रामायण व महाभारत – दोन महाकाव्ये
सुधीर भिडे
(रामायण व महाभारत या काव्यांकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहता येते. त्याविषयीची ही एक साप्ताहिक लघुलेखमाला.)
लेखातील विषयाची मांडणी
- विचारांचे द्वंद्वभाजन
- भौगोलिक विस्तार
- ही महाकाव्ये केव्हा लिहिली गेली?
- लिखाणाचा काल आणि कथानकाचा काल
- नीतिमत्तेचे मानदंड?
- लेखनाचे स्वरूप
---
विचारांचे द्वंद्वभाजन (Dichotomy)
राम आणि कृष्ण या व्यक्तींविषयी आपल्या मनात काहीसा गोंधळ असतो. एका बाजूला
आपण असे म्हणतो की हा आपला इतिहास आहे. पण मग इतिहासाचे नियम लावण्याची
आपली तयारी नसते. त्याचबरोबर आपण असे म्हणतो की या दोन व्यक्ती देव होत्या.
साहजिकच मानवांचे नियम यांना लागू होत नाहीत.
एका तिसऱ्या प्रकारे आपण या काव्यांकडे पाहू शकतो. हा इतिहास आहे की नाही; राम आणि कृष्ण देव होते की नाही हे प्रश्न बाजूस ठेवू. ही दोन काव्ये त्या काळातील आपला देश आणि समाज याबाबत बरेच काही सांगतात. जी माहिती मिळते ती फार उद्बोधक आहे.
एक गोष्ट जाणवते ती ही की दोन्ही महाकाव्ये ज्यांनी लिहिली त्यांना भारताचा भौगोलिक प्रदेश आणि वैशिष्ट्ये यांची नीट माहिती होती. ज्यांना भारत एक राष्ट्र आहे की नाही याची शंका आहे त्यांनी ही गोष्ट ध्यानात घ्यावी. दोन हजारांपेक्षा जास्त वर्षांपूर्वी या देशाच्या भूगोलाची माहिती सर्वसाधारण होती.
भारतीय जेव्हा दक्षिण-पूर्व आशियात पसरले तेव्हा त्यांनी रामकथा आपल्याबरोबर नेली. तिथे रामकथेला स्थानिक स्वरूप मिळाले. त्या देशांत असा विश्वास आहे की रामकथा त्यांच्या देशात घडली, भारतात नाही.
त्या प्रमाणात महाभारत जगात पसरलेले दिसत नाही.
भौगोलिक विस्तार
महाभारताची गोष्ट भारताच्या वायव्य भागात घडते. वायव्येकडील सर्वात दूरचा
भाग म्हणजे गांधार. गांधारी येथे जन्मली. महाभारताचा खलनायक, गांधारीचा
भाऊ, शकुनी हा गांधारचा राजपुत्र. हा भाग सध्याच्या अफगाणिस्तानात आहे.
महाभारतात सर्वात पूर्वेकडील दूरच्या जागांचा उल्लेख येतो त्या जागा अंग आणि काशी. दक्षिणेकडे विदर्भ, येथील राजकन्या रुक्मिणीचा कृष्णाशी विवाह होतो. आर्य इराणच्या दिशेने आले असे समजले जाते. महाभारताची गोष्ट ज्या भागात घडते तो प्रदेश आर्यांनी प्रथम व्यापलेला प्रदेश.
पांडवांची कटकट नको म्हणून त्यांना इंद्रप्रस्थ ही जागा देण्यात येते.
इंद्रप्रस्थ ही जागा उजाड असा उल्लेख येतो. इंद्रप्रस्थ ही सध्याची
दिल्लीची जागा. एकोणिसाव्या शतकापर्यंत तेथे दिल्लीजवळ एक इंदरपत नावाचे
खेडे होते. द्रोणाचार्य गुडगावजवळ राहत. या सर्व जागा आर्यांच्या वस्तीच्या
टोकावरच्या समजल्या जात. यादवांचे राज्य आणि द्रौपदीच्या वडिलांचे पांचाल
राज्य इंद्रप्रस्थाच्या दक्षिणेला होते. याचा अर्थ कुरुराज्याचे क्षेत्र
सप्तसिंधूच्या प्रदेशात होते.

आता आपण रामायणाच्या गोष्टीचा प्रदेश पाहू. प्रथम अयोध्या ही जागा
सप्तसिंधू प्रदेशाहून बरीच दूर आहे. रामायणाची बरीचशी गोष्ट दंडकारण्यात
घडते. महाराष्ट्रात पंचवटी आणि कर्नाटकात किष्किंधा या वाटेवरून राम
लंकेपर्यंत पोचतात.

लंकेत जाण्यासाठी ज्या सेतूचा वापर केला गेला तशी भौगोलिक रचना आजही दृष्टीस पडते.

