http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/10/blog-post.html
शिवछत्रपतींचे व्यक्तिमत्व ... भाग १
साधारणपणे २००६-७ मध्ये मी मराठा इतिहास आणि संबंधित विषयांवर ओर्कुटवर लिखाण सुरू केले होते. तेंव्हा मराठीत ब्लॉग वगैरे काही ठावूक नव्हते मला. काही दिवसांनी मला एक सचिन नामक मुलाचा फोन आला. (मी माझा फोन नंबर ओर्कुटवर तेंव्हा ठेवलेला होता.) लोअर परेलला असणाऱ्या एका जुन्या ग्रंथालयात काम करणाऱ्या सचिनने मला त्याच्याकडे असलेली काही जुनी पुस्तके बघण्यासाठी तिकडे बोलावले होते. माझ्या वाचनात उत्तम भर पडेल असे त्याचे म्हणणे होते. मी दुसऱ्या दिवशी सकाळी लगेचच तिकडे पोचलो. त्याने ७-८ पुस्तके माझ्यासमोर काढून ठेवली. मी ती सर्व पुस्तके २ महिन्यात परत करण्याच्या हमीवर घरी घेऊन आलो. त्या ग्रंथालयाचा सदस्य नसताना आणि तो मला ओळखत देखील नसताना त्याने इतकी जुने पुस्तके मला नेऊ देणे म्हणजे मला थोडे आश्चर्य वाटते. अर्थात मी माझा पता आणि संपर्क क्रमांक त्याच्याकडे ठेवलेला होताच. घरी आलो आणि पुढचे काही दिवस सुट्टी असल्याने अधाशासारखे ती पुस्तके वाचून काढू लागलो. त्यातल्या एका पुस्तकाचे नाव होते 'छत्रपती शिवाजी महाराज - पत्ररूप व्यक्तीदर्शन' लेखक होते डॉक्टर रामदास.
ह्या पुस्तकात राजांनी लिहिलेल्या काही पत्रांचा अभ्यास करून
राजांचे व्यक्तिमत्व मांडण्याचा पर्यंत केलेला होता. सदर पुस्तक १९४२
सालचे होते. माटुंगा येथून प्रकाशित झालेल्या ह्या पुस्तकाची किंमत अवघे २
रुपये लिहिलेली होती. हे दुर्मिळ पुस्तक आता बाजारात उपलब्ध नाही हे मला
ठावूक होते तेंव्हा मी त्या पुस्तकाची सर्व पाने स्कॅन करून घेतली.
पुस्तकात शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रांची अनुवादित पत्रे होती. अशी
एकूण ५० पत्रे छापलेली होती. गेल्या वर्षी मी हा ब्लॉग सुरू केला तेंव्हा
त्यातली बहुतेक पत्रे या ब्लॉगवर दिली होती. सदर लिखाण त्याच पत्रांवर
आधारीत असून त्यातला भाग १ आपल्यासमोर सादर करतोय... सध्यातरी लिखाण २
भागात संपवायचा विचार आहे पण बघुया जस-जसे लिखाण होईल त्यावर ठरेल किती
भाग होतील ते. अपेक्षा हे आपल्याला आवडेल.....
शके १५५७ म्हणजेच इ. स. १६४५ च्या एप्रिल महिन्यात वयाच्या अवघ्या १५ व्या
वर्षी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली. रोहिड खोरे आणि वेळवंड खोरे येथील
देशपांडे - कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे राजांसोबत होते असे काही
वतनदारांकडून कळल्यावर आदिलशहाच्या शिरवळ येथल्या सुभेदाराने त्यांना ३०
मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले. या पत्रामुळे दादाजी चिंतेत
असल्याचे कळताच राजांनी त्यांना पत्र पाठवले. 'हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे' या
आशयाचे पत्र पाठवले. आपण सुरु केलेले कार्य हे ईश्वरी इच्छेनूसार आहे, ही
धारणा त्यांनी ह्या पत्रामधून व्यक्त करून त्यांचे मनोबल वाढवले आहे.
आपल्या सहकाऱ्यांना आवश्यक असे मानसिक बळ ते वेळोवेळी देत असत.
स्त्रियांशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांविरुद्ध शिवरायांचे धोरण अतिशय कडक होते. ह्या बाबतीत ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. 'बदअमलाबद्दल कड़क शासन'
ते करत असत. जानेवारी १६४६ मध्ये त्यांनी रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ़
भिकाजी गुजर याला एका स्त्री सोबत गैरवर्तनासाठी चौरंग करण्याची शिक्षा
दिली होती. (चौरंग करण्याची शिक्षा म्हणजे दोन्ही हात व दोन्ही पाय तोडणे,
पण त्यानंतर माणूस रक्तस्त्राव होउन दगावू नये ह्यासाठी जखमा गरम तुपात
बूडवल्या जात.) पुढे त्याचाच कुळातील सोनजी गुजर याने राजांना 'पाटीलकी परत करावी, आम्ही स्वराज्यासाठी निष्ठा अर्पण करतो'
असे पत्र पाठवले तेंव्हा राजांनी २८ जानेवारी १६४६ च्या पत्रानुसार
त्याची पाटिलकी मान्य केली आहे. योग्य माणसे ओळखून त्यांच्याकडून निष्ठेने
काम करून घेण्याची ही कला अतुलनीय आहे.
शिवरायांनी वतनदारी संस्था बंद करवली असे नेहमी म्हटले जाते, ऐकिवात
येते, ते पूर्णपणे खरे नाही. खरेतर त्यांनी वतनदारी संस्थेत अमुलाग्र बदल
करून तिचा उपयोग स्वराज्यासाठी केला. ते अधिक मजबूत केले. पुरंदरचे
किल्लेदार सरनाईक महादजी यांचे निधन झाल्यावर त्यांचे पुत्र निळकंठराव
यांना पाठवलेल्या पत्रात राजे म्हणतात,"जोपर्यंत तुम्ही आम्हासी
इमाने वर्ताल, तोपर्यंत आम्हीहि तुम्हासी इमाने वर्तोन. तुम्हापासून
इमानांत अंतर पडिलियां आमचा हि इमान नाही." कुठले वतन वंश
परंपरेने सुरू ठेवायचे आणि कुठले नाही याबाबत ते माणूस ओळखूनच निर्णय घेत
असणार. याच आशयाची अजून काही पत्रे उपलब्ध आहेत. 'मी शत्रूंना दगे दिले, मित्रांना दगे दिल्याचे दाखवा' असे
आवाहन त्यांनी केले होते. त्याला आजपर्यंत उत्तर आले नाही. स्वराज्य उभे
करताना एक-एक माणूस जोडताना त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती हे
जीवाला-जीव देणारी, लाख मोलाची माणसे पाहिली की सहज कळून येते.
शिवरायांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात काही इनामे दिली होती. शिवराय १६७४ मध्ये छत्रपति होण्याआधी विजयनगरचे साम्राज्य हे दक्षिण भारतातले शेवटचे हिन्दू साम्राज्य होते. ते १५ व्या शतकात लयास गेल्यानंतर दक्षिणेमध्ये आदिलशाही, कुतुबशाही यांचे राज्य होते. विजयनगरच्या हिंदू साम्राज्याचा वंशज तिरुमलराय यांना शिवरायांनी १५ एप्रिल १६५७ च्या रोप्यपटाद्वारे काही जमीन निर्वाहासाठी इनाम म्हणून दिली होती. याशिवाय आंबेजोगाईच्या दासोपंतांना, आळंदीच्या 'ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या व्यवस्थेसाठी दर सालाना दानाची व्यवस्था केली होती. आग्र्याहून सुखरूप सुटून राजगडी परत येताना राजांनी ९ वर्षाच्या शंभूराजांना कृष्णाजी विश्वासराव आणि काशी त्रिमल यांच्याकड़े ठेवले होते. ते शंभूराजांना राजगडी परत घेउन आल्यावर राजांनी त्यांना १ लाख रुपये इनाम दिले. १६६० पासून प्रतापगडाच्या तुळजा
भवानी देवीच्या नैवेद्याची संपूर्ण व्यवस्था, १६७५ पासून पाटगाव मौनीबाबांच्या मठाला सालीना १००० माणसांचा शिधा ही सर्व पत्र उपलब्ध आहेत. छत्रपती शिवरायांनी १६७८ मध्ये समर्थ रामदास स्वामींच्या चाफळ येथील मठास सनद दिली आहे. त्यात ३३ गावे, ४१९ बिघे जमीन, १ कुरण आणि १२१ खंडी धन्य ह्याचा तपशील दिसून येतो.
छत्रपती शिवरायांचे शेती विषयक धोरण आणि व्यापार विषयक धोरण
हा खरतर अभ्यासाचा एक मोठा विषय. पण त्या संदर्भात आपण काही पत्रे बघुया.
पुणे परगण्यामधले देखमुख बापाजी शितोळे आणि देशमुख विठोजी शितोळे यांनी 'मुघलांच्या धामधूमीमुळे आमचे इतके नुकसान झाले आहे की आम्ही कर भरू शकत नाही'
असे राजांना कळवले होते. त्यांचा हा अर्ज राजांनी मान्य करून त्यांचा कर
रद्द केला आहे. प्रजा नियमासाठी नव्हे तर नियम प्रजेसाठी आहेत हे त्यांना
सर्वथा ठावूक होते. आवश्यक तेंव्हा नियमात बदल करून धोरणे राबवता येतात हे
ह्याचे उत्तम उदाहरण. कोकणात जम बसल्यावर राजांनी कोकणातील व्यापार
वाढविला होता. दाभोळ येथे नारळांची विक्री अतिशय कमी किमतीत होऊ लागल्याने
त्याचा परिणाम आजूबाजूच्या व्यापारावर होऊ लागला. तेंव्हा राजांनी आपल्या
सुभेदाराला पत्र लिहिले. राजे म्हणतात,'दाभोळास नारळ कमनिर्खे विकते हा अंमल कैसा आहे?'
पोर्तुगीझांच्या ताब्यातील व्यापारी मीठ कमी किमतीत विकत असल्याने
स्वराज्यातील मीठ व्यापारयांना कोणी भाव देईना. आपल्या व्यापारयांना
उत्तेजन मिळावे म्हणून राजांनी कुडाळ येथील आपला सुभेदार नरहरी आनंदराव यास
पत्र लिहिले. ते म्हणतात,'बारदेशीचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे' ह्यावरून दिसून येते की व्यापारावर त्यांचे किती बारीक लक्ष्य होते.
प्रभानवलीचा सुभेदार रामजी अनंत यास राजांनी पाठवलेले पत्र अतिशय वेधक आहे. ५ सप्टेंबर १६७६ रोजी लिहिलेल्या ह्या पत्रात राजे म्हणतात,'येक भाजीच्या देठासहि मन नको' शेतकरी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक असून त्यावर अन्याय तर होऊ नयेच, तर त्यास योग्य त्या सवलती मिळाव्यात आणि राज्याचे उत्पन्न वाढावे असे विचार ह्या पत्रात व्यक्त करण्यात आले आहेत. याशिवाय जमिन महसूलीची पद्धत, तगाई देणे, कर्जमुक्त करणे याबाबत सविस्तर विवेचन सदर पत्रामध्ये राजांनी केले आहे. (गेल्या काहीवर्षांपासून शेतकर्याच्या झालेल्या अवस्थेबद्दल बोलताना, हे पत्र प्रत्येक मामलेदार कचेरीमध्ये लावले पाहिले अशी सूचन बाबासाहेब पुरंदरे यांनी मध्ये एका कार्यक्रमात केली होती.)
शिवछत्रपतींचे युद्ध आणि सैन्यविषयक धोरण हा अजून एक
अभ्यासाचा प्रचंड विषय. सैन्याची छावणी ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी
कोणती काळजी घ्यायला हवी ह्याबद्दल सविस्तर विवेचन करणारे पत्र राजांनी ९
मे १६७४ रोजी आपल्या कोकणातील अधिकाऱ्यांना धाडले. राज्याभिषेक अवघ्या
महिन्यावर आलेला असतानाही राजांचे प्रजाहीताकडे संपूर्ण लक्ष होते.
सैन्याकडून प्रजेला यत्किंचितही उपसर्ग पोहोचू नये यासाठी ते किती सतर्क
असत हे ह्या पत्रावरून दिसून येते. आपल्या ३०० सैनिकांकडून एका गावाला
उपसर्ग झाल्याचे कळताच त्यांचे हात तोडणारा हा राजा निराळाच. तलवार घेऊन
लढाई करणाऱ्या हातांपेक्षा स्वराज्यामागे असलेले जनतेचे हात त्यांना जास्त
महत्वाचे वाटले असणार. स्वराज्याचा मूळ गाभा हा किल्ले आणि त्यांची
बांधणी यावर होता आणि त्यावर होणारा खर्च देखील प्रचंड होता. असाच एक
किल्ला राजांनी बाजीप्रभू देशपांडे यांना वसवायला सांगितला होता. १६५९
मध्ये 'मोहनगड किल्ला वसवावा.' असे पत्र राजांनी
बाजीप्रभूंना पाठवले आहे. तटबंदीचे काम करणे आणि गडावर वसाहत बसवणे असे
सांगून बांधकाम एका पावसाळ्यात मोडकळीस यायला नको ते मजबूत असावे असे
त्यांनी म्हटले आहे. शिवरायांना दुर्गबांधणी या विषयात प्रचंड दूरदृष्टी
होती. १६७७ मध्ये दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान चेन्नई येथील जिंजी
किल्ल्याचे बांधकाम राजांनी करवून घेतले. ते बघून फ्रेंच मार्टिन त्याच्या
डायरीत म्हणतो,"त्यांनी केलेले बांधकाम हे अभूतपूर्व आहे.
युरोपातल्या कुठल्याही बांधकाम तज्ञाला असे बांधकाम करण्याचा विचार देखील
सुचणार नाही."
या भागात आपण शिवरायांसंदर्भात काही पत्रे पाहिली. पुढच्या भागात आपण अफझलखान, शाहिस्तेखान, मिर्झाराजा, व्यंकोजी भोसले, दक्षिण दिग्विजय मोहीम अशी राजकारणाचा विस्तृत पट मांडणारी पत्रे बघू...
शिवछत्रपतींचे व्यक्तिमत्व ... भाग २
ज्या दुर्मिळ पुस्तकातून मी पत्रे संकलित करून लिहितो आहे त्या पुस्तकाबद्दल आपण गेल्या भागात पहिले. काही पत्रांच्या संदर्भाने राजांबद्दल अधिक जाणून सुद्धा घेतले. ह्या भागात आपण राजांनी लिहिलेली राजकारण विषयक पत्रे बघूया...
येत्या १० नोव्हेंबर रोजी आहे ३५१ वा शिवप्रताप दिवस. शिवप्रतापदिवस म्हणजे ज्यादिवशी राजांनी प्रतापगडाच्या साक्षीने अफझलखानाला ठार मारले तो दिवस. जी जावळी घेण्यासाठी खान आला होता त्या जावळीकडे आणि तिथल्या चंद्रराव मोरेकडे राजांचे लक्ष १६५१ पासूनच होते. चंद्रराव मोरे याने जेंव्हा बीरवाडीच्या माल आणि बाजी पाटील यांची वतने बळकावली तेंव्हा त्यांनी येऊन शिवरायांपुढे गाऱ्हाणे मांडले. त्यांच्या अधिकारपणाला मान्यता देताना राजे म्हणतात,"तुम्ही अधिकारपण खाउनु अधिकारपणाची चाकरी करणे" जेंव्हा खानाचे आक्रमण झाले तेंव्हा राजांनी त्याला पाठवलेल्या पत्राचा स्वैर मराठी अनुवाद तुम्हाला येथे वाचता येईल. पत्रात राजांनी खानाच्या सैन्याला जावळीच्या खोऱ्यात जगातल्या सर्व सुखसोयी उपभोगता येतील असे म्हटले होते. अर्थात त्यांना कश्या सुखसोई पोचवल्या गेल्या हे सर्वश्रुत आहेच!!! खानस्वारी पाठोपाठ मुघलांनी शास्ताखानाला (शाहिस्तेखानाला) दख्खन मोहिमेवर धाडले. औरंगाबादवरून निघालेल्या शाही फौजा थेट पुण्यात शिरल्या आणि सर्वत्र नासधूस करू लागल्या. ह्यात मावळामधल्या लोकांची जीवित व वित्तहानी खुप होत असे. आपल्या प्रजेबद्दल सदैव जागरुक असणाऱ्या राजांनी रोहिडखोरे मधील कारी येथील देशमूख सर्जेराव जेधे यांना २३ ऑक्टोबर १६६२ रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,"जे बांद धरून नेतील त्याचे पाप तुमचा माथा बसेल" ह्या पत्रामधून राजांची आपल्या रयतेविषयी असणारी काळजी व तळमळ दिसून येते.
१६५९ च्या शेवटाला केलेला खानवध आणि नंतर कोल्हापूरपावेतो मारलेली धडक, पन्हाळा आणि जुलै १६६० मधला बाजी-फुलाजी प्रभूंचा भीम पराक्रम, वेढ्यातून सुटून आल्यावर १६६३ मध्ये खुद्द शाहिस्तेखानाची राजांनी छाटलेली बोटे ह्या सर्वात दख्खन पेटून उठले होते. गेल्या ३-४ वर्षात दख्खनेत झालेली हानी भरून काढण्यासाठी राजांनी सुरत बेसुरत करून प्रचंड लुट प्राप्त केली. आत्मविश्वास कैक पटींनी वाढलेल्या राजांनी दख्खन मुघल सुभेदाराला पत्र पाठवले. मूळ पत्र फारसीमध्ये असले तरी त्याचा मराठी अनुवाद येथे देत आहे. स्वराज्य निर्मितीसोबत त्याचे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी आक्रमकांशी युद्ध खेळण्यास जागृक राहणे याची पूर्ण जाणीव त्यांना होती. ह्या पत्रातून त्यांचा आत्मविश्वास आणि निर्धार दिसून येतो.ह्या पत्रात राजे म्हणतात,"आपल्या भुमीचे संरक्षण करणे हे माझे कर्त्तव्य आहे आणि मी आपले कर्तव्य बजावण्यास कधीही चुकणार नाही." हे संपूर्ण पत्र वाचावे असे आहे.
"आज तीन वर्षे बादशहाचे मोठे मोठे सल्लागार आणि योद्धे आमचा प्रदेश काबीज करण्यासाठी चालून येत आहेत, हे तुम्हा सर्वांस माहिती आहेच. बादशहा हुकुम फर्मावतात,'शिवाजीचा मुलुख आणि किल्ले काबीज करा.' आणि तुम्ही जवाब पाठविता 'आम्ही लवकरच काबीज करतो.'
आमच्या या दुर्गम प्रदेशात कल्पनेचा घोडा सुद्धा नाचविणे कठीण आहे, मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला? भलत्याच खोट्या बातम्या लिहून पाठवण्यात तुम्हाला लाज कशी वाटत नाही? (विजापूरचे) कल्याणी आणि बिदरचे किल्ले उघड्या मैदानात होते ते तुम्ही काबीज केले. आमचा प्रदेश अत्यंत डोंगराळ आहे. नदी-नाले उतरून जाण्यास वाट नाही. अत्यंत मजबूत असे साठ किल्ले माझे आज तयार आहेत. पैकी काही समुद्र किनाऱ्यावर आहेत. बिचारा अफझलखान जावळीवर फौज घेऊन आला आणि नाहक मृत्यूमुखी पडला. हा सर्व प्रकार तुम्ही बादशहास का कळवीत नाही? अमीर उल उमराव शाहिस्तेखान आमच्या या गगनचुंबित डोंगरात आणि पाताळात पोचणाऱ्या खोऱ्यांत तीन वर्षे सारखा खपत होता. 'शिवाजीचा पाडाव करून लवकरच त्याचा प्रदेश काबीज करतो' असे बादशहाकडे लिहून लिहून थकला. ह्या खोडसाळ वर्तनाचा परिणाम त्याला भोवला. तो परिणाम सूर्यासारखा सर्वांच्या समोर आहे.
आपल्या भूमीचे संरक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि तुम्ही बादशहाकडे कितीही खोट्या बातम्या लिहून पाठवल्या तरीही मी माझे कर्तव्य बजावण्यास कधीही चुकणार नाही."
१६६४ मध्ये आदिलशाही सरदार खवासखान याने शिवरायांवर स्वारी केली. राजे पुन्हा एकदा कोकणात उतरले आणि त्यांनी विजापूरचा प्रदेश अधिक जोमाने काबीज करायला सुरवात केली. खवासखान, बाजी घोरपडे आणि खेम सावंत या त्रिकुटाचा शिवरायांनी एकत्र न होऊ देता एकएकटे पाडून बिमोड केला शिवाय पोर्तुगीज मुलुख सुद्धा काबीज केला तेंव्हा त्यांना धाक बसून त्यांनी नजराणा देखील पाठवला. आपल्या आऊसाहेब जिजामाता यांस लिहीलेल्या पत्रात ते म्हणतात,"स्वामींचे पुण्यप्रतापें आज्ञेप्रमाणे घडून आलें." राजांनी संपूर्ण कोकणावर ताबा मिळवत आता सिंधूदुर्गाचा पाया घातला आणि आपला आरमारी दरारा वाढवा म्हणून पहिली आरमारी मोहीम काढली. १६६५च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी घाईघाईने राजगड गाठला. पुरंदरचा तह हा मराठा इतिहासामध्ये एक मैलाचा दगड ठरला. हा तह व्हायच्या आधी राजांनी जयसिंगला एक विस्तृत पत्र लिहिले होते. त्याबद्दल आपण पुढच्या भागात माहिती घेऊ...
... भाग ३
स्वराज्यावरील संकटे काही थांबायचे नाव घेत नव्हती. १६५९ च्या अफझलखान स्वारीपासून सुरू झालेली ही सत्वपरीक्षा राजे प्रत्येक वेळी निभावून नेत होते. कधी स्वतःच्या जीवावर उदार होऊन तर कधी स्वतःच्या अतिशय प्रिय आणि जवळच्या माणसांचा त्याग भोगून. १६६४ साली राजांनी कोकणात यश प्राप्त केलेले असले तरी १६६५ च्या सुरवातीला 'ती' बातमी मराठा हेरांनी राजांपर्यंत पोचवली. मुघलांचा सेनापती मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येत होता. पुढे ३ महिन्यात मराठा - मुघल तह घडला. पुरंदरचा तह हा मराठा इतिहासामध्ये एक मैलाचा दगड ठरला. हा तह व्हायच्या आधी राजांनी जयसिंगला एक विस्तृत पत्र लिहिले होते. हे संपूर्ण पत्र वाचावे असेच आहे. पत्रामध्ये राजे म्हणतात,"तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे."
'हे श्रेष्ठ सरदारा, तुझ्यामुळे राजपुतांची मान उन्नत आहे. तुझ्यामुळे बाबरवंशाची राज्यलक्ष्मी अधिक प्रबळ झाली असून तुझे सहाय तिला मिळत आहे. हे प्रबळ आणि प्रौढ जयशहा! सीवाचा प्रमाण व आशीर्वाद स्वीकार. परमेश्वराने तुझे रक्षण करून तुला धर्माचा व न्यायाचा मार्ग दाखवावा. मी असे ऐकले आहे की, मजवर हल्ला करण्यासाठी व दख्खन जिंकण्यासाठी तू आला आहेस. हिंदूंचे हृद्य व रक्त यांच्या रक्ताने तू जगात यशस्वी होऊ पहात आहेस. पण तुझ्या हे लक्ष्यात आलें नाही की याने तुझ्या तोंडास काळोखी फासली जात आहे, कारण तुझ्या या कृत्याने देशावर व धर्मावर आपत्ती ओढवली आहे. जर तू क्षणमात्र अंतर्मुख होऊन आपल्या हाताकडे आणि झग्याकडे विवेकदृष्टीने पाहशील तर हा रंग कोणाच्या रंगाचा आहे व या रंगाचा रंग इहपरलोकी काय होणार हे तुला समजेल.
जर तू आपणहून दक्षिण देश जिंकण्यास आला असतास तर माझे शीर व डोळे तुझ्या रस्त्यावर बिछान्याप्रमाणे पसरले असते, मी तुझ्या घोड्याबरोबर मोठी सेना घेऊन आलो असतो आणि देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतची भूमी तुला जिंकून दिली असती. पण तू सज्जनांना फसविणाऱ्या औरंगजेबाच्या थापास भूलुन इकडे आला आहेस. तेंव्हा यावेळी तुझ्याशी कोणता डाव खेळावा हे मला समजेनासे झाले आहे. जर तुला सामील व्हावे, तर त्यात मर्दपणा नाही, कारण मर्द लोक प्रसंगाची सेवा करीत नाहीत. सिंह कधी भित्रेपणा दाखवत नाही. बरे, जर मी तलवार व कुऱ्हाड यांचा उपयोग केला तर दोनही बाजूंनी हिंदुंचीच हानी होणार. मोठ्या दु:खाची गोष्ट ही आहे की, मुसलमानांचे रक्त पिण्याखेरीज इतर कामासाठी माझ्या तलवारीस म्यानातून बाहेर पडावे लागेल! जर या लढाईसाठी स्वतः: तुर्क आला असता तर आम्हा वीरपुरुषांना घरबसल्या शिकार साधल्यासारखे झाले असते. पण जेंव्हा अफझलखान न शाईस्ताखान यांच्या हातून काम झेपत नाही असे दिसले तेंव्हा तुला आम्हाशी युद्ध करण्याकरीता नेमले आहे. कारण स्वतः: औरंगजेब आमचा मारा सोसण्यास समर्थ नाही. हिंदूलोकांत कोणी बलशाली राहू नये आणि सिंहांनी आपसांत लढून घायाळ व शांत व्हावे आणि गिधाडांना जंगलाचे स्वामित्व प्राप्त व्हावे, अशी औरंगजेबाची इच्छा आहे. ही गूढनीती तुझ्या ध्यानात येत नाही ह्यावरून त्याच्या जादूने तुला भूल पडली आहे असे प्रत्ययास येते.
तू जगात बरेवाईट पुष्कळ प्रसंग पहिले असशील. बागेत तू फुले आणि कंटक या दोघींचाही संचय केला असशील, पण आम्हा लोकांशी युद्ध करून हिंदूंचे शीर धुळीत मिळवण्याचे काम मात्र तू करू नये. प्रौढ वयात अल्लडपणा न करता सादीच्या त्या वचनाचे स्मरण कर, "सर्वच ठिकाणी घोडा फेकता येत नाही. कधी कधी ढाल फेकून पळून जाणे योग्य असते." व्याघ्र मृगादि प्राण्यांवर व्याघ्रता करतो, पण सिंहाबरोबर गृहयुद्ध करण्यास प्रवृत्त होत नाही. जर तुझ्या तीक्ष्ण तलवारीत पाणी असेल व घोड्यात दम असेल तर हिंदू धर्माच्या शत्रूंवर हल्ला करून इसलामाचे जड मूळ खोडून टाक.
जर या देशाचे राज्य दारा शिकोह (१) यास मिळाले असते तर आम्हा लोकांवर त्याने कृपा, अनुग्रह केला असता पण तू जसवंतसिंहास दगा दिलास व उच्चनीच याची पारख तुला करता आली नाही. आजवर किरकोळ शत्रूंशी गाठ पडल्यामुळे तुझा दम कायम राहिला आहे. परंतु तू आता सिंहाशी युद्ध करण्याची धिटाई करून आला आहेस. एवढ्या धावपळीने तुला काय मिळत आहे? तू मृगजळाच्या मागे धावत आहेस. एखाद्याने फार परिश्रम करून एखादी सुंदरी हस्तगत करावी आणि ती आपल्या शत्रूच्या स्वधील करावी, अशा तूच्छ व्यक्तीसारखा तू आहेस! तू या निचाच्या कृपेचा काय अभिमान धरतोस? जुझारसिंहाच्या (२) कामाचा परिणाम तुला लक्ष्यात नाही? कुमार छत्रसाल (३) यावर तो (औरंगजेब) कशाप्रकारची आपत्ती आणू पाहत होता, हे तू जाणतोस. याखेरीज इतर हिंदू लोकांवर या दृश्ताच्या हाताने काय काय अनर्थ आली आहेत हेही तुला माहित आहे. इष्ट हेतू साधण्यासाठी तो बापाचा व भावाचा खून पाडण्यास भीत नाही. राजभक्तीची सबब संगत असशील तर तू शहाजहानशी कसे वर्तन केलेस याचे स्मरण कर.
जर विधात्याने तुला अकलेचा अंश दिला असेल व मार्द्पानाची चाड असेल तर तू आपल्या जन्मभूमीच्या संतापात आपली तलवार तापीव व अत्याचाराच्या दु:खाने पडणार्या आसवांनी तिला पाणी दे. हा प्रसंग आम्ही लोकांनी आपसांत लढण्याचा नाही. कारण हिंदू लोकांवर यावेळी मोठे कठीण कार्य येऊन पडले आहे. आमची पोरेबाळे, देश, धन, देव व पवित्र देवपुजक या सर्वांवर त्याच्यामुळे पराकाष्ठेचे दु:ख कोसळले आहे. आणि हाच क्रम आणखी काही दिवस चालेल तर आम्हा हिंदू लोकांचे चिन्ह देखील पृथ्वीवर राहणार नाही! मुठभर मुसलमानांनी आमच्या एवढ्या देशावर प्रभुत्व गाजवावे ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. पण हे प्रभुत्व त्यांच्या पराक्रमाचे फळ नव्हे. जर तुला अकलेचे डोळे असतील तर पहा. आम्हाबरोबर तो कशा गोड गोष्टी बोलतो व चेहऱ्यावर कसे कसे रंग आणितो, आमच्या पायात आमचीच बेडी अडकीवितो व आमच्याच तलवारीने आमची शिरे कशी कापितो ते लक्ष्यात घ्या. आम्ही लोकांनी ह्यावेळी हिंदू, हिंदुस्थान आणि हिंदूधर्म यांच्या संरक्षणार्थ फार जोराचे प्रयत्न केले पाहिजेत. तलवारीस पाणी देऊन तुर्काचा जबाब तुर्कीतच दिला पाहिजे.
जर तू मारवाडचा राजा जसवंतसिंह व मेवाडचा राजा राजसिंह यांच्याशी ऐक्य करशील, तर फार मोठे काम होईल अशी अशा आहे. चोहीकडून उठावणी करून तुम्ही या सर्पाचे डोके दगडांनी ठेचून टाका. म्हणजे काही काळापर्यंत तरी त्याला दक्षिण प्रांतात आपले जाले पसरता येणार नाही. तेवढ्यात मी व माझे भालेबहाद्दर वीर विजापूर व गोवळकोंडा येथील दोन्ही बादशहांना जिंकतो. मेघासारखी गर्जना करणाऱ्या सैन्यानिशी मुसलमानांवर तलवारीचा पाउस पाडीन आणि सर्व दक्षिणदेशाच्या पटावरून इसलामाचे नाव किंवा चिन्ह धुवून टाकीन. त्यानंतर कार्यदक्ष वीर व भाला चालविणारे घोडेस्वार यांना बरोबर घेऊन प्रचंड लाटा व कोलाहल माजविणाऱ्या नदीप्रमाणे दक्षिण देशातील पहाडातून बाहेर पडून मैदानात येईन, आणि अत्यंत जलदीने तुम्हा लोकांच्या सेवेस हजर होईन व तुम्हास हिशेब विचारीन. चोहीकडून भयंकर युद्ध उपस्थित करून रणांगणात दंगल माजवून आम्ही लोक आमच्या सेनेच्या लाटा दिल्ली येथील त्याच्या जर्जर झालेल्या घरात पोहचवू. म्हणजे त्याच्या नावाचे औरंगहि राहणार नाही न जेबहि राहणार नाही. तसेच त्याची तलवार राहणार नाही व कपाटाचे जाळेही राहणार नाही. शुद्ध रक्ताने भरलेली नदी वाहवून आम्ही आमच्या पितरांच्या आत्म्याचे तर्पण करू. हे काम काही फार कठीण नाही. फक्त हृद्य व डोळे व हात यांची आवशक्यता आहे. दोन अंत:करणे (शिवराय व जयसिंह) एक होतील तर पहाड तोडता येईल व मोठ्या सैन्याच्या समूहाच्या ठीकरया उडविता येतील. या विषयासंबंधी मला तुझ्याशी फार बोलणे चालणे करावयाचे आहे, ते पत्री लिहिणे संयुक्तिक नव्हे. तू म्हणशील तर मी समक्ष तुझ्या भेटीस येईन, माझा बेत तुला कळवीन. तलवारीची शपथ, घोड्याची शपथ, देवाची शपथ व धर्माची शपथ घेऊन मी सांगतो की, असे करण्याने तुझ्यावर आपत्ती येणार नाही.
अफझलखानाचा शेवट कसा झाला हे लक्षत आणून तू शंकित होऊ नकोस. त्याने बाराशे लढवय्ये हबशी माझा घात करण्यासाठी ठेविले होते. त्याच्यावर मी प्रथमच हात चालविला नसता तर यावेळी हे पत्र तुला कोणी लिहिले असते? मला तुझ्यापासून अशी भीती नाही. कारण तुझ्यात माझ्यात काही शत्रुत्व नाही. जर मला माझे उत्तर अनुकूल आलें तर रात्री मी एकता तुझ्या भेटीस येईन. शाहस्तेखानाच्या खिशातून मी जे पत्र काढून घेतले आहे ते गुप्त पत्र मी तुला दाखवीन, तुझ्या डोळ्यावर संशयाचे पाणी शिंपडून तुझी सुखनिद्रा नाहीशी करीन. तुझ्या स्वप्नाचा खरा फलादेश करून नंतर तुझा जबाब घेईन.
जर या पत्राचे उत्तर माझ्या मनजोगे न येईल तर मी आणि माझी तीक्ष्ण तलवार आहे व तुझी सेना आहे. उद्या सूर्य आपले मुख संध्याकाळात लपवील तेंव्हा माझा अर्धचंद्र (तलवार) म्यानातून बाहेर पडेल. बस्स. कल्याण असो.
**********************************************************************************
(१) दारा शिकोह हा शहाजहानचा मोठा मुलगा आणि औरंजेबाचा वडीलबंधू
होता. शहाजहान मागून गादीवर तो बसू नये म्हणून औरंगजेबाने जयसिंहमार्फत
जसवंतसिंहाला पत्र पाठवून त्याचे मन कलुषित केले आणि दारा यास कुठलेली
सहाय्य मिळू दिले नाही. पुढे औरंगजेबाने त्याचा पराभव केला आणि त्याला ठार
मारले.
(२) जुझारसिंह बुंदेला हा शहाजहानचा एकनिष्ठ जहांगीर होता. पुढे मात्र औरंगजेबाने त्याचे संपूर्ण राज्य काढून घेतली, त्याला पदच्युत केले आणि जुझारसिंहाला अक्षरश: जंगलातून वणवण फिरावे लागले.
(३) छत्रसाल बुंदेला यावर औरंगजेबाने मोठी आपत्ती आणली होती.
छत्रसालचे वडील चंपतराय यांनी खरेतर औरंगजेबाला खूप सहाय्य दिलेले होते.
पुढे आपले राज्य परत घेण्यासाठी चात्रासाल शिवरायांना राजगडी येऊन भेटले.
******************************




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा