गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

श्रीराम FAQ

 https://kalaapushpa.com/2021/01/21/srirama-faq/

सिंड्रेलाची गोष्ट ऐकून कोणी असे विचारात नाही की बुवा सिंड्रेलाने मुळात अन्याय सोसलाच का? किंवा “युरोप मधील समाज बालकामगारांना राबवून घेणारा होता.” किंवा “सिंड्रेलाने कुणाची मदत का घेतली नाही?” किंवा “ती सावत्रआई काही वाईट नव्हती! नवरा मेल्यावर सुद्धा तिने सिंड्रेलाचा सांभाळ केला न? तिला हाकलून तर दिले नाही न घरातून? मारहाण तर नाही न केली तिला? विद्रूप तर नाही न केलं तिला? मग? चांगलीच होती ती!” हे प्रश्न विचारले जात नाहीत कारण ती गोष्ट आहे हे मानले असते वाचकाने.

पण रामायणाच्या बाबतीत तसे नाही. रामायणाबद्दल व त्यामधील पात्रांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. त्याचा अर्थच असा की रामायण ही ‘कथा’ म्हणून प्रश्नकर्त्याने वाचली नाही. प्रश्नकर्ता मान्य करतो की रामायण घडले आहे, राम हा एक मानव होता आणि कधी काळी तो अस्तित्वात होता.

याच प्रश्नाकार्त्यांच्या  काही प्रश्नांची उत्तरे आणि (गैर)समजांचे निराकरण.

काय सांगता?! उत्तर रामायण वाल्मिकींनी लिहिले नव्हते? ते मागाहून लिहिले गेले होते? कशावरून?

अभ्यासकांचे या बाबतीत एकमत आहे, रामरायाच्या राज्याभिषेकाने समाप्त होणारे वाल्मिकींचे रामायण सुखांत होते. उत्तर कांड किंवा उत्तर रामायण हे मागाहून कुणीतरी लिहिले. या निष्कर्षाप्रत पोचण्याचे करणे पुढील प्रमाणे आहेत –

  1. वाल्मिकी रामायणाच्या सुरुवातीला नारदमुनींनी वाल्मिकींना सांगितलेली रामाची कथा आली आहे. ही संक्षिप्त कथा रामराज्याभिषेकाने संपते. वाल्मिकींना तेवढीच कथा माहित होती. नारदांच्या कथेत ना सीतेच्या त्यागाचा उल्लेख येतो, ना लव-कुशाच्या जन्माचा, ना लव-कुशाने  रामायण गाण्याचा.
    1. वाल्मिकी रामायणातील युद्ध कांडाच्या शेवटच्या सर्गात वाल्मिकी लिहितात – रावणाचा वध केल्यावर राम-लक्ष्मण-सीता अयोध्येला परत आले. त्यावेळी भरत त्यांचे स्वागत करायला नंदीग्राम येथे आला. आणि त्याने तिथेच रामाला राज्याभिषेक करवला. राज्याभिषेक झाल्यानंतर रामाने अनेक वर्ष उत्तम राज्य केले आणि सगळे आनंदात, सुखात राहिले.” त्यानंतर रामायण ऐकल्याने काय फळ मिळते ते सांगितले आहे. अर्थात इथे फलश्रुती आली आहे. सुग्रास पोटभर जेवण झाल्यावर तांबुल खावा तसे रसपूर्ण कथा ऐकून त्याची फलश्रुती ऐकावी. तांबुल खाल्यावर कोणी पुन्हा वरण भाताने परत जेवायला सुरुवात करत नाही, तसे फलश्रुतीने वाल्मिकी रामायण संपते.
  2. उत्तरकांड या शब्दाचा अर्थच – नंतरचे कांड. मग हे वाल्मिकींनीच नंतर लिहिले नाही कशावरून? वाल्मिकींना जर उत्तरकांड लिहायचे असते तर तसे असते तर त्यांनी युद्ध कांडला फलश्रुती लिहिली नसती. त्या अर्थी दुसऱ्या कोणीतरी उत्तर कांड नंतरहून लिहिले असणार.  
  3. सीतेला सोडवल्यावर, सीतेच्या अग्निपरिक्षेनंतर रामाने अग्नीला वचन दिले आहे –  
    • विशुद्धा त्रिषु लोकेषु मैथिली जनकात्मजा |
    • न विहातुं मया शक्या कीर्तिरात्मवता यथा || ६-११८-२० ||
    • तिन्ही लोकात अत्यंत शुद्ध असलेली जनकात्मजा मैथिलीला मी कधीही अंतर देणार नाही! जसे मनुष्य आपली कीर्ती आपल्यापासून दूर करू शकत नाही, तशी सीता नित्य मजसोबत असेल!
    • ज्या इक्ष्वाकू घराण्यातील दशरथाने आपले वचन पाळण्यासाठी प्राण दिले, रामाने वडिलांच्या वचनासाठी वनवास पत्करला, भरताने दिलेल्या शब्दासाठी आयते मिळालेले राज्य परत केले, रामाने सुग्रीवाला त्याचे राज्य व पत्नी मिळवून दिली … तो राम अग्नीला दिलेले वचन विसरून उत्तरकांडात सीतेचा त्याग कसा करेल?
  4. युद्धकांड, सर्ग १२८ मध्ये सांगितले आहे – रामाने नंतर ‘शताश्वमेध’, शंभर अश्वमेध यज्ञ केले. हे यज्ञ त्याने सीतेसोबतच केले. सीतेचा सोन्याचा पुतळा ठेवून नाही केले. कोणताही यज्ञ करतांना यजमान पत्नीला विशिष्ठ कर्तव्य असत. तिने पुतळ्या सारखं बसून हाताला हात लावून ‘मम’ म्हणणे इतकचं काम नसते. त्यामुळे रामाने सीतेचा त्याग केल्यावर शेजारी सीतेची सोन्याची मूर्ती ठेवून यज्ञ केला हे अशक्य आहे.
  5. वाल्मिकींनी त्यांच्या महाकाव्यासाठी ३ नावे सुचवली आहेत – रामायण (रामाचा प्रवास), सीताचरित (सीतेचे चरित्र) किंवा पौलत्स्यवध (रावणाचा वध). वाल्मिकी रामायण युद्धकांड मध्ये रामाच्या प्रवासाने, सीतेच्या (अपहरणाच्या) कथेने आणि रावणाच्या वधाने संपते. यानंतर जर उत्तरकांड पहिले तर त्यामध्ये वेगळीच कथा आहे. जिचे नाव – रामाचा प्रवास, सीतेची (अपहरणाची) कथा किंवा रावणाचा वध या नावांना अनुसरून नाही.
  6. रामायणाच्या नंतर शेकडो वर्षांनी महाभारत घडले. महाभारताच्या वनपर्वातील रामोपाख्यान मध्ये रामाची कथा आली आहे. मार्कण्डेय ऋषींनी युधिष्ठिराचे मनोबल वाढवण्यासाठी रामाची कथा ऐकवली. ती कथा सुद्धा रामराज्याभिषेकाने संपते. म्हणजे निदान महाभारत काळापर्यंत रामायणात सीता त्यागाची कथा प्रचलित नव्हती. अभ्यासकांच्या मते महाभारताच्या नंतर उत्तरकांडची रचना झाली असावी.

वरील आणि इतरही अनेक कारणांमुळे या बाबतीत एकमत आहे कि उत्तरकांड वाल्मिकींनी लिहिलेले नसून, ते मूळ रामायणात नव्हते.

शुर्पणखा दंडकारण्याची स्वामिनी असतांना रामाने तिच्या अरण्यात जाऊन राक्षसांशी वैर का घ्यावं?

“स्वामिनी” म्हणजे काय? “स्वामी”चे कर्तव्य काय? कुणाला राजा म्हणायचे? याचे उत्तर वाल्मिकी रामायणातच मिळते. चित्रकुटमध्ये भेटायला आलेल्या भरताला राम विचारतो – “भरता! राज्यातील जनतेचे रक्षण करणे हा राजधर्म आहे. तू तो धर्म पळत आहेस न? तू प्रजेचे रक्षण करत आहेस न? राज्यातील स्त्रियांना संरक्षण देत आहेस न? तुझ्या राज्यातील कृषी करणारे, पशुपालन करणारे, वेदाभ्यास करणारे यांचे रक्षण करत आहेस न? अयोध्येतील प्राण्यांचे आणि चौरस्त्यावरील वृक्षांचे सुद्धा रक्षण तू करत आहेस न?”

‘स्वामिनी’ म्हणून हीच कर्तव्य ओघाने शुर्पणखेकडे येतात. पण, दंडकारण्यात वास करणाऱ्या ऋषींनी रामाला विनंती केली की येथील नरभक्षक राक्षसांपासून आमचे संरक्षण कर. शूर्पणखा तेथील ‘स्वामिनी’ असून सुद्धा त्या ऋषीमुनींना रामाकडे का धाव घ्यावी लागली? शूर्पणखा त्यांचे रक्षण करत नव्हती हे उघड आहे! तसेच त्या ऋषींना तिच्या पासूनच भय होते हे देखील उघड आहे.

ऋषींचे अर्थात सज्जनांचे, अबलांचे रक्षण करण्यासाठी रामाला दंडकारण्यातील राक्षसांशी वैर घ्यावे लागले.  

शुर्पणखेला रामाने व लक्ष्मणाने नकार का दिला?

शूर्पणखा सुंदर स्त्रीचे रूप घेऊन आली व तिने रामाला लग्नासाठी मागणी घातली. मात्र रामाने एकपत्नीव्रत असल्याचे कारण सांगून शुर्पणखेला नकार दिला. नको असलेल्या मागणीला नकार देण्याचा अधिकार फक्त स्त्रीला असतो का? पुरुषाला नकार देण्याचा अधिकार नाही का? स्त्री-पुरुष समानता मानणारे निश्चित रामाचा नकाराधिकार मनातील.

शुर्पणखेने साधी लग्नाची मागणी घातली होती, तर लक्ष्मणाने तिचे नाक  का कापले?

शूर्पणखा क्षणात रामावर तर क्षणात लक्ष्मणावर भाळली होती. तिचे काही रामावर उदात्त प्रेम वगैरे नव्हते. तिला दोघांपैकी कोणीपण नवरा म्हणून चालणार होता. रामाने आणि लक्ष्मणाने तिला नकार दिला, पण ती तो पचवू शकली नाही. तेंव्हा ती नरभक्षक राक्षसी रामाला म्हणाली – “मी या लक्ष्मणाला खाऊन टाकते. तुझ्या बायकोला पण माझ्या तीक्ष्ण नखांनी फाडून तुझ्या देखत आताच्या आत्ता खाऊन टाकते. मग तू आणि मी या दोघांच्या कटकटीतुन मुक्त होऊन आनंदाने या अरण्यात राहू!” असे म्हणत ती सीतेच्या अंगावर धावून गेली. म्हणून लक्ष्मणाने तिचे नाक कापले.

अगदी अलीकडच्या काळापर्यंत नाक कापणे ही एक सर्वसाधारण शिक्षा होती. उदाहरणच घ्यायचे तर, १८व्या शतकातील टिपू सुलतानने कित्येक सैनिकांचे नाक कापल्याचा उल्लेख इंग्रजांनी केला आहे. ‘एखाद्याचे नाक कापणे’ / ‘नाक कटवा देना’ असे वाक्प्रचार भारतीय भाषांमध्ये अजूनही दिसतात. तस्मात्, शूर्पणखेचे नाक कापणे ही त्या काळातील एक सामान्य शिक्षा होती. 

रावणाने सीतेला पळवले ते शुर्पणखेला दिलेल्या शिक्षेचा बदला घेण्यासाठी.

रामाने लग्नाला नकार दिल्यावर शूर्पणखेने आपले बंधू खर व दूषण यांना सैन्य घेऊन त्यांच्यावर हल्ला करायला पाठवले. पण रामाने त्यांना हरवले. मग तिने आपली तक्रार रावणाला सांगितली. पण रावणाला काही तिचे नाक कापल्याचा सूड घ्यावा असे वाटत नाही. तेंव्हा तीने रावणाला सांगितले –“अरे, त्या रामाची बायको फार सुंदर आहे. तुझ्यासारख्या बलाढ्य राजाला ती राणी म्हणून शोभेल. जा तिला बळजबरीने पळवून आण. आणि तिची इच्छा असो नसो, तिच्याशी लग्न कर.”

रावणाने सोन्याची लंका उभारली, त्याच्याकडे पुष्पकविमान होते. तो महान राजा होता.

लंकेचे राज्य आणि पुष्पक विमान हे दोन्ही रावणाने आपल्या भावाकडून ओरबाडून घेतले होते. स्वत: रावण मोठ्या प्रौढीने सीतेला सांगतो –

मत् भय आर्तः परित्यज्य स्वम् अधिष्ठानम् ऋद्धिमत् |
कैलासम् पर्वत श्रेष्ठम् अध्यास्ते नर वाहनः ||

वाल्मिकी रामायण, अरण्यकांड, सर्ग ४८

मी माझ्या मोठ्या भावाला कुबेराला, सळो की पळो करून सोडले. त्याच्या कडून लंका जिंकून घेतली. त्याचे पुष्पक विमान बळकावले. मला घाबरून तो कैलासात पळून गेला. असे पराक्रम करणारा मी शक्तिशाली दशानन आहे!

लक्षमणाने उर्मिलेला आपल्या सोबत अरण्यात का नेले नाही?

सीता हट्टाने रामाच्या मागोमाग वनवासात गेली. तिला या निर्णयापासून रामाने परावृत्त केले, तरीही ती तिच्या मर्जीने वनवासात गेली. उर्मिलेने तसे केले नाही. तिने जर स्वेच्छेने वनवासातील त्रासापेक्षा राजगृहातील सुख तिने निवडले असेल तर? सीतेप्रमाणे तिला देखील वनवास निवडण्याचे स्वातंत्र्य होते, पण तिने स्वत:हून सुखाने राजवाड्यात राहण्याचे ऑप्शन निवडले. लक्ष्मणाने सुद्धा तिला जबरदस्तीने अरण्यात नेले नाही. मग तिला का बरे जबरदस्ती १२ वर्ष वनवासात पाठवावे?

उर्मिला दुर्लक्षित राहिली, उपेक्षित राहिली. तिचा उल्लेख का येत नाही?

रामायण ही – रामाच्या प्रवासाची, सीतेच्या चरित्राची व रावणाच्या वधाची कथा आहे. या महत्वाच्या घटनांभोवतीचे तपशील वाल्मिकींनी दिले आहेत. या १४ वर्षांच्या काळात भरत, शत्रुघ्न, सुमंत, वशिष्ठ, विश्वामित्र, जनक, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती, कैकेयी, कौसल्या इत्यादींच्या बद्दल कोणतेच तपशील दिले नाहीत. परंतु जटायू, संपाती, नल, नील, जांबुवंत आदींच्या लहानसहान गोष्टींचा उल्लेख रामायणात आला आहे. कारण त्यांचा वनवासी राम-लक्ष्मण व सीतेशी संबध आला होता. उर्मिला किंवा वरील इतर कोणाचा वनवासातील घटनांशी संबध आला असता तर त्यांचा सुद्धा तपशील आला असता.

रामायण ही केवळ रामाची कथा आहे. सीतेची कथा नाही.

रामायणातील बालकांडात वाल्मिकी म्हणतात – मी लिहित असलेल्या काव्याचे नाव – रामायण (रामाचा प्रवास) किंवा सीताचरीत्र (सीतेचे चरित्र) किंवा पौलत्स्यवध (रावण वध) आहे.

काव्यं रामायणं कृत्स्न्नं सीतायाश्चरितं महत् |
पौलस्त्यवधमित्येवं चकार चरितव्रतः ||

वाल्मिकी रामायण, बालकांड, सर्ग ४

त्यामुळे, रामायण ही कथा जितकी रामाची आहे तितकीच ती सीतेची पण कथा आहे असे वाल्मिकी स्वत: लिहितात.

रावण एक चांगला भाऊ होता. सगळ्या स्त्रियांना रावणासारखा भाऊ हवा असे वाटते.

शूर्पणखा रावणाकडे आपले नाक कापल्याची तक्रार घेऊन गेली तेंव्हा रावणाला काही त्याचा सूड घ्यावा असे वाटले नाही. रावण हा “पर दार अभिमर्शनम्” अर्थात परस्त्रीकडे आकर्षित होणारा, त्यांचा विनयभंग करणारा होता, हे शुर्पणखेला माहित होते. म्हणून तिने आपला पवित्रा बदलून त्याच्याकडे सीतेच्या सौंदर्याचे वर्णन केले. त्यावर रावणाने सीतेला पळवले ते शुर्पणखेला दिलेल्या शिक्षेचा बदला घेण्यासाठी नव्हे तर स्वत:च्या मोहासाठी. सीतेला पळवून न्यायला आलेला रावण “शुर्पणखेचे नाक कापले म्हणून मी तुला पळवायला आलो!” असे म्हणाला नाही. तो म्हणाला, “हे सुंदरी! तुझ्यावर माझे मन बसले आहे. माझी लंकानगरी अतिशय सुंदर आहे. तू माझ्यासोबत ये, मी तुला सुखात ठेवीन. इथे रामाबरोबर कुटीत राहून तुला काय मिळणार आहे?