महाभारताच्या काळात आर्य सप्तसिंधूच्या भागात होते. दिल्लीपर्यंतचा भागही उजाड आणि त्या काळातील ‘अनार्य’ लोकानी वस्ती केलेला होता. रामायणाच्या काळात आर्य आग्नेय दिशेने पसरले होते. रामाच्या गोष्टीत आर्यांचे लक्ष दक्षिणेकडे होते. त्या भागात आर्यधर्म वाढवायचा होता. यावरून असे वाटते की महाभारताची गोष्ट रामायणाच्या आधीच्या समाजाचे वर्णन करते.
ही महाकाव्ये केव्हा लिहिली गेली?
महाभारताची पहिली हस्तलिखित पोथी १२०० सालातली आहे. भांडारकर प्राच्यविद्या
संस्थेने महाभारताची संशोधित आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. या आवृत्तीत
८९,००० श्लोक आहेत. ही आवृत्ती बनविताना १००० हस्तलिखितांचा संदर्भ घेण्यात
आला.
वाल्मिकींनी रामायण रचले. रामायणात २४,००० श्लोक आहेत. रामायणाला आदिकाव्य
म्हटले जाते. सहाव्या शतकात लिहिलेले रामायणाचे हस्तलिखित उपलब्ध आहे. (टाइम्स ऑफ इंडिया, १८/१२/२०१५)
कोणत्या ग्रंथात काय संदर्भ येतो यावरून ग्रंथाच्या रचनेचे साल अनुमानित करता येते. भारतरत्न काणे आपल्या ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ या ग्रंथात लिहितात (पृष्ठ ५०) -
मनुस्मृतीचा रचनाकाल सन १५० असावा. महाभारतात मनुस्मृतीचे बरेच संदर्भ आले आहेत. मनुस्मृतीत महाभारताचा कोठेही नामनिर्देश नाही. उलटपक्षी महाभारतात बहुतेक पर्वात मनुच्या स्मृतिचे संदर्भ आले आहेत. महाभारतातील शेकडो श्लोक मनुस्मृतीतील श्लोकांशी तंतोतंत जुळतात. या सर्व पुराव्यावरून मनुस्मृती महाभारताच्या अगोदर झाली असावी असे वाटते.
(धर्मशास्त्राचा इतिहास, भारतरत्न महामहोपाध्याय पां वा काणे, अनुवाद प्रकाशक – साहित्य आणि संस्कृती मंडळ. महाराष्ट्र राज्य प्रकाशन, १९६७)
- महाभारतात रामायणाचे संदर्भ येतात.
- महाभारताच्या वनपर्वात मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला रामाची गोष्ट सांगतात असा प्रसंग आहे.
- रामायणात हस्तिनापुर आणि इंद्रप्रस्थ यांचे उल्लेख येत नाहीत.
- अगस्ती ऋषी रामायणात भाग घेतात, तर महाभारतात त्यांचा उल्लेख इतिहासातील व्यक्ती असा येतो
- भगवद्गीतेत कृष्ण रामाचा उल्लेख एक महायोद्धा असा करतो .
- महाभारतकार व्यास वाल्मिकींचा उल्लेख करतात पण वाल्मिकी व्यासांचा उल्लेख करत नाहीत.
या सर्वांवरून असे म्हणता येते की रामायण महाभारताच्या आधी रचले गेले. दोन्ही काव्यांत इंद्र आणि परशुराम या व्यक्तिरेखा येतात. असे शक्य आहे की दोन्ही काव्ये शंभर वर्षांच्या काळात रचली.
माधवराव चितळे यांनी वाल्मिकी रामायणाचे मराठी रूपांतर लिहिले आहे. त्यात एक प्रसंग असा आहे –
विश्वामित्र (ऋषी बनण्याआधी) एकदा आपल्या सैन्यासह वशिष्ठांच्या आश्रमाला भेट देतात. वशिष्ठांची शिष्या शबाला पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था करते. शबालाच्या कामाचे व्यवस्थापन पाहून विश्वामित्र प्रभावित होतात आणि वशिष्ठांकडे शबालाची मागणी करतात. वशिष्ठांनी नकार दिल्यावर विश्वामित्र जबरदस्तीने शबालाला नेऊ पाहतात. शबाला आरडाओरडा करून बाजूला राहणाऱ्या शकांना मदतीस बोलावते. शक आश्रमात येऊन शबालाची सुटका करतात. शक भारतात ख्रिस्तपूर्व ५० ते इ.स. १०० या काळात आले. याचा अर्थ रामायण (आणि महाभारत) त्यानंतर लिहिले गेले.
नितीन वाघ यांनी ‘प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत’ हे बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाविषयी पुस्तक लिहिले आहे. ते लिहितात की बौद्ध धर्माचे वाङ्मय त्रिपिटीका रामायण आणि महाभारताचा उल्लेख करीत नाही. वाल्मिकी रामायणात एका श्लोकात बुद्धाचा उल्लेख येतो – बुद्धाय, शुद्धाय, दैत्य मोहिनी. यावरून ते असा निर्णय काढतात की रामायण आणि महाभारत बुद्धाच्या नंतर लिहिले गेले. हा निर्णय वरच्या विधानाशीही जुळतो.
यावरून ढोबळ मानाने रचनेचा काल समजायचा तर -
- मनुस्मृती – सन १५०
- रामायण – सन २५०
- महाभारत – सन ३५०
- १८ पुराणांची रचना यानंतर ३०० वर्षांपर्यंत झाली.
लिखाणाचा काल आणि कथानकाचा काल
वि. स. खांडेकर यांनी ययाती ही कादंबरी विसाव्या शतकात लिहिली. या
कादंबरीचा लिखाणाचा काल विसावे शतक तर कथानकाचा काल चार हजार
वर्षांपूर्वीचा.
समजा १९५० साली एका लेखकाने माधवराव पेशव्यांच्या जीवनावर कादंबरी लिहिली. दुसऱ्या लेखकाने २०२० साली शहाजी राजांच्या जीवनावर कादंबरी लिहिली. म्हणजे नंतर लिहिलेली कादंबरी आधीच्या कालाचा इतिहास सांगते.
असाच काहीसा प्रकार महाभारत आणि रामायण या बाबतीत झाला असावा. दोन्ही ग्रंथांची निर्मिती बुद्धाच्या कालानंतर झाली. दोन्ही ग्रंथातून ज्या समाजाचे वर्णन आले आहे तसा समाज बुद्धपूर्व ५०० वर्षांत म्हणजे आजपासून साधारणपणे ३००० वर्षांपूर्वी अस्तित्वात असावा. आता असा प्रश्न निर्माण होतो की या दोन काव्यांपैकी कोठले काव्य आधीच्या समाजाचे चित्रण करते?
वर पाहिल्याप्रमाणे रामायणाचा लिखाणाचा काल सन २५० आणि महाभारताचा सन ३५०.
निरनिराळ्या प्रकारे विचार केला तर महाभारतातील समाज रामायणातील समाजाच्या आधीचा असावा.
समजण्यासाठी असे म्हणू की महाभारताच्या कथानकाचा काल ख्रिस्तपूर्व १००० तर रामायणाच्या कथानकाचा काल ख्रिस्तपूर्व ८००. (हे सर्व काल अर्थातच ढोबळ मानाने लिहिले आहेत.) हा कालखंड वेदकालानंतर आणि बुद्धकालाआधी येतो.
महाभारताच्या कथानकाचा काल रामायणाच्या कथानकाच्या आधीचा वाटतो याचे एक कारण भौगोलिक विस्तार. महाभारताची कथा सप्तसिंधूच्या प्रदेशात घडते. इंद्रप्रस्थ ही जागा ओसाड असे वर्णन येते. तेथे नाग लोकांची वस्ती होती. त्यांना तेथून घालवून लावून पांडवांनी आपले राज्य स्थापिले असा उल्लेख येतो. या उलट अयोध्या सप्तसिंधूपासून पुष्कळ पूर्वेकडे आहे. आणि रामकथा तेथून दक्षिणेला जाते.
महाभारतात कुटुंबरचना विस्कळीत आहे कोणाचा कसा जन्म झाला याला महत्त्व नाही. रामायणात लग्न आणि कुटुंब ही कल्पना सुनिश्चित आहे.
नीतिमत्तेच्या कल्पना
रामायणातील व्यक्तिरेखा वागणुकीचे मानदंड उभे करतात. आदर्श पुत्र, आदर्श
भाऊ, आदर्श पत्नी अशा व्यक्तिरेखा आपण पाहतो. राम व्यक्तिगत आयुष्यात
नीतीची परिसीमा आहे. कैकेयी जेव्हा हे व्यक्त करते की रामाने राज्य सोडून
चौदा वर्षे वनवासाला जावे त्यानंतरही राम कैकेयीला आदराने संबोधतो.
अयोध्येस परतल्यावर राम राज्यावर बसतो तेव्हा तो आदर्श राजा बनतो. अजूनही
भारतीय मनात चांगले राज्य म्हणजे रामराज्य.
सीता सर्व सुखाचा त्याग करून रामाबरोबर वनवासाला जाते. चौदा वर्षांनंतर जेव्हा सीतेच्या हे ध्यानात येते की अयोध्यावासी तिच्या शीलाविषयी संशय घेत आहेत तेव्हा ती अयोध्या सोडून आश्रमात जाते.
भरत आणि लक्ष्मण आदर्श भावांच्या मूर्ती आहेत.
महाभारतात हे चित्र नाही. त्यामुळे महाभारतातील व्यक्तिरेखा आपल्याला जवळच्या वाटतात. विदुराने सांगितल्याप्रमाणे – शठम प्रतिशाठ्यम असा प्रकार आहे. या सर्वात कृष्ण पुढाकार घेतो. युद्धात भीष्म, द्रोण, कर्ण आणि दुर्योधन यांच्या पाडावात कृष्णाने सुचविलेल्या क्लृप्त्या या नैतिक म्हणता येत नाहीत. रामायणात राम फक्त एकदाच नीतीच्या बाहेर वागताना दिसतो – वालीचा वध करताना. त्यावेळी आर्यधर्माचे संवर्धन असे राम कारण देतो.
लेखनाचे स्वरूप
या प्रस्तावनेनंतर आपण त्या काळातील समाजाचा निरनिराळ्या अंगाने तीन भागात विचार करू.
भाग २ – दोन कथांतील साम्य
भाग ३ – कथेतील पात्रे
भाग ४ – तत्कालीन समाज
---
(पुढील भाग इथे)
संदर्भ ग्रंथ
- Land of seven Rivers, Chapter 3, Sanjeev Sanyal, Penguin Books 2012
- युगांत, इरावती कर्वे
- वास्तव रामायण, डॉक्टर वर्तक, चौथी आवृत्ती, १९९३
- Thesis on diet in Sanskrit literature, Sreeja, Calicut University
- महाराष्ट्र टाइम्स लेखमाला एप्रिल ते ऑगस्ट २०२२
- रामायण काही अभ्यास आणि विचार, प्रभाकर फडणीस
- आयोध्यानो रावण अने लंकाना राम, दिनकर जोशी (ही एक कादंबरी आहे. परंतु कथानक निरनिराळे प्रश्न उभे करते.)
- भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास, इतिहासाचार्य राजवाडे, लोकवाङ्मय गृह
- ज्येष्ठ, अनंत मनोहर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन
- महाभारताचे वास्तवदर्शन, प्राचार्य आठवले, श्री राधा दामोदर प्रतिष्ठान, २०००
- धर्मशास्त्राचा इतिहास, भारतरत्न महामहोपाध्याय पां वा काणे, (अनुवाद), साहित्य आणि संस्कृती मंडळ. महाराष्ट्र राज्य प्रकाशन, १९६७
- वाल्मिकी रामायण, माधव चितळे, माधवराव चितळे यांची प्रवचने, साकेत प्रकाशन, २०१६.
लेखमाला नेहमीप्रमाणे ज्ञानवर्धक होईल यात शंका नाही. त्यामुळे पुढच्या भागांची उत्सुकता आहे.
सध्या सेव्हन मुन्स ऑफ माली अल्मेडा हे पुस्तक वाचताना संदर्भ म्हणून, श्रीलंकेचा इतिहास चाळला, तेव्हा या विषयाच्या संदर्भात काही प्रश्न पडले होते. लेखमालेतून त्याची उत्तरे मिळतील अशी आशा करतो.
१. महाकाव्यांच्या लिखाणाचा काळ
- हा काळ लिप्यांच्या इतिहासाशी सुसंगत असला पाहिजे.
- कुठलेही साधे काव्य (महाकाव्य नव्हे) रचण्यासाठी (कंपाईल/एडीट करण्यासाठी) त्याच्या रचनाकाराला प्रथम लिपी अवगत असली पाहिजे. अन्यथा कितीही प्रतिभा असली तरीही +२०,००० रचना लिपीशिवाय रचणे थोडे अशक्यच वाटते. काव्य पुढल्या पिढीकडे मुखोद्गत होऊन गेले हा युक्तीवाद जरी ग्राह्य धरला तरीही निर्मितीसाठी तरी लिपी असणे आवश्यक वाटते.
- लिप्यांचा शोध हा माणसे जेव्हा भटके जीवन सोडून शेती करू लागले, नगरे वसवू लागले तेव्हा प्रथम शेतमालाच्या वा इतर मोजणीसाठी, नोंदीसाठी झाला असला पाहिजे हा तर्क पटतो (उत्खननात सापडलेल्या क्ले टॅब्लेट्स वरून). काव्य रचना हा फायदा नंतरचा असावा (स्थिरस्थावर झाल्यावर).
- जेराड डायमंडच्या गन, स्टील & जर्म्स या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, लिप्यांचा इतिहास पण चित्ररुप लिप्या ते मूळाक्षरे असाच उत्क्रांत झाला असला पाहिजे. बर्याच लिप्यांची उत्क्रांती ही ह्या "ब्ल्युप्रिंट कॉपिंग" (दुसर्या लिपितून जशास तशी अक्षरे उचलणे) ते "आयडीया डिफ्युजन" (मूळ कल्पनेमध्ये मध्ये थोडाफार बदल करून वेगळी अक्षरे बनविणे) या दोन मार्गातून झाली असावी हाही मुद्दा मला पटतो.
- ब्राह्मी लिपी (इ.पू. ३रे शतक) गुप्त लिपी (इ. ४-६वे शतक) या भारतातल्या प्राचिन लिप्यांपैकी एक ज्या संस्कृत, पाली भाषेसाठी वापरल्या जात होत्या.
- इंडस स्क्रिप्ट (हडप्पा, मोहेंजदडो संस्कृतीच्या लिप्या) आणि ब्राह्मीलिपीत साधर्म्य आहे असे संशोधकांना वाटते. पण इंडस स्क्रिप्ट मध्ये काव्यरचना करता येईल असे वाटत नाही तरीही याबाबत मतभेदाचे मुद्दे जाणून घ्यायला आवडेल. त्यामुळे या महाकाव्यांच्या लेखनाचा काळ ब्राह्मी वा गुप्त लिपीच्या वेळचाच असला पाहिजे हा तर्क पटतो.
- त्यामुळे लेखात लिहिलेला काव्यलेखनाचा काळ मला सुसंगत वाटतो. तरीही यावर काही वेगळे मत/संशोधन असेल तर जाणून घ्यायला आवडेल.
२. महाकाव्यांच्या कथानकाचा काळ
- महाकाव्यांच्या कथानकाचा काळ हा नुसत्या लिप्यांच्याच नव्हे तर धातू इतिहासाशीही (आयर्न एजशी) सुसंगत असला पाहिजे असे वाटते.
- लेखनाचा काळ आणि कथानकाचा काळ यात जर अंतर जास्त झाले तर तो कल्पनाविलास होण्याची शक्यता अधिक.
- कथानकाचा काळ जितका पाठी जाईल तितके अधिक प्रश्न निर्माण होत जातील आणि सुसंगती निर्माण करणे कठीण होत जाईल असे वाटते. कारण त्या संस्कृतीत मग लिपी उत्क्रांत झाली नव्हती असे म्हणावे लागेल. तत्कालीन युद्धात लागणार्या शस्त्रांची, संगती लावावी लागेल. कारण मग युद्धात जितकी जीवितहानी झाली असेल त्याच्या अंदाजानुसार त्याप्रमाणात शस्त्रनिर्मिती होणे शक्य होते का? असे प्रश्न-उपप्रश्न निर्माण होतात.
- तसेच अलिकडे मी वर म्हटल्याप्रमाणे श्रीलंकेचा इतिहास चाळताना मला नव्याने कळले की, सिंहली लोक हे बुद्धाच्या नंतरच्या काळात "उत्तर भारतातून" श्रीलंकेत आले. महावंश या ग्रंथातून श्रीलंकन राजवटीचा इतिहास कळतो. त्यानुसार त्यांनी "नागा" (श्रीलंकन नागा) जमातीचा (जे कदाचित अॅबओरिजिनल/आदिवासी होते) पराभव करून राज्य स्थापन केले. त्यानंतर चोल वंशाच्या राजांनी सुद्धा श्रीलंकेवर युद्ध करून कधी राज्य केले तर कधी बेटाच्या काही भागावर ताबा मिळवला. दोन गटांमध्ये (तमिळ आणि सिंहली) कधी संबंध चांगले राहिले. कधी युद्धे झाली. रोटी-बेटीचे व्यवहारही झाले. रामायणातल्या कथेनुसार प्राचीन काळात श्रीलंकेत लंकेसारखे प्रगत राज्य/शहर वस्ती असावी असे उत्खननातले पुरावे नाहीत (माझ्या मर्यादीत वाचनानुसार - पण असल्यास तशी माहिती घ्यायला आवडेल. कारण, ती सुसंगती लागायला हवी). अनुराधापुरम इथल्या राजवटीमध्ये फार फार तर इ. पूर्व १५०० मध्ये लोहयुगाची सुरुवात झाली असावी असे संशोधन म्हणते.
- सिंहली भाषेच्या लिपीचे मूळ जरी ब्राह्मी असले तरी त्या लिपीवर तमिळ लिपीचा (तमिळ ब्राह्मी) प्रभाव आहे (आयडिया डिफ्यूजन). बिभिषणाच्या पश्चात रामकथा श्रीलंकेत कुठल्याना कुठल्या स्वरुपात पुढल्या पिढीकडे जायला हव्या होत्या. पण तसे झालेले दिसत नाही. लिपीचा अभाव हे कारण असावे का?
- एकंदर कथानकाच्या काळाबाबत ठोस अंदाज करणे थोडे कठीणच वाटते. तरिही यावर अलिकडच्या संशोधनातून आलेली माहिती इतर जाणकारांनी शेअर केल्यास आवडेल.
बाकीच्या मुद्द्यांबद्दल काही विवरण करण्याची माझी पात्रता नाही; परंतु, एक शंका:
पण इंडस स्क्रिप्ट मध्ये काव्यरचना करता येईल असे वाटत नाही तरीही याबाबत मतभेदाचे मुद्दे जाणून घ्यायला आवडेल.
का बुवा? सिंधुलिपी ही चित्ररूप लिपी आहे, म्हणून?
चिनी भाषेत कधी काव्यरचना झालीच नाही काय?
फॉर्दॅट्मॅटर, लिपीचा (चित्राक्षर असो की मुळाक्षर) नि काव्यक्षमतेचा संबंध काय? काव्य हा मुख्यत्वेकरून भाषेचा, तिच्यातील ध्वनींचा नि तिच्याद्वारे व्यक्त केल्या गेलेल्या संकल्पनांचा खेळ असावा. लिपीचा काव्यनिर्मितीत नेमका सहभाग काय? हं, कवीला आपण मागच्या काही ओळींत नेमके काय लिहिले होते ते लक्षात ठेवून त्याच्याशी सुसंगत अशी पुढची काव्यरचना करण्याकरिता aide-mémoire म्हणून, झालेच तर काव्यरचना झाल्यानंतर तिचा प्रसार करण्यासाठी लिपीचा काही मर्यादित फायदा आहे, हे नाकारता येणार नाही. परंतु म्हणून, या दोन्ही कामांकरिता ती आवश्यक आहेच काय?
- कवीची स्मरणशक्ती जर चांगली असेल, तर त्याला अशा कृत्रिम साधनांची आवश्यकता असेलच, असे नाही. (मिळाल्यास फायदा होईल निश्चित; आवश्यकता नसेल.) आणि, नसेल स्मरणशक्ती तितकीशी चांगली, तरीसुद्धा, खुद्द कवीकडूनच नि काव्य रचीत असतानाच त्या काव्याचे कित्येक पाठभेद होतील फार फार तर, नि त्यातला शेवटला / कवीला त्यातल्या त्यात लक्षात राहिलेला पाठभेद पुढे प्रसारित होईल.
- काव्याच्या प्रसारात तो प्रसार करणाऱ्यांकडून, झालेच तर वेगवेगळ्या प्रसारकांना वेगवेगळ्या वेळी निवेदन करताना खुद्द कवीकडून, लिपीच्या मदतीअभावी असंख्य पाठभेद निर्माण होतील, फार फार तर. (कवीकडून पाठभेद झाल्यास त्यास त्या काव्याची पुढची 'आवृत्ती' म्हणता येईल काय? हा पूर्णपणे वेगळा प्रश्न.) यातील जे (एक वा एकाहून अधिक) पाठभेद समाजात प्रचलित होतील, ते टिकतील.
सबब, काव्याच्या पाठभेदांचे प्रमाण कमी करण्यासाठी (अर्थात, काव्याच्या 'स्टँडर्डायझेशन'साठी) लिपी (एका मर्यादेपर्यंत) उपयुक्त आहे, हे खरेच. परंतु म्हणून, मुळात काव्यरचनेकरिता ती आवश्यक आहे, हे पटत नाही.
- वेगवेगळ्या समाजांतील लोकगीते/पारंपरिक गीते घ्या. अनेकदा त्यांचे रचयिते हे निरक्षर असतात. दर खेपेस काही हे समाज शान्ता शेळक्यांसारख्या बाहेरच्या कवीकवयित्रींना काव्यरचना करण्याचे काम औटसोर्स करीत नाहीत. अनेकदा अशा काव्यांचा मूळ रचनाकार कोण, हे सांगणेही अशक्य असते. (अर्थात, मूळ रचनाकार कोण, हे माहीत नाही, याचा अर्थ आपोआप तो निरक्षर होता, असा होत नाही, हे खरेच; परंतु, ज्या समाजांत कागदपेन्सिल या रोजच्या वापरातल्या गोष्टी नाहीत, त्या समाजांतील काव्यरचना ही मुळात लिखित स्वरूपात होत नसावी, असा आपला एक अंदाज.)
- फॉर्दॅट्मॅटर, बहिणाबाई चौधरी या कवयित्री निरक्षर नव्हत्या काय?
असो. तर सांगण्याचा मतलब, लिपी ही मुळात जेथे काव्यरचनेसाठी आवश्यक नाही, तेथे ती चित्राक्षर आहे की मुळाक्षर, याने काव्यक्षमतेवर नेमका काय फरक पडतो?
उद्या देवनागरीतून उर्दू शेरोशायरी करता येत नाही, म्हणाल! (का? तर ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, म्हणून!)
कालनिर्णय
ही महाकाव्ये केव्हा लिहिली गेली?
लिखाणाचा काल आणि कथानकाचा काल
याबाबत टिळकांच्या Orion ग्रंथाचीही नोंद घ्यावी ही विनंती.
पृथ्वीच्या परांचन गतीने एके काळी दोन राशी मागे असलेला वसंत संपात बिंदू
आता मीन राशीत आहे. जुन्या ग्रंथातील मृगशिरस, कृत्तिका यांचा उल्लेख
ग्रंथांचा काळ भौगोलिक तऱ्हेने निश्चित करतो. भिष्माचे मरण त्याने पुढे
ढकलणे वगैरेही निर्देश करतात.
..............
पौराणिक कथांत रावणाचा मार्ग ( महादेवाचा वर मिळवून लंकेत परतताना
गोकर्णमार्गे -किष्किंधा असा आहे. पुरातन काळी मंगळुरू ,कालिकात येथे अरब
येत होते. ते धिप्पाड असत. त्यांच्याशी या धिप्पाड रावणाची हाणामारी झाली
असेल. मग ते महादेवाचे लिंगरूपी पिंड तिथेच गोकर्णाला टाकावे लागले असेल.
लंकेमुळे रावणास समुद्राचे आकर्षण असणार आणि म्हणून तो नाशिकनंतर कारवारकडे
गेला असेल
तिथून लोंढा हुबळी होस्पेट (किंष्किंधा) मार्गे पूर्व किनाऱ्यावरील धनुष्कोडी किंवा पुंपुहार बंदरातून लंकेला गेला असेल.
.........
नीतिमत्तेचे मानदंड?
यावर भरपूर लोकांनी चर्वीतचरण केले आहे.
रामायण आणि महाभारत आणि हे दोन्ही सतत अभ्यासले पाहिजेत, सतत यावर चर्चा केलो पाहिजे. प्रत्येक पिढीला भेडसावणारे प्रश्न सोदवण्यासाठी सनातन धर्म कसे मार्गदर्शन करतो यासाठी हे गरजेचे आहे. म्हणून पुढच्या भागांबद्दल उत्सुकता आहे.
'हा इतिहास आहे की नाही; राम आणि कृष्ण देव होते की नाही हे प्रश्न बाजूस ठेवू.' - या पद्धतीने अभ्यास केल्यास रामायण आणि महाभारतचे निर्जीव कलेवर आपण अभ्यासत आहोत हे इथे नमूद करुन ठेवतो.
Historicization - ऐतिहासिकीकरण ही आधुनिक पद्धत व भारतीय इतिहास
revelation (साक्षात्कार) आणि reincarnation (अवतार) वजा केले की
श्रुती-स्मृती-पुराणे-इतिहास यांचा अभ्यास म्हणजे त्यातला प्राण काढून केवळ
स्ठूल शरीराचा अभ्यास. आधुनिक काळात आपण इतिहासाचा विचार करताना मानवी
प्रवास एकरेषीय (linear) म्हणजे प्रगतीकडे (progress) किंवा अधोगतीकडे वा
सर्वनाशाकडे (apocalyptic) होणारा असा केला जातो. ‘आपण सगळे समाज म्हणून
प्रगतीच्या दिशेने किंवा अधोगतीच्या दिशेने जातो आहोत’, असा इतिहासाकडे
पाहण्याची पद्धत आता रूढ होवून बसली आहे. यांत प्रगती अथवा अधोगती ही
सामुदायिक असते, शेवट किंवा अंत अपेक्षित असतो म्हणून काळाचा विचार एकरेषीय
होतो. परंतु हिंदू विचारानुसार काळ एकरेषीय नाही. जन्माला आलेला प्रत्येक
जीव (मनुष्यासहित) आपापल्या स्वतंत्र गतीत आहे आणि ही गती त्या त्या
जीवाच्या संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण या कर्मावर अवलंबून असते. (‘दोन
ओंडक्यांची होते, सागरात भेट’...). पुढे वैयक्तिक गतीमुळे
जन्म-वृद्धी-मृत्यू हे चक्र सुरू राहते. म्हणजे काळ एकरेषीय नसून चक्रिय
(circular) असतो. हा आधुनिक ऐतिहासिकीकरण या पद्धतीत आणि हिंदू विचारातला
फरक आहे.
आज हे लिहिणे हे सुद्धा मानसिक मागासलेपणाचे लक्षण आहे इतपत Historicization आपल्या अंगवळणी पडले आहे.
'राम आणि कृष्ण या व्यक्तींविषयी आपल्या मनात काहीसा गोंधळ असतो. एका
बाजूला आपण असे म्हणतो की हा आपला इतिहास आहे. पण मग इतिहासाचे नियम
लावण्याची आपली तयारी नसते. त्याचबरोबर आपण असे म्हणतो की या दोन व्यक्ती
देव होत्या. साहजिकच मानवांचे नियम यांना लागू होत नाहीत.'
अशी सरसकट थियरी मांडून सुरुवात केली आहे. एकाच वेळी देव (ईश्वर हा योग्य
शब्द आहे, पण ते असो) आणि व्यक्ती असणे यात गोंधळ नाही. राम आणि कृष्ण हे
ईश्वराचे अवतार असले तरी त्यांना मानवी जीवनातले नियम लागू होते. रामाच्या
मनात संभ्रम निर्माण होवून तो निष्क्रिय होतो की काय अशी परिस्थिती आली
तेंव्हा वशिष्ठ ऋषींनी 'योगवासिष्ठ' हा उपदेश केला. सीतेचा विरह सहन करीत
रामाने 'राम-राज्य' निर्माण केले. कृष्णाला माता-पिता विरह सहन करावा लागला
आणि सरतेशेवटी यादवकुलाचा नाश होणार हा अंदाज होताच. एका बाणाचा घात होवून
कृष्णाचा अवतार संपला. राम-कृष्ण यांना मानवी नियम लागु होते हे समजायला
असे अनेक दाखले मूळ ग्रंथात आहेत.
चौदा वर्षांनंतर जेव्हा सीतेच्या हे ध्यानात येते की अयोध्यावासी तिच्या शीलाविषयी संशय घेत आहेत तेव्हा ती अयोध्या सोडून आश्रमात जाते.
परत एकदा वनातील आश्रमात जाण्याचा निर्णय सीता स्वत: घेते का?
मला माहिती असलेल्या कथेत आयोध्येतील एक धोबी त्याच्या पत्नीला घराबाहेर
जायला सांगत असतो आणि तेव्हा म्हणतो, "मी काही आयोध्येचा राजा राम नाही,
ज्याने परक्याच्या गृही राहिलेल्या पत्नीला स्विकारले." त्या वेळी श्रीराम
वेष बदलून राज्याची व्यवस्था पाहण्यासाठी तिथे आलेले असतात. हा संवाद
ऐकल्यावर ते सीतेचा त्याग करण्याचा निर्णय घेतात.
द्रौपदीनेही पांडवांसमवेत दोन वेळा (प्रत्येकी १२ वर्षे) वनवास भोगला असतोच आणि एक वर्ष आज्ञातवास.
सर्व पांडव युधिष्ठिराने इंद्र्प्रस्थाचे राज्य, सर्व बंधु आणि पत्नी
दौपदीला द्युतामधे पणाला लावले तरी विरोध करीत नाहीत. हे आदर्श वर्तन नाही
का?
गृहकलहामधे हस्तक्षेप केला म्हणून कृष्णाला (बहुदा गांधारीने) शाप दिला
आणि नेमक्या त्याच कारणाने वालीने रामाला शाप दिला. कृष्णाच्या हयातीतच
यादवी घडली आणि श्रीरामांच्या हयातीतच त्यांच्या राज्याची चार विभागात
वाटणी झाली.
म्हणजे विष्णुचा अवतार असूनही सर्व मानवी यातना त्यांना सहन कराव्या लागल्याच.
१) "आर्य भारतात बाहेरून आलेत हा सिद्धांत सापाला ठेचल्या प्रमाणे ठेचून मारला पाहिजे. "
-डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,१९४६ .
(हु वेअर द शुद्राज ..? डॉ .आंबेडकर रायटिंग अन्द स्पीचेस , खंड ७ ...प्रकरण ५ ,पृष्ठ क्र .८६ )
२) "आर्यन वंश सिद्धांत हा इतका बिनबुडाचा व मूर्खपणाचा आहे कि ह्या सिद्धांताचा फार पूर्वीच मृत्यू व्हायला पाहिजे होता ..."
-डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,१९४६ .
(हु वेअर द शुद्राज.? पृष्ठ क्र -.८० )
३) "बाहेरून आर्यांनी भारतावर आक्रमण केल्याचा कणा इतकाही पुरावा ऋग्वेदामध्ये सापडत नाही ." -डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,१९४६ .
(हु वेअर द शुद्राज..? पृष्ठ क्र .७४ ).
४) "पाश्चिमात्त्यांनी उभा केलेला हा आर्य वंश सिद्धांत प्रत्येक पातळीवर पराभूत होतो हे निर्विवाद सत्य आहे ."
-डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,१९४६ .
(हु वेअर द शुद्राज..? पृष्ठ क्र .७८ )
५) "आर्य वंश सिद्धांताचे प्रसारक इतके उतावीळ आहेत की त्यांच्या हे
लक्षातच येत नाही की त्यामुळे ते मूर्खांच्या नंदनवनात जाऊन पोहोचतात.
त्यांना काय सिद्ध करायचे आहे हे त्यांनी आधीच ठरविले असून त्याप्रमाणे
त्यांच्या सोयीने ते वेदांमधून पुरावे शोधत बसतात."
-डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,१९४६ .
(हु वेअर द शुद्राज.? पृष्ठ क्र.८० ).
#आर्याक्रमण_आर्यअनार्यवाद_ऋग्वेद_आंबेडकर
#इतिहासाच्या_पाऊलखुणा_meme_स्पर्धा
आता आंबेडकर काय म्हणतात ते तपासायचेच तर टिळक काय म्हणतात ते ही एकदा पहायला काय हरकत आहे?
वास्तविक आंबेडकर काय किंवा टिळक काय, दोघेही आपापल्या क्षेत्रात कितीही महान असले तरी इतिहास या क्षेत्रात त्यांचा फार अभ्यास होता याबाबत शंका आहे. खेरीज, त्यांच्या काळात Archeology आणि Linguistics ही दोन्हीही विद्याशाखा बाल्यावस्थेत होत्या. Genetics या विद्याशाखेचा तर जन्मही झाला नव्हता. तेव्हा त्या दोघांना फार गांभिर्याने घ्यायची आवश्यकता नाही.
आज ह्या तीनही विद्याशाखा फोफावल्या आहेत. भरपूर माहिती उपलब्ध आहे आणि नव्याने उपलब्ध होतही आहे. जगभरातील इतिहासतद्न्य आज आर्यन मायग्रेशन थियरी मान्य करतात. किंबहुना राखीगढी येथील संशोधनानंतर त्यावर शिक्कामोर्तबच झाले आहे.
टिळक नको की आंबेडकर नको.
जरा डीएनए काय म्हणतो ते पहायला काय हरकत आहे.
यातील लेटेस्ट पुस्तक - अर्ली इंडीयन्स https://www.amazon.in/Early-Indians-Story-Ancestors-Where/dp/938622898X
अनेकांना अंजन घालणारे ठरावे...
-स्थलांतरीत अहिरावण
रामायण व महाभारत – दोन कथांतील साम्य
सुधीर भिडे
मागील भाग इथे.
विषयाची मांडणी
- अद्भुत प्रसंग
- राक्षस
- वनवास
- कथेचे दोन भाग
- कथेचा शेवट युद्धाने
- उत्तर कथा
- दोन नायक
---
अद्भुत प्रसंग
दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या आणि तीन हजार वर्षांपूर्वीच्या समाजाचे
वर्णन करणाऱ्या कथांत अद्भुत प्रसंग असतील यात काही नवल नाही. येशूच्या
चरित्रात अद्भुत प्रसंग आहेतच. आजच्या कालात साईबाबा यांच्या चरित्रातही
अद्भुत प्रसंग घडल्याचे सांगितले जाते. ज्या व्यक्तींना देवत्व द्यायचे
असते त्यांच्या जीवनात अद्भुत प्रसंग असणे मानवी मनाला गरजेचे वाटते.
आधुनिक काळात व्यक्तीच्या मोठेपणाला अद्भुत प्रसंगांची गरज राहिली नाही.
महाभारतात पांडवांच्या जन्मापासून अद्भुत प्रसंग चालू होतात. कुंतीला चार मुले – कर्ण – (सूर्य), युधिष्ठिर (यम), भीम (वायू), अर्जुन (इंद्र) या देवांच्या कृपेने होतात. थोडा प्रसाद कुंती आपल्या सवतीला – माद्रीला देते. माद्रीला नकुल आणि सहदेव ही मुले होतात. त्या काळात नियोगाने पुत्रप्राप्ती करून घेणे सर्वमान्य होते. कुंतीचे पती, पांडू आणि दीर नियोगानेच झाले होते. येथे नियोगाचा उल्लेख येत नाही म्हणून अद्भुत प्रसंग म्हणायचे.

