सोमवार, १८ डिसेंबर, २०२३

उपनिषदे (१)

 http://www.misalpav.com/node/36022

आपण दर्शनांवरील अनेक लेख वाचले आणि अनपेक्षित वाचकसंख्या व आपण दिलेल्या प्रतिसादांवरून मी तर अचंबितच झालो होतो. या तत्वज्ञानावरील लेखांना इतका वाचकवर्ग मिपासारख्या सदातरुण संस्थेत असेल असे कधी वाटलेच नव्हते. जर दर्शनांना वाचकवर्ग असेल तर त्यांची गंगोत्री असलेल्या "उपनिषदां चीही ओळख कां करून देऊ नये असे बरेच दिवस मनांत घोळत होते. पण हे शिवधनुष्य पेलणे सोपे नाही हे माहीत असल्याने थोडा नव्हे बराच साशंक होतो. शेवटी विचार केला, आपले मित्रच आहेत, माऊलींच्या शब्दात बोलावयाचे तर ही "बालमतीची चावटी "मानून गोड करून घेतील. असो सुरवात तर करू.

प्रास्ताविक

उपनिषद याचा अर्थ "जवळ बसणे". शिष्याने गुरूच्या पायापाशी श्रद्धेने बसून ज्ञान ग्रहण करणे म्हणजे उपनिषद. कशी सुरवात झाली याला ?
वेद वाङ्मयाचे चार भाग. संहिता, ब्राह्मण, उपनिषद आणि आरण्यक. "संहिता" मध्ये देवतांची स्तुती करणारे मंत्र असून "ब्राह्मण" वैदिक मंत्रांचा यज्ञात उपयोग कसा करावयाचा हे सांगतात. "आरण्यक" ग्रंथांत कर्म आणि उपासना यांची सांगड कशी घालावी हे सांगितले आहे. "उपनिषदे सृष्टीच्या मूलतत्वांसंबंधी शोध घेतात.

लेखन तीन विभागांत देणार आहे. (१) बहिरंग, (२) अंतरंग आणि (३) काही निवडक उपनिषदांची तोंडओळख

बहिरंग,
हा भाग तसा निरसच. पण ही माहिती डोळ्याखालून गेलेली बरी. अंतरंगाची व एकेका उपनिषदाची ओळख करून घेतांना या माहितीचा उपयोग होईल. .

इथे उपनिषदांचा काळ, संख्या, महत्वाची आणि कमी महत्वाची कोणकोणती, कोणत्या वेदाशी संबंधित आहेत, प्रणेते ऋषी कोण इ. माहिती प्रथम बघू. रचनेची पूर्वमर्यादा इ.स.पूर्व १२००. अल्लोपनिषद किंवा विक्टोरियोपनिषद अर्थात इ.स.एकोणविसाव्या शतकातील.. ही फालतूक सोडून देऊन फक्त तत्वज्ञान सांगणारी घेतली तर उत्तरमर्यादा इ.स.पूर्व ६००. विविध देवतांच्या उपासनेकरिता लिहलेल्या "अथर्वशीर्ष"आणि "तापिनी" ग्रंथांनाही उपनिषदे म्हणावयाची पद्धत आहे. ती येथे विचारात घेतली नाहीत. वेदांत गर्भस्त्रावणी व सपत्नीनाशन असली अभिचारक उपनिषदेही आहेत. सोडून देऊं श्रीसूक्त व श्री भगवद्गीता यांनाही उपनिषदच म्हणतात पण त्यांचाही विचार नको. तेव्हा काळ इ.स.पूर्व १२०० ते इ.स.पूर्व ६००.

वेदांत देवताप्रार्थना आहेत तर उपनिषदात देवता प्रसन्न करून घेऊन स्वर्गभोग मिळवण्याऐवजी अंतीम सत्य, त्याला आत्मज्ञान म्हणा किंवा ब्रह्मज्ञान म्हणा, ते शोधण्याचा प्रयत्न केला आहे. क्षणभंगूर सौख्यापेक्षा शास्वत अमृतत्व शोधण्याचा हा प्रयत्न आहे. वनवासातील एकांतात चिंतन करून ऋषींना जे भावले ते उपनिषदांत त्यांनी मांडले. त्यामुळे उपनिषदांमध्ये एकवाक्यता नाही. अंतिम ध्येय एक असले तरी तेथे पोचण्याच्या वाटा निरनिराळ्या. सर्व दर्शनांची गंगोत्री असलेल्या उपनिषदांमधील या विचारवैविध्यामुळे एकच अंतिम साध्य असलेल्या दर्शनांतही विविधता आली. वैदिक तत्वज्ञानाचे परिणत स्वरूप उपनिषत्साहित्यात आढळत असल्याने उपनिषदे वेदांशी जोडली गेली आहेत. वेद, ब्राह्मणे किंवा आरण्यक ग्रंथातून ही उपनिष्दे घेतली

संख्या

: ही उपनिषदे आहेत तरी किती ? खरे म्हणजे अगणित. अशा अर्थाने की उपनिषद कशास म्हणावयाचे हे जर ठरत नसेल तर संख्या कशी ठरवणार ? मुक्तिकोपनिषदात यांची संख्या १०८ दिली आहे तर अड्यार ग्रंथसंग्रहालयामते १७९. श्री साधले १९४१ साली देतात २३९. जाऊ दे. आपण प्रमुख उपनिषदे म्हणून पुढील तेरा विचारात घेऊ. ईश, केन, कंठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तिरीय, ऐतरेय, छांदोग्य, बृहदारण्यक,श्वेताश्वतर, कौपितकी आणि मैत्रायणि. हीच कां ? यांच्यावर जास्त टीका लिहल्या गेल्या आहेत, यांच्यातील उद्धरणे इतर ग्रंथांत येतात आणि महत्वाचे हे की यांत तत्वज्ञान म्हणजेच आत्मज्ञान म्हणजेच ब्रह्मविद्या यांचा विचार केला गेला आहे. "तत् त्वं असि" किवा "प्रज्ञानं ब्रह्म" अशी महावाक्ये (तत्वज्ञानाचा पाया) ज्यात आहे तेवढी बघावित, खरे कीं नाही?

. उपनिषदे, वेदशाखा, मूळ ग्रंथ व प्रणेते ऋषी यांची सारिणी पुढे दिली आहे.
उपनिषद नाव वेदशाखा प्र्णेते ऋषी
१. ईशावास्य शुक्ल याज्ञवल्क्य
२. केन सामवेद तलवकार
३. कठ कृष्ण यजुर्वेद कठ
४. प्रश्न अथर्ववेद पिप्पलाद
५. मुंडक अथर्ववेद शौनक महाशाल
६. मांडुक्य अथर्ववेद मांडुक्य
७. तैत्तिरीय कृष्ण यजुर्वेद तित्तिरि
८. ऐतरेय ऋग्वेद महीदास ऐतरेय
९. छांदोग्य सामवेद उद्दालक आरुणि
१०. बृहदारण्यक शुक्ल यजुर्वेद याज्ञवल्क्य
११. श्वेताश्वर कृष्ण यजुर्वेद श्वेताश्वतर
१२. कौषीतकि ऋग्वेद शांख्यायन कौषीतकि
१३. मैत्रायणि सामवेद मैत्री

सारिणीवरून लक्षात येईल की वेद व संबंधित उपनिषदे पुढीलप्रमाणे
कृष्ण यजुर्वेद .....कठ, तैत्तिरिय, श्वेतश्वतर,
शुक्ल यजुर्वेद .....ईशावास्य, बृहदारण्यक,
ऋग्वेद ..............ऐतरेय, कौषितकि,
अथर्ववेद ........ ..प्रश्न, मुंडक, मांडुक्य
सामवेदे ......... .केन, छांदोग्य, मैत्र्रायणी
ईशावास्य हे एकमेव वैदिक संहितेतून घेतले असून बाकीची आरण्यक, ब्राह्मण यांच्यातून घेतली आहेत.

प्रणेते ऋषी
याज्ञवल्क्य, उद्दालक आरुणि, कौपितकि, पिप्पलाद, महिदास ऐतरेय, मैत्री हे प्रमुख प्रणेते ऋषी दिसतात. त्यातही याज्ञवल्क्य हे प्रमुख, श्रेष्ट म्हणावयास हरकत नाही.. जनकाच्या दरबारात गार्गीने सर्वांना संगितले की "यांपुढे तुमचे काही चाणार नाही; नमस्कार करून शरण जा" यांच्याबद्दल माहिती पुढे येणार आहेच.

रचना काल
ही तेरा उपनिषदे इ.स.पूर्व १२०० ते इ.स.पूर्व ६०० या काळात लिहली गेली असली तरी त्यांच्या रचनेचे पाच कालखंड मानले आहेत. कालखंड पुढील प्रमाणे

कालखंड उपनिषदे
प्रथम बृहदारण्यक, छांदोग्य,
द्वितीय ईश, केन,
तृतीय ऐतरेय, तैत्तिरीय, कौषीतकि,
चतुर्थ कठ, मुंडक, श्वेताश्वतर,
पंचम प्रश्न, मैत्री, मांडुक्य.

भाषा
शिष्याने गुरूच्या पायाशी बसून ज्ञान मिळवावयाचे होते. त्यामुळे गुरूकुलात गुरुजीनी सांगावयाचे व विद्यार्थ्यांनी ऐकावयाचे ही झाली सामान्य पद्धत. पण उपनिषदांमध्ये जरा निराळी पद्धत वापरली आहे. येथे शिष्याने प्रश्न विचारावयाचे व गुरुजींनी उत्तर द्यावयाचे ही पद्धत उपयोजिली आहे. प्रश्नोपनिषदांत तर सहा आचार्य, हो, आचार्य, नुकत्रेच मुंज झालेले बटू नव्हेत, विद्वान आचार्य, आपल्याला न सुटलेले प्रश्न घेऊन उत्तर मिळव्ण्यासाठी, भगवान पिप्पलादांकडे हातात समिधा घेऊन नम्रतेने आले. पिप्पलादांनी त्यांना एक वर्ष आपल्या आश्रमात ठेऊन घेत्रले व मगच त्यांना प्रश्न विचारावयाची परवानगी दिली व प्रश्नांची उत्तरे दिली. ही लोकसभेतील निरर्थक प्रश्नोत्तरे नव्हेत. उत्तर मिळवावयाचे तर कष्ट भोगण्याची तयारी होती. इतर काही ठिकाणी प्रश्न गृहित धरून उत्तरे दिली आहेत.
उपनिषदे म्हणजे गुरू-शिष्यांमधील संवाद झाले आहेत. प्रवचनामध्ये एकच विषय निरनिराळे दृष्टा, उदाहरणे देऊन समजावून दिला जातो, तसे उपनिषदे आपला प्रतिपाद्य विषय नानाविध उदाहरणे देऊन समजावून सांगतो. उत्तर देतांना शिष्यांचा अधिकार लक्षात घेतला जातो. एखादा सिद्धांत ग्रथांत ज्या प्रमाणे वादविवदात्मक तत्वचर्चेच्या रुपात मांडला जातो तसा उपनिषदांमध्ये आढळून ये नाही.(अपवाद फक्त बृहदारण्यकोपनिषदाचा} प्रासादिक, छोटीछोटी वाक्ये जास्त. बर्‍याचवेळी क्रियापदे गाळलेली.,भाषा ग्रांथिक स्वरूपाची नव्हे त्रर बोलीभाषेला जवळची. पूर्वकालीन प्रमाणग्रंथातील (उदा. ऋग्वेद) उदाहरणे उपनिषदांत दिली जातात. नवीन विषय अथवा प्रकरण सुरू झाले आहे हे सांगण्याकरिता शीर्षके दिली जातात भाषा ग्रांथिक स्वरूपाची नव्हे तर बोलीभाषेला जवळची.

ब्रह्मसुत्रे
व्यासकृत ब्रह्मसूत्रे ही उपनिषदातील शब्दांचे अर्थ सुस्पष्ट करण्याकरिता लिहली आहेत. पण गंमत म्हणजे ब्रह्मसूत्रांचा अर्थ सांगण्याकरिता पुढे अनेक पंडितानी ग्रंथ लिहले. उपनिषदांवर अनेक विद्वानांनी भाष्यग्रंथ लिहले आहेत. अर्थात प्रमुख म्हणजे आद्य शंकराचार्य..

बहिरंगाबद्दल एवढे पुरे. पुढील भागात अंतरंग म्हणजे उपनिषदांचा प्रतिपाद्य विषय या बद्दल माहिती घेऊं.

शरद

 

उपनिषदे (२)

अंतरंग भाग-१
वैदिक समाज सुखसमाधानी, आरोग्यसंपन्न, उत्साही होता.. इहलोकातील सुखे मिळत होती व यज्ञ करून परलोकातील सुखांची सोय करून ठेवावयाची खात्री होती. पण या समाजातील काही विचारवंतांना हे पुरेसे नव्हते. सुखे क्षणभंगुर आहेत, समोर दिसणारे जगही नश्वर दिसत होते. आणि जगाची सुरवात कशी झाली असावी, कुणी निर्माण केले हे जग, तो निर्माता, असा कोणी असलाच तर, कसा असेल, असल्या प्रश्नांना यज्ञसंस्थेत उत्तर नव्हते. ऋग्वेदातील नासदीय सूक्त, "पुरुष" या कल्पनेत वरील प्रश्नांना स्पर्श केलेला आढळून येतो. या विषयांचा पा॒या घेऊन उपनिषत्कालिन ऋषींनी आपल्या तत्वज्ञानाची भव्य इमारत उभी केली. वेदातील ह्या कल्पनांचा विकास पुढे उपनिषदांनी केला असला तरी यज्ञसंस्थेबद्दल मात्र त्यांना अजिबात आदर नव्हता. त्या काळाला अनुसरून, कटकटी नकोत, म्हणून त्यांनी बोलावयाचे टाळले. पण सगळ्यांनी नव्हे, एखादा कोपर्निकस निघतोच. उपनिषदात "यज्ञ म्हणजे फुटक्या नौका" इतक्या कडक शब्दात यज्ञकर्माबद्दल तुच्छता दाखविली आहे.
सृष्टी, धर्म आणि नीति या तीन गोष्टींवर ऋषींचे लक्ष केंद्रित झालेले होते. यावर विचार करतांना जड जग कामाचे नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आपली दृष्टी आंत, मनाकडे वळवली. धर्म व नीति यांबद्दल हे ठीक दिसते पण सृष्टी...... नाही पटत ? मग सांगा; आज Big Bang सिद्धांताने शास्त्रीय जगात खळबळ माजवली, पण त्या सिद्धाताचा उगम कोण्य़ा वर्तमानकालिन ऋषीच्या मनांत जागृत झालेल्या स्फुल्लिंगातच आहे तीन हजार वर्षांपूर्वी "नासदीय सूक्त" लिहणार्‍या, अरण्यात राहणार्‍या. अनामिक ऋषीलाही तसेच काही स्फुरले. आज आपण Big Bang आधी काय होते त्याचे पटणारे उत्तर देऊ शकत नाही. पण त्या अनामिकाने त्या॒चाही विचार केला, त्याच्या मनांत डोंगराआडून उगवणार्‍या सूर्याप्रमाणे, संपूर्ण विश्व उत्पन्न करणारे "ब्रह्म" हा विचार जन्मास आला. या विश्वनिर्मीतीच्या गूढ प्रक्रीयेबद्दल ऋषी इतका साशंक होता की तो म्हणतो " हे जे काही होते ते त्या "ब्रह्मा"लाच माहीत असेल किंवा... त्यालाही माहीत नसेल " सर्वात्मक "ब्रह्मा"लाही माहीत नसेल म्हणण्यात विचाराची झेप कुठे पोचली आहे हे लवकर लक्षात येत नाही. पण पुढील विचारवंतांना, पार ज्ञानेश्वरांना, त्याची भुरळ पडली आहे.
आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान हा उपनिषदांचा प्रधान प्रतिपाद्य विषय आहे. जरा ह्या आत्मा व ब्रह्म यांच्याबद्दल थोडेसे जाणून घ्यावयाचा प्रयत्न करू.
निसर्गातील कोणतीही प्रचंड वस्तू सजीव मानण्याची वृत्ती नाहीशी होऊन प्रत्येक गोष्टीचा तात्विक भूमिकेवरून विचार करण्याची पद्धत उपनिषदांनी स्विकारली. त्यामुळे " ज्याचे ज्ञान झाले असता बाकी सर्वाचे ज्ञान होते असे तत्व कोणते" असा प्रश्न मुंडक उपनिषदात विचारला गेला व सर्व उपनिषदांत त्याचा पाठपुरावा केला गेला. उदाहराणार्थ "सोन्याचे ज्ञान झाले तर सर्व अलंकारांचे ज्ञान होते" वा "सर्व लोखंडी अवजारांचे ज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे असेल तर लोखंडाचे ज्ञान प्राप्त करून घ्या" हे मूलज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आता ईश्वरप्राप्तीपेक्षा आत्मज्ञानाची ओढ लागली."शरीरातील चैतन्य नष्ट झाल्यावर काय कायम राहते तसेच गाढ निद्रावश झाले असता कोणते तत्व जागृत राहून स्वप्नसृष्टी निर्माण करते "(कठ उपनिषद) असला विचार आता करू लागले. दुसरा असाच एक प्रश्न (बृहदारण्यक उपनिषद)काव्यात्मक भाषेत विचारला आहे ."मृत्युरूपी काळ्या लाकुडतोड्याने तोडला असता पुन:पुन्हा जोराने वाढणार्‍या या जीववृक्षाचे खरे मूळ कोणते ?" याज्ञवल्क्यांनी ठाम उत्तर दिले "देहाच्या मृत्यूनंतर केवळ "आत्मा" जीवित राहतो " हे झाले जडातील अध्यात्मिक्त तत्वज्ञान..
कवितेच्या रसग्रहणात आपण पाहिले कीं अनोळखी शब्दांचे अर्थ आधी समजावून घेतले तर मग पुढचे काम सोपे होते. आधी आत्मा, ब्रह्म, प्राण, प्रणव, सत्-असत्, यांच्याबद्दल माहिती घेऊ.

आत्मन् ; हा शब्द वेदांत येतो पण बव्हंशी त्याचा अर्थ "अहम्" असा आहे.तसेच आत्मन् म्हणजे चैतन्य, जीवनशक्ती, प्राण, जीव असेही म्हटले आहे. या सगळ्यांचा उपयोग उपनिषत्साहित्याने केला आहे.
वेदांत अंतिम सत्याचा उल्लेख "पुरुष" किंवा ब्रह्म या संज्ञेने केला आहे. विश्वशक्तीला "देव" म्हणून भजू लागल्यावर त्याच्याशी आपले अभेद नाते आहे असे मनुष्य मानू लागला. बघा ना, बरेच लोक आमचे पूर्वज कृष्ण वंशातले, राम वंशातले असे म्हणतातच ना ? तसेच आत्मन् चे म्हणजे स्वत:चे या विश्वशक्तीशी म्हणजे "ब्रह्म"शी अभेदत्व आहे अशी एकदा कल्पना केली की आत्मा-ब्रह्म एकच झाले. बृहदारण्यकोपनिषदात "ब्रह्मभावश्चाहमात्मा ब्रह्म" (आत्मा ब्रह्म आहे) असा स्पष्ट उल्लेख केला आहे. सर्वव्यापी ब्रह्म जेव्हा व्यक्तीत असते तेव्हा त्याला आत्मा म्हणावयाचे. असा हा आत्मा शरीरात वास करतो त्याला काही मानसिक अवस्थांचा अनुभव येत असावा..मांडुक्य उपनिषदात जागरत्, स्वप्न्, सुषुप्ती व चौथी स्वसंवेद्य अश चार अवस्था वर्णिल्या आहेत. स्वसंवेद्य म्हणजेच तुरीय. या अवस्थेतील आत्म्याला अदृष्ट, अग्राह्य, अचिंतनीय, शिव, अद्वैत अशी अनेक विशेषणे दिली आहेत.
ऐतरेयोपनिषदात आत्मा हे जगाचे आदिकारण अथवा मूलतत्व असून त्याच्यापासूनच सृष्टीची उत्पत्ती झाली असे सांगितले आहे. प्रथम " ब्रह्म" व नंतर आत्मा असे म्हणून दोघांना एकच काम, आदिकारण, दिले की दोघेही एकच झाले.निरनिराळ्या ठिकाणी हा विचार मांडला आहे. "तत् त्वमसि " (छांदोग्योपनिषद) वा "सोsहमस्मि" यातही हेच सांगितले आहे,
थोडक्यात
(१) देहातील अविनाशी तत्च =आत्मा;
(२) विश्वातील अविनाशी तत्व =ब्रह्म;
(३) आत्मा-ब्रह्म यांच्यात भेद नाही.
हे ब्रह्म-आत्मा यांच्यातील अद्वैत, द्वैतवादी लोकांना आवडले नाही. त्यांनी प्रत्यगात्म्याला. "जीवात्मा" व ब्रह्माला "परमात्मा" अशा दोन संज्ञा दिल्या.
वरील पन्नास ओळीतील सार चार वाक्यात असे:
(१) देहातील अविनाशी तत्वाला म्हणावयाचे आत्मा,
(२) ब्रह्म आणि आत्मा याच्यात अभेद ,
(३) तूच आत्मा आहेस
(४) आत्मसाक्षात्कार हे परमलक्ष.
आत्म्यालाच जाणून मनुष्य मृत्यूच्या पलिकडे जातो. मोक्षप्राप्तीसाठी यापेक्षा निराळा मार्ग नाही. (श्वेताश्वतर उपनिषद )

(जरा मदत पाहिजे. जर एका आत्मा या विषयावर एवढे घडाभर तेल जाळले तर पुढील लेख उगीचच वाढत जातील. ब्रह्म, प्राण, प्रणव, सत-असत,... तर काय म्हणतोय, संक्षेपात लिहावे का ? तसा विषय अवघड असल्याने उदाहरणे देऊन सागावा लागतो. जर लेख लहान करावा असे सांगितलेत तर सूत्रमय लिहता येईल. काय करावे ?)

शरद

 

लेख निवांतपणे वाचला. खुपच सुरेख ! पुढील काही शंका मनात उद्भवलेल्या आहेत , कृपया त्यांचे निराकरण करावे :

१)

वेदातील ह्या कल्पनांचा विकास पुढे उपनिषदांनी केला असला तरी यज्ञसंस्थेबद्दल मात्र त्यांना अजिबात आदर नव्हता. त्या काळाला अनुसरून, कटकटी नकोत, म्हणून त्यांनी बोलावयाचे टाळले. पण सगळ्यांनी नव्हे, एखादा कोपर्निकस निघतोच. उपनिषदात "यज्ञ म्हणजे फुटक्या नौका" इतक्या कडक शब्दात यज्ञकर्माबद्दल तुच्छता दाखविली आहे.

संदर्भ ? ह्या वाक्याला संदर्भ काय ? माझा अल्पस्वल्प माहीती नुसार यज्ञांमध्ये बहुतांश करुन "इदं न मम" म्हणुन अग्नीत आहुती देतात , अर्थात मी माझे ही आसक्ती सुटावी ह्या साठी केलेली यज्ञ ही एक अप्रतिम साधना आहे. उपनिषदे शुध्द ज्ञानाचे समर्थन करतात हे मान्य , मात्र यज्ञांचा निषेध केल्याचे अजुन तरी माझया वाचनात आलेले नाही !

२)

थोडक्यात
(१) देहातील अविनाशी तत्च =आत्मा;
(२) विश्वातील अविनाशी तत्व =ब्रह्म;
(३) आत्मा-ब्रह्म यांच्यात भेद नाही.
हे ब्रह्म-आत्मा यांच्यातील अद्वैत, द्वैतवादी लोकांना आवडले नाही. त्यांनी प्रत्यगात्म्याला. "जीवात्मा" व ब्रह्माला "परमात्मा" अशा दोन संज्ञा दिल्या.

ह्यावरुन तर सरळ सरळ असे दिसत आहे की श्रीमदाद्य शंकराचार्यांचा शुध्द अद्वैत सिध्दांतच उपनिशदांना मान्य आहे , मग पुढील चार महान आचार्यांचे सिधांत कोणत्या पायावर उभे रहातील ? मला हा प्रश्न अगदी लहान पणा पासुन पडत आहे की अहंब्रह्मास्मि , तत्वमसि , अयमात्मा ब्रह्म वगैरे महावाक्ये अगदी स्पष्ट पणे अद्वैतचाचा उध्घोष करत असताना इतर आचार्यांचे सिध्दांत , द्वैत , द्वैताद्वैत , विषिश्ठाद्वैत वगैरे उभे राहिलेच कसे?

(जरा मदत पाहिजे. जर एका आत्मा या विषयावर एवढे घडाभर तेल जाळले तर पुढील लेख उगीचच वाढत जातील. ब्रह्म, प्राण, प्रणव, सत-असत,... तर काय म्हणतोय, संक्षेपात लिहावे का ? तसा विषय अवघड असल्याने उदाहरणे देऊन सागावा लागतो. जर लेख लहान करावा असे सांगितलेत तर सूत्रमय लिहता येईल. काय करावे ?)

माझ्य्या मते सुत्रमयता जास्त महत्वाची गोष्ट आहे , लेख छोटे छोटे करावेत , पण अधे मध्ये कधी आत्मा विषयावर जास्त स्पष्टीकरण लिहायचे झाले तर छोटेखानी पुरवणी लेख जोडता येतील ! अर्थात हे माझे मत !!

आणि दुसरी एक छोटी रिक्वेस्ट आहे , उपनिषदांच्या सविस्तर अभ्यासाला सुरुवात करण्या पुर्वी एक अति संक्षिप्य असा लेख लिहाल का की ज्यात उपनिषद , श्लोकांची संख्या , छद , कोणत्या वेदाचा भाग आहे ते , आचार्यांचे काही विशेष भाश्य , आणि उपनिषदाचा विषय आणि मांडणी कशी आहे इत्यादी ?
( इशावास्य्पनिषद वगळता कोणतेही उपनिषद सविस्तर अभ्यासले नसल्याने अन्य १७ उपनिषदांविषयी प्रचंड कुतुहल आहे एस्पिशीयली ती नचिकेताची गोष्ट कोणत्या उपनिषदात येते त्या !!)

लेख मनापासुन आवडला आहे , पुढील लेखांची वाट पहात आहे.

कळावे .
लेभ असावा .

आपला विनम्र
प्रगो

 (१) यज्ञ म्हणजे फुटक्या नौका... मुंडक उपनिषद १.२.७
प्लवा ह्येते अदृढा यज्ञरूपा,,
सगळा श्लोक देण्याऐवजी मराठी भाषांतर देतो.
सोळा ऋत्विज, यजमान ब पत्नी मिळून अठराजनांनी करावयाचे यज्ञरूप निकृष्ट कर्म संसारसागर तरून जाण्याला धोक्याच्या नावेसमान आहे. अज्ञानी लोक त्याचा आश्रय घेतात. त्यांना जरा-मृत्यू पुन:पुन्हा प्राप्त होतो.
(२) यज्ञात आहुती देताना "इदं न मम" म्हणावयाचे असले तरी यज्ञ हा मुख्यत: इह व पारलौकिक सुखांसाठीच केला जातो.शतपथ ब्राह्मणात (२.२.१.६) सांगितले आहे "यज्ञ यजमानाची पापे जाळतो. त्यामुळे यजमानाला ब्रह्मतेज, संपत्ती आणि सुख मिळते." काम्य यज्ञात उत्तम पाऊस पडावा, शत्रूंचा नाश व्हावा अशा कारणांकरिता याग सांगितले आहेत, यज्ञाचे अध्यात्मिक स्वरूप किंवा पारमार्थिक अर्थ सामान्य माणसांकरिता नसणार हे उघड आहे.
(३) ऊपनिषदे अद्वैतवादीच. श्रीमदाचार्य शकरांनी उपनिषदांपासून तो घेतला. उपनिषदांवर टीकाही लिहल्या. (उलटे नव्हे.)
(४) उपनिषदांत अद्वैत आहे म्हणून सर्वांनी ते स्विकारले पाहिजे असे मुळीच नाही. त्यावर निराळे लेख लिहावयास पाहिजेत.
(५) लेखांच्या स्वरूपाबद्दल आपल्या सूचनांचा नक्कीच विचार करीन, धन्यवाद
शरद

 

वैदिक काळातले यज्ञ बहुतकरून इंद्रादी देवांसाठी होत असत. आणि ते बहुतांश काम्य असत. परंतु उपनिषदांनी अद्वैत मत स्थिर झाल्यावर जे यज्ञ होऊ लागले म्हणजे बहुधा पुराणकाळातले, तोपर्यंत इंद्रादी देवांचे महत्व कमी होऊन पंचायतन प्रभृती देवता स्वीकारल्या गेल्या होत्या, त्या वेळेस यज्ञांचे स्वरूप देखील निष्काम होते. आज होणारे याग बहुतांश वेळेस काम्य असतात, पण निष्काम लोकांना देखील तेच याग निष्काम भावनेने करण्याची मुभा धर्माने दिलेली आहे,

प्लवा ह्येते अदृढा यज्ञरूपा,,

हे बहुधा संक्रमणकाळातील असेल.

बाकी इदं न मम, म्हणजे हे माझे नाही, मी तुला दिले. आता हे माझे नाही याचा अर्थ "ते माझे नाही" असा होत नाही अर्थात "हे मी तुला दिले, या बदल्यात तु मला ते दे" असा होऊ शकतो.

बाकी शरदकाका, उपनिषदांवरील लेखात आत्मा आणि माया आली नाही तर चुकल्याचुकल्यासारखे वातेल, त्यामुळे लागेल तेव्हढा वेळ त्याला जाऊ द्या असे मला वाटते.

काम्य यज्ञात उत्तम पाऊस पडावा, शत्रूंचा नाश व्हावा अशा कारणांकरिता याग सांगितले आहेत, यज्ञाचे अध्यात्मिक स्वरूप किंवा पारमार्थिक अर्थ सामान्य माणसांकरिता नसणार हे उघड आहे.

यज्ञ मुळात इतका लौकिक कारणांसाठीच जर आहे तर त्याचे अध्यात्मिक स्वरुप सामान्यांकरीता नसणार अस विरोधी विधान करण्याचा अर्थच नाही समजला. एकतर ते काम्य आहेत लौकीक इच्छेसाठी वगैरे आहेत. असेच जर आहे तर त्यात आध्यात्मिक अर्थ स्वरुप मुळात येतेच कसे व त्यावर ते सामान्याकरीता नाहीत असे कसे?
यज्ञ तुमच्या मते गुढ आध्यात्मिक सामान्य माणसाच्या आकलाना पलीकडचे आहेत की
सामान्य काम्य क्रिया आहेत ज्या कुठल्याही आदीम समाजात कुठल्याना कुठल्या स्वरुपात आढळतात.

 ऊपनिषदे अद्वैतवादीच. श्रीमदाचार्य शकरांनी उपनिषदांपासून तो घेतला. उपनिषदांवर टीकाही लिहल्या. (उलटे नव्हे.)
हे मान्य आता शंकराचार्य त्यांच्या ब्र्ह्मसुत्र भाष्यात यज्ञात होत असलेल्या प्राणी हिंसेचे जे समर्थन करतात. ते त्यांचे समर्थन व्यक्तीगत मानावे की उपनिषद संमत मानावे ?
म्हणजे उपनिषद व अद्वैत चा प्रभाव असुनही शंकराचार्यांसाठी प्राणीहिंसा समर्थनीय कशी ?
मग त्यामानाने ज्ञानेश्वर ( त्यांची यज्ञसंस्थेवर केलेली टीका व प्राणीहिंसेचा विरोध पाहता) तुलनेने संवेदनशील व आधुनिक आहे असे मी म्हणालो तर ते गैर होइल काय ?

यज्ञातील कर्मकांडांचा भाग समजावून सांगण्याकरता ब्राह्मणे लिहली गेली. त्या काळी (इ.स.पूर्व२०००, अंदाजे) आर्य संस्कृत बोलत होते. म्हणजे संस्कृत येत असतांनासुद्धा संहितांचा खरा अर्थ कळणे सोपे जात नव्हते. आध्यात्मिक अर्थ तर अवघडच. काम्य यज्ञ जेव्हा सुरू झाले तेव्हा सर्वसामान्य लोक प्राकृत बोलत व संस्कृत फक्त उच्च वर्णियांकरता उरले होते.(बघा:संस्कृत नाटके). अशा वेळी राज्यकर्ते किंवा धनिक लोक आध्यात्मिक अर्थ जाणणे शक्यच नव्हते. काम्य यज्ञ म्हणजे उद्देश इहलोकीच्या फायद्याकरता. ह्याचा अर्थ यज्ञप्रक्रिया निराळी असा नव्हे. काम्य यज्ञ प्राकृतात होत नव्हते. आजचे उदाहरण घ्या. लग्नात भटजी म्हणतात किंवा दिवसांकरता म्हणतात त्या संस्कृताचा अर्थ शिकलेल्या किती लोकांना कळतो ?

उपनिषदांनी यज्ञसंस्थेला विरोध केला आहे. आद्य शंकराचार्यांनी यज्ञातील हिंसेचे समर्थन केले असेल(मला माहीत नाही, ब्रह्मसूत्रावरील टीका वाचण्याइतके माझे संस्कृतचे ज्ञान नाही ) तर ते वैयक्तिक मत म्हणावयास हरकत नाही. एखाद्या ग्रंथातील एखादा भाग तुम्हाला मान्य आहे याचा अर्थ त्या ग्रंथातील सर्व विचार तुम्हाला मान्य आहेत असे नाही. अद्वैताचा झेंडा फडकवणारे आद्य शंकराचार्य निनांतसुंदर भक्तीरचना करतातच. आणि सर्वाभूती एकच आत्मा आहे म्हणाणारे आजचे शंकराचार्य दलितांना कशी वागणुक देतात ?
तुमच्या कोणत्याही म्हणणे :"गैर" आहे किंवा "गैर नाही" असा शेरा मारावयास मी कोण?
शरद

अहो ती एक आपली बोलीभाषेतली शैली असते तसे म्हणालो होतो की असे असे समजा तर असे गैर म्हणावे काय ?
त्यात जाणुन घेणे इतकाच हेतु होता. त्याहुन अधिक नाही.
एखाद्या ग्रंथातील एखादा भाग तुम्हाला मान्य आहे याचा अर्थ त्या ग्रंथातील सर्व विचार तुम्हाला मान्य आहेत असे नाही
आपला हा विचार फार आवडला.
आपण मुळ ग्रंथ वाचला नाही त्यामुळे माझे मत पुढे विस्ताराने मांडण्यात अडथळा येतो.
तरी मनापासुन धन्यवाद आपल्या प्रतिसादासाठी

 

एखाद्या ग्रंथातील एखादा भाग तुम्हाला मान्य आहे याचा अर्थ त्या ग्रंथातील सर्व विचार तुम्हाला मान्य आहेत असे नाही

हा विचार खुपच सुंदर आहे .एखाद्या लेखातील एखादा भाग तुम्हाला मान्य आहे याचा अर्थ त्या लेखातील सर्व विचार तुम्हाला मान्य आहेत असेही नाही

शिवाय संस्कृताचे भाषांतर करतानाच कित्येक अर्थ निघतात मग विवरण करावयाचे झाल्यास अजुनच जास्त अर्थ निघु शकतात उदाहरणार्थ प्लवा ह्येते अदृढा यज्ञरूपा ह्याचा अर्थ शरद सर उपनिषदांनी 'यज्ञसंस्थेला विरोध केला आहे ' असा काढतात पण मला वाटते हा विरोध नसुन केवळ त्यातला (काम्य कर्मातील) केवळ फोल पणा दाखवला आहे . अशाच अर्थाचे श्लोक भगवद्गीतेतही येतात =

यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ २-४२ ॥
कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् ।
क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥ २-४३ ॥
भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् ।
व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥ २-४४ ॥
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥ २-४५ ॥

गीता सरळ सरळ सांगते की वेद त्रैगुण्य विषय आहेत , अर्जुना तु ह्यां सर्वांच्या पार जा ...पण ह्याचा अर्थ गीता यज्ञ संस्थेचा निषेध करते असा होत नाही .

ह्या निमित्ताने गीतेतील हा भन्नाट श्लोक आठवला

न कर्मणामनारंभान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।
न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ ४ ॥

नुसती कर्मे केल्याने नैष्कर्म्य प्राप्त होत नसते अन नुसत्या सन्यासाने समाधी प्राप्त होत नसते , नुसती उपनिषदे वाचुन किती जणांना कळाणार आहेत ? ती आचरणात आणायला काहीतरी डॉक्टराईन हवाच ... माऊली म्हणतात तसे

देखैं उत्प्लवनासरिसां । पक्षी फळासि झोंबें जैसा ।
सांगैं नरु केवीं तैसा । पावे वेगा ? ॥ ४१ ॥
तो हळूहळू ढाळेंढाळें । केउतेनि एके वेळे ।
तया मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी ॥ ४२ ॥
तैसे देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें ।
सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ॥ ४३ ॥
येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें ।
पूर्णता अवसरें । पावते होती ॥ ४४ ॥

नुसते सांगितल्याने सर्वांनाच उपनिषदोक्त तत्वज्ञान कळेल असे नाही , सर्व सामान्य जनांना कळण्यासाठी काही ना काही कर्मकांडाची , यज्ञसंस्थेची जोड असणे मला तरी आवश्यक वाटते ! यज्ञाथात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः ।
तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचार वगैरे वगैरे

अवांतर :

आद्य शंकराचार्यांनी यज्ञातील हिंसेचे समर्थन केले

ह्याला संदर्भ काय ?

अतिअवांतर : सर्वोपनिषदो गाव: दोग्धा गोपालनंदन: | पार्थो वत्स: सुधी: भोक्ता दुग्धं गीतामॄतं महत् || अशी आमची श्रध्दा आहे तस्मात गीतेचे संदर्भ दिले म्हणुन कोणी "विषयांतर झाले" असे म्हणणार नाही अशी आशा करतो !

 नुसते सांगितल्याने सर्वांनाच उपनिषदोक्त तत्वज्ञान कळेल असे नाही , सर्व सामान्य जनांना कळण्यासाठी काही ना काही कर्मकांडाची , यज्ञसंस्थेची जोड असणे मला तरी आवश्यक वाटते !
यज्ञसंस्थेत पुरुषमेध अश्वमेध गोमेध सौत्रामणी यांचाही समावेश होतो.
यज्ञसंस्थेत शमिता सवित्र ही येतात
ही सर्व केवळ आत्मोन्नती साठी विशुद्ध बौद्धीक उन्नयना ची केवळ निरुपद्रवी साधने होती असे आपल्याला वाटते का ?
यामागे प्रचलित समाजव्यवस्था वर्गीय हितसंबंध राजकीय आर्थिक प्रवाहांचा कुठलाच परीणाम प्रभाव नव्हता असे आपल्याला वाटते का? त्यातील नियमांमध्ये झालेले बदल त्यातील सिम्बॉलिझम त्यातील कृत्ये ही एका आयसोलेटेड झोन मध्ये होत होती का ?
मुळात या संस्थेवर इतक्या बाजुंनी चार्वाक जैन बौद्ध उपनिषदे इतकी प्रखर टीका का झाली असावी ? याचा किमान आपण कधीतरी विचार करुन पाहावा असे सुचवितो

 नुसते सांगितल्याने सर्वांनाच उपनिषदोक्त तत्वज्ञान कळेल असे नाही , सर्व सामान्य जनांना कळण्यासाठी काही ना काही कर्मकांडाची , यज्ञसंस्थेची जोड असणे मला तरी आवश्यक वाटते !
यज्ञसंस्थेत पुरुषमेध अश्वमेध गोमेध सौत्रामणी यांचाही समावेश होतो.
यज्ञसंस्थेत शमिता सवित्र ही येतात
ही सर्व केवळ आत्मोन्नती साठी विशुद्ध बौद्धीक उन्नयना ची केवळ निरुपद्रवी साधने होती असे आपल्याला वाटते का ?
यामागे प्रचलित समाजव्यवस्था वर्गीय हितसंबंध राजकीय आर्थिक प्रवाहांचा कुठलाच परीणाम प्रभाव नव्हता असे आपल्याला वाटते का? त्यातील नियमांमध्ये झालेले बदल त्यातील सिम्बॉलिझम त्यातील कृत्ये ही एका आयसोलेटेड झोन मध्ये होत होती का ?
मुळात या संस्थेवर इतक्या बाजुंनी चार्वाक जैन बौद्ध उपनिषदे इतकी प्रखर टीका का झाली असावी ? याचा किमान आपण कधीतरी विचार करुन पाहावा असे सुचवितो

 

अंतरंग (२)
आत्मा
मागील भागात आपण पाहिले की ."शरीरातील चैतन्य नष्ट झाल्यावर काय कायम राहते तसेच गाढ निद्रावश झाले असता कोणते तत्व जागृत राहून स्वप्नसृष्टी निर्माण करते "(कठ उपनिषद ) आणि मृत्युरूपी काळ्या लाकुडतोड्याने तोडला असता पुन:पुन्हा जोराने वाढणार्‍या या जीववृक्षाचे खरे मूळ कोणते ? (बृहदारण्यक उपनिषद ) या दोन प्रश्नांची उत्तरे देण्याकरिता "आत्मा " निर्माण झाला. याला केवळ "अमर" करून भागण्यासारखे नव्हते.

सुरवातीला आत्मा शब्दाचा प्रयोग वस्तूची सत्ता किंवा एकता अशा अर्थी होत असे. पण पुढे त्याला सातत्यभावाची जोड देण्यात आली. साततत्व म्हणजे अखंडपणा. अस बघा; रावणाकडॆ सत्ता होती पण अखंडत्व नव्हते. ज्यांना आपण अमर म्हणतो ते देवही कल्पांती नाहिसे होतात. आत्म्याला सत्ता आहेच पण सातत्यही आहे.
या दोन विचारांच्या आधारे तत्वविचार सुरू ,झाला. आज आपण भिन्न भिन्न उपनिषदे व दर्शने यांनी "आत्म्या" बद्दल काय म्हटले आहे ते पाहू.

" नायमात्वा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुधा श्रृतेन " (कठ.१.२.२२)
आत्मा केवळ प्रवचनाने, कुशाग्र बुद्धीच्या साहाय्याने किंवा बहुश्रुतपणाने प्राप्त होत नाही. (त्यासाठी साधना करावी लागते.)

आत्मसाक्षात्कार हे मानवी जीवनाचे श्रेय मानले आहे.
" तमेव विदित्वाsतिमृत्युमेति नान्य:पन्था विद्यतेsयनाय " (श्वेता.२.८)
त्यालाच (आत्म्यालाच) जाणून मनुष्य मृत्यूच्या पलिकडे जातो. मोक्षप्राप्तीसाठी यापेक्षा निराळा मार्ग नाही.
" ऋते ज्ञानान्न मुक्ती: " ज्ञानावाचून मुक्ती नाही. स्वरूपाचा सक्षात्कार होण्यासाठी केवळ अध्ययन व्यर्थ आहे. ध्यानयोग व तत्वज्ञान यांचाच आधार घेतला पाहिजे

आत्मज्ञानासाठी पुढील सद्गुणांची आवश्यकता आहे.
सत्येन लभ्यस्तपसा ह्येव आत्मा सम्यग्ज्ञानेन ब्रह्मचर्येन नित्यम् !! (मुंडक ३.१.५)
सत्य, तपोचरण,सम्यग्ज्ञान व अखंड ब्रह्मचर्य या गुणांनी आत्मबोध होतो.
.
आत्मा प्रशस्ति
हा सूक्ष्म आत्मा फक्त मनाला कळतो. त्यात पंचप्राण आहेत. त्या प्राणांनी चित्त व्यापलेले आहे. त्या शुद्ध चित्तात आत्मा प्रगट होतो.
(मुंडक ३.१.९)

ब्रह्मज्ञस्थिति
यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह !
आनंदं ब्रह्मणो विद्वान् न विभेति कुतश्चन !! (तैतरीय.३.४.१)
वाणी आणि मन जेथे पोहोचू शकत नाहीत, असा हा ब्रह्मानंद भोगणारा, निर्भय "मनोमय कोश" आहे.

परब्रह्मविद्या
आत्माच एक प्रथम होता.दुसरे काही नव्हते.चलनवलन नव्हते. आत्म्याने विचार केला, लोक उत्पन्न करावेत. (ऐतरेय.१.१,१)

(गाढ झोपेत) पक्षी आपल्या घरट्यात एकरूप होतात, तद्वत इंद्रियसमूह झोपेत आत्म्यात एकरूप होतो. (प्रश्न. ४.७)

सर्व लोक ज्या आत्म्याच्या योगाने रूप, रस,गंध,शब्द व स्पर्श आणि मै थुन इत्यादींना जाणतात, त्याच्याच योगाने आत्मज्ञानही मिळवता येते. मग काय उरले ? (काही नाही) हेच नचिकेतसने विचारलेले आत्मतत्व होय.(कठ.४.३)

तत्त्वमसि
स च एषोsणिमैतदात्म्यमिद सर्वम् ! तत्सत्यम् ! स आत्मा ! तत्त्वमसि ! ( छांदोग्य.६.१३.३)
तोच हा सूक्ष्मस्वरूपी आत्मा होय. हे सर्व सदात्मक आहे, तेच सत्य होय. व तो आत्मा तूच आहेस.

पुरे, नाही का ? आता दर्शने काय म्हणतात तेही बघू..

लोकायत चैतन्यविशिष्ठ देहाला आत्मा समजतात.
माध्यमिक बौद्धांच्या मते आत्मा म्हणजे शून्य होय.
जैन लोक जीवतत्त्वाला आत्मा समजतात.
न्याय-- आत्मा नित्य व विभुद्रव्यविशेष आहे.आत्मे व मने अनेक आहेत.
तांत्रिकांच्या मते विश्वोत्तीप्रकाशात्मक आहे.
अद्वैत -- (प्रत्यगात्मा) चैतन्यरूप, कर्तृत्व-भोक्तृत्वविरहित व परब्रह्माहून अभिन्न आहे.

आज आपण उपनिषदांमध्ये आत्म्याबद्दल आलेल्या निरनिराळ्या वचनांतील काही माहिती पाहिली. त्यावरून लक्षात येईल की निरनिराळ्या दृष्टिकोनातून आत्म्याचे वर्णन केले आहे. तसे कळावयास फार अवघड नाही. परंतु काही शंका असल्यास अवष्य विचारा. उत्तर देण्याचा प्रयत्न करीन पुढील भागात "ब्रह्म" बद्दल माहिती घेऊ.

शरद

 आत्म्याला (किंवा ब्रह्माला म्हणा) सत्ता नाही असे म्हणणे उचित नाही. फार संदर्भ देण्याऐवजी एकच उदाहरण घेऊ. आत्म्याचे वर्णन एका वाक्यात करावयाचे असेल तर ते असे " आत्मा सत्, चित्, आनंद रूप आहे". सत म्हणजे सत्ता, जे आहे ते, नुसते आहे ते नव्हे तर जे कधी नाहिसे होत नाही ते. नित्य असणारे सत म्हणजे अक्षर, अविनाशी. असत म्हणजे जड, चित म्हणजे जाणीव जाणीव असेल तरच ज्ञान होऊ शकते. तेव्हा चित म्हणजे ज्ञान असे म्हणावय़ास हरकत नाही आत्मा आनंदरूप मानला आहे. दु:खाचे निरसन वा एखाद्या इंद्रियाचे तर्पण करणारे सुख हा जीवाला जगात मिळणारा आनंद असतो. तो सापेक्ष आहे, क्षर आहे आत्मवस्तूचा आनंद हा सहज आणि निर्निमित्त असतो. अमृतानुभवात छान माहिती मिळते. .
लेख लहान असावेत म्हणून उपनिषदांतील (व दर्शानांतील) उदाहरणे वानगी दाखल देतो. छांदोग्य-बृहदारण्यक यांतील संदर्भ द्यावयाचे म्हटले तर ... मारुतीची शेपटीच होईल.
मनोमय कोश आपण तैत्तिरीय उपनिषदामध्ये बघू.

 

अंतरंग -३
ब्रह्म (अ)

आत्मा ह्या प्रमुख विषयानंतर आता "ब्रह्मा" कडे वळू.

सर्व धर्मांत "ईश्वर" ही संकल्पना आढळते. प्राय: हा मानवसदृश असतो. भले मग तुम्ही त्याला चार हात वा हत्तीचे मुख द्या. तर या ईश्वराचे मनुष्यत्व बाजूला ठेवून केवळ निर्गुण, निराकार, सर्वशक्तिमान अशा "ब्रह्मा" ची कल्पना माणसाच्या प्रतिभेची उत्तुंग भरारी आहे. तत्वज्ञानदृष्ट्या विकसित विचाराचे ते एक आकर्षक फळ आहे. आपण पुढे ईश्वर व ब्रह्म यातील फरक पाहूच.

बृह = वाढणे, मोठे होणे या धातूपासून "ब्रह्म" हा शब्द बनला आहे. शांकर मताच्या आचार्यांनी "ब्रह्मा"ची व्याख्या करतांना म्हटले आहे :देश, काल व वस्तु यांनी सीमित होणारे, अनित्य, परिवर्तनशील, गुणरहित, दोषयुक्त, ज्ञानरहित, परतंत्र, असे जे जे ते सर्व अल्प होय. याच्याहून उलट अर्थात अनादी, अनंत, नित्यशुद्ध, बुद्ध व मुक्त ते ब्रह्म होय. छांदोग्योपनिषदात (७.७.२४) म्हटले आहे "यो वै भूमा तदमृतमय यदल्पं तत्मर्त्यम् " (भूमा= ब्रह्म्) ( जे ब्रह्म ते अमृत आणि जे अल्प ते मर्त्य होय.)

ब्रह्माची तटस्थ व स्वरूप अशी उभयविध लक्षणे आहेत. जगताचा जन्म, स्थिती व लय यांना कारण असणे हे ब्रह्माचे तटस्थ लक्षण होय. तैत्तिरीय उपनिषदात म्हटले आहे(३.१.५)
यतो वा इमानि भूतानि जायन्ते ! येन् जातानि जीवन्ति ! यत्प्रवत्यभिसंविशन्ति ! तद्विज्ञातस्व तद् ब्रह्म ! (ज्यापासून जग निर्माण झाले. झालेले सर्व प्राणी ज्यामुळे जगतात, त्यात विलीन होतात, ते जाण. ते ब्रह्म होय)

कोणत्याही वस्तूची दोन कारणे असतात. उपादान व निमित्त. घटाचे उपादान कारण माती व निमित्त कारण कुंभार असतो. उपादान कारण हे वस्तूची सामुग्री असते व निमित्त कारण कार्याला गती, आकार, प्रयोजन प्राप्त करून देणारे असते. ब्रह्म हे जगताचे अभिन्न उपादान व निमित्त कारण आहे. ईश्वरवादात जगताची उपादान कारणता नसते. ब्रह्म निराळे व ईश्वर निराळा.
तैत्तिरीयात (२.१) ब्रह्माचे स्वरूप लक्षण दिले आहे " सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म ! " (ब्रह्म हे सत्य, ज्ञान व अनंत आहे.) मागील भागात आपण पाहिले की "अनंत" ऐवजी "आनंद" असा बदल करून सत, चित व आनंद असेही ब्रह्माचे लक्षण दिले आहे. ही तीन लक्षणे ब्रह्माला परिपूर्णता देतात.

ब्रह्मकल्पनेचा विकास
ऋग्वेदात देवस्तुतिविषयक सूक्तांना ब्रह्म म्हटले आहे. या सूक्तांनी देवांचा उत्साह व सामर्थ्य वाढते, त्यांचे पोषण व संवर्धन होते. सूक्ते रक्षण करतात. देवतांपेक्षाही मंत्र जास्त सामर्थ्यवान, (रामसे रामानाम भारी) असे म्हणत ब्रह्म जास्त जास्त प्रभावी होवू लागले. ऋग्वेदात ब्रह्म विश्वशक्तीचा स्रोत आहे, त्याच्या ठिकाणी अद्भुत सामर्थ्य आहे ते विश्वाचे प्राणभुत तत्व आहे इथप्रयंत पोचले.

या पुढची पायरी अथर्ववेदात दिसते. तेथे ब्रह्माला प्रथम म्हणजे सर्वात ज्येष्ठ असे म्हणून वर्णनात्मक बीजभूत तत्वे अशी दिली आहेत.
(१) मानव शरीरात ब्रह्म प्रविष्ट झाले आहे.
(२) ब्रह्म हे स्कंभ म्हणजे सर्वांचे नियंत्रण करणारी शक्ती आहे.
(३) ब्रह्म हे सर्वात ज्येष्ठ आहे.
(४) ब्रह्म हे विश्वात्मक आहे.

आता उपनिषद्कार ऋषींना मूलभूत तत्वे मिळाली होती व त्यांनी या वरूनच आपले विचार विस्तारले. आत्मा व ब्रह्म हे एकच हा विचार सर्वात महत्वाचा.

ही झाली ब्रह्माची पूर्वपिठीका. पुढील भागात निरनिराळ्या उपनिषदात ब्रह्माबद्दल काय म्हटले आहे ते पाहू.

शरद

 

अंतरंग-४
ब्रह्म(आ)

पूर्वपीठीकेचा भाग थोडक्यान आवरून आज आपण उपनिषदांमध्ये "ब्रह्म" बद्दल काय लिहले आहे ते पाहू
(१) केनोपनिषद
प्रथम आचार्य शिष्याच्या, "मनाला प्रेरणा कोणी दिली, कोणाच्या इच्छेने लोक बोलतात, डोळे व कान यांचे कार्य कोणत्या देवाने सुरू केले "(१.१) इ. प्रश्नांची उत्तरे देतांना सांगतात " जेथे आत्मा जातो (प्रवेश करतो) त्या ब्रह्मात चक्षू, वाचा, मन जावू शकत नाहीत; ते ज्ञात व अज्ञात याच्या पलिकडे आहे; तेथे वाणी कुंठित होते पण वाणीची उत्पत्ती त्याच्यापासून होते. जे कानाला ऐकू येत नाही, पण ज्यामुळे कान ऐकू शकतो, जे श्वासोच्छ्वास करत नाही, पण ज्यामुळे प्राण श्वासोच्छ्वास करतो, (१.३,१.५, १.७ १.८)
ते ब्रह्म होय, आपण ज्याची उपासना करतो ते नव्हे.. ज्याला कळले आहे असे वाटते त्याला ते कळलेले नसते. ते ज्ञान होण्याच्या पलिकडे आहे. संशयरहित ज्ञानाने मोक्ष मिळतो." (२.२-२.४)
"यतो वाचो निवर्तंते "असे सगळी उपनिषदे म्हणतात.

नंतर एक कथा सांगितली आहे.(तृ.खंड)
देवांचा विजय झाला तेव्हा त्यांना गर्व झाला. हा विजय आपल्यामुळे झाला आहे असे त्यांना वाटले तेव्हा त्यांच्यासमोर ब्रह्म प्रगट जाले. पण देवांना ते कोण हे कळेना. तेव्हा देवांनी अग्नीला त्याच्याकडे पाठविले. अग्नीने विचारले "कोण रे तू " मग अग्नीला ब्रह्माने विचारले "तू कोण ? तुझे सामर्थ्य काय "? अग्नी म्हणाला " मी सर्व जग जाळू शकतो" ब्रह्माने त्याच्यासमोर एक काडी टाकली व ती जाळावयास सांगितले. अग्नी ती काडी जाळू शकला नाही. मग वायू गेला व "मी सर्व जग उडवू शकतो " अशी वल्गना त्याने केली. पण ब्रह्माने त्याच्या समोर टाकलेली काडी तो हलवूही शकला नाही. ब्रह्म गुप्त झाले. मग आकाशात प्रगट झालेल्या हैमवती उमेने त्यांना सांगितले की ":ते ब्रह्म होते व त्याच्यामुळेच तुम्हाला विजय प्राप्त झाला आहे." ब्रह्माच्या समोर देवांचे सामर्थ्य कस्पटासमान आहे हे ही कथा सांगते.

(2) ईशावास्य उपनिषद
पूर्णमद: पूर्णमिदम् !
पूर्णात्पूर्णमुदच्यते !!
पूर्णस्य पूर्णमादाय !
पूर्णमेवावशिष्यते !!

ईशावास्य उपनिषदातील हा शांतिमंत्र फार महत्वाचा आहे. अर्थ:
हे ब्रह्म पूर्ण आहे. (त्यातून निर्माण झालेले) हे विश्व पूर्ण आहे. पूर्णातून पूर्णच निर्माण होते. पूर्णातून पूर्ण वजा केले तरी पूर्णच राहणार. पूर्ण ब्रह्मातून पूर्ण विश्व वजा केले, काढून टाकले तरी पूर्णच शिल्लक राहणार
(गणितात infinity मधून infinity वजा केली तरी infinity च शिल्लक राहते तसेच काही.)
मह्त्वाचे काय ? इथे शांकर अद्वैतातील "जगत्मिथ्या" ला फाटा मारला आहे.( मान्य की उपनिषदांवरील लेखात ही भाषा शोभत नाही, पण मिपावर लिहतांना हे आटुमाटु होत असावे. शिवाय उपनिषदांनी अद्वैताचा पुरस्कार केला असला तरीही शाकरमत म्हणजेच अद्वैत असा गैरसमज टाळला पाहिजे. माऊलींनीही जगाला मिथ्या नाही तर काव्यात्मक भाषेत "विलास" म्हटले आहे.)
ईशावास्याचे प्रणेते याज्ञवल्क्य हे जगाला त्याज्य समजत नव्हते. सर्व जग ईश्वरमय आहे. त्याचा त्यागपूर्वक उपभोग घ्या असेच त्यांचे म्हणणे होते. जनकाच्या दरबारात एकदा सर्व ऋषी जमले असतांना जनकाने ह्जार गायी उभ्या केल्या व तो म्हणाला "सर्वश्रेष्ठ तत्वज्ञानी माणसाने ह्या गायी घ्याव्यात" आता सगळ्यांना प्रश्न पडला काय करावयाचे ? याज्ञवल्क्यांनी मात्र ताबडतोब आपल्या शिष्यांना "गाई घेऊन जा" असे सांगितले. आपल्या ज्ञानाबद्दलच्या खात्रीबरोबरच त्यांना असे धन सोडावयाचे नव्हते. संन्यास घ्यावयाचे ठरविल्यावर त्यांनी आपली मालमत्ता आपल्या दोन बायकांमध्ये वाटून दिली.
(आत्मा=ब्रह्म) आत्मा सर्वव्यापी, शुद्ध, शरीररहित,, अखंड, स्नायूरहित, निर्मल, पापरहित, द्रष्टा, सर्वज्ञ, सर्वश्रेष्थ व स्वयंभू आहे. (८)

(3) कंठ उपनिषद
यमाने नचिकेताला केलेल्या उपदेशातील (३.१५) पुढील वाक्यांत ब्रह्माचे वर्णन असे आहे :
’ शब्द, स्पर्श, रूप, रंग, गंध व व्यय नसलेले अनादि, अनंत, महत व अचल असे आत्मज्ञान जाणले असता मनुष्य मृत्यूपासून मुक्त होतो."
आत्मज्ञान वा ब्रह्मज्ञान हाच सुटकेचा मार्ग असे जर " मृत्यू" च म्हणत असेल तर मान्य केलेच पाहिजे, नाही का ?

(४) मुंडक उपनिषद
(१) चार वेद, शिक्षा, सूत्र, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष ही " अपरा विद्या " होय. अक्षरविद्या म्हणजेच ब्रह्मज्ञान ही " पराविद्या " आहे.
(१.१.५)
(२) ते ब्रह्म अदृष्य, अग्राह्य, आहे. तसेच, ते अगोत्र, वर्णरहित, डोळे , कान नसलेले, हात-पाय नसलेले, नित्य, व्यापक, विविधरूपी, अतिसूक्ष्म, अव्यंग, जगाचे उत्पत्तिस्थान, अशा स्वरूपात ज्ञात्यांना समजते.(१.१.६)
(३) प्रकाशस्वरूप, समीपस्थित, हृदयस्थ, महत्पद, समर्पित, चल, चेतन,उघडझाप करणारे असे ते ब्रह्म आहेहे शिष्यांनो, ते जे सर्वश्रेष्थ आहे, तेच ब्रह्म आहे.
(२.१.१.)
(४) दीप्तियुक्त, अणुपेक्षाही सूक्ष्म, सर्व जग व त्यातील प्राणी ज्यात आहेत, ते हे अक्षरब्रह्म होय. त्रेच प्राण, वाणी आणि म्मन आहे.ते सत्य आणि अमृत आहे. तेच प्राप्तव्य आहे.ते तू प्राप्त कर. (२.१.२)
(५) हृदयात निर्दोष व निष्कल ब्रह्म आहे. ते शुभ्र व अत्यंत तेजस्वी असणारे ब्रह्म ब्रह्मवेत्ते जाणतात. तेथे सूर्य, चंद्र-तारका आणि वीज यांना प्रवेश नाही मग अग्नीला प्रवेश कुठला ? त्याच्यामुळे जग प्रकाशित होते.त्या ब्रह्मामुळे जग आहे. (२.२.१०,११).

पुढील भागात आणखी दोन-तीन उपनिषदे बघू.

शरद

सुंदर लेख !

खालील विधानावर चर्चा करु इच्छितो :

इथे शांकर अद्वैतातील "जगत्मिथ्या" ला फाटा मारला आहे

मागे आपण निर्देशित केल्याप्रमाणे आधी उपनिषदे आली आणि मग आचार्यांनी भाष्ये लिहिले , उलटे नाही , तस्मात , आचार्यांनी उपनिषदोक्त संकल्पनेला फाटा दिला आहे असे म्हणता येईल !

आचार्यांचया आधीचा आर्यसनातन वैदिक धर्म कोठेच सन्यास ( म्हणजे घर दार सोडुन जाणे ह्या अर्थाने ) हा शब्द वापरत नाही . उलट शंभर वर्शे जगणयाची इच्छा धरुन सर्व कर्मे निर्लिप्तपणे करत रहावीत असेच सुचवतो आणि पुढे जाऊन ह्याच्या शिवाय दुसरा पर्याय नाही असेही ठामपणे म्हणतो .

पण माणसाचे अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही मन गुंतते हा एकदम सार्वत्रिक आणि सार्वकालिक अनुभव आहे . जडभरताची गोष्ट आपण ऐकलीच आहे !! आणि म्हणूनच बहुतेक आचार्यांनी ह्या सार्‍या मोहातुन जाताना कायम स्मरण रहावे म्हणुन जगन्मिथ्या म्हणले असावे की जेणे करुन ह्या मिथ्या मायेतुन बाहेर पडणे जास्त अवघड जाऊ नये !

जोवर चित्तशुध्दी होवुन ब्रह्मं सत्यम ही धारणा दृढ होत नाही तो पर्यंत चित्तस्य शुध्दये कर्मः करणे भागच आहे ! आणि एकदा का ही धारणा दृढ झाली की तेन त्यक्तेन भुञ्जीथा: म्हणुन त्यागपुर्वक अलिप्तपणे भोग घेत रहाणे किंव्वा जगन्मिथ्या म्हणुन संन्यास घेणॅ हा ज्या त्या साधकाचा चॉईस आहे असे मला वाटते ! कारण योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः । यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दति एव ||

माझ्या मते आचार्य आणि त्यांच्या नंतर झालेले सरेच अद्वैती संत सनातन वैदिक धर्माच्या मुळ सिध्दांतांना (ईशावायमिदं वगैरे ) आचरणात आणण्यासाठी सोपे आणि अधिक सोपे करत गेले असावेत. असा माझा आपला एक अंदाज आहे !

कळावे .
लोभ असावा.

आपला विनम्र
प्रगो

 महावाक्ये
उपनिषदांमधील तत्वज्ञानाचे सार असलेली काही वाक्ये "महावाक्ये" म्हणून प्रसिद्ध आहेत. आद्य शंकराचार्यांपासून अनेकांनी त्यावर विवरणे/भाष्ये लिहली आहेत. उपनिषदांचे सार काय ? आत्मा व ब्रह्म यांचे ऐक्य. हे एकत्व निरनिराळ्या उपनिषदांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले आहे.

पुढील वाक्यांना महावाक्ये म्हणतात.
(१) प्रज्ञानं ब्रह्म. ऐतरेय उपनिषद (३.३)
(२) अहं ब्रह्मास्मि बृहदारण्यक उपनिषद (१.४.१०)
(३) तत्वमसि छांदोग्य उपनिषद ( ६.८.७, ९.४, १०.३, ११.२ इत्यादि)
(४) अयमात्मा ब्रह्म मांडुक्य उपनिषद (१.२)

प्रज्ञानं ब्रह्म
ऐतरेय उपनिषदाची उपपत्ती आहे " सृष्टीतील समस्त स्थावर-जंगम वस्तू, पृथ्वीवरील समस्त प्राणी, आकाशातील समस्त पक्षी, तसेच समस्त पंचमहाभूते आणि देवता ही सारी "प्रज्ञे"मध्ये अंतर्भूत होतात आणि प्रज्ञेमुळेच ती जिवंत राहतात." मनाच्या आश्रयावाचून राहू शकणारी एकही स्वतंत्र वस्तू इहलोकी अस्तित्वात नाही. संज्ञान, अज्ञान, प्रज्ञान, मेधा, दृष्टि, धृति, मति, मनिषा, ससंकल्प, ऋतु, प्राण, इ. मनोवृत्तीही "चित्त" चीच नामांतरे होत. चित्त (चैतन्य) किंवा प्रज्ञा हे मनोभावनांचेच नव्हे तर ब्रह्माचेही अधिष्ठान आहे असा सिद्धांत येथे विशद केला आहे.प्रत्येक शरीरात शरीरेंद्रियसमुहापेक्षा विलक्षण असलेले हे चैतन्यच ब्रह्म होय.

अहं ब्रह्मास्मि
"अहं" म्हणजे "मी" नव्हे. मी, माझा असे म्हणणे म्हणजे अहंभाव. हा सोडून दिला पाहिजे. शरीराला वगळले म्हणजे काय उरते ? शरीरातील चैतन्य हे चैतन्य म्हणजेच आत्मा. हा आत्मा सर्वत्र आहे. आणि म्हणूनच आत्मा म्हणजेच ब्रह्म. अहं ब्रह्मास्मि याचा अर्थ आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत.

तत्त्वमसि
सृष्टीच्यापूर्वी जी वस्तु होती व नंतरही राहणार आहे ती वस्तु म्हणजेच "तत्" थोडक्यात "ब्रह्म" "त्वम्" म्हणजे "तू". वर पाहिल्याप्रमाणे तू म्हणजे तुझे शरीर नव्हे तर तुझ्या शरीरातील आत्मा. असि म्हणजे आहेस.
आरुणि ऋषी आपल्या मुलाला, श्वेतकेतूला निनिराळी उदाहरणे देवून सांगत आहेत की ब्रह्म (तत्) व आत्मा (त्वम्) एकच आहेत (असि)

अयमात्मा ब्रह्म
मांडुक्य उपनिषदात "ॐ" चे चार पद कल्पिले आहेत. अ, उ, म व तुरीय. त्यांचे काल भूत, वर्तमान, भविष्य व कालातीत. चतुर्विध मानसिक अवस्था "जागृति’, "स्वप्न", "सुषुप्ति" व "तुरीय" यांचेच विवरण येथे केले आहे. ॐ हा आत्म्याचेच वर्णन करत असला तरी त्याचा चतुर्थपाद हा स्वप्रकाशरूप व अपरोक्ष (प्रत्यक्ष) आहे.त्याला अयम् म्हटले असून हा आत्मा ब्रह्मच आहे असे प्रतिपादले आहे.

चारही महावाक्ये एकच गोष्ट वेगवेगळ्य़ा प्रकारांनी सांगतात. हत्तीची गोष्ट सर्वशृत आहेच, कुणी सोंड तर कुणी शेपुट वर्णन करतो, तसेच.
पुढील भागात उपसंहार करून निरोप घेतो. (हुss ष्य..ऐकले बरे का !}
शरद

 

मी महावाक्ये वेदांमध्ये येतात असे ऐकुन होतो मात्र नक्की कोणत्या भागात हे माहीत नव्हते. आज कन्फर्म झाले :)

अवांतर: ह्या लेखावरुन काही गोष्ठी आठवल्या :

अहं ब्रह्मास्मि "अहं" म्हणजे "मी" नव्हे. मी, माझा असे म्हणणे म्हणजे अहंभाव.

सेम असाच , अगदी हाच उल्लेख समर्थांच्या साहित्यात येतो :
अहं ब्रह्मास्मि हा गाथा | आला देह बुध्दीचिया माथा|
देह बुध्दीने परमार्था | कानकोंडे होईजे || श्रीराम ||

महावाक्ये एकदम सारभुत आहे , पण सगळ्यांना त्याचा खरा अर्थ समजतो असे नाही , रादर लोकं भलताच गैरसमज करुन घेतात , आणि कदाचित म्हणुनच सनातन धर्माने उपनिषदांचा , ब्रह्मसुत्रांच्या अभ्यासाला मर्यादा घातल्या असाव्यात असे वाटते .

महावाक्यांचा उपदेश सार | परी घेतला पाहिजे विचार |
त्यांच्या जपे अंधःकार | न फिटे भ्रांतीचा ||

:)

बाकी उगाचच कोणीतरी काही म्हणाले म्हणुन लेखन आवरते घेवु नये ही अत्यंत नम्र विनंती. आधीच सनातन वैदिक धर्माचा अभ्यास करणारे मोजकेच लोक उरले आहेत , शिवाय आमच्या सरख्या कॉर्पोरेट गुलामांना बृहदारण्यक , छांदोग्य सारख्या विशाल उपनिषदांचा अभ्यास करायला कधी वेळ मिळाणार ? किमान प्रत्येक उपनिषदावर सारभुत असा एक एक लेख तरी लिहाच अशी आग्रहाची विनंती आहे .

उपनिषदांनी आम्हाला काय दिले ?

उपसंहार

आत्मा, ब्रह्म या संज्ञांप्रमाणे प्राण, सत्-असत् इत्यादींची माहिती देणेही आवडले असते पण उपनिषद-सागरातून किती घागरी उपसत बसलो तरी ते न संपणारे काम असल्याने आज उपसंहारात दोन तीन विषयाची चर्चा करू.
(१) एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति ऋग्वेद १.१६४.४६
(२) विसंवादी मते
(३) उपनिषदांनी काय दिले ?

(१) एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति
उपनिषदे ही काही कोण्या पंडिताने एखादा सिद्धात पटवून देण्याकरिता लिहलेले खंडन-मंडनात्मक
लेखन नव्हे अरण्यातील आश्रमात, मूलभूत पराविद्येचा-ब्रह्मविद्येचा शोध घेतांना, .ऋषींच्या मनात स्फुरलेल्या विचारांचे ते संकलन होय. हे उत्स्फुर्त विचार निरनिराळ्य़ा ठिकाणी, वेगवेगळ्य़ा काळात, अनेकांनी मांडले आहेत. त्यामुळे त्यांच्यात एकवाक्यता नाही. तसे शक्यच नव्हते. एकदाच असे घडले की उद्दालक आरुणि ह्या गुरूचे शिष्य याज्ञवल्क्य या दोघांनी अनुक्रमे छांदोग्य उपनिषद व ईशावास्य-बृहदारण्यक ही उपनिषदे लिहली. याज्ञवल्क्यांनी आपल्या गुरूचे पटलेले विषय शिरोधार्य मानले पण स्वत:चे स्वतंत्र विचारच आपल्या लेखनात मांडले. ऋग्वेदात म्हटले की "एकच सत् " विद्वान अनेक प्रकारांनी वर्णतात. त्याला अग्नि, यम वायू असे संबोधितात. मागील "महावाक्ये" या लेखात आपण पाहिले की "आत्मा-ब्रह्म यांचे एकत्व " ही कल्पना चौघांनी चार प्रकारे वर्णिली. असे हे विचारही कोणी गद्यात मांडले, कोणी पद्यात तर कोणी गद्य-पद्यात. कुठे प्रश्न व त्यांची उत्तरे सरळसरळ दिली आहेत तर कुठे प्रश्न विचारले आहेत असे धरून त्यांची उत्तरेच दिली आहेत..आता काय झाले आहे की या वेगवेगळ्या विचारसरणींमुळे काही विसंगती समोर येतात. त्याचाही विचार करावयास पाहिजे.

(२) विसंवादी मते

आज मी फक्त दोन तीन महत्वाचे मुद्दे येथे देणार आहे.

(१) ब्रह्म हे अविकारी आहे असे सार्वत्रिक मत आहे. हे जर स्विकारले तर छांदोग्य (३.१४.१) "सर्वं खल्विदं ब्रह्म....." येथे स्पष्टच म्हटले की हे सर्व चराचर जग ब्रह्ममय आहे. ब्रह्मातच याची उत्पत्ती, स्थिती व लय होतो.
आता ह्या दोन गोष्टी परस्परविरोधी वाटतात की नाही ? एकदा जगाला "ब्रह्म" म्हटले की त्याची उत्पत्ती वा लय कसे शक्य आहे ? असो. इथे यात फार वेळ न मोडता पुढे जावू.

(२) जगदोत्पत्ती हा असाच एक चक्रावणारा विषय आहे. ऋग्वेदातील नासदीय सूक्तात म्हटले आहे जगाच्या मूलारंभी "सत्" ही नव्हते आणि "असत्" ही नव्हते. सर्वत्र काळोख एखाद्या महासागराप्रमाणे भरून राहिला होता.
हाच धागा उचलून तैत्तिरीय उपनिषदात (२.७.१) म्हटले आहे "आरंभी हे सारे जग "असत्" होते. त्यापासून "सत्" झाले. त्यातून हे जग निर्माण झाले. ठीक. आता छांदोग्य (६.२.१,२,३) काय म्हणते ते पाहू. आरुणी म्हंणतात " बाळा, उत्पत्तीपूर्वी केवळ "सत्" होते. काही (विद्वान) म्हणतात, त्यापूर्वी केवळ "असत्" च होते. त्या "असत्" पासून "सत्" झाले. परंतु बाळा, असे कसे असेल ? "असत्" पासून (अभावापासून) "सत्" (भाव) कसे निर्माण होईल ? म्हणून हे बाळा, (उत्पत्ति) पूर्वी "सत्" असावे. त्या "सत्"ला वाटले की आपण विविध रूपे धारण करावीत म्हणून त्याने तेजाची, तेजाने जलाची, जलाने अन्नाची ..इत्यादी. दोन अगदी एकमेकाविरोधी मते.

(३) आता "सत्" ने जग कसे निर्माण केले याबद्दलही एकमत दिसत नाही. आपण काही उपनिषदे काय म्हणतात ते पाहू

"छांदोग्य" प्रमाणे "सत्" ने प्रथम तेजाची निर्मिती केली. तेजापासून जल, जलापासून अन्न.(६,२,३)

"ऐतरेय" प्रमाणे आत्म्याने "अंभ"(जल), अंतरिक्ष", त्यात मेघ, त्याखाली पृथ्वी व त्याखाली जल (१,१,२)

"तैतरीय" प्रमाणे ब्रह्मा पासून आकाश निर्माण झाले, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नि, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी,,, पंचमहाभूतांपासून जग झाले. इथे महत्वाचे म्हणजे पंचमहाभूते "निर्माण केली" नसून "निर्माण झाली" आहेत. सहज निर्माण झाली, केलेली नाहीत मायावादी अद्वैतापेक्षा अधिक वास्तववादी. (२.१)

" मुंडक " प्रमाणे " कोळी तंतू उत्पन्न करतो व पुन्हा ते परत घेतो; किंवा पृथ्वीवर जशा औषधी (वनस्पती) निर्माण होतात ,शरीरावर जसे लव व केस उत्पन्न होतात, तसे अक्षरब्रह्मापासून जग निर्माण होते."

" प्रश्न " प्रमाणे प्रजापतीने तप केले.तप करून एक जोडपे उत्पन्न केले. रयि व प्राण ही त्यांची नावे होत. या जोडप्याने अनेक प्रकारची प्रजा निर्माण केली. (१.२.४).

आता आजच्या प्रमुख भागाकडॆ वळू

उपनिषदांनी आम्हाला काय दिले ?

(१) याज्ञिक कर्मकांडापासून मुक्तता दिली. स्वतंत्र विचार करावयास शिकवले. विचार स्वातंत्र्य दिले.
(२) परा (ब्रह्म) विद्येचा शोध घ्यावयाचा असेल तर जड जगापासून दृष्टि वळवून मनाकडे पाहिले पाहिजे हे शिकवले.
(३) शरीरसदृश देवापासून एकदम वेगळी अशी निर्गुण, निराकार ब्रह्माची कल्पना दिली.
(४) शरीरात आत्म्याची कल्पना केली.
(५) आत्मा व ब्रह्म यांचे एकत्व सिद्ध केले. त्यामुळे मी (एक वैयक्तिक माणुस) आणि ब्रह्मांड (आजुबाजूची माणसे व परिसर) यांच्यामध्ये एक दुवा निर्माण केला.

(६) उपनिषदांत ऋषींनी निरनिराळी मते मांडल्यामुळे पुढे दर्शने लिहणार्‍यांची फारच सोय झाली. सांख्य, योग, द्वैत-अद्वैत कोणतेही दर्शन घ्या. प्रत्येकाला आपल सिद्धांत मांडतांना पूर्वासूरींचे मत म्हणून एखादे तरी उपनिषद उर्धृत करता येवू लागले. वेदांचे ज्ञानकांड मानले गेलेले उपनिषद हाताशी असणे फार फार महत्वाचे होते. उपनिषदांना दर्शनांची "गंगोत्री" म्हणतात. आणि बौद्ध दर्शनासारखे अवैदिक दर्शनही ह्याला अपवाद नाही.

(७) "संन्यास" आश्रमाचा स्पष्ट निर्देश सर्व वैदिक व उपनिषत्साहित्यात प्रथम मुंडक उपनिषदांत आढळतो. संन्यासाश्रमाची प्रशंसा येथे केली आहे. भारतीय संस्कृतीत हे महत्वाचे पर्व आहे.

(८) नीती व आहार यांच्याबद्दल उपनिषदात बरीच चर्चा आहे. माणसाने नीतीमान असलेच पाहिजे हा आग्रह आहे. तीच गोष्ट "सत्या"बद्दल. सत्य हे सर्वश्रेष्ठ मानले आहे. "सत्यमेव जयति" हा संदेश आहे. आहाराचा .नेहमीच्या वागणुकीवर होणारा परिणाम सांगून योग्य आहाराचे महत्व वर्णिले आहे.

(९) कथा व संवाद
गोष्टी ह्या जनसामान्यांचा विरंगुळ्यचा एक भाग. तत्वज्ञानाच्या गहन अरण्यात त्या कोठून सापडणार? खरे आहे. पण उपनिषत्कारांनी तिथेही आपल्या प्रतिभेचा आविष्कार दाखविला. त्यांनी आपला विषय समजण्यास सोपा व्हावा व लक्षात पक्का रहावा म्हणून संवादरूपात उपनिषदे लिहली व त्यात भरपूर कथाही दिल्या.

(१०) उपनिषदांनी आम्हाला भगवत्गीता दिली.

एक सुरेख श्लोक आहे
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन:!
पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं मह्त् : !
!

सगळी उपनिषदे म्हणजे जणु गाईच., त्यांची धार काढणारा गवळी (तो तर साक्षात श्रीकृष्ण). ते अमृतसमान दूध ,गीता. बुद्धीमान बाळ अर्जुन ,याने त्याचे सेवन केले.,
गवळ्याच्या पोराची कमाल पहा. निरनिराळी मते मांडणार्‍या उपनिषदांमधून एक सुसंगत सूत्र शोधण्याचा प्रयत्न करावायाचा होता. सर्वसामान्य लोकांकरिता (अर्जुन त्यातला एक) तो पार पडलाही. आज गीतेत तुम्हाला अनेक उपनिषदांचे स्रार एकत्र पहावयास मिळते

मित्र हो, मोठा अवघड विषय. खरे म्हणजे अभ्यासू माणसाला आयुष्यभर पुरणारा. पण येथील वाचकांना निदान तोंडओळख व्हावी एवढ्या माफक उद्देशाने लिहलेले हे लेख. गोड मानून घ्या.

शरद .

ईशावास्योपनिषद

ईशावास्योपनिषद हे दशोपनिषदातील सर्वप्रथम असून आद्य शंकराचार्यांचे याच्यावर भाष्य आहे. .हे शुक्ल यजुर्वेदाचे उपनिषद आहे. हे एकमेव उपनिषद संहितेत असून इतर ब्राह्मणे-आरण्यके यांत आहेत. म्हणून हे जास्त पवित्र मानले जाते. बुद्धीवादी, थोर महर्षि योगीराज याज्ञवल्क्य हे कर्ते. शुक्ल यजुर्वेदाचा चाळीसावा अध्याय म्हणजे हे उपनिषद. यज्ञ म्हणजे कर्म आणि उपनिषदे म्हणजे ज्ञान. कर्म श्रेष्ठ की ज्ञान श्रेष्ठ हा वाद निर्माण झाला असता याज्ञवल्क्यांनी या उपनिषदात "ज्ञान-कर्म समुच्चया"चे तत्व प्रतिपादन केले. फार महत्वाचा विचार. उत्तरकालीन वैदिक साहित्यात निर्देशिलेल्या बत्तीस विद्यांमध्ये या उपनिषदातील पहिले सात मंत्र "ईश विद्या" म्हणून ओळखले जातात. यात अठरा मंत्र असून हे संपूर्ण पद्य उपनिषद आहे .कालखंडाप्रमाणे प्राचीन दुसर्‍या खंडात मोडते. खरे म्हणजे बृहदारण्यक या प्राचीनतम उपनिषदाचे आणि याचे कर्ते एकच असल्याने पहिल्या खंडातच टाकले पाहिजे.

आता उपनिषदाकडे वळू.

शान्तिमंत्र आहे

ॐ पूर्णमद: पूर्णमिदम् पूर्णात्पूर्णमुदच्यते !!
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते !!

अर्थ: हे ब्रह्म पूर्ण आहे. (त्यातून निर्माण झालेले) हे विश्व पूर्ण आहे. पूर्णातून पूर्णच निर्माण होते. पूर्णातून पूर्ण वजा केले तरी पूर्णच राहणार. पूर्ण ब्रह्मातून पूर्ण विश्व वजा केले, काढून टाकले तरी पूर्णच शिल्लक राहणार.

इथे विश्वाला ब्रह्मासारखेच "पूर्ण" म्हटले आहे. "जगन्मिथ्या " असे नाही. शांकरमताच्या विरुद्ध असे मत इथे स्पष्टपणे मांडले आहे. माऊलीसुद्धा जगाला ब्रह्माचा "विलास" मानते. मिथ्या नाही.

पहिला मंत्र आहे
ईशावास्यमिद सर्वम् यत्किं च जगत्यां जगत् !!
तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृध: कस्यस्विद्धनम् !! (१)

पहिल्या दोन शब्दांवरून उपनिषदाला हे नाव दिले.

सर्व जग ईश्वरमय आहे.त्याचा त्यागपूर्वक उपभोग घ्या. थोडासुद्धा अपहार करू नका.
इथे उपभोग घेण्यास विरोध नाही. फक्त त्यात गुंतू नका; त्यागाचीही भावना मनात पाहिजे असे सांगितले आहे. नीतीचा उपदेश लक्षात घेण्यासारखा आहे. परत एकदा जगाला ईश्वरमय म्हटले आहे.
दुसर्‍या श्लोकात कर्मप्रशंसा, तिसर्‍यात अज्ञाननिंदा आणि चथा-पाचवा यात आत्मस्वरूप वर्णन केले आहे,

वस्तु सर्वाणि भुतानि आत्मन्नेवानुपश्यति !!
सर्वभूतेषु चात्मानम् ततो न विजुगुप्सते !! (६)

"ज्ञाता"बद्दल म्हटले आहे : जो ज्ञाता सर्व जग स्वत:मध्ये बघतो; तसेच सर्व जगात आपल्याला पाहतो, तो कशाचाच तिरस्कार करत नाही. माझ्यातील आत्मा आणि सर्वभूतांतला आत्मा एकच असे समजल्यावर तिरस्कार कुणाचा करणार ? संत म्हणतात "जे जे भूत भेटते, त्याच्यात भगवंत दिसतो". हा एकात्मतेचा साक्षात्कार आहे.

आता "आत्म्या"चे वर्णन बघा.

सपर्यगाच्छुक्रमकायमव्रणम् !
अस्नअविर शुद्धमपापविद्धम् !!
कविर्मनीषे परिभू: स्वयंभू: !
याथातथ्यतोsर्थान् व्यदधाच्छाश्वतीभ्य: समाभ्य: !! (८)

आत्मा सर्वव्यापी, शुद्ध, शरीररहित, अखंड, स्नायूरहित, निर्मल, पापरहित, द्रष्टा, सर्वज्ञ, सर्वश्रेठ आणि स्वयंभू आहे. त्याने जगाला यथार्थ ज्ञान दिले.
इथे दिलेली आत्म्याची विशेषणे नंतर सर्वांनी वापरली. महत्वाचे आत्मा जगाला "यतार्थ ज्ञान" देतो इथे आहे. उपनिषदे म्हणजे ऋषींचे उत्स्फुर्त उद्गार असे म्हटले जाते तेव्हा ही उत्स्फुर्तता म्हणजे आत्म्याने दिलेले यतार्थ ज्ञानच होय.

पुढील सहा मंत्रात कर्म व ज्ञान यांचा समन्वय ग्रथित केला आहे.

अन्धं तम: प्रविशन्ति येsविद्यामुपासते !
ततो भूव इव ते तमो च्च उ विद्याया:रता: !! (९)

ज्ञान म्हणजे विद्या व कर्म म्हणजे अविद्या. केवळ अविद्या उपयोगी नाही हे कळू शकते पण केवळ विद्यासुद्धा उपयोगाची नाही जे कर्मच करत राहतात ते अज्ञानात प्रवेश करतात व विद्या म्हणजे ज्ञानच संपादन करतात तेही अज्ञानातच प्रवेश करतात

अन्यदेवाहुर्विद्यया अन्यदाहुरविद्यया !
इति शुश्रुम धीराणाम् ये नस्तद्विचचक्षिरे !! (१०)

केवळ कर्म किंवा केवळ ज्ञान याच्यापेक्षा प्राप्तव्य वेगळेच आहे हे प्राप्तव्य ज्ञान व कर्म या दोहोंच्या समुच्चायाने साधते

विद्यांचाविद्यां च यस्यद्वेद्वोभयं सह !
अविद्यया मृत्युंतीर्त्वा विद्ययाsमृतमश्नुते !! (११)

जो ज्ञान व कर्म हे दोन्ही एकत्र जाणतो, तो कर्माने मृत्यू टाळतो व ज्ञानाने अमर होतो

अन्धं तम: प्रविश्यन्ति येsसंभूतिमुपासते !
ततो भूय इव ते तमो य् उ संभूत्यां रता: !!

जे केवळ अव्यक्त प्रकृतीची उपासना करतात ते अंधारात प्रवेशमान होतात. त्याचप्रमाणे जे कारणरूप ब्रह्माची उपासना करतात ते सुद्धा अंधारातच प्रवेश करतात.(१२)

जरा अध्यात्म सोडून जगरीतीकडे बघा. लोकांचे कल्याण हे प्राप्तव्य. शिकले-सवरलेले विद्वान राजकारणात प्रवेश न करता, लोकांत न मिसळता, हे करावयास पाहिजे ते करावयास पाहिजे असे नुसते बडबडत राहतात. काम काहीच करत नाहीत ,हे झाले "ज्ञान". प्राप्तव्य दूरच राहते. गुंड राजकारणात धुडगुस घालतात. काही कामे करतात, हे झाले कर्म. पण लोककल्याण दूरच राहते.
आणखी असे पहा, ज्ञानेश्वर-तुकाराम यांना या जगात काही, मिळवावयाचे नव्हते. इच्छाही नव्हती. मग ते अज्ञानी लोकांच्या कल्याणाकरिता आयुष्यभर का झटत राहिले ? हे कर्म त्यांनी स्वेच्छेने स्विकारले. त्यांनी ज्ञान आणि कर्म यांचा समुच्चय आचरणात आणून लोकांसमोर आदर्श ठेवला.

मंत्र १४ ते १८ मध्ये मृत्युसमयीची प्रार्थना आहे. त्यातील दोन उल्लेखनीय गोष्टी (१) "हे सूर्या, तुझे जे ब्रह्मस्वरूप आहे, तो मी आहे." इथे मी(=माझ्या शरीरातील आत्मा) हा ब्रह्मस्वरूप आहे याची जाण आहे (२) "माझे शरीर जळून भस्म होवो" इथे प्रेतदहनाची चाल रूढ झाल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र संन्याशाचे प्रेत पुरण्याची चाल होती.

.
इशावास्योपनिषदाचे थोडक्यात तत्वज्ञान
(१) ऐहिक सुखांचा त्याग ही मिथ्या कल्पना. हा त्याग संन्याशाश्रमात करावा.
(२) सुखाचा उपभोग हा कोणताही अपहार न करता, त्यागाची भावना जागृत ठेवून घ्यावयाचा.
(३) असे कर्म करत १०० वर्षे जगा.
(4) ज्ञाता जग स्वतामध्ये पाहतो, सर्व जगाला आपल्यात बघतो, कोणाचा तिरस्कार करत नाही
(5) फक्त कर्म करणारे आणि केवळ ज्ञान मिळवणारे दोघेही अंधारात, अज्ञानातच प्रवेश करतात
(6 ) जो व्यक्त आणि अव्यक्त दोन्ही एकाच वेळी जाणतो तो मृत्यू टाळून अमरत्व मिळवतो
(7) मी ब्रह्मस्वरूप आहे..
(8) .हे अग्ने, कर्मफळ भोगण्यासाठी मला चांगल्या मार्गाने ने, माझे पाप नष्ट कर.

मित्र हो,
(१) एखाद्या उपनिषदाचा परिचय करून देतांना, एकसंधता राखण्यासाठी, मागील लेखांतील काही भाग परत येईल .द्विरुक्ती अटळ आहे.
(२) काही वाचकांच्या सागण्यावरून संस्कृत श्लोक दिले आहेत. पण खरच त्यांची गरज आहे का ?
शरद

 अभ्यासु लोकांसाठी खालील लिंक :
ईशावास्योपनिषद शांकर भाष्य - http://sanskritdocuments.org/doc_upanishhat/Ishaa_bhaashhya_Shankar.html...
मराठी भाषांतर स्क्रिब्ड.चोम वर उपलब्ध आहे पण त्याची लिन्क देता येत नाहीये !

एक शंका आहे - शांतीमंत्र हा उपनिषदाचा भाग मानला जातो का ?
(पुर्णमदः ह्या शांतीमंत्रावर नुकताच जोरदार काथ्याकुट होवुन गुरुदेवांचा दुसरा आयडी उडवल्या गेलेला आहे , तस्मात त्यावर चर्चा करणे टाळतो =)))) )

 

शरदराव, वेद आणि उपनिषदांमधील श्लोकाच्या आधी ॐ हे अक्षर का लिहीले जाते/म्हटले जाते याबद्दल काही लिहू शकाल का? आंतरजालावर शोधले असता लक्षात येते की या अक्षराबद्दल लोकांच्या काहीच्या काही कल्पना आहेत. उदा हे पहा:

ॐ एक पवित्र ध्वनी है. ॐ अनंत शक्ति का प्रतीक है. ॐ तीन अक्षरों से मिलकर बना है. अ उ म. अ का मतलब होता है आविर्भाव या उत्पन्न होना, उ का मतलब है उठना, उड़ना या विकास, मैं का अर्थ होता है मौन हो जाना अर्थात ब्रह्मलीन हो जाना. ॐ संपूरण ब्रह्माण्ड की उत्पति और पूरी सृष्टी का धौतक है. ॐ धर्म, अर्थ, काम, मोक्ष का प्रदायक है. सिर्फ ॐ का जाप करने से कई साधकों को अपने उद्देश्य की प्राप्ति हुई है. कोशीतकी ऋषि को कोई सन्तान नहीं थी. उन्होंने सूर्य का ध्यान करके ॐ का जाप किया. ॐ का जाप करने से उन्हें पुत्र की प्राप्ति हुई. गोपथ ब्राह्मण ग्रन्थ के अनुसार जो कुश के आसन पर बैठकर पूर्व की और मुँह करके एक हजार बार ॐ का जाप करने से सब कार्य सिद्ध हो जाते हैं.

ॐ के उच्चारण से होने वाले शारीरिक लाभ---

1. कई बार ॐ का उच्चारण करने से शरीर का तनाव दूर हो जाता है.
2. गभराहट या अधीरता महसूस हो रही हो तो ॐ के उच्चारण से आराम मिलता है.
3. ॐ का उच्चारण करने से शरीर के विषैले तत्व दूर हो जाते है. तनाव के कारण पैदा होने वाले तत्वों नियंत्रित करता है.
4. ॐ के उच्चारण से ह्रदय और खून का प्रवाह ठीक से होता है.
5. ॐ का उच्चारण करने से पाचन शक्ति बढती है.
6. ॐ का उच्चारण करने से शरीर में स्फूर्ति आती है.
7. ॐ के उच्चारण से थकान दूर हो जाती है.
8. ॐ का उच्चारण करने से नींद न आने की समस्या दूर हो जाती है. रात के समय नींद आने तक मन ही मन में ॐ का उच्चारण करने से नींद अच्छी आती है.
9. प्राणयाम के साथ ॐ का उचारण करने से फेफड़े मजबूत हो जाते हैं.
10. ॐ के पहले शब्द का उच्चारण करने से कंपन पैदा होता है. इस कंपन से रीड की हड्डी को लाभ मिलता है और रीड की हड्डी की कार्य करने की शक्ति बड जाती है.
11. ॐ के दूसरे शब्द का उच्चारण करने से गले में कंपन होता है. इससे थायरोइड ग्रंथी प्रभावित होती हैं.

http://www.jagrantoday.com/2015/08/chanting-aum-om-power-aum-ke-jaap-ki....

 

केनोपनिषद
केनोपनिषद हे दशोपनिषदापैकी द्वितीय असून आद्य शंकराचार्यांनी त्यावर भाष्य लिहले आहे. प्रणेते ऋषींचे नाव माहीत नाही. हे सामवेदाच्या तलवकार शाखेचे उपनिषद असून या शाखेचा एकमेव उपलब्ध ग्रंथ आहे हा तलवकार ब्राह्मणाचा नववा अध्याय आहे. याला ब्राह्मोपनिषद असेही नाव आहे. पहिल्या मंत्राची सुरवात "केनेचितम् पतति" अशी असल्याने याचे "केनोपनिषद" असे पडले. एकूण ३५ मंत्र असून चार खंडात विभाजन केले आहे. क्रमवारीने ९, ५, १२ व ९ मंत्र असून पहिले दोन खंड पद्यमय आणि शेवटचे दोन गद्यमय आहेत.

पहिल्या दोन खंडात शिष्य गुरूंना प्रश्न विचारतो व गुरू त्याला उत्तर देतात.. उपनिषदातील महत्वाच्या तत्वज्ञानाचा भाग इथे आहे. तिसर्‍या व चौथ्या खंडात ब्रह्माचे महत्व विशद करणारी एक गोष्ट आहे. ब्रह्मापुढे देवता कशा निष्प्रभ होतात ते कथेत वर्णन केले आहे.

प्रथम खंड

सुंदर स्त्री दिसली की डोळे तिकडे वळतात. गोड गाण्याकडे कान आकर्षतात. राग-लोभादि वेळी वाणी प्रगट होते. हे तर सर्वांना कळते. पण हे कृत्य इंद्रिये करतात का ? तसे दिसत नाही. आपण "काणाडोळा" केला म्हणतो तेव्हा हीच इंद्रिये तिकडे दुर्लक्ष करतात. ही मनाची करणी म्हटले तरी मन एकदा असे व एकादा तसे का करते याचे उत्तर मिळत नाही. शेवटी
एक प्रश्न अनुत्तरित राहतो. या मनाला, या इंद्रियांना, ही प्रेरणा कोण देतो ? हाच प्रश्न शिष्य आचार्यांना विचारतो.

ॐ केनेचितं पतति प्रेषितं मन: ! केन प्राण: प्रथम:प्रैति युक्त: !
केनेषितां वाचमिमां वदंति ! चक्षु: श्रोत्रं क उ देवो युनक्ति !! !! 1 !!

हे मन कोणापासून प्रेरणा घेऊन, कामनायुक्त होऊन आपल्या विषयामागे जाते ? कोणाकडून चालना घेऊन प्रथम प्राणाचे स्पंदन होते ? वाणी कोणाच्या सत्तेने बोलते ? कोणता देव डोळ्यांना व कानांना प्रेरणा देतो ?

लक्षात घ्या, शिष्याला या देहाबाहेरची कोणी तरी शक्ती हे काम करत असावी अशी अंधुक कल्पना आहे. आत्मा-ब्रह्म इत्यादीची फार माहिती नाही म्हणून कोणीतरी "देवता" ही प्रेरणा देत असावी असे त्याला वाटते. आचार्य त्याला उत्तर देतात.

श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यद्वाचो ह वाचं स उ प्राणस्य प्राण: !
चक्षुषश्चक्षुरतिमुच्य धीरा: प्रेत्यास्माल्लोकादमृता भवन्ति !! !! 2 !!

जो कानाचा कान, मनाचे मन, वाणीची वाणी आहे तोच प्राणाचा प्राण व डोळ्याचाही डोळा आहे.(असे जाणून )धैर्यवान पुरुष संसारापासून सुटून हा लोक पार करून अमर होतात

कानाचा कान असलेले, मनाचे मन असलेले, चैतन्य हेच प्राणाचा प्राण आहे., हा अंतस्थ आत्माच कानाच्या पाळीला, कानाच्या भोकाला ऐकण्याची शक्ती देतो. हे चैतन्य, हा आत्मा एकदा जाणला की इंद्रियांची, देहाची आसक्ति सोडून , "मी म्हणजे हा देह," हा भास सोडून, धैर्यवान माणसे संसारापासून सुटून, जन्म-मरणाचा फेरा नसल्याने अमर होतात.

न तत्र चक्षुर्गच्छति, न वाक् गच्छति, नो मन:!
न विद्मो न विजानिमो, यथैतदनुशिष्यात् !! !! 3 !!
अन्यदेव तद् विदितदथो अविदितादधि !
इति शुश्रुम पूर्वेषां ये नस्तद् व्याचचक्षिरे !! !! 4 !!

( जेथे आत्मा प्रवेश करतो, त्या ब्रह्मात))
तेथे नेत्र पोहोचत नाही, वाणीचा शिरकाव होत नाही, मन जात नाही, त्यामुळे कशा प्रकारे शिष्याला त्याचा उपदेश करावा ते आम्हाला समजत नाही. ते आमच्या लक्षात येत नाही. ते माहीत असल्यापेक्षा वेगळे व अज्ञाताहून पलिकडे आहे; असे आम्ही पूरातन पुरुषांकडून ऐकले आहे. त्यांनीच ते आम्हास समजावले होते..
जेथे वाणी पोचतच नाही, त्या ब्रह्माविषयी शिष्याला वाणीने माहिती देणार तरी कशी हा आचार्यांचा प्र्श्न आहे. ते ज्ञात-अज्ञात या दोहोंपलिकडचे आहे. आचार्यांच्या आधीच्या ज्ञानी लोकांनाही तोच अनुभव होता व तसेच त्यांनी संगितले होते.
एकोणिसाव्या शतकात रामकृष्णांवरही हाच प्रसंग ओढवला होता. त्यांना एकाने "समाधी" बद्दल विचारल्यावर ते म्हणाले " अरे, मलाही सांगावयाचे आहे, पण काय करू, शब्दच फुटत नाहीत." या क्षेत्रातील व्यक्तींचा हा कालाबाधित अनुभव दिसतो.

यद् वाचाsभ्युदितं येच वागभ्युद्यते !
तदेव ब्रह्म त्वं विद्धि, नेदं यदिदमुपासते !! !! 5 !!

जे वाणीने प्रकाशित होत नाही परंतु वाणी ज्याने प्रकाशित होते त्यालाच तू ब्रह्म (असे) जाण. ज्या (यज्ञदेवता व उपासना देवतां )ची लोक उपासना करितात त्या ते ब्रह्म नाही.

वाणीला चेतना देणारे ब्रह्म वाणीने प्रकाशित होणार नाही, त्याचे वर्णन वाणी करू शकणार नाही हे कळण्यासारखे आहे. जे वाणीला प्रेरणा देते ते ब्रह्म. हे सांगतांना आचार्यांना शिष्याच्या पहिल्या प्रश्नातील देवतांबद्दलचा संदेहही निपटून टाकावयाचा आहे. ते म्हणतात. उपासनादेवता या ब्रह्म नव्हेत.

यन्मनसा न मनुते येनाहुर्मनो मतं !
तदेव ब्रह्म त्वं विद्धि, नेदं यदिदमुपासते !! !! 6 !!
यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षूंषि पश्यति !
तदेव ब्रह्म त्वं विद्धि, नेदं यदिदमुपासते !! !! 7 !!
यच्छोत्रेण न शृणोति, येन श्रोत्रमिदं श्रुतम् !
तदेव ब्रह्म त्वं विद्धि, नेदं यदिदमुपासते !! !! 8 !!
यत्प्राणेन न प्र्रणिति, यन प्राण: प्रणीयते !
तदेव ब्रह्म त्वं विद्धि, नेदं यदिदमुपासते !! !! 9 !!
ज्याचे मनाने मनन करिता येत नाही पण ज्याचेमुळे मनाकडून मनन घडते असे म्हणतात, जे डोळ्याने पहाता येत नाही पण ज्याचेमुळे डोळे पाहू शकतात, जे कानाने ऐकता येत नाही पण ज्याचेमुळे कान ऐकू शकतात, जे श्वासोच्छ्वास करत नाही पण ज्यामुळे प्राण श्वासोच्छ्वास करतो, ते ब्रह्म होय. ज्याची लोक उपासना करतात, ते नव्हे

उपास्य देवता या ब्रह्म नव्हेत हे शिष्यावर खोलवर ठसवावयाचे आहे. शिष्याच्या प्रश्नातील डोळे. कान. वाणी , प्राण व मन या सर्वांबद्दल ते परत परत तेच ते सांगतात. हे पुन्हापुन्हा सांगण्याचे कारण सामान्य लोकांवर ह्या देवतांच्या सामर्थ्याबद्दल फार प्रभाव होता. काही पाहिजे असेल तर ते प्रार्थना करून ह्या देवतांकडून मिळेल यावर लोकांचा धृढ विश्वास होता. खोडून काढण्य़ासाठी पुनरावृत्ती.

द्वितीय खंड

यदि मन्यसे सुवेदेति दहरमेवापि, नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपम् !
यदवस्य त्वं वदस्य देवेषु, अत नु मीमांस्यमेव ते मन्ये विदितम् !! !!१!!

जर तुला "मी ब्रह्म चांगल्या रीतीने जाणतो " असे वाटत असेल तर,तू थोडेच जाणले आहेस, त्याचे जे रूप तू जांणतोस(आध्यात्मिक) व जे रूप देवतांना ठाऊक आहे (अधिदैविक) तेही अल्पच आहे. म्हणून तू ब्रह्मस्वरूपाचा अधिक विचार केला पाहिजेस.

नाहं मन्ये सुवेदिति, नो न वेदेतिवेद च !
यो नस्तद् वेद तद् वेद, नो न वेदेति वेद च !! !!२!!

जर ते झाल्याची खात्री वाटत नसेल, तर तुला ज्ञान झालेच असे समज. कारण ते ज्ञान झाले असे म्हणण्याच्या पलिकडे आहे.

ब्रह्माबद्दल विचार करताना, त्या बद्दल ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतांना एक मोठा धोका मुमुक्षुच्या मार्गात असतो. आचार्यांनी सांगितलेले मला समजले म्हणजे मला ब्रह्माचे ज्ञान झालेच अशी समजुत होणे सहज शक्य असते. आचार्य धोक्याच्चा कंदील दाखवतात. तुला कळले असे वाटत असेल तर तुला कळलेलेच नाही. पण अभ्यास करत राहिलास, परत परत करत राहिलास तर तुला वाटेल की आपल्याला ज्ञान झालेले नाही. त्या वेळीच तुला खरे ज्ञान झालेले असेल. ज्ञान होण्याच्य पलिकडे असलेले तेच तुला ज्ञान देईल.

यस्यामतं तस्य् मतं, मतं यस्य न वेदेअ स: !
अविज्ञातं विज्ञानतां, विज्ञातमविज्ञाताम् !! !!३!!

ज्या ज्ञात्याला ज्ञान झाले नाही असे वाटते, त्याला ज्ञान झाले असे मानावे. आणि ज्याला ज्ञान प्राप्त झाले असे वाटते, त्याला ज्ञान प्राप्त झाले नाही, असे मानावे.

प्रतिबोधविदितं मतममृतत्वे हि विन्दते !
आत्मना विन्दते वीर्यं, विद्यया विन्दतेsमृतम् !! !!४!!

संशयरहित ज्ञान ते ज्ञान होय. त्या ज्ञानाने मोक्ष मिळतो. ज्ञानामुळे सामर्थ्य प्राप्त होते व साक्षात्काराने मोक्ष मिळतो.

तृतीय खंड आणि चतुर्थ खंड

तिसर्‍या खंडात ब्रह्माचे महत्व सांगणारी एक कथा आहे.
देव-असूर युद्धात देवांचा विजय झाल्यावर देवांना वाटले की हा आपला पराक्रम आहे. तेव्हा आकाशात एक यक्ष (ब्रह्म) प्रगट झाले,. देवांना ते कोण आहे ते कळले नाही.म्हणून त्यांनी अग्नीला त्याच्याकडे चौकशीला पाठवले अग्नीने त्याला "तू कोण ?". असा प्रश्न केला यक्षाने विचारले म्हणून त्याने आपली ओळख जातवेदस अशी करून दिली. यक्षाने त्याला विचारले "तुझे वीर्य काय? तेव्हा अग्नी म्हणाला "मी हे सर्व जग जाळून टाकू शकतो." यक्षाने त्याच्या समोर एक गवताची काडी टाकली व म्हणाले "जाळ हीला". प्रयत्न करूनही अग्नीला ती काडी जाळता आली नाही. पराजित अग्नी माघारी आल्यावर इन्द्राने वायूला पाठविले. वायूने फुशारकी मारली की "मी जगालासुद्धा उडवून टाकेन " पण यक्षाने समोर टाकलेली गवताची काडी तो हलवूही शकला नाही. तो परत आल्यावर स्वत: इन्द्र यक्षाकडे गेला. पण त्याच्याशी एक शब्दही न बोलता यक्ष गुप्त झाले. नंतर आकाशात हैमवति उमा प्रगट झली. देवांनी विचारले "गुप्त झालेले हे कोण होते ?" उमाने सांगितले ते ब्रह्म होते व त्याच्यामुळे तुम्हाला विजय मिळाला, माहत्म्य प्राप्त झाले आहे. उमेच्या सांगण्यावरून या तिघांना ब्रह्माची ओळख झाली व ते इतर देवांहून श्रेष्ठ झाले.
विजेप्रमाणे ब्रह्म एकदा प्रगट झाले व लगेच गुप्त झाले. हा अधिदैवत पक्ष आहे. नंतर अध्यात्म पक्ष सांगितला जातो. मन ब्रह्म जाणते. पुन;पुन्हा त्याचे स्मरण करते. हा अध्यात्म पक्ष आहे. (४. ५.)

(थोडे विषयांतर. नेहमी शांतिमंत्रात तीनदा शान्ति: शान्ति: शान्ति:अशी म्हटले जाते . का ? त्रिविध तापांची शान्ति करावयाची असते: ही तीन तापे म्हणजे आधिदैविक ताप, आधिभौतिक ताप व आध्यात्मिक ताप. यांची लक्षणे
देवांपासून आधिदैविक ! .मानसताप आध्यात्मिक !
भूतांपासून तो भौतिक ! या नाव देख त्रिविध ताप ! एकनाथी भागवत.
वा
आपुलीच क्रिया आपणा बाधक ! आध्यात्मिक ताप तो !
पीडा जे भूतांपासून ! तो आधिभौतिक ताप जाण !
जितकी पीडा देवापासून ! आधिदैविक ताप तो.! वेदांतसूर्य (श्रीधर)
या तापत्रयीपासून सुटका व्हावी म्हणून शान्ति: शान्ति: शान्ति: असे म्हणावयाचे )

क्षणिक सहवासाने देवतांना ऊमेच्या मार्गदर्शनामुळे ब्रह्माची माहिती मिळाली हा झाला देवांचा "अधिदैवत" पक्ष. माणसांनी परत परत स्मरण करून ब्रह्म जाणावे. हा झाला माणसाचा "अध्यात्म" पक्ष. देवांना ऊमेचे मार्गदर्शन लाभले, मानवाने आचार्याकडून मिळवावे. देवतांना मिळते ते मर्त्य मानवालाही मिळू शकते, किती आश्वासक गोष्ट !

तस्यै तपो दम: कर्मेति प्रतिष्ठा !
वेदा: सर्वांगानि सत्यमायतनम् !!८!!

या उपनिषदाकरिता "तप","दम", "कर्म" ही पाया होत."वेद-वेदांगे" व "सत्य"हे त्या ब्रह्मविद्येचे स्थान होय.

यो व एतामेवं वेद ! अपहत्य पाप्माननन्तेस्वर्गे लोके
ज्येये प्रतितिष्ठति प्रतितिष्ठति !!९!!

जो हे केन उपनिषद आणि ब्रह्मविद्या जाणतो, त्याचे पाप दूर होते, तसेच तो स्वर्गात अनंतकाल सुखात राहतो

तत्वज्ञानाचे सार
(१) जगाचे आद्य मूळ आत्मा आहे.
(२) जो स्वत:ला ज्ञान झाले आहे असे समजतो, तो ज्ञान न झालेला असतो.
(३) निसर्गातील प्रत्येक घटनेमागे आणि मानवी हालचालीमागे ब्रह्माची शक्ती असते.
(४) हे सत्य जाणणे म्हणजे अमृतत्व मिळवणे होय.

शरद

यज्ञीय देवता म्हणजे वेदांतील देवता म्हटले तर वेदांत ब्रह्मा ही देवता नाही. उपनिषदांमध्ये मुंडकोपनिषदात "ब्रह्मा" किंवा ब्रह्मदेव याला विश्वकर्ता म्हटले आहे. त्याला अथर्वन नावाचा ज्येष्ठ पुत्रही आहे. "ब्रह्म" याला कोठेही पुत्र असल्याचे लिहलेले नाही. ब्रह्म कल्पनेतच ते शक्यही नाही. तेव्हा ’ब्रह्म आणि "ब्रह्मा/ब्रह्मदेव ’ यांचा एकमेकाशी संबंध दिसत नाही. यज्ञीय देवतात वेदांगे व पुराणे यातील देवताही स्विकारल्या तर त्यात ब्रह्मदेव येईल पण तरीही त्याचा व "ब्रह्म" चा संबंध नाही.

 

अविद्या
उपनिषदांचा परिचय करून देतांना ब्रह्म, आत्मा वगैरे संज्ञांची ओळख आपण करून घेतली होती. त्याच वेळी प्राण वगैरे इतर काहींची माहिती करून द्यावयाची होतीच. राहून गेले . आज एक महत्वाचा विषय "अविद्या" थोडा हाताळू.
अविद्येकडे वळावयाच्या आधी "विद्या" म्हणजे उपनिषदात काय म्हटले जाते हे पाहणे जरुरीचे आहे. उपनिषदकाली मूर्तिपूजा अस्तित्वात नव्हती. आदित्य अग्नि, चंद्र पंचमहाभुते, संहितादि ग्रंथ, यांच्याशी आचारधर्म निगडित होता. यातून "प्रतिकात्मक" उपासना सुरू झाली. ही प्रतिकोपासना हे "विद्या"चे सूत्र.
उपनिषदांत विद्या अनेक आहेत. त्यातील काही : ब्रह्म ,आत्मा, अक्षि, अग्नि, अंगुष्टमात्र, आनंदमय, ईश, उद्गीथ, गायत्री, दीर्घायुष्य, पुरुष, प्राण, बालाकि, भूमा, मधु, मंथ, मैत्रेयी, यज्ञ, वैश्वानर,संवर्ग इत्यादि

"अविद्या याचा अर्थ "विद्या नाही ती" अथवा "अपराविद्या" (कनिष्ष्ठ) असा नाही.

असत् वस्तू भासवणारी शक्ती म्हणजे अविद्या

वास्तविक जीवात्मा ब्रह्मापासून वेगळा नसताही जीवस्वरूप वेगळे दिसते, ते अविद्येमुळे. विश्व हे जसे मायाकार्य तसे जीव हे अविद्येचे कार्य होय. थोडक्यात पिण्डी अविद्या तसे ब्रह्मांण्डी माया.

ईशावास्यामध्ये कर्माला (कर्मकांडांना) अविद्या का म्हटले ? सरळ आहे. ही अविद्याच तुमची "ही कर्मे म्हणजे मोक्षाचा मार्ग" अशी फसवणुक करीत असते.

मित्र हो. आपल्या सगळ्यांचे संस्कृतचे ज्ञान काही उच्च दर्जाचे नाही. मान्य? तेव्हा आपले मराठी संत अविद्येबद्दल काय सांगतात ते बघू.

शिवीं जे योगमाया विख्याती !
जीवीं तीते अविद्या म्हणती !! (एकनाथी भागवत ३.१०३)

मायोपाधी ब्रह्म तो परमात्मा !
अविद्योपाधी ब्रह्म तो जीवु !! (विवेक सिंधु १५-३०)

माया-अविद्या असा जोडशब्दही वापरला जातो पण माया ही संज्ञा व्यापक असून अविद्या ही व्याप्त आहे.
माया अविद्या तेचि आरसे !
तेथ परब्रह्म प्रतिबिंब आपैसे !!
ते ईश्वर जीवु ऐसे.! तेथ बोलिले !! (वि.सिं. ७-.३)

माया परब्रह्माला परमात्म स्वरूपात आणते, तर अविद्या आत्म्याला जीवस्वरूपात बंदिस्त करते.

(एक नम्र विनंती. श्री समर्थांचे अभ्यासू समथांची मते इथे टाकतील काय ?)

अशी ही अविद्या. ती जीवाला बंधनात टाकत असली तरी परब्रह्माच्या संदर्भात तिला अस्तित्वच
नाही. माऊलींनी अनुभवामृतात अविद्याखंडणाकरता १०० पेक्षा जास्त ओव्या खर्ची घातल्या आहेत. ते अविद्या नावावार कोटी करून म्हणतात "जी नावातच विद्यमान नाही , ती असणार तरी कशी ?"
अविद्या येणे नावें ! मी विद्यमानचि नव्हे !!
हे अविद्याचि स्वभावे ! सांगतु असे !!

एकदा तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला की तुम्हाला बंधनात घालण्यास काही उरत नाही व मग बंधन घालणारी शक्तीही नसतेच. नेहमीचे उदाहरण म्हणजे सूर्याच्या संदर्भात अंधार नसतोच. अविद्या म्हणजे अज्ञान असे म्हटले की अज्ञान खंडण हे अविद्याखंडणच होते.. . .

हा छोटा लेख short break सारखा. पुढे आहे मुंडक उपनिषद .

शरद

 

मुण्डकोपनिषद
मुण्डकोपनिषद हे दशोपनिषदातील पंचम असून संन्यासाश्रमाचा पुरस्कार करणारे श्रेष्ठ, तत्वज्ञानपर उपनिषद असून भगवत्गीतेत याचा उपयोग केलेला दिसतो. अथर्ववेदाची तीन उपनिषदे, प्रश्न ,मुण्डक आणि माण्डुक्य. हे त्यांतील पूरातन. प्रश्न हे नंतर मुण्डकच्या स्पष्टीकरणा करता लिहले गेले असे दिसते. अंगिरस ऋषींचा शिष्य शौनक हा प्रणेता.
"संन्यासधर्माचा (मुंडण) पुरस्कार करणारे उपनिषद" अशा अर्थाने "मुंडक उपनिषद असे नाव पडले. या उपनिषदाचे तीन अध्याय (मुंडक) असून ६५ मंत्र आहेत. प्रथम मुंडक (९+१३=) २२; द्वितीय ((१०+१२=) २२ व तृतीय (१०+११=) २१ अशी विभागणी आहे.
या वेळी संस्कृत श्लोक महत्वाचे तेवढे देऊन तत्वज्ञान विचार सविस्तर पाहणार आहोत.

मुंडकोपनिषदात पुढील विषयांचा विचार केला आहे;

(१) परा व अपरा विद्या.
(२) ब्रह्माचे होकारात्मक-नकारात्मक वर्णन
(३) यज्ञनिंदा
(४) प्रणवध्यानाने आत्मज्ञानप्राप्ती
(५) द्वा सुपर्णा मंत्राचा अर्थ
(६) आत्मज्ञानासाठी संन्यासाश्रम आवष्यक
(७) सत्यद्वारा आत्मज्ञान
(८) आत्मा वर्णन
(९) आत्मानुभूति वर्णन
(१०) ब्रह्मविद्येचा उपदेश कोणाला ?

शौनक गुरू अंगिरस ऋषींना विचारतो " भगवन्, काय जाणले की सर्व जाणले जाते ?" अंगिरस म्हणाले "दोन जाणण्यासारख्या विद्या आहेत. एक परा विद्या व दुसरी अपरा (कनिष्ट)
विद्या.. चार वेद, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष (वेदांगे) इ. ही "अपरा विद्या" होय ब्रह्मज्ञान म्हणजे अक्षरविद्या ही "परा विद्या" होय. ते ब्रह्म अदृष्य, अग्राह्य, अगोत्र, वर्णरहित, डोळे-कान नसलेले, हातपाय नसलेले, नित्य, व्यापक, विविधरूपी, अतिसूक्ष्म, अव्यय , जगाचे उत्पत्तिस्थान अशा स्वरूपात ज्ञात्यांना कळते. कोळी तंतू उत्पन्न करतो व पुन्हा ते परत घेतो, पृथ्वीवर जशा वनस्पति निर्माण होतात, शरीरावर जसे लव व केस उत्पन्न होतात, तसे अक्षरब्रह्मापासून जग निर्माण होते." (१.१.६-७)

शौनकाला पडलेला प्रश्न नारदांनाही पडला होता व ते सनत्कुमारांकडे जाऊन म्हणाले की " मी वेद, पुराणे आदी (अपरा) विद्या शिकलो पण माझे समाधान झालेले नाही "(छांदोघ्य़ ७.१-५)
म्हणजे त्या काळीही विचारवंतांना यज्ञातील कर्मकांडाबद्दल संशय निर्माण झालेला होता.

अंगिरस पुढे अपरा विद्येचे वर्णन करतात " वेदांनी सुरू केलेली यज्ञातील "कर्मे" योग्य रीतीने पार पाडली की ती यजमानाला स्वर्गात नेतात. (पण त्याला तेथून परत पृथ्वीवर जन्म घ्यावाच लागतो) (१.१.४-५)

प्लवा ह्येते अदृढा यज्ञरूपा अष्तादशोक्तमवरं येषु कर्म !
पतत्च्छेयो येsभिनन्दन्ति मूढा जरा मृत्युं ते पुनरेवापुयन्ति !! (१.२.७)
(सोळा ऋत्विज्ञ, यजमान व पत्नी मिळून) अठरा जणांनी मिळून करावयाचे यज्ञरूप निकृष्ट कर्म संसारसागर तरून जाण्याला धोक्याच्या नावेसमान आहे. अज्ञानी लोक त्याचा आश्रय घेतात. त्यांना जरा-मृत्यू पुन:पुन्हा प्राप्त होतो.
उपनिषदात यज्ञातील कर्मकांडांची इतक्या स्पष्ट शब्दात निंदा केलेली इतरत्र आढळत नाही. त्या काळात तिकडे दुर्लक्ष करणे सोयिस्कर होते. उलट ईशावास्यात कर्म-ज्ञान यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. गंमत म्हणजे याज्ञवल्क्य समन्वय साधतात तर त्यांचे गुरू उद्दालक आरुणी या अपरा विद्येची संभावना " तू जे काही जाणतोस ते नाममात्र आहे. ते फक्त शाब्दिक ज्ञान आहे" अशी करतात. (छांदोग्य ७.१.३) थोडक्यात, उपनिषदांत या कनिष्ट (अपरा) विद्येबद्दल तुच्छताच आहे.
पुढे जाऊन ते म्हणतात, अविद्येत रमणारे, स्वत:ला कृतार्थ समजणारे कर्मठ तत्व जाणत नाहीत, त्यामुले ते दु:खी होऊन पतन पावतात. मूर्ख लोक यज्ञयागादि कर्मे, विहिरी -धर्मशाळा बांधणे अशी लोकोपकारक कृत्येच श्रेष्ठ मानतात, ते स्वर्ग प्राप्त करून पुन्हा हीन योनीला जातात. जे वानप्रस्थ व सन्यासी साधक अरण्यात राहून तप व उपासना करतात व शांत वृत्तीने भिक्षा मागून जगतात, ते शुद्ध देवयान मार्गाने जेथे अव्यय पुरुष आहे (ब्रह्मलोक) तेथे स्थिर होतात.
येथे लोकोपयोगी कृत्ये करणार्‍याना स्वर्ग मिळतो हे मान्य केले आहे पण तो कनिष्ठ लाभ आहे असे सांगून सन्यासमार्गाची भलावण केली आहे. कर्माने मोक्ष प्राप्त नाही. त्या करिता ज्ञानाची गरज आहे. (१.२.८ ते ११)

द्वितीय मुंडकातील प्रथम खंडात विराट् पुरूषाचे वर्णन आहे. पेटलेल्या अग्नीतून शेकडो एकसारख्या ठिणग्या निघतात व त्यातच विलीन होतात त्याप्रमाणे अक्षरापासून विविध सृष्टी निर्माण होते. दिव्य, अमूर्त, व्यापक, अज, अप्राण. अशा अक्षराच्या पलिकडे परपुरूष आहे.
(२.१.१-२)
त्या श्रेष्ठ पुरुषापासून प्राण मन, रुप इन्द्रिये, आकाश, वायू, तेज, दिशा, सूर्यरूपी समिधा असलेला अग्नि, सोमापासून पर्जन्य, पर्जन्यापासून औषधी निर्माण झाल्या. औषधांपासून पुरुष रेत व त्या रेतापासून जग निर्माण झाले.,, अशी मोठी यादी दिली आहे. विश्वनिर्मिती प्रक्रीया अक्षरब्रह्मापासून कशी सुरू झाली हे इथे सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे अक्षरब्रह्म सृष्टी निर्माण करते असे म्हटलेले नाही, अक्षरब्रह्मापासून सृष्टी निर्माण झाली असे म्हटले आहे.
(२.१.५ ते ९)
पृथ्वीवरील, स्वर्गातील समस्त पदार्थ, सजीव -निर्जीव सृष्टीमनोधर्म, नैतिक गुण हे मूळ पुरुषापासून उत्पन्न झाले ही झाली "पौरुषेय" उपपत्ती. पण हा पुरुष अमूर्त व परेहून पर असल्याने व त्याने स्वत: सृष्टी निर्माण केली नसल्याने ही "सेश्वर मिमांसा" सदृष निर्मिती असेही म्हणता येईल.

तो पुरुषच हे सर्व विश्व आहे. तो पुरुषच कर्म अमृत, परब्रह्म आणि अंतरात्मा होय. त्याला जो जाणतो, त्याची अविद्या नष्ट होते. त्याला या लोकीच ज्ञान होते, व तो जीवन्मुक्त होतो. ( काय जाणले असता सर्व जाणले जाते या प्रश्नाचे उत्तर येथे संपले.) मुक्ती इहलोकीही मिळू, शकते हे नमुद केले आहे. (२.१.१०)

द्वितीय खंडात ब्रह्मवर्णन केले असून ब्रह्म जाणण्याचा मार्ग पुढीलप्रमाणे सांगितला आहे.
ॐकार हे धनुष्य, आत्मा हा बाण, ब्रह्म हे लक्ष होय.त्याच्या साह्याने सावधपणाने बाण मारावा.बाणाप्रमाणे चित्त एकाग्र असावे. ज्या ब्रह्मात स्वर्ग, पृथ्वी, अंतरिक्ष, मन व सर्व प्राण आहेत, त्या आत्म्यालाच तू जाण. बाकी सर्व सोड.हाच मोक्षाचा मार्ग आहे. हृदयात आत्मा असतो. त्या आत्म्याचे ॐ शब्दाने ध्यान कर. (२.२.४-५)
अतिशय थोडक्यात, स्पष्ट शब्दात मार्गदर्शन केले आहे. मोक्षस्थान सांगितल्यावर ज्ञानफलही लगेचच दिले आहे.

हृदयात निर्दोष व निष्कल ब्रह्म आहे.ते शुभ्र व अत्यंत तेजस्वी असणारे ब्रह्म ब्रह्मवेत्ते जाणतात. (2.2.8)

न तत्र सूर्यो भाति, न चंद्र तारकम्
नेमा विद्युतो भान्ति, कुतोsचमग्नि: !
तमेव भान्तमनुभाति सर्वम्
तस्या भासा सर्वमिदं विभाति !! (2.2.11)

तेथे सूर्य, चंद्र-तारका आणि वीज यांना प्रवेश नाही.मग अग्नीला प्रवेश कुठला ? त्या ब्रह्माच्या प्रकाशानेच हे सर्व प्रकाशित होते व हे सर्व विश्व त्याच्या प्रकाशानेच प्रकाशमान आहे

मुंडकातील द्वितीय खंडात अध्यात्मिक कर्मयोग, आत्मानुभवाचे परिणाम व आत्मानुभावातील तेजाचा साक्षात्कार याचे सुरेख वर्णन आहे.

द्वा सुपर्णा सयुजा सखाया,समानं वृक्षं परिषस्वजाते !
तयोरन्य:पिप्पलं स्वाद्वत्ति, अनश्नन्नन्यो अभिचाकशति !! (ऋग्वेद १.१६४.२०)
ज्या दोघांचे मूळ बीज एकच आहे व नेहमी एकत्र असणारे परस्परांचे मित्र असे दोन पक्षी (जीवात्मा व परमात्मा) एकाच वृक्षाचा आश्रय करतात. त्यांपैकी एक (जीवात्मा) सुखदु:खात्मक अशा मधुर पिप्पल फलाचा (कर्मफळाचा) उपभोग घेतो आणि दुसरा (परमात्मा) फलाचा उपभोग न घेता केवळ पहात राहतो)..
ऋग्वेदातील एक महत्वाचे सूक्त. आत्मा-परमात्मा यांचे एकमेकांशी संबंध काय ? हे गुंतागुंतीचे व निरनिराळे मतप्रवाह मांडण्यास वाव देणारे सूक्त. याच कल्पनेचा विकास पातंजल योगसूत्रांतील केशकर्मविपाकाशये अपरामृष्ट:पुरुषविशेष: ईश्वर: ( सृष्टीपासून अलिप्त असा पुरुषविशेष म्हणजे ईश्वर) या विख्यात उपपत्तीत आढळते.
(ईश्वराबरोबर) त्याच वृक्षावर राहणारा जीव निराशेमुळे उत्पन्न झालेल्या दुबळेपणामुळे मोहित होऊन शोक करत राहतो. (परंतु) जेव्हा तो आपणाहून निराळा व योग्यांनी ज्याची उपासना केली आहे अशा ईश्वराचे माहात्म्य जाणतो तेव्हाच तो शोकरहित होतो.
जेव्हा साधक सुवर्णवर्ण आणि सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाचेही उत्पत्तिस्थान असलेले जगतकारण पुरुषतत्व पाहतो तेव्हा तो विद्वान पापपुण्य झटकून, ज्ञानाने निर्लेप होऊन, परमात्म्याशी एकरूप होतो. (३.१.२-३)
या दोन मंत्रांत जीवाला मोक्ष कसा मिळवता येतो त्याचे दिग्दर्शन केले आहे. इथे नोंद करण्य़ासारखे म्हणजे आत्मा व परमात्वा दोघेही शरीरात वास करतात असे सांगितले आहे.

ज्ञानसाधना
सत्येन लभ्यस्तपसा ह्येष आत्मा
सम्यग्ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम् ! (३.१.५)
हा आत्मा सत्याने, तपाने, आत्मज्ञानाने आणि ब्रह्मचर्याने प्राप्त होतो

सत्यप्रशंसा
सत्यमेव जयति नानृतं सत्येन पन्था विततो देवयान: !
येनाक्रमन्स्त्युषयो ह्याप्तकामा यत्र तत्सत्यस्य परमं निधानम् !! (३.१.६)
सत्याचा जय होतो. असत्याचा होत नाही. सत्यानेच देवयान मार्ग भरलेला आहे. या देवयान मार्गानेच महर्षी जातात, तो मार्ग सत्याने भरलेला आहे
.पुढे आत्म्याचे वर्णन केले आहे.
ते सत्य मोठे, दिव्य व अचिंत्य आहे,ते सूक्ष्माहून सूक्ष्म, अतिशय दूर व अतिशय जवळ आहे. हे येथेच आपल्या हृदयात आहे, तेथे त्याचा साक्षात्कार होतो. ते सत्य डोळे, वाणी, इंद्रिये, कर्म याने समजत नाही. फक्त शुद्ध अंत:करणाच्या ज्ञात्याला, ध्यानमग्नाला ते निष्कल ब्रह्म समजते. हा सूक्ष्म आत्मा फक्त मनाला कळतो. शुद्ध चित्तात आत्मा प्रगट होतो. (३.१.७-८-९):
सर्व जगाचे आश्रयस्थान असे तेजस्वी ब्रह्म जे णतात, त्याची उपासना करतात, ते थोर लोक मुक्त
होतात.जे कामनिक उपासना करतात ते पुन्हा पुन्हा जन्म घेतात. निष्काम या जन्मातच मुक्त होतात. (३.२.१-२)
नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधवा न बहुधा श्रुतेन
यमेवैष वृणते तेन् लभ्य: तस्यैष आत्मा विवृणते तनुं अयाम् !! (३.२.३)
इथे आत्मानुभूति वर्णन केली आहे.
हा आत्मा वेदादि शास्त्रांच्या अध्ययनाने, ज्ञानाच्या धारणाशक्तीने किंवा वेद-शास्त्राचे भरपूर श्रवण केल्यानेही मिळत नाही.जो विद्वान परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा करतो, त्याची ती इच्छाशक्तीच त्याला आत्म्याची प्राप्ती करून देते. परमात्मा आपले स्वरूप उघड करून दाखवितो.
नायमात्मा बलहीनेन लभ्यो नच प्रमादात्तपसो वाप्यलिंगात् !
एतैरूपायैर्यतते यस्तु विद्वांस्तस्यैष आत्मा विशते ब्रह्म धाम !! (३.२.४)
हे आत्मज्ञान बलहीनाला, चुका करणार्‍याला, संन्यास न घेणार्‍याला, (त्याग न करणार्‍याला) होत नाही. बलयुक्त, अप्रमादी व त्यागी माणसाला ज्ञान होते. त्याचा आत्मा ब्रह्मधामात प्रवेश करतो.

ज्ञाता व परमात्मा
जशा वाहणार्‍या नद्या समुद्राला मिळाल्यावर नाम-रूपरहित होतात तसा ज्ञाता परमात्म्यात विलिन झाल्यावर नामरूपरहित होतो, व दिव्य स्वरूप प्राप्त करतो (३.२.८)
ही अद्वैत सिद्धांताला, "जीव व ब्रह्म एकच" याला पृष्टी होय.

. ब्रह्मज्ञस्तुति
ज्याने आत्मज्ञान मिळविले आहे त्याबद्दल म्हटले आहे की मन ज्या लोकाची इच्छा करतो, ते सारे लोक;शुद्ध अंत:करणाचा मनुष्य ज्याची इच्छा करतो, त्या साधकाच्या सर्‍या इच्छा पूर्ण होतात. ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटत असेल त्याने अशा ज्ञात्याची सेवा करावी.(३.१.१९)
शेवटी संन्याशालाच सद्गुरूने आत्मज्ञानाचा मार्ग दाखवावा असे मुंडक उपनिषद सांगते.
लेख मोठा झाला खरा. पण मुंडक अनेक महत्वाच्या गोष्टींना स्पर्श करत असल्याने नाइलाज झाला
(कंसातले आकडे अनुक्रमे मुंडक,खंड व मंत्र यांचे)

शरद

 

प्रश्नोपनिषद
प्रश्नोपनिषद हे दशोपनिषदातील चतुर्थ असून सृष्टीच्या मूलस्थानापासून परमात्म्याच्या स्वरूपापर्यंतच्या अनेक समस्यांचा उलगडा करणारे एक महत्वाचे उपनिषद आहे. हे अथर्ववेदाच्या पिप्पलाद शाखेचे उपनिषद असून प्रणेते महर्षी पिप्पलादच आहेत.
या उपनिषदाची रचना योजनाबद्ध, सुसंघटित व मुद्देसूद आहे. म. पिप्पलादांकडे आलेल्या सहा शिष्यांचे प्रश्न व त्यांची उत्तरे असे याचे स्वरूप आहे. प्रश्न वेगवेगळे वाटले तरी ते म. पिप्पलादांच्या "सृष्टीची उत्पत्ती" या विषयीचे तत्वज्ञान या संबंधितच गुंफलेले आहेत.
अथर्ववेदाची मुंडक व प्रश्न ही दोन उपनिषदे. मुंडक आधीचे व प्रश्न नंतरचे. प्रश्नचे स्पष्टीकरण जास्त प्रगत वाटते.
"प्रश्नोत्तररूपी उपनिषद" म्हणून "प्रश्न उपनिषद" हे नाव. हे गद्य उपनिषद असून मंत्रांना "वाक्य" म्हणून ओळखले जाते. प्रश्नानुसार सहा अध्याय असून (अनुक्रमे १६+१३+१२+११+७+८ असे) एकुण ६७ मंत्र आहेत.

तत्वज्ञान
उपनिषदात खालील विषय हाताळलेले आहेत.
(१) ब्रह्म आणि द्वंदाची उत्पत्ती.
(२) प्राणाचे महत्व.
(३) निद्रा आणि स्वप्नमीमांसा.
(४) गाढ झोप म्हणजे ब्रह्मानंद.
(५) ॐकार ध्यानाने पापमुक्ती.
(६) लिंग शरीरकल्पना.
(७) अद्वैतपूर्ण अमरत्ववाद.
(८) "माया" म्हणजे "भास".

एवढ्या प्राथमिक माहिती नंतर उपनिषदाकडे वळू. ऒळीने सहा प्रश्न व त्यांची उत्तरे पाहू.
(आज थोडी वेगळी पद्धत वापरणार आहे. संस्कृत श्लोक देणार नाही. नाही तरी ६७ मंत्र देणे शक्यच नव्हते. त्या ऐवजी प्रश्न व त्याचे उत्तर मराठीतच बघू. संस्कृतचा अडथळा नसल्याने थोडी सुलभता वाढावी.)

प्रास्ताविक
सुकेश, सत्यकाम, सौर्यायणी, कौसल्य, भार्गव व कात्यायन हे सहा आचार्य ’परब्रह्म" जाणून घेण्याच्या इच्छेने हातात समिधा घेऊन शिष्यभावाने भगवान पिप्पलादांना शरण गेले. म. पिप्पलादांनी एक वर्ष आपल्या आश्रमात ब्रह्मचर्य व्रताने राहण्यास सांगितले व "मग प्रश्न विचारा मला माहीत असेल तर मी उत्तर सांगेन" असे सांगितले.

लक्षात घ्या. हे नुकतेच मुंज झालेले बटू नव्हेत. अभ्यासू, ज्ञानसंपन्न आचार्य आहेत. तरीही आपल्याला नसलेले ज्ञान मिळवण्याकरिता ते शिष्यभावाने म. पिप्पलादांकडे हातात समिधा घेऊन गेले. समिधा घेऊन जाण्यात एक संकेत आहे. समिधा यज्ञाच्या अग्नीत हव्य म्हणून टाकतात. समिधा राख होऊन अग्नीशी एकरूपs होतात. गुरूकडे जाताना अनन्य शरणभावाने "स्व"त्व जाळण्याची तयारी पाहिजे. म.पिप्पलादही या आचार्य शिष्याशी विनयपूर्वक बोलतात.

प्रश्न १
कात्यायनाने प्रश्न विचारला, "हे भगवन, हे सर्व जीव कोणापासून निर्माण होतात ? "
हा जीव-जडात्मक संसार अनित्य आहे हे कळले तरी त्याला निर्माण कोणी केले हा प्रश्न आहे. या असार संसाराचा त्याग करावयाचे हे ठीक, पण आपण ज्याचा त्याग करणार त्याचीही माहिती पाहिजेच ना ? जीवापासून जड किंवा जडापासून जीव निर्माण होवू शकत नाही हे सहज कळतेच मग हे भिन्न भिन्न निर्माण केले तरी कोणी ? हा प्रश्न.
भ.पिप्पलाद उत्तर देतात ;
"प्रजापतीने तप केले व मग रयि व प्राण ही जोडी निर्माण केली. रयि म्हणजे अन्न व प्राण म्हणजे अग्नी (भोक्ता). प्रजापति म्हणजे आपण सर्वसाधारणपणे ब्रह्मदेव म्हणतो तो.थोडक्यात "निर्माता". रयि व प्राण ही जोडी अरिस्टॉटलच्या जड-चैतन्य या जोडीशी मिळती-जुळती आहे. पिप्पलाद यांनी पुढे अनेक द्वंदे दिली आहेत. उदा. आदित्य=प्राण तर चंद्र =रयि. देवयान प्राण तर पितृयान रयि भोक्ता असतो दिवस=प्राण तर रात्र= रयि, वगैरे आपण पहातो की जीव हा भोक्ता व जड हे भोग्य असे निसर्गात दिसते. "माणुस" (जीव =चेतन) "अन्न" (भोग्य वस्तु=अचेतन) चा उपभोग घेतो. त्यांनी असेही सांगितले की इष्टापूर्त (यज व दान करणारे) यांना चंद्रलोक मिळतो व ते परत जन्म घेतात. तप, ब्रह्मचर्य, ज्ञान याच्या सहाय्याने आत्म्याचा शोध घेणार्‍यांना आदित्यलोक म्हणजे मोक्ष मिळतो व ते परत जन्म घेत नाहीत.".
थोडक्यात ऊत्तर :"चेतन व अचेतन वस्तुंच्या मिश्रणातून सृष्टी निर्माण झाली व या उभय गोष्टीच सृष्टीचे मूलभूत तत्व होत."
(१) प्रजापतीने सृष्टी निर्माण केली ही "पौरुषेय" उपपत्ती झाली.
(२) तैत्तिरीय उपनिषदातही सृष्टीकर्त्याने तप करून मग द्वंदे ( निरुक्त-अनिरुक्त, विज्ञान-अविज्ञान, सत्य-अनृत,) निर्माण केली असेच म्हटले आहे पण ती द्वंदे (दिवस व रात्र, पितृयान-देवयान,सूर्य व चंद्र यापेक्षा) जास्त संयुक्तिक वाटतात.

प्रश्न २
भार्गव विचारतो, "भगवन्, किती देव प्रजेचे धारण करतात ? लोकांना प्रेरणा कोण देते ? त्यातील वरिष्ठ कोण ? "

वेदकाळात अनेक देवता होत्या. त्यांचे त्या काळातील श्रेष्ठत्व वगैरे सोडून जर आपण हा प्रश्न आज विचारला तर धारण करणंणारा विष्णू, प्रेरणा देणारा बुद्धिदाता गणपति, व तुम्ही ज्या पंथाचे आहात त्या प्रंमाणे हरि हर, देवी अशी उत्तरे मिळतील. पण उपनिषदकाली भ. पिप्पलाद यांनी तात्विक उत्तर दिले आहे. ते एका गोष्टीने सुरवात करतात. ते म्हणतात
" आकाश, वायू, अग्नि, जल, व पृथ्वी ही महाभूते व वाचा, मन, चक्षू व श्रोत्र ही इंद्रिये हेही देवच आहेत. ते देव प्रगट होऊन एकदा भांडण करू लागले की, आम्हीच हे शरीर धारण करतो. त्या इंद्रियांना श्रेष्ठ देव प्राण म्हणाला, " असे समजण्याचा वेडेपणा करू नका. मी स्वत:ला पाच प्रकारे विभागून या शरीराला बळक्टी आणतो." पण त्यांचा विश्वास बसला नाही.
तेव्हा प्राण शरीर सोडून निघाल्यासारखा झाला. प्राण बाहेर पडू लागताच डोळे वगैरे इंद्रिये निस्तेज झाली. मधाच्या पोळ्यातील राणी मक्षिका बाहेर पडताच सर्व मक्षिका बाहेर पडतात, तद्वत प्राण बाहेर पडताच शरीराची स्थिती झाली. तेव्हा वाचा, मन इत्यादि.सर्वांनी प्राणाचे श्रेष्ठत्व मान्य केले. त्यांनी प्राणाचे खालील प्रकारे स्तवन केले.
हा प्राण सूर्य, पर्जन्य, इंद्र, वायू, पृथ्वी, रयि म्हनजे अन्न, सत् व असत्, अमृत आहे. रथचक्रात आरे एकजीव झालेले असतात, तद्वत प्राणात सर्व इंद्रिये एकत्र झालेली आहेत. चारी वेद, ब्राह्मण, क्षत्रिय सर्व प्राणामध्ये प्रतिष्ठित आहेत. तूच इंद्र, रुद्र, तेजोनिधी सूर्य आहेस. त्रैलोक्य प्राणाधीन आहे. आईप्रमाणे तू आमचे पालन कर.आम्हाला लक्ष्मी व बुद्धी दे.".
भार्गवाच्या तीनही प्रश्नांचे उत्तर "प्राण".
प्राणाचे श्रेष्ठत्व सांगणारी कथा छांदोग्य व कौषीतकि उपनिषदांमध्येही दिली आहे. तेथे एकेक इंद्रिय वर्षभर शरीराला सोडून गेले तरी शरीराचे कार्य चालूच राहिले. डोळे नसले तरी आंधळा जगू शकतोच. पण प्राण बाहेर जाऊ लागल्यावर सर्व इंद्रिये निर्जीव झाली. अशी कथा दिली आहे. पण येथे इंद्रियांबरोबर पंचमहाभूतेही समाविष्ठ केली आहेत.
प्राण हा केवळ इंद्रियांचाच राजा नसून तो विश्वातील सर्व देवतांचा अधिपती आहे हे या उपनिषदाने स्पष्ट केले आहे.

प्रश्न ३
कौसल्य विचारतो, "भगवन्, हा प्राण कसा निर्माण होतो ? या शरीरात कसा येतो ? शरीरात विभागून कसा राहतो ? याचे बाह्य व अध्यात्म रूप कसे आहे ? "
प्राणाचे मह्त्व कळले, तो विश्वाचा आधार आहे हे ही कळले पण माझा प्राणाचा संबंध केव्हा येतो ? तो माझ्या शरीरात असतो, तेव्हा. आता कौसल्याला शरीर-प्राण संबंध जाणून घ्यावयाचा आहे.
भ. पिप्पलाद म्हणतात, "फार खोलातील प्रश्न विचारलास, पण तू मोठा ज्ञाता आहेस म्हणून मी उत्तर देतो.
हा प्राण आत्म्यापासून निर्माण होतो.माणसाच्या सावलीप्रमाणे मानसाच्या शरीरात प्राण व्यापलेला आहे. इच्छेने शरीरात प्रान येतो.
राजा अधिकारी नेमतो, त्याप्रमाणे प्राण नेत्रादि इंद्रियांची नेमणुक करतो.
गुद व जननेंद्रियाचे ठिकाणी "अपान", मध्ये "समान" व नाक व मुखनासिका येथे प्राण स्वत: राहतो. "व्यान" बहात्तर हजार नाड्यांमध्ये राहतो. यांमध्ये एक ऊर्ध्वगामी नाडी आहे त्यात ’उदान" प्राण असतो. तुमच्या पापपुण्याप्रंमाणे तो पापलोकात वा पुण्यलोकात जातो.पुंय-पाप समान असेल तर मनुष्यलोकाला जातो. आदित्य रूपाने बाह्य प्राण जगवतो. तो "समान" डोळ्याच्या द्वारा सर्व सृष्टी पाहतो. ’समान" "व्यान"शी जोडलेला आहे. तेज म्हणजे "उदान" ते नष्ट झाले की माणुस मरणोन्मुख होतो. मनात लीन झालेला प्राण पुनर्जन्म घेतो. ज्या विचाराने जीव मृत्यू पावतो, त्याच विचाराने जीव पुनर्जन्म घेतो. उत्पत्ती, संकल्प, स्थाने व व्यापकत्व आदि प्रकारचे प्राणाचे आध्यात्मिक स्वरूप जाणून मनुष्य अमर होतो "
कौसल्याने एका प्रश्नात चार प्रश्न विचारले आहेत. प्राण आत्म्यापासून निर्माण होतो हे फार महत्वाचे. आपण नेहमी ’पंचप्राण" म्हणतो त्यांची स्थाने व कामे येथे सांगितली आहेत.
(१) हटयोगातील लेखात आपण पाहिले होते की सन्याशाचा प्राण टाळूतील ब्रह्मरंध्रातून जातो अशी समजूत आहे. त्याचे मूल येथे दिसते.
(२) इतना तो करना स्वामी, जब प्राण तनसे निकले !
गोविंद नाम लेकर, प्राण तनसे निकले !!
ही प्रार्थना का ? कळले ?
आज तीन प्रश्न घेतले. पुढील भागात उरलेले तीन प्रश्न व एकुण उपनिषदाचा आढावा घेऊ.

शरद

 

प्रश्नोपनिषद (२)
प्रश्न ४
सौर्यायणी गार्ग्य विचारतो, "भगवन्, ह्या पुरुषात (देहात) कोणती इंद्रिये झोपतात ? (झोप लागली की कार्य करत नाहीत ?) कोणती कार्य करतात ? कोण देव (इंद्रिय) स्वप्न पहातो ? सुख कुणाला मिळते ? आणि ही सर्व कोणाच्या अधिष्ठानावर आहेत ? "
माणसाच्या जीवनातील मोठा काळ झोपेत जातो. झोपेत काही वेळ त्याला स्वप्न पडतात, काही वेळ, गाढ झोपेत, पडत नाहीत..झोप लागली असतांना त्याची इंद्रिये उदा. डोळा, कान, काम करत नसतात. तरीही तो स्वप्नात काहीतरी पहात असतो, ऐकत असतो, तुम्हाला हा प्रश्न कधी पडला होता का ? की जर माझा डोळा काम करत नाही, तर पहातो कोण ? कसे ? गाढ झोपेत मला स्वप्न पडत नाहीत, मग त्यावेळी स्वप्न "पहाणारा" काय करतो ? दुसर्‍या प्रश्नाच्या उत्तरात भ. पिप्पलादांनी देव व इंद्रिये यांची सांगड घातली होती, ती ध्यानात ठेऊन गार्ग्य विचारत आहे कोणता देव काय करतो, काय करत नाही, आणि ही स्वप्ने पहातो तरी कोण ? जागेपणी मी एखादे सुंदर दृष्य पाहिले , सुरेल गाणे ऐकले तर "मला सुख मिळते" पण स्वप्नात माझी इंद्रिये कार्य करत नाहीत, मग हे सुख कोणाला मिळते ? आणि हे जे काय चालते ते कोणाच्या जोरावर ?
भ. पिप्पलाद उत्तर देतात
"अस्ताला जाणार्‍या सूर्याचे किरण त्याच्यातच विलीन होतात त्याप्रमाणे जेव्हा मनुष्य ऐकत नाही, बोलत नाही, पाहत नाही... त्यावेळी तो झोपला असे म्हणतात. त्याची इंद्रिये त्याच्या मनात लीन झालेली असतात. तेव्हा फक्त प्राणाग्नी जागृत असतात. अपान प्राण हा गार्ह्यपत्य अग्नी, व्यान हा अन्याहार्यपचन अग्नी, श्वासोच्छवासरूपी आहुती हा समान प्राण असून मन हे यजमान असते..त्याला प्राप्त होणारे इष्ट फल हा उदान प्राण होय. तोच मनाला झोपेत ब्रह्मस्वरूप प्रतीत होतो. तो स्वप्नात ब्रह्माचा अनुभव घेतो. दृष्ट-अदृष्ट, श्रुत-अश्रुत, अनुभूत-अननुभूत, सत्-असत्, हे सर्व तो जीव पाहतो. गाढ झोपेत स्वप्न पडत नाहीत, तेव्हा तो या शरीरात सुखी होतो. पक्षी आपल्या घरट्यात एकरूप होतात तद्वत इंद्रियसमूह झोपेत आत्म्यात विलीन होतात. पंचमहाभूते, ज्ञानेंद्रिये, कर्णेद्रिये, मन बुद्धी, अहंकार चित्त, तेज व प्राण हे सर्व आत्म्यात विलीन होतात.(सांख्यांची तत्वे आठवली ?) हा ज्ञाता, कर्ता व विज्ञानस्वरूप पुरुष निद्रेत आत्म्यामध्ये विलीन होतो. दोषरहित, अशरीर, गुणरहित, शुभ्र असे जे आहे ते तो जानतो, परब्रह्मरूपाला प्राप्त होतो. तो अक्षरब्रह्म जाणतो.
भ. पिप्पलाद गाढ झोप म्हणजे ब्रह्मानंद असे म्हणतात तसेच छांदोग्य उपनिषदातही म्हटले आहे. पण हे तितकेसे पटत नाही कारण गाढ झोपेत माणुस ब्रह्मलोकात जात असला तरी त्यास त्याची आणीव नसते. हे म्हणजे दरिद्री माणसाने रोज जमिनीत पुरलेले धन तुडवित जावे असेच झाले.
थोडक्यात, झोपेत सर्व इंद्रिये मनात विलीन होतात. प्राण जागा असतो. मन इंद्रियांचे काम करते. गाढ झोपेत मन ब्रह्मात लीन होते

प्रश्न ५.
सत्यकाम भ,पिप्पलादांना विचारतो, " भगवन्, जो मनुष्य मरणापर्यंत ॐकाराचे ध्यान करतो त्याला कोणता लोक मिळतो ?"
उत्तर सरळ व थोडक्यात आहे.
" ॐकार हे पर व अपर ब्रह्म आहे. त्यानेच ज्ञाता त्यापैकी एक मिळवतो. (ॐकाराच्या मात्रा तीन; अ,उ,म )
जर "एकमात्रक" ॐकाराचे ध्यान करील तर त्याला मनुष्यलोक प्राप्त होतो.त्याला ऋग्वेद, (तप, ब्रह्मचर्य व श्रद्धा यांच्या योगाने) माहात्म्य प्राप्त करून देतो.
तो जर "द्विमात्रक" ॐकाराचे ध्यान करील तर यजुर्वेद त्याला सोमलोकाला घेऊन जातो. तेथे ऐश्वर्य भोगून तो परत मनुष्यलोकास येतो.
जो कोणी "त्रिमात्रक" ॐकाराचे ध्यान करतो तो तेजस्वी सूर्यलोकास जातो. पापमुक्त झाल्याने सोमवेद त्याला ब्रह्मलोकाला घेऊन जातो.
ॐकाराच्या "अकार" "उकार" व ",मकार" या तीन मात्रा परस्परसंबद्ध,व एकरूप आहेत. बाह्य, अभ्यंतर व मध्यम म्हणजे "जाग्रुत", "स्वप्न" व "सुषुप्ति" या तीन अवस्था आहेत. ॐकाराच्या साह्याने ज्ञात्याला शांत, अजर, अमृत, अभय, व परब्रह्म मिळते. "
(इथे तीन मात्रा सांगितल्या असल्या तरी "मांडुक्य उपनिषदा"त ॐकाराचे चार पाद सांगितले असून तुरीय हा चौथा पाद म्हटले आहे. अथर्ववेदाची मुंडक, प्रश्न व मांडुक्य ही तीन उपनिषदे. मांडुक्य सर्वात उत्तर कालीन. प्रश्न हे मुंडकचे जास्त विवेचन करते तर ॐकारावर "प्रश्न" मध्ये एका प्रश्नाचे उत्तर आहे (सहातला एक भाग) व मांडुक्य उपनिषद फक्त ॐकारावरच लिहले आहे.) .

प्रश्न ६
सुकेशाने भ. पिप्पलादांना प्रश्न केला, " भगवन् , हिरण्यनाभ नावाच्या राजपुत्राने मला विचारले ’तू षोडषकलायुक्त पुरुष जाणतोस ?’ मी उत्तर दिले, "नाही, जर मला माहीत असते तर मी तुला सांगितले असते. खॊटे बोलतो त्याचा सर्वनाश होतो." तो प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तो पुरुष कोठे आहे?"
भ. पिप्पलाद सुकेशाला म्हणाले, "हे भल्या माणसा , या शरीरातच तो पुरुष आहे. त्याच्या मध्ये षोडश कला आहेत. (प्रथम षोडश कला कशाला म्हणतात ते पहा. पंच प्राण, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये व मन मिळून सोळा कला होतात)
परब्रह्माने विश्वनिर्मितीच्या वेळी देह निर्माण केला व मग तो विचार करू लागला, "(या देहातून) काय गेले असता मी जावे व काय राहिले असता मी रहावे ?" त्याने प्राण निर्माण केला त्या प्राणापासून श्रद्धा, पंच महाभूते, दहा इंद्रिये, मन, अन्नापासून वीर्य, तप, मंत्र, लोक व लोकामध्ये नाम उत्पन्न झाले.
नद्या समुद्राला जाऊन मिळतात व नाहीशा होतात. त्यांचे नाम, रूप नाहिसे होते. त्या समुद्र नावानेच ओळखल्या जातात. त्या प्रमाणे मनुष्याच्या सोळा कला, मनुष्यशरीरात येऊन नष्ट होतात फक्त मनुष्य (पुरुष) म्हणून लोक त्यांना पुढे ओळखतात. हा "अकल" (सोळा कला रहित) अमृत होतो.
रथाच्या चाकात आरे असतात, त्याप्रमाणे सोळा कला असलेला पुरुष जो जाणतो, त्याला मृत्यूचे दु:ख होत नाही "
आता प्रथम या षोडशकला असणार्‍या पुरुषाबद्दल राजपुत्राला व सुकेशाला जिज्ञासा का ते समजावून घेऊ. विश्वातल्या वस्तूंचे दोन विभाग. जड व चेतन. देह हा चेतन की जड ? जो पर्यंत देहात "प्राण" आहे तो पर्यंतच तो चेतन. नाही तर तो जडच. हा "प्राण"च "जीवा"ला "शीवा"ला जोडणारा दुवा आहे. हा प्राणच मनुष्याला "पुरुष" करतो. या पुरुषापासून सोळा कला निराळ्या करता येत नाहीत. त्या समुद्राला मिळणार्‍या नद्यांप्रमाणे पुरुषाबरोबर एकजीव होऊन जातात. छांदोग्य उपनिषदात हे निराळे उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे. तेथे म्हटले आहे की मधमाश्यांनी निरनिराळ्या फुलातून गोळा केलेला रस एकदा पोळ्यात एकत्र केला की मग प्रत्येक रसाला निराळे अस्तित्व नसते. सगळे रस एक मध म्हणूनच ओळखले जातात. शंकराचार्य यालाच "अद्वैत" म्हणतात जीवात्मा एकदा का परमात्म्याला भेटला की ते एकरूपच होतात.
. सांख्यांची "लिंगशरीर" कल्पना ही येथील षोडश कला पुरुष वरून घेतली असावी. तेथे "बुद्धी" ही सतरावी मिळवली आहे. सांख्य व अद्वैत ही दोनही दर्शने "प्रश्न"चा आधार घेतात.
पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात शेवटच्या वाक्यात "माया" हा शब्द येतो तेथे त्याचा अर्थ "भास" असा होतो. अद्वैतातही तसेच काहीसे म्हटले आहे. नाही का ?
अकल पुरुष ही कल्पना समजण्यास थोडी अवघड आहे. (माझी कमतरता !) बाकी"प्रश्नोपनिषदा"त
पहिल्या उत्तरापासून सहाव्या उत्तरापर्यंत ’प्राणा"ची महिती सांगितली आहे

शरद

 

कठोपनिषद
कठ (कठवल्ली) उपनिषद दशोपनिषदातील तृतीय असून मृत्यूसंबंधीच्या तत्वज्ञानामुळे, तत्वज्ञान उपनिषदातील श्रेष्ठ उपनिषदांपैकी एक समजले जाते. हे कृष्ण यजुर्वेदाच्या कठ शाखेचे उपनिषद असून प्रणेते ऋषी आचार्य कठ हे होत. आचार्य कठ हे वैशंपायन ऋषींचे एक प्रमुख शिष्य होते व त्यांच्या विशेष कर्तृत्वाने त्यांच्या अनुयायांची स्वतंत्र शाखा कठ नावाने सुविख्यात झाली. यांची वस्ती पंजाबात इरावती नदीच्या पूर्वेस हल्लीच्या अमृतसर शहराच्या आसपास होती. "कठ"चा रचनाकाल "मुंडक" व "श्वेताश्वतर" यांच्या बरोबरचा समजला जातो.

उपनिषदाचे दोन अध्याय (विभाग) असून प्रत्येक अद्यायामध्ये प्रत्येकी तीन वल्ली (उपविभाग) आहेत. एकुण मंत्रसंख्या (२९+२५ +१७ व १५+१५+१९) १२० आहे.
कठ हे गद्य-पद्यात्मक आहे. सुरवातीचा भाग गद्यात्मक असून नंतर सर्व पद्य आहे.

कथा
"नचिकेत" हा "वाजश्रवस्" ऋषींचा मुलगा. वडीलांनी केलेया यज्ञात, यजमानाने सर्व संपत्तीचे दान करावयाचे होते. मुलाने "मला तुम्ही कोणाला दान करणार ?" असे सारखे सारखे विचारल्याने पित्याने त्राग्याने "यमा"ला असे सांगितले. पित्याचे आज्ञेप्रमाणे नचिकेत यमगृही गेला. यम बाहेर गावी गेला होता. यमपत्नीने आग्रह केला तरी न जेवता नचिकेत तीन दिवस उपाशी राहिला. यम आल्यावर त्याने चौकशी केली व नचिकेतवर प्रसन्न होऊन तीन वर दिले. यम-नचिकेत संवाद म्हणजे "कठ" उपनिषद.

पहिले दोन वर किरकोळ होते पण "तिसरा वर माग" असे यम म्हणाल्यावर नचिकेत म्हणाला,

"काही लोकांच्या मते मृत शरीरात आत्मा असतो तर काहींच्या मते तो त्यात नसतो.त्या संशयाविषयीचे यथार्थ ज्ञान तू मला करून द्यावेस १.१.२०

:यम म्हणाला,"शहाण्या माणसांनाच काय देवांनाही याविषयी संशय आहे. तुला यातील काहीही कळणार नाही. तेव्हा तू या ऐवजी शतायुष्य, विपुल धन, मोठे राज्य, रथारूढ अप्सरा असे काहीही माग." नचिकेत म्हणाला " तू देऊ केलेल्या सर्व गोष्टी अनित्य, अल्पजीवी आहेत. अमर असलेल्यांच्या जवळ भूतलस्थ, जरामरणनयुक्त, परंतु विवेकी असा कोणता मानव अतिदीर्घ आयुष्य मागेल ? मला आत्म्याबद्दल ज्ञान दे. नचिकेतला दुसरे काही नको." .१.१.२९

नचिकेतचा आत्मज्ञानाबद्दलचा निश्चय पाहून यम प्रसन्न झाला व त्याने बोलावयास सुरवात केली.

श्रेयस्-प्रेयस् यांमधील फरक
"श्रेयस् ’व "प्रेयस् "असे आयुष्याचे भिन्न परिणामी दोन मार्ग आहेत. श्रेय मार्गाने जाणार्‍याचे कल्याण होते त्रर प्रेय मार्गाने जाणारा ध्येयापासून दूर जातो.
श्रेयस्श्च् प्रेयश्च् मनुष्यमेतस्तौ संपरित्य विचिनस्क्ति धिर: !
श्रेयो हि धीरोsभि प्रेयसो वृणीते प्रेयो मन्दो योगक्षेमात् वृणीते !! (१.२.२)

"श्रेयस् " व "प्रेयस् " ही दोन्ही मनुष्याकडे येतात. शहाणा माणुस त्यांना वेगळे करून "श्रेयस् ’ची निवड करतो तर मन्दबुद्धी मनुष्य शरीरधारणेला उपयुक्त अशा पशुपुत्रादींनीयुक्त अशा "प्रेयस् " ची निवड करतो.

इहलोकीच्या अनित्य वस्तूंमध्ये मन गुंतल्याने अविवेकी मनुष्य अपराध करतो आणि परलोकाचा मार्ग त्याला दिसत नाही. केवळ हाच लोक आहे, परलोक नाही, अशा समजुतीमुळे तो पुन्हा पुन्हा माझ्या ताब्यात येतो. १.२.६

आत्मविद्या-प्रशंसा
( त्या आत्म्याविषयीचे ज्ञान ) बहुतेक लोकांना ऐकण्याससुद्धा अप्राप्य आहे.पुष्कळांना ते ऐकूनही समजत नाही. ज्ञान सांगणारा कुशल्वक्ता दुर्लभ आहे.समजावून घेणाराही दुर्लभ.अणुएवढाच असल्याने तर्कबुद्धीने त्या विषयीचे ज्ञान थोडेसुद्धा होत नाही १.२.८-९
यमकृत आत्मन् चे वर्णन

आत्मा हा अनादि, अनाकलनीय, गुहेत निवास करणारा, पाहण्यास कठीण आहे. आचार्यांच्या कृपेने हे आत्मविषयक ज्ञान ऐकून आत्मा शरीरापासून वेगळा आहे असे जाणतो आणि आनंदमय आत्म्याच्या ज्ञानाने आनंदमय होतो. १.२.१३

आत्म्याचे नित्यत्वs
यम म्हणाळा "ते अविनाशी तत्व ब्रह्म होय.हे जाणले असता ज्ञात्याला ब्रह्म किंवा परतत्व यांपैकी ज्याची इच्छा असेल ते प्राप्त होते, १.२.१६.
हा धारणाशक्तियुक्त आत्मा कधीही उत्पन्न होत नाही. तो अनादि, चिरकाल टिकणारा आणि क्षयरहित आहे. शरीराचा नाश झाला असता नाश पावत नाही. जरी मारणार्‍याला वाटले की मी याला मारले व दुसर्‍याला वाटले की मी मेलो तरी दोघांनाही आत्म्याचे ज्ञान झालेले नसल्याने हा मारीतही नाही,तो मारला जात नाही, हे त्यांना कळत नाही.१.२.१९ (गीता पहा)
शरीरात निवास करूनही शरीररहित असलेल्या महान आणि व्यापक आत्म्याला जाणले असता बुद्धिमान मनुष्य शोकरहित होतो. १.२.२२

नायमात्मा प्रवचनेन लभ्यो, न मेधया न बहुना श्रुतेन !
यमेवैष वृणुते तेन लभ्यस्तस्यैष, आत्मा विवृणुते तनुस्याम् !! १.२.२३

आत्म्याविषयीचे ज्ञान केवळ कोणी सांगून मिळत नाही;.केवळ बुद्धीने वा पुष्कळ विचाराने मिळत नाही. जो केवळ आत्म्याचेच चिंतन करतो त्यालाच ते ज्ञान होते. स्वत: आत्माच स्वताविषयीचे ज्ञान त्याच्यासमोर प्रगट करतो

आत्म्याचे माहात्म्य
हा आत्मा एवढा मोठा आहे की ब्राह्मण व क्षत्रिय त्याचे भातरुपी अन्न आहे व साक्षात म्रुत्यू त्याचे तोंडी लावण्यासारखे आहे. १.२.२५

जीवात्मा आणि परमात्मा
स्वत: केलेल्या कर्माचे फळ भोगणारा "जीवात्मा" आणि हृदयस्थ परमात्मा हे दोघेही ऊन आणि सावली यांच्याप्रमाणे परस्परविरुद्ध असूनही संलग्न आहेत असे ब्रह्मज्ञानी म्हणतात. १.३.१
आत्म्याविषयीचे ज्ञान केवळ कोणी सांगून मिळत नाही;.केवळ बुद्धीने वा पुष्कळ विचाराने मिळत नाही. जो केवळ आत्म्याचेच चिंतन करतो त्यालाच ते ज्ञान होते. स्वत: आत्माच स्वताविषयीचे ज्ञान त्याच्यासमोर प्रगट करतो

रथरूपक
हे नचिकेता, आत्मा हा रथात बसलेला मनुष्य, शरीर हा रथ, बुद्धी ही सारथी व मन त्याचा लगाम आहे. इद्रियेही या रथाचे घोडे आहेत , तर विषय हे त्याचे जाण्याचे मार्ग आहेत. इंद्रिये व मन यांनी युक्त आत्म्याला संसारी मनुष्य म्हणावे. ज्याचे मन ताब्यात नाही, त्या मानवाची इंद्रिये सारथ्याला न आवरता येणार्‍या स्वैर अश्वांप्रमाणे त्याच्या ताब्यात रहात नाहीत. मन कोठे वळवावे हे जाणणार्‍या विवेकी मनुष्याची इंद्रिये ताब्यात रहातात.

इंद्रियजयामुळे ब्रह्मप्राप्ती
अविवेकी, चंचल आणि अपवित्र मनुष्याला ब्रह्मपद प्राप्त होत नाही. विवेकी, निग्रही व पवित्र मनुष्यच ब्रह्म पदाला पोचतो १.३.३ ते ९

उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान् निबोधत !
क्षुरस्य धारा निशिता दुरस्यया, दुर्गं पथस्तत् कवयो वदन्ति !! १.३.१४

(हे अज्ञानी पुरुषांनो), उठा, जागे व्हा. श्रेष्ठ अशा आचार्याकडे जाऊन आत्मज्ञान मिळवा. वस्तर्‍याची पाजळलेली धार दुर्लघ्य असते, तद्वत तवज्ञानाचा मार्ग कठीण आहे असे ज्ञाते म्हणतात.
शब्द, स्पर्श,रूप, रस, गंध व व्यय नसलेले अनादि, अनंत, महत आणि अचल असे आत्मतत्व जानले असता मनुष्य मृत्यूपासून मुक्त होतो.

"कठ" मधील पहिला अध्याय संपला. संक्षेपात आढावा दुसर्‍या अध्यायानंतर घेऊ.

शरद

 श्रेयस् आणि प्रेयस्
श्रेयस् म्हणजे अधिक चांगले, हितकारक, शुभ
प्रेयस् म्हणजे अधिक आवडते
जीवनात काही गोष्टी आवडत्या असतात व काही हितकर. आवडत्या गोष्टी हितकर असतातच असे नाही. उदा. मधुमेह असेल तर गोड खाऊ नये हे हितकर पण लोक आवडते म्हणून श्रीखंड चोपतातच.
यम सांगतो की "."आत्मज्ञान मिळवणे हे हितकारक. पण ते मिळवतांना तुम्हाला आवडणारे विषयसुख सोडावे लागेल. सामान्य मनुष्य विषयांच्या मागे धावतो. तो शरीरधारणेला उपयुक्त अशा पशुपुत्रादींनी युक्त अशा प्रेयस् ची निवड करतो. हे नचिकेत, प्रिय व सुखप्रद अशा इच्छांचा तू विचारपूर्वक त्याग केलास सामान्य माणसे ज्या चित्तमय मार्गात बुडून जातात, फसतात, रुततात तो मार्ग तू सोडून दिलास."
जीवात्मा व परमामा हे एकच. सर्व उपनिषदे हेच सांगतात. तेव्हा ते दोघे "संलग्न" आहेत हे उघड आहे. जीवात्मा शरीरात असतो तर परमात्मा विश्वात, हृदयातही. जीवात्म्याला परमात्म्याची ओळख पटत नाही कारंण दोहोंमधील अविद्येचा वा मायेचा पडदा. त्यामुळे परमात्मा हा प्रकाश (ऊन) म्हटले तर पडद्याआतील जीवात्मा सावली म्हणावयास हरकत नाही.
शरद

 नचिकेत यमाची कथा महाभारतातद्खील वाचल्याचे आठवतेय पण नेमक्या कुठल्या पर्वात ते लक्षात येत नाहीये.

 यम-नचिकेताची महाभारतातील गोष्ट अनुशासनिकपर्व, अध्याय एकाहत्तरावा येथे दिली आहे. पण त्या गोष्टीत व येतील गोष्टीत थोडे फरक आहेत. उदा. नचिकेत हा उद्दालकिचा पुत्र असे दिले असून नदीत वाहून गेलेली सामुग्री नचिकेताने आणली नाहीत म्हणून वडीलांनी त्याला " तू यमपुरीची वाट धर " असा शाप दिला. वगैरे. हे लोकप्रिय आख्यान ऋग्वेदातही आहे. (बहुधा वराह पुराणातही )
शरद..

 

कठोपनिषद (२)

मनुष्य आत्मज्ञान मिळवण्याऐवजी ऐहिक सुखात का रमतो ? परमेश्वराने इंद्रियांना बहिर्मुख करून जणु त्यांना ठारच मारले आहे. आतील आत्म्याला पाहण्याऐवजी तो बाह्य सुखातच गुंतून रहातो. बुद्धिमान मनुष्य मात्र इंद्रियांना विषयसुखांपासून परावृत्त करून प्रत्यक्ष आत्म्याला पाहतो.
सर्व लोक ज्या आत्म्याच्या योगाने रूप, रस, गंध, शब्द, स्पर्श, मैथून इत्यादींना जाणतात, त्याच्याच योगाने आत्मज्ञान मिळविता येते. हेच नचिकेतने विचारलेले आत्मतत्व
या नंतरच्या ३-४ मंत्रात ह्या तत्वाचे विवरण आहे. अग्नि व ब्रह्म हे एकच आहेत. आत्मा हाच सूर्याचा व जगाचे अधिष्टान आहे. इहलोकी जे अविनाशी तत्व आहे तेच परमब्रह्मात आहे व जे परब्रह्मात आहे तेच इहलोकी आहे. ब्रह्माचे प्रकार अनेक नाहीत. ते एकमेव तत्व मनानेच जाणावे लागते.
शरीरामध्ये अंगुष्ठाएवढा पुरुष असतो.तो भूत-भविष्यावर सत्ता गाजवत असतो. त्याला जाणले असता देहाचे रक्षण करण्याची इच्छा रहात नाही. हा ज्योतीप्रमाणे धूमरहित असलेला पुरुष चिरजीवी आहे.
शुद्ध जलामध्ये शुद्ध जल टाकले असता ते एकरूप होते, त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त झालेल्या मुनीचा आत्मा ब्रह्मस्वरूप होतो.
हा आत्मा आकाशात निवास करणारा सर्वगामी आदित्य आहे, अंतरिक्षातील वसु, कलशातील सोम आहे, मनुष्यांमध्ये, देवांमध्ये, जलामध्ये, पर्वतामध्ये, यज्ञामध्ये सर्वत्र हा सत्यरूप व महान आत्माच आहे.
नाशवंत शरीरधारी मानवाच्या देहातून आत्मा निघून गेला तर काहीच उरत नाही. माणुस प्राणवायूच्या योगाने नव्हे तर आत्म्याच्या योगाने जिवंत राहतो.
जन्म-मरणाच्या फेर्‍यात सपडलेल्या आत्म्याची अवस्था तुला सांगतो. काही मानव्चाच्या जन्मास येतात तर काही काही वृक्षादि स्थिरचर अवस्थेस प्राप्त होतात.
अग्नि एकच असतो, परंतु जगात प्रत्येक वस्तूमध्ये प्रवेश करून प्रतिवस्तूत राहिल्यासारखा वाटतो तसा आत्मा एकच असूनही प्रत्येक वस्तुमात्रात निवास करून त्याच्या बाहेरही राहतो.
सर्व भूतांच्या ठायी असलेला आत्मा जगातील दु:खांपासून अलिप्त असतो.
विविध रुपे धारण करणार्‍या आत्म्याला जे विचारवंत जाणतात ते आत्मज्ञानामुळे मुक्ती पावतात.
न तत्र सूर्यो भाती न चंद्रतारकं, नेमा विद्युतो भांति कुतोsयमग्नि: !
तमेव भान्तमनु भाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति !! २.३.१५

त्या ब्रह्माच्या पुढे सूर्य प्रकाशित होऊ शकत नाही, तारे, चंद्र, वीज यांचाही प्रकाश पडू शकत नाही, मग अग्नीचा काय पाड ? तो प्रकाशित असल्यामुळे हे सर्व प्रकाशित दिसते. त्याचाच हे सर्व प्रकाशमान होते.
अश्वत्थवृक्ष रुपक
मूळ वर आणि शाखा खाली असा हा अश्वत्थ अनादि कालापासून आहे.तेच शुद्ध चैतन्य व तेच ब्रह्म होय. सर्व लोक त्याच्याच आश्रयाने आहेत. (गीता पहा)
याच्या भयामुळे अग्नि तापतो, सूर्य प्रकाशतो. याच्याच भयामुळे इंद्र, वायु कार्यरत होतात.
शरीराचा नाश होण्यापूर्वी जर इहलोकीच हे ब्रह्म कोणी जाणू शकला तर त्याला मुक्ती मिळते.
पंचमहाभूतांपासून निर्माण होणार्‍या इंद्रियांचे आत्म्यापासूनचे वेगळेपण जाणून बुद्धिमान माणुस शोकरहित होतो.
इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, बुद्धीपेक्षा महान आत्मा श्रेष्ठ आहे. आत्म्याचे रूप दृश्य असत नाही, नेत्रांनी कोणी त्याला पाहू शकत नाही. मनाचे नियमन करणार्‍या बुद्धीने तो जाणता येणे शक्य आहे.
ज्यावेळी पाच ज्ञानेंद्रिये अंत:करणासह आत्म्याच्या ठायीच स्थिर राहतात, बुद्धी स्थिर राहते, त्या अवस्थेला श्रेष्ठ गती म्हणतात.श्रेष्ठ गतीला "योग" म्हणतात.
मानवी हृदयातून एकशे एक नाड्या निघाल्या आहेत. त्यातील एक सुषुम्ना नाडी मस्तकाचा भेद करून जाते. तिच्या द्वारे अंत:काळी प्राण गेला तर माणुस अमरत्व पावतो. उर्वरित नाड्यांतून गेला तर त्याला पुन्हा जन्म प्राप्त होतो.(काही सन्यास पंथांतील मृत देहाची कवटी फॊडण्याच्या
प्रथेचा उगम इथे असावा ?)
प्रेत झाल्यावर जीवात्म्याची स्थिती काय होते हा नचिकेतचा प्रश्न होता. या प्रश्नाचे उत्तर देताना यमाने जीवात्मा व परमात्मा यांचे स्वरूप समजावून सांगितले आहे. परमात्मा म्हणजे उपाधी रहित जीव व जीवात्मा म्हणजे उपाधीने युक्त परमात्मा असे सांगून पुढे शुद्ध आत्मस्वरूप म्हणजेच ब्रह्मस्वरूप होय व ते केव्हाही नष्ट होत नाही हे स्पष्ट केले.
तीन सिद्धांत :
(१) आत्मा आहे
(२) आत्म्यालाच आत्मा ओळखता येतो.
(३) आत्मा व परमात्मा हे भिन्न नसून एकच आहेत.
येथे कठ उपनिष्द संपले.

मित्रहो
आज उपनिषदांचा निरोप घेतो. या विषयावर स्वत: काही लिहण्याएवढा माझा अभ्यास नाही. परंतु मी चार ठिकाणी विद्वान लोकांनी लिहलेले गेली चाळीस वर्षे मोठ्या निष्ठेने वाचत आहे. कामात व्यग्र असल्याने ज्यांना इतका वेळ मिळणे अवघड आहे अशा मित्रांना , या विषयाचा परिचय करून द्यावा या लहानश्या इच्छेने हे लेख लिहले. सर्वश्री. डॉ. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, डॉ.श्री.द.देशमुख,, म.वा.वैद्य, पूज्य विनोबा व भारतीय संस्कृति कोश यांचा उपयोग करूनच हे लेख लिहले आहेत. चुका टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे. तरीही कमतरता राहणारच, क्षमस्व,

शरद

 

ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं
ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् !
छन्दासि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् !! (भ.गीता १५.१)

(असा एक पिंपळ वृक्ष आहे कीं ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि ज्याची पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो खरा वेदवेत्ता.)

(श्री. आदूबाळ यांनी वर "मूळ, खाली फांद्या" ही काय भानगड आहे ? असे विचारल्यावरून थोडक्यात माहिती दिली आहे.)

कठोपनिषदातील "अश्वत्थ" वृक्ष गीतेतही आहेच. तर हा अश्वत्थ, म्हणजे संसार वृक्ष. "हे माझे वडील, हे त्यांचे वडील," असे करत करत आपण मूळ पुरुषाकडे जातो. आता हा "मूळ" पुरुष, ज्याने हे सर्व विष्व निर्माण केले तो कोण ? ईश्वर. तो कोठे ? वर. कळले प्रपंच वृक्षाचे मूळ वर व फांद्या खाली का म्हटले आहे ? आता श्री. यांचा प्रश्न येईल की "असे आहे तर मला आजूबाजूला, या संसारात वर मूळ असलेला वृक्ष का दिसत नाही?" दिसेल की. तोही दिसेल. निसर्गात, एखाद्या तळ्याच्या काठी उभे रहा व पलिकडल्या वृक्षाचे पाण्यातील प्रतिबिंब पहा. काय दिसते ? मूळ वर, फांद्या खाली, ! जरा वार्‍याची हलकी झुळुक आली की हा वृक्ष नाहीसा होतो. संसाररुपी वृक्ष हा खर्‍या वृक्षाचे प्रतिबिंब आहे. पाण्यातील प्रतिबिंबा एवढेच क्षणभंगुर "अश्वत्थ" याचा अर्थ "उद्या नाही तो". म्हणूनच या वृक्षाला कठोपनिषदात व गीतेत "अश्वत्थ" म्हटले आहे.(अश्वत्थ म्हणजे पिंपळ=पिप्पल असा अर्थ असला तरी येथे संसार वृक्षाला पिंपळ म्हणण्यात गोडी नाही)
आणि जर तुम्ही या असार संसाराचे खोटेपण जाणून, पाणी म्हणजे अविद्येचा / मायेचा
पडदा, दूर सारून वरच्या खर्‍या वृक्षाला पाहिलेत, जाणलेत, तर तुम्हाला कळेल की हा अनादि कालापसून आहे, शुद्ध चैतन्य आहे "ब्रह्म" आहे. . .
पंधराव्या अध्यायात पुढील तीन श्लोकात या अश्वत्थ वृक्षाचे वर्णन केले असून त्याच्या फांद्या तोडत तोडत मूळाकडे, भगवंताकडे, कसे जावयाचे याचे वर्णन आहे. पण आपण आज गीता बघत नाही म्हणून ते "गुह्यतम शास्त्र "बाजूला ठेवून या अश्वत्थाची दुसरी बाजू पाहू.
हा आजूवाजूचा संसार म्हणजे "प्रतिबिंब" हे झाले "शांकर मत" पण माऊली मात्र तसे मानत नाहीत. त्यांचे म्हणणे हा वृक्ष तर ब्रह्माचा ’चिद्विलास्" आहे. सत् पासून असत् कसे निर्माण होणार ? तर हा विचारही "अश्वत्था" बद्दलचा दृष्टिकोन म्हणून लक्षात ठेवला पाहिजे.
शरद

 

 

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा