गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

श्री रामलल्ला विराजमान

 

रामजन्मभूमी – पुरावे, पुरावे आणि पुरावे

रामजन्मभूमी वादामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने नुकताच आपला निकाल दिला. त्याद्वारे विवादास्पद जागा ही अनंत प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असल्याची श्रद्धा आणि विशास अनंत काळापासून हिंदू धर्मियांच्या मनामध्ये आहे ह्यावर पाचही न्यायाधीशांनी एकमताने शिक्कामोर्तब केलं. ह्या निकालामध्ये ह्या वादबिंदूंसंदर्भात एक पुरवणी जोडून दाव्यामध्ये दाखल विविध तोंडी आणि लेखी पुरावे न्यायालयाने चर्चिले आहेत. हा वाद वेगवेगळ्या दाव्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे तयार केला गेला होता. जसं की ही विवादास्पद जमीन प्रभू रामचंद्रांच्या मालकी हक्काची आहे का? त्यावर मंदिर होते का? मशीद बाबराने बांधली का? ती मंदिर पाडून बांधली गेली का? त्यामध्ये राम जन्म स्थान म्हणून अनादी काळापासून हिंदूंकडून पूजा होत होती का? आणि जन्मस्थान असल्याचा विश्वास आणि श्रद्धा आहे का? अधिक श्रेयस्कर ताबा मालकी हक्क ठरविण्यासाठी ह्या सर्व वाद बिंदूंचा उपयोग होणार होता. निकालातील हे जोडपत्र केवळ ह्या वादबिंदूवर भाष्य करते. की हे स्थान जन्मस्थान आहे की नाही.

रामलल्ला विराजमान ह्या वादीच्या अर्थात हिंदूंच्या बाजूने प्रभू श्रीरामांचे अयोध्येतील विवादास्पद जागा हे जन्मस्थान असून त्यावर राजा विक्रमादित्यने बाराव्या शतकात बांधलेले प्रसिद्ध मंदिर होते. मुस्लिमांच्या म्हणण्यानुसार १५२८ साली बाबराच्या आदेशाने मीर बाकी ह्या त्याच्या सेनापतीने कोणतेही मंदिर ध्वस्त न करता मशीद बांधली.

वरील सर्व वादाचे मुद्दे हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने इतर तोंडी व लेखी पुराव्यान्व्यातिरिक्त सर्व धर्माचे धार्मिक ग्रंथ, प्रवास वर्णने, गॅझेटीयर्स, कविता आणि साहित्य ह्याचे पुरावे दाखल करून घेतले तसेच ते मान्यही केले. निकालात असलेले महत्त्वाचे पुरावे काय आहेत हे जाणून घेऊया.

रामलल्ला विराजमानतर्फे श्री. के. परासरण ह्या वकिलांनी बाजू मांडताना आठव्या शतकात लिहिलेले स्कंद पुराण, वैश्नवखंड, रुद्रयमाला, अयोध्या महात्म्यवर आपली भिस्त ठेवली. ख्रिस्तपूर्व लिहिलेल्या वाल्मीकी रामायणातही अयोध्या हे जन्मस्थळ असल्याचे म्हटले आहे. तुलसीदासाने लिहिलेले ‘रामचरित मानस’ मध्येही तेच म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले की भारतीय पुरावा कायद्याप्रमाणे जेव्हा एखाद्याचे मत ग्राह्य असते तेव्हा ते ज्यावर आधारित आहे असे आधारही ग्राह्य मानावे लागतात. त्यामुळे अनेक साक्षीदारांनी दिलेले तोंडी पुरावे मान्य करताना धार्मिक ग्रंथ, चरित्रे ह्यांचे पुरावे ग्राह्य धरावे लागतात. राजपत्रे (गॅझेटीयर्स) ही पुरावा म्हणून ह्याआधीच अनेक खटल्यामध्ये मान्य केलेली कागदपत्रे आहेत. एखाद्या तथ्याची संभाव्यता जर सामान्य माणसालाही सहज वाटली तर ते सिद्ध झाले आहे असे म्हणता येते. त्याप्रमाणेच स्कंद पुराणातील अयोध्या माहात्म्यातील श्लोक हे जन्म स्थानाची भौगोलिक स्थिती दर्शवितात ज्याची आजही कसोटी बघता येते.

येथे न्यायमूर्ती एआयआर १९५४ एससी २८२ ह्या वादामध्ये न्यायाधीशांनी केलेले निरिक्षण नोंदवतात. जस्टीस बी. के मुखर्जी ह्यांनी ह्या निर्णयात म्हटले की, ‘धर्म ही नक्कीच विश्वास आणि आस्थेची गोष्ट आहे, केवळ ईश्वरवादी नाही. धर्म म्हणजे शिकवण तत्त्वप्रणाली आणि विश्वास. धर्म फक्त नैतिक नियम सांगतो असे नाही तर तो विधी, उत्सव आणि पूजापाठाच्या पद्धतीही सांगतो जो धर्माचा अविभाज्य भाग असतो. अशा पालन करण्याच्या गोष्टी ह्या अगदी खाणंपिणं आणि पेहेरावापर्यंतही असू शकतात.’

ह्या निरीक्षणावर अवलंबून राहून न्यायाधीशांनी धार्मिक शास्त्रवचने ही हिंदू धर्माचा प्रमुख आधार आहे असे म्हटले आहे. वाल्मीकी रामायण हे प्रभू रामासंदर्भातील प्रमुख स्त्रोत आहे हे म्हटले. वादींनी सुवीरा जयस्वाल ह्या इतिहासकाराच्या तपासलेल्या साक्षीप्रमाणे वाल्मीकी रामायणाचा काल हा ख्रिस्तपूर्व ३०० ते ख्रिस्तपूर्व २०० हा आहे.

वाल्मीकी रामायणातील बालकांड अध्यायातील १८ व्या भागाप्रमाणे अयोध्येत कौसल्येने दिव्य अशा बालकास जन्म दिला.
ब्रिहद्-धर्मोत्तर पुराणातील खालील श्लोकाप्रमध्ये अयोध्या हे सातपैकी एक पवित्र स्थळ असल्याचे म्हटले आहे.

अयोध्या मथुरा माया काशी काञ्ची अवन्तिका ।
पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिकाः॥

बृहद् धर्मोत्तर पुराण

स्कंद पुराणातील अयोध्या महात्म्यामधील १८ ते २५ श्लोक हे जन्माचे भौगोलिक स्थान दर्शविण्यासाठी महत्त्वाचे आहेत.

तस्मात् स्थानत ऐशाने राम जन्म प्रवर्तते |
जन्मस्थानमिदं प्रोक्तं मोक्षादिफलसाधनम ||१८||
विघ्नेश्वरात पूर्व भागे वासिष्ठादुत्तरे तथा |
लौमशात् पश्चिमे भागे जन्मस्थानं तत: स्मृतम ||१९||

स्कंद पुराण, अयोध्या महात्म्य

या स्थानाच्या उत्तर-पूर्व दिशेला रामाचे जन्मस्थान आहे. हे पवित्र स्थान मोक्षप्राप्तीचे स्थान आहे. असे म्हटले जाते की हे जन्मस्थान विघ्नेश्वराच्या पूर्व, वशिष्टच्या उत्तर व लौमासाच्या पश्चिमेला आहे. पुढील श्लोकांमध्ये ह्या स्थानाचे दर्शन घेतल्यावर जन्मांचा फेरा टाळता येतो. त्यापासून मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो असे म्हटले आहे. १८ आणि १९वे श्लोक असे स्थान दर्शवितात. त्याबरोबरच हे स्थान हे हिंदूंसाठी जन्मस्थान म्हणून अत्यंत पवित्र आणि तीर्थयात्रेचे स्थान होते हेसुद्धा सिद्ध होते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टीस अगरवाल यांनीही आपल्या २०१० च्या निकालपत्रात स्कंद पुराणाचा पुरावा ग्राह्य धरला आहे. अतिशय स्पष्टपणे त्यांनी वादग्रस्त जागा हीच जन्मस्थान असल्याचे म्हटले आहे. महंत राम विलास दास वेदांती यांनी आपल्या साक्षीत स्कंद पुराणातील दाखला दिला.

अयोध्येची राम नवमीची यात्रा चैत्रातल्या तिसऱ्या नवरात्रीपासून सुरु होते. रामजन्मभूमी पूर्वोत्तर कोपऱ्यात आहे. पश्चिमेला गणेशाची पूजा होते. जन्मभूमी वशिष्ठ कुंडाच्या उत्तरेला आहे तर वशिष्ठ कुंड विग्नेश्वरीच्या पूर्वेला आहे.

स्कंद पुराणातील वैष्णव खंड

अयोध्या हे रामाचे जन्मस्थान असल्याचे वेद, उपनिषदे, स्मृति ह्याद्वारेही सिद्ध आहे. अनेक महंत, आचार्य ह्यांनी आपल्या प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर केलेल्या वर्णनाच्या तोंडी पुराव्याच्या आधारे आणि ग्रंथांवर अवलंबून राहून हे स्पष्ट होत असल्याबाबत आणि प्रतींच्या सत्यतेबाबत न्यायालयात साक्ष दिली. ‘ स्वामी अविमुक्तस्वरानंद सरस्वती यांनी स्कंद पुराणात दिलेल्या पद्धतीप्रमाणे जन्मभूमीचं दर्शन घेतल्याचे, वादग्रस्त जमिनीवर पिंडारक, लोमश, राम जन्म भूमी, विघ्नेश, वाशिष्ठकुंड आणि विघ्नेश्वरा अशासारखी जी बारा स्थाने आहेत त्यापैकी काहींवर काही दगडी बोर्ड्स बघितले असल्याचे आणि त्याप्रमाणे जन्म भूमीचे भौगोलिक स्थान निश्चित होते असे सांगितले.

पी. व्ही. काणे ह्या इतिहासकारांनी आपले मत नोंदवले की, स्कंद पुरण हे सातव्या शतकाच्या पूर्वी आणि नवव्या शतकानंतर लिहिले गेलेले नाही. अर्थात १७-१८व्या शतकातले काव्य असण्याची शक्यता नाही. न्यायालयाने कालावधी निश्चित करण्यासाठी इतरही ग्रंथांचा तसेच इतिहासकारांच्या साक्षी नोंदवून घेतल्या आणि त्याप्रमाणे स्थान निश्चित केले.

हजारो तोंडी आणि लेखी पुराव्यांपैकी अजून एक महत्त्वाचा पुरावा गुरु नानक देवजी यांचा होता. न्यायालयात अनेक शीख साक्षीदारांनी आपल्या साक्षी नोंदवल्या आहेत. तसेच शीख संप्रदायाचा इतिहास सांगणारे अनेक ग्रंथ पुरावा म्हणून सादर केले आहेत. जन्म साखी अर्थात गुरु नानक देवजी यांची काही चरित्रे उपलब्ध आहेत ती त्यांनी न्यायालयात सादर केली आहेत. त्यापैकी पुरातन जनम साखी, पोथी जनम साखी, सचखंड पोथी – जनमसाखी श्री गुरु नानक देवजी यासारखे ज्यांची यादीच अर्ध पान होईल अनेक शीख धर्मग्रंथ आणि चरित्रे हे सर्व न्यायालयाने ग्राह्य धरले.

गुरु नानक देवजींनी इ.स. १५१० ते १५११ मध्ये अयोध्या येथील राम जन्म भूमी मंदिराला भेट देऊन रामाचं दर्शन घेतलं होतं.

जन्म साखी व गुरु नानक देवांची इतर चरित्र

न्यायाधीशांनी धर्मग्रंथातील हा पुरावा मान्य करून असं म्हटलं की जरी नेमकं स्थान ग्रंथ सांगू शकत नसतील तरी १५१०-११ साली तेथे पवित्र मंदिर होतं, जन्मस्थान म्हणून आस्था होती, भाविक यात्रा करत असत, नियमित दर्शन घेत असत हे सिद्ध होतं. त्यावरील हिंदूंचा विश्वास आणि श्रद्धाही सिद्ध होते. न्यायालयाने पुढील काही निष्कर्ष काढले नसतील तरी हे म्हणायला वाव आहे की अकराव्या शतकात राजा विक्रमादित्यने बांधलेलं मंदिर १५११ पर्यंत इतक्या सुस्थितीत होतं की तिथे भाविक दुरून दर्शनाला येत असत. मंदिर पाडून मशीद उभारली असा पुरावा नाही असं म्हणताना १५२८ ला मंदिर पाडेपर्यंत मंदिर काल ओघात नष्ट किमान १५११ पर्यंत तरी झाले नाही. आणि पुढच्या १७ वर्षातच ते काळाच्या ओघात पूर्णतः नामशेष होईल अशी शक्यताही नाही.

तुलसीदास रचित श्री रामचरितमानस इ.स. १५७४-७५ हा ग्रंथ ज्यामध्ये अयोध्या हीच जन्मभूमी असल्याचे म्हटले तो पुरावा म्हणून मानला गेला.

राजपत्रे (गॅझेटीयर्स) आणि प्रवास वर्णने ही पुरावा म्हणून किती विश्वासार्ह मानायची ह्यावर वाद झाला. ह्यासाठी भारतीय पुरावा कायद्याच्या कलम ५७ प्रमाणे इतिहास, साहित्य, विज्ञान, कला ह्या सर्व बाबींची दखल न्यायालय घेऊ शकतं. सुखदेव सिंघ वि. महाराजा बहादूर ऑफ गीद्धौर एआयआर १९५१ एससी २८८ ह्या तसेच इतरही अनेक निकालात सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे राजपत्रे ही अनुभवी अधिकाऱ्यांनी अधिकृत नोंदींच्या आधारे तयार केलेली असल्यामुळे तो औपचारिक आणि तितकाच महत्त्वाचा पुरावा आहे आणि पुरावा म्हणून ग्राह्य आहे. कलम ८१ प्रमाणेही सर्व राजपत्रे सत्य मानणे न्यायालयाला अनिवार्य आहे.

ह्याप्रमाणे ए इन इ अकबरी हे अबुल फझल अलामी ह्यांनी लिहिलेला ग्रंथ ज्याचा तिसरा खंड जदुनाथ शंकर ह्यांनी भाषांतरित केलेला आहे. हा भाग हिंदू धर्म, तत्त्वज्ञान आणि विज्ञानाचा ज्ञानकोश आहे. तसेच दुसरा भाग अकबराच्या कालावधीतल्या मुघल साम्राज्याची राजपत्रे आहेत.

तीर्थस्थळ अयोध्या, रामचंद्र अवतार, अयोध्येतील रामाचा जन्म, हिंदूंच्या अयोध्ये बद्दलच्या पवित्र आस्थेबद्दल लेखन आहे.

ए इन इ अकबरी, भाग १ व २

१६०७ ते १६११ दरम्यान भारतात येऊन गेलेला प्रवासी विल्यम फ्लीन्च ह्याने ‘Early Travels in India’ हे प्रवासवर्णन लिहिले. तो रामचंद्रांच्या महल आणि किल्ल्याच्या अवशेषांचा उल्लेख आहे. फादर जोसेफ टीफेन्थहालर ह्या प्रवाश्याने १७६६ – १७७१ मध्ये भारताला भेट दिल्यानंतर लिहिलेल्या वर्णनात म्हटले की –

सीता रसोई हे ही टेकडीवरील जागा प्रसिद्ध आहे मात्र औरंगजेबाने रामकोट किल्ला उध्वस्त करून तिथे तीन घुमटांचं मुस्लीम प्रार्थनास्थळ बांधलं. काही म्हणतात की ते बाबराने बांधलं. मी तिथे अनेक कोरीव काम केलेले खांब बघितले तसेच ते वानरांचा राजा हनुमानाने आणल्याचे म्हटले आहे. त्या ठिकाणी एक पाळणा पण बघितला. हिंदूंचा असा विश्वास आहे की भगवान विष्णूने तेथे रामाचा अवतार म्हणून जन्म घेतला. औरंगजेब वा बाबराने ती जागा उध्वस्त केली तरीही जिथे प्रभू राम राहिले त्या जागेवर हिंदू तीन वेळा जातात आणि पालथे होतात. (नमस्कार घालतात)

फादर जोसेफ टीफेन्थहालर

ईस्ट इंडिया कंपनीच्या १८२८, १८३८ सालच्या राजपत्रात राम, लक्ष्मण, सीता मंदिरे, इतिहास ह्याचे उल्लेख आहेत. १८५८ सालच्या राजपत्रात अयोध्येचं मोठं वर्णन आहे. १८५६ साली मिर्झा जान ह्यांनी हदीथ ए सेहबा नावाच्या पुस्तकात राम जन्म भूमी जी सीता की रसोईला लागून आहे तिची पूजा होते असे म्हटले आहे. जिथे भव्य मंदिर होते त्यावर बाबराने मशीद बांधली असे म्हटले आहे.

१८५८ ते १९४९
ह्या दरम्यानचे अनेक राजपत्रे, ए. एस. आय. अहवाल, पुस्तके, ग्रंथ, इतर कागदोपत्री पुरावे आणि तोंडी पुरावे न्यायालयात दाखल आहेत. १ नोव्हेंबर १८५८ नंतर ब्रिटीश सरकारने काढलेल्या अनेक आदेशांमध्ये, पत्र व्यवहारांमध्ये आणि अधिकृत अहवालांमध्ये मशिदीचा उल्लेख जन्म स्थान मशीद असाच झाला आहे. पी. कार्नेगी जे अयोध्या आणि फैझाबादचे कमिशनर होते त्यांनी अयोध्या हिंदूंना मक्कासारखी आहे असे मत त्यांच्या लिखाणात नोंदवले आहे. रामाच्या जन्मस्थानावर मशीद उभारली होती, त्यासाठी मोठा संघर्ष झाला होता असे म्हटले. ते पुढे नोंद करतात की जोपर्यंत ब्रिटिशांनी रेलिंग घालून भाग पाडले नाहीत तोपर्यंत हिंदू आणि मुस्लीम मशीद मंदिरात पूजा करत असत. १८७७ च्या राजपत्रातही ह्याची पुनरावृत्ती लिहिली गेली आहे. १८८९ च्या ए.एस.आय. चा अहवाल नोंद करतो की –

रामाचं जुनं मंदिर अतिशय सुंदर असणार कारण त्यातील बरेचसे खांब मशिदीसाठी वापरले गेले आहेत. मंदिराच्या जागीच मशीद बांधली गेल्याचे म्हणणे बळकट करतो.

१८८९ ए.एस.आय. चा अहवाल

१९२१ चे बाराबंकी राजपत्र, पूर्वीचे मंदिर, त्यावर मशीद, हिंदूंसाठी हे स्थळ पवित्र असल्याचे आणि त्यामुळे आता संघर्षजन्य असल्याचे नमूद करतो.

३०.११.१८५८ मध्ये मुस्लिमांनी केलेल्या तक्रार अर्जावरून हे सिद्ध होते की मशिदीच्या आतमध्ये हिंदूंनी एक चबुतरा बांधला आहे, तेथे होम आणि पूजा चालू आहे तसेच पूर्ण मशीदीवर ‘राम राम’ असे लिहिले आहे. चबुतरा हटविण्यासाठी हा अर्ज आहे. असाच माशिदिताला चबुतरा काढून टाकावा यासाठीचा अर्ज मोहम्मद असघर ह्यांनी १२.२.१८६१ रोजी केला आहे. इतरही अनेक तक्रारींवरून हे सिद्ध होतं की सदर जागेवर हिंदू निरंतर आणि अखंड पूजा करत असत. त्यानंतर महंत रघुवर दास ह्यांनी मशीद परिसरातील चबुतऱ्यावर मंदिर बांधायची परवानगी कमिशनरकडे मागितलेली दिसते. १८६६ साली परिसरात मूर्ती ठेवल्याची मुसलमानांची तक्रार आहे. पुढे डेप्युटी कमिशनरांनी १८७७ साली खेम दास महंत ह्यांना जन्मस्थान दर्शनासाठी स्वतंत्र रस्ता मिळण्यासाठी उत्तरेकडील भिंतीचे दरवाजे उघडण्याचा आदेश केल्याचे दिसते. त्यावर सईद महम्मद असघर ह्यांनी अपील केल्याचे दिसते. सदर अपिलात परिसरात एक छोटा ‘चुल्हा’ असल्याचे नमूद आहे. १९३४ साली झालेल्या हिंदू मुस्लीम दंग्यांमध्ये मशिदीचे नुकसान झालेले दिसते.

अयोध्येतील ७ जागांचे भाविक दर्शन घेताना मी कायम पाहत आलो आहे. त्या तसेच रामजन्मभूमी ह्या जागांचे स्थान दुसरीकडे बदलू शकत नाही.

महंत परमहंस रामचंद्रदास

इतर अनेक महंत, आचार्य, प्रवासी, भाविक ह्यांच्या न्यायालयातील तोंडी साक्षी ह्या जन्मस्थानावर भाविकांच्या भेटी, दर्शन, पूजा, परिक्रमा, परिक्रमा मार्ग, परिसराची निरीक्षणे नोंदवितात आणि स्मृतीपलीकडच्या काळापासून ही जागा राम जन्मभूमी आहे, तसेच मध्य घुमटाच्या खालचे क्षेत्र तीर्थक्षेत्र आहे आणि तिथे पूजा केली जाते हे सांगतात. महंत भास्कर दास हे आपल्या साक्षीत तेथे १९४६ ते १९४९ पर्यंत म्हणजे जागा अधिग्रहित होईपर्यंतही तेथे एकही मुस्लिमाने नमाज अदा केला नाही उलट हिंदू फळे, फुले, पैसे वाहत असत असे म्हटले. अनेक साक्षीदारांनी मशिदीला जन्मस्थान म्हणत असल्याचेही न्यायालयात सांगितले. ह्याचा अर्थ १८५७ पर्यंत ब्रिटिशांनी लोखंडी जाळीची भिंत बांधून देईपर्यंत हिंदू सदर स्थानावर पूजा करत होते. त्यानंतर मात्र राम चबुतऱ्यावर जन्म भूमी म्हणून प्रतीकात्मक पूजा सुरु झाली. हिंदूंचा हा संपूर्ण संघर्ष, विरोध, चिकाटी, सातत्य आणि कृती ह्या त्यांच्या आस्थेची, श्रद्धेची आणि विश्वासाची ग्वाही देतात.

मशीद बांधण्यापूर्वी आणि नंतरही हिंदूंचा असा विश्वास आणि श्रद्धा होती की प्रभू रामाचे जन्मस्थान हे ज्यावर बाबरी मशीद उभारली आहे तेच आहे, आणि हा विश्वास आणि श्रद्धा ही लेखी आणि तोंडी पुराव्याच्या आधारे सिद्ध झाली आहे.

न्यायालयाचा निष्कर्ष

ह्या न्यायालयीन लढाईत इतरही ए. एस. आय. च्या उत्खननाच्या अहवालासारखे अत्यंत महत्त्वाचे पुरावे, दावे, प्रतिदावे आणि वाद्बिंदू आहेत. परंतु तो ह्या लेखाचा विषय नाही. वाद्बिंदूच्या ह्या निष्कर्षामुळे हिंदूंचा ‘अधिक श्रेयस्कर मालकी हक्क’ (better possessory title) सिद्ध होत आहे. हिंदूंचा पूजेसाठी आणि यात्रेसाठी हिंदूंचा सिद्ध झालेला आणि मुस्लिमांनी सिद्ध न केलेला अखंडित ताबा (unimpeded possession) हा निकालातील कलाटणी देणारा मुद्दा ठरला. त्यामुळे ६ डिसेंबर १९९२ ची घटना वगळताही न्यायालयीन लढाईद्वारे हिंदूंचा हा मालकी हक्क मान्य झाला असता, केला गेला असता.

हे सर्व विस्तृतपणे लिहिण्याचा उद्देश म्हणजे निकालामध्ये मान्य केलेल्या पुराव्यांचे महत्त्व लक्षात यावे आणि त्यानिमित्ताने इतिहासातून कोणकोणते धडे घ्यायचे हेसुद्धा लक्षात यावे हा होता. हिंदू ही जीवनपद्धती असे आत्तापर्यंत न्यायमूर्तींसह अनेक जणांनी म्हटले आहे. ह्या लेखाच्या सुरुवातीसच न्यायमूर्ती बी. के मुखर्जी हे धर्म अनेक खाण्यापिण्याच्या आणि पेहेरावासहित अनेक बाबी नोंदवत असतो असं म्हणतात हे लिहिलंय. भारतीय समाजाचा सांस्कृतिक पट हा अनेक प्रथा, परंपरा, दंतकथा, आरत्या, पुराणे, श्लोक, गीते, पोथ्या, धर्मग्रंथ, भाषा, तसेच गायन, नृत्य, चित्र, शिल्प, लोककला आदि कला, प्रथा परंपरा, उत्सव, सण-समारंभ ह्यांनी विणलेला आहे. इतकेच नाही तर रोजच्या जगण्यातील अनेक प्रथा, विधी ह्यामध्येही त्याचे धागे सापडतात. हजारो वर्षे जाऊनही त्यातल्या बदलत्या रुपात का असेना त्यातलं तत्त्व अजून मूळ धरून आहे. त्यातल्या बदलांची संगती वेळ आली तर लावता येते. आणि त्याचा ‘मूळ’ शोधण्यासाठी परस्परसंबंध जोडता येतो.

जागेच्या मालकी हक्कासाठी त्यांचा हा उपयोग ह्या निकालामध्ये झाला मात्र भविष्यात कितीतरी गोष्टींसाठी त्याचा उपयोग करून घेता येऊ शकतो. आस्था, विश्वास आणि श्रद्धा ह्या अंध नाहीत तर त्यांना ठोस असा प्राचीन आधार आहे, तो बुद्धीस अनुभवजन्य आहे. हा आधार राम जन्म भूमी निकालामध्ये तर्क आणि बुद्धीने ग्राह्य धरला गेला, सिद्ध झाला हे ह्या निकालाचं उदाहरण (precedent)! ही सर्वांनीच लक्षात ठेवण्यासारखी आणि ह्यापुढे वापरता येण्यासारखी गोष्ट.

हा निकाल ह्या सर्व प्रथा, परंपरांचं पालन, धार्मिक ग्रंथांचं, प्रवास वर्णनांचं जतन, पोथ्या पुराणांचं पठण, सण समारंभ, उत्सवांचं साजरीकरण, कर्मकांडे आणि त्यांची उपयोगिता, अखंडित तीर्थयात्रा, वहिवाट (unimpeded use) अशा अनेक गोष्टींचं महत्त्व लक्षात आणून देतो.

माणसाच्या आयुष्याचं ध्येय हे ‘अंतिम सत्य’ जाणून घेण्याचं असतं. ते जाणून घेण्याचा जो मार्ग प्रभू रामचंद्रांच्या श्रद्धेतून जातो. तीच श्रद्धा ‘किती सत्य’ हे जाणून घेण्याचा मार्ग ह्या निकालाने उदाहरण (precedent) म्हणून घालून दिला आहे.

विभावरी बिडवे
९८२२६७१११०

रामजन्मभूमी याचिकेत श्री रामलल्ला विराजमान ही देवता प्रत्यक्ष पक्षकार आहे. ह्या वादात प्रभू रामचंद्र हे कायदेशीर व्यक्ती मानून त्यांच्या निकट मित्र म्हणजे नेक्स्ट फ्रेंडकरवी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिकेची सुनावणी घेतली आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हाती येत आहे. बरोबरच राम जन्म भूमी हीसुद्धा २ नंबरची वादी आहे.

कायदेशीर व्यक्ती (legal entity) म्हणजे नैसर्गिक व्यक्तीहून वेगळी, कृत्रिमरीत्या निर्माण केलेली व्यक्ती. सर्वसाधारण संकल्पनेत आपण जिवंत माणसाला व्यक्ती म्हणतो. मात्र वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या देशांत प्रत्येक जिवंत मानवास व्यक्तीचा असा दर्जा नव्हता. रोमन कायद्यानुसार गुलाम हा माणूस नव्हता. त्याला कुटुंब असण्याचा अधिकार नव्हता. त्याला प्राण्याप्रमाणे वागणूक मिळत असे. गुलामगिरी नष्ट झाल्यानंतर त्याला माणसाचा दर्जा मिळाला. अमेरिकेत आफ्रिकन अमेरिकन्सना अनेक कायदेशीर हक्क नव्हते त्यांनाही गुलाम समजले जायचे. स्त्रियांना आपल्या मानवीय हक्कांसाठी लढा द्यावा लागला आहे.

समाज प्रगत होत गेल्यानंतर गरजांनुसार माणसांच्या मोठ्या समूहांच्या सहकार्यातून अनेक संस्था, प्राधिकरणे, नोंदणीकृत श्रमिक संघ, कंपन्या, धर्मादाय, निगम, मंडळे ह्यांचा उगम आणि विकास होत गेला. समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्या कार्यरत राहिल्या. ‘माणसांचा समूह’ असा त्यांच्याबरोबर व्यवहार करण्याखेरीज कायद्याने त्याचं स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं गेलं. सालमंड ह्या प्रख्यात कायदेतज्ञाच्या म्हणण्यानुसार ‘व्यक्ती म्हणजे कोणतीही अशी हस्ती जिला हक्क आणि कर्तव्ये लागू होतात.’ वर उल्लेखलेल्या अशा संस्थांकडून कर्तव्यांची अपेक्षा केली गेली बरोबरच त्यांना हक्क देण्याची गरज निर्माण झाली. स्वतंत्र व्यक्ती म्हणून अशा संस्था स्वतःची मालमत्ता बाळगू शकतात, हस्तांतर करू शकतात, विनियोग करू शकतात. ह्या संस्था स्वतःच्या नावाने करारनामे करू शकतात, दावे, प्रतिदावे, फिर्यादी करू शकतात तसेच त्यांच्यावरही फिर्याद केली जाऊ शकते. अर्थातच सह्या किंवा इतर औपाचारिकतेसाठी त्यांचे प्रतिनिधित्व करणारी नैसर्गिक माणसे असतात.

व्यवस्थापकाची नेमणूक केली जाते. परंतु अशा कृत्रिम व्यक्तीचे अस्तित्व कायद्याने मान्य केले आहे किंबहुना ती कायद्याचीच निर्मिती आहे. कित्येक दाव्यांमध्ये किंवा करारनाम्यांमध्ये आपण बघतो की त्यावर क्ष प्रा. लि. असे प्रत्यक्ष नाव आहे आणि केवळ व्यवस्थापक म्हणून संचालक ह्या नात्याने एखाद्या व्यक्तीने त्यावर सही केली आहे. असा करारनामा हा आपण त्या संचालकाशी करत नाही कारण संचालक बदलत राहतात. मात्र पूर्ण संचालक मंडळ बदललं तरी कंपनी तीच राहते जिच्याबरोबर आपण करार केलेला असतो. गुंतागुंतीच्या समाजात अशा कृत्रिम व्यक्ती ही एक अपरिहार्य बाब आहे हे आत्तापर्यंत आपण मान्य केलं आहे.

कृत्रिम व्यक्तीची संकल्पना ब्रिटीश येण्याअगोदर आपल्याकडे नसल्याने आपण हिंदू मूर्तींना मनुष्यत्वाचे अधिकार देऊन टकले. मूर्तीच्या वतीने जे व्यवस्थापक असायचे जे मालमत्ता घेणे, विकणे करू शकायचे त्यांना दक्षिणेत धर्मकर्ता तर उत्तरेत शेबैत म्हणायचे. दगडी मूर्ती असल्यामुळे हजारो वर्षे मूर्ती टिकून राहायच्या. विसर्जन करावे लागल्यास, मूर्ती भंग झाल्यास किंवा मूर्ती बदलायची गरज भासल्यास ते शक्य होते कारण त्यावरील विश्वास, श्रद्धा ही कायम असायची आणि मूर्ती चल असायच्या. त्यामुळे निरंतर मालकी हक्क चालू राहायचा. ब्रिटिशांनंतर विश्वस्त व्यवस्था निर्माण करून त्याद्वारे कारभार बघण्याची पद्धत पाडली तरी ती अनिवार्य नाही. आणि धर्मातील परंपरा, रूढी म्हणून मूर्ती कायदेशीर व्यक्ती म्हणून मालमत्ता धारण करत राहिल्या. त्यांना तशी मान्यता दिली. प्रत्यक्ष मूर्तीचे अस्तित्वात असणेही गरजेचे नाही कारण देव म्हणजे प्रत्यक्ष मूर्ती नव्हे तर ‘चल’ असणारा विश्वास. केदारनाथच्या मंदिरातही मूर्ती नाही. तेथे एका दगडाच्या सुळक्याची पूजा करतात. गयेच्या विष्णुपाद मंदिराचे अजून एक उदाहरण. श्रीराम चरण व सीता कि ररसोई यासारख्या चिन्हान्द्वारे श्रीराम देवतेची पूजा केली जाते.
योगेन्द्रनाथ नास्कर वि, कमिशन ऑफ इनकम टॅक्स, कलकत्ता, १९६९ (1) एस.सी. सी. ५५५ ह्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने हिंदू मूर्ती ही मालमत्ता धारण करण्यास आणि तिच्यावर जी व्यक्ती तिच्या मालमत्तेची व्यवस्था बघत आहे अशा व्यवस्थापकाद्वारे कर लागू करण्यास योग्य कायदेशीर व्यक्ती आहे असा निर्वाळा दिला. ही मूर्ती म्हणजे एखादे बालक (मायनर)असते आणि त्याच्या मालमत्तेचे रक्षण आणि खर्च एखाद्या पालकाप्रमाणे घेणे हे त्या व्यवस्थापकाचे कर्तव्य असते असे म्हटले. ह्या याचिकेत एका इंग्रजी केसमधल्या चर्चसंदर्भात दिलेल्या निकालाचा दाखला नमूद केला गेला ज्यामध्ये चर्च हे अज्ञान बालकाप्रमाणे आहे आणि त्याचा व्यवस्थापक हा त्याचा पालक आहे’ असे म्हटले गेले.

पुढे राम जानकीजी डाइटीज व इतर वि. स्टेट ऑफ बिहार व इतर, १९९९ (५) एस. सी. सी. 50 ह्या याचिकेत आपल्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की हिंदू धर्माप्रमाणे धार्मिक प्रतिमा ह्या दोन प्रकारे मानल्या जातात. एक स्वयंभू म्हणजे स्वतःहून प्रकट होणारी आणि दुसरी म्हणजे जिची प्रतिष्ठापना केली जाते. ईश्वर हा निराकार असतो मात्र अशा सर्वशक्तिमान रूपाचे माणसाच्या तर्कशक्तीने, श्रद्धेने मूर्तीमध्ये प्रकटीकरण होते. प्राण प्रतिष्ठा करून तो अनादी परमात्मा मूर्तीमध्ये साकार होतो. अशा मूर्तीला वाहिलेली संपत्ती ही तात्त्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या प्रथम त्या मूर्तीची होते आणि अशी मूर्ती ही एखादी नैसर्गिक व्यक्ती म्हणजे पुजाऱ्याशी/व्यवस्थापकाशी जोडली जाते जो तिचा विश्वस्त असतो, तिच्या संपत्तीचा रक्षणकर्ता असतो. म्हणजेच मूर्तीला स्वतंत्र व्यक्तीचा दर्जा ही गरज आहे हे ह्या निकालाद्वारे ठळकपणे अधोरेखित झाले.

अशा प्रकारे नैसर्गिक व्यक्तीखेरीज इतर अजीवीत व्यक्तींना स्वतंत्र मानवीय दर्जा हा आपल्या न्यायालयांनी खूप पूर्वीपासून मानला आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रभांडक कमिटी, अमृतसर वि. श्री. सोम नाथ दास आणि इतर ए. आय. आर. २००० एससी १४२१ ह्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अशा कृत्रिम व्यक्तींची वर्गवारी केली आहे.

  • प्रथम वर्गात लोकांच्या समूहाने केलेली महामंडळे आणि ज्या लोकांनी ती बनवली आहेत ते तिचे सदस्य.
  • दुसऱ्या वर्गात लोकांचा समूह नाही तर एखादी संस्था जसे की चर्च, हॉस्पिटल, विद्यापीठ, ग्रंथालय.
  • तिसरा म्हणजे अशी कायदेशीर व्यक्ती जिला एखादी देणगी किंवा राशी अर्पण झाली आहे, दान मिळाली आहे.

अशा प्रकारच्या सर्व अजीवीत हस्तींना स्वतंत्र व्यक्ती म्हणून दर्जा दिला जातो.

ह्या सर्व उहापोहानंतर अगदी स्वाभाविकरीत्या लक्षात येऊ शकते की प्रभू रामचंद्रांना असा दर्जा देण्याची काय कारणे असू शकतात. तसेच त्याचे काय परिणाम होऊ शकतात. प्रभूस अनेक कायदेशीर हक्क प्राप्त होतात. स्वतःच्या वतीने कायदेशीर कार्यवाही करू शकतात. देवकी नंदन अगरवाल ह्यांनी निकट मित्र किंवा रामसखा म्हणून दावा दाखल केला आणि अलाहबाद उच्च न्यायालयाने तो मान्यही केला. कायद्याच्या दृष्टीने तो बालक असतो आणि कायद्यानुसार त्याला समय सीमेच्या मर्यादा लागू नसतात.

– विभावरी बिडवे

 

सीतास्वरुपा – मन राम तन राम

सामना ऑनलाईन

>> वृषाली साठे

सीतामाई अशोक वाटिकेत गेल्यानंतर त्यांना रावणाच्या मायावी शक्तीचा अनुभव येतो. रावणाने छळ केलेल्या अनेक स्त्रिया-बालकांची पीडा त्यांना समजते. त्यांच्या मनचक्षुसमोर न पटणारी दृश्ये दिसतात.  कारण रावण त्यांच्या बुद्धीचा ताबा घेऊ पाहत असतो. पण जर मनामध्ये राम आणि तनामध्ये रामनाम असेल तर अशा सीतामाईच्या मन-बुद्धीला कोण हरवू शकेल?

सीतामाई अशोकवनात येऊन अशोकाच्या झाडाला टेकून बसल्या. त्यांनी दोन घोट पाणी प्यायले. आता सरळ ध्यानात जाऊन स्वतच्या विचारांवर ताबा मिळवायचा ठरवले. सीतामाई ध्यानाला बसल्या. पण त्यांचे डोके प्रचंड दुखू लागले. मन संभ्रमित झाले. त्या जागरुक अवस्थेत राहू शकत नव्हत्या. ध्यान नीट का लागत नाही, सीतामाईला कळेनासे झाले. त्यांचे मन एवढे विचलित का झाले? का त्यांच्या विचारात स्पष्टता नाही?

यावेळेस मला श्रीरामांशी संपर्क साधणे अत्यंत आवश्यक आहे असे त्यांना वाटले. ‘श्रीराम श्रीराम!’ त्यांनी जप सुरू केला. यापूर्वी त्यांनी असा जप केला असता, त्यांचा श्रीरामांबरोबर संपर्क स्थापन होऊन त्यांना सूचना मिळत असे. मात्र या वेळेस मात्र त्यांना काही सूचना मिळाली नाही.

एक क्षण त्यांच्या मनात वाईट विचारदेखील आला की श्रीरामांचे काही बरेवाईट तर झाले नसेल ना. पण दुसऱ्याच क्षणी मृत्यू आम्हा दोघांना वेगळे करू शकत नाही हा विचार आला. असे कित्येक तास जातात. पण सीतामाईचा श्रीरामांशी संपर्क होत नाही. त्यांना त्यांच्या भ्रमित मानसिक अवस्थेबद्दल आश्चर्य वाटतं. मग त्यांना आठवलं की, त्या दोन घोट पाणी प्यायल्या होत्या आणि त्यानंतरच त्यांची अशी अवस्था झाली. त्या पाण्यातून रावणाने मायावी शक्तीचा नक्कीच प्रयोग केला आहे. त्या सतर्क होऊन विचार करतात. रावण केवळ अन्न आणि पाण्यातूनच त्यांना मायावी शक्तीने त्रास देऊ शकतो आणि म्हणूनच जोपर्यंत लंकेत आहोत तोपर्यंत अन्न-पाण्याचा त्याग करायला हवा. पण प्यायलेल्या पाण्याचा प्रभाव कमी होत नव्हता.

सोमा ही गोष्ट सांगताना सीतामाई चांगले उद्दिष्ट घेऊन  लंकेत आल्या होत्या हे सांगते. त्यांना रावणाच्या मनातून राग, घृणा, मत्सर, काम हे काढून त्याच्या मनात दडलेल्या प्रेमाला बाहेर काढायचे होते. पण सीतामाईंना याची कल्पना नव्हती की रावण मायावी शक्तीचा दुरुपयोग करून त्यांची बुद्धी नियंत्रण करण्याचा प्रयत्न करू शकतो. रावण तर खूप खुश होता. त्याला सीतामाईंकडे असलेल्या आध्यात्मिक शक्तींची कल्पना होती. अशा स्त्री ला जर तो विचलित करू शकतो, तर तो त्याचा खूप मोठा विजय होता. आता ही लढाई  रणांगणावर न होता दोन मनबुद्धिंमध्ये चालू झाली होती आणि या मानसिक युद्धात पहिलं आक्रमण रावणाने केलं होतं.

सीतामाईंना हळूहळू अंधाराकडे जात होत्या. काही वेळानंतर त्यांना जमीन दिसली. पण त्यावर जिवंतपणाची एकही खूण नव्हती. जळलेली झाडं, रखरखीत नद्या  होत्या. लाव्हारस ओकणारे पर्वत होते. त्यांचा लाल प्रकाश सर्वत्र पसरला होता. त्यांना तिथून बाहेर पडायचा मार्ग दिसत नव्हता. शेवटी सीतामाई रागाने म्हणाल्या, ही कोणती मृत जागा आहे. तेवढय़ात त्यांना पायाखाली काहीतरी जाणवलं. खाली त्यांना खूप प्रेतं पडलेली दिसली. तेही हात, पाय कापलेल्या विचित्र अवस्थेत होती. ती विद्रूप स्थिती बघून सीतामाई थोडय़ा मागे सरकल्या. ती प्रेतं मदताची याचना करू लागली. सीतामाई विचारलं, ही तुमची अवस्था अशीकशी झाली? ती प्रेतं उठून उभी राहिली. तेव्हा सीतामाईला दिसतं की ती सर्व स्त्रियांची प्रेतं आहेत. त्यांच्यावर खूपच अत्याचार झाले आहेत. त्यांच्या शरीराची अवस्था खूपच वाईट आहे आणि ही अवस्था  रावणाने केली आहे. ती सर्व प्रेतं सीतामाईला आम्हाला मदत करा, असं सांगू लागली.

सीतामाई प्रत्येक प्रेताजवळ जाऊन त्यांच्या चेहऱयावरून हात फिरवून त्यांना शांती प्रदान करत म्हणाली, हे मुलींनो मला तुमचं दुःख घेऊ द्या. नंतर अतिशय रागाने सीतामाई रावणाला उद्देशून म्हणाल्या, हे रावणा, हे तू काय करून ठेवलं आहेस. जो पुरुष स्त्राrला वाईट वागवेल त्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतील. सीतामाईच्या शापाने रावण  तिथे प्रगट झाला आणि जोराजोरात हसत म्हणाला या स्त्रियांना माझ्या आनंदासाठीच मी निर्माण केलं होतं. तितक्यात सर्व दृश्य हवेत विरून गेलं. रावणही गायब झाला. त्याच्या हसण्याचा गडगडाट हळूहळू कमी होत गेला. सीतामाईला कळेना की हे सत्य आहे की आभास! रावणाने मायावी शक्तीने केलेला हा पहिला प्रहार होता.

नंतर सीतामाईंना एक सुंदर जंगल दिसतं. जंगलात त्यांना एका सुंदर झऱयापाशी श्रीराम दिसतात. त्यांना खूप आनंद होतो. त्या धावत श्रीरामा जवळ जातात आणि पाहतात की एक सुंदर स्त्राr श्रीरामांजवळ पहुडली आहे. श्रीराम तिच्या बटांशी खेळत तिला सांगत आहेत की, सीतेचा मृत्यू झाला आहे. आता तूच अयोध्येची महाराणी होणार!  सीतामाईला हृदयात भयंकर वेदनेची कळ जाणवते. ते दृश्य नाहीसं होतं. सीतामाईंना पुढच्या दृश्यात अयोध्येचा राजमहाल दिसतो. श्रीराम सिंहासनावर बसले आहेत आणि तीच सुंदर स्त्राr त्यांच्या शेजारी बसली आहे. सीतामाई रडत सांगते, श्रीरामा मी जिवंत आहे. पण त्यांचा आवाज रामापर्यंत पोहोचत नाही. सीतामाई रडत गुढघ्यावर बसतात. त्यावेळी त्यांना रामाच्या जागी रावण दिसायला लागतो आणि तो पुन्हा जोराजोरात हसायला लागतो. ते हसणे ऐकून सीतामाई स्वतच्या कानावर हात ठेवतात आणि तोंड फिरवतात. बघावं तिथे त्यांना रावण एका सुंदर स्त्राrबरोबर दिसतो. तो त्या सुंदर स्त्राrला त्रास द्यायला सुरुवात करतो. ती स्त्राr रावणापासून स्वतला सोडवायचा प्रयत्न करते. पण रावण त्या स्त्राrचा खूप छळ करतो. सीतामाईंना ते दृश्य बघवत नाही. त्या या स्त्रियांचं दुःख स्वत अनुभवत असतात. ते दृश्य नाहीसं होतं. सीतामाईंना पुन्हा अंधाराचा विळखा पडतो. पण आता सीतामाई सतर्क असतात. कारण हा सर्व रावणाच्या मायावी शक्तीचा खेळ असतो. त्या अंधारातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येक वेळी एक काचेची भिंत समोर उभी राहते. त्या काचेवर रावणाचा विकट हास्य करणारा चेहरा असतो. सीतामाई धावून धावून दमतात आणि खाली जमिनीवर बसतात. त्यांना वाटतं की, त्या वसुंधरा मातेच्या जवळ आहेत. पण त्यांना माती हातात घेताच ती मृत माती जाणवते. त्या हताश होतात. तेही दृश्य बदलते. त्यांना  आता श्रीराम अयोध्यामध्ये राजसिंहासनावर बसलेले दिसतात. त्यांच्या शेजारी दोन लहान बाळे असतात. सीतामाईंना आतून वाटतं की, ही दोन लहान बाळे त्यांची आणि श्रीरामांची आहेत. वात्सल्यभावनेने त्या बाळांना घ्यायला पुढे सरकतात. तितक्यात राम उठतात. तलवारीने दोन्ही बाळांची डोकी उडवतात. सीतामाई भयचकीत होतात.  पण  त्यांना हे भ्रमलोक असल्याचं कळून चुकतं. तेव्हा रामाच्या जागी त्यांना रावण दिसू लागतो. रावण सीतामाईकडे बघून विकट हसतो. सीतामाईची अवस्था बघून त्याला आनंद होतो.

पुन्हा दृश्य बदलतं. सीतामाईंसमोर अनेक लहान बालके मरून पडलेली दिसतात. त्यांच्या आया दुःखाने वेडय़ा झालेल्या असतात. मुलांची ही अवस्था बघून सीतामाई म्हणतात, कोण आहे हा रावण. ज्याला लहान मुलांचीदेखील दया येत नाही. तेव्हा त्यांना त्यांचा आंतरिक आवाज सांगतो की तोच रावण आहे, ज्याने पोटचा मुलगा प्रल्हादला अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला होता. भ्रम का होईना, अशी दृश्य निर्माण करणारा रावण किती घाणेरडे विकृत विचारांचा आहे हे त्यांना कळतं. उद्या हे विकृत विचार तो कृतीतही आणू शकतो. आपल्याला त्याचा नाश करायलाच हवा. रावण मायावी शक्तीच्या साहाय्याने कोणाच्याही बुद्धीचा ताबा घेऊन असे विकृत विचार पेरू शकतो. ज्यामुळे पूर्ण मानव जातीचा विनाश होऊ शकतो.

भले ती रावणाने तयार केलेली मायावी दृश्ये होती, पण सीतामाईंनी पीडितांच्या वेदना अनुभवल्या. त्यांना वाटले की या जन्मासाठी मी खूप सहन केलं. आता माझी शक्ती संपली आहे. आता मी शून्यात विलीन होते. या विचाराने त्या शरीर त्याग करण्यास तयार होतात. तेव्हा त्यांना श्रीरामांचा मधुर आवाज ऐकू येतो, सीता अशी कुठलीही शक्ती या जगात नाही, जी तूला हरवू शकेल. रावणाचे असे विकृत विचार तूच थांबवू शकतेस. ती शक्ती केवळ तुझ्यात आहे. हे तुझेच अद्वितीय प्रेम आहे ज्यामुळे हे विश्व टिकून आहे. मी पण तुझ्याच प्रेमामुळेच आहे. श्रीरामांच्या आवाजासोबत सीतामाईंना प्रत्यक्ष श्रीराम दिसायला लागतात. त्यांच्या डोळ्यात बघताना त्या सर्व वेदना विसरून जातात. त्यांच्या संपूर्ण देहात, मनात, बुद्धीत केवळ रामनाम भरून जातं.

vrishali.sathe@gmail.com

 

।। सीतास्वरुपा ।।- सीता शक्ती श्रीरामाची

सामना ऑनलाईन

>> वृषाली साठे

सीतामाईंच्या वनवासातील आयुष्यातील हा पट. या काळातही त्या तितक्याच विचारपूर्वक निर्णय घेत परिस्थिती हाताळत. सीतामाई श्रीरामाच्या शक्ती आहेत हे कायम सिद्ध झाले आहे. मागच्या भागात आपण शूर्पणखा ही मायावी रूप धारण करून आश्रमातील योगींना भुलवत होती ते पाहिलं. आता पुढे…

सीतामाई स्वयंपाक करत होत्या. त्यांना एक तीव्र सुगंध आला. त्यांनी पाहिलं की, एक सुंदर स्त्राr हातात एक भांडं घेऊन आश्रमात आली आहे. श्रीराम आणि लक्ष्मणजी तिच्याशी बोलत आहेत व तिने आणलेलं भांडं लक्ष्मण यांनी हातात घेतलं आहे. सीतामाई त्वरित बाहेर येतात आणि ते भांडं लक्ष्मण यांच्याकडून घेतात. सीतामाईंना बघताच ती सुंदर स्त्राr वैतागून श्रीरामाकडे बघत म्हणते, “मला माहीत नव्हतं की, तुमची दासी तुमच्याबरोबर राहते.’’ श्रीराम तिला सीतामाई पत्नी असल्याचे सांगतात.

शिवाय हेही सांगतात की, “माझ्या पत्नीची हरकत नसेल तर तुम्ही आमच्याबरोबर जेवायला बसा.’’ सीतामाईचे संस्कारच होते की, त्या कधीही अतिथीला खाल्ल्याशिवाय पाठवत नसत. सीतामाई आश्रमाच्या मागच्या बाजूला काळोख्या जागी जातात. त्या स्त्राrने आणलेलं अन्न तिथे टाकून भांडं स्वच्छ धुऊन त्यात स्वत शिजवलेलं अन्न भरतात  आणि मग त्या तिघांना जेवायला वाढतात. जेवून झाल्यावर श्रीरामजी आणि लक्ष्मणजीमध्ये काहीच फरक पडला नसल्याचं पाहून ती स्त्राr सीतामाईला ओरडून बोलली, “मी आणलेलं अन्न तू का वाढलं नाहीस?’’ सीतामाई म्हणतात की, “मी तुला ओळखलं आहे. तू आमच्यावर तुझी मायावी शक्ती वापरू शकत नाही.’’ हे ऐकताच ती स्त्राr मूळ रूपात येते. ती रावणाची बहीण शूर्पणखा असते. ती सीतामाईच्या अंगावर धावून जाते.  श्रीरामजी काही करणार इतक्यात लक्ष्मणजी शूर्पणखेच्या दिशेने चाकू फेकतात. त्याने तिचं नाक कापल जातं. ती रागावून निघून जाते. जाताना लक्ष्मणाला म्हणते, “याची फळं तुला भोगावीच लागतील. तुला खूप यातनादायी मृत्यू येईल.’’ सीतामाईंना खूप वाईट वाटतं. कारण त्यांना माहीत असतं की कर्माचं फळ मिळतंच आणि लक्ष्मणाने हे कर्म केवळ आपल्या सुरक्षिततेसाठी केलं होतं. मग या कर्माचं फळ एकटय़ा लक्ष्मणाने का भोगावं?

सीतामाई श्रीरामजी आणि लक्ष्मणाला म्हणतात की, “रावणाच्या बहिणीची झालेली अशी दुर्दशा रावण सहन करणार नाही. तो आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो. आपल्याला अजून सतर्क राहायला हवं.’’ दुसऱया दिवशी सीतामाईंना दिसलं की त्यांनी फेकून दिलेलं अन्न खाऊन तीन पक्षी मरून पडलेले आहेत. श्रीरामजी सीतामाईंना समजावतात की, आपण धैर्याने घ्यायला हवं. पुढे रावणाशी होणाऱया युद्धात किती जीव जाणार आहेत याची कल्पना न केलेली बरी.

लक्ष्मणजी आवेशाने म्हणतात की, “आपण रावणावर हल्ला करू.’’ श्रीरामजी त्याला सांगतात की, “काही ठोस कारण असल्याशिवाय आपण त्याच्याशी युद्ध करू शकत नाही.’’ लक्ष्मणजी म्हणतात की, “रावणाच्या बहिणीने आपल्याला विष देऊन मारायचा प्रयत्न केला हे कारण आहेच की.’’

श्रीरामजी म्हणतात की, “यात रावणाचा प्रत्यक्ष हात होता हे आपण सिद्ध करू शकत नाही. शिवाय रावण महादेवाचा भक्त आहे हे आपण विसरता कामा नये. सध्या तरी आपण शांत राहून पुढे काय होते त्याची वाट बघू या.’’

सीतामाई म्हणतात की, “मी रावणाला एकदा पाहिलं होतं. तेव्हा त्याला बाबांकडे असलेलं महादेवाचं धनुष्य हवं होतं. बाबांनी त्याला नकार दिला. तेव्हा तो बऱयाच धमक्या देऊन गेला होता, पण त्या वेळेस बाबांनी मला त्यांच्या शेजारी  बसवलं होतं. का ते माहीत नाही.’’ श्रीरामजी म्हणाले, “सीते, तू जनकबाबांची शक्ती होतीस. तसंच तू माझीदेखील शक्ती आहेस (रामरक्षा या स्तोत्रातदेखील सीता शक्तीही सीतामाई असल्याचं बुधकौशिक ऋषी सांगतात).

त्या वेळचा रावण आणि आताचा रावण यात खूप फरक आहे. जपतपाने आणि तपश्चर्येने त्याला खूप वरदान मिळाली आहेत, पण त्याचा तो दुरुपयोग करतो आहे. शिवाय आता त्याच्याकडे बऱयाच मायावी शक्ती आहेत. जगातील सगळ्या वाईट शक्तींना त्याने एकत्र केलं आहे. त्याच्याशी केलेलं युद्ध हे केवळ एका व्यक्तीशी नसून सर्व वाईट शक्तींशी असेल.’’ सीतामाई एकदम गप्प होतात. त्यांच्या डोळ्यांसमोर अचानक एक दृश्य दिसू लागतं. त्या दृश्यात नारायण होते आणि त्या स्वत नारायणी होत्या. त्यांचा एक भक्त त्यांच्यापासून दूर दूर एका शून्य विवरात जात आहे आणि त्या त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. श्रीरामजी यांनाही हेच दृश्य दिसतं, पण दोघंही काहीच बोलत नाहीत. सीतामाईंना निसर्गातला फरक जाणवत असतो. वेळी-अवेळी पाऊस येणं, नेहमीच्या लयीत वारा न वाहणं, पशुपक्ष्यांच्या वागण्यातला बदल आणि नद्यांची बदलणारी गती… वातावरण गंभीर जाणवत होतं. संकटाची  चाहूल सीतामाईंना लागली होती. त्या पुत्री गोदावरीला भेटायला गेल्या. गोदावरी म्हणाली, “माते, आता ती वेळ आली आहे. रावणाचा सामना करावाच लागेल आणि हा सामना तुम्हाला एकटीला करावा लागेल. कारण तुम्हीच रावणाच्या हृदयात जाऊन त्याच्या मनात अद्वितीय प्रेम जागवू शकता. सध्या त्याच्या मनात फक्त घृणा आहे. पण हे सगळं तुमच्या सहमतीशिवाय होऊ शकत नाही.’’ सीतामाई तिला सहमती देत म्हणतात, “मी रावणाचा सामना करेन आणि माझ्या आध्यात्मिक साधनांचा उपयोग करून त्याला समजावेन.’’ गोदावरी म्हणते, “माते, तुम्हाला असूर साम्राज्यात एकटीने जाऊन हे कार्य करायचं आहे. त्यासाठी सर्व आध्यात्मिक शक्तींचा वापर करावा लागेल. मगच या वसुंधरेचं दुःख दूर होईल. या दरम्यान श्रीरामांचा वियोग सहन करावा लागेल. यासाठी तुमची सहमती आवश्यक आहे. कारण तुमच्या सहमतीशिवाय पुढचा घटनाक्रम घडणं शक्यच नाही.’’

सीतामाई जड अंतकरणाने सहमती देते. श्रीरामजी सीतामाईंना शोधत येतात. सीतामाईंच्या डोळ्यांतलं पाणी बघून विचारतात, “सीते, तू अशी विचलित का झाली आहेस?’’ तेव्हा सीतामाई म्हणतात, “स्वामी जर कधी मी तुमच्याबरोबर नसल्याचा प्रसंग ओढवला तर त्या विचाराने अजिबात घाबरू नका. मी माझी सुरक्षा नक्कीच करू शकते.’’

श्रीरामजी म्हणतात, “सीते, मला माहीत आहे की, तुझ्यात आध्यात्मिक शक्ती खूप आहे आणि त्यायोगे तू तुझं रक्षण करू शकतेस, पण मी पण शपथ घेतो की, तू पृथ्वीवर कुठेही असलीस तरी मी तुला हुडकून काढीन. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे.’’ सीतामाई म्हणतात, “स्वामी तुम्ही आणि मी वेगळे नाहीच आहोत. जेव्हा मी तुमच्या डोळ्यांत बघते तेव्हा मी दुःखमुक्त होते आणि मला शांती मिळते. खऱया अर्थाने मी मला गवसते.’’

मग दोघे कुटीत परत येतात. त्या दिवसापासून सीतामाई थोडय़ा विचारमग्न राहायला लागल्या. श्रीरामजी सीतामाईंना खूश कसं करावं याचा विचारात असताना त्यांना एक सोनेरी हरीण दिसतं.

vrishali.sathe@gmail.com

 

।। सीतास्वरुपा ।।- आत्मसन्मानाचे रूपक

सामना ऑनलाईन

>> वृषाली साठे

पहलगामसारख्या दुर्घटना घडल्यानंतर आजही रावण ही वृत्ती आपल्या आजूबाजूला वास्तव्यास आहे. या वृत्तीला दूर सारायचे तर आपल्यातील राम आणि सीता दोहोंनाही कायम जागृत ठेवले पाहिजे. उद्या सीतानवमी आहे. म्हणूनच या व्यक्तिमत्त्वातील सार आपण अंगिकारले पाहिजे. सीता हे केवळ नाव वा पौराणिक व्यक्ती नव्हे तर ते आत्मसन्मानाचे, स्वाभिमानाचे आणि कणखरतेचे रूपकच आहे.

सीतामाईची कहाणी आता सोमा सांगू लागते. वनवासात असताना रामजी ज्या-ज्या प्रदेशातून गेले, तेथील राक्षसांचा त्यांनी नायनाट केला. राक्षसांमुळे कोणाचा लहान मुलगा गेला होता तर कोणाचा भाऊ, कोणाची आई, तर कोणाचे बाबा गेले होते. काहीजण तर सर्वस्व हरवून बसले होते. त्या लोकांना सीतामाईंने भावनिक आधार दिला. त्यांच्यासाठी जेवण बनवून त्यांना प्रेमाने खाऊ घालायच्या. त्यांना वनऔषधींची चांगली माहिती होती. त्या औषधांचा वापर करून त्या स्वयंपाक बनवायच्या. मानसिक सामर्थ्य देऊन त्यांनी लोकांना आनंदाने जगायला शिकवले.

आजच्या काळात एखाद्या मुलीवर बलात्कार झाला, तर पोलीस, न्यायालय तिला न्याय मिळवून देते. पण तिच्या मानसिक अवस्थेचे काय? कोणीतरी प्रेमाने जवळ घेऊन दुःख हलके करायला लागतेच ना? आज जर मानसिक उपचारांची एवढी गरज आहे, तर त्या काळात राक्षसांनी केलेला विध्वंस पाहता किती भयानक काळ असावा! जंगलातील लोकांना शेती करायला सीतामाईंने शिकवले. जर कोणाला बरे नसेल तर त्या औषध द्यायच्या. शिवाय लोकतंत्र शिकवून त्यांना आत्मनिर्भर देखील करायच्या.

प्रत्येक वेळी जंगलात त्यांना खायला काही मिळेलच असे नव्हते. मिळेल त्या अन्नात ते तिघे जेवायचे व एकमेकांची खूप काळजी घ्यायचे. चित्रकूट सोडून पंचवटीला येईपर्यंत रामजी आणि लक्ष्मणजी यांनी अनेक राक्षसांना यमसदनी पाठवले. आश्रमातले ऋषी, शिष्यगण यांनादेखील निर्भय बनवून त्यांची घडी पुन्हा बसवून दिली. मिथिलेत जनकबाबांमुळे सीतामाईंना शास्त्र चर्चामध्ये खूप रस होता. त्यामुळे रामजी व सीतामाई बरोबर ऋषींच्या शास्त्रचर्चा भरपूर रंगायच्या.

रामजी आणि लक्ष्मणजी सीतामाईची खूप काळजी घ्यायचे. त्यांनी सांगितलेले औषधोपचार करायचे. सीतामाई राजमहालात जशा आनंदात  राहायच्या त्यापेक्षा जास्त आनंदात त्या जंगलातल्या पर्णकुटीत राहायच्या. रामजी आणि सीतामाई जेव्हा पंचवटीत आले, तेव्हा तिथला निसर्ग खूप सुंदर होता. तिथे त्यांची मुलगी गोदावरी नदी होती. सीतामाई जेव्हा गोदावरीच्या तीरावर येऊन बसायच्या, तेव्हा गोदावरी त्यांचे पाय धुवायची. सुंदर फुले व वनऔषधी स्वतच्या पाण्याबरोबर वाहून आणत सीतामाईंना अर्पण करायची. पण वरून सुंदर, लोभस वाटणाऱया पंचवटीत आतून काहीतरी बिनसलेले नक्कीच होते. हे दोघांनाही जाणवले होते.

ऋषी-मुनी श्रीरामांना भेटायला येत व सांगत की राक्षसराज रावण महादेवाची भक्ती करून खूप प्रबळ झाला आहे. त्याला अनेक वर मिळाले आहेत. खूप सिद्धी, मंत्र, तंत्र, विविध अस्त्र त्याच्याकडे आहेत. त्याचा तो दुरुपयोग करतो आहे. दंडकारण्याला त्याने त्याचा प्रमुख तळ बनवले आहे. इथे त्याचे प्रमुख सेनापती राहतात. ते आम्हाला खूप त्रास देतात. रावणाला उत्तरेकडे आक्रमण करायचे आहे. म्हणूनच दक्षिणेत हा तळ त्याने खूप मजबूत बनवला आहे. त्याचे सेनापती आम्हाला सतत त्रास देतात. आमच्या आश्रमाची विटंबना करतात. इतके दिवस आम्हाला अवगत असणाऱया मंत्रांनी आम्ही आमच्या आश्रमाची सुरक्षा करत होतो. पण रावणाकडे आमच्या प्रत्येक मंत्रावर प्रतिमंत्र असतो. त्यामुळे आमचे मंत्र तेवढे प्रभावी ठरत नाही. रावणाने निसर्गात केलेल्या  ढवळाढवळीमुळे काही ठिकाणी दुष्काळ पडला आहे. आम्हाला जगणे खूप कठीण होत चालले आहे. आमचे रक्षण करा. लक्ष्मणजी चिडून म्हणाले की आपण थेट रावणावर हल्ला करू. पण श्रीराम यांनी त्यांना समजावले की आपल्याकडे रावणावर हल्ला करायला ठोस कारण नाही आणि आपल्याकडे याचा पुरावाही नाही की रावण हे सर्व सेनापतींमार्फत घडवून आणत आहे. कारण रावण कुठलाच पुरावा मागे ठेवत नसे.

आजकाल आपण एखाद्या बातमीवर लगेच चिडून व्यक्त होतो. ऐकीव बातम्यांवर विश्वास ठेवतो. त्याची शहानिशा करत नाही. श्रीराम त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे जे आपल्याला जगात वावरायला उपयोगी पडेल. ते तिघे जेव्हा अगस्त्य मुनींना भेटायला गेले तेव्हा त्यांची पत्नी महातपस्विनी लोपामुद्राने त्यांना रावणाबद्दल अधिक माहिती दिली. रावण एवढा प्रबळ झाला आहे की तो त्याच्या तपर्श्च्येच्या बळावर मिळवलेल्या शक्तीच्या सहाय्याने कोणाच्याही बुद्धीत शिरून त्यांचे विचार केवळ ओळखत नव्हता तर त्यात त्याला हवे तसे बदलही घडवून आणू शकत होता. लोपामुद्राने श्रीराम आणि सीतामाईंना काही मंत्र व मुद्रा शिकवल्या आणि सांगितले की याचा उपयोग अगदी टोकाच्या क्षणी करा. कारण हे मंत्र अतिसंहारक आहेत. तुम्ही मनाने आणि बुद्धीने खूप खंबीर आहात. हे मंत्र तुमच्या बुद्धीत शिरून वाचायला रावणाला जमणार नाही. माता अनुस्येने आपल्या पूर्ण ध्यानाचे फल सीतामाईंना दिले होते. त्यामुळे असीम शक्ती आणि सुरक्षा सीतामाईंना मिळाली. माता लोपामुद्रेने मंत्र आणि मुद्रा सीतामाईना स्वत च्या रक्षणासाठी दिल्या. श्रीरामाची बाह्य युद्धाची तर सीतामाईची आंतरिक युद्धाची तयारी होत होती. त्यांचा शेवटी सामना रावणाचा सेनापती खरदूषण याच्याशी झाला. श्रीरामांनी एकटय़ाने त्याला पराभूत केले. पण एक गोष्ट त्यांना लक्षात येते की या युद्धात वापरलेली अस्त्र-शस्त्र आधीच्या युद्धांपेक्षा खूप वेगळी आहेत. जर सेनापतीकडे अशा प्रकारची अस्त्र-शस्त्र असतील तर रावणाकडे कोणत्या प्रकारची अस्त्र-शस्त्र असतील? याबद्दल श्रीराम सजगतेने विचार करू लागले. जसजसे रावणाचे सेनापती मारले जाऊ लागले, तसतसे रावण अधिक सैन्य पंचवटीत पाठवू लागला. पंचवटीमधील वातावरण अशांत बनत चालले होते. पशुपक्षी, जीव-जंतू या सगळ्यावर यांचा परिणाम दिसत होता.

सोमा कलशातील अग्निद्वारे हे सगळे पाहू व अनुभवू शकत होती. तिला सीतामाईची खूप काळजी वाटत होती. पण सीतामाईची काळजी करणारी ती एकटीच नव्हती. अयोध्यामध्ये सर्वच स्त्रिया शरयू नदीवर पहाटे येऊन एकत्र सीतामाईच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करायच्या. अगदी सीतामाई वनवासात गेल्या तेव्हापासून. महामुनी अनुसूया, लोपामुद्राचे आशीर्वाद आणि अनेक स्त्रियांच्या प्रार्थनेचे सुरक्षा कवच सीतामाईच्या भोवती होतेच. अशातच शूर्पणखेची या कथेत एन्ट्री झाली. रावणाची बहीण शूर्पणखा ही मायावी होती.

एकदा लक्ष्मणाला बरे नव्हते म्हणून सीतामाई औषधी झाडपाला शोधण्यासाठी जंगलात खूप आतपर्यंत गेल्या. औषधी घेऊन येताना त्यांना एका स्त्राrच्या रडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने त्या गेल्या तेव्हा त्यांना एक स्त्राr पार्वतीमातेच्या मूर्तिसमोर बसून रडताना दिसली. सीतामाईंनी तिला रडण्याचे कारण विचारले. तेव्हा ती म्हणाली, ‘माझं नाव चंद्रिका. माझे पती योगी आहेत. आमचा एक आश्रम होता. खूप विद्यार्थी आमच्या आश्रमात शिकायचे. एकदा माया नावाची एक सुंदर स्त्राr आमच्या आश्रमात आली. तिचे वडील  मोठे योगी असल्याचे तिने आम्हाला सांगितले. तिच्या अंगाला खूप सुगंध येत होता. तिने आणलेला पक्वान्न तिने सर्व पुरुषांना खायला घालून भुलवले. एक दिवस माझे पती तिच्याबरोबर मला सोडून निघून गेले. तेव्हापासून मी अशी एकटी आहे. मला आत्महत्या करायची होती. पण पार्वती मातेने मला अडवले. मी जगून तरी काय करू? माझे माझ्या पतीवर खूप प्रेम आहे.’ ते ऐकून सीतामाई म्हणाल्या, ‘तुझा पती तुला सोडून दुसऱया स्त्राrच्या मागे गेला हे चुकीचेच आहे. पण माझ्या बाबांनी मला सांगितले होते की स्त्राrचा पहिला धर्म म्हणजे स्वतचा आत्मसन्मान राखणे. नंतर पत्नीधर्म. तू स्वत खंबीर हो. तू तुझ्या आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष दे. मी तुला श्वासावर आधारीत काही ध्यानपद्धती शिकवते.’ चंद्रिका म्हणाली, ‘हीच पद्धत माया सर्व आश्रमात वापरते. ही रावणाची बहीण शूर्पणखा आहे. हिच्यामुळे आजपर्यंत कित्येक संसार उध्वस्त झाले. कितीतरी स्त्रियांनी आत्महत्या केल्या. तिला या भागातील सर्व गुरुकुले नष्ट करायची आहेत.’ सीतामाई म्हणाल्या, ‘हिला हिच्या कर्माची फळे याच जन्मी भोगावी लागतील.’

चंद्रिकाला सांत्वना देऊन सीतामाई कुटीत परतल्या. श्रीराम व लक्ष्मणजी तिची वाटच बघत होते. जेवण झाल्यावर रामजींने सकाळी झालेली घटना सांगितली. ते शेजारच्या गावी गेले असता त्यांना नदीत एका योग्याचे शव दिसले. गावात चौकशी केल्यावर कळले की तो योगी चांगल्या चारित्र्याचा नव्हता. ते शव बाहेर काढण्यासाठी मदतीला कोणीच पुढे आले नाही. शेवटी रामजींने एकटय़ानेच ते शव बाहेर काढून त्यावर अंत्यसंस्कार केले. ‘कोण योगी होता तो माहीत नाही,’ रामजी म्हणाले.

तेव्हा सीतामाईने त्यांना चंद्रिकेची कहाणी सांगितली. रामजींनी केलेल्या वर्णनावरून सीतामाईची खात्री पटली की तो योगी चंद्रिकेचा नवरा होता. सीतामाईंना चंद्रिकेला हा समाचार कसा द्यायचा याचा प्रश्न पडला. त्या ध्यानाला बसल्या आणि त्यांच्या सूक्ष्म रूपाने चंद्रिकेजवळ गेल्या.  चंद्रिकेच्या भौतिक शरीराला सीतामाई दिसत नव्हत्या. तेव्हा तिथे माता पार्वती प्रगट झाल्या. तिने दिलेल्या दिव्य दृष्टीने चंद्रिका सीतामाईला बघू लागल्या. सीतामाईने तिला तिच्या नवऱयाच्या मृत्यूची बातमी देताच चंद्रिकेला शोक अनावर झाला. सीतामाई तिला म्हणाल्या की, ‘तुझ्या नवऱयाला शांतपणे त्याचा पुढचा प्रवास करू देत. तुझ्या शोकाने त्याला अडवू नकोस.’ यातून सीतामाई आपल्याला सांगतात की, आपली प्रिय व्यक्ती जर आपल्याला सोडून देवाघरी गेली, तर देवाकडे त्याच्या उत्तम गतीसाठी प्रार्थना करा. तुमच्या प्रेमाचे बंधन घालून त्यांची गती अडवू नका.

vrishali.sathe@gmail.com

 

।। सीतास्वरुपा ।।- अंतर्मनातील युध्द

सामना ऑनलाईन

>> वृषाली साठे

गोदावरीला त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे रावणाला त्यांना एकटीला सामोरे जायचे होते. मनाची तयारी करून त्या फळांची टोपली घेऊन बाहेर आल्या. त्या वेळी त्यांना पूर्ण जाणीव होती की त्या एका कृष्णविवराकडे जात आहेत. पण शूरपणे त्या येईल त्या प्रसंगाला सोमोरं जाण्यासाठी तयार होत्या. रावण आणि सीतामाई यांच्या मधल्या अंतर्मनातील युद्धाची सुरुवात झाली होती.

गोदावरीला भेटून सीतामाई श्रीरामासह कुटीत परतल्या. त्यांना खुश करण्यासाठी श्रीराम कारणे शोधू लागले आणि त्यांच्या दृष्टीस सोनेरी हरण पडले. श्रीराम सीतामाईला म्हणाले, अशी सोनेरी हरणे मिथिलेनंतर आपल्याला कुठे दिसलीच नाहीत. सीतामाई म्हणाल्या, मला कुठेच हरीण दिसत नाही. श्रीराम म्हणाले, थांब, मी तुझ्यासाठी ते हरीण घेऊन येतो. ते धनुष्यबाण घेऊन कुटीबाहेर पडले.

सीतामाईना काहीतरी अशुभ जाणवत होते. धावत जाऊन श्रीरामांना अडवावे, त्यांना नका जाऊ असे सांगावे, असे त्यांना वाटत होते. पण त्यांचे पाय जड झाले आणि तोंडातून  शब्द बाहेर पडत नव्हते.

नियतीने आता तिचे काम केले होते. सीतामाईंने गोदावरीला पुढल्या घटनाक्रमासाठी सहमती दिलेली होती. त्यामुळेच सीतामाई श्रीरामांना मनात असूनही अडवू शकत नव्हत्या.

बराच वेळ झाला. लक्ष्मणजी सीतामाईंना चिंतातूर बघून म्हणाले की, काळजी करू नका. श्रीरामजी लवकर परत येतील. खूप वेळ गेला. लक्ष्मणजी व सीतामाई दोघेही श्रीरामांची वाट बघत होते. तेवढय़ात त्यांना रामाचा आवाज ऐकू आला. सीतामाईना जाणवते की हा रामाचा आवाज नक्कीच नाही. पण ‘लक्ष्मणा धाव’ असे रामाच्या आवाजातील हाक ऐकून लक्ष्मणजी संभ्रमात पडले. रामाच्या मदतीला जाऊ की इथेच थांबू. शेवटी सीतामाई त्यांना जायला सांगतात. नाईलाजाने लक्ष्मणजी निघतात आणि सीतामाईंना विनंती करतात की तुम्ही कुटी सोडून कुठेही जाऊ नका.

सीतामाईंना वाटते की, लक्ष्मणजीना सांगावे की मी पण येते तुमच्याबरोबर श्रीरामांना शोधायला. पण पुन्हा त्यांचे पाय जड होतात आणि त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडत नाहीत.

सीतामाई कुटीत आतमध्ये जातात. त्यांना दारातून अंगणाबाहेर उभा असलेला तो दिसतो. तो रावणच असतो. जो साधूच्या वेशात अन्नासाठी याचना करत असतो. कोणालाही अन्न नाकारणे सीतामाईंसाठी अशक्य होते. रावणाला बघताच त्यांना जनकबाबांचा त्याने केलेला अपमान आठवतो. गोदावरीला त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे रावणाला त्यांना एकटीला सामोरे जायचे होते. त्यांनी मनाची तयारी केली. फळ असलेली टोपली घेऊन त्या बाहेर आल्या. त्यांना जाणीव होती की त्या एका कृष्णविवराकडे जात आहेत. पण शूरपणे त्या येईल त्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी तयार होत्या. पण ज्या क्षणी रावणाने त्यांचे मनगट धरले. त्या क्षणी त्यांनी जोरात किंकाळी फोडली. कारण त्या क्षणी त्यांचे श्रीरामाबरोबर असलेले सोनेरी धागे तुटले. ज्या धाग्यांमुळे न बोलताही त्यांचे एकमेकांबरोबर संभाषण व्हायचे, त्यांना एकमेकांच्या हृदयाची धडधड जाणवायची.

हे सीतामाईंसाठी अनपेक्षित होते. श्रीरामांबरोबर असाही वियोग होईल असे त्यांना वाटले नव्हते. यापुढे त्यांना एकटीला संघर्ष करायचा होता. त्याचप्रमाणे कलशामार्फत सोमाचा सीतामाईंशी असलेला संपर्कदेखील संपला.

एवढी गोष्ट सांगून सोमा थांबली. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. अनुसूया आणि तिच्या आईलादेखील रडू थांबवता येत नव्हते. अनुसूयेला मात्र एका प्रश्नाचे उत्तर मिळाले होते.

सीतामाईंच्या सहमतीशिवाय जगातील एक पानदेखील हलू शकत नाही. रावणाकडे कितीही शक्ती असल्या तरी तो सीतामाईंचे अपहरण त्यांच्या मर्जीशिवाय करू शकत नाही.

सोमा पुढे म्हणते, सीतामाईबद्दल सगळ्यांना किती कमी माहिती आहे. रावणाने त्यांना बंदी बनवून अशोकवनात ठेवले, त्यांना खूप त्रास दिला, श्रीरामजी आणि लक्ष्मणजी यांनी रावणाला हरवून त्यांना अयोध्येमध्ये परत आणले. श्रीरामांचा पराक्रम व त्यांचा झालेला विजय सगळ्यांना माहीत आहे, पण या सगळ्यात सीतामाईंनी केलेला त्याग, बलिदान, त्यांनी केलेला पराक्रम कोणालाच माहीत नाही.

सीतामाईंनी पण अयोध्येत आल्यावर त्यांच्या लंकेतील वास्तव्याबद्दल कोणालाही काही सांगितले नाही. अगदी श्रीरामांनादेखील नाही.

पण त्यांनी हे सगळे हनुमानाला सांगितले होते. हनुमान आणि सीतामाई या दोघांमध्ये एक अद्भुत पुत्र आणि माता हे नाते होते. हनुमान त्याच्या सीतामातेसाठी काहीही करायला सदैव तयार असायचा. सीतामाईनी कधीही त्यांनी केलेल्या महान कार्याचा उल्लेख केला नाही. कारण त्यांना कीर्तीची कधीच अपेक्षा नव्हती. पण सीतामाई जेव्हा आपला पृथ्वीवरील अवतार संपवून निजधामाला गेल्या. तेव्हा ही कथा हनुमानाने सोमाला सांगितली.

बघा, आपल्या कथेत आता पवनपुत्राचे आगमन झाले आहे. आता या पुढील कथा आपल्याला हनुमानजी सोमामार्फत सांगणार आहेत. रावणाला वाटत होते की, सीतामाई त्याच्या सापळ्यात अडकल्या आहेत, पण झाले होते उलटे. सीतामाईंना लंकेत नेऊन तो स्वतच्या विनाशाच्या सापळ्यात अडकला होता. सीतामाईंना माहीत नव्हते की त्यांना पुढे काय सहन करावे लागणार आहे. पण त्यांना हे नक्की माहीत होते की, ह्या सर्व दुष्ट शक्तींपासून वसुंधरा पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी त्या या भूतलावर आल्या आहेत.

हनुमानजी पुढे म्हणाले, जेव्हा रावण सीतामाईंना खेचत विमानात घेऊन गेला तेव्हा त्याच्या पकडीतून सीतामाई सहज सुटू शकल्या असत्या. त्यांच्याकडे माता लोपामुद्रेने दिलेले प्रभावी मंत्र होते. पण त्यांनी ते वापरले नाहीत. रावणाने अशा रीतीने स्पर्श केलेला बघून मात्र रागाने सीतामाई लालबुंद झाल्या. जणु काही त्यांच्या पूर्ण शरीरातून अग्नी बाहेर पडत होता. रावणाने घाबरून हात सोडून दिला. सीतामाई रागाने व त्वेषाने रावणाला म्हणाल्या, अरे राक्षसा, तुझी हिंमत कशी झाली, मला हात लावायची. लक्षात ठेव, यापुढे तू कधीही मला हात लावू शकणार नाहीस. मी तुझ्याबरोबर लंकेत येईन, पण माझ्या इच्छेने. तू मला कधीही बंदी बनवू शकत नाहीस.

सीतामाईंनी हनुमानाला सांगितले, “मी रागाने लालबुंद झाले, मी माझा राग शांत करू शकत नव्हते. पण जेव्हा श्रीरामांना आदल्या दिवशी त्यांच्या डोळ्यात पाहात मी त्यांना जे सांगितले ते आठवले. मग श्रीरामांना आठवत मी शांत होण्याचा प्रयत्न करू लागले. मला जाणवले की मला अधिक सावध राहण्याची गरज आहे. सीतामाईंनी नंतर जटायूला पाहिले. त्याने निकराने रावणाबरोबर युद्ध केले. जेव्हा पंख कापले गेले तेव्हा जटायू खाली पडला. सीतामाईंना खूप दुःख झाले. आपण या आधीही पाहिले आहे की सीतामाई कोणाचेच दुःख बघू शकत नव्हत्या. मग जटायूचे दुःख त्या कशा बघू शकल्या असतील? सीतामाईंनी स्वत जटायूच्या वेदना स्वीकारल्या. त्यांना आपले हात कापले गेले आहेत या वेदना जाणवल्या. तेव्हा वायुदेव येऊन तिच्या कानात बोलले, माता हा पहिला बळी आहे. पुढे महासंग्रामात किती बळी जातील सांगता येत नाही.

सीतामाई श्रीरामांची आठवण येताच खूप कासावीस झाल्या. आपण आश्रमात नाही बघून श्रीरामांना किती दुःख होईल या विचाराने त्या खूप दुःखी झाल्या. त्यांनी आपले सर्व दागिने एका उत्तरायणात बांधून विमानातून खाली फेकले. जेणेकरून श्रीरामांना त्यांचा काहीतरी ठावठिकाणा लागावा. यानंतर सीतामाई अजून सतर्क झाल्या, कारण त्यांचा संकल्प खूप मोठा होता. त्यांना रावणाच्या हृदयसाम्राज्यात शिरून त्याला चांगल्या मार्गांवर घेऊन यायचे होते. पण रावण वेगळ्याच गुर्मीत होता. रावणाची इच्छा होती की सीतामाईंना साखळदंडाने बांधून लंकेत घेऊन जावे. पण सीतामाईंकडे बघून त्याची तशी हिंमत झाली नाही.

जेव्हा विमान लंकेत उतरले तेव्हा सीतामाई स्वत विमानातून बाहेर उतरून आल्या. बाहेर खूप गर्दी जमली होती. लंकेतील सगळी प्रजा, रावणाचे सेनाधिकारी, राजघराण्यातील व्यक्ती सगळेजण होते. त्यात शूर्पणखा पण होती. तिच्या चेहऱयावर एक विकट हास्य होते. सीतामाईकडे बघून ती थुंकली आणि म्हणाली, की आज माझा बदला पूर्ण झाला.

सीतामाई तिला काहीही प्रतिक्रिया देत नाहीत. त्या शांतपणे व निर्भयपणे सरळ चालत गेल्या. एक मोठे प्रवेशद्वार ओलांडून त्या पुढे गेल्यानंतर एक मोठे प्रांगण लागले. त्या प्रांगणाच्या मागे एक उपवन होते. त्या उपवनाला कुंपण म्हणून मोठय़ा भिंती होत्या. सीतामाई त्या उपवनात जातात, इकडे तिकडे बघतात. त्यांना एक अशोक वृक्ष दिसतो. त्यांना जाणवते की तो वृक्ष त्यांना स्वतजवळ बोलावतो आहे. त्या अशोक वृक्षापाशी गेल्या आणि झाडाला पाठ टेकून खाली बसल्या.

निसर्गाच्या प्रेमळ स्पर्शाने त्यांना थोडे बरे वाटले. त्यांनी पाहिले की आजूबाजूला भयंकर राक्षसिणी पहारा देत आहेत. त्यातील जी थोडी शांत स्वभावाची असते, ती फळाची टोपली व पाणी घेऊन सीतामाईंजवळ येते आणि म्हणते, राजकुमारी सीता, तुम्हाला भूक लागली असेल. थोडं खाऊन घ्या. सीतामाई खाण्यासाठी नकार देते. पण दोन घोट पाणी घेते… आणि इथेच रावणाची मायावी शक्ती काम करते. रावण आणि सीतामाई यांच्या मधल्या अंतर्मनातील ( Psychological war) युद्धाची सुरुवात होते.

vrishali.sathe@gmail.com

संस्कृती-वैभव – श्रीरामाच्या बहिणीचे मंदिर

सामना ऑनलाईन

>> वर्षा चोपडे

पुराणात उल्लेख असलेली रामायणातील राजकुमारी शांता अत्यंत सुंदर आणि बुद्धिमान स्त्री होती. वाल्मीकी रामायण, बालकाण्ड आणि विष्णुपुराणात शांतादेवीचा उल्लेख आढळतो. हिंदुस्थानात उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेशात  शांतादेवीची दोन मुख्य मंदिरे आहेत.

कोण होती भगवान रामाची बहीण? फार कमी लोकांना माहिती आहे की, भगवान राम यांना एक मोठी बहीणदेखील होती. पुराणात उल्लेख असलेली हिंदू महाकाव्य रामायणातील राजकुमारी शांता अत्यंत सुंदर आणि बुद्धिमान स्त्री होती. वाल्मीकी रामायण, बालकाण्ड आणि विष्णुपुराणात शांतादेवीचा उल्लेख आढळतो.

पौराणिक कथेनुसार, भगवान रामाच्या जन्मापूर्वी दशरथ आणि कौसल्या यांना एक शांता नावाची मुलगी  होती. राजा अंगराज रोमपाद आणि राणी वर्षिनी (रामाची मावशी) यांना मूलबाळ नव्हते. राजा रोमपाद शांताचे तेजस्वी रूप व युद्धातील ज्ञान ऐकून प्रभावित झाले. आपल्याला अशीच कन्या असावी अशी इच्छा त्यांनी राजा दशरथासमोर प्रगट केली. विशाल मनाच्या राजा दशरथाने आपली कन्या उदारपणे राजा रोमपाद आणि राणी वर्षिनी यांना दत्तक दिली. राजकुमारी शांता दोघा राजाराणीची अत्यंत लाडकी होती. एकदा एक ब्राह्मण राजाकडे मदतीसाठी आला असता राजाने त्या ब्राह्मणाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तो ब्राह्मण क्रोधित झाला. रोमपादाच्या राज्यात दुष्काळ पडेल असा त्याने शाप दिला. इंद्राने रोमपादाच्या अंगदेशात पाण्याचा वर्षाव बंद केला आणि दुष्काळ पाडला. त्यानंतर यातून मुक्तता मिळवण्यासाठी राजा रोमपादने शृंगी ऋषींना यज्ञ करण्यास विनंती केली. शृंगी ऋषी हे विभांडक ऋषी व अप्सरा उर्वशी यांचे पुत्र होते. शृंगी ऋषींच्या डोक्यावर शिंग होते, म्हणून त्यांचे नाव ऋष्यशृंग पडले. शृंगी ऋषी हे  कश्यप ऋषींचे नातू असल्याचेही म्हटले जाते. त्यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते श्रंगेरी, सध्या कर्नाटकात आहे. श्रंगेरीजवळ त्याच नावाचा एक पर्वतदेखील आहे. शृंगाच्या जन्मानंतर  उर्वशी स्वर्गात निघून गेली. या फसवणुकीमुळे विभांडक दुखावला गेला. त्याला स्त्रीचा द्वेष वाटू लागला आणि त्याने आपला मुलगा ऋष्यशृंगावर स्त्रीची सावलीही पडू न देण्याचा निर्धार केला. यासाठी त्याने ऋष्यशृंगाचे संगोपन जंगलात केले. ते जंगल अंगदेशच्या सीमेला लागून होते. तीव्र क्रोधाचे परिणाम अंगदेशाला भोगावे लागले, तिथे भयानक दुष्काळ पडला. शृंगी ऋषींच्या तपश्चर्येत इतकी शक्ती होती की, ते भगवान इंद्राला प्रसन्न करू शकत होते आणि त्यांना हवा तेव्हा पाऊस पाडू शकत होते. अंगराज रोमपाद यांनी ऋषी आणि मंत्र्यांशी सल्लामसलत केली आणि असा निष्कर्ष काढला की, जर ऋष्यशृंगाला अंगदेशाच्या भूमीवर आणले तर त्यांची समस्या दूर होईल. म्हणून राजाने ऋष्यशृंगाला प्रसन्न करण्यासाठी देवदासींची मदत घेतली; कारण शृंगाने त्याच्या जन्मानंतर कधीही स्त्री पाहिली नव्हती… आणि नेमके तेच घडले. अंगदेशात शृंग ऋषीचे मोठय़ा आनंदात स्वागत करण्यात आले; परंतु विभांडकच्या रागाच्या भीतीने रोमपादाने ताबडतोब आपली मुलगी शांताचा हात ऋष्यशृंगाच्या हाती सोपवला. यज्ञानंतर इंद्रदेवाने दुष्काळ दूर केला. याच शृंगी ऋषी यांनी गुरू वशिष्ठांच्या विनंतीवरून राजा दशरथाकरिता उत्तर प्रदेशातील बस्ती जिह्यातील मखौडा धाम मनोरमा नदीकाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला होता. यज्ञादरम्यान माता शांता यांनी 45 दिवस देवी शक्तीची पूजा केली. त्यानंतर काही महिन्यांनी भगवान राम आणि त्यांच्या तीन भावांचा जन्म झाला. ऋषी शृंगाने अश्वमेध यज्ञ केला ते ठिकाण अयोध्येपासून सुमारे 38 किमी पूर्वेस होते.

हिंदुस्थानात उत्तर प्रदेश व हिमाचल राज्यात शांतादेवीची दोन मुख्य मंदिरे आहेत. उत्तर प्रदेशातील बस्ती जिह्यापासून 45 किलोमीटर अंतरावर हरैया तहसील परिसरात एक ठिकाण आहे, ज्याचे नाव शृंगिनारी आहे. त्रेतायुगात माता शांता तिथल्या घनदाट जंगलात राहत असत आणि पूजा-अर्चा करत असत. येथे शृंगी ऋषींनी बांधलेले माता शांताचे एक मोठे मंदिर आहे. हे एक सिद्ध ठिकाण आहे. देशभरातून इथे भक्त येतात. प्रार्थना करतात आणि  देवी  तिच्या भक्तांना आशीर्वाद देत त्यांच्या इच्छा पूर्ण करते असे म्हटले जाते. या मंदिरात देवी शांता आणि त्यांचे पती शृंग ऋषी यांची एकत्र पूजा केली जाते.

असे म्हणतात, हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील मंदिर शांतादेवीचे निवासस्थान होते. हिमाचल राज्याच्या कुल्लूपासून 50 किमी दूर असलेले हे मंदिर दसरा उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर त्याच्या अद्वितीय लाकडी वास्तुकला आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. काही लोकांचा असा विश्वास आहे की, या मंदिरात मनापासून पूजा करणाऱया भक्तांना भगवान राम, त्यांची बहीण शांता व शृंगी ऋषी यांचे आशीर्वाद मिळतात. हिंदुस्थानातील दक्षिणेकडील काही भागांत भगवान रामाची बहीण शांता ही पूजनीय आहे. याच शृंगी ऋषीचे मंदिर प्रामुख्याने बिहारमधील लखीसराय येथे आणि छत्तीसगडमधील धमतरी येथेही  आहे. लखीसराय मंदिर, बाबा शृंगी ऋषी धाम, सूर्यगढ प्रखंडमध्ये स्थित आहे. हे मंदिर जंगल आणि पर्वतांनी वेढलेले आहे. शृंगी ऋषी हे राजा दशरथ यांचे जावई आणि भगवान श्रीराम यांचे मेहुणे होते. असे मानले जाते की, भगवान रामाने ऋषी शृंगीच्या आश्रमात रावणाशी युद्ध करण्याची योजना आखली होती. पौराणिक कथेबाबत अनेक मतभेद असले तरी शांता ही प्रभू रामचंद्राची मोठी बहीण  होती असे सांगितले जाते.

varshakisanc@gmail.com

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)

।। सीतास्वरुपा ।। – करुणामयी

सामना ऑनलाईन

>> वृषाली साठे

‘अन्टोल्ड स्टोरी ऑफ सीता’ या पुस्तकातून डेना मॅरिअम यांनी त्यांच्या शब्दात सांगितलेली ही कथा. सीतामाई आणि राम यांची ही जीवनकथा म्हणजे संपूर्ण भारतवर्षाची कहाणी आहे.

विवाह झाल्यावर जनकबाबा या चारही दासींना म्हणजे सोमा, मीनाक्षी, उषा आणि रोहणा यांना विचारतात की, त्या सीतामाईबरोबर अयोध्येला जायला तयार आहेत का? चारही जणी सीतामाईबरोबर जायला तयार होतात, तेव्हा जनकबाबा चारीजणींना जवळ घेतात आणि सांगतात की, ज्याप्रमाणे माझ्यासाठी सीतामाई आणि उर्मिला आहेत त्याप्रमाणे तुम्ही पण माझ्याच कन्या आहात. मीनाक्षीला खूप भरून येतं. तिला तिच्या वडिलांची खूप आठवण येते.

लहानपणीच मीनाक्षीला तिच्या वडिलांनी त्यांच्या घराण्याला असलेल्या शापाबद्दल सांगितलं होतं. त्यांच्या घरात कोणाही मुलीचं लग्न होताच ती विधवा बनून माहेरी परत यायची. त्यामुळे मीनाक्षीला लग्न कधी करायचेच नव्हते. सीतामाईंना मीनाक्षीची खूप काळजी वाटायची. निघताना सीतामाई मीनाक्षीला अश्व शाळेत काम करणाऱया किरणला भेटून यायला सांगते. मीनाक्षीला कळत नाही की किरणला का भेटायचं, पण सीतामाईंना माहीत असतं की किरणला मीनाक्षी खूप पसंत आहे. पण या जन्मी घराण्याच्या शापामुळे मीनाक्षीचं लग्न होऊ शकत नाही. पण सीतामाईंना खात्री असते की पुढल्या कुठल्या तरी जन्मी हे दोघं एकत्र येतीलच आणि हे खरं होतंही.

आता सीतामाईचा अयोध्यामध्ये प्रवेशाबद्दल बोलूया. अयोध्यामध्ये जोरदार स्वागत होतं. कौशल्या मातेने तर मिथिलेत दूत पाठवून सीतेला काय आवडतं, काय नाही याची चौकशी करून ठेवलेली असते. राम तर सगळय़ांचा आवडता म्हणजे घरच्यांचा आणि प्रजेचादेखील. म्हणून सीतामाईबद्दल सगळय़ांना उत्सुकता होती. भव्य आणि दिव्य स्वागत चारही राजकुमार आणि त्यांच्या पत्नींचं होतं. मिथिलेतील चारही राजकन्या आणि त्यांच्या दासी अयोध्यामध्ये आल्यावर जरा भांबवून जातात. मिथिलेत खूप साधेपणा आणि अयोध्येमध्ये खूप श्रीमंती व दिखाऊपणा.

भव्यदिव्य राजवाडा, त्यातील अति श्रीमंती. कोणालाही भेटायला जायच्या आधी दासीमार्फत वर्दी द्यायची. हे सर्व मिथिलेपेक्षा खूप वेगळं होतं. शिवाय राण्यांमधील एकमेकींच्या नात्यात प्रेम कमी आणि स्पर्धाच जास्त पाहायला मिळत होती. सीतामाई घराण्याच्या चालीरीती समजून घेतात. सगळय़ा सासवांची मनापासून सेवा करतात. प्रत्येकाची आवड-निवड जाणून घेतात. त्याप्रमाणे त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून प्रत्येकाला खूश करतात. बहिणींना आणि त्यांच्याबरोबर आलेल्या दासींना मिथिलेची आठवण आली तर त्या त्यांना जवळ घेऊन त्यांची समजूत काढतात. आपण इथे खूप जबाबदारीने वागलं पाहिजे जेणेकरून आपल्या माहेरची शान कमी होता कामा नये असं सीतामाई त्या दासींना समजावून सांगायच्या. रामजी आणि सीतामाईमधील प्रेम तर असं काही विलक्षण असतं की त्यांच्या संपर्कात येणारे प्रत्येकजण हे प्रेम बघून आनंदित होतात. त्यांच्यामध्ये फुललेले प्रेमाचे फूल इतके सुगंधित होते की, त्यात संपूर्ण अयोध्या सुगंधित होऊन जाते. रामजी आणि सीतामाईंना एकमेकांविषयी आदर व विश्वास होता. त्यांच्यात मनमोकळा संवाद होईल अशी मैत्री होती. मुख्य म्हणजे प्रत्येक सुखदुःखात एकमेकांना साथ व प्रसंगी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी होती. यालाच प्रेम म्हणतात ना. त्यांचे मनाचे धागे इतके जुळले होते की काही न सांगता त्यांना एकमेकांच्या मनातील प्रत्येक गोष्ट कळायची. प्रेम म्हणजे आंतरिक ओढ. हे केवळ एक स्त्राr व पुरुष यातील प्रेम नव्हते तर दोन आत्म्यांचे मिलन होते. जे अभिन्न होते. यातच एक वर्ष निघून गेलं.

अयोध्येमध्ये स्त्रियांना राजवाडय़ाबाहेर मनात येईल तेव्हा जायची मुभा नव्हती. सीतामाई तर लहानपणापासून जंगलात, नदीवर, बागेत, नगरात, शेतात एकटय़ा जायच्या. इथे अयोध्येमध्ये राजवाडय़ात सीतामाईंना निसर्गाची खूप आठवण यायची. एकदा त्यांनी मीनाक्षीकडून सेविकेचा पोशाख मागून घेतला आणि त्या सोमा आणि मीनाक्षीबरोबर शरयू तीरावर गेल्या. त्यांनी शरयू नदीच्या दिव्य आत्म्याची पूजा केली तेव्हा शरयू नदी स्वत येऊन सीतामाईंना भेटल्या. तेव्हापासून सोमा आणि मीनाक्षीसाठी ती शरयू नदीची जागा खूपच पवित्र ठरली. पुढे हीच जागा समस्त अयोध्येतील महिलांसाठी पवित्र पूजा स्थान बनली.

दशरथ महाराज रामाचा राज्याभिषेक ठरवतात. या पुढची गोष्ट तर आपल्याला माहीतच आहे. रामाला 14 वर्षांचा वनवास माता कैकयीमुळे होतो. कौसल्या माता सीतामाईंना रामजीबरोबर जायची परवानगी देतात. कारण त्यांना माहीत असतं की हे दोघे एकमेकांशिवाय परिपूर्ण नाहीत. मीनाक्षी विचारते की, ‘आमचं काय? आम्ही पण तुमच्याबरोबर येतो.’ तेव्हा सीतामाई म्हणतात, ‘मीनाक्षी हे शक्य नाही. आज जरी तुम्हाला हे कैकयी माता व मंथरा हे कारण वाटत असलं तरी आम्ही जंगलात जाणं हे विधिलिखित आहे, जे खूप गरजेचं आहे. जंगलातील आश्रमावर होणारे हल्ले थांबवले नाहीत तर पुढच्या पिढीपर्यंत ज्ञान कसं जाईल?’

त्या काळातील आश्रम म्हणजे आजच्या काळातील शैक्षणिक संस्था. या आश्रमाचं संरक्षण होणं ही काळाची गरज होती. मीनाक्षी विचारते, ‘सीतामाई तुमच्याशिवाय आम्ही चौघी इथे राहून काय करू?’ सीतामाई चौघींना बोलवते आणि त्यांना एक कलश देते. त्या कलशामध्ये स्वतमधून चिदाग्नी काढून ठेवते. कलशामध्ये अग्नी प्रकट होतो. नंतर प्रत्येकीला एक एक मंत्र देते आणि सांगते रोज सकाळ-संध्याकाळ या मंत्राचा पाठ या कलशासमोर करा. तुमच्या माझ्यातील संपर्क या कलशातील अग्नीद्वारे कायम राहील. नंतर ती चौघींना कौसल्या माता, सुमित्रा माता आणि कैकयी माता यांची सेवा करायला सांगते.

मीनाक्षी रागावते, मी कैकयी मातेची सेवा का करू? सीतामाई तिला समजावून सांगतात की, ‘आज कैकयी मातेला माहीत नाही की त्यांनी काय केलं आहे, पण उद्या जेव्हा त्यांना त्याची जाणीव होईल तेव्हा कोणी त्यांच्याबरोबर नसेल. तिला तेव्हा आधाराची गरज असेल. तू तेव्हा तिचा आधार हो. बघा किती प्रेम आहे सीतामाईच्या मनात. अशाच प्रेमळ सीतामाईंना नमस्कार करून आजचा भाग संपवते.

vrishali.sathe@gmail.com

सीतास्वरुपा – सर्वगुणसंपन्न सीता

सामना ऑनलाईन

>> वृषाली साठे

सीतामाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडताना अनेक प्रश्नांची उत्तरे या कथेमार्फत आपल्याला मिळताना दिसतात. गुणवर्णन ऐकताना आपण त्या गुणांना स्वतमध्ये आकर्षित करतो. सीतामाईचे हे विविध पैलू मीनाक्षी म्हणजेच लेखिका डेना मॅरिअम, ज्या पूर्वजन्मी सीतामाईच्या दासी होत्या, त्यांच्याकडून जाणून घेत आहोत.

आपण पाहिलं की, सीतामाईचा जन्म संपूर्ण पृथ्वीसाठी झाला. जनकबाबा आणि सुनयना मातेची ती लाडकी लेक होतीच. पण सर्व मिथिलावासीही तिच्यावर खूप प्रेम करत होते. कारणही तसेच होते. सीतामाईचा पायगुणच चांगला होता. मिथिलेतील दुष्काळ संपला होता. अन्नधान्याची कमतरता नव्हती. सर्वत्र सुखसमृद्धी भरून वाहत होती. राजवाडय़ात तर सगळे सतत सीतामाईच्या अवतीभवती राहण्याचा प्रयत्न करायचे. एक गंमत होती की, या लहान बाळाची प्रभाव इतका विलक्षण होता की सर्वजण तिला सीतामाई म्हणूनच हाक मारायचे. बाळ इतके अद्भुत होते की जे जनकबाबा जंगलात ऋषी मुनींच्या सहवासात त्यांचा वेळ जास्त घालवायचे ते आता बाळ घरी आल्यापासून एक वर्ष कुठे बाहेरच गेले नाहीत. अर्थात जगन्माता नारायणीच्या बाळलीला बघण्याचे सौख्य कोणी का सोडेल?

पण जेव्हा सीतामाई एक वर्षाची झाली, तेव्हा मात्र एक दिवस जनकबाबा जंगलात ऋषींच्या आश्रमात जायला निघाले. सीतामाईने त्यांच्या पायाला मिठी मारली व नंतर आपले दोन्ही हात उंचावून मला पण घेऊन चला असे म्हणू लागली.

सुनयना मातेला इतक्या लहान मुलीला जंगलात जाऊ द्यावे हे काही बरोबर वाटेना. सीतामाईचे मन दुखवायला नको असे बाबांनी समजावले. जेव्हापासून सीतामाई राजवाडय़ात आल्या तेव्हापासून बाबांनी मीनाक्षीला सीतामाईची देखभाल करण्याचे काम दिले. त्यामुळे जनकबाबा आणि सीतामाईसोबत मीनाक्षीदेखील जंगलात गेली.

जनक महाराज ऋषींबरोबर विचारविनियम करत एका कुटीमध्ये होते. तर एक वर्षाच्या सीतामाईंना सांभाळत मीनाक्षी दुसऱया कुटीमध्ये होती. मीनाक्षीला मध्येच डोळा लागला. उठल्यावर बघते तर सीतामाई तिथे नव्हत्या. ती धावत हे जनकबाबांना सांगायला गेली तर तिथे तिने पाहिले की जनकबाबांच्या शेजारी जमिनीवर सीतामाई झोपून गेली आहे. जनकबाबा म्हणाले की, ती स्वत चालत इथे आली आणि माझ्या व ऋषींच्या चर्चा ऐकत झोपून गेली. एक वर्षाचे बाळ पण किती शांतपणे चर्चा ऐकत होते. बाळाचे पाय पाळण्यात दिसत होते, कारण ती प्रत्यक्ष नारायणी होती. केवळ पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी तिने मानवी जन्म घेतला होता.

जेव्हा जेव्हा जनकबाबा जंगलात जायचे तेव्हा तेव्हा सीतामाई त्यांच्याबरोबर जायच्या. एकदा अशाच सीतामाई 2-3 वर्षांच्या असताना जंगलात गेल्या असताना त्या एका झाडाकडे बोट दाखवून जनकबाबांना काही सांगू पाहात होत्या. जनकबाबांना समजेना, पण जवळ जाऊन बघितले तर एक पिल्लू जखमी अवस्थेत पडले होते. सीतामाईने त्याला उचलून घेतले. सीतामाईला प्रकृतीमधील प्रत्येकाचे दुःख जाणवायचे व ते दुःख दूर करायला त्या धडपड करायच्या.

आजकाल आपण आत्मकेंद्री बनत चाललो आहोत. ही अशी संवेदनशीलता आपल्यात नाही तर आपण लहान मुलांना काय शिकवणार? लहानपणापासून सीतामाई ध्यान करायच्या. खूप आनंद झाला असेल तरी ध्यान. दुःख झाले तरी ध्यान. ध्यान करून त्या प्रकृतीशी सतत कनेक्ट करायच्या. ही गोष्ट आज खूप महत्त्वाची आहे. प्रत्येकाने रोज सुरुवातीला किमान 10 मिनिटे जरी मेडिटेशन करायला हवे. मानसिक शक्तीचा विकास केवळ ध्यानाने होतो.

एकदा अशीच सीतामाई मीनाक्षीबरोबर जंगलात गेली होती. पण आश्रमात न जाता ती जंगलाकडे पळत गेली. पाठोपाठ मीनाक्षी तर होतीच. ती एका पक्ष्यांच्या थव्याजवळ गेली. त्यांच्याशी बोलू लागली. बोलून झाल्यावर पुन्हा जंगलात गेली. तिथून तिने औषधी वनस्पती आणली. जनकबाबांनी त्याबद्दल विचारताच ती म्हणाली की, आश्रमातल्या एका ऋषींचे पोट खूप दुखत होते. म्हणून ती औषधी वनस्पती आणायला जंगलात गेली. त्याची माहिती पक्ष्यांनी तिला दिली. ज्या ऋषीचे पोट दुखत होते त्यांनाही खूप आश्चर्य वाटले. कारण त्यांचे पोट दोन दिवसांपासून दुखत होते आणि त्यांनी कोणीलाही ते सांगितले नव्हते.

जनकबाबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते समजून गेले की ही नारायणी या जगातील दुःख दूर करायला आली आहे. हे माझे परम भाग्य की मी हिचा पिता आहे. यातून आपल्याला सीतामाईचे व्यक्तित्व उलगडत जाते. कशा प्रकारे त्या प्रकृतीशी कनेक्टेड होत्या. कोणी न सांगताही त्यांना दुसऱयांचे भाव समजत होते. त्यांना फक्त माणसांशीच नाही, प्राणी, पक्षी, झाडे, निसर्गाशीसुध्दा संवाद साधता यायचा.

अजून एक प्रसंग मीनाक्षी सांगते. एकदा सीतामाईला जंगलात जाऊन खूप वेळ झाला. ती परत आली नाही म्हणून जनकबाबा आणि मीनाक्षी शोधायला गेले. तर जंगलात एका झाडाखाली एका मोठय़ा माकडिणीच्या मांडीवर सीतामाई डोके ठेवून झोपली होती. त्या दोघांना बघताच माकडीण पळून गेली. सीतामाईना विचारले तर तिने सांगितले की, या माकडिणीचे पिल्लू काल झाडावरून पडून मेले. ती खूप दुःखी होती. म्हणून सीतामाई तिला सांत्वना देत होती. ते बघून जनकबाबांच्या डोळ्यातून पाणी आले. बघा सीतामाई दुसऱयाचे दुःख बघू शकत नाही.

आज आपण हे प्रकृती (निसर्ग) बरोबरचे कनेक्शन हरवून बसलो आहोत. `अन्टोल्ड स्टोरी आाफ सीता’ या पुस्तकाच्या निमित्ताने आपण मनाने प्रकृतीच्या जवळ गेलो तर सीतामाईला ते खूप आवडेल. सीतामाई एकदा आठ-नऊ वर्षांची असताना तिला आणि जनकबाबांना एका आश्रमाच्या उद्घाटनासाठी बोलवले होते. सीतामाई आश्रमात यायला तयारच होईनात. सगळे ऋषी-मुनी विचारायला लागले की तुम्ही आत का येत नाही? त्यावर सीतामाई म्हणाल्या की, हा आश्रम बांधताना तुम्ही किती झाडे तोडलीत? प्रकृतीचा नियम आहे, तुम्ही जेवढे प्रकृतीकडून घ्याल त्याच्या दुप्पट तुम्हाला प्रकृतीला द्यावे लागेल. म्हणजे जेवढी झाडे तोडाल, त्याच्या दुप्पट झाडे तुम्हाला लावावी लागतील. बघा आजच्या काळात आपण एवढा विचार तरी करतो का? आपल्याला फक्त घ्यायचे माहीत आहे. सीतामाई त्या काळात शिकवत होती की, प्रकृतीकडून कधीही काहीही फुकट घेऊ नये.

यानंतर या कहाणीत एका महत्त्वाच्या पात्राचा प्रवेश होतो, आणि तो म्हणजे सोमा. सोमा सीतामाईपेक्षा एक-दोन वर्षांनी मोठी असेल. ती जेव्हा काम मागण्यासाठी राजवाडय़ात आली तेव्हा जनक बाबांनी तिला सीतामाईची सखी म्हणून काम करायला सांगितले. सोमा आणि सीतामाई यांच्यातला संबंध अद्वितीय होते. दोघींनाही एकमेकांच्या मनातले काही न सांगता कळायचे. सीतामाईंना गोड खावेसे वाटले तर सोमा गोड बनवायची. सीतामाईंना एखादे फळ खावेसे वाटले की सोमा ते फळ त्यांच्यासमोर आणून ठेवत असे. त्या दोघींचा संबंध अद्वितीय होता. आजकाल आपण ज्याला मेंटल टेलिपथी म्हणतो, अगदी तसेच. जशी कथा पुढे जाते तेव्हा सोमा हे पात्र किती महत्त्वाचे आहे हे कळत जाते.

जशी जशी सीतामाई मोठी होत गेली, तसे ती ध्यानाला जास्त महत्त्व द्यायला लागली. तिला जंगलात जाऊन ध्यान करायला फार आवडायचे. आज आपण लोकतंत्र, प्रजातंत्र हे शब्द वापरतो पण 7000 वर्षांपूर्वी सीतामाई आणि जनकबाबांनी मिथिलेत स्वशासनाचा पाया रचला. प्रत्येक गावात पंचायत असली पाहिजे. तिथली लोकंच आपला प्रतिनिधी निवडून समितीमार्फत गावात सुव्यवस्था व शासन उत्कृष्टपणे करण्याची संकल्पना सीतामाई आणि जनकबाबांनी आणली. आपल्याला रामायणात सीतामाईबद्दल एवढे माहीत नव्हते. सीतामाईची निर्णयक्षमता व प्रत्येक जिवाबद्दल असलेला कळवळा यासारख्या गोष्टी सीतामाईची नवीन ओळख करून देतात.

ज्याप्रमाणे सीतामाईंना ध्यान आवडायचे, त्याप्रमाणे जेवण बनवून प्रेमाने दुसऱयाला खाऊ घालणे ही गोष्ट त्यांना खूप आवडायची. वेगवेगळय़ा भाज्या, कंदमुळे, वनस्पती यांचा वापर करून त्या उत्कृष्ट स्वयंपाक करायच्या. अन्नापासून मन बनते. त्यामुळे सात्त्विक जेवणावर त्यांचा भर असायचा. सर्व शास्त्र व शस्त्रविद्या त्यांना गुरुकुलात जात असल्याने येत होत्या. त्या सर्व वडीलधाऱया मंडळीची सेवा करायच्या आणि लहान बहिणींची काळजी घ्यायच्या. धर्म, अर्थ, काम, मोक्ष याप्रमाणे पाचवा पुरुषार्थ प्रेम हा आहे. आणि हे प्रेम काय असते हेच आपण सीतामाईकडून शिकतो.

।। सीतास्वरुपा ।। – आंतरिक शक्ती

सामना ऑनलाईन

>> वृषाली साठे

डेना मेरियम त्यांच्या `अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता’ या पुस्तकातून काही अद्भुत व आपण कधी न ऐकलेल्या गोष्टी त्या आपल्याला सांगतात. डेना मेरियम, ज्या पूर्वजन्मी सीतेची दासी, मीनाक्षी होत्या. तार्किक दृष्टीने पाहिले तर खऱया वाटणाऱया या गोष्टी आणि त्याचे सीतामाईच्या दृष्टीतून झालेले निरूपण ऐकण्याजोगेच…

मदत करण्यात तर सीतामाई सदैव तत्पर असायच्या. शेतात जाऊन नांगरदेखील त्या उचलायच्या तेव्हा सुनयना माता जनक बाबांकडे पार करायच्या की, “माझी एवढी नाजूक मुलगी! तिला तुम्ही अशी कामं करायला सांगता?” जनक बाबा सांगायचे की, “तिची भौतिक शक्ती बघू नकोस, तिची आंतरिक शक्ती बघ. मी शिकवलेल्या यौगिक क्रियांनी व तिने केलेल्या ध्यानाने तिची आंतरिक शक्ती खूप वाढली आहे. हे काम तर ती सहज करेल.”

एकदा सीतामाई जंगलात ध्यानाला त्यांच्या आवडत्या ठिकाणी गेल्या. खूप वेळ होतो, त्या ध्यानातून बाहेर येत नाहीत. मीनाक्षी व सोमा धावत जनक बाबांना येऊन सांगतात की, खूप तास होऊन गेले, पण सीतामाई ध्यानातून बाहेर नाही आल्या. जनक बाबा म्हणाले की, “मला याचीच भीती होती. जर सीतामाई नारायणी तत्त्वाशी एकरूप झाली तर मी तिला पुन्हा कसं आपल्यात आणू?” ते स्वत ध्यानाला बसले. ध्यानात सीतामाईंशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण ते संपर्क करू शकत नव्हते. काही वेळाने त्यांनी आनंदाने डोळे उघडले आणि म्हणाले की, सीतामाई ध्यानातून बाहेर येत आहेत. सीतामाई जेव्हा खरोखर ध्यानातून बाहेर आल्या तेव्हा जनक बाबांनी त्यांना विचारले, “असं काय झालं की, तू ध्यानातून बाहेर येऊ शकलीस?”

सीतामाई सांगितले की, कुठली तरी प्रेमाची शक्ती माझ्या जवळ आली आणि त्या प्रेमाच्या शक्तीने मला ध्यानातून बाहेर आणले. जनक बाबा समजून गेले की, आता कन्येच्या स्वयंवराची वेळ आली आहे. पण सीतामाईने निश्चय केला होता की, त्यांना जाणवलेली प्रेमाची शक्ती ज्या राजकुमाराकडे आहे, त्याच्याशीच विवाह करेन.
जनक बाबांनी स्वयंवराची घोषणा केली आणि त्यासाठी एक पण ठेवला होता. जनक बाबांकडे जे महादेवाचे धनुष्य होते, ते जो कोणी उचलून त्याला प्रत्यंचा लावेल त्याच्याशी सीतामाई विवाह करतील. ते धनुष्य परशुरामाचे होते. ते केवळ पिढीजात सांभाळण्यासाठी होते आणि ते धनुष्य जनक बाबांकडे होते. लहानपणी एकदा सीतामाई खेळत असताना त्यांचा चेंडू धनुष्याजवळ पडला होता. तेव्हा सीतामाईने एका हाताने धनुष्य उचलून त्याच्या खालचा चेंडू काढून घेतला होता. ते पाहून जनक बाबा आणि सुनयना माता खूप आश्चर्यचकित झाले होते. आंतरिक शक्तीच्या जोरावर कितीतरी भौतिक शक्तीची कामे केली जातात.

स्वयंवराचा दिवस उजाडला त्या दिवशीदेखील सीतामाई शेतात गेल्या. जमिनीवरची माती हातात घेऊन मीनाक्षीला म्हणाल्या की, ही धरती माता किती आपल्यावर प्रेम करते… बोलता बोलता सीतामाई अचानक थांबल्या. त्यांना ध्यानात जाणवलेली प्रेमाची शक्ती आसपासच कुठेतरी असल्याचा भास झाला. शेतात दूरवर एक रथ उभा होता. त्यातून दोन राजकुमार खाली उतरले. सीतामाईने शेतकऱयाला विचारले, “कोण आहेत हे?” शेतकरी म्हणाला की, हे अयोध्येचे राजकुमार आहेत. अशा रीतीने कथेत राम आणि लक्ष्मण यांचा प्रवेश होतो.

स्वयंवरासाठी संपूर्ण मिथिला नगरी सज्ज होत होती. सीतामाई मीनाक्षी आणि सोमाबरोबर पार्वती मातेच्या मंदिरात गेल्या. त्या वेळेस त्यांच्याबरोबर त्यांची धाकटी बहीण उर्मिला आणि अजून दोन दासी होत्या. त्या दोन दासी म्हणजे उषा आणि रोहणा. तिथे गेल्यानंतर पूजा करत असताना सीतामाईंना तीच प्रेमाची शक्ती पुन्हा जाणवली. त्या मंदिरात राम-लक्ष्मण दोघेही आलेले होते. सगळ्याजणी मागे वळून रामजीकडे बघतात. ते भव्य रूप, दैदिप्यमान कांती यामुळे कोणालाही त्यांना पाहता आले नाही. फक्त सीतामाई ते रूप बघू शकत होत्या. सोमाच्या मनात आले की, मी हे का बघू शकत नाही? सोमाच्या मनातली प्रत्येक गोष्ट सीतामाईंना न सांगता कळत असे. त्या सोमाला म्हणाल्या, “सोमा, कांतीच्या पलीकडे बघायचा प्रयत्न कर.” त्यानंतर सोमा रामजींकडे थोडेफार बघू शकली. रामजी पण सीतामाईंना पाहून हीच नारायणी शक्ती आहे, जिच्याशी एकरूप व्हायची वेळ आली असल्याचे समजून गेले.

त्यानंतर घडेलेली सीता-स्वयंवराची गोष्ट सगळय़ांना माहीत आहे. राम स्वयंवराचा पण जिंकतात.

जेव्हा रामजी आणि सीतामाईंचा विवाह निश्चित होतो, तेव्हा जनक बाबा रामजींना जवळ बसवून मिथिलेतील स्वशासनाची माहिती देतात. अयोध्या भौतिक दृष्टीने खूपच समृद्ध आहे, पण मिथिला आंतरिक ज्ञानाने परिपूर्ण आहे हे ते रामजींना सांगतात. हा केवळ रामजी आणि सीतामाईंचा विवाह नाही, तर हा अयोध्या आणि मिथिला यांचा विवाह आहे. म्हणजेच शक्ती आणि आंतरिक शक्ती यांचे मीलन आहे. ही एक काळाची गरज आहे की, अयोध्येत आता मिथिलेतील ज्ञानाचा वापर व्हावा.
बघा, आजच्या काळातदेखील आपण कितीही ज्ञानी आणि शक्तिमान असलो, सर्व प्रकारच्या कामात अव्वल असलो तरी जोपर्यंत आपण आपल्या आंतरिक शक्तीशी परिचित होत नाही तोपर्यंत खऱया दृष्टीने विजय मिळवू शकत नाही. काम व ाढाsधरूपी रावण आपल्याला छळतच राहतात …आणि सीतामाई आपल्याला शिकवतात की, आंतरिक शक्ती ध्यानाने वाढवता येते.

जनक बाबांना हेही माहीत होते की, संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी राम आणि सीतामाईंचा विवाह होणे खूप गरजेचे आहे. जनक बाबांकडे जेवढे ज्ञान होते ते सर्व त्यांनी सीतामाईंना दिले होते. ते राम यांना सांगतात की, तुम्हा दोघांना प्रेमाचा खरा धर्म या जगात प्रस्थापित करायचा आहे.

vrishali.sathe@gmail.com

सृजन संवाद – राम जन्मला गं सखे…

सामना ऑनलाईन

>> डॉ. समिरा गुजर जोशी

राम नवमीचा आनंद आपण सारे साजरा करत आहोत. राम जन्माचा हा उत्सव साजरा करत असताना वाल्मीकी रामायणात त्यामागे दडलेल्या कारणाविषयी जे सांगितले आहे त्याकडेही एक नजर टाकू.

दशरथ राजाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करण्याचे ठरवले. त्यासाठी ऋषुशृंग मुनींना पाचारण करण्यात आले हे आपण जाणतोच. हा यज्ञ करण्यासाठी एक संपूर्ण नगर किंवा यज्ञ-वाटिका उभी करण्यात आली होती. ज्यात देशोदेशीचे राजे, विद्वान, ऋषि-महर्षि येऊन राहिले होते. त्यांच्यासाठीची व्यवस्था पाहता आजच्या काळातील ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ खरे तर तेव्हापासून आहे असेच म्हणावेसे वाटते. त्याविषयी आपण स्वतंत्रपणे समजून घेऊया. पण याच भव्य संमेलनात आणखी एक अदृश्य संमेलन सुरू होते. हे संमेलन अदृश्य होते, कारण ते देवांचे संमेलन होते. त्यांच्यासमोर उभ्या एका गंभीर प्रश्नाची चर्चा करण्यासाठी ते जमले होते. ही समस्या म्हणजे रावणाचा वध करणे. सहसा रावणाला शिवाने वर दिल्याचे आपण ऐकत आलो आहोत. पण रामायणात बालकांडामध्ये ब्रह्मदेवाने रावणाला अमर होण्याचा वर दिला असे सांगितले आहे. याच संदर्भात सगळे देव चिंता व्यक्त करत आहेत की, या वरामुळे रावण उन्मत्त झाला आहे. ब्रह्मदेवही तेवढेच चिंतित आहेत. ते म्हणतात की, “मी त्याला आधीच सांगितले होते की कोणीही अमर होऊ शकत नाही. तरीही त्याने आग्रह धरला तेव्हा मी त्याला गंधर्व, यक्ष, राक्षस आणि देव यांना तो अवध्य असेल असे वचन दिले. असे मी करायला नको होते हे खरे. पण यावर एक उपाय मला दिसतो आहे. रावण अहंकारी असल्यामुळे क्षुद्र मानव आपले काही बिघडवू शकेल असे त्याला वाटले नाही. या वरामध्ये तो मानवाकडून अवध्य आहे असे म्हटलेले नाही. तेव्हा मानवाला त्याचा वध करता येईल.” मग भगवान विष्णु ही जबाबदारी स्वीकारतात. दशरथ राजाचे चार पुत्र हे विष्णुचेच अंश असतील असे ठरते. इतकेच नव्हे तर विष्णुच्या ह्या मानवरूपाला सहकार्य करतील असे वानर सैन्यसुद्धा जन्मास घालण्याचे ठरते. म्हणजे एक अख्खी जनरेशन या निमित्ताने तयार होते असे म्हणूया.

वाल्मीकी रामायणात सांगितलेली ही गोष्ट पुढे जनमानसात कसे रूप घेते ते पाहू. तर गंमत ही की, रावणाला मिळालेल्या वरामध्ये मानवाचा समावेश नाही असा उल्लेख आहे. पण लोक परंपरेमध्ये नर आणि वानर या दोघांना रावणाने वगळले, असे म्हटले आहे. नर आणि वानर एकत्र ऐकायलाही छान वाटते आणि कथेला धरूनही आहे. असा हा थोडासा बदल झालेला दिसला तरी गोष्टीचे तात्पर्य आजही लक्षात घेण्यासारखे आहे. शत्रूला underestimate करू नये. म्हणजेच गौण लेखू नये. नर किंवा वानर यांना दुबळे समजण्याची चूक झाली आणि तीच रावणाच्या नाशाचे कारण ठरली.

एकनाथ महाराजांनी ही कथा थेट न सांगता एका वेगळ्या प्रकारे तिचा समावेश केला आहे. त्यांच्या भावार्थ रामायणात दशरथ कौसल्या राणीला डोहाळे विचारतो आहे. तेव्हा कौसल्या राणी जणू भ्रमात असल्याप्रमाणे काही बडबडते. ती म्हणते,

म्हणे मी अवघा राम। मज माजी तव कैचा भ्रम?
अवतरलो पुरुषोत्तम। देवांचे श्रम फेडावया।।
मी नव्हे स्त्राr ना पुरुष। नर वानर वा राक्षस।।
ईशाचा जो निज ईश। परम पुरुष श्रीराम ।।

दशरथ गोंधळून जातो की ही असे का बोलते आहे? तो तिला विचारतो की, का असे बोलते आहेस? आपल्या लग्नाच्या वेळी तो उन्मत्त राक्षस रावण त्याने त्रास दिला होता, त्याची आठवण तुला होते आहे का?

रावण हे नाव ऐकताच कौसल्या राणी चवताळून उठते… म्हणू लागते, दे दे धनुष्य बाण. करू लंकेचे निर्वाण… तिचा रुद्रावतार पाहून दशरथ राजा गोंधळून जातो. पण आता जणू कौसल्या राणी नव्हे तर तिच्या पोटातील श्रीराम पुढील भविष्यवाणी करत आहेत.

एकनाथांनी हा प्रसंग सुंदर रंगवला आहे. मूळ वाल्मीकी रामायणात देवांच्या सभेत जी रावणवधाची योजना निश्चित करण्यात आली तीच इथे डोहाळ्याच्या रूपाने सांगण्यात आली.

`गर्भाचे आवडी मातेचा डोहळा।’ असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. जिजाऊ मांसाहेबांनासुद्धा युद्ध करण्याचे, घोडय़ावर स्वार होण्याचे डोहाळे लागले होते म्हणतात. पुढे सीतेला वनात जायचे डोहाळे लागले होते ना!

रामजन्म ही भारतीय मनाला प्रेरणा देणारी घटना आहे. तिची नित्यनवी रूपे प्रतिभावंतांना खुणावत असतात. म्हणून आज ही कौसल्या मातेच्या डोहाळ्यांची गोष्ट सांगाविशी वाटली. सज्जनांचा विश्राम असणारे प्रभू श्रीराम असेच आपल्याला प्रेरणा देत राहोत.

samira.gujar@yahoo.com
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)

सृजन संवाद – रावणाची कुळकथा

सामना ऑनलाईन

>> डॉ. समिरा गुजर जोशी

रावणाची कुलपरंपरा काय? याविषयी उत्तरकांडामध्ये चर्चा येते. रावण स्वतला पौलत्स्य म्हणवत असे. ते पुलत्सी हे ब्रह्मर्षी होते. रावण तर बोलून चालून राक्षस होता. त्याचे ह्या ब्रह्मर्षीशी नाते कसे संभवते ह्याचा उलगडा उत्तरकांडात होतो. पुलत्सी ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी तृणबिंदू नावाच्या विद्वानाच्या आश्रमात जाऊन राहू लागले.

सकृतदर्शनी ज्ञानाचा विस्तार करण्याकरता नवे आश्रम काढण्यासाठी मेरुपर्वताच्या पायथ्याशी जाऊन त्यांनी आश्रम स्थापन केला होता. हा मेरुपर्वत आफ्रिकेत सध्याच्या टांझानियामध्ये आहे. त्याचे नाव आजही मेरू असेच आहे. तिथे तृणबिंदू नावाचा कोणी विद्वान एक आश्रम आधीपासून चालवत असे. त्याच्याबरोबर हे पुलत्सी राहिले. या तृणबिंदूला एक कन्यका होती. पुलत्सी मुनी आपल्या अभ्यासात मग्न असायचे. तेथील ऋषिकन्यकांना नवीन आलेली व्यक्ती म्हणून पुलत्सींबद्दल कुतूहल होते. त्यात तृणबिंदूंची कन्यका होती. पुलत्सी अभ्यासात गढलेले असताना, ते वेदांचे पठण करत असताना ती ऐकत उभी राही. तिचे पुलत्सींकडचे आकर्षण वाढते आहे, हे लक्षात आल्यानंतर तृणबिंदूंनी स्वतच पुढाकार घेऊन पुलत्सींना विनंती केली की, `आपण मुद्दाम येथे आला आहात. आपण माझ्याकडून भिक्षा म्हणून माझ्या या गुणवान मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार करा.’ अशा रीतीने पुलत्सी आणि तृणबिंदूंची कन्यका यांचा विवाह झाला. नंतर त्यांना मुलगा झाला. त्यांचा संसार चांगला झाला. एका बाजूला तृणबिंदूंच्या मुलीच्या पोटात असताना पुलत्सींचे वेदमंत्र हा मुलगा ऐकत असे. त्याचे नावच आपण विश्रवा म्हणजे ज्याने वेद ऐकले असे ठेवू असे त्यांनी ठरविले. तो नंतर ऋषिपरंपरेप्रमाणे व्रतस्थ होऊन वडिलांप्रमाणेच मोठा तापसी झाला. पुढे तो विवाहयोग्य झाल्यानंतर भारद्वाज ऋषींनी त्यांच्या देववर्णिनी नावाच्या कन्येशी त्याचा विवाह करून दिला. म्हणजे एका बाजूस पुलत्सींची व भारद्वाजांची ऋषिपरंपरा, त्यात राजर्षी तृणबिंदूंची कन्या ही विश्रवाची आई, तिचा अंश येऊन मिळाला. त्या विश्रवाचा मुलगाही सर्व ब्रह्मगुणांनी व तेजाने संपन्न होता. विश्रवाचा मुलगा म्हणून तो वैश्रवण या नावाने ओळखला जातो. आजच्या आपल्या परिभाषेमध्ये तो धनाध्यक्ष म्हणजे वित्तसंस्थेचा प्रमुख होईल अशी भविष्यवाणीच विश्रवाने केली. (गणपतीपुढे आपण मंत्रपुष्पांजली म्हणतो त्यात “कामकामाय मह्यं वैश्रवणो ददातु’ असे म्हणतो. तिथे वैश्रवण म्हणजे कुबेर असा अर्थ होतो. कुबेरदेखील वैश्रवण आहे, कारण तो त्याच कुळातील आहे.)

वैश्रवणाने कठोर तप केले. त्याला इंद्र-वरुण-यम यांच्याप्रमाणे लोकपाल व्हायचे होते. त्याला ब्रह्मदेवाने वर दिला की, तू चौथा लोकपाल होशील. तू अक्षय निधीचा स्वामी होशील. त्याला त्यांनी प्रसिद्ध असे पुष्पक विमानही भेट दिले. या वराने तो आनंदित तर झाला, पण त्याच्या मनात नव्या संकल्पांचा जन्म झाला. त्याला असे वाटले की, आता मी एक नवी वस्ती वसवावी. एक अशी जागा जिथे सगळ्यांना सुख मिळेल. कोणीही दुःखी नसेल. त्याच्या वडिलांनीच त्याला सुचवले की, `तू लंकेत जा आणि तुझे हे कार्य साकार कर. तिथे पूर्वी राक्षस राहायचे. पण भगवान विष्णूंनी त्यांना तेथून हुसकावले आहे. आता लंका ओसाड आहे. तिथे जाऊन तू तिला समृद्ध कर.’ त्याप्रमाणे त्याने केले. तो पुष्पक विमानात बसून आपल्या आई-वडिलांना भेटायला मेरू पर्वताच्या प्रदेशात पुन: पुन्हा जात असे याचाही उल्लेख आहे. त्या विश्रवाचे खरेतर एक लग्न झाले होते, त्यातून त्याला असलेला मुलगा म्हणजे कुबेर. पण कैकसी या राक्षस कन्येचा त्याला उतारवयात मोह पडला. (लंकेत पुन्हा शिरकाव व्हावा म्हणून राक्षसांनी तिला मुद्दाम पाठवले होते.) त्याने तिच्याशी विवाह केला. यातून राक्षसी संतती निर्माण होईल याची त्याला भीती होती, पण मोहाचे पारडे जड ठरले. या विवाहातून त्याला दशग्रीव अर्थात रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा आणि बिभीषण ही अपत्ये झाली.

पुढे दशग्रीव मोठा झाल्यावर त्याच्या आजोळच्या मंडळींनी त्याच्या मनात कुबेराविषयी कटुता निर्माण केली. तेव्हा मोठा असल्याने लंकेवर कुबेराचे राज्य होते. रावण `मी राक्षस असल्याने इथला मूळ रहिवासी आहे, म्हणून मला राज्य दे,’ असे म्हणू लागला. तेव्हा कुबेर वडिलांकडे सल्ला मागायला गेला. तोवर रावण इतका बलाढय़ झाला होता की कुबेराला वडिलांनीही सांगितले की तू लंका सोड आणि हिमालयाच्या बाजूला जा. त्यामुळे युद्ध न करता रावण लंकापती झाला. त्याने कुबेराचे पुष्पक विमानही बळकावले. (रावणावर विजय मिळवून त्याच विमानात बसून राम अयोध्येत आले तेव्हा त्यांनी ते विमान लंकेला परत पाठविले नाही, तर कुबेराला परत केले, असा उल्लेख रामायणात येतो तो याच कारणामुळे!)

अशाप्रकारे रावण पुलत्सीच्या कुळातील, कुबेराचा सावत्र भाऊ असून असा राक्षसी कसा याचे उत्तर आपल्याला उत्तरकांडात सापडते.

(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)

































 

 

भारतीय ज्ञान परंपरा

 

मूळ भाषण – डॉ. गौरीताई माहुलीकर | मराठी अनुवाद – दिपाली पाटवदकर 

डॉ. गौरी माहुलीकर (gauri.mahulikar@cvv.ac.in) या मुंबई विद्यापीठातील माजी संस्कृत विभाग प्रमुख होत. सध्या डॉ. माहुलीकर चिन्मय विश्वविद्यापीठ, केरळ येथे डीन आहेत. त्यांनी ‘पुराण मंत्र आणि विधींमध्ये वैदिक घटक’ या मध्ये डॉक्टरेट मिळविली आहे. त्यांनी इंग्रजी, मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषेमध्ये सात पुस्तके आणि ९० हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले आहेत. डॉ. माहुलीकर अनेक पुरस्कारांनी विभूषित आहेत. त्यांना ‘प्राचीन ग्रीक नाटक आणि भरताचे नाट्यशास्त्र’ या प्रबंधासाठी मॅनकेजी लिम्जी सुवर्णपदक; संस्कृतच्या प्रसारासाठी कॅनेडियन एज्युकेशन फाउंडेशनचा ‘रामकृष्ण पुरस्कार’; कलासदन, मुंबईचा ‘गुरु गौरव पुरस्कार’; महाराष्ट्र राज्य शासनाचा ‘कविकुलगुरु कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’; कांची कामकोटी पीठाचा ‘आदि शंकराचार्य पुरस्कार’; मुंबई विद्यापीठाचा ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’; आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणेचा ‘इंदिरा बेहेरे पुरस्कार’ आदि मिळाले आहेत. ‘भारतीय ज्ञान संस्था’ या विषयावर डॉ. माहुलीकर यांची एक अभ्यासपूर्ण व्याख्यानमाला चिन्मय विश्वविद्यापीठाच्या अंतर्गत चालू आहे. त्या मालेतील ‘भारतीय ज्ञान संस्था’ ची ओळख करून देणाऱ्या त्यांच्या व्याख्यानाचा हा मराठी अनुवाद. 

कैक रूढी, चालीरीती परंपरागत चालत आलेल्या असतात. त्या कुठेही लिहून ठेवलेल्या नसतात. ग्रथित केलेल्या नसतात. काही पारंपारिक ज्ञान मात्र सूत्र रूपाने, सिद्धांत रूपाने ग्रथित केले आहे. त्या ग्रंथांमधून विविध शास्त्र, विज्ञान किंवा तत्त्वज्ञान सांगितले आहे. या ग्रंथबद्ध ज्ञानाला ‘भारतीय ज्ञान संस्था’ (Indian Knowledge System) असे म्हटले जाते. ही ज्ञान परंपरा अतिशय प्राचीन आहे. आणि तिचा ओघ अखंड वाहत आहे. अशा ज्ञान परंपरा इतरही प्राचीन संस्कृतींमध्ये होत्या. जसे इजिप्त, सुमेरियन, ग्रीक, बेबिलोनियन, पर्शियन इत्यादी. मात्र त्या परंपरा काळाच्या ओघात व आक्रमणांच्या माऱ्यात नष्ट झाल्या. भारतीय ज्ञान परंपरा मात्र अनेक आघात सहन करून सुद्धा आजही टिकून आहे. त्या अर्थी त्यामध्ये निश्चितपणे काही शाश्वत असे तत्त्व असणार. तसे नसते तर ते ज्ञान हजारो वर्ष टिकले नसते. ते ज्ञान टिकले तर आहेच पण विशेष असे की ते आजही वाचावेसे वाटते. त्या अर्थी ते नित्यनूतन आहे. प्रत्येक वाचनात त्यामधील काही नवीन अर्थ कळतो.

भारतीय ज्ञानाचा आवाका पाहतांना आपण सुरुवात करतो ती वैदिक वाङ्मयापासून. याला ‘श्रुती’ वाङ्मय पण म्हटले जाते. त्याचे कारण असे की हे वाङ्मय लेखन व वाचनासाठी नाही, तर पठण व श्रवणासाठी आहे. हा मौखिक ज्ञानाचा ठेवा गुरु-शिष्य परंपरेने वेगवेगळ्या पद्धतीने गायन करून, पठण करून जपून ठेवला. जटा, रेखा, दंड, शिखा, घन आदि विविध प्रकारे वैदिक मंत्रांच्या पाठांतराच्या पद्धती विकसित केल्या होत्या. हे मंत्र व ऋचा कवीने ‘रचलेल्या’ नाहीत. तर ते मंत्र ऋषींना ‘दिसले’ व तसे त्याने गायले. ऋषी या मंत्रांचे कर्तृत्व स्वत:कडे घेत नाहीत. या कारणास्तव वेदांना ‘अपौरुषेय’ पण म्हणतात. वेदांचे अजून एक विशेष असे आहे, की ते जगातील सर्वात प्राचीन वाङ्मय आहे.

ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद असे चार वेद असून प्रत्येकात चार प्रकारचे वांग्मय आहे – संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. प्रत्येक वेदाच्या अनेक संहिता आहेत. प्रत्येक संहितेत अनेक मंडळे, अनुवाक किंवा कांड आहेत. त्यात प्रत्येकात अनेक सूक्त आहेत. प्रत्येक सूक्तात अनेक मंत्र आहेत. आणि प्रत्येक मंत्राचे वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळे अर्थ लावले आहेत! अनेक ब्राह्मण ग्रंथातून वैदिक संहितेचा विस्तार आला आहे. कथा आल्या आहेत. त्या शिवाय सर्व वेदांमध्ये मिळून शेकडो उपनिषदे आहेत. उपनिषदांना ‘वेदांत’ अशीही संज्ञा आहे. वेदांचा ‘अंतिम’ भाग म्हणून वेदांत. किंवा वेदांचा ‘परम’, ‘उच्च’ किंवा ‘शीर्ष’ भाग म्हणूनही  त्यांना वेदांत असे म्हटले आहे.

वेद कळण्यासाठी लिहिलेल्या साहित्याला वेदांग म्हटले आहे. ही ६ अंग आहेत – शिक्षा, निरुक्त, व्याकरण, छंद, कल्प व ज्योतिष. या मधून उच्चारण शास्त्र (Phonology, Phonetics), शब्दांची उत्पत्ती (Etymology), वाक्यांची रचना (Grammar), काव्याची रचना (Prosody) यांचे शास्त्र सांगितले आहे.  तसेच कल्प सूत्रांमधून यज्ञाचे Instruction Manual व ज्योतिष मधून दिशा व काल या संबंधीची माहिती दिली आहे.

वेद शब्द प्रमाण मानणारे ६ दर्शने आहेत  – सांख्य, न्याय, वैशेषिक, योग, पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा. या दर्शनांचा पण वैदिक साहित्यात समावेश होतो.

वेदांग व दर्शने सूत्ररुपात संक्षिप्तपणे लिहिली आहेत. सूत्रे ही कमीतकमी शब्दात रचलेली असल्याने कळायला अवघड असतात. त्यामुळे त्यांचे विवरण करून त्यावर भाष्य लिहिणे पुढील काळात आवश्यक झाले. उदाहरण घ्यायचे झाले तर – दहा उपनिषदांवर आदि शंकराचार्यांनी भाष्य लिहिले आहेत. किंवा ब्रह्मसूत्रावर कैक तत्त्वचिंतकांनी भाष्य लिहिले आहे. जसे आदि शंकरांचे शारीरकभाष्य, रामानुजंचे श्रीभाष्य, वल्लभाचार्यांचे  अणुभाष्य. आपापल्या द्वैत, अद्वैत आदी मतानुसार लिहिलेली ही भाष्ये आहेत. अशा प्रकारचे भाष्य साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

स्मृती साहित्यात – इतिहास, पुराण, धर्मशास्त्र आदि विषय येतात. ऋषींनी सांगितलेले ज्ञान लक्षात ठेवून, आठवून लिहिले म्हणून त्यांना ‘स्मृती’ ग्रंथ म्हटले जाते. इतिहास, अर्थात ‘हे असे घडले’ सांगणारे ग्रंथ आहेत – रामायण व महाभारत. तसेच पुराणांमधून प्राचीन काळी घडलेल्या गोष्टींची माहिती येते. कालानुरूप पुराणांमध्ये नवी नवी माहिती लिहिली गेली. कैक पुराणात अगदी १९ व्या  शतकात देखील माहिती लिहिली आहे. महाभारतात व्यास म्हणतात – वेद कळण्यासाठी इतिहास व पुराणे वाचावीत. कारण त्यामधून वेदांनी जे प्रतिपादित केले आहे तेच अधिक सोपे करून कथा रूपाने सांगितले आहे. वेद फार प्राचीन काळी लिहिले असल्यामुळे त्या मधील संस्कृत जुन्या वळणाचे आहे. जसे १३ व्या शतकातील मराठीत लिहिलेली ज्ञानेश्वरी आज वाचायला अवघड वाटते. तसेच वेदांची भाषा संस्कृत असली तरी ती जुनी असल्याने कळायला अवघड जाते. या करिता सामान्य माणसाला वेद समजावेत म्हणून इतिहास – पुराणे यांची रचना केली गेली. स्मृती काळात इतरही अनेक शास्त्रीय ग्रंथ लिहिले गेले. त्यामध्ये – अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, कामशास्त्र, नाट्यशास्त्र, वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र, पाकशास्त्र, खगोलशास्त्र, मयमत, समरांगणसूत्रधार, बृहतसंहिता आदि अनेक ग्रंथ लिहिले गेले. यामधून Botany पासून Arithmetic पर्यंत; Political Sciences पासून Taxation पर्यंत आणि Cusines पासून Dramatics पर्यंत विविध विषयांवर अभ्यासपूर्ण शास्त्रीय ग्रंथ आहेत.

श्रुती व स्मृती नंतर आपण पाहतो अभिजात संस्कृत मधील ग्रंथ निर्मिती. यामध्ये काव्य व नाटकांचा समावेश होतो. आदि कवी वाल्मिकी यांच्या कडून प्रेरणा घेऊन अनेक कवींनी नवीन काव्य निर्माण केले. त्यामध्ये इस पूर्व तिसऱ्या शतकातील भासाची नाटके, जी काळाच्या पडद्याआड हरवलेली होती, ती २०व्य शतकात अतिशय नाट्यपूर्ण पद्धतीने पुन्हा प्रकाशात आली. त्यामध्ये – प्रतिमानाटक, कर्णभार, उरुभंग, स्वप्नवासवदत्त आदि १३ नाटके आहेत. भासाच्या नंतरचा महाकवी म्हणजे कालिदास! कालिदासाने लिहिलेली मेघदूत, कुमारसंभव, रघुवंश आदि ७ मधुर काव्य. विशाखदत्त, श्रीहर्ष, बाणभट्ट, माघ, राजशेखर, दंडी अशी कवींची एक मोठी साखळी आहे. यांनी विविध प्रकारचे दृश्य व श्रव्य काव्य निर्माण केले. नाटक, प्रकरण आदि अनेक प्रकारची नाटके. गद्य, पद्य व चम्पू प्रकारातील महाकाव्य, व खंडकाव्य. ही काव्य निर्मितीची मालिका भर्तृहरीचे शतकत्रय, जयदेवाचे गीतगोविंद, १६ व्या शतकातील जगन्नाथ पंडिताचे गंगालहरी पर्यंत चालू राहते. ही परंपरा आजही अखंड चालू आहे. आजही नवनवीन संस्कृत नाटक लिहिले जाते व रंगमंचावर सदर केले जाते.

या ज्ञान परंपरेत आणखी एक कप्पा आहे – सुभाषित व स्तोत्रांचा. सुभाषित, कूट प्रश्न, प्रहेलिका हा संस्कृत साहित्यातील मोठा गंमत आणणारा प्रकार आहे. सुभाषितांमध्ये अगदी दोन – चार वाक्यात एक वैश्विक सत्य एखादे दृष्टांत देऊन शिकवले असते. कूट प्रश्नात – एक पद देऊन संपूर्ण श्लोक निर्माण करायचे challenge दिले असते. तर प्रहेलिकांमध्ये कोडे घातले असते. अशा प्रकारची कोडी सोडवणे, सुभाषिते पाठ करणे हे विद्यार्थांचे रिकाम्या वेळातील खेळ होते.

भारतीय ज्ञानाच्या या मोठ्या खजान्याचा पेटारा कुलूपात बंद आहे. त्याची किल्ली आहे संस्कृत भाषा! ती भाषा शिकली की हा मोठा खजाना सहज हाताला लागणार आहे! हे साहित्य संस्कृत भाषेत असून ते वेगवेगळ्या लिपींमध्ये बद्ध केले आहे. काश्मीरचे संस्कृत साहित्य शारदा लिपी मध्ये लिहिले गेले. केरळ मध्ये संस्कृत साहित्य मल्याळम लिपीत लिहिले गेले. तर मध्य भारतातील संस्कृत साहित्य देवनागरी लिपीत लिहिले गेले. तस्मात जुने साहित्य वाचायला जशी संस्कृत भाषा येणे गरजेचे आहे, तसेच विविध लिपी सुद्धा वाचता येणे पण आवश्यक आहे. या दोन गोष्टी आत्मसात केल्या की भारतीय ज्ञानाचा खजाना प्रत्येकासाठी खुला आहे! 

 

 

 

 

 

 

 

 

राम आणि रावण नेतृत्व चिकित्सा

 https://kalaapushpa.com/2021/04/13/leadership_rama_ravana/

दैनिक सकाळच्या ‘अयोध्या पर्व’ या १२ एप्रिल २०२१ मध्ये पूर्व प्रसिद्ध लेख

नेतृत्व आणि नेता  

नेतृत्व करणे म्हणजे मार्ग दाखवणे. दिग्दर्शन करणे. संकटाचा सामना करायला अग्रणी असणे. समाजाचे नेतृत्व कोण करू शकतो? तर जो अधिकाधिक लोकांना आपल्या वक्तृत्वाने आणि कर्तृत्वाने प्रभावित करू शकतो तो. जो उत्तम योजना तयार करू शकतो, योजना उत्तम रीतीने व शीघ्र गतीने राबवू शकतो, तज्ञांचे मत विचारात घेतो, कुशल लोकांवर काम सोपवतो आणि सोपवलेल्या कामावर देखरेख ठेवतो तो. जो आपल्या अनुयायांशी सम्मानपूर्वक व्यवहार करतो, अनुयायांचे म्हणणे ऐकतो, जो आपल्या अनुयायांच्या मनात उत्साह व बल निर्माण करून त्यांच्या क्षमतेच्या पलीकडे वाटत असणाऱ्या गोष्टी करवून घेऊ शकतो तो. जो नीतीने वागतो, जो सामर्थ्यवान असतो, जो रागाच्या भरात निर्णय घेत नाही (responds not reacts), जो चारित्र्यवान असतो, ज्याने स्वार्थाचा त्याग केला असतो, जो बोलतो तसा चालतो, जो डगमगत नाही, जो लोकापवादाला घाबरतो तो. जो येणाऱ्या काळातील आव्हाने ओळखतो, जो लोकांना संघटीत करतो, असा मनुष्य समाजाचे नेतृत्व करू शकतो. रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काढलेले उद्गार एका उत्तम नेत्याचे गुण दर्शवतात –

निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी ॥
यशवंत, कीर्तिवंत । सामर्थ्यवंत, वरदवंत ।
पुण्यवंत, नीतिवंत । जाणता राजा ॥
आचारशीळ, विचारशीळ । दानशीळ, धर्मशीळ ।
सर्वज्ञपणे सुशीळ । सकळांठायी ॥
धीर, उदार, गंभीर । शूर क्रियेसी तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥
कित्येक दुष्ट संहारीले । कित्येकांस धाक सुटले ।
कित्येकांस आश्रयो जाले । शिवकल्याण राजा ॥

एका उत्तम नेत्याचे ठिकाणी, वरील पैकी बरेच गुण कमी अधिक प्रमाणात आढळतात. यातील काही नेतृत्वगुणांचा विचार राम व रावण यांच्या बाबतीत वाल्मिकी रामायणाच्या आधारे करूया.

|| सुशीळ ||

माणसाच्या चारित्र्याला किंवा शीलाला अनेक पैलू आहेत. जसे सत्यवचन, नीति, स्थिरबुद्धी, निर्मोहिता, सदाचरण, शिस्तप्रियता, संयम इत्यादी. अशा गुणांनी संपन्न असलेली व्यक्ती वाहवत जात नाही, क्षणिक मोहाला बळी पडत नाही, कोणत्याही प्रसंगी चांगलंच वागेल याविषयी इतरांच्या मनात खात्री असते. म्हणूनच २१व्या शतकात, अमेरिकेसारख्या प्रगत पाश्चिमात्य देशातील जनतेला सुद्धा शुद्ध चारित्र्याचाच राष्ट्रपती हवा असतो. राम आणि रावण यांच्या चारित्र्याचा एक पैलू  – परस्त्रीशी व्यवहार, हा रामकथेतून कसा उलगडतो ते पाहू.

रावणाविषयी त्याची बहिण शूर्पणखा म्हणते, “रावण हा परदार अभिमर्शनम् आहे”. अर्थात दुसऱ्यांच्या पत्नींकडे  आकर्षित होणारा, परस्त्रीयांचा विनयभंग करायला मागे पुढे न पाहणारा होता. हे जाणूनच ती रावणाला सांगते, “बंधो! त्या रामाची बायको फार सुंदर आहे. तू तिला बळजबरीने पळवून आणून तिच्याशी लग्न कर. तुझ्या सारख्या बलाढ्य राजाला अशी सुंदर राणी असायलाच हवी.” मंदोदरी सह अनेक स्त्रिया असलेल्या रावणाने आणखी एका सुंदरीची अभिलाषा मनात धरून सीतेचे अपहरण केले. तिला अशोकवाटिकेत राक्षसींच्या कडक पहाऱ्यात ठेवले आणि ताकीद दिली –

ऊर्ध्वं द्वाभ्यां तु मासाभ्यां भर्तारम् मामनिच्चतीम् | मम त्वां प्रातराशार्थमालभन्ते महानसे || ५-२२-९

जर एका वर्षाच्या आत माझ्याशी विवाह केला नाहीस तर तुला मारून, सकाळच्या न्याहारीला मी तुला खाईन.

त्याच काळातील रामाने मात्र एकपत्नीव्रत (One woman man) धारण केले होते. दंडकारण्यात असतांना त्याच्या मदनासारख्या रूपावर भाळून शूर्पणखा एका लावण्यवतीचे रूप घेऊन आली. तिने रामाला लग्नाची मागणी घातली. पण राम तिच्या रुपाच्या मोहात अडकला नाही. तो त्याच्या व्रतापासून ढळला नाही. त्याने शूर्पणखेला आपण एकपत्नीव्रत धारण केले असल्याचे सांगून तिच्या प्रस्तावाला नकार दिला. राम म्हणाला –

कृत दारो अस्मि भवति भार्या इयम् दयिता मम | त्वत् विधानाम् तु नारीणाम् सुदुःखा ससपत्नता || ३-१८-२

ही पहा, ही माझी प्रिय भार्या सीता. तुला का बरे माझ्याशी विवाह करून सवतीचे जिणे जगायचं आहे? ( नकोच ते! तू माझ्याशी लग्न करायचा विचार मनातून काढून टाक! )

राम आणि रावण या दोघांच्या आपल्या पत्नीशी व इतर स्त्रियांशी वर्तनातील हा फरकच राम-रावण युद्धाचे बीज ठरले हा एक भाग झाला. दुसरा असा की शुद्ध चारित्र्यामुळे, राजा नसून सुद्धा, रामाला केवळ अयोध्येतील नागरिकांनीच नाही तर वनवासींनी सुद्धा आपला नेता मानले. राम वनवासात जाणार म्हटल्यावर कित्येक अयोध्यावासी त्याच्या बरोबर जाण्यास निघाले. वनवासात असतांना कित्येक वनवासी आपल्या तक्रारी रामाकडे घेऊन आले. जटायू, शबरी, अगस्ती यांसारखे रामाशी काही संबंध नसलेले लोक स्वत:हून रामाच्या मदतीला आले.

रावणाला त्याच्या अनुयायांकडून असे उत्स्फूर्त प्रेम मिळाले नाही. मारीच आणि कुंभकर्ण हे त्याचे नातलग असून सुद्धा त्यांची मदत मिळवण्यासाठी रावणाला त्यांना धमकी द्यावी लागली होती. मारीचाने सीताहरणासाठी मदत करायला नकार दिला, तेंव्हा रावण म्हणाला – 

मृत्युर् ध्रुवो हि अद्य मया विरुध्यतः| ३-४०-२७

माझ्या सांगण्याच्या विरुद्ध गेलास तर तुझा मृत्यू निश्चित आहे  हे जाण!

अनुयायांनी ऐकावे यासाठी रावणाला त्याचा अधिकार वापरावा लागला. राम आणि रावण दोघेही नेतेच पण एकाचे नेतृत्व पुढाऱ्या सारखे तर दुसऱ्याचे मालकासारखे होते. (Leader & Boss)

|| बहुत जनांसी आधारू ||

राम – लक्ष्मण – सीता वनवासाच्या काळात दंडकारण्यात आले, तेंव्हा ते शरभंग ऋषींच्या आश्रमात गेले. तिथे अनेक ऋषीमुनींनी रामाला तेथील दुर्दैवी परिस्तिथी सांगितली. अरण्यातील जनतेवर राक्षस सारखा हल्ला करत त्या विषयी सांगितले. त्यांनी रामाला पंपा नदी काठी राक्षसांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या ऋषींच्या अस्थींचे ढीग दाखवले व म्हणाले आमचे या राक्षसांपासून रक्षण कर! रामाने त्यांचे आर्जव आज्ञेप्रमाण मानले व दुष्ट राक्षसांपासून त्यांचे रक्षण करण्याचे वचन दिले. बोलल्याप्रमाणे रामाने दंडकारण्यात असतांना अनेक नरभक्षक राक्षसांना यमसदनी पाठवले.

रामाने अनेकांना आधार दिला होता. रामायणाच्या सुरुवातीला विश्वामित्रांना देखील त्राटिकेच्या त्रासापासून सोडवण्यासाठी रामाची मदत मागितली होती. सुग्रीव आणि बिभीषणाला पण रामच आपल्याला आधार देऊ शकतो असे वाटले होते. आणि त्यांचा भाव रामाने सार्थ ठरवला होता.

रावणाच्या बाबतीत त्याच्यावर कोणी विश्वास ठेवला होता किंवा इतरंना त्याचा आधार वाटला होता असे दिसत नाही. उदाहरणार्थ – शूर्पणखा जेंव्हा रावणाकडे लक्ष्मणाची तक्रार घेऊन गेली तेंव्हा रावणाला काही तिचे नाक कापल्याचा सूड घ्यावा किंवा त्रिशिर, खर, दुषणाला मारल्याचा सूड घ्यावा असे वाटले नाही. पण शूर्पणखेने जेंव्हा “तुला सीतेसारखी सुंदर बायको असायला हवी” असे आमिष दाखवले तेंव्हा त्याने राम – लक्ष्मणाला फसवून दूर पाठवले व सीतेचे अपहरण केले. 

|| धीर, उदार, गंभीर ||

रामाचे वर्णन करतांना नारद मुनी वाल्मिकींना सांगतात –

स च सर्वगुणोपेतः कौसल्यानन्दवर्धनः | समुद्र इव गाम्भीर्ये धैर्येण हिमवानिव || १-१-१७

कौसल्येचा आनंद वाढवणारा राम सर्वगुणसंपन्न आहे. गांभीर्यात तो समुद्राप्रमाणे अथांग आहे, धैर्यात तो हिमालयासारखा अचल आहे आणि दानात तो कुबेरासमान आहे.

रावणाच्या शौर्याचे, धैर्याचे वर्णन सुद्धा रामायणात पदोपदी आले आहे. रावणाच्या मुलांचा आणि भावांचा युद्धात मृत्यू झाला तरीही रावणाने युद्धातून माघार घेतली नाही. तो धीराने रामाशी लढायला रणांगणात उतरला. महाभारतीय युद्धाच्या शेवटच्या दिवशी, दुर्योधन रणांगणातून पळून गेला व नदीत लपून बसला होता, हे लक्षात घेतले असता रावणाचे धैर्य कळते.

|| कित्येक दुष्ट संहारीले ||

रामाने संहार केला आहे तो दुष्टांचा, समाज कंटाकांचा. विश्वामित्रांच्या यज्ञात विघ्न आणणाऱ्या त्राटिकेचा. जनस्थानातील नरभक्षक राक्षसांचा. भावाच्या पत्नीचे हरण करणाऱ्या वालीचा. आणि शेवटी सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा.

रावणाने आधी केलेले एक युद्ध रामायणात येते ते कुबेराच्या विरुद्धचे. रावणाने स्वत:च्या मोठ्या भावाशी संघर्ष केला तो लंकेचे राज्य व पुष्पक विमान मिळवण्यासाठी. हा रावणाने केलेला संहार काही ‘दुष्टा’च्या विरुद्ध नव्हता. त्यामुळे रावणाच्या नेतृत्वाला हे विशेषण देता येत नाही.  

|| कित्येकांस आश्रयो जाले||

राम वनवासात निघाला तेंव्हा लक्ष्मण आणि सीतेने राजवाड्यातील सुखांना तिलांजली दिली व ते रामाबरोबर वनात गेले. भरत सुद्धा रामाबरोबर वनात जाऊन राहण्यास तयार होता. इतकेच काय, विभीषण सुद्धा आपला महाल सोडून रामाकडे आला. सुग्रीवाला पण रामाने आश्रय दिला.

रावणाकडे आश्रय घेतला होता तो मारीचाने. विश्वामित्रांच्या यज्ञात दगडांचा वर्षाव करून विघ्न आणणाऱ्या त्राटिकेला रामाने मारले त्यावेळी मारीच तिथून निसटला आणि त्याने रावणाकडे आश्रय घेतला होता. 

|| सामर्थ्यवंत ||

रामाचे सामर्थ्य मंदोदरीच्या शब्दातून सहज प्रकट झाले आहे –

कथन् त्रैलोक्यमाक्रम्य श्रिया वीर्येण चान्वितम् | अविषह्यन् जघान त्वं मानुषो वनगोचरः || ६-१११-६

मंदोदरी रावणाच्या पार्थिवा जवळ बसून म्हणते, “तुझ्यासारख्या त्रैलोक्यावर राज्य करणाऱ्या राजाला, वनात संचार करणाऱ्या एका य:कश्चित माणसाने युद्धात कसे काय हरवलं? अविश्वसनीय आहे ही घटना!”

हेच रामाचे ‘समर्थ’पण आहे. जटा वाढवून, वल्कले धारण करून, वनवासी जीवन जगणारा एक साधा माणूस. तो एका महाबलाढ्य प्रस्थापित राजाच्या विरुद्ध लढायला उभा राहतो. त्यासाठी मित्र मिळवतो, सैन्य जमवतो, समुद्रावर सेतू बांधतो आणि लढून जिंकतो सुद्धा! हे अचाट काम एक समर्थच करू शकतो.

|| सावधानता ||

सावधानता बाळगणारा नेता येणाऱ्या काळातील आव्हाने ओळखतो. सावधानता बाळगली नसता, काय होते ते रावणाच्या व्यवहारातून दिसते. हनुमान समुद्र उल्लंघून लंकेत येऊन सीतेला रामाचा निरोप देऊन जाता जाता लंका दहन करून गेला. तरीही रावणाला हे लक्षात आले नाही की त्याचा शत्रू सैन्यासह समुद्र ओलांडून त्याच्यावर हल्ला करू शकतो. रावण सुग्रीवाला निरोप धाडतांना म्हणतो –

न हीयम् हरिभिर्लङ्का प्राप्तुम् शक्या कथम् चन | देवैरपि सगन्धर्वैः किम् पुनर्नरवानरैः || ६-२०-१२

लंकेपर्यंत पोचता येणे केवळ अशक्य आहे. गंधर्वांना सुद्धा इथे पोचणे शक्य नाही, तिथे मानवांची आणि वानरांची की कथा?

रावण अशा भ्रमात राहिला आणि राम सेतू बांधून सैन्यासह लंकेत पोचला सुद्धा. लंकेत पोचल्यावर जिथे खायला भरपूर कंद-मूळ-फळ होती अशा ठिकाणी तळ ठोकला. आणि सैन्याच्या तुकड्या पाडून प्रत्येक तुकडीवर एक एक प्रमुख नेमून दिला!

|| श्रवण ||

भरत आणि राम, लक्ष्मण आणि राम, सीता आणि राम यांचे अनेक संवाद रामायणात आले आहेत. कसलीही भीड किंवा भीती न बाळगता त्यांनी आपले परखड मत रामाला स्पष्टपणे सांगितले आहे. अशा संवादातून त्यांच्यात होणारी विचारांची देवघेव वाचकाला सुद्धा समृद्ध करून जाते. या संवादातून राम किती लक्ष देऊन ऐकतो आणि त्यावर विचार करून शास्त्रांच्या आधाराने बोलतो हे लक्षात येते.

किंवा रामाचा अजून एक संवाद आहे विभीषणा बरोबर. युद्धाच्या आधी विभीषणाने रामाला रावणाची बलस्थाने सांगितली. त्याच्या कडच्या सैन्याची, हत्ती, रथ, पायदळाची संख्या सांगितली. कोणत्या प्रकारची शस्त्रे घेऊन कोणते वीर लंकेचे रक्षण करत आहेत हे सांगितले. रावण – कुबेर युद्धात रावणाचे सैन्य किती मोठे होते, त्याने कसा पराक्रम गाजवला हे रामाला सांगितले. हे ऐकून रामाने त्यावर विचार केला व त्यानुसार कोणत्या वानर वीराने लंकेवर कोणत्या बाजूने हल्ला करायचा याची योजना बांधली.

रावणाची बाबतीत मात्र अशी ऐकून घेण्याची वृत्ती दिसत नाही. जसेशुक आणि सारण हे रावणाचे दूत रावणाच्या सांगण्यावरून रामाच्या सैन्याची पाहणी करून येतात. आल्यावर ते रावणाला शत्रूची माहिती देतात. किती सैन्य आहे, कोण कोण सरदार आहेत, प्रत्येकाची नावे, त्यांच्याकडील  शक्ती कोणती, रामाने आत्तापर्यंत मारलेल्या राक्षसांची जंत्री, रामाच्या प्रचंड मोठ्या सैन्याची माहिती, रामाच्या बरोबरचे इतर योद्धे जसे – लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान, अंगद यांची माहिती ते दोघेजण रावणाला सांगतात. 

त्यांचा वृत्तांत ऐकून रावण संतापतो! आणि म्हणतो, “रामाने खर, दूषण आदी राक्षसांना मारले असेल, पण त्याने अजून माझे शौर्य पहिले नाही! माझ्या सारखा योद्धा संपूर्ण विश्वात नाही! ते असो, मी त्याला युद्धभूमीत पाहून घेईन. पण तुम्हा दोघांकडे मी आत्ताच पाहून घेतो!

न तावत् सदृशम् नाम सचिवैर् उपजीविभिः | विप्रियम् नृपतेर् वक्तुम् निग्रह प्रग्रहे विभोः || २-२९-७

तुमची उपजीविका माझ्यावर अवलंबून आहे, मी तुमचा राजा आहे, प्रभू आहे. असे असून तुम्ही माझ्याशी अशी कटू वाक्य बोलता?

माझ्या समोर येऊन शत्रूची स्तुती करताय हे तुम्हाला शोभते का? धिक्कार आहे तुमचा! माझ्याशी असे बोलायला तुमची जीभ रेटतेच कशी? तुम्हाला हे बोलतांना मृत्युचं भय नाही वाटलं? तुम्ही आत्तापर्यंत केले काम आठवून मी तुम्हाला मृत्युदंड देत नाही. चालते व्हा इथून, पुन्हा मला तुमच तोंड दाखवू नका!”

या आणि अशा अनेक प्रसंगातून नेता म्हणून रावणाची ऐकण्याची क्षमता कमी पडते असे दिसते. रावणाच्या मृत्यूनंतर रणांगणात आलेली मंदोदरी रावणाच्या पार्थिवाजवळ बसून म्हणते – मी तुला किती वेळा सांगितले की रामाशी वैर ओढवून घेऊ नकोस! सीतेला रामाकडे परत पाठव! पण तू ऐकले नाहीस! आज सीता रामाबरोबर आनंदात आहे, आणि  तुझ्या (न ऐकण्या) मुळे आम्ही सगळ्या (रावणाच्या पत्नी) मात्र दु:खसागरात लोटल्या गेल्या आहोत.

मारीचकुम्भकर्णाभ्यां वाक्यं मम पितुस्तथा | न श्रुतं वीर्यमत्तेन तस्येदं फलमीदृशम् || ६-१११-८०

रावणा! मारीच, कुंभकर्ण, विभीषण, माझे वडील आणि मी सुद्धा तुला सीतेला परत पाठवण्याबद्दल वारंवार उपदेश केला. पण तूला तुझ्या शक्तीचा अवास्तव गर्व नडला. तू कुणाचेही ऐकले नाहीस, आणि हाय आज आम्हावर शोक प्रसंग कोसळला!

ज्या रावणाने बायकोला पळवून नेले, ज्याच्याशी लढतांना लक्ष्मण मरता मरता वाचला होता, अनेक सैनिक धारातीर्थी पडले होते, अशा रावणाच्या मृत्यूनंतर मात्र राम – “मरणान्तानि वैराणि” असे सांगून बिभीषणाला रावणाचे अंत्यसंस्कार करायला सांगतो. एका नेत्याचे असे उदात्त विचार संपूर्ण समाजावर दीर्घकाळ संस्कार करणारे ठरले.

नेतृत्व कसे नसावे  

चांगल्या नेत्याचे जसे गुण सांगितले आहेत तसेच वाईट नेत्याचे गुण पण रामायणात सांगितले आहेत. शूर्पणखा रावणाला राम-लक्ष्मणाच्या जनस्थानातील कर्तृत्वा बद्दल सांगते तेंव्हा ती म्हणते –

अतिमानिनम् अग्राह्यम् आत्म संभावितम् नरम् | क्रोधिनम् व्यसने हन्ति स्व जनो अपि नराधिपम् || ३-३३-१६

जो राजा अति मानी असतो, ज्याच्याशी संपर्क साधणे संवाद साधणे कठीण असते, जो स्वत:मध्ये रमलेला असतो, जो संतापी असतो, तो राजा संकट कोसळले असता स्वत:च्याच नाही तर स्वजनांच्या नाशास सुद्धा कारणीभूत ठरतो. 

हे भविष्य रावणाने अखेर खरे करून दाखवले. युद्धात जसे राक्षसांचे एक एक वीर मारले जाऊ लागले, रावणाची मुले मारली गेली, तेंव्हा रावणाने कुंभकर्णाला बोलावून घेतले आणि सांगितले –

सर्वक्षपितकोशम् च स त्वमभ्युपपद्य माम् |त्रायस्वेमाम् पुरीम् लङ्काम् बालवृद्धावशेषिताम् || ६-६२-१९

आता तू एकटाच मला वाचवू शकतोस कुंभकर्णा! राज्याचा कोश रिकामा झाला आहे. युवा पिढी युद्धात धारातीर्थी पडली आहे. लंकेत आता फक्त बालकं आणि वृध्द राहिले आहेत. अशा परिस्तिथीत आता तूच लंकेचे रक्षण कर!

रावणाच्या नेतृत्वाने लंकेवर अशी परिस्तिथी ओढवली.

रामाच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या अयोध्येतील चित्र या विरुद्ध आहे. राम-रावण युद्ध अयोध्येपासून, किष्किंधेपासून दूर घडले आहे. त्यामुळे या दोन्ही नगरींना युद्धाची झळ लागली नाही. अयोध्येचा तर एकही सैनिक या युद्धात लढला नाही. अयोध्येला कसलीही तोशीस न लागता रामाने शेजारील राज्य असलेल्या किष्किंधा व लंकेत मित्र राजे स्थापन करून दोन देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोडले.

संदर्भ –

  • वाल्मिकी रामायण – English Translation from valmikiramayan.net
  • The Practical Sanskrit-English Dictionary – V S Apte
  • Two Special Leadership Qualities: Integrity & Fidelity – Darlene Richard