सूर्य आणि कुंती - रवि वर्मा प्रेस.
कर्णाच्या अंगावर जन्मत:च कवचकुंडले असतात. हे कवच कर्णाच्या शरीराबरोबर मोठे होत असावे. या कवचामुळे कर्ण अवध्य असतो. युद्धाआधी इंद्र लबाडीने कवच कुंडले घेऊन टाकतो आणि कर्ण वध्य होतो.
कौरवांच्या जन्माची कथा अशीच अद्भुत आहे. गांधारी जेव्हा गर्भ धारण करते तेव्हा तिला समजते की कुंतीला तीन मुले अगोदरच झाली आहेत. याचा अर्थ राज्यावर कुंतीचा मुलगा येणार. वैतागाने गांधारी आपल्या पोटावर प्रहार करते. त्यामुळे गर्भ बाहेर येतो. त्या गर्भाचे शंभर तुकडे करून व्यास ते शंभर मडक्यात ठेवतात. त्यातून शंभर मुले होतात.
पांडवांच्या जन्माप्रमाणेच रामाचा जन्मही अद्भुत आहे. दशरथ पुत्रकामेष्टी यज्ञ करतो. यज्ञातून यज्ञपुरुष बाहेर येतो आणि दशरथाला एका भांड्यात खीर देतो. दशरथाच्या राण्या ती खीर पितात आणि त्यांना चार मुले होतात.
युद्धाच्या वेळी लक्ष्मण गंभीर रितीने जखमी होतो. वैद्य असे सांगतात की हिमालयात असलेली एक वनस्पती लक्ष्मणाचा जीव वाचवू शकेल. मारुती तत्काळ उडत हिमालयात जातो आणि हिमालयाची एक टेकडीच उचलून लंकेत आणतो.
युद्ध संपल्यावर राम परिवारासह पुष्पक विमानाने अयोध्येत पोचतो.
राक्षस
दोन्ही कथांत राक्षस येतात.
रामायणामध्ये आर्य राम आणि राक्षस राजा रावण यांच्यातील संघर्ष आहे. उत्तरेतील आर्यांनी व्यापलेल्या भागाच्या बाहेर दक्षिणेत दंडकारण्यात राहणाऱ्या लोकांस आर्य राक्षस असे संबोधत. त्या काळात दंडकारण्य घनदाट अरण्यांनी व्यापलेले होते. रामायणात त्या अरण्याचे वर्णन येते. माली आणि सुमाली हे दोन भाऊ दंडकारण्यात राज्य करत होते. त्यांचा मुख्य देव शंकर. आर्यांनी हा देव त्यांच्या देवांत नंतर सामावलेला दिसतो. आर्यांचा देव इंद्र आणि राक्षस यांच्यात कायम संघर्ष चाललेला दिसतो.
असुर, दानव आणि राक्षस हे शब्द बऱ्याच वेळेला समानार्थी म्हणून वापरले जातात. पण हे शब्द एकाच अर्थाचे नाहीत. नाहीत. असुर आणि दानव हे देवांचे चुलतभाऊ. लवकरच देव आणि दानव यांच्यात संघर्ष चालू झाला.
राक्षस हा शब्द आर्य वस्तीच्या बाहेर राहणाऱ्या आदिवासी लोकांसाठी वापरला जातो. रामायणात असा उल्लेख येतो की राक्षस ऋषींच्या यज्ञकर्मात विघ्न आणतात. रामाने प्रथमपासूनच राक्षसांचा पराभव / नाश करण्याची जबाबदारी घेतलेली दिसते. उत्तर रामायणात असा संदर्भ येतो की मथुरेत लवण नावाचा राक्षस त्रास देत आहे. हा लवण रावणाचा पुतण्या आहे असे सांगितले जाते. लवणाच्या तोंडी असे वाक्य आहे – मला वैदिक धर्माचा नाश करायचा आहे. शत्रुघ्नाला त्याचा बिमोड करण्यासाठी पाठवले जाते.
असे म्हणतात की इतिहास हा जेत्यांची कथा असते. जेते नेहमीच हारलेल्या लोकांना हीन लेखतात. बाबराने हिंदूंविषयी असेच लिहिले. इंग्रजांनी भारतीयांविषयी असेच लिहिले. आर्यांच्या कथांतून राक्षसांविषयी वाईट लिहिलेले दिसते. आर्यांनी त्यांचा देश व्यापला. त्यांना त्यांच्या निवासातून हुसकावून लावले. त्याचे समर्थन करण्यासाठी त्यांना असंस्कृत ठरविण्यात आले.
रामायणाच्या कथेचा गाभा हा आर्यांचा दंडकारण्यामध्ये प्रसार आणि राक्षसांवर विजय हा आहे.
कुंभकर्ण
महाभारताच्या कथेत राक्षसांना खास स्थान नाही. वनवासात भीमाचे राक्षसकन्येशी – हिडिंबा – लग्न आणि त्यांना झालेला पुत्र – घटोत्कच – हा एक उल्लेख येतो. बकासुराचा वध असा राक्षसांचा दुसरा उल्लेख येतो. महाभारताची मुख्य गोष्ट सप्तसिंधू प्रदेशात घडते. महाभारत काळापूर्वी तेथील मूळ वस्तीला घालवून लावण्यात आले होते हे कारण असावे.
क्षत्रिय भीम आणि राक्षसकन्येचा विवाह त्या काळातील समाजव्यवस्था दाखवितो.
वनवास

दोन्ही गोष्टींत वनवास हा महत्त्वाचा भाग आहे.
पांडव दोन वेळेला वनवास भोगतात. लाक्षागृह घटनेनंतर पांडव स्वत:च वनवासात राहतात. या वनवासाचे कारण समजत नाही. पांडव हस्तिनापुराला परत येऊन दुर्योधनाच्या दुष्कृत्याविषयी बोलू शकले असते. विदुर आणि भीष्म यांना ही गोष्ट माहीत असतेच. पांडवांचा दुसरा वनवास युधिष्ठिराच्या बेजबाबदार वागणुकीने ओढवला जातो. हा वनवास म्हणजे युद्धाची तयारी असते.
पांडवांचा वनवास म्हणजे पूर्वेकडे जाणे. रामाचा वनवास म्हणजे दक्षिणेकडे जाणे.
वडलांच्या इच्छेनुसार रामाचा वनवास चालू होतो. कथानक अशा तऱ्हेने रचले आहे की रामाचा वनवास आर्य संस्कृतीचा दक्षिणेत प्रसार करण्याचा प्रयत्न दिसतो. रामायणात अशा अर्थाचा एक श्लोक आहे. राम वनात जाणे ही शिक्षा मानत नव्हते तर एक संधी म्हणून बघत होते. त्यांनी वनात जाणे म्हणजे दंडकारण्यात जाणे अशी अट होती. दंडकारण्य म्हणजे विंध्याच्या दक्षिणेचा प्रदेश.
आर्य लोक आदिवासींच्या प्रदेशात घुसले आणि त्यांनी जेव्हा विरोध केला तेव्हा त्यांना नष्ट करण्याचा चंग बांधला.
जेव्हा वाली आणि रावण यांचा मृत्यू होतो तेव्हा त्यांची उत्तरक्रिया वैदिक रीतीने राम करवून घेतात.
महाभारतात कुटुंबातील संघर्ष आहे, तर रामायणात दोन संस्कृतीमधील संघर्ष आहे.
राज्य कोणाला – राजा कोण?
दोन्ही कथांच्या मुळाशी हा प्रश्न आहे. रामायणात दशरथानंतर राजा कोण? राम की भरत हा प्रश्न आहे. हा प्रश्न भरत निर्माण करत नाही, त्याची आई निर्माण करते. महाभारतात पण राज्य कोणाचे हा प्रश्न आहे – दुर्योधन की युधिष्ठिर – कोण राजा होणार? अशी कौटुंबिक लढाई युगांपासून चालली आहे. त्यात बरेच वेळा सामान्य भरडले जातात.
कथेचे दोन भाग
दोन्ही कथांत एक जागा अशी येते की तेथून युद्धाचे वेध लागतात.
रामायणात ही जागा येते जेव्हा राम अगस्तींच्या आश्रमात पोचतात. या घटनेपर्यंत वनवासाची अकरा वर्षे झालेली असतात. अगस्ती रामाला सांगतात की येणारा काळ संघर्षाचा आहे. अगस्ती रामाला विशेष शस्त्रे देतात जी अगस्तींना इंद्राकडून मिळाली असतात.
महाभारतात ही जागा येते जेव्हा पांडव वनवासात जातात. वनवासानंतर युद्ध अनिवार्य होणार असते. यासाठी कृष्ण अर्जुनाला इंद्राकडून विशेष शस्त्रे घेऊन येण्यास सांगतात.
कथेचा शेवट युद्धाने
युद्धापूर्वी शांतीचा प्रस्ताव दोन्ही कथांत आहे. रामायणात अंगद शांतिदूत म्हणून रामाकडून शांतीचा संदेश घेऊन जातो.
महाभारतात कृष्ण शांतिप्रस्ताव घेऊन जातो. शांतिप्रस्ताव घेऊन गेलेल्या दूतांचा दोन्ही गोष्टींत अपमान केला जातो आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न होतो. दोन्ही दूत आपली विशेष शक्ती दाखवून निघून जातात.

शांतिदूत कृष्ण - राजा रवि वर्मा
युद्धाने प्रश्न सोडविण्यापेक्षा सामोपचाराने प्रश्न सोडवावेत हा संदेश दोन्ही कथांत आहे.
दोन्ही कथांतून दोन महाकाय राक्षस युद्धात भाग घेतात. ज्या दिवशी ते लढतात त्याच दिवशी ते मारले जातात. हे दोन्ही राक्षस सत्य आणि धर्म यांची मूल्ये जाणणारे आहेत.
घटोत्कच हा भीमाचा राक्षसीपासून झालेला पुत्र. त्याला युद्धाची बातमी उशिरा पोचते. जेव्हा कळते तेव्हा हा पांडवांच्या बाजूने लढण्यास हजर होतो. युद्धात तो कौरव सेनेचा मोठ्या प्रमाणावर संहार चालू करतो. निरुपायाने कर्णाला त्याला मारण्यासाठी अमोघ अस्त्र वापरावे लागते. परंतु ते अस्त्र वापरले गेल्याने अर्जुनाचा जीव सुरक्षित होतो.
कुंभकर्ण हा रावणाचा लहान भाऊ आणि बिभीषणाचा मोठा भाऊ. त्याला युद्धात भाग घेण्यासाठी उठवले जाते. युद्धाचे कारण समजताच तो मोठ्या भावाला – रावणाला – तो अनीतीने वागत आहे हे सांगतो. तरी कुंभकर्ण रावणासाठी युद्धास तयार होतो. युद्धभूमीवर तो लहान भाऊ, बिभीषणास भेटतो. आपला देश आणि कुल यांना सोडून रामास मिळाल्याबद्दल कुंभकर्ण बिभीषणास दोष देतो. कुंभकर्णाचे रावण आणि बिभीषण यांच्याबरोबरचे संवाद जीवन कसे जगावे हे सांगतात. कुंभकर्णाला हे माहीत आहे की तो युद्धात रामाच्या हाती मारला जाणार आहे. सर्व मरण पावलेल्या राक्षसांचे अंत्यसंस्कार करण्यास तो बिभीषणाला सांगतो आणि युद्धात उतरतो. त्याच दिवशी तो मरण पावतो.
दोन्ही कथांचा शेवट युद्धाने होतो. नीतीचा अनीतीविरुद्ध विजय होतो. रामायणात रावण आणि त्याचे सर्व साथीदार आणि सेनापती मारले जातात. रामाचे सर्व साथीदार – लक्ष्मण, हनुमान, सुग्रीव, अंगद, जांबुवंत – जिवंत राहतात. बिभीषण युद्धात भाग घेत नाही.

कौरव-पांडव युद्ध - मेवाड शैलीतील चित्र १७-१८वे शतक.
महाभारतात दुर्योधन आणि त्याचे सर्व समर्थक आणि सेनानी मारले जातात. कृपाचार्य कुलगुरू असल्याने त्यांना मारले जात नाही. अश्वत्थामा चिरंजीवी असल्याने मरत नाही. सर्व पांडव जिवंत राहतात. कृष्ण युद्धात भाग घेत नाही.
उत्तर रामायण / उत्तर महाभारत
काही तज्ज्ञांचे असे मत आहे की उत्तर रामायण हे मूळ रामायणाचा भाग नाही. उत्तर रामायणात मथुरा आणि काशी या शहरांचा उल्लेख आहे. ही शहरे वाल्मिकी रामायणात येत नाहीत. वाल्मिकी रामायणात शूद्र असा उल्लेख नाही जो उत्तर रामायणात येतो. उत्तर रामायणात चार प्रमुख घटना आहेत.
- रामाने राज्य करणे, आजही रामराज्याची कल्पना आदर्श म्हणून मान्य केली जाते
- सीतेचा त्याग
- लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या मुलांना स्वत:ची राज्ये मिळणे.
- रामाचे निर्वाण
उत्तर महाभारतात अशा महत्त्वाच्या घटना घडत नाहीत. कृष्ण आणि पांडव यांचा अंत कसा होतो ही प्रमुख घटना उत्तर महाभारतात येते.
दोन नायक : राम आणि कृष्ण
दोन्ही कथांचे नायक राम आणि कृष्ण हे विष्णूचे अवतार मानले जातात.
अवतार ही कल्पना वेदकाळानंतर पुढे आली. खर्या अर्थाने रामायण आणि महाभारत यांच्यामुळे राम आणि कृष्ण यांची गणना अवतारात करण्यात आली. पुराणे रामायण आणि महाभारत यांच्यानंतर, सन १०० ते सन ७००पर्यंत रचली गेली. पुराणांत राम आणि कृष्ण यांना अवतारस्वरूप देण्यात आले. या काळात चंद्रगुप्ताचे साम्राज्य होऊन गेले होते. महाराष्ट्रात सातवाहन आणि राष्ट्र्कुटांची सत्ता होती. पुराणे लिहिली गेली त्या काळात ऐतिहासिक काळाची सुरुवात झाली होती.
भारतीय जनमानसात राम आणि कृष्ण यांचे स्थान देवांचे आहे. रामाचे
कुटुंबीय आणि समाज रामाला विष्णूचा अवतार मानतात. राम स्वत:ला साधा मानव
म्हणून घेतो. राम नैतिक वागणुकीचे मानदंड तयार करतो. राम हा आदर्श पुत्र,
आदर्श बंधू, आदर्श मित्र आहे. तो आदर्श राजाही आहे.
मुलांच्या जन्मासाठी दशरथाने यज्ञ केला. देवतांनी तेथे येऊन सांगितले की
रावण नावाचा राक्षस सर्वांना त्रास देत आहे. त्याच्या निवारणाकरिता
विष्णूंनी मानवरूपात जन्म घेण्याचे ठरविले. देवनिर्मित खीर त्यांनी दशरथाला
दिली. रामाचा जन्मच रावणाला मारण्यासाठी झाला आहे. कैकयीचे वर आणि वनवास
हा गोष्टीचा भाग झाला.
आपल्या मर्जीप्रमाणे जनमत मानायचे की नाही हे राम ठरवताना दिसतो. जेव्हा राम वनवासाला निघतो तेव्हा त्याची नियुक्ती राजा म्हणून झालेली असते. मंत्री सुमंत रामाला हे सांगतात की त्याची प्रजेबाबतही कर्तव्ये आहेत. जनमत हे सांगत असते की त्याने पित्याची आज्ञा न मानता राज्यारोहण करावे. पण जनमताला महत्त्व न देता राम वनात जातो. जेव्हा प्रजा सीतेवर आळ घेत आहे अशी वार्ता रामाच्या कानावर येते तेव्हा जनमताला मानून राम सीतेला बाहेर काढतो.
सुग्रीव-वाली लढाई - ख्मेर मंदिर
वनवासात वालीचा वध झाल्यावर राम वालीच्या पत्नीस सुग्रीवाशी लग्न करण्यास सांगतो. रावणाचा वध झाल्यावर रावणाच्या पत्नीस राम बिभिषणाशी लग्न करण्यास सांगतो. अशा काल्पनिक स्थितीत समजा रामाचा मृत्यू लक्ष्मणाआधी झाला, तर सीतेने लक्ष्मणाशी लग्न करणे योग्य झाले असते का?
लंकेतील युद्धात विजयाचा मोठा वाटा बिभीषणाचा आहे. इंद्रजित अजेय शक्ती
मिळविण्यासाठी देवीची पूजा चालू करतो. ही पूजा तोडण्याचे महत्त्व बिभीषण
सांगतो. रावणाच्या मृत्यूचे गुपित बिभीषण रामास सांगतो. अस्त्र रावणाच्या
बेंबीवर मारले पाहिजे ही माहिती बिभीषण पुरवितो.
महाभारतात हेच काम कृष्ण करतो. प्रत्येक अडचणीच्या वेळी कृष्ण मार्ग सांगतो.
राम आणि कृष्ण यांच्या व्यक्तित्वात मोठा फरक आहे. राम स्वत:ला साधा मानव समजतो. कृष्ण मीच ईश्वर आहे असे मुक्तपणे सांगतो. वेळ आली तर सुदर्शन चक्र काढून अपराध करणाऱ्याला मारायला मागे पुढे पाहत नाही.
राम एकपत्नीव्रत पाळतो, कृष्णाच्या बऱ्याच स्त्रिया आहेत.
नैतिकतेच्या बाबतीत दोन व्यक्ती अगदी निराळ्या आहेत. प्रत्येक क्रिया करताना ती नैतिकतेच्या निकषावर सुलाखूनच मग राम क्रिया करतो. कृष्णाच्या दृष्टीने अंतिम ध्येय नैतिकदृष्ट्या योग्य असेल तर ते प्राप्त करण्यासाठी कोणताही मार्ग अवलंबिला तरी चालते. कृष्णाच्या दृष्टीने साधन महत्त्वाचे नाही, साध्यापर्यंत कसेही पोचले तरी चालते.
रामायण आणि महाभारत ही दोनही महाकाव्ये अतिशय रसाळ आहेत. प्रत्येकाला त्यात काही ना काही गवसतेच. पण या कथा घडल्या तो कालखंड अती प्राचिन आहे. त्या काळातील समाज, पद्धती, नीती, नियम हे सर्वस्वी अनोळखी आहेत. त्यातील घटना, प्रसंगांना वर्तमानकालीन निकष लावणे योग्य नाही. अनेक नाट्यमय प्रसंग, अनेक पिढया आणि त्यातील घटना आणि त्याचे पुढील प्रसंगी मिळालेले संदर्भ हे देखिल एक महत्वाचे साम्य आहे. गुंतलेली अनेक नाती आणि व्यक्ती, काही अती महान तर काही अती नीच व्यक्तीमत्वे दोन्ही कथानकांमधे अढळतात.दोन्ही कथातील साम्य अगदी त्रोटक स्वरूपात आणि त्यातील काव्य, नाट्य, नवरस इत्यादी वगळून मांडणे खरोखरीच अवघड आहे.
रामायण व महाभारत – दोन कथांतील पात्रे
सुधीर भिडे
मागील भाग इथे.
विषयाची मांडणी
रावण आणि धृतराष्ट्र
सीता आणि द्रौपदी
बिभीषण आणि कृष्ण
दुर्दैवी पात्रे –
कर्ण, उर्मिला, कुंभकर्ण आणि द्रोणाचार्य
एक निराळेच पात्र – युधिष्ठिर
ऋषी मुनी – कुलगुरू
व्यास, वाल्मिकी, अगस्ती
परशुराम
इंद्र आणि सूर्य
---
रावण आणि धृतराष्ट्र
रावण रामायणातील खलनायक आहे तर धृतराष्ट्र महाभारतातील. काहींना असे वाटते
महाभारत हे कृष्ण आणि धृतराष्ट्र यांच्यातील संघर्ष आहे आणि महाभारताचा
खलनायक आहे शकुनी.
रावण आणि धृतराष्ट्र या दोघांच्या जन्मकथा विचित्र आहेत.
विश्वरवा हा लंकेचा राजा होता. विश्वरवा हा ब्रम्हदेवाचा नातू. विश्वरवाचा मुलगा कुबेर.
माली आणि सुमाली हे दंडकारण्यात राज्य करीत. कैकसी ही सुमालीची मुलगी.
कुंती प्रमाणे लग्नाआधी विश्वरवापासून नियोगाने तिला चार मुले झाली –
रावण, बिभीषण, कुंभकर्ण आणि शूर्पणखा. अशा प्रकारे रावण हा ब्रह्मदेवाचा
पणतू.
रावण इतका पराक्रमी निघाला की विश्वरवाने आपल्या अनौरस पुत्रास – रावणास – लंकेचे राज्य दिले आणि आपल्या लग्नाच्या पुत्रास – कुबेराला – निराळे राज्य दिले . बिभीषण आणि कुंभकर्ण आपल्या भावाबरोबर लंकेस गेले आणि बहीण शूर्पणखा आईबरोबर दंडकारण्यात राहिली.
त्यानंतर कैकसीने एका राक्षसाबरोबर लग्न केले. या लग्नातून तिला दोन मुले झाली – खर आणि दूषण. रामांच्या वेळी हे दोघे जण दंडकारण्यात राज्य करीत होते. हे दोघे रावणाचे सावत्र भाऊ.
धृतराष्ट्राचा जन्म पण नियोगाने झाला. राजा विचित्रवीर्य हा मुलांना जन्म न देता मरण पावला. मग भीष्मांनी व्यासांना बोलावून नियोगाने धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर – ही मुले करवली.
रावणाने आपल्या पराक्रमाने राज्य मिळविले तर धृतराष्ट्र योगायोगाने अंधळा असून राजा होतो. राज्यकारभारासाठी तो भीष्म आणि विदुर यांच्यावर अवलंबून असतो. रावण आणि धृतराष्ट्र आपल्या सल्लागारांचा सल्ला न मानता युद्धात पडतात. बिभीषण रावणाला सल्ला देतो की सीतेला परत करून युद्ध टाळावे. विदुर पण धृतराष्ट्राला युद्ध न करण्याचा सल्ला देतो. कथेच्या शेवटी दोघेही एकटे पडलेले असतात – त्याच्या सर्व योद्ध्यांचा मृत्यू झालेला असतो. दोन्ही सल्लागार – बिभीषण आणि विदुर जिवंत राहतात.

जटायुवध - राजा रवि वर्मा नक्कल प्रत
सीता आणि द्रौपदी
सीता आणि द्रौपदी यांचा जन्म नैसर्गिक नाही. सीता शेतात मिळाली तर द्रौपदीचा जन्म यज्ञात झाला. राजवाडे अशा जन्मांना अयोनिज असे म्हणतात. ऋग्वेदात योनीचा अर्थ घर असा होतो. या दोघींची गर्भधारणा घराबाहेर झाली – ज्या प्रकारे व्यासांच्या आईची गर्भधारणा होडीत झाली – पराशर आणि मत्स्यगंधा यांच्या संबंधातून.
दोघींच्या स्वयंवरात शिवधनुष्याचा पण असतो. अर्जुनाला शिवधनुष्याने मत्स्यभेद करायचा असतो, रामाला फक्त प्रत्यंचा चढवायची असते. दोघी माहेरी लाडात वाढलेल्या असतात. लग्नानंतरचे दोघींचे आयुष्य दुःखद असते. तसे पाहिले तर दोन्ही गोष्टीतील बायकांचे आयुष्य दुःखद असते. रामायणातील – कौसल्या, सुमित्रा आणि महाभारतातील कुंती आणि गांधारी.
जसे राम आणि कृष्ण यांचे व्यक्तित्व निराळे आहे तसेच सीता आणि द्रौपदी यांचे व्यक्तित्व अगदी निराळे आहे. द्रौपदीचा दरबारात दुर्योधनाने जो अपमान केला आहे त्याचा सूड द्रौपदीला हवा आहे – कसा? दुर्योधनाच्या रक्ताने तिला वेणी बांधायची आहे. सीता असा भयंकर सूड घेण्याचा विचारही करू शकणार नाही. रावणाने तिचा असाच अपमान केला आहे. तिला माहीत आहे की राम येऊन रावणाला शिक्षा देतील. त्याहून तिची काही अपेक्षा नाही. जेव्हा अयोध्यावासी तिच्या शीलावर संशय घेतात तेव्हा शांतपणे ती अयोध्यावासींना माफ करून वनात जाते.

वनवासात सीता - राजा रवि वर्मा शैली
धैर्य, धीर आणि योग्य वागणूक याचे सीतेला भान आहे. हनुमान लंकेत अशोकवाटिकेत पोचतो. हनुमान सांगतो की तो सीतेला आकाशमार्गे परत नेऊ शकतो. परंतु ती नकार देते. राम लंकेत येऊन रावणाला मारल्यानंतरच ती परतेल. रामाच्या दृष्टीने रावणाचा वध तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढे सीतेला परत आणणे.
द्रौपदीची वागणूक एकदम उलटी आहे. ती पांडवांना परत परत आठवण करून देते की दुर्योधनाचा वध महत्त्वाचा आहे. जनमानसात सीतेला देवीचे स्थान आहे. द्रौपदी देवता नाही, तिचे देऊळ नाही.
सीतेविषयी एक गोष्ट पाहा. रावण पंचवटीत येऊन सीतेचे हरण करणार आहे हे रामांना आधीच माहीत होते. एके दिवशी लक्ष्मण लाकडे आणण्यास बाहेर गेलेला असताना रामांनी हे रहस्य सीतेला सांगितले आणि असे सुचविले की सीतेने अग्निदेवाच्या आश्रयाला जावे आणि एक मायावी सीता आश्रमात राहील. रामांच्या सांगण्याप्रमाणे सीता अग्निदेवाच्या आश्रयाला गेली आणि तिची प्रतिकृती पंचवटीच्या आश्रमात राहिली. पुढची गोष्ट आपल्याला माहीत असते.
लंकेतील युद्धात रावणाचा वध केल्यावर सीतेला रामांकडे आणण्यात येते. राम सीतेला अग्नीतून जाऊन बाहेर येण्यास सांगतात. अग्नीत मायावी प्रतिकृती जाते आणि अग्नीतून खरी सीता बाहेर येते. हे दृश्य पाहणाऱ्या लोकांना असे वाटते की रामांनी सीतेकडून अग्निदिव्य करून घेतले आणि तिची शुद्धता पाहिली.
ही गोष्ट सर्व प्रथम कूर्मपुराणात येते, जे सहाव्या शतकात लिहिले गेले. त्यानंतर लिहिलेल्या रामायणाच्या संस्करणामध्येही गोष्ट येते. रामचरित मानस या ग्रंथापासून ते थेट रामानंद सागर यांच्या टीव्ही मालिकेत ही कथा येते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की वाल्मिकी रामायणात या गोष्टीचा उल्लेख नाही.
वरील माहितीचा कसा अर्थ लावावा? हिंदू धर्मात अवताराची कल्पना रामायण आणि महाभारत येथून सुरू झाली. यानंतर लगेचच पुराणांची रचना सुरू झाली. रामभक्तांच्या नजरेत रामाची फसवणूक होऊन सीतेचे हरण होणे आणि पवित्र सीतेला राक्षसाने पकडून उचलून रथात ठेवणे हे भयंकर वाटले असावे. त्यामुळे ही गोष्ट लिहिण्यात आली असावी.
बिभीषण आणि कृष्ण
राम आणि अर्जुन, हे दोघेही महायोद्धे होते. परंतु दोघांनाही त्यांच्या शत्रूला हरविणे शक्य झाले नसते जर त्यांना शत्रूविषयीची खास माहिती मिळाली नसती. बिभीषणाने जी विशेष माहिती पुरविली त्यामुळेच इंद्रजित, कुंभकर्ण आणि रावण यांचा वध शक्य झाला. त्याचप्रमाणे कृष्णाने दिलेल्या सूचनांमुळे भीष्म, कर्ण, द्रोण यांना मारणे शक्य झाले.
यावरून हे सुचविले जाते की शत्रूला हरविण्यासाठी केवळ शूर योद्धे पुरेसे होत नाहीत. शत्रूची खास बातमी हेरांकडून मिळविली पाहिजे.
दुर्दैवी पात्रे
दोन्ही कथांत काही दुर्दैवी पात्रे आहेत. त्यांची स्वतःची काही चूक नसताना त्यांना न्याय मिळत नाही. त्यांना कुटुंब आणि समाजाकडून योग्य वागणूक मिळत नाही. त्यांच्या आयुष्यात गोष्टी सरळ घडत नाहीत.
महाभारतात दुर्दैवी पात्रे आहेत कर्ण, द्रोणाचार्य आणि शिखंडी.
महाभारतात कर्णाचे पात्र दुर्दैवी आहे. कर्णाला त्याच्या आईने जन्मतःच सोडून दिले आहे. त्यानंतर जवळजवळ पूर्ण आयुष्य कर्ण आपल्या मातापित्यांची माहिती नसताना जगतो. त्याच्या रंगरूपावरून तो ज्यांनी त्याला वाढविले त्यांचा पुत्र नाही हे स्पष्ट होते. कर्णाला पाठिंबा मिळतो तो एका वाईट व्यक्तीकडून – दुर्योधनाकडून. त्यामुळे आयुष्यभर कर्णाला दुर्योधनाच्या दुष्कर्मामध्ये भागीदार व्हावे लागते. काही वेळा कर्ण दुर्योधनाला हे सांगतोही की हे कृत्य बरे नव्हे, परंतु लगेच बोलतो, “मित्रा तरी मी तुला मदत करीन”.
युद्धाचे ढग जेव्हा जमू लागतात तेव्हा कृष्ण कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य सांगून अवसानघात करतो. त्यानंतर कुंतीही कर्णाची भेट घेऊन कर्ण तिचाच मुलगा आहे हे सांगते. कर्ण कुंतीला हे आश्वासन देतो की तिची पाच मुले युद्धानंतर जिवंत राहतील. युद्धात दोन वेळा कर्णाला भीम आणि अर्जुन यांना मारण्याची संधी आलेली असते, पण तो दोघांना सोडून देतो. आणि शेवटी युद्धाचे नियम तोडून अर्जुन कर्णाचा वध करतो. त्यानंतर कृष्ण पांडवांना कर्ण त्यांचा भाऊ असल्याचे सांगतो. यावर युधिष्ठिर कुंतीला सांगतो की हजारो माणसांच्या मृत्यूला तीच जबाबदार आहे.
राजा धृपद द्रोणाचार्यांचा अपमान करतो. त्याचा बदला घेण्यासाठी द्रोणाचार्यांचे आयुष्य जाते. शेवटी पांडव त्यांच्यासाठी हे काम करतात. युद्धात द्रोणाचार्यांची कर्णासारखीच स्थिती आहे. दुर्योधनाची बाजू चुकीची आहे हे माहीत असूनही ते त्याच्याच बाजूने पांडवांविरुद्ध लढण्यास विवश आहेत. कारण कुरू कुलाचे त्यांच्यावर उपकार आहेत.

शिखंडी आणि कृप यांची लढाई
महाभारतातील अजून एक दुर्दैवी पात्र म्हणजे अंबा / शिखंडी. अंबा आणि तिच्या बहिणी यांना स्वयंवरातून भीष्माने पळवून नेले. हस्तिनापुराला पोचल्यावर अंबेने भीष्मास सांगितले की तिचे दुसऱ्या राजाबरोबर प्रेम आहे. भीष्माने अंबेला तिच्या प्रियकराकडे पोचते केले. परंतु हरण केलेल्या स्त्रीबरोबर लग्न करण्यास तिच्या प्रियकराने नकार दिला. या दु:खास भीष्म जबाबदार आहे हे ती जाणते. पुढच्या जन्मात अंबा शिखंडी म्हणून धृपदाकडे जन्म घेते. शिखंडी तृतीयपंथी असल्याने भीष्म त्यांच्यावर बाण चालविणार नाही हे समजल्यावर शिखंडी अर्जुनाच्या रथावर चढला आणि अर्जुनाने भीष्मांचा वध केला. एक प्रश्न पडतो – शिखंडी स्वत: महारथी आहे मग तोच भीष्मांचा वध का करत नाही? शिखंडीकडून मरण हे भीष्मांना जास्त त्रासदायक झाले असते?
रामायणातील दुर्दैवी पात्रे आहेत उर्मिला आणि कुंभकर्ण.
जनकाला सीता शेतात सापडली. राजवाड्यांच्या मते सीतेच्या मातेची गर्भधारणा शेतात झाली. उर्मिला ही जनकाची दुसरी मुलगी. जेव्हा रामाचे सीतेबरोबर लग्न ठरते तेव्हा असे ठरविण्यात येते की उर्मिलेचे लक्ष्मणाबरोबर लग्न करून द्यायचे. सीतेकरता स्वयंवर पण उर्मिलेकरता स्वयंवर नाही.
लग्नानंतर लवकरच वनवासाचा प्रसंग येतो. सीता रामाला सांगते की ती रामाबरोबर वनवासाला जाणार. कारण विवाहित स्त्रीची जागा नवऱ्याबरोबर आहे. परंतु हा तर्क उर्मिलेला लागू नाही. एक सासरा आणि तीन सासवा यांच्या सेवेसाठी तिला अयोध्येत राहावे लागणार. रामाची आई, कौसल्या रामाबरोबर वनात जाऊ इच्छिते. राम आपल्या आईला हे सांगतो की पत्नीने पतीच्या सेवेत राहिले पाहिजे. पण जे सीतेला आणि कौसल्येला लागू आहे ते उर्मिलेला नाही.
स्वत: वाल्मिकीसुद्धा उर्मिलेला न्याय देत नाहीत. सीता रामाला पटवून देत आहे की ती वनात येणार. या विषयावर पन्नास श्लोक आहेत. पण एका श्लोकातच लक्ष्मण उर्मिलेला नाही असे सांगतो.
कुंभकर्ण
कुंभकर्ण रावणाचा धाकटा भाऊ होता. जेव्हा रावणाने सीतेस पळवून आणले तेव्हा हा झोपलेला होता. जेव्हा जरूर पडली तेव्हा रावणाने त्यास उठविले. जेव्हा परिस्थिती समजली तेव्हा कुंभकर्ण रावणास सांगतो की त्याने दुष्कृत्य केले आहे. तरी पण तो रावणासाठी लढण्यास तयार होतो आणि मृत्युमुखी पडतो. येथे मूल्यांचा संघर्ष आहे. कुंभकर्ण जाणतो की रामाची बाजू नैतिकदृष्ट्या बरोबर आहे. परंतु रावणाला मदत न करणे म्हणजे आपला देश आणि आपले लोक यांच्याविरुद्ध जाणे. हा देशद्रोह कुंभकर्णाला जास्त वाईट वाटतो. ही गोष्ट तो बिभीषणालाही सांगतो.
एक निराळेच पात्र युधिष्ठिर.
आपल्या मनात युधिष्ठिराविषयी चीड येते. व्यक्तिमत्व, तेज, पराक्रम या गुणांचा त्याच्यात अभाव दिसतो. धर्म अधर्माच्या विचारात सदैव गोंधळलेली ही व्यक्ती आहे.
युधिष्ठिराचे द्यूतप्रेम पांडवांच्या दुःखाचे मूळ आहे. द्यूताच्या निर्णयात तो भावांचे मत घेत नाही, आणि वेळ येते तेव्हा त्यांनाच पणाला लावतो. द्रौपदी जेव्हा हा प्रश्न उपस्थित करते की ‘स्वतः हरलेला मनुष्य आपल्या बायकोला पणाला कसे लावू शकतो?’ – या प्रश्नाचे धर्मराजाकडे उत्तर नाही.
अर्जुनाने द्रौपदी जिंकली त्या वेळी युधिष्ठिर द्रौपदीवर अधिकार सांगतो. पण त्याआधी जेव्हा भीमाबरोबर हिडिंबेचे लग्न ठरते तेव्हा हा आपला अधिकार का सांगत नाही?
सबंध वनवासात हा भीम आणि अर्जुन यांच्या आधारावर जगतो. युद्धात हा काहीही करत नाही. युद्धाच्या शेवटी कृष्ण त्याला सरळच बोलतात – तू युद्धात काहीही केले नाहीस आता युद्ध संपल्यातच जमा आहे. आता तरी शल्याला मार. तेव्हा शल्याला हा कपटाने मारतो.
ऋषी आणि मुनी
रामाचे इक्ष्वाकू कूळ आणि पांडव / कौरवांचे कुरु कूळ या दोन्ही कुलांचे कुलगुरू वशिष्ठ आणि कृपाचार्य यांचा या कथानकात भाग आहे.
वशिष्ठ एक आदरणीय, मान्यवर भूमिका वठवतात. ते अयोध्येबाहेर राहतात आणि बोलावणे आल्यास अयोध्येत जातात. प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगात त्यांचा सल्ला घेतला जातो.
कृपाचार्य हस्तिनापुरात राहतात. कृपाचार्यांचे महत्त्व कमी आहे.
दुर्योधन त्यांचा अपमान करतो तेव्हा ते गप्प राहतात. कृपाचार्य कौरवांच्या
बाजूने लढतात आणि युद्ध संपल्यावर जिवंत राहतात. युद्धाचे नियम तोडून
रात्रीच्या वेळी पांडवांच्या मुलांची हत्या करण्याच्या कटात ते सहभागी
होतात.
व्यास आणि वाल्मिकी हे महाभारत आणि रामायणाचे लेखक आहेत आणि दोन्ही गोष्टीत त्यांचा सहभाग आहे.
व्यास हे सत्यवतीचे लग्नाआधीचे पुत्र. सत्यवतीचे शंतनू या कुरु राजाशी लग्न होते. त्यांचा मुलगा विचित्रवीर्य हा मुलाचा जन्म होण्याआधी मरतो. तेव्हा सत्यवती आपला पुत्र व्यास यांना बोलावून सुनांपासून मुले नियोगाने करविते. अशा प्रकारे कौरव आणि पांडव हे व्यासांचे नातू होतात.
त्यानंतर महाभारताच्या गोष्टीत व्यास वेळोवेळी येत राहतात, पण केवळ एक त्रयस्थ म्हणून.
वाल्मिकी हे अनार्य होते. त्यांचा रामायणाच्या कथेच्या शेवटी संदर्भ येतो. लोकापवादामुळे अयोध्या सोडून सीता वनात जाते आणि वाल्मिकींच्या आश्रमात राहते. लव आणि कुश तेथेच वाढतात.
ज्या काळाचे हे वर्णन आहे त्या काळात व्यक्तीच्या कुलाला, जन्माला महत्त्व नव्हते. वर्णव्यवस्था सुनिश्चित झालेली नव्हती असे दिसते.
अगस्ती ऋषींचा उल्लेख रामायणात बऱ्याच वेळा येतो. अगस्ती आणि लोपामुद्रा यांचा आश्रम दंडकारण्यात गोदावरीकाठी होता. आर्यांचा धर्म विंध्याच्या दक्षिणेला अगस्ती ऋषींनी नेला. तमिळ व्याकरणाचे लेखक अशी त्यांची ओळख आहे.
अगस्ती ऋषी राम आणि लक्ष्मण यांना अस्त्रे देतात. रामायणात सुरुवातीला असा उल्लेख येतो की विश्वामित्र रामाला अस्त्रे देतात. महाभारतात द्रोणाचार्य कौरव आणि पांडव यांचे शिक्षण करतात त्यात अस्त्रविद्या पण येते. असे दिसते की त्या वेळच्या आश्रमात केवळ धार्मिक शिक्षणच दिले जात होते असे नाही तर शस्रविद्या पण शिकवली जाई.
तमिळनाडूत आर्य ब्राह्मण गुप्तकालानंतर पोचले असा संदर्भ आहे. यावरूनही
या दोन गोष्टींचा काल तीन हजार वर्षांपेक्षा जास्त जुना नसावा.
महाभारतात अगस्तींचा उल्लेख केवळ एक इतिहास काळातील व्यक्ती असा येतो.
रामायणात ब्राह्मण आणि ऋषी त्यांच्या रक्षणासाठी क्षत्रियांवर अवलंबून असतात. महाभारतात तीन ब्राह्मण व्यक्ती युद्धात सामील होतात – द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि अश्वत्थामा. रामायण काळापर्यंत वर्णव्यवस्था दृढ झाली होती असे दिसते.
दोन्ही गोष्टीत परशुरामाचा उल्लेख येतो. प्रत्यंचा लावताना राम शिवधनुष्य तोडतो. खवळून परशुराम लढाई करण्यास येतो. राम त्याला हरवितात. महाभारतात अंबा परशुरामाकडे भीष्माची तक्रार घेऊन जाते. परशुराम भीष्मास अंबेशी लग्न करण्यास सांगतात. भीष्म नाही म्हणतो. मग युद्ध होते ज्यात परशुराम हरतात.
सध्याच्या ब्राह्मणांना परशुराम वंदनीय वाटतात. परशुरामांनी क्षत्रियांचा संहार केला असा पुराणात उल्लेख येतो. रामायण आणि महाभारताचे लेखक ब्राह्मण नव्हते. राम आणि भीष्म क्षत्रिय होते. या दोघांनी परशुरामाला हरविले. दोन्ही गोष्टींत परशुरामाचे पात्र काही गौरवास्पद दाखविलेले नाही.
इंद्र आणि सूर्य

तंजावर शैलीतील इंद्राचे चित्र
दोन्ही गोष्टींत इंद्र आणि सूर्य यांना महत्त्वाची भूमिका आहे.
रावणाला भ्रमित करण्यासाठी इंद्र रंभेला रावणाकडे पाठवितो पण रावण बधत नाही आणि रागावून इंद्रावर हल्ला करतो. रावण इंद्राला पराजित करून लंकेत बंदी म्हणून आणतो. मेघनाद यांच्याबरोबर समेट करून ब्रह्मा इंद्राची सुटका करतात.
रामायणाच्या गोष्टीत रावणाला मारण्यासाठी इंद्र विष्णूला पृथ्वीवर अवतार घेण्यास सांगतो. रामाचे जेव्हा रावणाशी युद्ध होते तेव्हा इंद्र आपला रथ रामाला देतो.
महाभारतात इंद्र अर्जुनाचा पिता आहे. वनवासात असताना अर्जुन इंद्रलोकात विशेष अस्त्रे मिळविण्यासाठी जातो. युद्ध सुरू होण्याआधी इंद्र कर्णाकडून कवचकुंडले चलाखीने घेतो ज्यामुळे कर्ण अवध्य राहत नाही.
दोन्ही गोष्टींत इंद्राचा सहभाग पाहून असे वाटते की आपल्या समाजाचे
साधारण एकाच काळातील वर्णन या दोन गोष्टी करतात. इंद्रायणी सावकार यांच्या
मते इंद्र ही एक व्यक्ती नसून ते एका अधिकाराचे नाव आहे. योग्य कारभार न
झाल्यास ब्रह्मा, विष्णू आणि महेश ती व्यक्ती बदलतात.
महाभारतात कर्णाचे वडील सूर्य असतात तर अर्जुनाचे इंद्र. रामायणात वालीचे वडील इंद्र असतात तर सुग्रीवाचे सूर्य.
इंद्र ही एक व्यक्ती नसून ते एका अधिकाराचे नाव आहे.
इंद्राविषयी नेहमीच संभ्रम निर्माण होतो. एकीकडे पुराणकथात -जे सगळ्यात नंतर आले (वैदिककाळ उत्तरार्ध)- तो विलासी, भोगी, स्त्रीलंपट दिसतो. याउलट ऋग्वेदात जे सगळ्यात प्राचीन आहे (वैदिककाळ पूर्वार्ध), तिथे इंद्राची स्तुती दिसते. मी ऋग्वेदाच्या इंग्रजी भाषांतराचा वर्डक्लाउड काढला होता तेव्हा मला त्यात इंद्र हा शब्ध सगळ्यात मोठा दिसला होता.
तमिळनाडूत आर्य ब्राह्मण गुप्तकालानंतर पोचले
दक्षिण भारताच्या इतिहासाची शृंखला खूपच तुटक आहे. (तुटक म्हणण्यापेक्षा जवळजवळ नाहीच). त्यात उत्खननाच्या साईट्स पण मर्यादीत आहेत. आणि साहित्यिक पुरावे (लिटररी एव्हिडंस) सुरु होतात ते संगम साहित्यापासून जे इ. पू. ३ शतकाच्या नंतरचे आहे. त्याअगोदरचा लेखी संदर्भ काही मिळत नाहीत. जसे रामायण आहे तसे दक्षिणेत संगम साहित्यात शिलप्पदिकारम हे समकालीन महाकाव्य आहे. ज्यात उल्लेख येतो तो कन्नकीच्या कथेचा. सितेत आणि तिच्यात खूप साम्य दिसते. दक्षिण भारतात आणि श्रीलंकेत तिला देवी म्हणून पूजतात. गुप्तकालाच्या अगोदर मौर्य काळात, मौर्य साम्राज्याची सीमा तामिळनाडूच्या जरा वर आहे. तिथपर्यंत अशोकाचे शिलालेख, स्तंभ आहेत. अशोकाच्या समकालीन साहित्यात चोल, पांड्या, चेरा यांचे उल्लेख येतात. जैन आणि बौद्ध साहित्यानुसार, आर्य ब्राह्मण, बौद्ध आणि जैन साधक राजाश्रयासाठी प्रयत्न करताना दिसतात. उत्तर भारतात तुटक का होईना इतिहासाच्या शृखंला सापडतात. पण दक्षिण भारताबाबत मात्र सगळे कोडेच आहे. रावण, लंका याचा मेळ लागत नाही. शिवाय दक्षिण भारतातल्या देवता उत्तर भारतापेक्षा अगदी वेगवेगळ्या दिसतात.
सीतेविषयी एक गोष्ट पाहा. रावण पंचवटीत येऊन सीतेचे हरण करणार आहे हे रामांना आधीच माहीत होते. एके दिवशी लक्ष्मण लाकडे आणण्यास बाहेर गेलेला असताना रामांनी हे रहस्य सीतेला सांगितले आणि असे सुचविले की सीतेने अग्निदेवाच्या आश्रयाला जावे आणि एक मायावी सीता आश्रमात राहील. रामांच्या सांगण्याप्रमाणे सीता अग्निदेवाच्या आश्रयाला गेली आणि तिची प्रतिकृती पंचवटीच्या आश्रमात राहिली. पुढची गोष्ट आपल्याला माहीत असते.
पांचटपणाची हद्द आहे, म्हंजे ती खरी सीता नव्हतीच तर? मग आम्ही उगाच तिला पतिव्रता, सोशिक, धैर्य, विवेक याची पवित्र मूर्ती वगैरें समजून राहिलो. बिचारीची लै कुत्तरओढ झाली वगैरे वाटलं, तिच्यावेळी आजच्यागत कौटुंबिक न्यायालयं असती तर तिची फारच सोय झाली अस्ती नै, पर नाही गड्या, खरी सीतामाय तर अग्नीदेवाच्या FireBnB मंदी ( किंवा अग्नीदेवाच्या व्हॉईड मंदी (TGP मधल्या जेनेटच्या व्हॉइड प्रमाणे) ) आरामाsत राहत होती.. तिला ह्या समद्या नाटुकल्याची लाईव्ह टेलिकास्ट बघण्याची सोय रामदेवानं केली होती.. आणि ती fire-proof (अग्नी-रोधक) वाडग्यातून Netflix & Chill'd खात आरामात ते बघत राहिली. आणि "आता तुमची येण्ट्री बरका, ऍक्शन! " म्हंटल्याबरोबर एक सोशिक, धैर्य, विवेक याची पवित्र मूर्ती असल्यागत आगीतून बाहेर आली.. वाह वाह.. नाय म्हंजी तुम्हास्नी (म्हणजी मूळ लिवणार्यासनी) पुरस्कारच द्याया पाहिजे. नाय म्हंजे, एखाद्या चांगली गोष्टीत नकोते ट्विस्ट घालून त्याचं वांग कसं कराव हे तवापासून बरका.. तुम्हाला काय वाटलं ते फकस्त बॉलीवूडलाच जमतंय ? अरेरे, रामायनाट्यातल्या फक्त एका पात्रविषयीं थोडा आदर होता आज तोही निसटला..
महाभारत आणि रामायणकालीन समाज
सुधीर भिडे
मागील भाग इथे.
विषयाची मांडणी
वर्ण
स्त्रियांची स्थिती
नियोग
कुटुंब
राजकीय संस्था
धर्म
शेती प्रधान अर्थव्यवस्था
जुगार
गुलामी
युद्धे
---
या दोन महाकाव्यांतील कथेचा काल उपनिषदकालानंतर आणि बुद्धापर्यंत यामधला
असावा. त्या काव्यांची रचना बुद्धानंतर पुराणकालापर्यंत असावी. दोन्ही
गोष्टींतून समाजाचे वेगळे चित्र पुढे येते.
वर्णव्यवस्था
समाजात ब्राह्मण आणि क्षत्रिय हे दोन प्रमुख वर्ण दिसतात. वैश्य आणि शूद्र
हे वर्ण येत नाहीत. आर्यांशिवाय या देशात राहणाऱ्या लोकांच्या काही जाती
वर्णिलेल्या आहेत. राम जेव्हा वनवासाला जातात तेव्हा ते निषाद राज्यात
येतात, जे आर्य नाहीत. राक्षस या जातीविषयी निराळा विचार करू. महाभारत
कालानंतर चार वर्ण प्रामुख्याने अस्तित्वात आले असे दिसते. बुद्धाच्या
काळात वैश्य आणि शूद्र प्रामुख्याने अस्तित्वात होते.
माधवराव चितळ्यांच्या मताप्रमाणे भारतीय कथाकारांनी मनोरंजनासाठी वानर या शब्दाचे विकृत स्वरूप उभे केले. वानर या शब्दाचा अर्थ वनावर उपजीविका करणारे. वाल्मिकीच्या रामायणात या समाजाविषयी काय माहिती मिळते? सामाजिकदृष्ट्या हा समाज प्रगत होता. या समाजात चातुर्वर्ण्य व्यवस्था नव्हती. वालीचे वर्णन शूर असे आहे, क्षत्रिय असे नाही.

वाली, कंपनी स्कूल, १९वे शतक.
मारुती स्तोत्रात ही ओळ येते - वनारी अंजनी सुता रामदुता प्रभंजना – येथे हनुमान वनात राहणार्या अंजनीचा मुलगा असे वर्णन आहे.
अरण्यकांडात (सर्ग ४९ ते ५६) रावण आपल्या राज्याची बढाई मारत असताना सीतेला
सांगतो की मी १० कोटी राक्षस आणि २० कोटी इतर अशा लोकसंख्येचा राजा आहे.
वाल्मिकी इतर लोकवस्तीला वनवासी म्हणतात, ज्यात वानर आले.
आपण ३० कोटी जनसंख्येची सत्यता थोडी बाजूस ठेवू. रामायणात बरेच आकडे असे अतिशयोक्तीचे आहेत. त्या काळच्या जनतेत दोन तृतीयांश वनवासी / आदिवासी लोक होते. आदिवासी हे भारतात ५०,००० वर्षांपूर्वी आलेले मूळचे भारतीय. मग हे एक तृतीयांश राक्षस कोण? मूळ आदिवासींनंतर भारतात इराणमधून लोक आले. ते १०,००० वर्षांपूर्वी आले. येथील लोक आणि नवे भारतीय यांनी सिंधू सरस्वती संस्कृती वसविली. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासानंतर हे लोक भारतभर पसरले. पण त्यांना राक्षस निश्चितच म्हणता येणार नाही. कारण ते लोक आर्यांपेक्षा सांस्कृतिकदृष्ट्या जास्त प्रगत होते.
राक्षस हा उल्लेख रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांत येतो. यांचे वर्णन नरमांसभक्षक असे केले जाते. ते क्रूर आणि संस्कृतिहीन असे वर्णन येते. रावण क्रूर होता पण संस्कृतिहीन नव्हता. या दोन्ही काव्यांतून सुमारे ३००० वर्षांपूर्वीच्या समाजाचे चित्र येते. या समाजात हे राक्षस कोण हा प्रश्न अनुत्तरित राहतो. का असे समजायचे की आदिवासींपैकी काही राक्षस समाजाचे होते?
स्त्रियांचे स्थान
दोन्ही गोष्टीत स्त्रिया घटनांना दिशा दाखवतात असे दिसत नाही. तसे पाहिले
तर दोन्ही गोष्टीत स्त्रियांचे आयुष्य दु:खात जाते. महाभारतामध्ये
स्त्रियांनी होमहवन केल्याचा उल्लेख नाही. रामायणात कौसल्येने होम केला
आहे. सीतेने संध्या केली असाही उल्लेख आहे. महाभारतकालीन स्त्रिया या
प्रकारची धार्मिक कृत्ये करीत नसत. वेदात स्त्रियांनी होमहवन केल्याचे
उल्लेख आहेत.
दशरथ कैकेयीला 'तू विधवा होऊन राज्य कर' असे सांगतो. स्त्रियांनी राज्य करण्याची कल्पना महाभारतकाली उरली नव्हती. महाभारतात स्त्रिया युद्धावर गेल्याचे वर्णन नाही. कैकेयी युद्धावर गेल्याचे वर्णन आहे. वेदामध्येही स्त्रिया युद्धावर गेल्याचे वर्णन आहे. सतीची चाल महाभारतात दिसते. पांडू निवर्तल्यावर माद्री सती गेली. रामायणात मात्र सतीची प्रथा कोठेही दिसत नाही.
आपण पहिल्या भागात असे प्रमेय केले की महाभारतकालीन समाज रामायणाच्या आधीचा वाटतो. वरची माहिती त्या प्रमेयाच्या उलट जाते.
पुरुषांची नावे ‘या आईचा मुलगा’ अशी घेतलेली दिसतात जसे की रामायणात सौमित्र आणि महाभारतात कौन्तेय. व्यक्तीची आई निश्चित असते पित्याविषयी सांगता येत नाही. (अमेरिकेत शाळेत प्रवेशासाठी फक्त आईचे नाव लागते.)
दोन्ही गोष्टींत समाज पूर्णपणे पुरुषप्रधान होता. स्त्रियांना सामाजिक किंवा राजकीय महत्त्वाचे स्थान नव्हते.
तृतीयपंथी व्यक्तींकडे समाज इतक्या क्षुद्रपणे पाहत नसे, जी आज स्थिती
आहे. शिखंडी दृपदाचा मुलगा. तो तृतीयपंथी होता आणि महारथी होता. त्याची
कुचेष्टा झालेली आपण पाहत नाही. पांडवांच्या शिबिरात युद्धस्थितीचा विचार
करण्यासाठी ज्या बैठका होत त्यात शिखंडी भाग घेत असे.
‘अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा’ या पाच स्त्रिया प्रात:स्मरणीय
आहेत असे सांगण्यात येते. यातील द्रौपदी सोडता इतर चार स्त्रिया रामायणातील
आहेत. पतीची सेवा करणे आणि दिलेली शिक्षा भोगणे यापेक्षा जास्त काही
त्यांनी केल्याचे दिसत नाही. द्रौपदी मात्र निराळी आहे.
नियोग
एखाद्या स्त्रीला वैवाहिक संबंधातून पुत्र होत नसेल तर नियोगाचा वापर केला जाई. मनुस्मृतीत याविषयी वचने आहेत. पांडव आणि कौरवांचे पिता पांडू आणि धृतराष्ट्र यांचा जन्म नियोगाने झाला आहे. पांडवांचा जन्मही नियोगाने झाला आहे.
रामायणात नियोगाचा उल्लेख नाही.
मनुस्मृती या दोन महाकाव्यांच्या आधी लिहिली गेली. मनुस्मृतीत नियोगाचे नियम सांगितले आहेत.
लग्ने आणि कुटुंब
महाभारतात कुरु घराण्यात मुलांचा जन्म कसा झाला याला काही महत्त्व दिसत
नाही. सत्यवतीचा अनौरस पुत्र ज्याला तिने तिच्या लग्नाआधी जन्म दिला, तो
पुढे महर्षी व्यास झाला. विदुर हा दासीचा पुत्र पण तो पांडू आणि धृतराष्ट्र
यांचा भाऊ समजला गेला. व्यास आणि एका दासीपासून झालेल्या मुलाचा कुरु
कुळाशी काही जैविक संबंध नाही आणि तरी त्यास आदराने वागविले गेले.
पांडवांचा जन्म नियोगासारख्या क्रियेने झाला.
रामायणात लग्नसंस्थेला महत्त्व आहे. दशरथ आणि रावण यांना एकापेक्षा जास्त
बायका आहेत परंतु रामाचे एकपत्नीव्रत आहे. रामाच्या भावांच्या पण एकेकच
बायका आहेत. संसारात स्त्रीला समान स्तर नाही. स्त्रीचे पहिले कर्तव्य
म्हणजे पतीची सेवा हे परत परत सांगितले जाते. सीता रामाला हेच सांगते आणि
राम आपल्या आईला हेच सांगतो. ज्या स्त्रिया असे वागत नाहीत त्यांना
स्वर्गात स्थान नाही असे सांगितले जाते.
राम आणि सीता दोघेही मद्य पित असत असे वाल्मिकी लिहितो. महाभारतकाली स्त्रिया दारू पिताना दिसत नाहीत. कृष्ण आणि अर्जुन दारू पिऊन बेभान झाल्याचे व्यास वर्णन करतात.
जर रामायण महाभारतानंतर लिहिले गेले, तर असे म्हटले पाहिजे की महाभारत काळात सामाजिक आणि कौटुंबिक नीतिमत्तेचा ऱ्हास झाला.
राजकीय व्यवस्था
लहान लहान राज्ये अरण्याने वेढलेली होती. ताकदवान राज्ये बाजूच्या राज्यांवर आधिपत्य गाजवत परंतु प्रदेश गिळंकृत करून एकछत्री साम्राज्य स्थापणे, (जे पुढे मौर्यांच्या काळात झाले), अशी कल्पना नव्हती. रामाने अश्वमेध यज्ञ केला. युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला. याचा अर्थ एवढाच होता की बाजूच्या राज्यांनी त्यांचे श्रेष्ठत्व मानले. राज्यात लहान लहान नगरपदे असत. नगरपदांचे स्वत:चे शासन असे.
राजा मंत्र्यांच्या आणि कुलगुरूच्या मताला किंमत देत असे. दशरथाने जेव्हा रामाला राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याने मंत्र्यांची आणि नगरजनांची सभा बोलावून त्यांचे मत घेतले.
त्या काळात राज्याचे भौगोलिकदृष्ट्या चार भाग होते. नगरे आणि त्या जवळचा भाग राष्ट्र असे ओळखला जायचा. त्याशिवाय जनपदे, अरण्ये आणि आश्रमपदे असे भाग असत. हे आश्रम म्हणजे एक मोठी वस्ती असे, तेथे शिक्षण घेण्यास आलेले विद्यार्थी आणि तपस्या करणारे ऋषी असत. आश्रमाच्या जवळ, पण बाहेर, वानप्रस्थी असत.
भरत जेव्हा रामास भेटला तेव्हा रामाने हे गृहीत धरले की भरत राजा झाला आहे. रामाने राज्य कसे चालले आहे याची विचारणा करताना भरतास साठ प्रश्न केले. राज्यशास्त्राच्या पुस्तकात याचा समावेश केला पाहिजे. त्यापैकी काही निवडक प्रश्न -
- चांगल्या लोकांशी विचारविनिमय करून राज्यव्यवहार करतोस ना?
- गुपिते फुटून सगळ्यांना माहीत होत नाहीत ना?
- चांगली कार्ये पूर्ण होत आली असताना लोकांना त्याबद्दल कळते ना? (आधीच उगीच गाजावाजा केला जात नाही)
- गुणवान शोधून त्यांच्यावर काम सोपवितोस ना?
- कारभारी अतिकठोर होऊन प्रजेला त्रास देत नाहीत ना?
- सैनिकांचे पगार वेळेवर होतात ना?
- अयोध्येचे तू नीट रक्षण करतोस ना?
- राज्यातील शेती केवळ पावसावर अवलंबून नाही ना? (तलाव, पाटबंधारे यांची नीट व्यवस्था आहे ना?)
- अयोध्येतील लोकांना स्वतः भेटतोस ना? जे कामगार आहेत त्यांना स्वतः भेटतोस ना?
- महसूल चांगला आहे ना? खर्च कमी आहे ना? (खर्च महसुलापेक्षा जास्त नाही ना?)
- गोडधोड जेवण एकटाच जेवत नाहीस ना?
धर्म
त्या काळात धर्म यज्ञांवर आधारित होता. मूर्तिपूजा नव्हती. टेलिव्हिजन
मालिकांमध्ये दाखविल्याप्रमाणे देवळे नव्हती. रामायणात वर्णन केलेल्या
देवता महाभारताहून निराळ्या आहेत. रामायणातील सर्व देवता ऋग्वेदकालीन आहेत –
रुद्र , यम , इंद्र, मरुत, अग्नि, वसू, आदित्य, अश्विनीकुमार, वरुण – हे
देव रामायणात पुजलेले दिसतात.
महाभारतात गणपती आहे. रामायणात गणपतीचा उल्लेख नाही.
अर्थव्यवस्था
शेती आणि गायींचे कळप पाळणे हे प्रमुख व्यवसाय होते. धातूची भांडी
बनविण्याचे शास्त्र प्रस्थापित झाले नव्हते. मातीच्या भांड्यांचा वापर असे.
घरे विटा आणि लाकूड यांनी बनविली जात. रामायणात शरयू नदीच्या उत्तर काठावर
यज्ञाच्या तयारीला सुरुवात होते. यज्ञनगरी वसवण्यात आली. या कामासाठी लाखो
विटा तयार करा असे आदेश देण्यात आले.
लिहिण्याची कला
लिहिण्याच्या कलेची सुरुवात झालेली नव्हती . निरोप द्यायचा म्हणजे सेवक
पाठविला जाई. बुद्धकाळानंतर लिहिण्याची कला आढळून येते. Asokan edicts (3rd
century B.C.) are the earliest decipherable inscriptions, so far
available in India (Antiquity of writing in India, Archaeological Survey
of India)
जुगार
जुगार सामान्यपणे खेळला जाई. जुगार खेळण्याला नकार देणे म्हणजे क्षत्रिय
धर्माच्या विरोधी समजले जाई. युधिष्ठिराचे जुगार खेळणे हे महाभारताच्या
गोष्टीच्या मध्यभागी आहे. पांडव अज्ञातवासात विराट राजाच्या राजवाड्यात
राहत असताना विराट राजा पण जुगाराचा व्यसनी दाखविला आहे.
रामायणात जुगार नाही.
गुलामगिरी
जेव्हा भीष्मांना ही जाणीव होते की दुसऱ्या दिवशीच्या युद्धात ते जायबंदी
होणार आहेत तेव्हा ते त्यांच्या दोन सेवकांना गुलामगिरीतून मुक्त करतात.
सेवकांना ते असे सांगत नाहीत की कामावरून त्यांना काढले आहे, किंवा
उद्यापासून काम नाही. ते स्पष्टपणे त्यांना गुलामगिरीतून मुक्त केले आहे
असे बोलतात.
रामायणात गुलामगिरीचा उल्लेख नाही.
युद्धशास्त्र
युद्धात वापरण्यात आलेली शस्त्रे दोन्ही महाकाव्यात एकच आहेत. धनुष्य-बाण, गदा, तलवार, भाला ही शस्त्रे वापरलेली दिसतात. मोठे योद्धे रथात उभे राहून युद्ध करतात.
तलवार, बाण, भाला आणि गदा ही शस्त्रे धातूची बनलेली होती का? याचे उत्तर अवघड आहे.
तमिळनाडू मध्ये Mayiladumparai या गावी झालेल्या उत्खननात जी लोखंडाची अवजारे आणि लोखंड बनविण्याच्या भट्टीचे अवशेष सापडले आहेत त्या अवजारांचा काल ४२०० वर्षांपूर्वीचा असावा असे कार्बन डेटिंगवरून ध्यानात आले आहे. – इंडियन एक्स्प्रेस १४/९/२३

The beginning of iron technology in the middle Ganga plain suggested
on the premise of findings is that the early and mid 2nd millennium BC.
(Calibrated C14 date at Dadupur, near Lucknow - 1700 BC)
Ancient Indian History and Archaeology University of Lucknow, Dr. Anil Kumar, Professor Ancient Indian History and Archaeology University of Lucknow
वरील दोन संदर्भांवरून असे म्हणता येईल की भारतात साडेतीन हजार वर्षांपूर्वी लोखंड बनविणे चालू झाले होते. एके काळी जगात सर्वोत्तम लोखंड भारतात बनत असे. भारतातून दमास्कसला लोखंड निर्यात होई, जिथे त्याचा वापर तलवारी बनविण्यासाठी होत असे. खनिजापासून लोखंड मिळविण्यासाठी लाकडी कोळशाचा वापर होई. ज्वलनाला हवा मिळण्यासाठी भात्याचा वापर होई. या सर्वांचे अवशेष उत्खननात मिळाले आहेत.
ज्या प्रकारच्या भट्ट्या वापरल्या जायच्या त्याचे चित्र खाली दिले आहे.

शस्त्रे बनविण्यासाठी जे लोखंड वापरले जाई त्यास वूत्झ स्टील असे नाव आहे. वूत्झ हा शब्द दक्षिण भारतीय भाषांपासून आला आहे.
आपण हे पाहिले की दोन्ही काव्यात ज्या समाजाचे वर्णन आहे तो समाज तीन हजार
वर्षांपूर्वीचा होता. यावरून असे सांगता येईल की जर कथानकाचा काल साडेतीन
हजार वर्षांपूर्वीचा नसेल तर युद्धात लोखंडाची हत्यारे वापरली गेली असतील.
ज्या काळात ही काव्ये लिहिली गेली, दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात, त्या
काळात निश्चितच लोखंड बनविण्याची कला / शास्त्र प्रगत झाले होते आणि तलवारी
बनत होत्या. सातवाहनकालीन उत्खननात लोखंडाची शस्त्रे मिळाली आहेत.
महाकाव्य लेखनाचा काल हा सातवाहनांचा काल होता.
महाभारत युद्धात हत्तींचा वापर केलेला दिसतो. रामायण युद्धात हत्तींचा वापर
दिसत नाही. हे जरा आश्चर्याचे वाटते कारण आजही लंकेत मोठ्या प्रमाणावर
हत्ती आहेत. रावणाच्या सैन्यातही हत्ती वापरलेले दिसत नाहीत .
---
(क्रमशः)
मौर्य साम्राज्याच्या विघटना नंतर
महाभारतात गणपती आहे. रामायणात गणपतीचा उल्लेख नाही.
मौर्य साम्राज्याच्या विघटना नंतरचा आणि गुप्त साम्राज्याच्या उदयापूर्वीचा - मधला जो साधारण ५०० वर्षांचा काळ आहे, तो मोठ्या राजकीय उलथा-पालथीचा काळ आहे. बदलत्या राजकीय घडामोडींचा प्रभाव साहित्य आणि संस्कृतीत पडला असला पाहिजे. आर्यांचे आणि मगध साम्राज्याचे जे वायव्येकडचे टोक आहे ते म्हणजे गंधार. तक्षशिला सारखे विद्यापिठ याच भागात होते. तिथेच पाणिनीने व्याकरणावर (इ.स. पू. ३५०) आणि चाणक्याने राज्यशास्त्र-अर्थशास्त्रावर संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिले. त्यामुळे सहाजिक वाटते की आजूबाजूच्या प्रदेशातली (कंबोज, बहिलिका वा बॅक्ट्रिया) भाषा आणि काही प्रमाणात संस्कृती फार वेगळी नसावी. सीमेपलिकडे इंडो-ग्रीक राज्य होते, आणि भारतातून जाणार्या "उत्तरपथ" मार्गे थेट ग्रीक पर्यंत व्यापार होत होता. मौर्य काळात चंद्रगुप्त ने राजकारणाचा (matrimonial alliances) भाग म्हणून सेल्युकसच्या मुलीबरोबर लग्न केले होते. पण जसे सम्राट अशोक नंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली तसे बंड होऊन मगध आणि गंगेच्या खोर्यात शुंग वंशाच्या राज्यांची सत्ता आली. दक्षिणेत सातवाहन साम्राज्य उदयाला आले. उत्तरेत मथुरेपर्यंत प्रथम इंडो-ग्रीक यांनी (राजा मणेंदर किंवा मिलिंदा) त्यानंतर शाक/क्षत्रप (Indo-Scythians, राजा रुद्रदमन, संस्कृतमधला सगळ्यात जुना स्तंभ, जुनागडमधला याच्या राजवटीतला आहे) यांनी आणि शेवटी कुषाण वंशीयांनी (राजा कनिष्क) सत्ता स्थापन केली. हे कुषाण वंशीय शैवपूजक होते आणि वैदिककाळ पूर्वार्धात त्यांची वस्ती प्रथम युशी नंतर बॅक्ट्रीया इथे होती. त्यांच्या काळात उत्तर भारतात सोन्याची नाणी चलनात होती. त्यापैकी काही नाण्यांवर प्रचलित शंकराच्या जवळ जाणारे चित्र दिसते (अर्थात बुद्ध आणि ग्रीक देवतांचीही नाणी दिसतात) . ॠग्वेदात जे रुद्राचे वर्णन येते त्याच्या वर्णनामध्ये आणि प्रचलित शंकरामध्ये वर्णना मध्ये फरक आहे. गणेशाची कथा येते ती मत्स्यपुराणात जी लिहिली गेली इ.स. दुसर्या-तिसर्या शतकात. हा योगायोग नक्कीच नसावा. या कुषाणांना गुप्त राजांनी पुन्हा बॅक्ट्रीया पर्यंत माघार घ्यायला लावली.
त्या काळात धर्म यज्ञांवर आधारित होता. मूर्तिपूजा नव्हती.
अभ्यासकांच्या मते यापैकी बहुतेक साम्राज्यावर ग्रीक, बुद्धीझम यांचाही प्रभाव आहे (किंवा व्यापारी वर्गाला जवळ ठेवण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्माला राजाश्रय दिला असावा) उदा. मणेंदर १ किंवा मिलिंदा याचे पाली मधले मिलिंदपन्हो, कनिष्क चे स्तुप. त्यांनीच ग्रीकांची हेलनीस्टीक शैली भारतात आणली असावी (ग्रेको बुद्धिस्ट आर्ट). त्यामुळे ग्रीक शैलीसारख्या मूर्त्या (खास करून बुद्धाच्या) बनू लागल्या. आणि त्याचा प्रभाव शेवटी आर्य संस्कृतीवरही झाला. त्याअगोदर काही अभ्यासकांच्या मते आर्यांमध्ये मूर्तीपूजा वा मंदिरे असण्याची शक्यता कमी आहे.
रामायणात जुगार नाही
१)अयोध्या कांडात कैकई जेंव्हा रामाला वनवासात पाठवा असे राजा दशरथाला सांगते तेंव्हा हा श्लोक आढळतो:;अयोध्यायां नरेन्द्राणां निवासो नात्र संशयः । अयोध्या नाम नगरी नाम्ना तस्यां वसाम्यहम् ॥ अयोध्यां त्यजतो मे त्वं रामं चारण्यमाश्रितम् । किं नु खेलसि द्यूतेन दुर्बुद्धे विपरीतया ॥
२) किष्किंधा कांडात हनुमान जेंव्हा लंकेला जाऊन येतो आणि रामाला भेटतो तेंव्हा असे सांगतो:द्यूतेनापहृतप्रभो रावणो राक्षसाधिपः । अयोध्यां त्यजतो मां च वनं चारण्यमाश्रितः ॥
अशा पद्धतीने रामायणात जुगार खेळण्याचा संदर्भ येतो परंतु जुगार खेळून राज्य पणाला लावण्या इतपत द्युत बदनाम झालेले नव्हते जे महाभारतात झालेले होते.
महाभारतात गणपती आहे. रामायणात गणपतीचा उल्लेख नाही.
गोकर्णमहाबळेश्वराची कहाणी काय भाव? की, तिची विल्हेवाट (सोयिस्करपणे) ‘प्रक्षिप्त’ म्हणून लावायची?
समाजात ब्राह्मण आणि क्षत्रिय हे दोन प्रमुख वर्ण दिसतात. वैश्य आणि शूद्र हे वर्ण येत नाहीत.
महाभारत कालानंतर चार वर्ण प्रामुख्याने अस्तित्वात आले असे दिसते. बुद्धाच्या काळात वैश्य आणि शूद्र प्रामुख्याने अस्तित्वात होते.
मग ‘वर्णसंकर होऊन अनाचार माजेल’ असे श्रीकृष्ण गीतेत जो बोंबलून बोंबलून सांगत असतो, त्याची काय वाट? फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा संकर झाला, तरी इतकी दुरवस्था?
रामायणात गुलामगिरीचा उल्लेख नाही.
हे रोचक आहे. आणि, या परिप्रेक्ष्यात, नंतरच्या काळांत ‘रामदास’, (मॉरिशसचे माजी पंतप्रधान श्री. शिवसागर) ‘रामगुलाम’ अशी नावे दिली-घेतली गेली, हा निव्वळ दैवदुर्विलास आहे.
आपण ३० कोटी जनसंख्येची सत्यता थोडी बाजूस ठेवू. रामायणात बरेच आकडे असे अतिशयोक्तीचे आहेत.
किंवा, त्या ३० ‘कोटी’ जनसंख्येचा अर्थ (३३ कोटी देवांप्रमाणे) ३० ‘प्रकारची’ लोकसंख्या असा तर नसेल ना?
आणि रामेश्वरमची अशीच काहीतरी कथा आहे ना?
रावण शंकराची पिंडी लंकेला घेउन जात असतो त्याला ती नेता येउ नये म्हणून गणपती "काहीतरी आयडिया" करतो. आणि नंतर लंकेला जाण्याकरता समुद्र पार करायचा असतो तेव्हा श्रीराम तिथे पुजा करतात.
ही कथा बऱ्याचवेळा ऐकलेली आहे, त्याचे मूळ माहिती नाही.
का बाळगोपाळांच्या मनोरंजनाकरता ती रचलेली आहे? माहिती नाही.
रामचरितमानस मधला हा दोहा पहा:
बिलपहिं बिकल दास अरु दासी। घर घर रुदनु करहिं पुरबासी॥
अँथयउ आजु भानुकुल भानू। धरम अवधि गुन रूप निधानू॥3॥
दास आणि-दासी व्याकूळ होऊन विलाप करत आहेत. नगरातील लोकं रडत आहेत. एक
धर्मात्मा, रूप आणि गुणाचे भांडार सूर्य कुळाच्या सूर्याचा अस्त झाला आहे.
या दोह्यातील दास आणि दासी म्हणजे गुलाम नव्हेत काय?
रामायणात नियोगाचा उल्लेख नाही.
रामयणात मुले व्हावीत म्हणुन दशरथ यद्न्य करतो ते कशाचे प्रतिक आहे? मला तरी पुत्रकामेष्टी यद्न्य म्हणजे यद्न्यकर्त्या ऋषि बरोबर नियोग असेच वाटत होते.
युद्धात वापरण्यात आलेली शस्त्रे दोन्ही महाकाव्यात एकच आहेत.
रामायणात राम लक्श्मण धनुश्य वापरतात. पण इतर वानर योद्धे दगड धोंडे
वापरतात. गदायुद्धा चा उल्लेख रामायणात नाही.( गदेचा आहे पण गदा युद्धाचा
नाही) तसेच रामाने रथात बसून युद्ध केले नाही. रथ हे रावणाकडुन वापरले गेले
होते.
रामायणातली शस्त्रे ही महाभारतातील शस्त्रांहून थोडी अप्रगत आहेत.( फेकून
मारणे किंवा हातानी मारणे यासारखी) महाभारतातील शस्त्रे ही यंत्रे वापरून (
सुदर्शन चक्र / धनुष्य ) फेकली जात होती.
सर्वात महत्वाचे म्हणजे महाभारतातली लढाई ही जमीनीसाठी झालेली आहे.
रामायणात शेतीचे उल्लेख आहेत पण लोक स्वत:च्या मालकीची जमीन राखत होते असे
कोठेच उल्लेख नाहीत्
सर्वात महत्वाचे म्हणजे महाभारतातली लढाई ही जमीनीसाठी झालेली आहे. रामायणात शेतीचे उल्लेख आहेत पण लोक स्वत:च्या मालकीची जमीन राखत होते असे कोठेच उल्लेख नाहीत्
रामाने अश्वमेध यज्ञ केला होता. त्यामुळे, रामायणाच्या काळात जमिनीसाठी लढाई होत नव्हती असे वाटत नाही. एनसीआरटीच्या जुन्या इतिहासाच्या पुस्तकात वैदिककाळ पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग केले होते. पूर्वार्धाचा काळ हा ऋग्वेदाचा काळ मानला जातो. आणि ऋग्वेदाचा अभ्यास करून अभ्यासकांनी असा निष्कर्ष काढला होता की, जरी शेतीची/पिकांची माहिती असली, तरी पूर्वार्धात जमीन (लँड) ही प्रमुख संपत्ती आहे असे वाटत नाही. मुख्य संपत्ती हे पशू आहे. दानही पशू / दासी म्हणून दिले जाते होते. यावरून ती एक pastural economy असावी असा तर्क आहे. पुढे लोखंडाचा शोध लागल्यावर सिंधू खोर्यातून गंगेच्या खोर्यात विस्तार होत गेला असावा. कारण आता लोखंडाच्या कुर्हाडीने जंगल तोडून शेती करता येते. नांगरणी करता येते. जे ब्रॉन्झएजमध्ये शक्य नव्हते. सध्याच्या (गेल्या वर्षीच्या) एनसीआरटी च्या पुस्तकात वैदिक काळ हा कालखंडच पाठ्यपुस्तकातून काढून टाकलेला आहे. वास्तविक जिथे तज्ञांमध्ये मतभेद आहेत ते मतभेदाचे मुद्दे सांगून (वा गाळून) जिथे जिथे एकमत आहे तो भाग ठेवता आला असता.
रामायण व महाभारत – कथानकाचा काळ
सुधीर भिडे
मागील भाग इथे.
विषयाची मांडणी
लिखाणाचा काल आणि कथानकाचा काळ
अतिप्राचीन घटनांचा काल ठरविण्यासाठी खगोलशास्त्राचा वापर
निलेश ओक यांचे संशोधन – महाभारत
निलेश ओक यांचे संशोधन – रामायण
ओकांच्या मतात कितपत सत्यता?
ओकांसारखे इतरही प्रयास
पुरातत्व संशोधन
निष्कर्ष
---
लिखाणाचा काल आणि कथानकाचा काळ
भाग एकमध्ये आपण खालील माहिती पाहिली -
वि. स. खांडेकर यांनी ययाती ही कादंबरी विसाव्या शतकात लिहिली. या कादंबरीचा लिखाणाचा काल विसावे शतक तर कथानकाचा काल चार हजार वर्षांपूर्वीचा.
समजा १९५० साली एका लेखकाने माधवराव पेशव्यांच्या जीवनावर कादंबरी लिहिली. दुसऱ्या लेखकाने २०२० साली शहाजी राजांच्या जीवनावर कादंबरी लिहिली. मागून लिहिलेली कादंबरी आधीच्या कालाचा इतिहास सांगते.
असाच काहीसा प्रकार महाभारत आणि रामायण या बाबतीत झाला असावा. दोन्ही ग्रंथांची निर्मिती बुद्धाच्या कालानंतर झाली. दोन्ही ग्रंथांतून ज्या समाजाचे वर्णन आले आहे तसा समाज बुद्धपूर्व ५०० वर्षात म्हणजे आजपासून साधारणपणे ३००० वर्षांपूर्वी अस्तित्वात असावा. आता असा प्रश्न निर्माण होतो की या दोन काव्यांपैकी कोठले काव्य आधीच्या समाजाचे चित्रण करते?
वर पाहिल्याप्रमाणे रामायणाचा लिखाणाचा काल सन २५० आणि महाभारताचा सन ३५०.
निरनिराळ्या प्रकारे विचार केला तर महाभारतातील समाज रामायणातील समाजाच्या आधीचा असावा.
समजण्यासाठी असे म्हणू की महाभारताच्या कथानकाचा काल ख्रिस्तपूर्व १००० तर रामायणाच्या कथानकाचा काल ख्रिस्तपूर्व ८००, हे सर्व काल अर्थातच ढोबळ मानाने लिहिले आहेत. हा कालखंड वेदकालानंतर आणि बुद्धकालाआधी येतो.
महाभारताच्या कथानकाचा काल रामायणाच्या कथानकाच्या आधीचा वाटतो याचे एक कारण भौगोलिक विस्तार. महाभारताची कथा सप्तसिंधूच्या प्रदेशात घडते. इंद्रप्रस्थ ही जागा पण ओसाड असे वर्णन येते. तेथे नाग लोकांची वस्ती होती. त्यांना तेथून घालवून लावून पांडवांनी आपले राज्य स्थापले असा उल्लेख येतो. या उलट अयोध्या सप्तसिंधूपासून पुष्कळ पूर्वेकडे आहे. आणि रामकथा तेथून दक्षिणेला जाते.
महाभारतात कुटुंबरचना विस्कळीत आहे कोणाचा कसा जन्म झाला याला महत्त्व नाही. रामायणात लग्न आणि कुटुंब ही कल्पना सुनिश्चित आहे.
अतिप्राचीन घटनांचा काल ठरविण्यासाठी खगोलशास्त्राचा वापर
गुंडाळलेल्या दोरीतून भोवरा सोडला की प्रथम भोवऱ्याचा अक्ष – अक्सिस – axis
– सरळ असतो. गती कमी झाली की अक्ष तिरपा होतो आणि भोवरा फिरत असताना
डगमगतो. पृथ्वीचे असेच आहे. पृथ्वी स्वत:भोवती फिरत असताना तिचा अक्ष गोल
फिरत असतो. याला इंग्रजीत प्रीसेशन म्हणतात.

याचे दोन परिणाम दिसतात –
ज्याला आपण ध्रुव तारा म्हणतो – जो पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या वर असतो –
तो बदलतो. १४००० वर्षांनी किंवा १४००० वर्षांपूर्वी ज्याला आपण उत्तर ध्रुव
म्हणतो – तो व्हेगा नावाचा तारा होता/ असेल. जेव्हा इजिप्त मध्ये
पिरामिड्स बांधले गेले तेव्हा उत्तर ध्रुवाच्या वर थुबन नावाचा तारा होता.
अर्थात हे पूर्ण सत्य नाही. कारण १४००० वर्षात पृथ्वीच्या सापेक्ष ताऱ्याची जागा थोडी बदललेली असते.
दुसरा परिणाम म्हणजे जशी शतके जातात तसे सूर्य उगवताना निराळ्या नक्षत्राच्या जवळ असतो.
याचा अर्थ असा झाला की एखाद्या जुन्या ग्रंथात नक्षत्रांची स्थिती नोंदविली असेल तर त्या काळाचे अनुमान करता येते.
निलेश ओक यांचे संशोधन – महाभारत
निलेश ओक अमेरिकेत असतात, ते केमिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी रामायण आणि महाभारत यांचा कालखंड या विषयावर बरेच संशोधन केले आहे. 'निलेश ओक - रामायण आणि महाभारत' असे युट्यूबवर शोधले की त्यांचे पुष्कळ व्हिडिओ मिळतात. महाभारत आणि रामायण आपला इतिहास आहे असे ओक यांचे मत आहे.
महाभारताविषयी त्यांचे संशोधन काय आहे?
महाभारत काव्यात ३०० पेक्षा जास्त वेळेला खगोलशास्त्राचा उल्लेख येतो – जसे
की नक्षत्रे आणि तारे यांची स्थिती, ग्रहणे, ग्रहांची स्थिती.
खगोलशास्त्राच्या अभ्यासकांना वर्णन केलेली स्थिती केव्हा असावी याचा अंदाज
बांधता येतो. एक उदाहरण म्हणजे सप्तर्षी आणि ध्रुव तारा. सप्तर्षी (आणि
इतर नक्षत्रे) ध्रुव ताऱ्याभोवती घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरताना आकाशात
दिसतात. या प्रवासात वशिष्ठ ताऱ्यामागे अरुंधती तारा जाताना दिसतो.
महाभारतात एक श्लोक असा आहे की अरुंधती तारा वशिष्ठ ताऱ्याच्या पुढे जातो.
अशी स्थिती केव्हा असण्याची शक्यता आहे?

ओक यांच्या संशोधनाप्रमाणे ख्रिस्तपूर्व ५५६१ या वर्षी अशी स्थिती आली होती आणि त्यानंतर कधीच येणार नाही. यावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की महाभारत युद्धाचा काल ख्रिस्तपूर्व ५५६१, म्हणजे ७५०० वर्षापूर्वीचा आहे. या शिवाय महाभारतात इतर खगोलशास्त्रीय संदर्भ आले आहेत त्यावरूनही हाच निष्कर्ष येतो असे ते म्हणतात.
खगोलशास्त्राशिवाय पुरातत्व, भूविज्ञान, हवामान शास्त्र, समुद्रशास्त्र अशा निरनिराळ्या शास्त्रांत कालाविषयी पुरावे शोधता येतात. समुद्रशास्त्राच्या पुराव्याची ओक अशी माहिती देतात.
हिमयुग जेव्हा उच्च श्रेणीवर होते, तेव्हा समुद्राची पातळी खाली होती. जसे हिमयुग संपत चालले तशी समुद्राची पातळी वाढू लागली. परंतु ही वाढ एकाच वेगाने होत नाही. काही कालापर्यंत संथ रितीने वाढ होते. पण काही हजार वर्षांनी अचानक फार वाढ होते. असा प्रसंग बरोबर ख्रिस्तपूर्व ५५०० वर्षांपूर्वी आलेला दिसतो. त्या काळात सर्व जगात आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यावरही अशी वाढ नोंदविली गेली. अर्थातच हा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना महाभारताविषयी न काही माहिती होती ना त्यांना ख्रिस्तपूर्व ५५०० हे वर्ष काही विशेष वाटत होते. अशा प्रकारे ते एक पूर्वग्रहदोषाशिवायचे संशोधन होते.
महाभारताच्या शेवटी द्वारका पाण्यात गेली असे उल्लेख आहेत. अशा प्रकारे महाभारत युद्धाच्या काळाला समुद्रशास्त्राप्रमाणे पण आधार मिळतो.
निलेश ओक यांचे संशोधन – रामायण
महाभारताप्रमाणे रामायणातही खगोलशास्त्राचे संदर्भ येतात. त्यातील काही संदर्भ असे -
- हेमंत ऋतूत पुष्य नक्षत्राजवळ सूर्यास्त होतो
- अश्विन महिन्यात वसंत ऋतू असतो.
- ब्रह्मराशी पोल स्टार होता.
या प्रकारच्या विधानांचा खगोलशास्त्रीय अभ्यास केल्यावर ओक यांनी ठरविले की हा काल ख्रिस्तपूर्व १२२०९ असला पाहिजे. या पुराव्याला पूरक असे दोन पुरावे ओकांनी विचारात घेतले.
भरत जेव्हा आपल्या आजोळहून अयोध्येस परत येत असतो तेंव्हा तो पश्चिम वाहिनी सतलज नदीचे वर्णन करतो. ही घटना १४००० वर्षापूर्वी घडली. त्या आधी सतलज दक्षिणवाहिनी होती आणि सरस्वतीस मिळत असे.
समुद्राची उंची वाढत असताना ज्या प्रकारे द्वारका पाण्यात गेली त्याच प्रमाणे रामसेतू पाण्यात गेला.
ओकांच्या मतात कितपत सत्यता?
ओकांच्या लिखाणाला प्रश्न करणारे लिखाण आहे. त्यातील दोन लेखकांचा उल्लेख करतो.
Blog refuting Nilesh Oak's dating of Ramayana to 12209 BCE, Dr. Raja Ram Mohan Roy | Apr, 2021 | Medium
डॉक्टर जयश्री सारनाथान यांनी ओक यांच्या प्रतिपादनाची सत्यता प्रश्नांकित केली आहे (Challenging Nilesh Oak's dates of Mahabharata and Ramayana. "Mahabharata 3136 BCE: Validation of the Traditional Date")
डॉक्टर सुचेता परांजपे यांचा महाभारताचे वास्तव हा कार्यक्रम युट्यूबवर पाहता येतो.
महाभारताच्या रचनेविषयी त्या लिहितात –
युद्धानंतर युधिष्ठिराने व्यासांना विनंती केली की त्यांनी युद्धाची हकिगत लिहावी. व्यासांनी युद्धाचे वर्णन करणारा आठ हजार श्लोकांचा ग्रंथ लिहिला आणि त्यास जय असे नाव दिले. या ग्रंथाची चार हस्तलिखिते करून भारतात चार दिशांना पाठविण्यात आली.
यानंतर पांडवांचा खापरपणतू जनमेजय याने कुलगुरू वैशंपायन यांना विचारले की माझ्या पूर्वजांनी मोठे युद्ध लढले. त्याची काय पार्श्वभूमी होती? वैशंपायनांनी जी कथा सांगितली ती भरतवंशाची कहाणी. या कथेत २४००० श्लोक होते. या कथेला भारत असे नाव देण्यात आले. अर्थात भारताची रचना युद्धानंतर सुमारे १०० वर्षांनी झाली.
त्यानंतर दीडशे वर्षांनी शौनक नावाच्या ऋषींनी एक यज्ञ केला. या
यज्ञासाठी देशातून ऋषी आले होते. यज्ञ चालू असताना संध्याकाळी मंडळी एकत्र
जमत. उग्रश्रव नावाचा एक भाट त्याना भारताची गोष्ट सांगे. त्या वेळी जमलेले
ऋषी त्यांना जे वाटे ती कथा सांगत. ते सर्व लिहून घेतले जाई.
अशा प्रकारे मूळचा ३२००० श्लोकांचा ग्रंथ एक लाख श्लोकांचा झाला. हा ग्रंथ
बनविण्यात अनेकांचा हात होता. या ग्रंथाला महाभारत असे नाव दिले गेले.
व्यासांनी लिहिलेला मूळ ग्रंथ ‘जय’, त्याचे स्वरूप भारत आणि शेवटी महाभारत
झाले. महाभारत युद्धानंतर किमान २५० वर्षांनी रचले गेले.
ओकांसारखे इतरही प्रयास
The Scientific Dating of the Ramayana, Did Rama exist? Rakesh Krishnan Simha @ByRakeshSimha, India facts 15-11-2015.
रामायणात लिहिल्याप्रमाणे रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला पुनर्वसू नक्षत्रात झाला. त्या वेळी सूर्य, मंगल, गुरु, शुक्र कोणत्या राशीत होते ते लिहिले होते. यावरून रामजन्म ९३०० वर्षांपूर्वी झाला असा निष्कर्ष हे अभ्यासक काढतात.
ट्रिब्युन इंडियात २५/४/२०१७ रोजी आलेल्या बातमीनुसार, गुरु जम्बेश्वर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर तंकेश्वर कुमार यांनी एका भाषणात सांगितले की खगोलशास्त्रीय गणिते आणि प्लॅनेटेरीयम सॉफ्टवेअरचा वापर करून हे सिद्ध झाले आहे की रामायण ७००० वर्षापूर्वी घडले.
पुरातत्व संशोधन
स्वराज्यच्या २०/६/२०१९च्या अंकात पुरातत्व विभागातर्फे उत्खनन चालू होते त्याचा वृत्तांत आला होता.
दिल्लीपासून ६८ कि मी अंतरावर सनौली येथे उत्खनन चालू आहे. उत्खननात एका
रथाचे अवशेष मिळाले आहेत. त्याच बरोबर धनुष्यबाण आणि काही शस्त्रे मिळाली
आहेत. रथाच्या अवशेषावरून महाभारतात रथांचे जे वर्णन येते तसेच अवशेष आहेत.
या अवशेषांवरून असा निष्कर्ष काढता येतो की महाभारत युद्ध १५०० ते २००० या
काळात झाले असावे.
उत्तर प्रदेशात मीरत जवळ बर्नावा गावात झालेल्या उत्खननाचा रिपोर्ट हिंदुस्तान टाइम्समध्ये ८/४/१८ रोजी प्रसिद्ध झाला. महाभारतात लाक्षागृहाचा उल्लेख येतो त्या जागेजवळ हे गाव आहे.

उत्खननात मिळालेली मातीची भांडी आणि थाळ्या हस्तिनापुर आणि कुरुक्षेत्र या ठिकाणी उत्खननात मिळालेल्या वस्तूंसारख्या आहेत. प्रोफेसर लाल यांनी इंद्रप्रस्थ आणि कुरुक्षेत्र या ठिकाणी केलेल्या उत्खननावरून असा निष्कर्ष काढला होता की महाभारत काल ८०० बी सी असा असावा. लाल यांनी केलेल्या उत्खननात या भागात मोठा पूर आल्याचे दिसते. तशाच पुराचा पुरावा बर्नावा गावात झालेल्या उत्खननात मिळाला. याचप्रमाणे काही शस्त्रांचे अवशेष मिळाले.
महाभारताच्या दृष्टीने द्वारकेजवळ समुद्रात केलेले संशोधन महत्त्वाचे आहे.
Marine Archaeological Exploration off Dwarka by S R Rao, Indian Journal of Marine Sciences Vol 16 , 1987 (पीडीएफ)



द्वारकेजवळच्या समुद्रात बुडालेल्या बंदराचे आणि धक्क्याचे अवशेष मिळाले आहेत. दगडाचे अवजड लंगर सापडले आहेत. याशिवाय सिंधू सरस्वती संस्कृतीमध्ये वापरले जाणारे शिक्के मिळाले आहेत. ३४०० वर्षापूर्वी हे बंदर पाण्याखाली गेले असावे.
२००७ साली या ठिकाणी एक लाकडाचा ओंडका मिळाल्याची बातमी आली. त्यानंतर असे प्रसिद्ध झाले की हा ओंडका ९५०० वर्षांपूर्वीचा आहे. यानंतर या बातम्या एकदम गायब झाल्या. गेल्या १५ वर्षात या बाबतीत पुढे काहीच लिखाण आले नाही. यावरून या बातमीची विश्वसनीयता वाटत नाही.
रामायण
महाभारताच्या दृष्टीने उत्तर भारतातील आणि द्वारका येथे केलेल्या उत्खननाविषयी आपण माहिती घेतली. महाराष्ट्रात मिळालेले अवशेष रामायणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. रामायणाच्या दृष्टीने महाराष्ट्र म्हणजे दंडकारण्याचा भाग. येथे रानटी वस्त्या होत्या असे उल्लेख येतात. हा राक्षसांचा भाग. परंतु उत्खननात निराळे दृश्य पुढे येते.
भुसावळपासून ७० किमी अंतरावर निंबाळकर गढी येथे झालेल्या उत्खननात सिंधू सरस्वती संस्कृतीच्या सारखे अवशेष मिळाले आहेत. जी खापरे मिळाली आहेत त्यावर सिंधू सरस्वती संस्कृतीच्या लिपीसारखे लिखाण आहे.
आर्यांना लिखाण माहीत होते याचे काही पुरावे नाहीत. ही वस्ती ३५०० वर्षांपूर्वीची आहे.
पुण्यापासून ९० किमी अंतरावर इनामगाव खेड्याच्या जवळ उत्खननात एका पूर्ण गावाचे अवशेष मिळाले आहेत.
ही वस्ती पण ३५०० वर्षांपूर्वीची आहे. मातीची खापरे, दगडी वस्तू, तांब्याच्या वस्तू , मणी अशा वस्तू मिळाल्या आहेत. हे लोक शेती करत असत असा पुरावा आहे. एक भट्टी मिळाली आहे ज्याचा उपयोग निश्चित झालेला नाही. २६६ दफनस्थाने मिळाली आहेत. निश्चितच ही आर्यांची वस्ती नव्हती. रामाने दक्षिणेत येऊन रानटी राक्षसांना सुसंस्कृत बनविले या सिद्धांताला काही आधार राहत नाही.
(दुर्दैवाची कथा अशी की वीस वर्षापूर्वी झालेल्या उत्खननानंतर ही साईट उजाड पडली आहे. मिळालेल्या अवशेषांचे जतन करणे कोणाला महत्त्वाचे वाटत नाही. नुकतेच या जागेला कुंपण घालण्यासाठी निधी देण्यात आला असे ऐकले. कुंपणासाठी किती खरोखर खर्च करण्यात येईल याविषयी काही सांगता येत नाही.
या बाबतीत तमिळनाडू सरकारकडून महाराष्ट्राने शिकण्यासारखे आहे. तामिळनाडूचे असे मत आहे की उत्तरेकडील आर्यांची बी जे पी पार्टी तामिळनाडूच्या इतिहासाकडे दुर्लक्ष करते आणि या कामासाठी फंड देत नाही. यासाठी तामिळनाडू सरकारने या उत्खननासाठी पैसे उपलब्ध करून दिले आहेत. तामिळनाडू सरकार येथे एक वस्तुसंग्रहालय बांधत आहे. आपल्या देशात प्रत्येक गोष्टीचे राजकारण केले जाते.)
निष्कर्ष
पहिल्या भागात आपण पाहिले की ढोबळ मानाने या महाकाव्यांच्या रचनेचा काल समजायचा तर मनुस्मृती – सन १५०, रामायण – सन २५०, महाभारत – सन ३५०. भौगोलिक आणि सामाजिक कारणांचा विचार केला तर महाभारताचा सामाजिक काल रामायणाच्या आधीचा वाटतो.
ओकांचे लिखाण या मताला पूर्ण छेद देते. ओक त्यांच्या लिखाणात घटनांचा काल आणि ग्रंथलेखनाचा काल यात अंतर असावे असा विचारही करत नाहीत. किमान महाभारताच्या बाबतीत डॉक्टर परांजपे यांच्या मताप्रमाणे लिखाणाचा काल आणि कथानकाचा काल एक नाही. पण डॉक्टर परांजपे यातील अंतर केवळ २५० वर्षे समजतात. जर आपण घटनांच्या कालासंबंधी ओकांचे मत ग्राह्य धरले तर घटना आणि लिखाण – महाभारत ७५०० वर्षापूर्वी आणि रामायण १४५०० वर्षांपूर्वी.
डॉक्टर परांजपे सांगतात की व्यासांनी जय नावाच्या पुस्तकाची चार हस्तलिखिते बनविली. भारतात बुद्धकालाच्या आधी लिपी दिसत नाही (मोहेन्जोदारोची लिपी विचारात न घेता). जर ओक किंवा इतर अभ्यासकांनी सांगितलेला घटनेचा काल मानला तर त्या काळात लिहिण्याची कला अवगत नव्हती.
डॉक्टर परांजपे यांच्या मताचा विचार केला तर खगोलशास्त्रावर अवलंबून महाभारताचा काल ठरविणे शंकास्पद होते. कारण महाभारताचे लिखाण युद्धानंतर २५० वर्षांनी झाले.
समुद्रशास्त्रावर आधारित माहितीप्रमाणे द्वारका आणि रामसेतू समुद्रात जाणे हे विश्वास ठेवण्यासारखे आहे.
ओकांच्या प्रमाणे इतरही अभ्यासकांनी खगोलशास्त्राचा वापर करून आपले निष्कर्ष काढले आहेत. ओक रामायणाचा काळ १४००० वर्षांपूर्वीचा सांगतात, राकेश सिंह ९३०० वर्षांपूर्वीचा सांगतात तर तंकेश्वर कुमार ७००० वर्षांपूर्वीचा सांगतात. हे तिघेही आपली पद्धत ‘शास्त्रीय’ असल्याचे लिहितात. अर्थातच या तीन विद्वानांत कोणी तरी चूक करीत आहेत.
या अभ्यासकांच्या विचारात जर सत्यता असेल तर ते भारतीय संस्कृतीकडे पाहण्याचा एक नवीन परिप्रेक्ष सुचवत आहेत. यासाठी एखाद्या विद्यापीठाला या कामात अंतर्भूत करून त्यांच्या विधानांची सत्यता पारखून घेतली पाहिजे. हे काम केंद्रीय सरकारला करता येणार नाही. यासाठी न्यायालयाच्या मार्फत हे काम करणे चांगले, जसे की आज ज्ञानवापी मशिदीबाबत होत आहे.
समुद्रशास्त्रावर आधारित माहितीप्रमाणे द्वारका आणि रामसेतू समुद्रात जाणे हे विश्वास ठेवण्यासारखे आहे. द्वारकेजवळ समुद्रात केलेल्या उत्खननात जे अवशेष मिळाले आहेत त्यांचा संबंध सिंधू सरस्वती संस्कृतीशी जातो. या संशोधनावरून ३५०० वर्षांपूर्वी असलेले बंदर पाण्याखाली गेले असे दिसते. या ठिकाणी पाण्याखाली लोखंडाच्या वस्तू मिळाल्या आहेत. यावरून भारतात ३५०० वर्षापूर्वी लोखंड बनविण्याची कला माहीत होती. जर महाभारतकाल त्यानंतरचा असेल तर युद्धातील शस्त्रे लोखंडाची होती .
आता आपण दुसऱ्या बाजूनी या कथानकाचा काल निश्चित करण्याचा प्रयत्न करू.
वेदांचा काल
ख्रिस्तपूर्व ४०००-२००० From : Cultural History of Ancient India, By R.N. Gaidhani, V.G. Rahurkar, Continental Prakashan, 1955
ख्रिस्तपूर्व २०००-१००० Principal Upanishads, by S Radhakrishnan, George Allen and Unwin UK 1953, Harper Collins India, Fifth Impression 1997
ख्रिस्तपूर्व २०००-५०० ढवळीकर
ख्रिस्तपूर्व ४०००-१०००, भारतरत्न पां वा काणे
वरील चार विद्वानांच्या अंदाजाप्रमाणे वैदिक काल ख्रिस्तपूर्व १०००मध्ये संपलेला होता. वैदिक काळात कुरु आणि इक्ष्वाकूसारखी मोठी राजघराणी दिसत नाहीत. याशिवाय या दोन्ही घराण्यांचा मागचा इतिहास सांगितला जातो. यावरून असे म्हणता येईल की या कथानकांचा काल ख्रिस्तपूर्व १०००पेक्षा मागे असू शकत नाही. म्हणून पहिल्या भागात असे लिहिले होते – समजण्यासाठी असे म्हणू की महाभारताच्या कथानकाचा काल ख्रिस्तपूर्व १००० तर रामायणाच्या कथानकाचा काल ख्रिस्तपूर्व ८००, हे सर्व काल अर्थातच ढोबळ मानाने लिहिले आहेत. हा कालखंड वेदकाळानंतर आणि बुद्धकाळाआधी येतो.
पुरातत्व उत्खननाच्या निष्कर्षावरून हा कालखंड ख्रिस्तपूर्व १००० असावा असेच दिसते. महाराष्ट्र्रात झालेल्या उत्खननावरून असे म्हणता येईल की या काळात राम दक्षिणेत येण्यापूर्वी येथे प्रगत समाज अस्तित्वात होता.
तसा कृष्णाचा आणि रामाचा काळ ठरवण्यासाठी काही आधार घेता येईल का?
महाभारताचा काळ काही लोक जयद्रथ वधाच्या प्रसंगी खग्राससूर्यग्रहण झाले होते हे गृहीत धरून काढण्याचा प्रयत्न करतात.
कथानकातील एखाद्या घटनेवरून त्या कथानकाचा काळ ठरवणे फारसे तर्कसंगत वाटत नाही. एकतर रामायण आणि महाभारतात अनेक गोष्टी नंतर घुसडलेल्या आहेत. त्यामूळे मूळ काय आणि प्रक्षिप्त काय, ते आधी ठरवावे लागेल. खेरीज, मूळ कथानकातही एखादी भौगोलीक घटना retrofit करून टाकणे, हे अगदीच अशक्य नाही!
इंडो-युरोपीय भाषी Steppe Pastorals हे १९०० BCE नंतरच भारतात आले, हे जागतीक स्तरावर सिद्ध झाले आहे. तेव्हा रामायण किंवा महाभारताचा काळ त्यानंतरचाच असणार हे उघड आहे.
किंचित सुधारणा - इसपू ३५०० ते इसपू१००० हा साधारण टोळ्यांचा येण्याचा कालावधी मानला जातो. इसपू२००० ते इसपू २५०० मोठ्याप्रमाणात.
मानवी अवशेष उपलब्धता इसपू१९०० ते इसपू २००० चे मिळाले आहेत म्हणुन तोच कालावधी किंवा त्यानंतरच आले असे मानणे चूक ठरेल.
महाभारत काल लेखन कालावधी इसपू २०० ते इसपू४०० असावा. महाभारत जसे लिहीले आहे तसेच असण्याची शक्यता शून्य कारण ती एक विविध ऐतिहासिक घटनांवर आधारीत एक काल्पनिक कथा आहे असे माझे मत आहे. हेच रामायणाला लागू
अर्थात मी जाणकार नाही आणि माझे मत गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा