https://www.maheshnaik.com/mahabharatatil-vivah/
महाभारतातील विवाह - महाभारत
सुमारे एक लक्ष श्लोक असलेले महाभारत हे केवळ भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठे आर्ष महाकाव्य आहे. “यदिहास्ति तद्न्यत्र यन्नेहास्ति न कुत्रचित” म्हणजे यात जे आहे ते सर्वत्र आहे, पण यात जे नाही ते इतर कोठेच नाही अशी याची ख्याती आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर माउलींनी देखील “व्यासोच्छिष्ट्म जगत सर्वम” म्हणजे व्यासांनी सर्व जगच उष्टे करून ठेवले आहे असे गौरवोद्गार काढले आहेत.
भारतीय विवाह संस्थेच्या प्रचलित आणि अप्रचलित परंतु ज्ञात, अशा विविध विवाह प्रकारांची पाळेमुळे देखील आपल्याला महाभारतात विविध ठिकाणी मुख्य कथानकांमध्ये व उप कथानकांमध्ये आढळून येतात. महाभारत घडले तेच मुळी अशाच एका आगळ्या वेगळ्या विवाह संबंधातून. त्याची सुरुवातही होते ते राजा शंतनूच्या वेगळ्या प्रकारच्या विवाहातून. शंतनूचा पहिला विवाह झाला तो गंगेशी. गंगा (महाभारतकार येथे मानवी रूपातील गंगा नदीचा उल्लेख करतात) शंतनुशी विवाहाला तयार होते तेच मुळी तिच्या अटींवर. या अटीतली मुख्य अट म्हणजे तिच्या कोणत्याही कृत्याचा जाब शंतनू तिला विचारणार नाही अशी. म्हणूनच जेव्हा ती एकापाठोपाठ एक असे ७ पुत्र जन्मल्यावर लगेचच नदीला अर्पण करते, तेव्हा शंतनूला गप्प बसण्यावाचून पर्याय नसतो. मात्र आठव्या पुत्राच्या वेळी तेच घडतंय हे पाहून शंतनूला राहवत नाही व तो तिला अडवतो आणि मग ठरलेल्या अटींप्रमाणे ती त्याला सोडून पुत्रासह निघून जाते. काही कालावधीनंतर पुत्र देवव्रताला व्यवस्थित शिक्षण देत राजा शंतनूकडे परत सोडते.

शंतनूची दुसरी पत्नी म्हणजे दाशराजकन्या सत्यवती. एकेकाळी मत्स्यगंधा या नावाने परिचित असलेली सर्वसाधारण कोळी जमातीच्या प्रमुखाची मुलगी. राजा शंतनूला ती आवडते पण तिचा पिता देखील तिचा विवाह एका समर्थ राज्याच्या राजाशी , शंतनुशी , करून द्यायला तयार होतो तेदेखील काही अटींवर. तिचा होणारा मुलगाच कुरुंचा उत्तराधिकारी ठरेल हि ती अट. यातूनच भीष्म प्रतिज्ञेचा जन्म होतो. राजकुमार देवव्रत आपल्या पित्याच्या इच्छेखातर राज्यावर तर पाणी सोडतोच, पण आजन्म अविवाहित देखील राहण्याची भीष्मप्रतिज्ञा करतो ते केवळ शंतनू व सत्यवतीच्या विवाह व्हावा म्हणून.
भीष्मांनी वर्णिलेले विवाहाचे आठ प्रकार
याच प्रतिज्ञेमुळे अविवाहित राहिलेल्या भीष्मांना पुढे आपल्या लहान सावत्र बंधूकरिता, विचित्रवीर्याकरिता , काशीराजाच्या कन्यांच्या स्वयंवरात भाग घ्यावा लागतो. सत्यवतीचा थोरला मुलगा चित्रांगद जेव्हा त्याच नावाच्या गंधर्वाकडून सीमायुद्धात मारला जातो तेव्हा कुमारवयात असणाऱ्या विचित्रवीर्याच्या विवाहाची जबाबदारी ओघानेच भीष्मांवर येऊन पडते आणि भीष्म काशी राज्यात जाऊन अंबा, अंबिका व अंबालिका या त्याच्या तीन राजकन्यांच्या स्वयंवरात भाग घेतात आणि तेथून या तीन कन्यांना उचलून रथात घालतात व जमलेल्या राजांचे युद्धाचे आव्हान स्वीकारतात.
आदिपर्वातील १०२व्या अध्यायात या घटनेचे वर्णन येते. याच वेळी भीष्म उपस्थित राजांना विवाहाचे ८ प्रकार सांगतात ते असे :
(१) वराला आमंत्रित करून कन्येला अलंकार घालून , यथोचित वरदक्षिणा देऊन केलेला विवाह म्हणजे ब्राह्मविवाह होय.
(२) जर वराकडून गोधन घेऊन त्याला कन्या दिली तर तो आर्ष विवाह होय.
(३) वराने मागितलेले धन (हुंडा ) देऊन जर कन्या अर्पण केली तर तो आसुर विवाह होय.
(४) कन्येला तिच्या इच्छेविरुद्ध पळवून नेऊन जर तिच्याशी विवाह केला तर तो राक्षस विवाह होय.
(५) परस्परसंमतीने वधू – वरानी केलेला विवाह म्हणजे गंधर्व विवाह होय.
(६) अमली पदार्थाच्या सेवनानंतर बेहोष झालेल्या कन्येला पळवून नेऊन तिच्याशी केलेला विवाह म्हणजे पैशाच विवाह होय.
(७) कन्येच्या पित्याकडे जाऊन रीतसर मागणी घालून त्याच्या अनुमतीने पण काहीच देवाणघेवाण न करता केला विवाह म्हणजे प्राजापत्य विवाह होय. आणि …..
(८) यज्ञामध्ये ऋत्विजाचे काम करून दक्षिण म्हणून कन्येची प्राप्ती करून केलेला विवाह म्हणजे दैव विवाह होय.
महाभारतात ‘स्वयंवर’ ही विवाह जमविण्याची पद्धत अनेकदा आढळून येते. यात कन्येला पती निवडण्याचे स्वातंत्र्य असले तरी यातील निवड बरेचदा ‘पण’ लावून केली जाई व हा ‘पण’ पूर्ण करणारा पुरुष त्या कन्येच्या पसंतीला उतरणारा असेलच याची खात्री नसे. या पद्धतीत “पण” जिंकलेला वर, कन्येशी ब्राह्मविवाह करत असला तरी या स्वयंवरातून कधी कधी राजे आपल्या सामर्थ्याच्या बळावर स्वयंवर मंडपातून कन्येचे तिच्या इच्छेविरुद्ध हरण करीत. यासाठी त्यांना तिथे जमलेले राजे, त्या कन्येचा पिता, बंधू , आप्तेष्ट यांचा पराभव करावा लागे आणि मग हा राक्षस विवाहाचा प्रकार ठरे. यात क्षत्रियाचा पराक्रम सिद्ध होत असल्याने हा विवाहप्रकार क्षत्रियांसाठी श्रेष्ठ मानला गेला आणि म्हणूनच भीष्मांनी देखील काशीराजकन्याना पळविताना याच मार्गाचा अवलंब केला आणि त्याचवेळी त्यांनी जमलेल्या राजांचा पराभव केला.
यात भीष्मांनी कन्या स्वतःसाठी पळविल्या नव्हत्या तर त्यांनी त्या आपल्या सावत्र बंधूंसाठी, विचित्रवीर्यासाठी, पळविल्या होत्या. त्यातील अंबिका व अंबालिकेने विचित्रवीर्याशी विवाह करणे मान्य केले पण थोरल्या अंबेने मात्र आपल्या प्रियकराकडे, सौभराज शाल्वाकडे जाण्याची इच्छा बोलून दाखविली व भीष्मांनी ती मान्य देखील केली. पण जेव्हा भीष्मांकडून या स्वयंवराच्या वेळी पराभूत झालेल्या मानी शाल्वाने तिचा स्वीकार केला नाही, तेव्हा तिचा सूडाग्नी चेतविला गेला तो मात्र भीष्मांविरुद्ध. त्यांच्या मृत्यूच्या इच्छेनेच तिने पुढे शिखंडीनी म्हणून स्त्रीजन्म घेतला आणि जी पुढे शिखंडी रूपात पुरुष म्हणून महाभारत युद्धात लढताना भीष्मांच्या पतनाला कारणीभूत ठरली.
महाभारताच्या महारण्यात शिरताना विवाहांची विविध रूपे आपल्याला पाहायला मिळतात. यातील पांडूचा कुंतीशी झालेला विवाह हा स्वयंवरातील परस्परसंमतीने झालेला विवाह आहे व म्हणूनच तो ब्राह्मविवाह प्रकारात मोडतो तर त्याचा दुसरा म्हणजे मद्रकन्या माद्रीशी झालेला विवाह म्हणजे मद्राना भरपूर द्रव्य कन्याशुल्काच्या रूपात देऊन केलेला आर्षविवाह. याचप्रकारे पांडूचा मोठा बंधू अंध धृतराष्ट्राचाही विवाह गांधारच्या सुबल नरेशाची कन्या गांधारीशी झालेला आढळतो. हे दोन्ही विवाह भरपूर द्रव्य देऊन भीष्मांनी घडवून आणले आहेत.
धृतराष्ट्र व पांडू यांची संतती म्हणजेच कौरव व पांडव. पैकी पांडवांचा जन्मच मुळी अरण्यातील. पांडवांच्या बालपणाच्या सुरुवातीचा काळ देखील पर्वतीय प्रदेशात गेला. मात्र पांडूच्या आकस्मिक निधनानंतर माद्री सती गेली व कुंती पाचही मुलांसह हस्तिनापुरी परतली.
यानंतरचा कालावधी एका सुप्त वैराचा कालावधी आहे. आपल्या राज्याच्या अधिकारात पांडव हे वाटेकरीच नव्हे तर श्रेष्ठ दावेदार ठरू पाहताहेत हे लक्षात येताच कौरवांनी, त्यातही दुर्योधन दुःशासनानी त्यांना आपल्या मार्गातून हटविण्याचे बरेच प्रयत्न केले. त्यातलाच एक प्रयत्न होता वारणावत येथीस लाक्षागृहात पांडवांना त्यांच्या कुंतीमातेसह जाळून मारण्याचा. मात्र विदुराच्या सावधपणामुळे पांडव या लाक्षागृहाला पडलेल्या भुयारातून गुपचूप निसटले.
यानंतर कुंतीसह रानोमाळ फिरणाऱ्या पांडवांची अरण्यात गाठ पडली ती राक्षसकन्या हिडिंबेशी. दोन भिन्न जमातीची ही माणसे. पांडव राजकुलीन मानव तर हिडिंबा राक्षसकुळातील. मात्र हि हिडिंबा त्यातील धडधाकट पांडवावर, भीमावर , मोहित होते व पांडवांना मारण्याऐवजी यातील भीमाने आपल्याशी विवाहबद्ध व्हावे अशी गळ घालते. भीम तिच्या भावाशी युद्ध करून त्याला ठार मारतो पण तरीदेखील ती भीमाशी विवाहबद्ध होण्यासाठी कुंतीलाही विनविते व मग काही अटींवर कुंती देखील या विवाहाला संमती दर्शविते आणि भीम – हिडिंबेचा गंधर्व विवाह संपन्न होतो. पांडवांपैकी कुण्या एकाचा हा पहिलाच विवाह, मात्र दूरगामी परिणाम करणारा. राक्षसकुळाशी संबंध प्रस्थापित करणारा. यातून जन्मलेल्या भीम व हिडिंबेच्या पुत्राने – घटोत्कचाने – महाभारत युद्धात नंतर पांडवांच्या बाजूने आपल्या राक्षस सेनेसह भाग घेत, कर्णाच्या अर्जुनासाठी राखून ठेवलेल्या शक्तीला वाया घालविण्यासाठी वीरमरण पत्करले व पांडवांच्या महाभारत युद्धातील विजयाचा मार्ग प्रशस्त केला.
कृष्ण रुक्मिणी विवाह – प्रेमविवाह कि राक्षस विवाह ?
कृष्ण रुक्मिणी विवाह हा प्रेमविवाह असल्याची सर्वमान्य समजूत आहे. रुक्मिणीने कृष्णाला सुदेव नावाच्या ब्राह्मणांमार्फत निरोप (प्रेमपत्र ?) पाठवून त्याला कुंडिनपुरात बोलावून घेतले. तिथे तिचा विवाह शिशुपालाशी होणार होता. विवाहाच्या पूर्वसंध्येला आपण कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊ, तेथून आपल्याला पळवून न्यावे अशी विनंती तिने श्रीकृष्णाला केली होती अशी सर्वसाधारण कथा आपण ऐकलेली असते. पण त्यामागील सत्य व तथ्य जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला महाभारताच्या खिलपर्वात म्हणजेच हरिवंशात डोकावावे लागते. आणि मग आपल्या लक्षात येते कि कृष्णाने रुक्मिणीचे केलेले हरण हा राक्षसविवाह आहे.
हरिवंशानुसार प्रथम हे स्वयंवर आयोजिल्याचे कृष्णाला हेरांद्वारे कळल्यावर कृष्ण या लग्नाला उपस्थित राहायचे ठरवतो. कृष्ण अभिषिक्त राजा नाही म्हणून तो या स्वयंवरात भाग घेऊ शकत नाही असा आक्षेप इतर राजे नोंदवतात तेव्हा कुंडीनपूर जवळील विदर्भ देशाचे राजे क्रथ व कौशिक हे आपलं राज्य कृष्णाला अर्पण करत त्याला राज्याभिषेक करतात. मग मात्र पेच प्रसंग निर्माण होतो व याचं पर्यवसान युद्धात होऊ नये म्हणून रुक्मिणीचा पिता राजा भीष्मक ते स्वयंवरच रद्द करतो व पुन्हा काही कालावधीनंतर चेदिराज दमघोषाचा पुत्र व जरासंधाचा सेनापती आणि मानसपुत्र असलेल्या शिशुपालसोबत हा विवाह ठरवितो, म्हणून यावेळी श्रीकृष्ण येतो तो आपल्या आतेभावाच्या, शिशुपालाच्या विवाह समारंभात. त्यामुळे त्याच्यासह सर्व यादवांचा तळ मात्र नगराबाहेरच आहे आणि याच ठिकाणच्या जवळ असलेल्या कुलदेवतेच्या दर्शनाला रुक्मिणी आलेली असताना पहिल्यांदा श्रीकृष्णाच्या दृष्टीस पडते.
रुक्मिणीहरण व तिचा कृष्णाशी विवाह हि श्रीकृष्णाच्या दृष्टीने राजनैतिक दृष्ट्या महत्वाची घटना आहे. असे केल्याने कृष्णाच्या विरोधी गटातील व द्वारकेवर वारंवार चालून येणाऱ्या जरासंधाच्या गटातील एका प्रभावशाली राजाचा , भीष्मकाचा व त्याच्या पुत्राचा रुक्मिचा , विरोध कमी होतो. जरासंध विरोधी लढ्यात त्याची मदत या विवाहामुळे होणार नसली तरी त्याचा त्रास तरी होऊ शकणार नाही हि या संबधामागची मेख आहे. आणि असे केल्याने आपला पुरुषार्थ सिध्द होऊन जरासंधाच्या गटातील राजांचा जळफळाट होईल हेदेखील उघड होते. आणि रुक्मिणी सुंदर असल्याने या विवाहाद्वारे हे अनमोल रत्न श्रीकृष्णाच्या हाती लागत होते.
याच विचाराने कृष्ण शिशुपाल विवाहाच्या वेळी आपल्या सेनेसह उपस्थित राहिला होता. बलराम व इतर यादव सेनानी त्याच्याबरोबर होते. रुक्मिणी कुलदेवतेच्या दर्शनाला आली तेव्हाच कृष्णाने तिला पहिले व तेथेच पक्का निर्धार केला तिला पळविण्याचा. एका झटक्यात निर्णय प्रक्रिया झाली , रथाला अश्व बांधले गेले या समस्त यादव सेनेला सज्जतेचा आदेश दिला गेला. रुक्मिणी देवळातून पूजा करून येईस्तोवर यादव सेना सज्ज झाली. रुक्मिणीला काही समजण्यापूर्वीच ती देवालयातून बाहेर येताच कृष्णाने रथ तिच्याजवळ नेत तिला रथात घातली व रथ पळवायला सुरुवात केली. असे काही होईल याची कल्पना नसलेले अल्पसे संरक्षक दल प्रतिकार करू पाहताच तो प्रतिकार बलराम व यादव सेनेने मोडून काढला आणि त्यातील काही जीव वाचवून हि बातमी सांगायला राजवाड्यात गेले.
रुक्मिणीला कृष्णाने पळविली हि बातमी ऐकून संतप्त झालेला शिशुपाल व त्याच्या गटातील राजे पाठलागावर निघाले पण यादवसेनेने त्यांना रोखून धरत त्यांचा पराभव केला. रुक्मिणीचा भाऊ रुक्मि तर कृष्णाला मारून रुक्मिणीला सोडवेन तरच कुंडिनपुरात पाऊल ठेवेन अशी घोर प्रतिज्ञा करून निघाला. नर्मदेच्या काठाने द्वारकेकडे जाणाऱ्या कृष्णाला त्याने काही अंतरानंतर गाठले. पण पराक्रमी कृष्णाने त्याचा पराभव तर केलाच पण रुक्मिणीच्या विनंतीवरून त्याला जीवदान देखील दिले. अपमानित रुक्मि पुन्हा कुंडिनपुरात न जाता भोजकट नावाचे वेगळे शहर वसवून राहिला. अशा रीतीने रुक्मिणीला पळवून कृष्णाने तिच्याशी जो विवाह केला त्याचे वर्णन हरिवंशात राक्षस विवाह म्हणूनच येते.
अर्जुनाचे विविध विवाह
द्रौपदी स्वयंवराचा पण जिंकणाऱ्या अर्जुनाने व त्याच्या इतर चार बंधूनी द्रौपदीशी केलेला विवाह एक आगळावेगळा विवाह आहे. हा विवाह घडवून आणण्यासाठी महाभारतकार व्यासांनाही बऱ्याच करामती कराव्या लागल्या. पांडवांमधील एकजूट टिकवून ठेवण्यासाठी पाचही पांडवांचा एका द्रौपदीशी विवाह घडणे आवश्यक होते. बहुपत्नीत्व हे त्याकाळच्या समाजात सर्वमान्य असले तरी बहुपतित्व मात्र प्रचलित नव्हते. पांडवांचे बालपण ज्या पर्वतीय प्रदेशात गेले होते, त्या प्रदेशात बहुपतित्वाची हि पद्धत सर्वसाधारण असली, तरी आर्यावर्तात मात्र रूढ नव्हती. म्हणूनच व्यासांनी राजा द्रुपदाची समजूत काढून त्याला राजी करण्यासाठी द्रौपदीच्या मागील जन्मातील शंकराने दिलेल्या वरदानाचा आश्रय घेतला, आणि एका द्रौपदीचा पाच पांडवांशी विवाह घडवून आणला व या प्रकाराला देखील समाजमान्यता मिळवून दिली.
नंतर पुढे खांडवप्रस्थात पांडव आल्यानंतर त्यांनी नारदांच्या सांगण्यावरून पांडवांनी द्रौपदी बरोबरच्या एकांतात दिवसांची वाटणीचा कालावधी निश्चित केला व या एकांत भंगाचे प्रायश्चित म्हणून १२ वर्ष वनवासाची शिक्षापण निश्चित केली. दुर्दैवाने एका ब्राम्हणाच्या चोरांनी पळविलेल्या गायी सोडविण्यासाठी शस्त्र हवीत यासाठी अर्जुनाकडून युधिष्ठिराच्या एकांत काळाचा भंग झाला व त्याच्याच नशिबी हा वनवास आला. या वनवासाच्या काळात अर्जुनाने उलुपी या नागकन्येशी व चित्रांगदा या मणिपूरच्या राजकन्येशी विवाह केलेला आढळतो. या विवाहापासून त्यांना अनुक्रमे इरावान व बभ्रुवाहन असे दोन पुत्र झाले. यानंतरचा त्याचा विवाह आहे तो श्रीकृष्णाची भगिनी सुभद्रेशी. या राक्षस विवाहाची म्हणजेच सुभद्राहरणाची कहाणी देखील बरीच उत्कंठावर्धक आहे.
अर्जुनाचे सुभद्राहरण
आपल्या वनवासादरम्यान देशोदेशी भ्रमंती करत अर्जुन भारत वर्षाच्या पश्चिमेला प्रभास क्षेत्राजवळ पोहोचला. इथे त्याचा सखा श्रीकृष्ण त्याला भेटला. याच ठिकाणी आपल्या सख्यांसोबत विहाराला आलेली सुभद्रा त्याच्या दृष्टीस पडली व त्याचे चित्त हरपले. त्याची हि स्थिती श्रीकृष्णाच्या लक्षात आली व त्याने ती आपलॆच बहीण असल्याचे सांगताच तो वरमला. त्याच्या मनाची स्थिती समजून चुकलेल्या श्रीकृष्णाला हा नातेसंबंध हवाच होता. अर्जुनाने कृष्णाजवळ तिच्या स्वयंवराबद्दल विचारणा केली तेव्हा धूर्त कृष्णाने त्याला सांगितले कि स्त्रियांच्या मनाचा काय भरवसा ? त्या कधी कुणावर भाळून त्याच्या गळ्यात माल घालतील हे काही सांगता यायचे नाही, त्यापेक्षा तू तिला पळवून न्यावेस हेच उत्तम, बाकीचे सर्व मी पाहून घेईन.
मग अर्जुनाने खांडवप्रस्थाकडे दूत पाठवून या विवाहासाठी युधिष्ठिराची अनुमती घेतली. ती मिळताच कृष्णार्जुनानी सुभद्राहरणाची योजना आखली. अर्जुन यावेळी द्वारकेतच कृष्णासोबत राहात होता व एके दिवशी सुभद्रा रैवतक पर्वतावर देवदर्शनाला जाणार असे समजताच अर्जुनाने त्याच दिवशी मृगयेचा बेत आखला. कृष्णाने त्या निमित्ताने त्याला आपला वेगवान रथ व शस्त्रास्त्रे देऊ केली. आणि मग योजनेबरहुकूम अर्जुनाने रैवतक पर्वतावरून सुभद्रेला आपल्या रथात घालून पळवून नेले.
यादवांना द्वारकेत हि बातमी काळातच यादव कुळातील एका मुलीला पळविल्याचे
कळताच सर्व यादव खवळून उठले व त्यांनी तातडीने त्यांची सुधर्मा राजसभा
भरवली. यात सर्व यादव तावातावाने अर्जुनाचा बिमोड करण्याविषयी व सुभद्रेला
सोडवून आणण्याविषयी बोलू लागले. श्रीकृष्ण मात्र शांत होता. त्याचा हा
शांतपणा पाहून बलरामाने इतर यादवांचे त्याकडे लक्ष वेधले व त्याचाही विचार
घेण्याविषयी सुचविले. त्यावर श्रीकृष्णाने उसळलेल्या बलरामाचे व इतर
यादवांचे शांतवनच केले नाही तर त्याने सुभद्रेसह अर्जुनालादेखील स्वीकारणे
कसे यादवांच्या हिताचे आहे हे त्याने पटवून दिले. यासाठी त्याने सुधर्म
राजसभेसमोर पुढील मुद्दे मांडले
(१) अर्जुनाला सुभद्रेशी स्वयंवरमंडपात लग्न करता आले असते पण ती आपलायचं
गळ्यात माल घालेल याची त्याला खात्री नसावी म्हणूनच त्याने तिला पळवून
न्यायाचे ठरविले असावे.
(२) क्षत्रियांचा अजून एक विवाह प्रकार म्हणजे आर्षविवाह. यात वधूपक्षाला
म्हणजे यादवांना धन देऊन अर्जुनाला सुभद्रेशी विवाह करता आला असता, पण यादव
द्रव्यलोभी नाहीत व म्हणूनच मुलीची अशी विक्री करण्यास ते कदापि तयार
होणार नाहीत अशी अर्जुनाला खात्री असावी म्हणूनच त्याने या मार्गाचा अवलंब
केला नसावा. यावरून त्याचे यादवांविषयीचे मत किती उच्चीचे आहे हेच दिसून
येते.
(३) कुरुंच्या थोर कुळात जन्मलेल्या अर्जुनाने यादव कुळातील सुभद्रेला
पळविली आहे. शिवाय तो आमच्या कुंती आत्याचा पुत्र आहे. कुलाचाराप्रमाणे
देखील हा विवाह शास्त्र संमत व बरोबरीचाच ठरतो आणि सुभद्रा एका चांगल्या
कुळातच पडली आहे.
(४) अर्जुन एक प्रतिष्ठित व पराक्रमी धनुर्धर आहे. त्याला अनेक
अस्त्रविद्या देखील ज्ञात आहेत. जर तुम्ही त्याचा पाठलाग केलात आणि त्याला
युद्धासाठी ललकारल्यावर त्याने एकट्याने तुमचा पराभव केला तर यादवकुळाची
नाचक्कीच होईल.
अशा प्रकारे धूर्तपणे श्रीकृष्णाने अर्जुन व सुभद्रेला सन्मानपूर्वक माघारी
बोलवून त्यांचा समारंभपूर्वक विवाह लावून देण्याची योजना यादवांच्या गली
उतरवली. आणि सर्व यादव शांत होत या विवाहाला तयार झाले.
या विवाहानंतर अर्जुन आपल्या वनवासाचा १२ वर्षाचा कालावधी पूर्ण करण्याकरिता अजून १ वर्ष द्वारकेतच राहिला व हा कालावधी पूर्ण झाल्यावरच खांडवप्रस्थात परतला. इतक्या वर्षांनी, ते देखील कृष्णाची सावत्र भगिनी असलेल्या सुभद्रेला पत्नी म्हणून स्वीकारत तिच्यासह परतलेल्या अर्जुनावर व सुभद्रेवरदेखील द्रौपदीचा रोष असणे स्वाभाविक होते. परंतु तो घालविण्यासाठी अर्जुनाने सुभद्रेला गोपीचं वेष परिधान करून द्रौपदीला भेटायला पाठविले व तिने देखील द्रौपदीला “मला तुमची दासी समजा” असे म्हणत द्रौपदीचे मन जिंकले.
अभिमन्यू – उत्तरा विवाह – एक राजकीय संबंध
यानंतर महाभारतात राजसूय यज्ञ व त्यासाठी युधिष्टिराच्या ४ बंधूनी चारी दिशांना केलेल्या दिग्विजयाचे वर्ण येते. या यज्ञाच्या वेळी शिशुपालाचा कृष्णाने वध केला. याचवेळी पांडवांचे वैभव पाहून दुर्योधन द्वेषाने भरला. पांडवांचा सूड घेत त्यांचे वैभव कसे धुळीला मिळविता येईल याचा विचार त्याने सुरु केला. यातच त्याच्या मामाने, शकुनीने मांडलेला द्यूतक्रीडेचा प्रस्ताव त्याला पसंत पडला. हि योजना त्याने धृतराष्ट्राच्याही गली उतरवली व पांडवांना व विशेषतः युधिष्ठिराला द्यूताचे आव्हान दिले. यानंतर जे घडले ती महाभारत युद्धाची नांदीच होती असे म्हणावे लागते. द्रौपदी वस्रहरणाचा सर्वज्ञात प्रसंग घडला तो याच प्रसंगी.
द्यूतक्रीडेत हरलेल्या पांडवांना १२ वर्षाचा वनवास व १ वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला. यातील अज्ञातवासाच्या काळात पांडव विविध रूपे घेऊन मत्स्य देशाच्या विराट राजाच्या पदरी राहिले. यावेळी अर्जुन इथे एका तृतीयपंथी नृत्यशिक्षकाच्या , बृहन्नडेच्या , वेशात विराटराजाच्या कन्येला , उत्तरेला, नृत्य शिकविता राहिला. महापराक्रमी पांडव आपल्या दरबारात राहून आपली सेवा करीत होते या कौरवांनी केलेल्या गोधन हरण प्रसंगी त्यांनीच आपले रक्षण केले हे नंतर मत्स्यराज विराटाला कळताच तो ओशाळला व त्या बदल्यात त्याने आपली कन्या उत्तरा, अर्जुनाला देण्याची इच्छा बोलून दाखविलीय. पण वयाने ती आपल्या कन्येप्रमाणे व नात्याने ती आपली शिष्या असल्याचे सांगत अर्जुनाने आपल्या पुत्रासाठी, अभिमन्यूसाठी तिला मागणी घातली, जी राजा विराटाने आनंदाने मान्य केली. पांडवांसाठी दुर्योधन त्यांचे राज्य परत देणार नाही व त्यासाठी युद्ध करावे लागेल हे स्पष्ट दिसत होते व त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त राजे आपल्या बाजूने वाळविणे या त्यांना घट्ट नातेसंबंधाने बांधून ठेवणे आवश्यक होते. पुढे पांडवांच्या विजयासाठी ते एक मोठे कारण ठरले. कौरवांच्या बाजूने लढणारी बहुतांश सेना दुर्योधनाच्या बाजूने लढली तरी त्यातील बऱ्याच सेनानायकांना सर्वसमावेशक ध्येय नव्हते. पांडवांच्या बाजूने मात्र त्यांचे सगेसोयरे म्हणजे पांचाल , विराट, यादवांचा एक गट व स्वतः श्रीकृष्ण , असल्याने पांडवांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्याचे ध्येय या सर्वांसमोर होते आणि म्हणूनच त्यांचा जय झाला.
कुरुंचे वंशज कि व्यासपुत्र ? - महाभारत -
हस्तिनापुरात विचित्रविर्याचा मृत्यू झाल्यावर सत्यवती वर मात्र आभाळ कोसळलं. विचित्रवीर्य देखील अपत्यहीन मृत्यू पावल्याने आता हस्तिनापूरच्या गादीला वारस उरला नव्हता, व त्यामुळेच आता ज्या राज्याच्या मोहाने सत्यवतीने भीष्मप्रतिज्ञा घडवून आणली होती, तेच राज्य निर्वंश होण्याचा धोका निर्माण झाला. व ते टाळण्यासाठी सत्यवतीने भीष्मालाच आपलं ब्रह्मचर्य व्रत मोडण्याची विनंती केली.
ही विनंती भीष्मांनी अर्थातच अमान्य केली. यात महाभारतकार भीष्मांच्या वयाचा विचार मात्र मुळीच मध्ये आणत नाहीत. ते केवळ आपल्यासमोर मांडतात ते सुमारे ८० वर्षे वयाच्या भीष्मांचा प्रतिज्ञा पालनाचा निग्रह.
भीष्मांनी मग आपल्या मातेला यातून एक मार्ग सुचविला व तो म्हणजे एखादा सुयोग्य ब्राह्मण बघून अंबिका व अंबालिकांशी नियोग घडवून आणण्याचा. तत्कालीन समाजामध्ये, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये, संततीप्राप्तीचा नियोग हा सर्वमान्य व धर्ममान्य मार्ग होता. यावर सत्यवतीने देखील आपल्या पुत्राला, भीष्माला, आपल्या विवाहपूर्व पराशर ऋषींसोबतच्या संबंधांची व त्यातून जन्मलेल्या कृष्णद्वैपायन या कानीन पुत्राची गोष्ट सांगितली, तेव्हा ही भीष्मांना यात काही वावगे असल्याचे जाणवले नाही. याउलट कनिष्ठ भ्राता व अधिकारी ब्राह्मण या न्यायाने व्यासांना नियोगासाठी पाचारण करणे योग्य ठरेल, असा निर्वाळा देखील भीष्मानी सत्यवतीला दिला.
सत्यवतीच्या क्षत्रियकुलीन असण्याचे महत्व
या ठिकाणी महाभारतकारांनी सत्यवतीला क्षत्रिय कुलीन ठरविण्याचे महत्त्व पुन्हा एकदा आपल्या लक्षात येते. ती जर हीन कुलीन ठरवली गेली असती तर, पिता ब्राह्मण (पराशर) व हीन कुलीन माता सत्यवती यांची संतती असलेले कृष्णद्वैपायन देखील हीन कुलीन ठरले असते. महाभारतकारानी सत्यवती हि राजा उपरिचर वसूची क्षत्रिय कन्या असल्याची कथा अगदी जाणीवपूर्वक रचल्याचे यावरून आपल्या लक्षात येते.
भीष्मांचे मत विचारात घेत व नियोगासाठी व्यासांना पाचारण करण्यासाठी भीष्मांची संमती मिळवली सत्यवतीने सुनांद्वारे नियोग पद्धतीने राज्याचा वारस मिळविण्याचे ठरविले खरे, पण यासाठी तिने आपल्या सुनांची, अंबिका अथवा अंबालिकेची संमती मात्र गृहीत धरली होती. सुरुवातीला या प्रकारे परपुरुषाकडून संतती निर्मितीला त्या तयारच नव्हत्या. पण सत्यवतीच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही व त्या नाईलाजास्तव राजी झाल्या. सत्यवतीने व्यासांना पाचारण केले (व ते प्रकट झाले असे महाभारत सांगते). ते हजर होताच सत्यवतीने त्यांना बोलावण्याचे प्रयोजन सांगितले. तेव्हा त्यांनाही काहीसा धक्का बसला व आपल्याला व तसेच सत्यवतीच्या सुनेला देखील मानसिक व शारीरिक तयारी करण्याकरता एक वर्षाचा कालावधी लागेल असे त्यांनी सांगितले. पण सत्यवती एवढा काळ वाट पाहायला तयार नव्हती. अशा प्रकारे विना-वारस वेळ घालविल्यास प्रजेत अराजक माजेल, राज्य निर्नायकी राहिल, या कारणास्तव एवढा वेळ थांबण्यास तिने व्यासांना नकार दर्शविला. लगेचच नियोग विधीची रीतसर घोषणा करण्यात आली.
व्यासांचे उग्र रूप
अंबिकेची समागमाची मानसिक तयारीच नव्हती. तिला नक्की कुणाशी समागम करायचा आहे याची देखील कल्पना नव्हती. तिचा दीरच समागमासाठी येईल असे सांगण्यात आले तेव्हा तिच्या मनात भीष्मांची प्रतिमा होती, पण प्रत्यक्षात पलंगावर तयार असणाऱ्या अंबिकेच्या समोर उभे राहिले ते, कृष्ण वर्णाचे, पिंगट जटांचे, तारट डोळ्यांचे, पिंगट दाढी-मिशांचे व बेढब अंगाचे, व्यास (होय, व्यासांचे असेच वर्णन महाभारतकारांनी म्हणजे खुद्द व्यासांनीच करून ठेवले आहे). आणि या अशा अवताराला घाबरून अंबिकेने आपले डोळे घट्ट मिटून घेतले व ती केवळ शरीराने त्या प्रक्रियेला सामोरे गेली. अंबिकेच्या पुत्राचे धृतराष्ट्राचे अंधत्व, हा याच घट्ट डोळे मिटुन घेण्याचा परिणाम होता, असे व्यासांनी सत्यवतीला लगेचच सांगितल्याचे महाभारतकार आपल्याला सांगतात.
यानंतर लगेचच व्यास तिथून निघून गेले. यथावकाश अंबिकेला जो पुत्र झाला तो जन्मांध निपजला. तो म्हणजेच धृतराष्ट्र. त्याच्या अंधत्वामुळे भविष्यात त्याला राज्यकारभार करता येणार नाही म्हणून, सत्यवतीने पुन्हा एकदा व्यासांना पाचारण केले. यावेळी अंबालिकेची पाळी होती. अंबिकेचा अनुभव गाठीशी होताच, पण अंबालिका देखील व्यासांना पाहताच भीतीने पांढरीफटक पडली. त्यामुळे तिच्याशी समागम केल्यानंतर होणारा पुत्र पांडूवर्णी होईल, असे व्यासांनी सांगितले. अंबालिकेला दिवस भरताच खरोखरीच तिला एक पांडूवर्णी (त्वचेचा रंग असणारा) पुत्र झाला असे महाभारतकारानी नोंदविले. हाच पांडू याच नावाने प्रख्यात झाला.
या दोन्ही कुमारांमध्ये व्यंग असल्यामुळे
सत्यवतीने पुन्हा एकदा व्यासांना आवाहन / पाचारण केले व अंबिकेला तयार
राहण्यास सांगितले. पण सुमारे दीड-दोन वर्षांपूर्वीचा भीतीप्रद अनुभव
गाठीशी असल्याने तिने सत्यवतीला जरी होकार दिला तरी प्रत्यक्ष समागमासाठी
आपल्या एका दासीला अलंकारिक वस्त्रे घालून पाठविले. त्या सुंदर दासीने आपले
कर्तव्य मनोभावे पार पाडले. कदाचित
पहिले दोन राजपुत्र मानले गेलेले व्यासपुत्र सव्यंग जन्मले व आपला पुत्र जर अव्यंग जन्मला तर कदाचित पुढेही त्याला राज्यकारभारात महत्त्वाचा वाटा मिळू शकेल या भावनेने देखील असावे. कारण काहीही असो, पण व्यास तृप्त झाले. आपली आपल्या सुनेकडून फसवणूक झाली हे सत्यवतीच्या लक्षात आले. व्यास मात्र एका अव्यंग पुत्राचे दान एका दासीच्या झोळीत टाकून गेले. पुढे दिवस भरल्यावर तिला जो पुत्र झाला तो होता महात्मा विदूर. अर्थातच दासीपुत्र असल्याने त्याला तत्कालिन प्रथेप्रमाणे राजपद काही मिळू शकणार नव्हते.
व्यासांचा महाभारतात वेळोवेळी हस्तक्षेप
या सर्व कथाभागात आपल्या लक्षात काही गोष्टी येतात त्या म्हणजे, अंबिकेचा पुत्र अंध उपजला हे त्याच्या जन्मानंतरच लक्षात आले. पण तो तसाच निपजणार हे व्यासांकडून वदविणे म्हणजे व्यासांना भविष्यकाळाचे ज्ञान होते असे दर्शविणे होय. तसे खरेच असते तर अंबालिकेकडून पुत्र प्राप्ती करून घेण्यासाठी, धृतराष्ट्र जन्माची वाट पाहण्याची आवश्यकता नव्हती. व वाट पाहायची होती तर आधी व्यासांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनाही व्यवस्थित नीटनेटक्या रुपात स्वतःला अंबालिकेसमोर येता आले असते व तिचा पुत्र मग पांडूवर्णीय न निपजता.
हीच गोष्ट तिसऱ्या वेळेची. पण त्याही वेळी ते एखाद्या राजकन्येला घृणा येईल अशा अवतारात होते. व त्याचमुळे राज्याचा उत्तराधिकार पणाला लागला असल्याचे ठाऊक असून देखील, अंबिकेने स्वतः न जाता दासीला त्यांच्याकडे पाठविणे पसंत केले. म्हणजे वर्षभराच्या अंतराने जन्माला आलेल्या धृतराष्ट्र व पांडू यांच्या जन्मासंबंधी महाभारतकारांनी आपल्याला व्यासमुखातून सांगितलेले भाकीत म्हणजे नंतरच्या काळात घुसविलेला प्रक्षेप असावा असे वाटते.
पण इथून पुढे सुरु होते ती कहाणी केवळ कुरु वंशाचीच नसून व्यासांच्या पुत्रांचीही असल्याने महाभारत कथेमध्ये वेळोवेळी होत असणारा व्यासांचा हस्तक्षेप हा केवळ महाभारतकार असा नसून तो एक पिता व पितामह असा देखील असल्याचे आपल्या लक्षात येईल.
_________________________________________________________________________________
संदर्भ : प्रचलित आवृत्ती अध्याय १०५ व १०६, चिकित्सक आवृत्ती – अध्याय १००
अंबा – शिखंडी : बादरायण संबंध - महाभारत - महाभारत कथा
अंबेचा सूडाग्नी
भीष्मांच्या परवानगीने मोठ्या आनंदाने अंबा आपल्या प्रियकराकडे, सौभराज शाल्वाकडे निघाली. तिला सोबत करण्याकरता भीष्मांनी वृद्ध ब्राह्मण, पुरोहित व काही दासी सोबत दिल्या होत्या. पण शाल्वाकडे पोहोचताच मात्र तिचा भ्रमनिरास झाला. भीष्माने स्वयंवरात सर्व क्षत्रियांचा पराभव करून जिंकलेल्या आंबेला स्वीकारायला शाल्वाने स्पष्ट नकार दिला व तिला तेथून निघून जाण्यास सांगितले.
अतिशय दुःखद मनाने अंबा तेथून निघाली व नगरा बाहेरील वनात एका ऋषी समूहांच्या आश्रमात गेली. दोष नक्की कुणाचा हेच न समजल्याने, तिने प्रथम भीष्माला वेळीच शाल्वावरचे आपले प्रेम न सांगितल्याने स्वतःला दोष दिला, नंतर आपले स्वयंवर मांडले म्हणून पित्याला दोष दिला, त्या स्वयंवरातून आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याला पळवून नेल्या बद्दल भीष्माला दोष दिला व नंतर आपल्याला झिडकारल्याबद्दल शाल्वाला दोष दिला. आपली कर्मकहाणी तिने सर्व आश्रमवासीयांना सांगितली व आपल्याला तेथेच आश्रय द्यायची तिने विनंती केली. तेव्हा ही तरुण मुलगी इथे कशी सुरक्षित ठेवावी व पुढे नक्की काय करावे या चिंतेने आश्रमवासीयांना देखील ग्रासले. आंबे च्या मनातील दुःखाची जागा हळूहळू संताप व सूडाच्या भावनेने घेतली व आपल्याला पळवून नेणाऱ्या भीष्मा विरुद्धच ही सुडाची भावना प्रबळ होऊ लागली. पण……. सूड घ्यायचा कसा?
अंबेचे भीष्मवधासाठी परशुरामांना साकडे
भीष्माने अंबेचे हरण केले त्यावेळी स्वयंवरात या तीनही कन्या भीष्मांसमोरून वरमाला घेऊन गेल्या होत्या व वृद्ध असल्याने त्यांनी त्याला वरमाला घातली नव्हती. तसेच इतर राजांनीही भीष्माची वृद्ध म्हणून हेटाळणी केली होती. असे असताना देखील या तीनही कन्यांनी व विशेषत शाल्वावर प्रेम असणाऱ्या अंबेने भीष्मांना त्याच वेळी हे सांगण्याचे धाडस केले नव्हते. कदाचित प्रथम तिला शाल्वाच्या पराक्रमावर भरवसा असावा, व नंतर भीष्माच्या क्रोधाची भीती वाटली असावी हस्तिनापूरला पोचल्यावर देखील अंबेने विचित्रवीर्याशी विवाह निश्चित होईपर्यंत वाट पाहिली व नंतरच अखेरच्या क्षणी धाडस करून भीष्माला शाल्वावरील प्रेमाची हकिकत सांगितली. त्यामुळे भीष्म, दुसऱ्या कुणावर तरी प्रेम करणाऱ्या मुलीचे विचित्रवीर्याशी लग्न लावणार नाही हे देखील निश्चित होते. बरं, भीष्माची लढण्यास सांगणार तरी कुणाला? नुकताच एकट्या भीष्माने स्वयंवर मंडपात सर्व क्षत्रिय राजांचा केलेला पराभव तिने पाहिला होता. त्यामुळे ती अधिकाधिक बेचैन होऊन संतापत होती. ती त्या आश्रमातील ऋषीमुनींचा उपदेशही ऐकत नव्हती व तेथून निघून ही जात नव्हती. अशा विचित्र परिस्थितीत ते आश्रमवासी असताना राजा होत्रवाहन त्या आश्रमात येऊन पोहोचला. तेथील चर्चेवरून त्याला या कन्येची, अंबे ची व्यथा कळली. आणि तीच आपल्या मुलीची मुलगी, म्हणजेच आपली नात असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तिचे सांत्वन करीत धीर दिला. राजा होत्रवाहन परशुरामांचा निकटवर्ती होता. व त्यामुळे परशुरामाचा शिष्य असलेल्या भीष्मांचा बंदोबस्त तो परशुरामाकडून करून घेईल अशी ग्वाही त्यांनी दिली. ते ऐकताच अंबेच्या सूडाच्या आशा पल्लवित झाल्या.
याच सुमारास परशुरामांचा अजून एक जवळचा शिष्य अकृतव्रण त्या आश्रमात येऊन पोहोचला. राजा होत्रवाहन व आश्रम वासियांनी त्याचा आदर सत्कार करत परशुरामाद्वारे अंबेला न्याय मिळवून देण्याची विनंती अकृतव्रणाकडे केली. परशुराम लवकरच आश्रमात येणार असून ते निश्चितच अंबेला न्याय देतील असे आश्वासन त्याने दिले.
पाठोपाठ परशुराम देखील त्या आश्रमात येऊन पोहोचले होत्रवाहन व अकृतव्रण या आपल्या निकटवर्तीयांकडून त्यांना अंबेची कर्मकहाणी कळली. भीष्म आणि शाल्व हे दोघेही आपले शिष्य असल्याने आपले ऐकतील या विश्वासाने त्यांनी अंबेला नक्की काय हवे त्याची निवड करण्यास सांगितले. यावेळी अंबेने भीष्माचा सूड हवा, असा आपला निर्णय जाहीर केला. तिला युद्ध हवे हे लक्षात येताच परशुरामांनी आपण सध्या धनुष्य खाली ठेवले असल्याचे तिला सांगितले. पण लगेचच अकृतव्रणाने त्यांना त्यांच्या “सर्व क्षत्रिय समुदायाला जो जिंकेल त्याला ठार मारण्यासाठी मी शस्त्र हाती घेईन” या प्रतिज्ञेची आठवण करून दिली व परशुरामाला भीष्माला निरोप पाठवणे भाग पडले. भीष्म तेथे पोहोचताच परशुरामांनी भीष्माला तोच सर्व अंबा प्रकरणाचे मूळ असल्याचे सांगत अंबेला स्वीकारण्याची आज्ञा केली. यावर प्रतिज्ञाबद्ध भीष्माने शाल्वासारख्या परपुरुषावर मन जडलेल्या कन्येला मी माझ्या बंधू साठी पण स्वीकारणार नाही असे ठामपणे सांगितले. दोघेही आपापल्या भूमिकांवर अडून बसल्याने आता युद्ध प्रसंगाला तोंड फुटणार हे निश्चित झाले.
भीष्म – परशुराम युद्ध
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे हे युद्ध कुरुक्षेत्रावर सुरू झाले. आपल्या शिष्याचा,भीष्माचा, आपण सहज पराभव करू शकू हा परशुरामांचा भ्रम भीष्माने आपल्या युद्ध कौशल्याने दूर केला. तब्बल 23 दिवस हे युद्ध सुरू राहिले. अखेरच्या दिवशी तर जेव्हा आपल्या प्रस्वाप अस्त्राने भीष्म परशुरामाचा वध करेल अशी परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा नारदाने मध्ये पडून हे युद्ध थांबवले. परशुरामांनी आपला पराभव मान्य केला. याचबरोबर अंबेची उरलीसुरली आशा देखील संपुष्टात आली आणि अंबा आणखीनच पिसाळली. तिने आसुरी तपश्चर्येचा मार्ग अवलंबिला. वायू भक्षण करीत, पाण्यात उभे राहून, असे विविध तपांचे मार्ग तिने अनुसरले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही तेव्हा सुमारे बारा वर्षांनी ती तीर्थयात्रेला निघाली. यातच तिची भेट भीष्माची माता गंगा हिच्याशी देखील घडली आणि तिनेही अंबेला शांत करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. आता हळूहळू “मी कुणाच्यातरी मदतीने मी भीष्मांचा वध करेन”, या ऐवजी “मी स्वतः भीष्माचा वध करायला हवा” अशी धारणा घेऊन ती तप करायला लागली आणि यातच शंकरांनी तिला “तू भीष्माचा रणात वध करशील” असा वर दिला. वरप्राप्ती होताच अंबा लगेच हुरळून गेली नाही. तिने आपल्या स्त्रीत्वाची जाणीव शंकरांना करून दिली. तेव्हा शंकराने तिला पुरुषत्वाची प्राप्ती होईल व त्या देहात देखील तुला या सर्व गोष्टींचे स्मरण राहील असा देखील वर दिला. असा वर मिळाल्यावर मात्र अंबेने मुळीच वेळ दवडला नाही आणि सर्वांसमक्ष रानातून लाकडे आणून, चिता रचून प्रज्वलित करत भीष्म वधासाठी अग्री समर्पण केले आणि एक सूडाग्नी काही कालावधीसाठी शांत झाला. कारण महाभारतकारांच्या म्हणण्यानुसार हीच अंबा पुढे द्रुपदाच्या घरी शिखंडी म्हणून जन्म घेणार होती.
इकडे हस्तिनापुरात…..
या सर्व कालावधीत हस्तिनापुरात काय घडत होतं अंबेच्या बहिणींचा, अंबिका व अंबालिका यांचा विवाह विचित्रवीर्याशी होऊन, त्या पुढील सात वर्षात त्याचा मृत्यूही झाला होता. सत्यवतीने व भीष्मांनी पुढाकार घेऊन घडवून आणलेल्या नियोगाने त्यांना धृतराष्ट्र व पांडू हे पुत्रही झालेले होते. अंबेच्या तपाची पहिली बारा वर्षे पूर्ण होईपर्यंत ही मुले चार-पाच वर्षांची झाली होती. त्यानंतरच्या, अंबेची तीर्थयात्रा, पुन्हा कठोर तपाचरण व त्यानंतरचे शंकराचे वरदान या कालावधीत ते कुमारवयीन झाले होते.
अंबा – शिखंडी बादरायण संबंध
महाभारतकारांनी अंबेची रचलेली कहाणी बराच काळ लांबविली आहे ते द्रुपदापर्यंत नेऊन पोहचविण्यासाठी. अन्यथा द्रोणांच्या बरोबरीचा द्रुपद, हा वयाने धृतराष्ट्र पांडू यांच्यापेक्षा काहीसा मोठा आहे. त्याला तसे भीष्मवधाचे प्रयोजन देखील दिसत नाही. पण कुरुंच्या शेजारील पांचाल हे एकच मोठे व सशक्त राज्य आहे. पांचालराज द्रुपदाचे आपला बालमित्र द्रोणाशी आलेले वैर ही नंतरची घटना आहे. आणि शिखंडी जर भीष्म वध करण्याएवढा शूर योद्धा असता तर द्रोण वधासाठी द्रुपदाने वेगळा पुत्र, ते देखील हवन करून का प्राप्त करून घेतला असावा ? ते देखील समजत नाही. बरं फक्त भीष्म वधासाठीच अंबेचा शिखंडी म्हणून जन्म झाला असे मानावे तर शिखंडीच्या हातून भीष्म वध घडलेला नाही. आणि अंबेच्या अग्नी प्रवेशाच्या वेळीच सत्तरीपार असणारे भीष्म आपल्या वयाच्या कितव्या वर्षी युद्धात सामोरे येणार हे तरी अंबेला ठाऊक होते का?
या सर्वांचा विचार करता अंबेचे शिखंडीच्या रूपात जन्म घेणे हा महाभारतकारानी जोडलेला बादरायण संबंध आहे असे माझे स्पष्ट मत आहे. याच शिखंडीच्या लिंगबदलाची कहाणी देखील तितकीच गूढ आडे व त्याचा रहस्यभेद याच मालिकेत योग्य वेळी होईलच.
___________________________________________________________________________________
संदर्भ : अम्बोपाख्यान पर्व : अध्याय १७२ ते १८७ प्रचलित आवृत्ती
स्वयंवरातील भीष्मपराक्रम - महाभारत - महाभारत कथा
दाशराजाचा होकार मिळाल्यावर सत्यवतीला रथात सोबत घेऊन राजपुत्र देवव्रत हस्तिनापुरात परतला व सर्व हकीकत पित्याला सांगून त्याने सत्यवतीला शंतनूच्या हवाली केलं. यानंतर शंतनू व सत्यवतीचा विवाह झाला.
या विवाहानंतर शंतनूपासून सत्यवतीला चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन पुत्र झाले. विचित्रवीर्य कुमार वयात असतानाच शंतनूचे निधन झाले. आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे भीष्मांनी तरुण चित्रांगदाला राज्याभिषेक केला. महाभारत आपल्याला सांगते कि चित्रांगद पराक्रमी होता, मात्र त्याचे चित्रांगद याच नावाच्या गंधर्वाशी युद्ध झाले. कुरुक्षेत्राजवळील हिरण्यवती (प्रचलित प्रतींनुसार सरस्वती नदी ) नदीच्या किनाऱ्यावर झालेले हे युद्ध सुमारे ३ वर्षे सुरु होते, म्हणजेच हा हस्तिनापूरच्या उत्तरेकडील भागातील सीमावाद असावा व वारंवार उफाळून येत असावा. मात्र असे असून देखील पराक्रमी व अजेय भीष्मांनी यात या ३ वर्षात हस्तक्षेप करून गंधर्वाला संपविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. याउलट या युद्धात अखेरीस चित्रांगद गंधर्वाकडून मारला गेला. त्यामुळेच या कालावधीत भीष्म राज्यकारभार चित्रांगदावर सोपवून बाजूला झाले असावेत असे दिसते. नियती मात्र भीष्मांना वारंवार हस्तिनापूरच्या राजगादीकडे वारंवार खेचत होती.
यानंतर अजूनही कुमारवयीन असणाऱ्या विचित्रवीर्याला भीष्माने राज्यावर बसविले आणि त्याच्या नावाने भीष्माने राज्यकारभार सुरु केला. विचित्रवीर्य तारुण्यात येताच सत्यवतीने व भीष्माने त्याच्या विवाहाचा विचार सुरु केला. याचवेळी काशीराजाने त्याच्या अंबा, अंबिका व अंबालिका या तीन राजकन्यांचे स्वयंवर मांडले असल्याचे कानी आले व विचित्रवीर्याला यात भरीस घालण्याऐवजी स्वतःच या स्वयंवराला हजेरी लावण्याचे ठरविले. कोवळ्या वयाच्या व हस्तिनापूरच्या गादीचा एकमेव वारस असणाऱ्या विचित्रवीर्याला, एकटेच स्वयंवराला पाठविल्यावर, इतर राजांच्या गराड्यातून एखादी राजकन्या घेऊन येणे हे त्याला शक्य होणार नाही याची सत्यवती व भीष्माला खात्री असावी. म्हणूनच भीष्म या स्वयंवरासाठी भीष्म एकटेच काशी राज्यात पोहोचले
भीष्मांचा स्वयंवरात उपहास
भीष्म ४० वर्षाचा असताना शंतनू व सत्यवतीचा विवाह झाला होता. त्यावेळचे शंतनूचेच वय ६८ वर्षांचे होते हे आपण या आधी पाहिले आहे. त्यानंतर त्याला उतारवयात झालेल्या चित्रांगद व विचित्रवीर्य या मुलांमध्ये देखील ४-६ वर्षाचे अंतर असावे असे दिसते. विवाहानंतर सुमारे १६-१७ वर्षांनी म्हणजे वयाच्या ८५ व्या वर्षी शंतनूचा मृत्यू झाला त्यावेळी चित्रांगद १६ वर्षाचा तरुण होता व तो गादीवर आला. यावेळी १०-११ वर्षाचा असणारा विचित्रवीर्य त्यानंतर जेव्हा ३-४ वर्षांनी चित्रांगदाचा गंधर्वाबरोबरच्या लढाईत मृत्यू झाला, तेव्हादेखील १४-१५ वर्षाचा कुमारचा होता. म्हणजेच चित्रांगदाच्या मृत्यूच्या वेळी भीष्मानी वयाची साठी गाठली होती व १-२ वर्षात तारुण्यात पदार्पण केलेल्या कोवळ्या विचित्रवीर्यासाठी वधू आणायला भीष्म निघाले तेव्हा ते साठी उलटलेले (६२-६३ वयाचे) होते.
अशा वयोवृद्ध व प्रतिज्ञाबद्ध भीष्माला स्वयंवराच्या मंडपात पाहून तेथील तरुण राजांनी नाके मुरडली व भीष्माची थट्टा देखील केली, असे वर्णन महाभारताच्या सर्व प्रचलित आवृत्त्यांमध्ये येते (चिकित्सक आवृत्ती मध्ये मात्र हे थट्टेचे वर्णन येत नाही). त्यांचे हे टोमणे भीष्माला फारच लागले आणि त्यांनी संतापून तात्काळ त्या तीनही राजकन्यांचे हरण करायचे ठरविले आणि सर्वांसमक्ष त्यांना रथात घालून उपस्थित राजांना त्याने आव्हान दिले. असे करताना त्यात त्यांनी जे वीरोचित भाषण केले त्यात त्यांनी विवाहाचे आठ प्रकार सांगितले व त्यातील आप्तेष्ठांचा व विवाहोत्सुक क्षत्रियांचा पराभव करून केलेला राक्षस विवाह हा क्षत्रियांसाठी सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगत सर्व उपस्थित क्षत्रियांना युद्धासाठी ललकारले.
भीष्म पराक्रम
महाभारतकारानी या छोटेखानी युद्धात पण भीष्मांनी केलेल्या पराक्रमाचे यथासांग वर्णन केले आहे. सर्व राजे आपापल्या अंगावरचे अलंकार इतस्ततः भिरकावत, चिलखत चढवीत , सारथ्याना तात्काळ रथ सिद्ध करायला सांगत, शस्त्रसज्ज होत रथारूढ झाले व सर्वानी एकत्रितपणे भीष्मांवर हल्ला केला. पण नरपुंगव भीष्माने अतुलनीय पराक्रम करीत एकट्याने आपल्या धनुष्यबाणाने त्या सर्वांचा असा पराभव केला कि त्या सर्व राजांनीही तोंडात बोटे घातली.
या पराक्रमानंतर भीष्म हस्तिनापुराकडे निघाला असता त्याला सौभराज शाल्वाची ललकारी ऐकू आली. इतर सर्व राजे भीष्माच्या शौर्याने दिपून गेले तरीदेखील, त्या तीन कन्यापैकी, थोरल्या अंबेवर प्रेम करणारा शाल्व मात्र हार मानणारा नव्हता. भीष्माने देखील रथ थांबवून त्याच्याशी युद्ध आरंभले. या आधीच पराभूत झालेले इतर राजे आता प्रेक्षक बनले. सुरुवातीलाच शाल्वाने केलेल्या आक्रमणाने, या राजांनी आता भीष्मांविरुद्ध शाल्वाला प्रोत्साहितकरायला सुरुवात केली. ते पाहून चिडलेल्या भीष्माने आपल्या अविरत शरवृष्टीने शाल्वाला संत्रस्त केले. त्याचे घोडे मारले, रथ मोडला, आणि त्याला जेरीला आणले व अखेर जीवदान देत सोडून दिले. पराभवाने अपमानित झालेला शाल्व आपल्या नगराकडे परतला व भीष्म त्या तीनही कन्यांना घेऊन हस्तिनापूरला परतला. स्वतः जिंकून आणलेल्या या तीनही कन्या त्याने सत्यवतीच्या मुलाला, म्हणजेच आपल्या धाकट्या भावाला, विचित्रवीर्याला अर्पण केल्या आणि तो त्याच्या विवाहच्या तयारीला लागला.
आपला विवाह आता विचित्रवीर्या बरोबर होणार हे कळताच त्या तिघीतली ज्येष्ठ कन्या अंबा हिने आपले मन भीष्मांसमोर उघड केले व आपले शाल्व राजावर प्रेम होते आणि आपल्याला मिळवण्यासाठीच तो भीष्मा बरोबर तुमुल युद्ध करत होता हे तिने सांगितले. हे ऐकताच धर्म विचार जाणून घेण्यासाठी भीष्माने वेद पारंगत विद्वानांबरोबर विचारविनिमय केला व नंतर सत्यवतीच्या परवानगीने अंबेला शाल्व राजाकडे परतण्यास अनुमती दिली.
तिच्या दोन बहिणी अंबिका व अंबालिका मात्र देखण्या विचित्रवीर्याला पाहताच त्याच्याशी विवाहाला आनंदाने तयार झाल्या. अनुपम सौंदर्यवती असलेल्या या दोन कन्यांना पाहतात विचित्रवीर्य देखील भलताच वेडावला आणि त्यांच्याशी विवाह होतात “धर्मात्मा विचित्रवीर्य कामात्मा झाला” इतक्या स्पष्ट शब्दात महाभारतकारांनी त्याची लग्नानंतरची विलासी वृत्ती नोंदविली आहे. या अति कामविकाराचा जो व्हायचा तोच परिणाम झाला. सुमारे सात वर्षे राज्य कारभार दुर्लक्षून कामविहार करणार्या विचित्रवीर्या ला तरुण वयातच राजयक्ष्मा म्हणजे क्षयरोग झाला. वैद्यांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण अखेर या क्षयरोगाने त्याचा अंत झाला व हस्तिनापूरावर पुन्हा एकदा काळोखाचं साम्राज्य पसरले. भीष्मांच्या वृद्ध खांद्यांवर पुन्हा एकदा हस्तिनापूरला सावरण्याची जबाबदारी येऊन पडली आणि आपल्या प्रतिज्ञेत राहून ती कशी पार पाडायची याची चिंता त्यांना व सत्यवतीला भेडसावू लागली.
संदर्भ : आदिपर्व अध्याय १०२, चिकित्सक आवृत्ती अध्याय ९६
जितेंद्रिय देवव्रत भीष्म (भीष्मप्रतिज्ञा) - महाभारत - महाभारत कथा
गंगेने हाती सोपविलेल्या तेजस्वी कुमार देवव्रताला घेऊन राजा शंतनू
अतिशय आनंदाने हस्तिनापुरात परतला. सर्वगुणसंपन्न राजकुमार देवव्रताला
पाहून नगर जन देखील आनंदी झाले. राजा शंतनू राज्यकारभारात पुन्हा व्यग्र
झाला. त्याने देवव्रताला युवराज्याभिषेक देखील केला. अशा प्रकारे सुमारे
चार वर्षे सुखात गेली. यानंतर राज्यकारभार देवव्रतावर सोपवून राजा शंतनु
पुन्हा मृगयेत रमू लागला. यावेळी यमुनेच्या तीरावर मृगयेला गेला असताना
दूरवरून येणाऱ्या एका सुगंधाने तो धुंद झाला. या सुगंधाच्या उगमस्थानाचा
जेव्हा त्याने शोध घेतला तेव्हा एक लावण्यवती कन्या त्याच्या दृष्टीस पडली
आणि राजा शंतनू तिच्याकडे आकृष्ट झाला. त्याने तिची चौकशी केली
तेव्हा तिने त्याला आपले नाव सत्यवती असून आपण नदीकाठावरील धीवर
(कोळी) प्रमुखाची कन्या असल्याचे व उदरनिर्वाहासाठी नौका चालवत असल्याचे
तिने सांगितले. तिच्यावर मोहित झालेल्या शंतनूने तिच्या पित्याला
भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली व नंतर त्याला भेटून त्याने त्या धीवराकडे
त्याच्या कन्येला सरळ मागणी घातली.

शंतनूचे त्या वेळचे वय लक्षात घेता ही मागणी शंतनूने खरं तर राजपुत्र देवव्रतासाठी घालायला हवी होती. साठी पार केलेल्या शंतनूने आपल्या तरुण राजपुत्राच्या विवाहाचा विचार करायला हवा होता. पण या वयात देखील शंतनूने असा विवेकी विचार केला नाही. त्याची ही स्थिती सत्यवतीच्या पित्याने ओळखली व त्याने धूर्तपणे या संधीचा फायदा घ्यायचे ठरवले. त्याने राजाला आपली अट सांगितली की, तू माझ्या कन्येच्या तुझ्यापासून होणाऱ्या पुत्राला राज्याभिषेक करायला हवा. देवव्रताला युवराज्याभिषेक करून चुकलेल्या राजा शंतनूला अर्थातच हा होकार देववला नाही व खिन्न मनाने तो हस्तिनापूरला परतला.
याच बरोबर अजून एक गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यायला हवी ती म्हणजे शंतनू हस्तिनापूरचा राजा होता. यमुना-गंगा प्रदेशात राहणारे सर्वजण, ही त्याची प्रजा होते. पण शंतनूने आपल्या सत्तेच्या अधिकाराचा वापर, ही मागणी घालताना केलेला दिसत नाही. तसेच धीवराने देखील आपल्या राजाच्या मागणी पुढे दबून जात त्याला होकारही दिलेला नाही. आणि त्याने अटी घातल्यावर कोणतीही बळजबरी न करता, शंतनू हिरमुसला होऊन हस्तिनापुरात परतला आहे.
यानंतर तो सत्यवतीच्या विचारात सतत उदास राहू लागला. त्याचे कशातच लक्ष लागेना. मुख्य म्लान दिसू लागले. त्याची ही अवस्था, त्याचा पुत्र देवव्रत त्याच्या लक्षात आली. त्याने शंतनुला त्याबद्दल छेडले असता वेगळ्याचा शब्दात शंतनूने आपली व्यथा आपल्या पुत्रासमोर मांडली. तो देवव्रताला म्हणाला, तू माझा एकुलता एक पुत्र असून नित्य युद्ध कर्मात व्यस्त असतोस. जर तुला काही झाले तर मी निपुत्रिक होईल व आपला कुलक्षय होईल. तो टाळण्यासाठी मला पुन्हा विवाह करायचा आहे. यापुढे हे लग्न कोळ्याच्या मुलीशी करायचे आहे हे आपल्या मुलाला सांगणे त्याला कदाचित संयुक्तिक वाटले नसावे. वास्तविक पाहता देवव्रत येण्या आधीची छत्तीस आणि नंतरची चार, म्हणजे चाळीस वर्षे शंतनु निपुत्रिक असल्याप्रमाणे होता. कुलक्षय टाळण्यासाठी तो युवराज देवव्रताचा विवाह करून राज्य त्याच्या हाती सोपवू शकला असता असे असताना देखील उतारवयात त्याला झालेल्या मदनबाणाने मती भ्रष्ट झाला हे मात्र खरे.
भीष्म प्रतिज्ञा
देवव्रताने त्याची व्यथा समजावून घेतली. या व्यथेचा निश्चित रोख जाणून घेण्यासाठी त्याने अमात्यांना गाठले. त्यात त्याला धीवर प्रमुखाच्या अटींची कहाणी कळली. आपल्या पित्यावरील आत्यंतिक प्रेमाने देवव्रताने तात्काळ एक निर्णय घेतला व सोबत प्रतिष्ठित क्षत्रिय वीरांना घेऊन तो त्या धीवर प्रमुखाकडे गेला, आणि आपल्या पित्यासाठी त्याने सत्यवतीला मागणी घातली.
इथेही चतुर धीवराने आपला संयम सोडलेला दिसत नाही. त्याने सत्यवतीशी देवव्रताने विवाह करावा असेही सुचविल्याचे दिसत नाही कारण कदाचित ती देखील वयाने देवव्रतापेक्षा पोक्त असावी (व काही वर्षांपूर्वी तिच्या पोटी व्यासांचा ही जन्म झाला आहे, जे देवव्रतापेक्षा काही वर्षांनी लहान असावेत). त्याने पुन्हा एकदा आपली अट देवव्रताला सांगितली. तो विचार करूनच देवव्रत इथे आला होता व म्हणूनच तात्काळ त्याने आपण राज्यावरचा हक्क सोडत आहोत व सत्यवतीचाच पुत्र हस्तिनापूरचा राजा होईल असे वचन तिच्या पित्याला दिले.
या वचनाने जरी तो धीवर खुश झाला तरी त्याने अजून एका संभाव्य धोक्याची जाणीव देवव्रताला करून दिली. ती म्हणजे, तू म्हणतोस ते ठीक पण उद्या तुझ्या पुत्रांना राज्य लोभ उत्पन्न झाला व त्यांनी देखील राज्यावर हक्क सांगितला तर? हे ऐकून देखील देवव्रत जरादेखील विचलित झाला नाही. व तत्क्षणी त्याने आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची अजून एक प्रतिज्ञा केली. आपल्या या प्रतिज्ञेमुळे आपण जरी निपुत्रिक राहिलो तरी आपल्याला स्वर्गप्राप्ती होईल, हा विश्वास देखील त्यांने व्यक्त केला. त्याची ही प्रतिज्ञा ऐकून सोबत आलेले प्रतिष्ठित क्षत्रिय वीर अवाक झाले. आणि हा तर भीष्मच आहे अशा शब्दात सर्वांनी त्याचा गौरव केला.
अशा रीतीने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवण्याच्या या जितेंद्रिय प्रतिज्ञेमुळे देवव्रत पुढे भीष्म म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच्या या प्रेमामुळे शंतनूने देखील त्याला तू इच्छामरणी होशील असा वर दिला.
असे घडले असेल का ?
यातील देवव्रताचे शंतनू वरील निरातिशय प्रेम पाहता, भैरप्पांनी आपल्या पर्व या कादंबरीतून एक वेगळा विचार आपल्यासमोर मांडला आहे. तो म्हणजे पहिल्या सात बाळंतपणासाठी गंगाच माहेरी निघून जायची व आपल्या मातृसत्ताक कुटुंबात पुत्रांना ठेवून परतायची. पण आठव्या वेळी मात्र शंतनूने तिला माहेरी जाण्यापासून प्रतिबंध केला. म्हणूनच पुत्रजन्म होतात लहानग्या देवव्रताला शंतनूच्या हाती सोपवून, आपल्या अटींप्रमाणे ती स्वगृही आपल्या आधीच्या ७ पुत्रांकडे निघून गेली. शंतनूने नंतर देवव्रताला सर्व प्रकारचा विद्याभ्यास देऊन घडविले असावे. पित्याचा हा त्याग पाहून देवव्रताने देखील आपल्या पित्यासाठी भीष्मप्रतिज्ञेद्वारे एक मोठा आयुष्यभराचा त्याग करायचा निर्णय घेतला.
अर्थातच हा विचार स्वतः महाभारतकार कुठेच ध्वनित देखील करीत नाहीत. पण एक गोष्ट आपल्याला महाभारतातून निश्चितपणे कळते ती मात्र अशी की, शंतनूने जे दोन्ही विवाह केले ते नदी प्रदेशातील वन कन्या, धीवरकन्या इत्यादी क्षत्रिय नसलेल्या जमातीतील मुलींशी केले व ते देखील दोन्ही वेळी त्यांनी घातलेल्या अटी मान्य करीत केले. या दोन्ही कन्यांची कदाचित हीन असलेली कुळे उंचावण्यासाठी व त्या राजाला आणि राज्याला अनुरूप आहेत, ते तत्कालीन जनमानसावर ठसविण्यासाठी त्यांच्या जन्माभोवती अद्भुततेचे वलय निर्माण केले, जे आपण या आधीच्या कथा भागात पाहिले आहेच.
टीप : लेखासोबत वापरलेली दोन्ही चित्रे सुप्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांची असून आंतरजालावरून (इंटरनेटवरून ) घेतलेली आहेत.
संदर्भ : आदिपर्व अध्याय १००, पर्व (एस एल भैरप्पा)
व्यासजन्मापूर्वी हस्तिनापुरात….महाभारताची सुरुवात -

महाभारताची सुरुवात हस्तिनापूरचा राजा शंतनू याच्यापासून होते. आपण एक पिढी मागे गेलो तर आपल्याला असे आढळते की, शंतनू हा राजा प्रतिप व शिबी कन्या राणी सुनंदा यांचा पुत्र. प्रतिपाला एकूण तीन पुत्र होते देवापी, बाल्हिक व शंतनू. यातील देवापि हा थोरला पुत्र धर्मपरायण व प्रजाहितदक्ष असूनही, त्याला त्वचारोग असल्याने या “हिनांग भूपतीला” राज्याभिषेक करण्यास प्रजेने व ब्राह्मणांनी नकार दिला. या घटनेने राजा प्रतीप व्यथित झाला. बाल्हिकाने आपल्या मातुलगृही म्हणजे मामाकडे जाऊन तिथले राज्य सांभाळणे पसंत केले व प्रतिपाच्या मृत्युनंतर शंतनु राजा झाला. या घटनेचे भाष्य आपल्याला पुढे उद्योग पर्वात आढळते , जेव्हा धृतराष्ट्र, दुर्योधनाला त्याचा राज्यावर अधिकार का नाही हे देवापीचे उदाहरण देऊन समजावतो, कि जसे त्याला हिनांगतेमुळे राज्य मिळाले नाही तसे अंधत्वामुळे मला मिळू शकले नाही व म्हणूनच हस्तिनापूरच्या राज्यावर पंडूचा जेष्ठ पुत्र युधिष्ठिर याचाच अधिकार आहे.
शंतनू देखील एक पराक्रमी व नीतिमान राजा होता व तत्कालीन क्षत्रियांप्रमाणेच त्याला देखील मृगयेचा छंद होता. अशाच एका प्रसंगी गंगाकिनारी मृगयेला गेला असता त्याची दृष्टी गंगा नावाच्या सुंदर स्त्रीवर पडते व तो मोहित होतो. तो तिला लग्नासाठी मागणी घालतो. गंगा हि नदीकाठच्या प्रदेशातील एक चतुर तरुणी आहे. ती त्याच्यापुढे काही अटी ठेवते त्या म्हणजे, “मी जे काही करीन ते चांगले असो अथवा वाईट, तू मला अडविता कामा नये अथवा मला अप्रिय असे बोलताही कामा नये”. जर तू मला अडविलेस अथवा बोल लावलास तर तत्क्षणी मी तुला सोडून जाईन. गंगेच्या सौंदर्याने मोहित झालेल्या शंतनू तात्काळ मागचा पुढचा विचार न करता या अटी मान्य करतो आणि त्याने गंगा त्याच्याशी विवाहबद्ध होते .
त्यांचे वैवाहिक आयुष्य अत्यंत सुखी आहे. गंगा यथावकाश पुत्रवती होते व पुत्र जन्म झाल्यावर लगेचच ती आपल्या नवजात पुत्राला गंगार्पण करते. राजा शंतनू ते पाहतो, पण विवाहपूर्व अटींमुळे काहीच बोलत नाही. या नंतरच्या त्यांच्या सहजीवनात देखील हे असे होतच राहते. त्यांना असे पाठोपाठ ७ पुत्र होतात व राणी गंगा ते गंगा नदीला अर्पण करत राहते. राजा वरील गंगेच्या प्रेमाचा अंमल हळूहळू उतरू लागतो, आणि आठवा पुत्र झाल्यावर राणी गंगा जेव्हा त्याला गंगार्पण करू पाहते तेव्हा न राहून तो आपल्या पत्नीला अडवितो. तिला बोल लावतो. विचारतो अगे कैदाशीनी, स्वतःच्या पुत्रांना मारून टाकणारी अशी तु आहेस तरी कोण? आणि तू हे पाप नक्की करतेस तरी का?
महाभिष व गंगा

शंतनुचे ते उद्गार ऐकून गंगा त्याला स्वतःचा व शंतनूच्या पूर्वजन्माचा इतिहास त्याला सांगते. ती म्हणते, हे राजन, तू पूर्वजन्मीचा महाभिष राजा तर मी तर देवलोकीची जन्हूकन्या गंगा. स्वर्गप्राप्ती झालेला महाभिष राजा ब्रह्मदेवाच्या दरबारात उपस्थित असताना मी देखील तेथे पोहोचले. त्यावेळी माझे वस्त्र वाऱ्याने उडाले आणि ते पाहून सर्व देवांनी माना खाली घातल्या. महाभिष मात्र माझ्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत राहिला, व त्यामुळे ब्रह्मदेवाने त्याला “तू पुन्हा मृत्युलोकी जन्म घेशील” असा शाप दिला. ज्या गंगेने तुला भुरळ घातली तीच तुझी पत्नी होईल व गंगा तुझ्या मनाविरुद्ध वागताच तुला क्रोध येईल, व तुमची या शापातून मुक्तता होईल. आता पृथ्वीलोकातील वास्तव्याच्या शापातून मी मुक्त झाले आहे. आता मी या आठव्या पुत्राला सोबत घेऊन जाते व त्याला सर्व विद्या पारंगत करून तुला परत आणून देइन.
अष्टवसूंच्या शापाची कथा
गंगा तिने जन्मताच मृत्युलोकातून मुक्त केलेल्या तिच्या सात पुत्रांचा वृत्तांत त्याला सांगते तो असा. अनेक मुनींचे वास्तव्य असणाऱ्या एका तपोवनामध्ये अष्टवसू सपत्नीक विहार करत असताना द्यू नावाच्या एका वसूची पत्नी वसिष्ठांच्या नंदिनी या कामधेनूला पाहते व आपल्या पतीकडे, म्हणजे द्यू कडे, ती कामधेनू आपल्याला मिळवून द्यावी, असा हट्ट धरते. म्हणून द्यू आपल्या इतर सात भावांसह ती नंदिनी गाय पळवून आणतो. वसिष्ठांना हे कळताच, ते त्या अष्टवसुना “तुम्हाला मनुष्य लोकात जन्म घ्यावा लागेल” असा शाप देतात. भयभीत व पश्चात्तापदग्ध होऊन अष्टवसु वसिष्ठ ऋषींना शरण जातात. वशिष्ठ त्यांना उ:शाप देत म्हणतात, एक वर्षाचा काळ लोटल्यावर तुमच्यापैकी सात जण मुक्त होतील, पण मुख्य अपराधी द्यू मात्र दीर्घकाळ मृत्युलोकात वास्तव्य करेल. हे वसू गंगेकडे येऊन गंगेने त्यांना जन्म द्यावा अशी विनंती करतात व गंगा देखील त्यांची विनंती मान्य करते.
चिकित्सकांच्या दृष्टीतून
महाभारत कथेच्या या प्रारंभीच्या घटनेकडे चिकित्सक दृष्टीने पाहताना आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. शंतनू गंगेकाठी मृगयेला जातो व एका तरुणीवर भाळतो आणि तिला मागणी घालतो. ती मुलगी प्रत्यक्ष नदी तर असू शकत नाही मग हे वैचित्र्य, शाप यांचा अंतर्भाव या कथेत कशासाठी? तर जिच्याबद्दल काहीच माहीत नाही, अशा एका मुलीला, म्हणजेच गंगेला, हस्तिनापूरच्या राजघराण्यात सामावून घेण्यासाठी. हि गंगा मग होती तरी कोण?गंगा नदीकिनारी राहणाऱ्या अशा एखाद्या गणातील/जमातीतील मुलगी, जिला शंतनू बरोबर विवाह तिच्या अटींवर मान्य होता, पण आपली मुले तेथील राजवाड्यात, नगरात वाढवणं मान्य नव्हतं. कदाचित एखाद्या मातृसत्ताक पद्धतीतील जमातीतील अथवा अप्सरा, देव या उत्तरेकडील गणातील मुलगी जी आपल्या मुलांना जन्मल्यावर अल्पावधीतच आपल्या जमातीत परत करत होती (केवळ “क्षेत्रज-पुत्र” न्यायाने) अथवा त्यांना खरंच मारून टाकत होती (मातृसत्ताक पद्धतीत पुरुष अपत्य नको म्हणून). आणि या गोष्टीला विरोध होताच, आपल्या अटीप्रमाणे पुन्हा आपल्या गणात / जमातीत परतली. या सर्वांना कथेला अद्भुत असे स्वरूप देण्यासाठी महाभिष राजाची, अष्टवसूंच्या शापाची कहाणी त्याभोवती रचली गेली.
काही काळानंतर
गंगा आपल्या आठव्या पुत्राला सोबत घेऊन जाते. शंतनू पुन्हा एकटा होतो व हस्तिनापूरच्या राज्यकारभार करू लागतो. मध्ये काही वर्षे जातात (महाभारत आदिपर्व अध्याय १००, श्लोक २०, नुसार ३६ वर्षे). पुन्हा एकदा शंतनू गंगाकिनारी मृगया करत असता, एका ठिकाणी गंगेचे पाणी बाणांनी अडवलेले त्याला दिसते. त्याचा शोध घेतला असता, त्याला एक रूपसंपन्न कुमार दिसतो, ज्याने आपल्या शरवर्षावाने ते पाणी अडवून ठेवले होते. राजाने पृच्छा करतात गंगा तिथे प्रकट होते. ती तो आपला पुत्र देवव्रत असल्याचे त्याला सांगते. देवव्रत आता विद्याभ्यास व शस्त्रविद्या पारंगत असल्याचे सांगत तिने तो पुत्र शंतनूच्या हवाली करते. देवव्रताने वसिष्ठांकडून वेदांचे अध्ययन केले असून (त्या द्यू वसुला शाप देणारे वसिष्ठच) अस्त्र विद्येत तो देवराज इंद्राप्रमाणे पराक्रमी आहे, शुक्राचार्य जी नीती जाणतात व परशुराम जी अस्त्रविद्या जाणतात त्यातही तो पारंगत आहे असे गंगा शंतनुला सांगते.
वयाचे गणित

शंतनूने गंगेवर मोहित होण्याचे वय महाभारताने दर्शविलेले नाही. अगदी ते २०च वर्षे होते असे मानले (व म्हणूनच या वयात तिच्या सर्व अटी शंतनूने मान्य केल्या) , तरी आठवा पुत्र देवव्रताचा जन्म होईस्तोवर ते २८ वर पोहोचेल. महाभारतानुसार ३६ वर्षांनी जर गंगा देवव्रताला परत करते तर त्यावेळी शंतनूचे हे वय २८+३६=६४ वर्षांवर पोहोचते. आणि मग ज्या वयात आपल्या पुत्राचे लग्न करून वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा त्या वयात शंतनू पुन्हा एकदा लग्नगाठ बांधायला तयार होतो. आपल्या पित्याची हि इच्छादेखील पूर्ण करणारा देवव्रत मात्र भीष्म होऊन महाभारताला जन्म देतो. ते कसे हे आपण पुढील लेखात पाहू ….
संदर्भ :
(१) आदिपर्व अध्याय ९२/९४ , भांडारकर चिकित्सक आवृत्ती, (मूळ कथाभागाकरिता) (२) महाभारताचा मूल्यवेध – डॉ रवींद्र शोभणे , (३) पर्व – एस एल भैरप्पा [(२) व (३) चिकित्सेकरिता ]
वापरलेली चित्रे – मायाजालावरून साभार
महाभारतकार व्यासांची जन्मकथा – Birth of Maharshi Vyas
Birth of Maharshi Vyas – महाभारत कथेची सुरुवात जरी व्यासांच्या जन्माच्या आधी होत असली तरी या कथेत स्वतः व्यास वारंवार भूमिका निभावत असल्याने, महाभारताच्या मुख्य कथानकाला सुरुवात करण्यापूर्वी व्यासांची जन्मकथा जाणून घेणे आवश्यक आहे. महाभारतात असलेले सर्व नाट्य थोड्याफार प्रमाणात व्यास जन्माच्या कथेत देखील आहेच.
महर्षी व्यास हे पराशर मुनी व धीवर कन्या सत्यवती यांचे पुत्र. त्यांच्या या मात्यापित्यांची कहाणी देखील असंख्य चमत्कारांनी रंगवलेली आणि बरीचशी उत्तरकालीन भर आहे, असे वाटायला लावणारी आहे. महाभारताच्या पहील्याच म्हणजे आदिपर्वाच्या अध्याय १७६ मध्ये पराशर ऋषींची जन्मकथा येथे ही थोडक्यात अशी…..
पराशर ऋषींची जन्मकथा
पूर्वी इश्वाकु वंशातील (रामाचा वंश) कल्माषपाद नावाचा राजा होऊन गेला. एकदा शिकारी करता, हा राजा वनात गेला असताना, एका अरुंद वाटेवर समोरून ज्येष्ठ वशिष्ठ पुत्र शक्ती येत होता. ब्राह्मणाला प्रथम वाट द्यायची हा तत्कालीन संकेत पण राजा वाट द्यायला तयार होईना आणि शक्ती ऋषी देखील वाट सोडेना. तेव्हा कल्माषपाद राजाने त्याला चाबकाने फोडून काढले आणि त्यामुळे संतापून शक्ती ऋषीने त्याला तू मनुष्य भक्षक राक्षस होशील असा शाप दिला. त्याबरोबर त्या राजाने शक्तीलाच प्रथम भक्ष केले व त्यानंतर उरलेल्या वशिष्ठ पुत्रांना. हे कळताच ऋषी वशिष्ठ अतिशय दुःखी झाले व त्यांनी आत्मघाताचे अनेक प्रयत्न केले पण ते सर्व अयशस्वी ठरले. या सर्व प्रकारात शक्तीची पत्नी अदृश्यन्ती त्यांची पाठराखण करत होती. व तिच्या गर्भातून येणारा, वेदाध्ययन करणारा एक स्वर वरिष्ठांच्या कानावर पडला तेव्हा वसिष्ठांनी कुतूहलाने अदृश्यन्तीकडे चौकशी केली यावेळी तिने त्यांचा नातू तिच्या उदरात वाढत असल्याचे वसिष्ठांना सांगितले हे कळताच त्यांचे नैराश्य पळाले. यथावकाश अदृश्यन्तीला जो पुत्र झाला त्याचे नाव वसिष्ठांनी पराशर असे ठेवले.
सत्यवतीची जन्मकथा
उपरिचर वसु नावाचा एक राजा होता. इंद्राच्या इच्छेप्रमाणे त्याने चेदी राज्य जिंकले त्यामुळे इंद्राने त्याची स्तुती करत त्याला सज्जनांचा प्रतिपाळ करण्यासाठी कळकाची काठी दिली. नवीन संवत्सराचा सुरुवातीला या राजाने ती काठी जमिनीत रोवून त्यावर शेला व पुष्पमाला बांधून त्याची पूजा केली. तद्नंतर प्रत्येक संवत्सराच्या (वर्षाच्या) सुरुवातीला ही प्रथाच झाली आजही नववर्षाच्या सुरुवातीला असे गुढी पूजन केले जाते.
या उपरिचर वसुला गिरीका नावाची पत्नी होती. ती ऋतुमती होण्याच्या काळातच राजाला राजवाड्यातील वयोवृद्धांना मांसान्न हवे म्हणून शिकारीसाठी वनात जावे लागले. वनातच गिरीकेच्या आठवणीने राजाचे वीर्यस्स्खलन झाले. ते वाया जाऊ नये म्हणून राजाने ते एका द्रोणात धरले व ते गिरिके पर्यंत पोहोचण्यासाठी एका श्येन पक्षाला दिले. हा पक्षी यमुने वरून जात असता त्याच्या चोचीत काहीतरी पाहून दुसऱ्या एका श्येन पक्षाने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्याशी झालेल्या झटापटीत तो द्रोण यमुनेच्या पाण्यात पडला. त्या यमुनेच्या पाण्यात अद्रिका नावाची अप्सरा शापामुळे मासा झाली होती. तिने ते वीर्य गिळले व त्यातून तिला गर्भ राहिला. पुढे ती प्रसूत झाल्यावर तिला एक मानवी जुळे झाले. ही जुळी मुले कोळ्यांनी राजा उपरिचर वसु कडे नेली. पैकी जो मुलगा होता तो राजाने ठेवून घेतला तर मुलगी राजाने त्या धीवराला दिली व स्वतःच्या मुलीसारखा प्रतिपाळ करण्यास सांगितले तीच मुलगी म्हणजे सत्यवती. या दोन मानवी मुलांना जन्म देऊन अप्सरा आद्रिका शापमुक्त झाली.
पराशर व सत्यवती यांच्या जन्मकथेचा मतितार्थ
या दोन्ही कथा पाहता आपल्या असे लक्षात येते की हा सर्व खटाटोप व्यासांच्या माता-पित्यांना व पर्यायाने व्यासांना उच्चकुलीन ठरवण्यासाठी उत्तरकाळात केला गेला असावा. यात पराशरांचे वडील शक्ती ऋषी कल्माषपाद राजा पेक्षा श्रेष्ठ व वशिष्ठ कुळातील असे सांगितले गेले, तर धीवर कन्या मत्स्यगंधा प्रत्यक्षात एका अप्सरेच्या पोटी जन्माला आलेली क्षत्रिय राजकन्या असे दाखवण्याचा प्रयत्न आहे. कदाचित प्रत्यक्षात राजा उपरिचर वसु, अद्रिका या एखाद्या यमुना काठच्या धीवर कन्येबरोबर रत झाला असावा व त्यातून मत्स्यगंधा सत्यवतीचा जन्म झाला असावा.
व्यासमहर्षींचा जन्म

तर असे हे पराशर मुनी यमुनेच्या किनाऱ्यावर नाव चालवणाऱ्या या सत्यवती
नामक धीवर कन्येवर आसक्त झाले व त्यांनी तिला नावेतच समागमाची विनंती केली.
त्यावेळी ऋषींना नाही कसे म्हणायचे? मग तिने त्यांना, दोन्ही किनाऱ्यांवर
ऋषी उभे आहेत, असे दाखवले. तेव्हा त्यांनी आपल्या तपोबलाने नावेभोवती धुके
निर्माण केले. त्यावर सत्यवतीने माझे कौमार्य नष्ट होईल असे सांगताच,
ऋषींनी तिला ती कुमारीच राहील असा आशिर्वाद दिला व एखादा वर मागण्यास
सांगितले. तेव्हा माझ्या सर्वांगाचा माशांचा वास जावून छान सुगंध येऊ देत
असा वर तिने मागितला. ऋषींनी तिची ही इच्छा देखील पूर्ण केली व तिचे नाव
गंधवती अथवा योजनगंधा असे देखील पडले. त्यानंतर पराशर ऋषींनी तिच्याबरोबर
समागम केला व ती गर्भवती झाली.
कालांतराने यमुनेतील एका द्वीपावर (बेटावर) ती प्रसूत झाली. रंगाने
कृष्णवर्ण असलेल्या व द्वीपावर जन्मलेल्या मुलाला सर्वजण कृष्णद्वैपायन
म्हणून ओळखू लागले. पुढे या ज्ञानी पुत्राने शाखा भेदाला अनुसरून वेदांचा
विस्तार केला म्हणून त्यांना व्यास हे नाव प्राप्त झाले.
या कथेतील वरदान नक्की काय ?
या कथेतून आपल्याला असे लक्षात येते की तपोबलापेक्षा आसक्ती, ती देखील क्षणिक कामासक्ती प्रबळ ठरते व पराशरांसारखे ऋषी देखील त्याला सहज भुलतात. सत्यवतीला त्यांनी दिलेल्या कौमार्य भंग न होण्याचा वर म्हणजे द्विपावरील तिच्या वास्तव्याने तिची प्रसूती कुणाच्याच लक्षात येणार नाही व मी या पुत्राला लगेच घेऊन जाईन असे वचन जे त्यांनी सत्यवतील दिले व ते पाळले देखील. सत्यवती पुन्हा तिचे आयुष्य तिच्या परीने जगायला मोकळी झाली, असाच याचा अर्थ. बरे, या प्रसूतिकालाच्या महिन्यांमध्ये माशांपासून दूर एका बेटावर राहिल्याने तिला माशांचा गंध पण येणार नाही, हे वराचे आणखी एक स्वरूप.
पुढील महाभारत
यमुनेच्या काठावर हे सर्व घडत असतानाच तिकडे दूर हस्तिनापुरात मात्र काही वेगळ्याच घटना घडून गेल्या होत्या. या घटनांचा व हस्तिनापुरातील त्या घटनांचा एकमेकात मिलाफ होत पुढे महाभारत घडणार होतं. काय होत्या त्या घटना ? ते आपण पुढील लेखापासून पाहू.
लेखासोबतची छायाचित्रे – मायाजालावरून … मात्र मूळ स्रोत माहीत नाही
संदर्भ – आदिपर्व अध्याय ६३, १७६,१७७,१७८
जनमेजयाचे सर्पसत्र कि नाग वंशियांचे हत्याकांड ? महाभारत
महाभारत कथेत पडलेली भर अभ्यासायची असेल तर सुरुवातीपासूनच ते चिकित्सकपणे अभ्यासायला हवे. त्यातील रूपके , उपकथानके यांची त्यात भर पडत गेली, हे आपल्याला थोड्याश्या चिकित्सक नजरेने पाहताच लक्षात येते. यासाठी आपण महाभारताच्या सुरुवातीचे कथानक पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल कि या सर्पसत्रात सांगितले गेलेले महाभारताचे कथानक हा कदाचित असाच विध्वंस पुन्हा टाळण्यासाठी केलेला उपदेश असावा . कसे ? ते आपण आता पाहू .
महाभारताची सुरुवात होते ती राजा जनमेजयाच्या सर्प सत्राच्या कथेपासून. येथे व्यासांच्या उपस्थितीत (यासाठी व्यासांचे वय १५० वर्षांपेक्षा जास्त असायला हवे) व्यासशिष्य वैशंपायनाने महाभारत श्रोत्यांना ऐकविले. या सर्पसत्राचे कारण होते राजा परिक्षिताचा सर्पदंशाने झालेला मृत्यू.

महाभारतीय कथेनुसार , युधिष्ठिरानंतर राज्यावर आलेला अभिमन्यूपुत्र
परिक्षित बरीच वर्षे (त्याच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत?) राज्य करतो.
एकदा तो वनात शिकारीला गेलेला असताना एका मृगाला बाण मारतो. जखमी अवस्थेत
तो मृग जंगलात निसटतो व त्याचा पाठलाग करीत परिक्षित दाट जंगलात शिरतो.
अरण्यात पुढे गेल्यावर त्याला एक ऋषी ध्यानस्थ असलेले दिसतात. त्यांना
(शमीक ऋषींना) भूक व तहानेने व्याकुळ झालेला राजा, तो मृग कोणत्या दिशेनं
गेला ते विचारतो पण त्यांचे मौनव्रत असल्याने त्याला काहीच उत्तर मिळत
नाही. म्हणून राजा परिक्षित चिडून शेजारी मरून पडलेला एक सर्प बाणाच्या
टोकाने उचलून ऋषींच्या अंगावर टाकतो व निघून जातो. शमीक ऋषींना त्याचे
काहीच वाटत नाही पण त्यांचा पुत्र शृंगी याला ती बातमी कळल्यावर तो
संतापाच्या भारत राजा परिक्षिताला, तू ७ दिवसात सर्पदंशाने मृत्यू पावशील,
असा शाप देतो.
शृंगी जेव्हा आपण दिलेल्या शापाबद्दल आपल्या पित्याला, शमीक ऋषींना, सांगतो
तेव्हा ते राजा परीक्षिताचे गुणगान करतात. असा शाप अनाठायी दिल्याबद्दल ते
शृंगीला बोल लावतात व आपला एक शिष्य गौरमुख याला हि बातमी कळविण्यासाठी
राजा परीक्षिताकडे पाठवितात.

राजा परीक्षित या बातमीने हादरून जातो व आपला मृत्यू टाळण्यासाठी स्वतःला एका मनोऱ्यात बंदिस्त करून घेतो. शेवटच्या, सातव्या दिवशी, आता कुणी येत नाही या विचाराने तो निर्धास्त झालेला असताना, तक्षक एका सफरचंदातील अळीद्वारे राजमहालात प्रवेश करतो आणि राजाला दंश करतो..परीक्षिताच्या मृत्यूनंतर अल्पवयीन जनमेजय राजा बनतो. यथावकाश काशीराज सुवर्णवर्मा याची कन्या वपुष्टमा हिच्याशी त्याचा विवाह होतो व तो सुखाने राज्यकारभार करू लागतो.त्यानंतर काही वर्षांनी राजा जनमेजय आपल्या पित्याच्या मृत्यूबद्दल आपल्या अमात्यांकडे चौकशी करतो आणि त्याला सर्व घटनाक्रम कळतो. तक्षकाच्या दंशाने आपल्या पित्याचा मृत्यू झाला हे कळताच संतापाने तो सर्व सर्प जातीलाच नष्ट करायचे ठरवतो व त्यासाठी सर्पसत्र आयोजित करतो. या सर्पसत्रात बरेच सर्प मृत्युमुखी पडतात व शेवटी तक्षकाची पाळी येते तेव्हा तक्षक इंद्राच्या पाठी लपतो. यावर “इंद्राय स्वाहा , तक्षकाय स्वाहा “ अशी दोघांचीही आहुती देण्याच्या क्षणी, जरत्कारु नावाच्या ऋषींचा, जरत्कारु नावाच्याच पत्नीपासून (हि वासुकी नागाची भगिनी म्हणजेच नाग कुळातील स्त्री) झालेला पुत्र, आस्तिक, जनमेजय राजाला प्रसन्न करून हे सर्पसत्र थांबविण्याचा वर मागून घेतो आणि तक्षकाचा नाश थांबवितो.
सर्प सत्राचा अर्थ
लौकिक पातळीवर या साऱ्या घटनेचा अर्थ आपल्याला कसा लावता येईल ते आपण पाहू. या कथेत आपल्याला दिसते ते सुमारे ४ पिढ्या चालत आलेले पांडव-नाग कुळांचे वैर, ज्याची सुरुवात होते, कृष्णार्जुनांच्या खांडववन दहनापासून. या दहनात अनेक नाग कुळे नष्ट झाली पण तक्षक नाग (हे तेथील नाग कुल प्रमुखाचे नाव असावे ) मात्र त्यावेळी खांडव वनात नसल्याने बचावला व नाग कुळाचे पांडवांशी वैर जडले.
परीक्षित शिकारीसाठी रानात गेल्यावर त्याने मृग नव्हे तर, या नागकुळातील कुणाचा तरी रानात पाठलाग केला असेल अथवा हत्या केली असेल. त्यामुळेच त्या कुलप्रमुखाने परीक्षिताचीच हत्या करायची प्रतिज्ञा (हा शृंगी ऋषींचा शाप म्हणून दर्शवला गेला) केली व ती अमलात आणण्यासाठी विषारी सफरचंद अथवा प्रत्यक्ष विषारी सर्पाचा उपयोग केला असावा. परीक्षिताचा मृत्यू हि हत्याच आहे व ती नाग वंशियांनी घडवून आणली हे काही वर्षांनंतर मोठा झालेल्या व राज्यशकट हाकणाऱ्या जनमेजयाला समजले व म्हणूनच त्याने नाग जमातीला समूळ नष्ट करायचे ठरविले व त्यांच्या विरुद्ध मोहीम उघडली. यात त्याने बऱ्याच नाग कुळांचा निर्वंश करण्याचा सपाटा लावला. यात वासुकी, ऐरावत, कौरव्य, तक्षक, धृतराष्ट्र अशा विविध नाग कुळातील असंख्य नाग मृत्युमुखी पडले. याला घाबरून तक्षक नाग उत्तरेकडे पळाला व तो इंद्राच्या आश्रयासाठी देवलोकी गेला. हा देवलोकाचा भाग हिमालयाच्या पलीकडे किंवा काश्मीरच्या उत्तरेकडे असावा, व म्हणूनच राजा जनमेजयदेखील त्याच्या पाठी उत्तरेकडे म्हणजे तक्षशिला जवळच्या प्रांतात तळ देऊन होता. यावेळी या महाभारत कथा सांगणाऱ्या वैशंपायन यांचा उद्देश, या वैराची परिणती महाभारतीय युद्धासारखे युद्ध पुन्हा घडून येऊ नये, हा असावा. अशा प्रकारच्या युद्धाने अपरिमित हानी होऊ शकते आणि हेच याच्या ३ पिढ्या आधी घडून आलेले आहे हे जनमेजयाला अवगत करून दिले आणि आस्तिकाने देखील जनमेजयाला प्रसन्न करत हा नागसंहार थांबवला.
कोणत्याही यज्ञात अशा प्रकारे विविध ठिकाणाहून सर्प येऊन पडणे शक्य नाही व नाग जमातीचा मात्र प्रचंड प्रमाणात संहार राजा जनमेजयाने घडवून आणला हे स्पष्ट करण्यासाठी रचलेल्या कथांमध्ये, महाभारतातील या घटनांचे वर्णन करताना त्यात नंतर अनेक रूपक कथा / उपकथा यात जोडल्या गेल्या. एका पिढीजात वैराला चमत्कारांचे व वर-शाप कथांचे स्वरूप देऊन या साऱ्यांचे एक वेगळेच स्वरूप आपल्या समोर उभे केले गेले. हस्ते परहस्ते पुढील पिढीकडे मौखिक स्वरूपात जाणाऱ्या महाभारताचा प्रचंड विस्तार आपण या पातळीवर हळू हळू उलगडू शकतो.
महाभारतीय महाकाव्याची भव्यता-Grandeur of Mahabharat -
महाभारताचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. सुमारे एक लक्ष श्लोकांसह जगातील सर्वात मोठे काव्य म्हणून मान्यता पावलेले महाभारत जिथून सुरु होते तिथेच ते संपते देखील. हे कसे? आपण जी कथा वाचतो ही कथा लोमहर्षण (अथवा रोमहर्षण) यांचा पुत्र उग्रश्रवा सौती नैमिषारण्यातील शौनकादि ऋषींना सांगतो तेथपासून. आता आपण या कथेचा उगम पाहू.
महाभारत युद्धामध्ये कौरव-पांडवांकडील सर्व योद्धे मारले जातात व वाचतात
केवळ पांडव. पांडवांचा वंश शिल्लक राहतो तो केवळ अर्जुन-पुत्र अभिमन्यूची
पत्नी उत्तरा हिच्या पोटी. युद्धानंतर ३६ वर्षे युधिष्ठिर राज्य करतो व पांडवांच्या
पश्चात
अभिमन्यूपुत्र परीक्षित राजा होतो आणि पांडव स्वर्गारोहणाला निघून जातात.
राजा परीक्षिताचा मृत्यू सर्प दंशाने होतो व हे कळल्यावर परीक्षिताचा पुत्र (अभिमन्यूचा नातू) राजा
जनमेजय हे सर्पसत्र (सर्पसत्र म्हणजे सर्पांची आहुती देणारा यज्ञ) आयोजित
करतो. या यज्ञासाठी आलेले वैशंपायन नावाचे ऋषी राजा जनमेजयाला आपल्या
आजोबा-पणजोबांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगण्यासाठी या भारत कथेचं निवेदन
करतात. (सर्पसत्र सध्याच्या तक्षशिला परिसरात, जे आता पाकिस्तानात आहे, तेथे झाले असे मानण्यात येते). त्यांनी हि कथा जय या नावाने व्यास महर्षींच्या तोंडून ऐकलेली असते. त्यात स्वतःच्या उपकथानकांची भर घालून ते त्याला भारत बनवतात. अशा रीतीने हे एक वर्तुळ पूर्ण होतं. याच यज्ञाच्या ठिकाणी ही कथा सौतीने ऐकली आणि आपल्या अनेक उपकथानकं व रूपक कथांची भर घालून त्याचं जे महाकाव्य बनलं तेच आपण ऐकत / वाचत असलेलं महाभारत.
व्यासांचे जय हे केवळ ८८०० श्लोकांचं असल्याचं मानलं जातं , तर वैशंपायनांचे भारत २४००० श्लोकांचं बनलं. आणि उग्रश्रवा सौतीनी जेव्हा ते नैमिषारण्यात शौनकादी मुनींना सांगितले तेव्हा ते सुमारे १ लक्ष श्लोकांचे बनले (मुख्य महाभारताचे ८४००० श्लोक + १६००० श्लोकांचे खिलपर्व किंवा हरिवंश ) . अर्थात हि सत्यासत्यता आपल्याला तपासून पाहता येत नाही.
असं हे महाकाव्य भारताच्या किंवा जगाच्या इतर काव्याच्या तुलनेत किती मोठे आहे हे आपण या लेखासोबत असलेल्या एका तुलनात्मक तक्त्याद्वारे पाहू शकतो. महाभारत हे रामायणाच्या सुमारे चार पट मोठे असून इलियड व ओडिसी या ग्रीक महाकाव्यांच्या एकत्रित श्लोकसंख्येपेक्षा देखील चौपट आहे.
गणेशाने लिहिलेलं काव्य ?
एवढं मोठं महाकाव्य अस्तित्वात कसं आलं असेल ? हे देखील एक कोडंच आहे. याबद्दल असे सांगितलं जाते कि व्यासांना हे काव्य स्फुरलं व त्यांना ते लिहून घेण्यासाठी श्री गणेशाला विनंती केली. गणेशाने देखील ते मान्य करताना एक अट घातली कि व्यासांनी ते सांगताना कोठेही थांबायचं नाही. व्यासांनी देखील हि विनंती मान्य करताना श्री गणेशाला एक प्रति अट घातली कि त्यानेदेखील यातील प्रत्येक श्लोक समजावून घेतल्याशिवाय शब्द बद्ध करायचा नाही. दोघांनी एकमेकांच्या अटी मान्य करत या महाकाव्याच्या निर्मितीला आरंभ केला. महर्षी व्यासांनी देखील स्वतःच्या निर्मितीला वेळ मिळण्यासाठी काही कूट श्लोकांची निर्मिती केली व एक महाकाव्य जन्माला आलं .
पण खरंच असं घडलं असेल का ? हि कथा कशी आली , गणपती हे दैवत संपूर्ण कथेत कुठेच आढळत नसताना लेखनिक म्हणून कसं आले. यातील अशा अनेक कथांचा उहापोह आपण प्रक्षिप्त म्हणजे नक्की काय? व भांडारकर संस्थेच्या डॉ सुखटणकर व त्यांच्या चमूने ते कसे ठरविले हे पुढील लेखात पाहू .
Mahabharata Reference Books महाभारतासाठी संदर्भ व विश्लेषण ग्रंथ
प्रत्येक मराठी घरात रामायण-महाभारत यासारखे धर्मग्रंथ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रथम हस्तांतरित होतात होतात ते मौखिक स्वरूपात. आमच्या लहानपणी तरी तशीच परिस्थिती होती व त्यामुळे त्यातील अद्भुताचे मलाही एक कुतूहल निर्माण झाले आणि त्यातूनच त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्याची प्रेरणा देखील. महाभारतासारखा प्रचंड ग्रंथ तर अनेक अद्भुतांनी भरलेला. प्रथम त्यातील लहानसहान गोष्टी वाचल्या. त्यानंतर पांडवप्रताप, महाभारत कथासार व त्यापुढे जैमिनी अश्वमेध कथासार अशा छोट्या पुस्तकातून महाभारताचा एक सलग कथा भाग माझ्या मनात साकार झाला. त्याही पुढे जाऊन मृत्युंजय, युगंधर, राधेय यांच्यासारख्या ललित कादंबऱ्या वाचल्या व त्यातील कर्ण, कृष्ण यांच्या रेखाटनाने तर मी भारावूनच गेलो होतो.
सुमारास पुण्याच्या भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटने (BORI) महाभारतावर काही दशकं संशोधन करीत महाभारताची चोखंदळ अथवा संशोधित आवृत्ती (ज्याला इंग्रजीमध्ये क्रिटिकल एडिशन CE , म्हणून ओळखलं जातं) प्रसिद्ध केली होती. मूळ महाभारतात नसलेले आणि नंतर घुसडले गेले असावेत असे वाटणारे – सर्व श्लोक त्यांनी बाजूला काढले व महाभारताच्या तत्कालीन अभ्यासकांना महाभारताच्या अभ्यासासाठी एक नवं दालन उपलब्ध झालं. असं करताना BORI च्या अभ्यासकांनी भारताच्या विविध भागात उपलब्ध असणाऱ्या महाभारताच्या विविध प्रतींचा सुमारे चाळीसएक वर्ष अभ्यास केला व त्यामुळे या संदर्भ ग्रंथाला एक प्रतिष्ठा प्राप्त झाली. या संदर्भ ग्रंथांच्या आधी, बर्याच जणांनी महाभारताच्या निळकंठ प्रतीला प्रमाण मानलं होतं. ही प्रत म्हणजे महाराष्ट्रातील गोदावरी तीरावरील कोपरगाव या ठिकाणच्या, निळकंठ चतुर्धर, या संस्कृत अभ्यासकांने महाभारतावर केलेलं सतराव्या शतकातील विवेचन. सध्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या ठिकाणी जन्मलेले हे कवीवर्य पुढे संस्कृतच्या अभ्यासासाठी वाराणसीत स्थायिक झाले येथूनच त्यांनी महाभारतावरील हे संस्कृत टिपण लिहिलं. बऱ्याच संस्कृत अभ्यासकांकडून ते आजही प्रमाण मानले जाते.
याबद्दल एक विशेष सांगायचे म्हणजे निळकंठ यांची ही प्रत सतराव्या शतकातील असल्याने यातील युध्दवर्णनात युद्धांच्या उल्लेख तोफांचे उल्लेख देखील आहेत. याचा उपयोग महाभारतकाळी देखील तोफा होत्या असे सांगायला आज केला जातो तो पूर्णतः चुकीचा आहे.
भांडारकर प्रत उपलब्ध झाल्यावर मराठीत देखील अनेक साहित्य कृतींना बहर आला. यात मृत्युंजय, राधेय, युगंधर सारख्या ललित कादंबरी वजा लिखाण होते तसेच युगांत, व्यासपर्व, हा जय नावाचा इतिहास आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, महाभारत एक सूडाचा प्रवास असे विश्लेषणात्मक वृत्तपत्रीय लेखन संकलन अथवा पुस्तके देखील होती. कर्ण व श्रीकृष्ण या व्यक्तिरेखाना त्यामुळे बराच उठाव मिळाला. कर्णावर तर मृत्युंजय, तो राजहंस एक अशी मराठी नाटकं देखील निघाली होती जी मी देखील त्याकाळी पाहिली होती.
१९७० व १९८०च्या सुमारास वृत्तपत्रातून महाभारतावर बरेच लेख-प्रति लेख छापून येत. त्यातून यातली बरीचशी पुस्तकं संकलित केली गेली आणि म्हणूनच त्याचे साहित्यिक मूल्य देखील फार आहे. या टीकात्मक व विश्लेषणात्मक लेख आणि पुस्तकांबरोबरच महाभारताचे एक मानवी स्वरूप देखील उलगडायला सुरुवात झाली व त्यातील प्रत्येक चमत्कृतीपूर्ण व अनाकलनीय प्रसंगावर सांगोपांग विचार व चर्चा सुरू झाली. यातूनच श्री एस एल भैरप्पा यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाच्या लेखणीतून १९८०च्या सुमारास पर्व ही कादंबरी साकारली आणि महाभारताचा एक वेगळाच मानवी पैलू लोकांच्या ध्यानात आला व हळूहळू वाचकांच्या पचनी पडू लागला.
माझ्यासारखा सर्वसामान्य वाचक मात्र यापासून बराच दूर होता. मी शालेय जीवनात युगंधर, मृत्युंजय सारखे ललित कादंबरी प्रकारात मोडणारे वाङ्मय वाचले होते. परंतु या टीकात्मक अथवा विश्लेषणात्मक लेख व पुस्तकांपासून मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो व म्हणूनच माझ्या पिढीच्या अनेकांप्रमाणे मलादेखील बी. आर. चोप्रा यांचे दूरदर्शनवरील महाभारत हेच संपूर्ण महाभारत होते. अभ्यासाच्या व नंतरच्या नोकरीच्या व्यस्ततेत महाभारत हा विषय मागे पडला आणि मधल्या कालावधीत केवळ ज्ञानरंजन म्हणून अधून मधून जमेल तसे वाचत राहिलो.
पण काही वर्षांपूर्वी श्री. एस. एल. भैरप्पा यांची पर्व ही कादंबरी माझ्या हातात पडली. ती वाचताच मी भारावून गेलो. पर्व मधील घटना मनाला पटू लागल्या. चमत्कारांवरील दैवी आवरण बाजूला होऊ लागले. त्या मागचा मानवी चेहरा जास्त जवळचा वाटू लागला आणि मग कुठेतरी मनाच्या मागच्या कोपऱ्यातील अडगळीतून असलेल्या युगांत, व्यासपर्व, महाभारत एक सूडाचा प्रवास, महाभारत-संघर्ष आणि समन्वय, अशा अनेक पुस्तकांचा शोध सुरू झाला आणि हळूहळू ती वाचताना महाभारता बद्दलची उत्सुकता नव्याने जागृत झाली. त्यातील घटनांना नवे आयाम मिळाले.नवीन दृष्टीकोन मिळाला. एकदम काहीतरी नवीन वेगळं गवसल्याचा आनंद मिळाला. मग हे सगळं सांगायचं कुणाला? कळणार कोणाला? आणि कधी? हेच समजेना म्हणून हा ब्लॉग लेखन प्रपंच.
आता ही सर्व पुस्तक दोन-दोनदा वाचल्यावर डॉक्टर रा. शं. वाळिंबे संपादित विदर्भ-मराठवाडा कंपनीचे सर्व खंड नव्याने वाचायला घेतले आहेत. संदर्भासाठी गीता प्रेस, गोरखपुर यांची संस्कृत हिंदी आवृत्ती व भांडारकर इन्स्टिट्यूटची संस्कृतमधील संशोधित प्रत देखील आहे. या सर्वांचा वापर करून हळूहळू मला उमगलेले महाभारत मराठीतून उलगडण्याचा विचार आहे. तसं पाहिलं तर, ते इतर बऱ्याच ब्लॉगवर पण उपलब्ध आहे तरी पण मला त्याचे अस्तित्व पुर्ण वाटत नसल्याने, माझ्या दृष्टीकोनातून ते सादर करण्याचा माझा प्रयत्न राहील. अर्थात यासाठी बराच कालावधी लागेल याचीही मला जाणीव आहे तरीपण पाहुया किती तग धरता येतो ते.मला उपलब्ध झालेले काही साहित्य (गीता प्रेस व भांडारकर प्रती) नेटवर उपलब्ध आहे. यथावकाश मी ते माझ्या या ब्लॉग वर पण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेनच पण त्याआधी त्याचे माझ्या दृष्टिकोनातून परीक्षण देखील वेगळ्या लेखात करेन.