सर्व राक्षस भर्तारम् कामय – कामात् – स्वयम् आगतम् |
न मन्मथ शर आविष्टम् प्रति आख्यातुम् त्वम् अर्हसि ||

वाल्मिकी रामायण, अरण्यकांड, सर्ग ४८

सर्व राक्षसांचा राजा असेलेला मी, मदनाच्या बाणांनी घायाळ होऊन स्वत:हून तुझ्याकडे चालत आलो आहे. माझ्या प्रस्तावाला नकार देऊ नकोस!”

रावणाने सीतेला पळवले पण त्याने तिच्या अंगाला हात सुद्धा लावला नाही. म्हणून तो महान होता!

रावणाने तपस्व्याचा वेश घेऊन सीतेला फसवून घराबाहेर बोलावून घेतले. तसेच आधी तिच्या नवऱ्याला व दिराला युक्तीने दूर पाठवले. अर्थात सीतेला पळवण्याचा त्याचा कट पूर्व नियोजित होता. त्यावर सीतेला तिच्या इच्छेविरुद्ध, खांद्यावर उचलून घेऊन आपल्या विमानात बसवून बळजबरीने लंकेला नेले. तिथे तिला अशोकवनात कैदेत ठेवले. तिच्या भोवती दिवसरात्र राक्षसिंचा पहारा ठेवला. आणि तिला धमकी दिली, “एक वर्षाच्या आता माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी तुला मारून टाकेन.”

भारतीय संविधानात स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध पळवून नेणाऱ्याला दंड सांगितला आहे. Section 366 – if a person kidnaps or abducts a woman against her wish so as to marry her, shall be punished with fine and rigorous or simple imprisonment for up to 10 years. Section 368 – Wrongfully concealing or keeping in confinement, kidnapped or abducted person shall be punished in the same way. त्याशिवाय इतरही कलम आहेत.

म्हणजेच एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध पळवून नेल्यास, १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा दिली जाऊ शकते. असा कायदा असलेल्या देशात व त्यामुळे सुरक्षा प्राप्त असलेल्या स्त्रिया जेंव्हा “रावणाने सीतेला फक्त पळवून नेले, तिच्या अंगाला हात लावला नाही.” म्हणत रावणावर स्तुतीसुमने उधळतात, तेंव्हा त्यांची कीव येते.

सीतेच्या अंगाला हात न लावण्याचे कारण वेगळे होते. रावणाने पूर्वी कुबेराकडून त्याचे राज्य, विमान, संपत्ती सगळे लुटले. त्यावर रावणाने कुबेराची पुत्रवधू, म्हणजे आपल्या पुतण्याची, नलकुबेराची बायको नासवली. ते कळल्यावर नलकुबेराने रावणाला शाप दिला – “पुन्हा कुठल्या स्त्रीवर जबरदस्ती केलीस तर तुझा मृत्यू होईल!” आजच्या भाषेत सांगायचे तर नलकुबेराने बायकोवर अत्याचार करणाऱ्या स्वत:च्या काकाला धमकी दिली, “If you rape another woman, I will personally come to Lanka and kill you.”

रावणाने त्याच्या चांगुलपणामुळे नाही तर या धमकीला भिऊन सीतेला स्पर्श केला नाही.

रावण आपल्या प्रजेची काळजी घेणारा एक चांगला राजा होता.

रावणाने स्वत:साठी दुसऱ्याची बायको पळवून आणली. त्यामुळे त्याच्या राज्याचे व त्याच्या प्रजेचे प्रचंड नुकसान झाले. आधी हनुमंताने लंका पेटवून दिली. त्यानंतर रावणाने बऱ्या बोलाने सीतेला परत करायचे सोडून युद्धाचा पर्याय निवडला. हे युद्ध रावणाने स्वत:च्या वासनेपायी प्रजेवर युद्ध लादले.

सीतेची अग्निपरीक्षा

राम आणि सीतेचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते, त्यांचा एकमेकांवर सार्थ विश्वास होता. जसे रामाने सुंदर रूप धारण करून आलेल्या शुर्पणखेचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला, तसेच सीतेने सुद्धा बलाढ्य रावणाचा लग्नाचा प्रस्ताव  नाकारला. अगदी जीवे मारण्याची धमकी दिली, तरीसुद्धा सीता तिच्या निर्नायार ठाम राहिली. राम आणि सीता  एकमेकांशिवाय जगूच शकत नव्हते.

असे असून सुद्धा, रामाने सीतेला सोडवून आणल्यावर कोरडेपणाने “तू हवी तिथे जाण्यास मुक्त आहेस” असे सांगितले. हे तिला सांगत असता, रामाची अवस्था कशी होती, त्याबद्दल वाल्मिकी सांगतात –

पश्यतस्तां तु रामस्य समीपे हृदयप्रियाम् |
जनवादभयाद्राज्ञो बभूव हृदयं द्विधा ||

वाल्मिकी रामायण, युद्धकांड, सर्ग ११५

रामाने हृदयप्रिया सीतेला समीप पहिले खरे, पण जनवादाच्या भयाने त्याचे हृदय विदीर्ण झाले.

रामाच्या शब्दांनी घायाळ झालेल्या सीतेने अग्निप्रवेश करायचा ठरवला. तिने लक्ष्मणाला अग्नी प्रदीप्त करण्यास सांगितले. सीतेने रामाला प्रदक्षिणा घातली, अग्नीला प्रदक्षिणा घातली व, “मी कायेने, वाचेने व मानाने केवळ रामाचाच विचार केला असेन तर अग्नीने माझे रक्षण करावे!” अशी प्रार्थना केली. तिथे जमलेले वानर, राक्षस सर्वजण हळहळले व “सीता पवित्र आहे! सीता पवित्र आहे!” असे म्हणू लागले. जनतेनेच असा निर्वाळा दिल्याने लोकापवाद टाळला! या वेळी रामाचे नेत्र अश्रूंनी भरून आले, व तो म्हणाला,

बालिशो बत कामात्म रामो दशरथात्मजः |
इति वक्ष्यति मां लोको जानकीमविशोध्य हि ||

वाल्मिकी रामायण, युद्धकांड, सर्ग ११८

लोकांच्या समक्ष सीता शुद्ध असल्याची ग्वाही मिळणे आवश्यक होते. कारण ही पुष्कळ दिवस लंकेत राहिली होती. हिची शुद्धी न करता जर मी तिचा स्वीकार केला असता तर लोकांनी सीतेच्या चारित्र्यावर संशय घेतला असता व दशरथपुत्र राम विषयलंपट आहे असे म्हणाले असते. आम्हा दोघांवरचा लोकापवाद टाळण्यासाठी हे दिव्य करणे प्राप्त होते.

सीतात्याग. गर्भवती सीतेला सोडून देणे. 

सीतात्याग प्रसंग उत्तरकांड मध्ये येतो. अभ्यासकांच्या मते, हे संपूर्ण कांड मागाहून लिहिलेले आहे. वाल्मिकी रामायण युद्धकांडातील रामराज्याभिषेकानंतर फलश्रुतीने समाप्त होते. वाल्मिकी रामायणात रामाने सीतेला  अग्नीपरीक्षेनंतर स्वीकारणे योग्य होते. कदाचित नंतरच्या काळातील लोकांनी रामाने सीतेचा स्वीकार कसा काय केला म्हणून आक्षेप घेतला असावा. त्या प्रश्नांना उत्तर म्हणून कुणी उत्तरकांड लिहून त्यात सीतात्याग प्रसंग लिहिला असावा. जो प्रसंग वाल्मिकी रामायणात नाही त्याविषयी अधिक चर्चा करण्यात अर्थ नाही.

तरीही, या विषयावरील माझे मत असे की – उत्तरकांडात राजारामने प्रजेसाठी अत्यंत प्रिय अशा आपल्या पत्नीचा त्याग केला. धृताराष्ट्राप्रमाणे आपल्या पत्नीसाठी, मुलासाठी प्रजेला वेठीस धरणाऱ्या नेत्यांना रामाने घालून दिलेला हा धडा आहे.

रामाला राष्ट्रपुरुष का मानायचे?

सुकुमार रामाला युवराज केले, तेंव्हा तो योगवशिष्ठचा अधिकारी झाला! षोडशवर्षीय रामाला विश्वामित्रांबरोबर पाठवले तेंव्हा त्याने त्राटिकेचा वध करून यज्ञाचे रक्षण केले! मिथिला पाहायला नेले तर त्याने शिवधनुष्य तोडून स्वयंवराचा पण जिंकला! वनवासात पाठवले तर तिथे त्याने दुष्टांचे मर्दन करून सुष्टांचे रक्षण केले! भार्या पळवली तर हनुमंतासारख्या दूताकरवी समुद्रापार तिचा शोध घेतला! वनात राहणाऱ्या, वल्कले धारण करणाऱ्या, जटाधारी धनुर्धर रामने सुग्रीवासारखा राजा मित्र म्हणून मिळवला! एकटा दुकटा वनात राहणारा राम सैन्य काय जमवतो, समुद्रावर सेतू काय बांधतो, शत्रूची मर्मस्थळे फोडतो आणि युद्धाला उभा काय राहतो! बलाढ्य अशा लंकाधिपती रावणाला युद्धात हरवतो! वनात राहणारा एक साधा मनुष्य, जो प्रस्थापितांविरुद्ध लढतो, अन्यायाविरुद्ध लढतो आणि युद्ध करून जिंकतो! पुढे रामाला राज्याभिषेक केल्यावर त्याने आदर्श असे रामराज्य निमार्ण केले! असे काम केवळ एक समर्थच करू शकतो.

“How to live a powerful life” – यावर अनेक मॉडर्न गुरु बोलतात. त्या Powerful Life चे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीराम! म्हणूनच – श्रीराम समर्थ आहे. असा समर्थच राष्ट्रपुरुष होण्यास योग्य आहे!

वाल्मिकी रामायणात अगदी सुरुवातीला रामाचे गुण सांगितले आहेत, ते असे – महावीर, पराक्रमी, शत्रूनाशक, यशस्वी, बुद्धिमान, नीतिमान, श्रीमान, स्मृतिमान, प्रतिभानवान, विचक्षण, सज्जन, प्रभावी वक्तृत्व असलेला, ज्ञानसंपन्न, सावध, धर्मज्ञ, वेद व वेदांगांचा तज्ञ, धनुर्वेदाचा तज्ञ सर्वशास्त्रे जाणणारा, प्रजाहितदक्ष, स्वजानांचे रक्षण करणारा आणि सर्वलोकप्रिय असा राजाराम!

समुद्र इव गाम्भीर्ये धैर्येण हिमवानिव ||
विष्णुना सदृशो वीर्ये सोमवत्प्रियदर्शनः |
कालाग्निसदृशः क्रोधे क्षमया पृथिवीसमः ||
धनदेन समस्त्यागे सत्ये धर्म इवापरः |

वाल्मिकी रामायण, बालकांड सर्ग १.

श्रीराम हा गांभीर्यात समुद्रा सारखा, धैर्यात हिमालयासारखा आणि शौर्यात विष्णूसारखा आहे! तो दिसायला चंद्रासारखा प्रियदर्शी आहे, क्षमा करण्यात पृथ्वीसारखा आहे, दान करण्यात कुबेरासारखा आहे आणि त्याचा क्रोध कालाग्नीसारखा आहे!  

सीता हनुमंताच्या बरोबर लंकेतून रामाकडे का गेली नाही?

हनुमान सीतेला शोधात लंकेत आला. सीतेला रामाची मुद्रा देऊन, रामाचा निरोप दिला. निघते वेळी हनुमान सीतामाईला म्हणाला, “सीतामाई, तुम्ही जर माझ्या पाठीवर बसलात तर मी तुम्हाला थेट रामाकडे घेऊन जाऊ शकतो. मी पर्वतच काय लंका सुद्धा उचलून घेऊन जाऊ शकतो. तुम्ही निर्धास्तपणे माझ्या सोबत चला. मी तुम्हाला रामाकडे घेऊन गेलो की विरह दु:ख संपून जाईल!”

सीता एक राजकन्या होती. क्षत्रिय होती. तिला युद्धतंत्राची जाण होती. राजकारण कळत होतं. रामाशी राजकारणाविषयी ती चर्चा करत असे. अशी जाणती राणी सीता उत्तरली, “हनुमंता! तू मला रामाकडे समर्थपणे घेऊन जाशील यात शंका नाही. पण, तू मला घेऊन जात असता राक्षस पाहतील आणि ते तुझ्यावर हल्ला करतील. ते संख्येने अधिक आहेत. त्यांनी तुला धरले तर? त्या धडपडीत मी जर तुझ्या पाठीवरून खाली पडले, तर माझा मृत्यू निश्चित आहे. मी जर जिवंत राहिले आणि राक्षसांच्या तावडीत सापडले तर ते मला आणखीन कुठल्या दुर्गम ठिकाणी ठेवतील. तसे झाले तर माझा शोध राम कसा लावेल? किंवा या हल्ल्यात जर चुकून तुझा मृत्यू झाला तर राम जे मला सोडवण्यासाठी योजना आखत आहे ती कशी पूर्ण होईल?

“म्हणून मी सांगते की तू रामाला जाऊन माझा ठावठिकाणा सांग. तो येऊन आपले शौर्य गाजवून, रावणाला हरवून निश्चित माझी येथून सुटका करेल.”

रामाने वालीचा वध कपटाने केला.

भारताने पाकिस्तानला न सांगता रात्रीतून strike केला. हे कपट होते का? किंवा १९६२ मध्ये चीनने भारताला काहीही कल्पना न देता भारतावर हल्ला केला होता, हे कपट होते का? तसेच रामाने शत्रूला न कळत त्याच्यावर वार केला होता. हे अर्थातच वालीला रुचले नाही. त्याने रामाला अशा प्रकारे त्याच्यावर बाण का सोडला हे विचारले. आणि वाल्मिकींना सुद्धा रामाने काय उत्तर दिले हे लिहून ठेवणे महत्वाचे वाटले.

रामाने सुग्रीवाशी मैत्री केली होती. दोघांनी अग्नीला साक्षी ठेवून एकमेकांना त्यांची पत्नी मिळवून देण्यासाठी मदत करायची शपथ घेतली होती. वालीचा वध करून, रामाने सुग्रीवाची पत्नी रुमा त्याला परत मिळवून दिली.

रामाने मृत्यु समीप आलेल्या वालीला म्हटले आहे, “मोठ्या भावाने लहान भावाशी पित्याप्रमाणे वागले पाहिजे. पण तू तर तुझ्या लहान भावाची बायकोच पळवलीस! हा मोठा गुन्हा केलास. या लोकात समाजाविरुद्ध जो वागतो त्याला शिक्षा करणे प्राप्त आहे. मी इथे राजा भरताचा प्रतिनिधी म्हणून तुला शिक्षा करत आहे. गुन्हेगाराचा वध करणे पाप नाही. म्हणूनच तुझा वध करून मी काही गैर केले नाही.” 

रामाने शंबूकाला मारून मागासवर्गीय लोकांवर अन्याय केला?

शंबूक वधाची कथा उत्तरकांड मध्ये आली आहे. अभ्यासकांच्या मते, हे संपूर्ण कांड मागाहून लिहिलेले आहे. वाल्मिकी रामायण युद्धकांडातील रामराज्याभिषेकानंतर फलश्रुतीने समाप्त होते. जो प्रसंग वाल्मिकी रामायणात नाही त्याविषयी अधिक चर्चा करण्यात अर्थ नाही.

तरीही यावरील मत असे – रामाने योगिनी शबरीसाठी “तपोधने, चारुभाषिणी, तापसी” अशी आदरयुक्त विशेषणे वापरली आहेत. तपश्चर्या करणाऱ्या या मातंग ऋषींच्या आश्रमातील या सेविकेबद्दल रामाने नितांत आदर व्यक्त केला आहे. (प्रश्नकर्त्यांच्या मते शबरी ही ‘दलित’ आहे.) किंवा निषादराज गुहा हा रामाचा प्रिय मित्र आहे. (जो प्रश्नकर्त्यांच्या मते ‘अनुसूचित जमातीचा’ आहे.) सुग्रीव, हनुमान, जांबुवंत, जटायू यांची ‘जात’ रामायणाने काढली नाही. (हे सर्व प्रश्नकर्त्यांच्या मते ‘अनुसूचित जमातीचे आहेत.) रामायणातून निश्चितपणे असे दिसते की रामाने जातीचा विचार न करता सर्वांशी प्रेमपूर्वक व्यवहार केला आहे. ‘ब्राह्मण आहे’ म्हणून रावणाला क्षमा नाही, तसेच ‘ब्राह्मण नाही’ म्हणून शबरीला शिक्षा नाही. जातीवरून भेदभाव नाही. गुण कर्मानुसार प्रत्येकाशी व्यवहार केला आहे.

राम ब्राम्हणवादी होता का?

भरत जेंव्हा रामाला भेटायला चित्रकुट येथे आला, तेंव्हा रामाने त्याचाकडे अयोध्येची व राज्यकारभाराची विचारपूस केली. या  संवादात राजाने कसे वागावे, राज्य कसे करावे, राजाची कर्तव्य काय आहेत हे रामाने सविस्तरपणे सांगितले. त्यामध्ये ब्राह्मणांविषयी राम म्हणतो –

 “बंधो! तू असा अचानक वनात का आलास? आपले पिता व माता सुखरूप आहेत ना? मला खात्री आहे की तू आपल्या विनयशील व असूया नसलेल्या पुरोहितांचा सत्कार करत असशील. आपल्या वडिलांच्या वयाच्या निष्णात वैद्यांचा व वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांचा तू योग्य मान राखत आहेस ना? ज्यांनी तुला धनुर्विद्या व अर्थशास्त्र शिकवले त्या तुझ्या गुरुजनांशी तू आदराने वागतोस ना? सर्व शिक्षकांचा, वृद्धजनांचा, ऋषी-मुनींचा, अतिथींचा, ब्राह्मणांचा सत्कार करत जा! मात्र धनसंचय करणाऱ्या ब्राह्मणांचा तू सन्मान करू नकोस. काही ब्राह्मण स्वत:ला विद्वान म्हणवून लोकांना अर्थशून्य उपदेश देतात. त्यांचा सत्कार करू नकोस.”

याला ब्राह्मणवादी म्हणायचे का?

रावण हा पुलत्स्य ऋषींचा नातू होता. अगस्त्य ऋषी त्याचे चुलत आजोबा. आणि विश्रवा या योगींचा तो पुत्र होता. अर्थात ब्राह्मण होता. रावणाने परस्त्रीचे अपहरण केले, पण रामाने रावणाला ‘ब्राह्मण’ होता म्हणून क्षमा केली नाही. दान दिले नाही. सत्कार केला नाही. रामाने रावणाशी युद्ध करून त्याचा वध केला.

याला ब्राह्मणवादी म्हणायचे का?

रामचरित्र कालबाह्य आहे.

“आईं वडिलांचे ऐकावे.”, “भावंडांवर प्रेम करावे.”, “संकट कोसळले असता खचून न जाता त्याचा सामना करावा.”, “आपला प्रतिस्पर्धी कितीही बलाढ्य असला किंवा प्रस्थापित राजा असला तरी सुद्धा त्याच्याशी दोन हात करायला घाबरू नये.”, “राजाने व राणीने प्रजेसाठी स्वत:च्या सुखांचा त्याग करावा.”, “राजा एकपत्नीव्रती असावा.”, “बायकोला शोधण्यासाठी पायपीट करावी लागली, युद्ध पुकारावे लागले तरी बेहेत्तर!”, ही शिकवण जर कालबाह्य झाली असेल तर रामायण कालबाह्य वाटू शकते.

ज्यांना आई-वडीलांना काही विचारू नये, बायको असतांना सुद्धा गर्लफ्रेंड असावी, राजकीय नेत्याने मुलासाठी प्रजेला वेठीस धरले, किंवा रामाराज्य नको, भ्रष्टराज्य हवे असे वाटत असेल त्यांना रामचरित्र कालबाह्य वाटू शकते.

रामाने लक्ष्मणावर अन्याय केला आहे.

रामायण ही रामाची कथा आहे. त्यामुळे त्या मध्ये लक्ष्मणावर फोकस नाही.

रामाचे लक्ष्मणावर जीवापाड प्रेम होते. लक्ष्मण युद्धात जखमी होऊन पडल्यावर, हतबल झालेल्या रामाला शोक अनावर झाला होता. त्रायावेळी म म्हणला, “लक्ष्मण मला माझ्या प्राणांहून अधिक प्रिय आहे. देशोदेशी अनेक पतिव्रता पाहायला मिळतील, पण लक्ष्मणासारखा भाऊ शोधून सुद्धा सापडणार नाही. त्याच्या शिवाय मला विजयश्री नको. आणि पुन्हा अयोध्येला जाणे पण नको. लक्ष्मण जसा माझ्या मागोमाग अरण्यात आला, तसे आता मी त्याच्या मागोमाग यमलोकात जाईन.”  

रामाने शरयू नदीत आत्महत्या का केली?

रामाचा देहत्याग उत्तरकांड मध्ये लिहिला आहे. अभ्यासकांच्या मते, हे संपूर्ण कांड मागाहून लिहिलेले आहे. वाल्मिकी रामायण युद्धकांडातील रामराज्याभिषेकानंतर फलश्रुतीने समाप्त होते. जो प्रसंग वाल्मिकी रामायणात नाही त्याविषयी अधिक चर्चा करण्यात अर्थ नाही.

परंतु, या विषयावरील माझे मत असे की – “जगावे कसे” हे सांगणारे तत्त्वज्ञान “मरावे कसे” हे देखील सांगते. भारतातील पंथ विविध प्रकारे प्राण कसा सोडावा हे सांगतात. जसे जैन पंथात ‘संथारा’, ‘सल्लेखना’, ‘प्रायोपवेशन’ आदि प्रकार सांगितले आहेत. अशा प्रकारे देहाचा त्याग करण्याला ‘आत्महत्या’ म्हणत नाहीत. आत्महत्या ही जीवनात हरल्यावर इहलोकीची यात्रा संपवण्यासाठी केली असते. तर जीवनकार्य पूर्ण झाल्यावर देहाचा त्याग करणे याला समाधी म्हणतात.

 



भारतीय वाङ्मयामध्ये वाल्मिकी ऋषींना ‘आदिकवी, महाकवी’ म्हणून अग्रपूजेचा मान असून, ‘वाल्मिकी रामायण’ काव्याचा ‘आदिकाव्य ग्रंथ’ म्हणून गौरव केला जातो. वाल्मिकी ऋषी कोण होते? अनेक जण त्यांना लुटारू-वाटमार्‍या मानतात. पण, प्रत्यक्ष वाल्मिकी ऋषी स्वतःबद्दल काय म्हणतात, हे महत्त्वाचे आहे. रामायणात एके ठिकाणी स्वतःचा परिचय देताना, ‘मी प्रचेतस मुनींचा दहावा पुत्र आहे’ असे ते म्हणतात. ‘रामायण’ मूळातून वाचल्यावर, आपणास वाल्मिकी ऋषींची खरी ओळख होते. ते विद्वान पंडित व कांंतदर्शी थोर कवी होेते. महान तपस्वी होते. त्यांच्या काव्यातून होणारे ऋतुवर्णन, निसर्गवर्णन, नीतीशास्त्र, राजकारण, तत्त्वज्ञान याचे विलोभनीय मनोरम्य दर्शन वाचकांना थक्क करते, त्याचबरोबर वाल्मिकी ऋषींच्या प्रज्ञा प्रतिभेचे, रसिकतेचे, विद्याव्यासंगाचेही दर्शन स्तिमित करते.

वाल्मिकींनी एका पराक्रमी पुरुषाची (रामाची) वीरगाथा देवर्षी नारदांकडून ऐकली आणि पुढे ब्रह्मदेवांच्या दृष्टांत आज्ञेने त्या वीरपुरुषाच्या गौरवगाथेला शब्दरुपात गुंफले. ही एका महाप्रतापी पुरुषाची म्हणजे अध्याध्येच्या राजा रामाची शौर्यगाथा होय. जिला आपण ‘वाल्मिकी रामायण’ म्हणून ओळखतो. वाल्मिकींच्या या रामायणात ना चमत्कारांना स्थान आहे, ना अतर्क्य अतिशयोक्तीयुक्त घटना प्रसंग आहेत. ‘वाल्मिकी रामायण’ ही देवकथा नसून, एका प्रतापी पुरुषाची मानवकथा आहे. हेच वाल्मिकी रामायणाचे पहिले वैशिष्ट्य आहे.

करुणेतून काव्याचा जन्म

नित्यनेमाप्रमाणे वाल्मिकी ऋषी तमसा नदीवर स्नान संध्येस गेले असता, एका मिथुनरत क्रौंच पक्ष्याच्या जोडप्यातील नराला एका शिकार्‍याने बाण मारल्याने, तो मृत होऊन पडला आहे व क्रौंच पक्षिणी विरहाने तडफडून प्राण सोडते, असे हृदयद्रावक, करूण दृश्य पाहतात आणि त्यांच्या तोंडून त्या शिकार्‍याला शाप देणारा, उत्स्फूर्त उद्गार बाहेर पडतो की,‘मा निषाद पतिष्ठां त्वमगमः शाश्वती समाः।’....आणि हाच करूण उद्गार भारतीय काव्यसृष्टीतील पहिले काव्य, छंद ठरतो. शोक भावनेतून उत्स्फूर्त प्रगटला म्हणून त्याला ‘श्लोक’ म्हटले गेले. आपल्या तोंडून असे काव्य बाहेर पडल्याचे, खुद्द वाल्मिकींनाच आश्चर्य वाटते. दिवसभर ते त्या श्लोकाचेच चिंतन करीत राहिले व रात्री त्याच विचारात झोपी गेले. पहाटे त्यांना ब्रह्मदेवाचा दृष्टांत होतो आणि नारदांकडून ऐकलेली रामकथा-चरित्र तू या श्लोकाप्रमाणे लिही, ते रामायण चिरकाल लोकांमध्ये प्रसिद्ध राहिल, अशी देववाणी ऐकू येते. ब्रह्मदेवाची आज्ञा शिरसावंद्य मानून, वाल्मिकी ऋषी रामायण लेखनाचा श्रीगणेशा करतात. त्यामध्ये ब्रह्मदेवांच्या आशीर्वादात्मक आज्ञेचा स्पष्ट उल्लेख करतात. तो असा की,

यावत स्थास्यन्ति गिरयः सरितःच महीतले।

तावत रामायण कथा लोकेतु प्रचरिष्यति।

‘जो पर्यंत या धरेवर नद्या वाहत आहेत, पर्वत स्थिर आहेत, तोवर हे मुनीवरा तुझे रामायण सर्व लोकात चिरकाल प्रसिद्ध राहील.’ इति ब्रह्मदेव.

‘वाल्मिकी रामायणा’चे स्वरूप

विद्यमान ‘वाल्मिकी रामायणा’मध्ये सात कांडे आणि २४ हजार श्लोक आहेत. प्रत्येक कांडामध्ये अनेक सर्ग आहेत १) बालकांड, २) अयोध्याकांड ३) आरण्यकांड ४) किष्किंधाकांड ५) सुंदरकांड ६) युद्धकांड आणि ७) उत्तरकांड अशा सात कांडांमध्ये रामकथा विस्तारलेली आहे. काही अभ्यासकांच्या मते, ‘बालकांड’ व ‘उत्तरकांड’ वाल्मिकींनी लिहिलेले नसून, कोणीतरी नंतर जोडलेली आहेत. या मतास वाल्मिकींच्या रामायणातील युद्धकांडातच पुरावा मिळतो, तो असा की, युद्धकांडात रामाचा राज्याभिषेक झाल्यावर, रामराज्य सुरू होते, असे सांगून ग्रंथाची फलश्रुती कथन केलेली आहे. आपल्या पारंपरिक ग्रंथलेखन पद्धतीनुसार, फलश्रुती हाच ग्रंथाचा समारोप असतो. त्यामुळे ती शेवटी असते. दुसरी गोष्ट म्हणजे, देवर्षी नारदांनी जी रामकथा वाल्मिकींना सांगितली, ती रामराज्याभिषेकापर्यंतच होती. म्हणूनच वाल्मिकींनी युद्धकांडात रामराज्याभिषेकानंतर ग्रंथसमाप्ती दर्शक फलश्रुती कथन केली असावी. यावरून उत्तरकांड त्यातील सीतात्याग वगैरे गोष्टी मूळ वाल्मिकी रामायणात नाहीत, असे अभ्यासक म्हणतात. रामराज्याभिषेकाने रामायणाचा सुखांत समारोप वाल्मिकींनी केलेला आहे. वाल्मिकी हे रामाचे समकालीन होते. रामराज्यातील आदर्श अशा शासनव्यवस्था, कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, अर्थव्यवस्था यांचे वाल्मिकी रामायणातून सुरेख दर्शन घडते. वाल्मिकी रामायणास सुमारे पाच हजार वर्षे झाली आहेत आणि आजही ते प्रेरणादायी-स्फूर्तीदायी आहे. असे हे कालजयी वाल्मिकी रामायण, विश्वातील सार्या रामकथांची मूळ गंगोत्री आहे.

जगामध्ये जी महाकाव्ये ख्यातकीर्त, अमर मानली जातात, त्यामध्ये मिल्टनचे ‘पॅरडाईज लॉस्ट’ आणि होमरचे ‘ईलियड’ यांना पाश्चात्य लोक विशेष श्रेष्ठ मानतात; पण क्रांतदर्शी वाल्मिकींचे ‘रामायण’ हे त्या दोन्हीपेक्षा प्राचीन असून, ते भारतातीलच नव्हे, तर जगाच्या वाङ्मयातील पहिले ‘आदि महाकाव्य’ आहे.होमरच्या ‘ईलियड’वरून वाल्मिकी रामायणाची रचना झाली, असे काही विद्वान (?) पाश्चात्य अभ्यासकांचे मत आहे. त्यांनी वाल्मिकी हे होमरच्या शेकडो वर्षे आधीचे कवी आहेत, हा काल संदर्भ लक्षात घ्यावा. दुसरी गोष्ट म्हणजे, होमरच्या ‘ईलियड’मधील नायिका हेलन ही स्वेच्छेने नवर्‍याला सोडून, प्रियकराकडे पळून जाते, तर वाल्मिकी रामायणातील नायिका सीता ही पतीनिष्ठ असून, तिचे अपहरण होते. हा हेलन व सीतामधील फरक, भारतीय स्त्री व पाश्चात्य स्त्री यांच्यातील फरक आहे, हे अभ्यासकांनी लक्षात घ्यावे. भारतीयांना अशा लोकोत्तर, एकमेवाद्वितीय, पराक्रमी पुरुषांचे अपूर्व काव्य सांस्कृतिक-साहित्यिक वारसा म्हणून लाभले, हे भारतीयांचे परमभाग्य. ‘रामो भूत्वा रामं यजेत।’ असे या वारशाचे आपण अभ्यासपूर्वक, भक्तिभावाने वसा म्हणून प्राणपणाने जतन, संवर्धन केले पाहिजे. ते आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.


आदौ  रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम्।बालीनिग्रहणं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चाद्रावण कुम्भकर्ण हनन मेतद्धि रामायणम्।।

भूतलावर राक्षस गणांचा थैमान सुरु असतांना, सर्व चराचर, ऋषि गण, मानव भयभीत असतांना ब्रह्मदेवाच्या आदेशाने सर्व देव गणांनी वानर कुळात जन्म घेतला. त्याच वेळेस, सप्तपुरी मध्ये जेष्ठ अशा अयोध्या नगरीत रघुकुलातील राजा दशरथ आपल्या पत्नी आणि वशिष्ठादि मुनींसह पुत्रप्राप्ती साठी यज्ञाचे आयोजन करत असतात. या यज्ञातून अग्निपुरुष प्रगट होतो आणि पायस पात्र  अर्पण करत दशरथाला सांगतो कि योग्य वेळी भगवान विष्णू आपल्या अंश रूपाने तुझ्या पुत्र रूपात अवतीर्ण होणार आहेत. राजा दशरथ आपल्या 

तीनही राण्यांना पायसाचा प्रसाद देतो. 

अश्वमेध यज्ञ संपून बारा महिने उलटतात आणि चैत्र महिन्यातील नवमीचे दिवशी, पुनर्वसु  नक्षत्रावर, दुसऱ्या प्रहरात महाराणी कौसल्येचा पोटी राम जन्मला......  

याच दाशरथी रामाचा आज जन्मोत्सव.  रामजन्मोत्सवाच्या निमित्याने मूर्तिकलेतील रामचंद्राचे दर्शन घडवण्याचा छोटासा प्रयत्न.... 

रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे ।

रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: ।

पुराणात तीन रामांचा आवर्जून उल्लेख होतो :

१. भार्गव राम (परशुराम)

२. दाशरथी राम (सीतापती राम )

३. बलराम 

१,२,३ चित्रे पवनी,जिल्हा भंडारा येथील स्तंभावरील आहेत. 

रामायणातील काही प्रसंग :

आश्रमात वार्तालाप करतांना राम, लक्ष्मण आणि सीता... समोर सुवर्णमृग... 

(मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर)

तोडितां फुले मी सहज पहिला जाता, मज आणुनी द्या तो हरीण अयोध्या नाथा ...... 

सुवर्णमृगाचा हट्ट करणारी सीता ....... (मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर)

मृगाची शिकार करतांना राम ..... सीतेच्या आग्रहामुळे रामाला शोधायला आलेला लक्ष्मण, आणि राम-लक्ष्मण भेट... (मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर)

याचक रूपात आलेल्या रावणाला भिक्षा घालतांना सीता....  मूळ रूपात येऊन सीता हरण करतांना रावण...

(मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर)

"मरणोमख याला का मारसी रघुनाथा अडवीता खलासी पडलो, पळविली  रावणे सीता"

रावण जटायू युद्ध.... जटायूशी वार्तालाप करतांना राम-लक्ष्मण.(मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर) 

१.           २.                       ३.                             ४.                             ५.      

राम - रावण युद्धपट, (अंचलेश्वर महादेव मंदिर, चंद्रपूर येथील शिल्पपट )

१. हीच ती रामांची स्वामींनी...... अशोक वृक्ष, त्याखाली बसलेली सीता आणि  मुद्रिका देतांना हनुमंत 

२. युद्धासाठी निघालेला रावण 

३. राक्षस सैन्य 

४. वानर सैन्य 

५. इंद्र रथातुन युद्धाला सज्य राम 

राम- रावण युद्ध (मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर)

        रावण वधानंतर श्रीराम, माता जानकी, लक्ष्मण, हनुमंतासह अयोध्येला परततात. योग्य मुहूर्त पाहून रामांना राज्याभिषेक करण्यात येतो... प्रभू रामचंद्र अयोध्यापती होतात... 

पृष्ठतो लक्षमणम देवं सछत्रं कणकप्रभम । 

पार्श्वे भारत शत्रुघ्न चामर व्यंजनांवितौ । 

अग्रे अव्यग्रम हनुमंतम रामानुग्रह कांक्षिणां ।।

रामचंद्रांचा राज्याभिषेक करतांना लक्ष्मण आणि भरत व छत्रधरी शत्रुघ्न आणि हनुमान 

( मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर)

रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।

रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम: ॥

सिहासनाधीश प्रभू राम, वामांगी जनक कन्या सीता आणि चरणाशी भक्तश्रेष्ठ हनुमंत (पवनी,जिल्हा भंडारा )

राम  राज्याभिषेकानंतर सर्वत्र आनंदाचं, उत्साहाचं  वातावरण निर्माण झालं, खऱ्या अर्थाने रामराज्याला सुरुवात झाली. 

या रामनवमीच्या पावन पर्वावर आपल्याला प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद लाभो व सर्वत्र मंगलमय हो ह्याच मंगल कामना... 

2

रामाला दैवत्व कधी प्राप्त झाले असावे?

रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांवर उहापोह करणार्‍यांची, त्याकडे इतिहास म्हणून बघणार्‍यांची आणि राम-कृष्ण यांची विष्णूचे अवतार म्हणून भक्ती करणार्‍यांची संख्या अमाप असावी. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही अनेकांना या महाकाव्यांनी, त्यातील पात्रांनी आणि देवस्वरूप अवतारांनी भुरळ घातली आहे. मध्यंतरी विसुनानांनी हेलिओडोरसच्या स्तंभाबद्दल लिहिलेल्या "गरुडध्वज शिलालेख, विष्णू आणि वासुदेव भाग-१" या लेखातून कृष्णभक्तीची/ भागवत् धर्माची परंपरा भारतात किती पुरातन आहे त्यावर माहिती दिली होती. त्या लेखातून पुढे आलेल्या निष्कर्षात कृष्णभक्ती ही इ.स. पूर्व ३०० च्याही आधी केली जात असावी असा सहज निष्कर्ष निघतो. या निष्कर्षाला पुष्टी देण्यासाठी मेगॅस्थेनिसने इंडिकामध्ये शौरसेनींविषयी दिलेली माहिती, अलेक्झांडरने शिव आणि कृष्ण या दोन्ही देवता ग्रीकांना पूर्वापार माहित असल्याचा केलेला दावा, हेलिओडोरसचा गरुडध्वज हे पुढे करता येतात. कृष्णाप्रमाणेच देवपदावर पोहोचलेल्या रामभक्तीची परंपरा किती जुनी असावी हा विचार मनात डोकावतो परंतु मूळ मुद्द्याला हात घालण्यापूर्वी राम आणि कृष्ण यांना प्रसिद्धी देणार्‍या रामायण आणि महाभारताकडे एकवार पाहू.

***
कोंबडी आधी की अंडे या प्रश्नाचे मनाजोगे उत्तर मिळालेले नसले तरी "रामायण आधी की महाभारत" या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडून चटकन "रामायण आधीचे" असे दिले जाते. याला प्रमाण म्हणून रामायणाचा काळ, त्यावेळी असणारे समाजजीवन, पौराणिक व्यक्ती, वेषभूषा अशा अनेक गोष्टींच्या आधारे रामायणच आधीचे असा निष्कर्ष काढला जातो. त्यापैकी प्रामुख्याने येणारे काही मुद्दे असे -

१. पौराणिक वंशावळीप्रमाणे राम किंवा त्याचा रघुवंश हा कुरुवंशाच्या आधी येतो.
२. रामायणात महाभारताचा उल्लेख नाही पण महाभारतात रामकथेचा आणि त्यातील पात्रांचा (उदा. हनुमान) उल्लेख/ कथा आहेत.
३. रामायणाचे कथानक त्रेतायुगात घडते आणि महाभारताचे द्वापारयुगात.

परंतु विचार केल्यास या विधानांतून राम ही व्यक्ती कुरुवंशाआधी जन्माला आली होती इतकेच कळते. रामायण हे महाभारताआधी रचले हे सिद्ध होत नाही. एखाद्या उत्तम लेखकासाठी त्याची कथा सद्य काळापेक्षा मागे जाऊन रचणे हे अशक्य कार्य नाही. उदा. लगान या चित्रपटात दाखवलेली पात्रे, काळ आणि कथा सांगते की क्रिकेट हा खेळ गुजराथमधील काही अडाणी गावकर्‍यांनी ब्रिटिशांसमवेत लीलयेने खेळून दाखवला. ही कथा २१ व्या शतकात लिहिलेली असेल तरी १००-१२५ वर्षांपूर्वीचा काळ निर्माण करणे, तत्कालीन इतिहासातील खर्‍या व्यक्तिंशी त्या कथानकाशी सांगड घालणे आणि एक नवे कथानक रचणे चांगल्या लेखकाला अवघड नसते.

एका वेगळ्या उदाहरणात, इलियडचा पूर्वभाग सायप्रिआ हा इलियडनंतर रचला गेल्याचा प्रवाद आहे. असे करताना लेखकांनी हे पूर्वभाग आहेत याची जाणीव ठेवून लेखन केल्याचे निर्वाळे तज्ज्ञ देतात. अगदी अलिकडल्या काळातील उदाहरण बघायचे झाले तर ट्वायलाइट या प्रसिद्ध कादंबरीत येणार्‍या ब्री टॅनर या संक्षेपाने येणार्‍या पात्रावर पुढे "द शॉर्ट सेकंड लाइफ ऑफ ब्री टॅनर" अशी कादंबरी लिहिण्यात आली.

अशाप्रकारे संक्षेपाने येणार्‍या पात्राचा किंवा कथानकाचा विस्तार करून नवे कथानक रचणारा लेखक योग्य काळ उभा करतो, त्या काळाशी सुसंगत मांडणी, समाजव्यवस्था, राजकारण यांचा समावेश करून कथेला सुसंगती आणतो.

महाभारताचा विचार करता, महाभारतात संक्षेपाने रामकथा (रामोपाख्यान) येते. याला रामकथा असे म्हटले आहे कारण महाभारतात वाल्मिकीने रचलेल्या रामायणाचा उल्लेख नाही. इतकेच नाही तर या कथेत राम हा एक राजपुत्र म्हणून येतो. दैवी पुरुष म्हणून नाही. वाल्मिकी नावाच्या कोणत्याही ऋषींचा महाभारतात उल्लेख नाही. महाभारतात या रामकथेच्या संक्षेपाने येण्याबद्दल चार गृहितके मांडता येतील -
  • रामायण महाभारता आधी रचले गेल्याने त्याचा संक्षेपाने महाभारतात रामकथा (रामोपाख्यान) उल्लेख येतो किंवा
  • महाभारतात आलेली रामकथा ही नंतर फुलवून त्याचे वेगळे रामायण हे महाकाव्य निर्माण झाले.
  • महाभारतात आलेली रामकथा ही वाल्मिकी रामायणाच्या पूर्वीच्या एखाद्या रामायणावर आधारित आहे.
  • रामकथा आणि रामायण हे एका तिसर्‍याच रामस्रोतावरून निर्माण झाले आहेत.
यापैकी कोणते विधान खरे मानायचे हा गुंता होतो. विविध तज्ज्ञ वरीलपैकी विविध मते मांडून आपापले तर्क मांडतात. सध्या आपण केवळ दुसर्‍या विधानाबाबत विचार करू.

- महाभारतात आलेली रामकथा ही नंतर फुलवून त्याचे वेगळे रामायण हे महाकाव्य निर्माण झाले. -

या मुद्द्याच्या पुष्टर्थ काही गृहितके खाली मांडत आहे.

१. रामायणातील राम हा कथेचा नायक आहे तर कृष्ण महाभारतातील प्रमुख पात्र नाही. एकदा विष्णूच्या अवताराने नायकाचा अवतार घेतल्यावर त्या पुढील अवतारात तो नायक नसावा ही एक प्रकारची उतरंड वाटते.

२. रामकथेतील राम हा दैवी पुरुष नाही. अहल्येचे प्रसिद्ध प्रकरण रामकथेत येत नाही. तो दैवी पुरुष आहे असे दाखवण्यासाठी जे बालकांड आणि उत्तरकांड याचा वापर होतो ते दोन्ही अनेक तज्ज्ञांच्या मते मागाहून भरती झालेले असावे असे मानले जातात. या वरून मूळ कथेला ठिगळे जोडून रामाला दैवी बनवण्याचा घाट कालांतराने घालण्यात आला. पुराणांतून रामाला आणि कृष्णाला विष्णूचे अवतार मानून रामाला कृष्णापेक्षा पुरातन ठरवण्यात आले. हे सर्व बदल गुप्त काळात झाले असावे असा अंदाज मांडला जातो. पुराणांना गुप्तकाळात प्रमाणित करताना त्यात अनेक फेरफार केले गेले असे मानले जाते. रामालाही दैवत्व तेव्हाच प्राप्त झाले असावे का? बौद्ध काळानंतर जेव्हा हिंदू धर्म पुन्हा बळकट झाला तेव्हा हिंदू दैवतांना बळकटी आली असे तर नव्हे?

३. प्रचलित प्रवादांनुसार महाभारत हा इतिहास तर रामायण हे आदिकाव्य मानले गेले आहे. बहुधा यामुळेच रामायणाच्या अनेक आवृत्ती दिसून येतात. त्या मानाने महाभारताच्या आवृत्तींतील फरक लहान आहेत आणि आवृत्तींची संख्याही कमी आहे. येथे उदाहरण द्यायचे झाले तर काही रामायणांत सीता ही रामाची बहिण आहे तर काहींमध्ये ती रावणाची मुलगी आहे. काही रामायणांत रावणाचा वध लक्ष्मणाकडून होतो तर दशरथ जातकात किष्किंधा, लंका, सीतेचे अपहरण वगैरे नाही. अध्यात्मिक रामायण नावाचे एक रामायण खुद्द वेदव्यासांनी रचले असे सांगितले जाते परंतु गुप्तकाळात ज्या प्रमाणे सर्व पुराणांचा लेखक व्यास बनले त्यातलाच हा एक प्रकार असावा असे एक मत पडते. यावरून राम हा कथानायक म्हणून अधिक प्रसिद्ध असावा असे वाटते.

४. स्थळ-काळाचा विचार केल्यास सरस्वती नदीच्या खोर्‍यातून पूर्वेकडे गंगेच्या खोर्‍यात तत्कालीन जमातींचे स्थलांतर झाले असे मानले जाते. महाभारत हे गंगेच्या पश्चिमेकडील खोर्‍यात घडते. महाभारत काळात गंगेचे पूर्वेकडील खोरे त्यामानाने उपेक्षित वाटते. महाभारतात सरस्वती नदीचा उल्लेख अनेकदा येतो. रामायणात तो किष्किंधाकांडात इतका पुसटसा येतो की तो मागाहून घातला गेला असावा अशी शंका घेतली जाते. रामायणातील कोसल देश, अयोध्या नगरी वगैरे गंगा, शरयु नदीच्या आसपासच्या भागात वसलेले प्रदेश सप्तसिंधुंना महत्त्व देत नाहीत. याउलट, महाभारतात कोसल, किष्किंधा, दंडकारण्य वगैरे प्रदेशांना महत्त्व नाही.

५. इ.स.पूर्व ४५० मध्ये 'कृष्णवासुदेव' याची प्रस्थापना यमुना आणि (लुप्त?) सरस्वती यांच्या आसपासच्या राज्यांमध्ये प्रमुख दैवत म्हणून झालेली होती. (संदर्भः गरुडध्वज..लेख) या प्रकारे राम या दैवताची प्रस्थापना त्या काळात झाल्याचे ऐकिवात नाही. दुसर्‍या शब्दांत कृष्णाला ज्या काळी दैवताचे स्वरूप होते त्याकाळी रामही दैवी झाला होता असे स्पष्ट विधान करण्यास खात्रीशीर पुरावे मिळत नाहीत. कृष्ण हा त्यामानाने भारतात खोलवर रुजलेला दिसतो. कधी महाराष्ट्रात विठोबाच्या रुपात तर कधी ओरिसात जगन्नाथ म्हणून, राजस्थानात श्रीनाथजी म्हणून तर गुजराथेत रणछोडराय म्हणून. रामाचे असे लोकदैवतांत रुजलेले रुप दिसत नाही.

संस्कृती या पुस्तकात इरावती कर्वे म्हणतात की वाल्मिकी रामायणाची भाषा ही महाभारतातील भाषेपेक्षा अधिक अर्वाचीन वाटते. रामायणात येणारे अहिंसेचे उल्लेखही बौद्ध काळामुळे घातले गेले असावे अशी शंका त्यांना येते. हा लेख आणि उपक्रम या संकेतस्थळावर यावर सांगोपांग चर्चा झाल्यावर इरावती कर्वेंच्या संस्कृती या पुस्तकातील रामायण-महाभारतावरील लेख मला वाचायला मिळाले. रामायणाबाबत या लेखात घेतलेल्या शंका इरावतीबाईंनीही बहुतांशी उद्दृत केल्या आहेत.
***


या विषयावर सांगोपांग चर्चा उपक्रम या संकेतस्थळावर मध्यंतरी झाली आणि त्यातून रामाला दैवत्व बौद्ध सुवर्णकाळानंतर आणि कालिदासापूर्वी प्राप्त झाले असावे या निष्कर्षाप्रत मी पोहोचले आहे.



संदर्भः लोकदैवतांचे विश्वः र. चिं. ढेरे The Mahabharata, Volume 2: Book 2: The Book of Assembly; Book 3: The Book of the Forest - J. A. B. van Buitenen एशियन वेरिएशन्स इन रामायणा 

http://vmoti.blogspot.com/2012/06/blog-post.html

महाकवी वाल्मीकींचा वारसा 

रामकथेचा प्रवास दिक्कालाच्या मर्यादा ओलांडून अखंडपणे चालू आहे. हे रामचरित्र जितके सुंदर आहे, तितकीच ही कथा खुलविणार्‍या कवींची प्रतिभाही. सौंदर्यद़ृष्टीतून जीवनाविषयीचे तात्त्विक अधिष्ठान आणि रसास्वाद यामुळे तो काव्यसृष्टीला संपन्न करत असतो. महर्षी वाल्मीकींच्या रामायणापासून आजच्या वास्तवापर्यंत ही रामगाथा साहित्यसृष्टीत आणि लोकजीवनात चैतन्य देत उभी आहे.

 





डॉ. रामचंद्र देखणे

वैश्विक साहित्याचे एक मोठे दालन काव्य या साहित्य प्रकाराने शोभिवंत आणि समृद्ध झाले आहे. भारतीय प्राचीन वैदिक वाङ्मयापासून रचली गेलेली महाकाव्ये हे केवळ भारताचेच वाङ्मयीन वैभव नाही, तर वैश्विक महाकाव्याचे ते एक सौंदर्यदर्शन आहे. ही महाकाव्ये आणि ती रचणारे महाकवी म्हणजे भारतीय साहित्यसृष्टीने विश्वाला दिलेली एक देणगी आहे. महाकाव्य हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते ते ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ ही दोन्ही महाकाव्ये म्हणजे नुसती काव्य सृजनाची अभिव्यक्ती नसून, भारतीय लोकजीवनाचा सांस्कृतिक इतिहास म्हणून त्यांचे स्थान खूप मोठे आहे. ‘रामायण’ हा वैश्विक मूल्यांचा चरित्रकोश आहे, तर ‘महाभारत’ हा ज्ञानकोश. बाळशास्त्री हरदासांनी म्हटले आहे की, रामायणाने जीवनाचे ध्येयदर्शन घडविले आहे, तर महाभारताने मानवी जीवनातील अपरिपूर्णता लक्षात घेऊन प्राप्त स्थितीतही वाटचाल करण्यासाठी नवा ध्येयसिद्धीचा मार्ग दाखविला आहे. 

भारतीय काव्यांमध्ये ‘आर्ष महाकाव्य’ आणि ‘विदग्ध महाकाव्य’ असे दोन प्रकार सांगितले आहेत. साहित्यदर्पणकारांनी रामायण-महाभारताला आर्ष महाकाव्य म्हणून गौरविले आहे. प्राथम्य, प्राचीनता, पावित्र्य आणि सहजस्फूर्तत्व यामुळे ही दोन्ही महाकाव्ये आर्ष महाकाव्ये म्हणून लोकप्रिय ठरली आहेत. लौकिक साहित्यात वाल्मीकी हे आदिकवी, तर रामायण आदिकाव्य होय. धार्मिक आणि नैतिक आदर्शांचे ते भांडार आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या भारतीय समाजरचनेची परंपरा, धारणा, आकांक्षा, भावना तसेच तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, धार्मिक लोकजीवनाचे चित्र रामायणातून उभे राहते. ते जसे महाकाव्य आहे, तसेच समाजशास्त्रीय भूमिकेतून घडविलेले एक ऐतिहासिक चिंतनही आहे. काही विचारवंत हे रामायणाला केवळ काव्य मानतात. इतिहास मानत नाहीत. परंतु, इतिहासही काव्यातून मांडता येतो. मराठ्यांचा इतिहास हा बखरीच्या पानापेक्षाही शाहिरांच्या कवनात अधिक दडलेला आहे आणि तो पोवाड्यामुळेच सर्वज्ञात झाला आहे. तत्त्वज्ञान हे काव्यातून मांडता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’ होय. 

चरित्रकाव्य हेसुद्धा कुठल्या तरी चरित्रकथेवर आधारित असते आणि सखोल चरित्रकथा ही कधीच फारशी कल्पित नसते. ती वास्तवाचेच चित्रण करत असते. काही चरित्रभाग ठसविण्यासाठी त्या कथेमध्ये काही वेळा काव्यात्मक प्रसंग उभे करावे लागतात. काव्यात्मक कथेलाही थोडी रंजकता आणि नाट्यमयता लाभावी म्हणून असे प्रसंग येतात. म्हणून ते काव्य, वास्तवातील चरित्रकथा नाही किंवा इतिहास नाही, असे म्हणणे हे केवळ धाडसाचे ठरेल. रामायणाच्या बाबतीतही असे काही तर्क बाजूला ठेवून ठामपणे सांगता येते की, ते आदिकाव्य आणि छंदोबद्ध इतिहास आहे. कालांतराने त्यात काही बदल होत गेले असतील किंवा काही क्षेपकत्व जोडले गेले असेल; पण पुढे त्याच्यावर लिहिलेल्या अनेक साहित्यकृतीतून ते विदग्धतेने नटले गेले आणि रामायणाचा लोकविस्तार झाला. रामकथा अधिक लोकाभिमुख होऊन सामान्यांच्या प्रतिमेला येऊन पोहोचली. म्हणजेच आर्ष महाकाव्याचे विश्व हे रामायणाच्या रूपात अवतरले आणि महारामायणाच्या रूपात विकसित झाले.

महर्षी वाल्मीकी हा रामायणाचा कर्ता असून, संस्कृत भाषेचा आदिकवी आहे. वाल्मीकींच्या या कवित्वाची ओळख महाभारताच्या द्रोणपर्वावरून कळते. कवी आणि काव्य या दोन्ही विशुद्ध रूपाची कसोटी म्हणजे वाल्मीकींचे रामायण होय. वाल्मीकींनी रामायण का लिहावे किंवा त्याला रामायणाची स्फूर्ती कशी मिळाली आणि काव्यातून ते कसे प्रकटले याची अतिशय सुंदर कथा वाल्मीकींच्या संदर्भात सांगितली जाते. आद्य रामकथा ही नारदमुनींनी वाल्मीकींना सांगितली आहे. एकदा वाल्मीकींनी नारदाला विचारले, ‘हे मुनिश्रेष्ठ, सांप्रत पृथ्वीवर गुणवान, पराक्रमी, सत्यवचनी असा गुणसंपन्न कोण आहे?’ यावर नारदाने इश्वाकू कुळात जन्मलेल्या रामाचे नाव सांगितले आणि वाल्मीकींच्या आग्रहास्तव संपूर्ण रामकथा सांगितली. ती ऐकून महर्षी वाल्मीकी प्रभावीत झाले आणि या रामचरित्राचा विचार त्यांच्या सारखा मनात घर करून राहिला. त्या विचारानेही ते राममय झाले. वाल्मीकींचा आश्रम तमसा नदीच्या काठावर होता. आपला शिष्य भारद्वाज यांना घेऊन एक दिवस वाल्मीकी ऋषी तमसा नदीवर स्नानाला गेले. सकाळची प्रसन्न वेळ होती. वाटेत एका वृक्षावर क्रौंच पक्ष्याचे जोडपे प्रणयविहार करीत असल्याचे त्यांना दिसले. तेवढ्यात एका निषादाने कुठूनतरी बाण मारला आणि त्यातल्या नराचा वेध घेतला. आर्ततेने विव्हळ होऊन त्या पक्ष्याच्या जोडीतला नर क्षणार्धात खाली पडला आणि गतप्राण झाला. आपला जोडीदार पडलेला पाहून त्याची मादी आक्रोश करू लागली. त्या द़ृश्याने वाल्मीकींचे हृदय द्रवले. शिकारी मात्र विजयी मुद्रेने पुढे आला. तो त्या मृत क्रौंच पक्ष्याला उचलणार तोच एक गंभीर, गगनभेदी आवाज आसमंतात उमटला.

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती समः।
यद क्रौंच मिथुनादेकमवधी काममोहितम।

आणि या शब्दांबरोबर वाल्मीकींच्या मुखातून वरील श्लोकातून एक शार्पिवाणी बाहेर पडली. ‘हे निषाधा, तू या भूतलावर फार वर्षे जगणार नाहीस. कारण, तू क्रौंचयुग्मापैकी निरपराध अशा एकाचा वध केला आहेस.’ ही शापवाणी गद्य नसून पद्यरूपात होती. तो एक सहजस्फूर्त असा अनुष्टुभ छंद होता. क्रौंच पक्ष्याच्या जाण्याने भावनांचा आवेग दाटून आला आणि महर्षी वाल्मीकी शोकमग्न झाले. त्या शोकातून एक शाप बाहेर पडला तोच श्लोकाच्या रूपात. त्याचवेळी त्यांच्या अंतरंगातील एक कवी प्रकट झाला होता. वाल्मीकींनी पितामह ब्रह्मदेवाला तो श्लोक ऐकवला. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, ‘हे ऋषीश्रेष्ठा, तुझ्या ठिकाणी सरस्वती अविर्भूत झाली आहे. तू या अनुष्टुभ छंदात समग्र रामचरित्र लिहावे. चोवीस हजार श्लोक, पाचशे सर्ग, सहा काष्ठे आणि सातवे उत्तरकाष्ठ असे हे वाल्मीकींचे रामायण अवतरले. विश्वातील हे पहिले काव्य एका वेदनेतून जन्माला आले. कविता म्हणजे संवेदनाचा उत्सव. या संवेदना प्रतिकूल आणि अनुकूलही असतात. अनुकूल संवेदना सुखदायी, तर प्रतिकूल संवेदना दुःखदायी वाटतात. सुख आणि दुःख अशा दोन धु्रवांना म्हणजे जोडणारा अनुभूतीचा परिघ साधला गेला की, कवितेचे वर्तुळ पूर्ण होते. त्या वर्तुळाचा कवी हा केंद्रबिंदू असतो. तो आपल्या अनुभूतीने परीघ विस्तारत नेतो आणि कवीचे भव्य क्षितिज साकारते. हे काव्य कोण गाऊन दाखविणार, असे वाल्मीकींनी विचारले. त्यासरशी लव-कुश हे दोन कुमार पुढे आले. वाल्मीकींनी त्यांना ते शिकवले आणि ऋषींच्या एका सभेत त्यांनी खांद्यावर वीणा घेऊन रामकथेचे गायन केले आणि रामकथेचा पट उलगडत गेला. रामकथेचे हे वीणागायन हेच श्रीरामाचे पहिले संकीर्तन ठरले.

महर्षी वाल्मीकींच्या पूर्वीही रामाविषयी काही गाथा प्रसिद्ध होत्या. कुशीलव किंवा सुत हे गाथागायक म्हणून प्रसिद्ध आहेत. निरनिराळ्या राजवंशांमध्ये असे कुशीलव आपल्या पदरी बाळगण्याची प्रथा होती. हे कुशीलव राजवंशातील पराक्रमी पुरुषांच्या चरित्रावर गाथा रचित आणि राजसभेत गाऊन दाखवीत. रामविषयक गाथा या इश्वाकु वंशातच निर्माण झाल्या असाव्यात. प्रभू रामाविषयीच्या या गाथा अगोदरच्या की वाल्मीकींचे रामायण, असा जेव्हा प्रश्न उभा राहतो तेव्हा हे लक्षात येते की, रामचरित्राविषयीचे काही कथाभाग आणि आख्यानेही वाल्मीकींपूर्वीची असतीलही; पण महर्षी वाल्मीकींनी त्याच्या आधारे अनुष्टुभ छंदात पहिले रामायण काव्यरूपात लिहिले आणि  रामदूत कुशलवांनी ते प्रथम गायिले. नंतर कुशीलव या गाथागायकांनी समस्त देशात संचार करून रामकथा आणि रामगाथा गायिली. वाल्मीकींचे रामायण ज्यांनी प्रथम गाऊन दाखविले तेही कुश आणि लव होते. म्हणजेच या कुश-लवांपासून या चरित्रगाथा गाणार्‍यांना कुशीलव हे नाव मिळाले असेल आणि पुढे असे कुशीलव हे राजसभेत गायन करून लोकप्रिय झाले असतील. या विचाराला पुष्टी मिळते.

वाल्मीकी रामायणानंतर ही रामकथा सांगणारी अनेक महाकाव्ये आणि चरित्रग्रंथ लिहिले गेले. अनेक प्रकारची रामायणे लिहिली गेली. त्यात अध्यात्मरामायण, अद्भुतरामायण, आनंदरामायण, तत्त्वसंग्रह रामायण, कृतिवास रामायण, भावार्थ रामायण, तुलसीदासाचे रामचरितमानस यासारख्या ग्रंथातून रामचरित्र मांडले गेले. स्कंद, पद्य, देवीपुराण आणि अनेक उपपुराणांतून रामकथा सांगितली गेली. संस्कृत ललित  साहित्याच्या उत्कर्ष काळातही अनेक कवींनी रामकथेवर महाकाव्ये आणि नाटके लिहिली. रघुवंश, महीकाव्य, महावीरचरित, उत्तररामचरित, जानकीहरण, कुंदमाला ही त्याची काही उदाहरणे. मराठीत संत एकनाथांचे भावार्थ रामायण, समर्थांचे रामायण, मोरोपंतांची रामायणे आणि अगदी अलीकडच्या काळातील कविश्रेष्ठ गदिमांचे ‘गीत रामायण’ असा हा रामायण कथेचा आणि रामगाथेचा प्रवास दिक्कालाच्या मर्यादा ओलांडून अखंडपणे चालू आहे.  महर्षी वाल्मीकींच्या रामायणापासून आजच्या वास्तवापर्यंत ही रामकथा  साहित्यसृष्टीत आणि लोकजीवनातही चैतन्य देत उभी आहे, हे निश्चित!

भावार्थ रामायण ते गीतरामायण

माणूस आणि मूल्य यांच्यातला संघर्ष सनातन आहे. तोच रामायण महाकाव्याचा गाभा आहे. रामभक्तीला मराठी भूमीत अधिक उत्कट करण्याचे काम गीतरामायणाने केले. या चिरंतन कलाकृतीने मराठीजनांना निर्मळ आणि निर्भेळ आनंद तर दिलाच, त्याचबरोबर जीवनातल्या शाश्वत सत्याचा स्वीकार करण्याचे धैर्य दिले. स्वतःला पारखून पाहण्यासाठी एक लख्ख आरसा दिला. पौराणिक व्यक्तिरेखांचे चरितगान करताना वर्तमानाचे सजग भानही दिले. 

प्रा. मिलिंद जोशी 

महर्षी व्यास आणि वाल्मीकींच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या महाभारत आणि रामायण या महाकाव्यांचे भारतीय समाजमनातील स्थान अढळ असेच आहे. महाभारत जीवन कसे आहे हे सांगते. रामायण जीवन कसे असावे याचा वस्तुपाठ लोकांसमोर ठेवते. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधूर ते ते असा उत्तमतेचा ध्यास आणि आदर्शांची आस बाळगणार्‍या समाजाला श्रीरामाचेच अधिक आकर्षण वाटत आले ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच भारतीय समाजमनात, आध्यात्मात आणि राजकारणात रामाला अढळ स्थान आहे.

उच्चकोटीच्या साधकांपासून ते अलौकिक प्रतिभेच्या साहित्यिकांपर्यंत आणि दार्शनिक तत्त्वचिंतकांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वांनाच रामाविषयी ममत्व वाटते. भारताच्या दोन हजार वर्षांच्या आध्यात्मिक परंपरेचे उन्नत रूप म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते रामकृष्ण परमहंस म्हणत, ‘जो राम होता, तोच कृष्ण होता. जो कृष्ण होता, तोच राम होता. तोच रामकृष्ण म्हणून या देहात नांदतो आहे.’ महात्मा गांधींना लहानपणी अंधाराची खूप भीती वाटत होती. त्यांची ही भीती घालविण्यासाठी त्यांच्या आईने त्यांना ‘श्रीराम’ हा मंत्र जपायला सांगितला. गांधींनी तो आयुष्यभर जपला.

रामायणातील कथाभागाची, व्यक्तिचित्रणाची पार्श्वभूमी स्वीकारून भारतीय भाषांमध्ये रामायणाचा संस्कार तुळसी रामायणापासून दिसून येतो. मराठी संत कवींचा रामायणाकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन मूलतः पारमार्थिक आणि आध्यात्मिक असा आहे. रामायणाचा संस्कार प्राचीन मराठी कवितेवर सातत्याने झालेला आहे. तो तीन दिशांनी झालेला आहे. 1) एकनाथ, मुक्तेश्वर, रामदास, मोरोपंत यांनी रामायण सलगपणे मराठीत उतरविण्याचा प्रयत्न केला. एकनाथांचे ‘भावार्थ रामायण’ मुक्तेश्वरांचे ‘संक्षेप रामायण’ आणि रामदासांचे ‘लघुरामायण’, सुंदरकांड’ आणि ‘युद्धकांड’ तसेच मोरोपंतांचे ‘सार रामायण’, ‘मंत्र रामायण’, आणि ‘संकीर्ण रामायण’ (एकशे आठ) या सुदीर्घ रचना मराठी कवींनी केलेल्या आहेत. रामायणाच्या संस्काराची दुसरी दिशा म्हणजे 2) आज काही कांडच उपलब्ध असलेली कविता होय. उदाहरणार्थ निरंजन माधव या कवीने सातही कांड लिहिल्याचा उल्लेख मिळतो, पण त्यांचे ‘चिदबोध’ रामायणातील ‘बालकांड’च उपलब्ध आहे आणि तिसरी दिशा म्हणजे 3) रामायणातील कथाभागावर निर्माण झालेली आख्याने, कथागीते, स्वयंवर, काव्ये, अभंग, पाळणे इत्यादी होत. नागेश, विठ्ठल या कवींनी ‘सीता स्वयंवराची’ रचना केली. मोरोपंतांचे ‘सीतागीत’ प्रसिद्ध आहे. वेणाबाई, शिवरामस्वामी, माधवस्वामी यांनी रामायणावर स्फूट रचना केलेली आहे. श्रीधराने प्रवचन कीर्तनासाठी ‘रामविजय’ या ग्रंथाची रचना केली. (संदर्भ - ‘नाथवाणी’, डॉ. उषा माधव देशमुख, माया प्रकाशन, नागपूर, पृष्ठ क्र. 69)
एकनाथांचा ‘चतु:श्लोकी भागवत’ हा पहिला ग्रंथ आणि ‘भावार्थ रामायण’ हा अखेरचा ग्रंथ आहे. एकनाथांचा अखेरचा ग्रंथ ‘भावार्थ रामायण’ असल्यामुळे तो अपूर्ण राहिला आहे. पुढे नाथांचा शिष्य गावबा याने तो पूर्ण केला. याच रामायणात अहिमही आख्यान आहे ते एकनाथ पंचकातील जयरामस्वामी वडगावकर यांचे आहे. एकनाथ-गावबा-जयरामस्वामी यांनी भावार्थ रामायण पूर्ण केले. ज्ञानेश्वरांची ‘भावार्थ दीपिका’ आहे तसेच नाथांचे ‘भावार्थ रामायण’ आहे त्यात वाल्मीकी रामायण, आनंद रामायण, अध्यात्म रामायण, अद्भुत रामायण, योगवासिष्ठ यांचा आधार घेतलेला आहे. रामकथेच्या माध्यमातून नाथांनी केवळ रामसीतेची कथा सांगितली नाही, तर धर्मविषयक, नीतीविषयक प्रंबोधन केले.

ग्रंथांचे नामाभिधान । शुद्ध भावार्थ रामायण॥
तो भाव जडला पूर्ण । असता वक्तेपण मजकैचे॥
भावी अनुसरोनी रघुनाथ । वक्ता झाला एकनाथ ॥
माझेनि हाते ग्रंथ लिहिवित । कर्ता करविता तो एक ॥
(युद्धकांड अ: 55: 125,126)

प्रभू रामचंद्राने हे काव्य माझ्या हातून पूर्ण करून घेतले आहे तोच कर्ता करविता आहे अशीच नाथांची भावना आहे. आत्यंतिक रसाळपणा आणि ओघवती शैली यामुळे नाथांच्या रामायणाचा परिणाम समाजमनावर खोलवर झाला. या महाराष्ट्र भूमीत रामभक्तीला प्रगाढ करण्याचे काम समर्थ रामदासांनी केले. ते स्वतःला श्रीरामाचा दास म्हणवून घेत. श्रीराम जयराम जयजयराम हा मंत्र त्यांना अगदी लहान वयातच स्फुरला होता. आम्ही काय कुणाचे खातो रे । श्रीराम आम्हाला देतो रे ॥ असे अभय त्यांनी मराठी जनाना दिलेले होते. म्हणोनि आम्ही रामदास । रामचरणी आमूचा विश्वास । जरी कोसळोनी पडो हे आकाश । परि आणिकांची वास न पाहो॥ ही त्यांची प्रज्ञा होती. ब्रह्मांड भेदून रामकथा पैलाड न्यावी । ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती. रामदासांनी लघुरामायण, सुंदरकांड आणि युद्धकांड लिहिले. रामदासांनी रामोपासनेच्या बरोबर रामभक्त मारुतीची उपासना करायला समाजाला सांगितले. रामनवमीचा उत्सव वर्षातून एकदा येणार. मंदिर उभे केले तर नित्योपासना घडेल या भावनेने त्यांनी चाफळला राममंदिर उभे केले. रामभक्त हनुमंताची चाफळ, उंब्रज, पारगाव, मसूर शहापूर, शिराळे, शिंगणवाडी, मनपाडळी, माजगाव, बहागाव येथे स्थापना केली. सत्त्व हरवलेल्या समाजाला त्यांनी श्रीरामाकडे सामर्थ्य मागायला सांगितले. त्यासाठी ‘पावनभिक्षा’ लिहिली. कोमलवाणी, विमलकरणी, विद्यावैभव, जनहितकारक, प्रसंगओळख, अंतरपारख, सज्जनसंगती, बहुजनमैत्री आणि अभेदभक्ती ही मूल्ये रामाकडे मागायला सांगितली आणि आनंदवनभुवनाचे स्वप्न साकार व्हावे यासाठीची पार्श्वभूमी समर्थांनी तयार केली.

महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला हा रामभक्तीचा संस्कार पुढे ग. दि. माडगूळकर यांच्यापर्यंत आला. रामभक्त असणारी आई, रामदासी झालेला मामा आणि उमेदवारीच्या काळात पुण्यात भटकत असताना मोरोपंतांचे वंशज रामचंद्र दत्तात्रेय पराडकर यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘मोरोपंतांची रामायणे’ चे केलेले वाचन या सार्‍या संचितातून गदिमांच्या सिद्धहस्त लेखणीतून गीत रामायण साकारले. आपल्या सांस्कृतिक संचितांचे नवसर्जन करून अजरामर कलाकृती कशी निर्माण करता येते याचा आदर्श वस्तुपाठ गदिमांनी ‘गीतरामायणाच्या’ माध्यमातून समोर ठेवला. 1955 मध्ये आकाशवाणीचे अधिकारी सीताकांत लाड यांच्या कल्पनेतून गीतरामायणाची कल्पना पुढे आली. त्या सालच्या रामनवमीपासून पुणे आकाशवाणी केंद्रावरून गीतरामायण प्रसारित होऊ लागले. सीताकांत लाड यांची गीतातून रामायण सादर करण्याची कल्पना हे एक शिवधनुष्य होते. शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर आणि स्वरप्रभू सुधीर फडके यांनी 56 गीतांतून ते पेलले. त्यातून भावभक्तींचे पावनतीर्थ निर्माण झाले. गदिमा आणि बाबूजींनी शब्दस्वरांचा अलौकिक नजराणा या कलाकृतीच्या माध्यमातून सरस्वतीच्या चरणी अर्पण केला. या चिरंतन कलाकृतीमुळे गदिमा महाराष्ट्राचे वाल्मीकी झाले. स्वरतीर्थ होण्याचा भाग्ययोग बाबूजींच्या वाट्याला आला. या पवित्र शब्द स्वरगंगेच्या काठी मनोभावे विसावण्यात धन्यता मानणार्‍या मराठीजनाची श्रवण संस्कृती त्यामुळे श्रीमंत झाली. अभिरूची ऐश्वर्यसंपन्न झाली. या अजरामर कलाकृतीचे गारुड गेली 66 वर्षे मराठी मनावर कायम आहे. पुढच्या अनेक पिढ्याही शुभंकर संस्कारांचे हे पाथेय सोबत घेऊनच वाटचाल करणार आहेत.

माणूस आणि मूल्य यांच्यातला संघर्ष हा सनातन आहे. तोच या महाकाव्याचा गाभा आहे. या संघर्षात मर्यादेचे भान असणारा आणि विवेक आणि वैराग्य । हेचि जाणावे महद्भाग्य ॥ या समर्थवचनाला अनुसरून वाटचाल करणारा माणूसच हा भवसागर तरून जाऊ शकतो, यावर नितांत श्रद्धा असल्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम रामाला मनामनात स्थान मिळाले. या रामभक्तीला मराठी भूमीत अधिक उत्कट करण्याचे काम गीतरामायणाने केले. उत्तम गीताला मिळालेली सुरेख चाल आणि संगीत यामुळे अविस्मरणीय झालेली मैफल एवढीच केवळ गीतरामायणाची ओळख नाही. मनामनातल्या रामभक्तीला साद घालत शब्दातून नि:शब्दाकडे, जाणिवेतून नेणिवेकडे, उत्कर्षाकडून परमोत्कर्षाकडे जाणार्‍या प्रकाशवाटा दाखविणारी ती परमपवित्र अशी गंगोत्री झालेली आहे. या चिरंतन कलाकृतीने मराठी जनाना निर्मळ आणि निर्भेळ आनंद तर दिलाच, त्याचबरोबर जीवनातल्या शाश्वत सत्याचा स्वीकार करण्याचे धैर्य दिले. स्वतःला पारखून पाहण्यासाठी एक लख्ख आरसाही दिला. पौराणिक व्यक्तिरेखांचे चरितगान करताना वर्तमानाचे सजग भानही दिले. जीवनात दाटून आलेल्या धुक्याचे पदर बाजूला सारत उजेडाची गावे कशी शोधत राहायची याची संथाही दिली. कोदंडधारी रामाची अनेकविध नात्यांतून उलगडणारी मनोहारी रूपे गीतरामायणातून साकारताना गदिमांनी आत्मारामाला साद घातली. तोच आत्माराम जीवनाला सुंदरता आणि अर्थपूर्णता देऊ शकेल, असे त्यांना वाटत होते. गीतरामायणातील पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे गीत ऐकताना स्वा. सावरकर, आचार्य विनोबा भावे यांच्यासारख्या स्थितप्रज्ञ माणसांच्या डोळ्यांतही आसवे उभी राहिली. फुले कितीही ताजी टवटवीत आणि सुवासिक असली, तरीही ती सुकतात. अगदी देवाला वाहिली तरी दुसर्‍या दिवशी त्यांचे निर्माल्य होतं. गदिमांच्या प्रतिभासृष्टीतील सारी शब्दफुले अम्लानतेचे वरदान घेऊन आलेली आहेत. अशाच शब्दफुलांनी गदिमांनी गीतरामायणातून शाश्वत मूल्यांची सर्वांगसुंदर पूजा बांधली.

आजही सभोवतालची परिस्थिती मन विषण्ण करणारी आहे. एकीकडे भौतिक समृद्धी आहे, तर दुसरीकडे किळसवाणे वैचारिक दारिद्य्र आहे. समाजाच्या नैतिक आणि भौतिक जीवनातील दरी रुंदावत आहे. सर्व सुखे पायाशी लोळण घेत असूनही सुख, शांती आणि समाधानाच्या शोधार्थ माणसे वणवण भटकत आहेत. नुसती धावत सुटली आहेत. धावायचे कुठपर्यंत आणि कशासाठी माहीत नाही, त्यामुळे सर्वत्र अस्वस्थता आहे. रामायणातला राम कुठे थांबायचे आणि कसे थांबायचे हे सांगतो; कारण तो मर्यादापुरुषोत्तम आहे. आज बाहेरचा गोंगाट प्रचंड वाढल्यामुळे कुणालाच ‘आत्मारामा’चा आवाज ऐकता येत नाही. तो ऐकण्याची उत्सुकता समाजमनात निर्माण झाली, तरच या महाराष्ट्रभूमीतल्या प्रतिभावंतांची रामायणनिर्मितीची सर्जनशीलता सार्थकी लागली असे म्हणता येईल.
(लेखक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत.)

संतसाहित्यातला राम

संतांनी त्यांच्या साहित्यातून जसा पराक्रमी कोदंडधारी राम उभा केला. तसाच प्रेमळ आणि कनवाळू रामही मांडला. घरातल्या माणसांवर, आपल्या भक्तांवर आणि राज्यातल्या प्रजेवर अफाट प्रेम करणारा रामही संतांनी समाजमनात पोहोचवला.

 ज्ञानेश्वर बंडगर

वारकरी संत आपल्या समाजाचे लोकशिक्षक होते. त्यांनी समाजाला अध्यात्माबरोबरच नीतीची शिकवणही दिली.  समाजमनावर रामकथेचा विलक्षण प्रभाव असल्याने या रामायणातील अनेक कथा संतांनी आपल्या अभंगातून लोकांसमोर ठेवल्या आहेत. रामायणातल्या अनेक प्रसंगांचा वापर करून संतांनी आपला नीतीविचार त्यातून व्यक्त केला आहे. संतांनी त्यांच्या अभंगांमधून उभा केलेला राम सामान्य माणसाला जगण्याची दिशा दाखवणारा आहे. 

मराठीतून पहिली रामकथा लिहिली ती संत नामदेवरायांनी. नामदेवराय हे महाराष्ट्रातील आद्य रामकथाकार. त्यानंतर संत एकनाथबाबांनी विस्ताराने मराठीतून रामायण लिहिले. नाथबाबांनंतर रामायणातल्या काही प्रसंगांचा आधार घेऊन तुकोबारायांनी अभंगरचना केली. नामदेवराय, एकनाथबाबा आणि तुकोबाराय या संतांबरोबरच इतरही संतांनी रामकथेतील काही प्रसंग आपल्या अभंगातून मांडलेले आहेत.
महत्त्वाचं म्हणजे वारकरी परंपरेतील संतपंचकांपैकी एक असणार्‍या कबीरांची रामभक्तीही प्रसिद्ध आहे. तुकोबांनी एका अभंगात नामदेवराय विठ्ठलभक्त, ज्ञानोबाराय कृष्णभक्त आणि कबीर रामभक्त

असल्याचे सांगितले आहे.‘रामकृष्णहरी’ हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. या मंत्रातील हरी म्हणजेच विठ्ठलभक्तीसाठी नामदेवराय, कृष्णभक्तीसाठी ज्ञानोबाराय तर रामभक्तीसाठी कबीर प्रसिद्ध आहेत. एका अर्थाने कबीरांच्या रामभक्तीने वारकरी परंपरेच्या मंत्राला पूर्णत्व मिळालं. कबीरांनी रामाची निर्गुणोपासना आपल्याला शिकवली. कबीरांचा राम निर्गुण आहे. त्यामुळेच त्यांना राम आणि रहीम यांच्यात फरक दिसत नाही. कबीरांनी रामाला एका धर्माच्या कोषातून बाहेर काढून वैश्विक केले आहे. त्यांनी आपल्या भारतीय समाजाला रामनामाची ताकद समजावून सांगितली. कबीरांच्या या ‘निराकार’ रामाबरोबर मराठी संतांच्या ‘साकार’ रामाचे ‘सद्गुण’ खूप महत्त्वाचे आहेत. रामाची सगुणोपसाना करणार्‍या मराठी संतांनी रामाच्या जीवनातील प्रेम, त्याग आणि पराक्रम यासारख्या आदर्श जीवनमूल्यांचा परिचय करून दिला आहे.

रामाच्या जीवनात त्यांची त्यागाची भूमिका दाखवणारे दोन प्रसंग आहेत. पहिला प्रसंग म्हणजे वडील दशरथांच्या वचनासाठी राजगादी सोडून चौदा वर्षे त्यांनी वनवास भोगला आणि दुसरा प्रसंग म्हणजे लंका जिंकल्यावर ती आपल्या ताब्यात न ठेवता बिभीषणाकडे सोपवली.  संतांनी रामाच्या जीवनातले हे दोन्ही प्रसंग आपल्या अभंगात नमूद केलेत.  वैकुंठाचा राजा असतानाही राम एखाद्या योग्याप्रमाणे त्यागी भूमिकेत कसा जगला, याविषयी नामदेवरायांनी एक अभंग लिहिलाय. या अभंगात नामदेवरायांनी वडिलांच्या वचनरक्षणासाठीचा रामाचा त्याग मांडलाय. ‘पितृवचनालागी मानोनी साचारी। जाला पादचारी वनी हिंडे।’ असं त्यांनी रामाचं वर्णन केलंय. सत्तेला चिटकून न राहता लंकाराज्य बिभीषणाकडे सोपवणार्‍या रामाची उदारता तुकोबांनी एका अभंगात अधोरेखीत केली आहे. ‘लंकाराज्य बिभीषणा। केली चिरकाळ स्थापना॥ औदार्याची सीमा। काय वर्णू रघुरामा॥’ असं म्हणत तुकोबांनी बिभीषणाकडे लंकाराज्य सुपूर्द करणार्‍या रामाचं औदार्य मांडलं आहे.

रामाच्या उदारतेबरोबरच संतांनी त्यांच्या पराक्रमाची महती गायली आहे. खरं तर नामदेवरायांच्या काळात मराठी माणसांच्या पराक्रमाला उतरती कळा लागली होती. त्यानंतर तर मराठी माणसं हतबल झाली. निराशेचा काळोख दाटला. नेमक्या याच काळात संतांनी मराठी समाजाला रामाच्या पराक्रमाची आठवण करून दिली. वानरांसमवेत स्वतः दुष्टांवर चाल करून विजयश्री खेचून आणणार्‍या कोदंडधारी रामाच्या पराक्रमाच्या कथा एकनाथबाबांनी आपल्या रसाळ वाणीनं तळागाळात पोहोचवल्या. नंतरच्या काळात शहाजीराजे आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांपासून मराठी माणसांच्या पराक्रमाची कमान चढतीच राहिली. मराठी माणसांच्या या पराक्रमाला अनेक कारणं आहेत; पण संतांनी सांगितलेल्या रामाच्या पराक्रमाच्या कथा हे त्यापैकी एक कारण आहे हे नक्की.

संतांनी त्यांच्या साहित्यातून जसा पराक्रमी कोदंडधारी राम उभा केला. तसाच प्रेमळ आणि कनवाळू रामही मांडला. घरातल्या माणसांवर, आपल्या भक्तांवर आणि राज्यातल्या प्रजेवर अफाट प्रेम करणारा रामही संतांनी समाजमनात पोहोचवला. खरं तर रामाचं त्याच्या घरातल्या सर्व माणसांवर प्रेम होतं. स्वतःला कितीही कष्ट सोसावं लागलं तरी चालेल; पण घरातली माणसं सुखात असावीत, असं रामाला वाटायचं. पित्याच्या वचनासाठी ते वनवास भोगायला तयार झाले, यावरून त्यांचं वडिलांवरचं प्रेम दिसतं. वडिलांबरोबरच रामाचं सीतेवरचं प्रेम दाखवणारा एक प्रसंग आहे. ज्यावेळी रावणानं सीतेला पळवून नेलं. त्यावेळी राम वेड्यासारखा रानावनात शोक करत फिरत होता, अशी वर्णनं तुकोबारायांनी त्यांच्या अभंगात केली आहेत.‘वनांतरी रडे। ऐसे पुराणी पवाडे।’ असं त्या प्रसंगाविषयी तुकोबाराय लिहितात. सीतेच्या विरहानं व्याकूळ होऊन रानावनात रडत हिंडणार्‍या रामाच्या त्या प्रसंगातून पती-पत्नीचं नातं प्रेममय असावं, हेच संतांना सूचित करायचं आहे. रामाचं त्याच्या धाकट्या भावांवरही जबरदस्त प्रेम होतं. लक्ष्मणशक्तीचा असाच एक प्रसंग नाथबाबांनी रामायणात नमूद केलाय. लक्ष्मण युद्धात मूर्च्छा येऊन पडला होता. त्यावेळी रामानं केलेला शोक काळजाला घरं पाडणारा आहे. राम आणि त्यांचे सर्व भाऊ यांचं परस्परांवरचं प्रेम विलोभनीय आहे.

घरातल्या माणसांवर प्रेम करणारा हा कुटुंबवत्सल राम भक्तवत्सलही आहे. ‘श्रीराम प्रेमवत्सलू। श्रीराम निरपेक्ष स्नेहाळू। श्रीराम भक्तकाजकृपाळू। दीनदयाळू श्रीराम॥ या ओवीतून नाथरायांनी रामाची भक्तवत्सलता व्यक्त केली आहे. रामाच्या भक्तांवरच्या प्रेमाची अशीच एक कथा संतांनी वारंवार सांगितली आहे. ही कथा आहे भिल्लीण शबरीची. रामाला गोड बोरं खाऊ घालण्यासाठी शबरी दररोज बोरं आधी चाखून बघायची. जी बोरं गोड असतील तीच रामासाठी ठेवायची. जेव्हा रामाची आणि शबरीची भेट झाली तेव्हा शबरीने चाखलेली तीच उष्टी बोरं रामानं खाल्ल्याची कथा प्रसिद्ध आहे. आपल्या भारतीय समाजात अन्नोदक व्यवहारावर कठोर जातीय निर्बंध आहेत. आपल्यापेक्षा खालच्या मानल्या गेलेल्या जातीच्या व्यक्तीचे अन्न अथवा पाणी चुकूनही खाऊ-पिऊ नये, असा धर्मशास्त्राचा नियम आहे. संतांना भोजन व्यवहारातला हा जातिभेद अर्थातच मान्य नव्हता. त्यामुळे संत पारंपरिक सनातन्यांना न जुमानता धर्मशास्त्राचा नियम झुगारून बेधडकपणे आंतरजातीय सहभोजन करत. संतांनी आपण करत असलेल्या आंतरजातीय सहभोजनाच्या कृतीला आधार म्हणून रामचरित्रातील हा भिल्लीण शबरीची उष्टी बोरं खाण्याचा प्रसंग अनेकदा सांगितला आहे. चोखोबारायांच्या घरी देवासह अनेक जातीचे संत भोजनासाठी आले होते, अशी एक कथा आहे. याप्रसंगी कोणीतरी सनातनी हे पाहतील, अशी भीतीही चोखोबारायांनी बोलून दाखवली होती. चोखोबारायांच्या काळानंतर नाथबाबांनीही राणू नावाच्या एका अस्पृश्य मानल्या गेलेल्या भक्ताच्या घरी जेवण केलं होतं. नाथबाबांच्या या कृतीमुळे अनेकजण त्यांच्यावर चिडले होतेच; पण त्यांचा पोटचा मुलगाही या प्रसंगामुळे नाथबाबांवर चिडून काशीला  निघून गेला होता. अर्थातच नाथबाबांना त्याची पर्वा नव्हती. संतांनी सुरू केलेल्या आंतरजातीय सहभोजनाच्या मोहिमांना रामकथेतल्या या प्रसंगाचा खूप मोठा आधार होता.‘भिल्लीणीची बोरे कैसी। चाखोनी वाहतसे देवासी॥’ असं यामुळेच जनाबाईंनी म्हटलंय. देवाला म्हणजेच रामाला जातीविषयाच्या धार्मिक नियमांपेक्षा प्रेम महत्त्वाचं आहे, हेच या रामकथेतून संतांनी समाजाला सुचवून दिलंय. 

वारकरी संत प्रेमभक्तीचे पुरस्कर्ते होते. भक्तीसमोर ब्रह्मज्ञानाची आणि कर्मकांडाची मातब्बरी त्यांना मान्य नव्हती. ब्रह्मज्ञान आणि कर्मकांड हे दोन्ही मार्ग अतिशय अवघड होते आणि त्यावर केवळ उच्चवर्णीयांची मक्तेदारी होती. त्यामुळेच संतांनी ज्ञानकांड आणि कर्मकांड यापेक्षा भक्तिकांडाचा महिमा वाढवला. प्रेमभक्तीचं कर्मकांडाच्या तुलनेतले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी तुकोबांनी रामाने शबरीची बोरं खाण्याचा हा प्रसंग आपल्या अभंगात मांडलाय. यज्ञात देवांना संतुष्ट करण्यासाठी तूप, तीळ, तांदूळ यांसारख्या पदार्थांची समंत्रक आहुती दिली जाते. यावेळी अतिशय काटेकोरपणे शुचिता पाळली जाते; पण यज्ञयागाचा कर्मकांडी मार्ग देवाला फारसा आवडत नाही त्यामुळे तो यज्ञात खोड्या काढतो. प्रसंगी मंत्रातल्या बारीक चुका काढून यज्ञ विफल करून टाकतो. यज्ञातल्या आहुतीवर सहजासहजी संतुष्ट न होता त्यात काहीतरी खोड काढणारा हाच राम शबरीनं चाखून उष्टी केलेली बोरं मात्र आवडीनं खातो. यावरून कर्मकांडापेक्षा प्रेमभक्तीचा मार्ग रामाला जवळचा वाटतो, अशी तुकोबारायांनी मांडणी केली आहे. ‘यज्ञमुखी खोडी काढी। कोण गोडी बोरांची॥’ असं याविषयी तुकोबारायांनी म्हटलंय.

राम घरातल्या माणसांवर आणि भक्तांवर जसा प्रेम करत होता. तसाच तो आपल्या राज्यातील प्रजेवरही प्रेम करीत होता. संतांनी रामाची एक ‘प्रजावत्सल राजा’ अशी प्रतिमा निर्माण केली आहे. ‘आले रामराज्य आम्हा सुखा काय उणे’ अशा शब्दात तुकोबारायांनी रामराज्याचं कौतुक केलंय.  वनवासाच्या काळात नवीन देश वसवणारा, वनवास संपल्यावर सगळ्या जनतेला समाधान देणारे राज्य चालवणारा आणि पीकपाणी-दूधदुभत्याची भरभराट करून उत्पन्न वाढवणारा एक न्यायी आणि आदर्श राजा अशी रामाची प्रतिमा संतांनी उभी केलेली आहे.

अशा रितीने संतांनी प्रेम, त्याग आणि पराक्रम यासारख्या आदर्श मूल्यांची पेरणी करण्यासाठी रामकथा सांगितली आहे. संतांची आणि विशेषतः नाथरायांची विस्ताराने रामकथा लिहिण्यामागची भावना काय असावी याविषयी गं. बा. सरदार यांनी केलेले विवेचन फारच महत्त्वाचे आहे. सरदार लिहितात, ‘भागवत धर्माचे निरूपण करण्यासाठी एकनाथांनी एकादश स्कंध निवडला; पण कथारचनेच्या वेळी मात्र रामायणाची कास धरली, हे त्यांच्या समयज्ञतेचे व समाजप्रवणतेचे द्योतक आहे. रामायण व महाभारत या दोन ग्रंथांनी आज शेकडो वर्षे हिंदवासीयांना सामाजिक नीतिमत्तेचे बाळकडू पाजले आहे.   स्वतः रामाच्या चरित्रात त्याग आणि तपस्या, प्रभुत्व आणि पराक्रम, स्वाभिमान आणि सहिष्णुता, लोकसंग्रह आणि संघटना चातुर्य हे गुण प्रकर्षाने दिसून येतात. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीला या गुणांची किती आवश्यकता याची एकनाथांना पुरती ओळख होती. म्हणून त्यांनी इतक्या विस्ताराने रामचरित्राचे वर्णन केले.’ 

श्रीराम - एक महासेतू 

आज श्रीरामाच्या चरित्राचे, गुणांचे स्मरण, चिंतन, पुनरावलोकन करण्याची आत्यंतिक निकड निर्माण झाली आहे. माणसापासून आणि माणुसकीपासून दुरावत निघालेल्या माणूस नावाच्या प्राण्याला पुन्हा त्यांच्याशी जोडलं जायचं असेल, तर ‘रामचिंतनाचा’ सेतू त्याला निश्चितच साहाय्यकारी होऊ शकेल.

प्रणव गोखले

श्रीराम आणि सेतू हे दोन शब्द वाचून कदाचित रामेश्वर येथील भारत आणि श्रीलंकेला जोडणारी प्राचीन सेतुरचना वाचकांच्या नजरेसमोर तरळून जाईल. मात्र, या ठिकाणी आपल्याला त्या भौतिक रामसेतूचा नव्हे, तर रामामुळे उभारल्या गेलेल्या वैश्विक धारणांच्या सेतूचा विचार करावयाचा आहे. सेतू म्हणजे दोन टोकांना, द्वीपांना एकमेकांशी जोडणारा दुवा. श्रीरामाची चरित्रकथा असो वा त्यातील नीतिशास्त्र, श्रीरामाविषयीचे तत्त्वज्ञान असो वा त्याची होणारी उपासना, श्रीरामाविषयीचे असे असंख्य पैलू आहेत जे या भारतीय समाजाला, भावविश्वाला, धारणांना एखाद्या सेतूप्रमाणे जोडत आले आहेत.

आज ‘राम’ हा शब्द उच्चारल्यावर जो आकृतिबंध आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो केवळ प्राचीनकाळच्या एका पुण्यश्लोक राजाच्या स्मृतिचित्रापुरता मर्यादित नाही. ऋषी, कवी, दार्शनिक, संत या सर्वांच्या द़ृष्टीतून साकारलेला राम आणि जनमानसात विसावलेला राम अशा अनेक आयामांतून तो आकृतिबंध पूर्ण होत जातो. वाल्मीकी, व्यास यासारखे महर्षी; कालिदास, भवभूती, क्षेमेंद्रासारखे विदग्ध महाकवी; मध्व, रामानंद यासारखे दार्शनिक आचार्य; कबीर, तुलसीदास, रामदास यासारखे संत; भिन्न भिन्न कालखंडात झालेल्या या सर्वांना एकत्र जोडणारे सूत्र ‘राम’ आहे.

महर्षी वाल्मीकींनी रचलेली चोवीस हजार श्लोकांची रामायणसंहिता ही रामकथेची आणि भारतीय काव्यपरंपरेचीही गंगोत्री मानली जाते. प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा तीनही कालखंडातील संस्कृत आणि प्राकृत भाषाप्रांतातील असंख्य अभिजात कवींच्या प्रतिभेला रामचरित्र हे अखंड साद घालीत आले आहे. भारतातल्या प्रायः प्रत्येक प्रांताला, भाषेला राम आणि रामकथा आपले वाटतात. या आपुलकीपोटी झालेल्या विविध भाषिक अवतारांत रामकथा, वाल्मीकींच्या मूळ रामायणाची चौकटही ओलांडून जाते. या विविधरंगी रामकथा म्हणजे ऐतिहासिकता, वास्तविकता यांच्या अत्याग्रहामध्ये गुंतून न पडता ‘जनश्रद्धेचा’ झालेला विश्वविस्तार आहेत. एक पुराणकथा नाना प्रांत, तेथील संस्कृती, भाषा, प्रातिभा आविष्कार या सगळ्यांना कशी अलगद जोडत जाते याचे अक्षरशः प्रत्यंतर रामचरित्राचे हे साहित्यिक अवतार पाहताना येत जाते. वाङ्मयाचे अनुगमन करणार्‍या संगीत, नाटक, चित्र, शिल्प यासारख्या कलाविष्कारातूनही रामकथा प्रकट न होती तरच नवल. थोडक्यात, रामचरित्र हे भारतीय साहित्य आणि कला - विश्वाला जोडणारा सेतूच ठरते 

भारतीय उपखंडामधील भौगोलिक, भाषिक, सांस्कृतिक वैविध्याशी फारकत न घेता राम आणि रामकथा अगदी सहज त्यात एकरूप होऊन जातात. उत्तरेमधील हरिद्वारपासून दक्षिण सागरामधल्या लंकाद्वीपापर्यंत रामकथेच्या पाऊलखुणा भारतात सर्वत्र पसरलेल्या आहेत. आजही कुठे लक्ष्मणाने नदी पार करण्यासाठी बांधलेला झुलता पूल आहे, तर कुठे सीतेची गुंफा आहे, कुठे श्रीराम विसावलेली शिळा आहे, तर कुठे हनुमंताने उचलून आणलेल्या द्रोणागिरीची कोसळलेली शिखरे. भारतामधील प्रायः प्रत्येक प्रांत कोणत्या ना कोणत्या रूपात रामाशी अथवा रामचरित्रातील एखाद्या व्यक्तीशी असलेल्या ऋणानुबंधाच्या खुणा आपल्या उरी बाळगून आहे. त्या त्या स्थानाला तीर्थक्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले आहे. अशाप्रकारे भारताचा भौगोलिक विस्तारही एकप्रकारे रामक्षेत्रांनी जोडला गेला आहे.

रामकथेतील संदर्भांच्या आधारे रामाचा पदस्पर्श ज्या ज्या प्रांतांना झाल्याचे सांगितले जाते, आज त्या सर्व प्रांतांमध्ये एक समान सांस्कृतिक सूत्र असल्याचे स्पष्ट दिसते. तत्कालीन भारतवर्षातील नागर अथवा जनपद संस्कृतींमध्ये रुजलेला राम तर स्पष्ट दिसतोच; मात्र दक्षिणापथातील वनेचारांच्या संस्कृतीही रामाशी संवादी होऊन जातात. अगदी भिन्न सांस्कृतिक मूल्य जपणार्‍या लंकेमधील राक्षसांच्या समृद्ध अशा समाजात राम पोहोचतो. अतिरेकी महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या प्रवृत्तींशी संघर्ष करून त्यांना जिंकतो. मात्र, तेथील पात्र व्यक्तीच्या हाती राज्याधिकार सोपवून स्वतः सत्तेपासून दूरच राहतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये राक्षस समाजामध्येही मानवी तत्त्वे, मूल्ये रुजतात आणि पुन्हा दोन भिन्न संस्कृतींना जोडणारा सेतू उभा राहतो.

राम हा केवळ समाजातील अभिजनांपुरता मर्यादित राहत नाही, तर परिजनांनाही तो तितकाच आपलासा वाटतो. आजही भारतामध्ये कोल, रामोशी असे अनेक सामाजिकवर्ग आहेत जे आपला जातिसंबंध थेट रामाशी जोडतात. खुद्द रामायणाचा विचार करता - निषादराजगुह, शबरीभिल्लीण यासारख्या तत्कालीन समाजाच्या चौकटीबाहेरील लोकांचे रामाशी असणारे सौहार्द; जटायू-संपातीसारखे पक्षी, ऋक्ष-वानरांसारखे पशू यांचे रामाशी जडलेले सख्य, या संदर्भांचा एका व्यापक सामाजिक भूमिकेतूनही विचार होणे आवश्यक आहे. संपूर्ण मानवी समाज आणि सृष्टीमधील इतर जीवांच्या परस्पर साहचर्याचे, मैत्राचे एक उदात्त चित्र रामचरित्र आपल्या समोर मांडते. यातून सामाजिक, वैचारिक मूल्यनिर्धारणामध्ये आवश्यक असणारे एक मानक प्रस्थापित केले गेले आहे.

भिन्न भिन्न रामभक्ती संप्रदाय हेदेखील एकप्रकारे सांस्कृतिक-सेतुबंधनाचेच कार्य करीत आले आहेत. रामानुज, मध्व यासारख्या वेदांती आचार्यांनी आत्मानुभवप्राप्तीसाठी रामभक्तीचे महत्त्व लोकांना समजावून दिले. यातून ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग यांचा समन्वय साधला गेला. पुढील काळात आचार्य राघवानंद आणि रामानंद यांनी रामोपासनाप्रधान असा रामावत संप्रदाय स्थापन केला. याच संप्रदायाची एक शाखा रामानंद यांच्याच नावाने विकसित झाली. सर्व जाती-वर्णाच्या लोकांना या शाखेत मुक्त प्रवेश होता. रामानंदांच्या मुख्य शिष्यांपैकी एक महान संत कबीर जन्मसंस्कारांनी मुस्लिम होते. मात्र, त्यांनीही रामनामाची महती गायली. कबीरांच्या अनुयायांचा एक स्वतंत्र संप्रदाय आहे, निर्गुणप्रधान असूनही त्यात रामनाम हे परम साधन म्हणून स्वीकारले गेले. दादू दयाल, मलुकदास यासारख्या अन्य काही निर्गुणोपासक सत्पुरुषांच्या संप्रदायांतही रामनामाची महती प्रतिध्वनित होत राहिली. शिखांच्या ‘गुरुवाणी’मध्येही रामनामाचे आणि रामकथेचे पडसाद उमटलेले दिसतात. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा मूलमंत्रच ‘रामकृष्णहरी’ आहे. तर समर्थ रामदासांनी प्रवर्तित केलेल्या,भक्ती-शक्ती समन्वय घडवणार्‍या रामदासी ‘स्वरूप’ संप्रदायामध्ये रामोपासनाच मुख्य आहे. रामरसिक, रामसनेही असे असंख्य रामोपासक संप्रदाय मध्ययुगीन कालखंडात विकसित झाले. या संप्रदायांनी आपापल्या परीने सगुण-निर्गुण, ज्ञान-भक्ती, प्रवृत्ती-निवृत्ती, सोवळे-ओवळे अशा वेगवेगळ्या धारणांच्या द्वंद्वांमुळे विभक्त होऊ पाहणार्‍या समाजाला रामभक्तीचे अधिष्ठान देऊन एकत्र आणले. निर्गुण उपासनेपासून अगदी राजकारणापर्यंतच्या क्षेत्रांतल्या साक्षेपी महंतांना जोडणारा समान धागा रामभक्तीचा होता. यावरूनच त्या सर्वांसाठी आदर्श आणि आराध्य असणार्‍या रामाचंद्राच्या स्वरूप व्याप्तीची काहीशी कल्पना येऊ शकेल.    

वाल्मीकींच्या उत्तरकालीन रामकथाकारांनी रामसेतूसाठी वापरलेल्या प्रत्येक शिळेवर वानरांनी रामनाम लिहिल्याचा उल्लेख केला आहे. रामनामाक्षारांच्या सामर्थ्यामुळे शिळा समुद्रावर तरल्या आणि एकमेकांशी जोडलेल्या राहिल्या अशी धारणा त्यामागे आहे. लोकाचारामध्ये कुणी भेटल्यावर राम-राम करण्याच्या प्रघातापासून, व्यक्तीला अखेरचा निरोप देताना ‘रामनाम सत्य है’ म्हणण्याच्या पद्धतीपर्यंत रामनाम आपल्याला ठायी ठायी भेटते. यातही एकप्रकारे रामाचे नाम एकाला दुसर्‍याशी जोडण्याचे काम करते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. संतवाङ्मयामध्ये कळीकाळाला दूर ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय हा ‘रामनाम’ आहे अशा आशयाची अनेक वचने वारंवार येतात. भक्तिमार्गातील भाविकांचा द़ृष्टिकोन थोडा बाजूला ठेवला, तरी व्यावहारिक पातळीवरही या विचाराची एका वेगळ्या प्रकारे संगती लावता येण्याजोगी आहे. ‘कलि’ याचा अर्थच मुळात विवाद, कलह, संघर्ष असा आहे. जर या कलह-संघर्षापासून स्वतःला वाचवायचं असेल, तर समोरच्याशी पटत असल्यास त्याला रामराम करणे म्हणजेच योग्य तो मान ठेवून अभिवादन करणे अथवा न पटल्यास वाद न घालता रामराम ठोकणे म्हणजे वेळीच निरोप घेणे पथ्याचे ठरते. यातील विनोदाचा मुद्दा वगळला, तरी ‘रामनामाचा’ संकेत  समाजधुरिणांनी व्यक्ती-व्यक्तीमध्ये घडणार्‍या संवादाच्या म्हणजेच एकप्रकारे जोडले जाण्याच्या प्रक्रियेच्या आरंभी आणि अंती योजला ही खरच चिंतनीय बाब आहे. आजच्या काळात वैश्विकीकरणाच्या प्रक्रियेत दोन खंडांना जोडण्याच्या खटाटोपात, प्रत्येक माणूस आपापल्या आभासी विश्वाच्या कोषात अधिकाधिक गुरफटत चालला आहे. मी जगासाठी काय करू शकतो यापेक्षा अवघ्या जगाचा उपयोग माझ्या व्यक्तिगत सुखासाठी, उन्नतीसाठी कसा करता येईल यासाठी अवघ्यांचा अवघा अट्टाहास सुरू आहे. अशा या पार्श्वभूमीवर आज श्रीरामाच्या चरित्राचे, गुणांचे स्मरण, चिंतन, पुनरावलोकन करण्याची आत्यंतिक निकड निर्माण झाली आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतः आधी दुसर्‍याच्या हिताला जपण्याचा संदेश देणार्‍या रामचरित्राच्या चिंतनाला एक नवे औचित्य आले आहे. राज्याभिषेक होत असताना अचानक केवळ पित्याने दिलेले वचन राखण्यासाठी राज्याधिकार सोडून वनवास पत्करणे; भाऊ पुन्हा राज्याधिकार अर्पण करीत असता तत्त्वासाठी तो न स्वीकारणे; तापसमुनींच्या रक्षणासाठी आततायी राक्षसी शक्तींशी केवळ आत्मनिर्भर राहून संघर्ष करणे; राज्यभार स्वीकारल्यावर प्रजानुरंजनासाठी प्राणप्रिय पत्नीचाही परित्याग करणे, आजन्म पत्नीशी एकनिष्ठ राहणे; रामचरित्रामधला यापैकी एक एक प्रसंग आज वाट चुकलेल्या समाजाला दिशा दाखवायला पुरेसा आहे. माणसापासून आणि माणुसकीपासून दुरावत चाललेल्या माणूस नावाच्या प्राण्याला, पुन्हा त्यांच्याशी जोडलं जायचं असेल, तर‘रामचिंतनाचा’ सेतू त्याला निश्चितच साहाय्यकारी होऊ शकेल.

(लेखक वैदिक संशोधन मंडळ, पुणे या संस्थेत 
सहायक संचालक आहेत.) 

अयोध्याकारण 

अयोध्या म्हणजे जिथे युद्ध होत नाही असं शहर; पण गेली तीन दशकं अयोध्या देशातल्या राजकारणाची समरभूमी बनलीय. फक्त राजकारणच नाही, तर देशाचं समाजकारण, धर्मकारणही याच शहराभोवती फिरतंय. अयोध्येच्या गल्ल्यांमधून फेरफटका मारताना नोंदविलेली काही निरीक्षणं. 

प्रशांत कदम

अयोध्या. शरयू नदीचा काठ. वेळ संध्याकाळी सहा-साडेसहाची. शरयू नदीचा घाट मोठा विस्तीर्ण आहे. तो एका नजरेत मावत नाही. घाटावर एकाचवेळी जवळपास पंधरा ते वीस ठिकाणी आरतीची लगबग सुरू आहे. समोर सगळ्यात मोठा मंडप दिसतोय. तिथं मुख्य आरती होते. हा मंडप दुरूनही ओळखू येतोय. दोन महिन्यांत इथं येण्याची ही दुसरी वेळ. राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला झाला. त्यावेळी एकदा येणं झालं होतं. बाबरी विध्वंस प्रकरणाचा सीबीआय कोर्टाचा निकाल 30 सप्टेंबरला लागला. त्यानंतर पुन्हा आता इथं येणं झालंय. खरंतर अयोध्येत याआधीही काही ना काही कारणानं येणं झालं आहे; पण अयोध्येशी संबंधित गेल्या 30 वर्षांतली ही दोन सगळ्यात महत्त्वाची स्थित्यंतरं. इतरवेळी अयोध्येला येणं आणि या दोन घटना-घडामोडींच्या आसपास अयोध्येला येणं, यात हाच महत्त्वाचा फरक आहे.

स्वातंत्र्यानंतर भारताच्या राजकारणात गेल्या तीन दशकांपासून केंद्रस्थानी असलेलं स्थान म्हणजे अयोध्या. गेल्या सात-आठ महिन्यांत तर या आंदोलनाशी निगडित तीन महत्त्वाच्या घटना घडल्या. 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयानं रामजन्मभूमीच्या बाजूनं स्पष्ट निकाल दिला. त्यानंतर ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आणि आता बाबरी विध्वंस प्रकरणातले सर्व आरोपी निर्दोष ठरले. एकूणच रामजन्मभूमीसाठी उभ्या राहिलेल्या आंदोलनाची इतिश्री होत चालली आहे, असंच या घटनांवरून दिसतं. ज्यांनी मंदिराचं स्वप्न पाहिलं, ते आता साकार होताना दिसतंय. त्यांच्या द़ृष्टीनं ही क्रांती असेल, तर ती आता पूर्ण झालीय. मग आता पुढं काय? या आंदोलनानं काय साध्य केलं? पुढं ते कोणत्या मार्गानं जाणार आहे? जी अपेक्षित उद्दिष्ट्ये समोर ठेवली होती, त्यातली कोणती साकार झाली आहेत, असे काही प्रश्न शरयू घाटावर उभं राहिल्यानंतर मनात येत होते. या प्रश्नांभोवतीच संध्याकाळ संपली आणि रात्रही!

दुसरा दिवस उजाडला. अयोध्येत फेरफटका मारणं सुरू होतं. भूमिपूजनावेळी सजलेल्या अयोध्येचा साजशृंगार अजूनही पुरता उतरलेला दिसत नव्हता. भारताच्या राजकारणात इतकी वर्षे केंद्रस्थानी असलेल्या या ठिकाणी एकच एक भूमिका पाहायला कशी मिळेल. एकीकडे सामंजस्याची, तर दुसरीकडे अगदी टोकाची भूमिका मनापासून बाळगणारे लोक इथं भेटतात. बाबरी विध्वंस प्रकरणात शिवसैनिकांची भूमिका आक्रमक असल्याची वर्णनं आपल्याला माहीत आहेतच. या केसमधे 29 प्रमुख आरोपींमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह काही शिवसैनिकही होते. त्यात मोरेश्वर सावे, सतीश प्रधान ही मराठी नावं तर पवन पांडे, संतोष दुबे यांच्यासारखे काही उत्तर भारतीय शिवसैनिकांचा समावेश होता. मी अयोध्येत पोहोचण्याच्या एक दिवस आधीच सीबीआय कोर्टानं सर्व आरोपींना निर्दोष ठरवलं होतं. त्यामुळंच संतोष दुबे यांची भेट घ्यायची होती. फोन केला, तर ते विजयी आवेशातच म्हणाले, ‘संध्याकाळी सहा वाजता शरयू काठावर काही परिचितांनी सत्काराचा कार्यक्रम ठेवलाय. तिथंच भेटुयात.’

त्यांच्या भेटीची वेळ ठरल्यावर आणखी काही भेटीगाठीचं नियोजन केलं. त्यातलं एक महत्त्वाचं नाव होतं, ते म्हणजे इक्बाल अन्सारी! कोण इक्बाल अन्सारी? तर, राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं पहिलं आमंत्रण गेलं, ते इक्बाल अन्सारी यांना. त्याचं कारण सांगतो. इक्बाल यांचे वडील हाशीम अन्सारी हे अयोध्या खटल्यातले मुख्य मुस्लीम पक्षकार. 2016 मधे त्यांचं निधन झालं. त्यानंतर इक्बाल अन्सारी यांनी हा खटला पुढं चालवला. निकाल आल्यानंतर मात्र त्यांची भूमिका एकदम सामोपचाराची होती. ‘जे झालं ते झालं, कोर्टाचा निकाल मान्य आहे’, असंं म्हणत त्यांनी पुनर्विचार याचिकाही दाखल न करण्याचा निर्णय घेतला. भूमिपूजनाचं आमंत्रण स्वीकारायचं की नाही, याबाबत मुस्लिम पक्षकारांमध्ये मतभेद होते. अनेक कडवे पक्षकार विरोधही करत होते. इक्बाल अन्सारींनी मात्र ते स्वीकारलं. ते कार्यक्रमालाही उपस्थित राहिले. सरकारला प्रतीकात्मक एकता दाखवायची होती. त्यासाठी अन्सारींच्या या उपस्थितीचा फायदाच झाला.

अशा अन्सारींच्या घराचा पत्ता शोधणं काही फार अवघड गेलं नाही. अयोध्येत जन्मभूमीकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर डावीकडे वळण घेतलं की, मुस्लीम वस्ती सुरू होते. वस्तीच्या सुरुवातीलाच एक घर आहे. त्यावर ‘मुद्दई बाबरी मस्जिद मरहूम हाजीमो हाशिम अन्सारी का घर’ अशी पाटी दिसते. तेच त्यांचं घर. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वांत मोठ्या खटल्यातले ते प्रमुख पक्षकार असले, तरीही या खटल्यानं त्यांना प्रसिद्धीशिवाय काहीच मिळालं नसल्याचं त्यांच्या घराच्या अवस्थेवरून दिसून येतं. सगळ्या वस्तीलाच एक जुनी कळा आहे. त्याला अन्सारी यांचं घरही अपवाद नाही. अन्सारींकडे पोहोचलो तेव्हा ते घरासमोरच्या लाकडी छपरात चार-पाच खुर्च्या टाकून हास्यविनोदाची मैफल रंगवत होते. त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले जवान या गप्पांमध्ये पुढाकार घेत असल्याचं दिसून आलं. आमचं येणं झाल्यावर अन्सारी या मैफिलीतून उठले आणि आम्हाला घरात घेऊन आत गेले. सुरुवातीला थोड्या गप्पा झाल्या. वादग्रस्त जागा मंदिराची असल्याचा निर्वाळा सुप्रिम कोर्टानं दिला. पाठोपाठ सीबीआयनंही बाबरी उद्ध्वस्त करणार्‍यांना निर्दोष ठरवलं. त्यामुळं त्यांच्या मनात एक पराभवाची भावना असेल, असं वाटलं होतं. त्यामुळं याबद्दलच त्यांना विचारलं. ‘हमारे लिए तो उसी दिन मसला खतम हो गया था, जब सरकारने मस्जिद को नही बचाया। अब 28 साल से ये देखरेख, पूजापाठ तो सब मंदिर का ही हो रहा था ना वहा। कल्याणसिंहने कोर्ट में हलफनामा दिया था, मस्जिद को कुछ नहीं होगा। लेकिन उसके बावजूद जो करना था वह तो कर ही दिया। कोर्टसे भी कोई उम्मीद नहीं रही। इसलिए तो हम रिव्यू में भी नहीं गए।’

अन्सारी यांच्या बोलण्यात एक हताशपण जाणवलं.  मंदिर आणि मशीद दोन्हीच्या बांधकामांसाठी स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करावेत, असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. सरकारच मंदिर बांधतंय, असा अर्थ जाऊ नये यासाठी या ट्रस्टच्या स्वतंत्रतेवर कोर्टाचा भर होता. अयोध्येत झालेला भूमिपूजनाचा सोहळा हाही काही सरकारी कार्यक्रम नव्हता. तो ट्रस्टचाच होता; पण पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळं त्यातला फरक कुणाच्या लक्षात आला नाही. सरकार मंदिर बांधकामाच्या कामात रस दाखवत असताना मशिदीसाठी मात्र तितकीशी हालचाल होताना दिसत नाही. मशिदीसाठी देण्यात आलेली 5 एकर जागा ही अयोध्येपासून 25 किलोमीटर लांब आहे. हा विषय अन्सारी यांच्यासमोर काढला. तेव्हाही त्यांच्या बोलण्यात कोरडेपण होतं. 

‘हमारा काम तो सिर्फ कोर्ट तक सीमित था। मस्जिद के लिए जमीन तो वक्फ बोर्ड को मिली हैं। अगर वह पक्षकारों को मिली होती, अगर वह अयोध्या में मिली होती तो हमारा उससे कुछ लेना-देना होता। अब मस्जिद मे क्या बनाऐंगे, कहां बनाऐंगे, मस्जिद बनाऐंगे भी क्या यह उनकी जिम्मेदारी हैं।’ इतक्या वर्षांपासून मशिदीसाठी कोर्टात भांडणार्‍या व्यक्तीच्या बोलण्यात किती अलिप्तपणा आहे, हे जाणवत राहिलं. अन्सारी यांच्याबद्दल अयोध्येतल्या ज्येष्ठ पत्रकारांनी आधी काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातच त्यांच्या अलिप्तपणाचं उत्तर दडलं आहे, हे लक्षात आलं. अयोध्येच्या संपूर्ण प्रकरणात सहभागी असलेल्या मुस्लीम पक्षकारांपैकी इक्बाल अन्सारी आणि त्यांचे वडील हाशिम अन्सारी हे मवाळ भूमिकेचे. बाबरी मशिदीच्या देखरेखीसाठी असलेल्या स्थानिक कमिटीचेही हाशिम अन्सारी सदस्य होते. त्यामुळंच ते या खटल्यात पक्षकार बनले. वाद सतत सुरू राहण्यापेक्षा एकदा काय तो निकाल लागला पाहिजे, असंच हाशिम अन्सारी यांचं मत होतं. इक्बाल अन्सारी यांचीही हीच भूमिका होती. ती भूमिकाही त्यांच्याशी बोलताना कळली.

‘हमलोग झगडे को बरकरार नहीं रखना चाहते। हम नहीं चाहते के आनेवाली पिढी भी हमारी तरह ये झगडा देखती रहें। जो देस मंदिर-मस्जिद की लढाई लढता रहेगा उस देश का सोचिए क्या भला हो सकता हैं?’ 

आपण कोर्टात कशासाठी गेलो होतो, हेही त्यांच्याही डोक्यात अगदी स्पष्ट आहे. उगीच आपल्या लढाईला ते उदात्तीकरणाचा मुलामा लागू देत नाहीत. 

‘ये हमारे मोहल्ले की मस्जिद थी। हम स्वयं अपने लिए कोर्ट मे गए थे। ये किसी दुसरे की लढाई नही थी। हमारे अब्बा इस मस्जिदकी देखरेख करते थे।’ 

एवढ्या वर्षांच्या संघर्षानंतर आता लागलेल्या निकालानं वाद संपेल का, यावरही ते त्यांची तात्त्विक भूमिका स्पष्ट करतात. 

विवाद तो कभी खत्म नही होता। हिंदू-मुस्लिम को आपस में लडाने के लिए नया नया फॉर्म्युला छोडते रहते है ये लोग। अभी एक मंदिर बना नही की मथुरा-काशी पहुंच गए लोग। जहां मंदिर-मस्जिद की लडाई चलती रहेगी तो उस देश मे क्या होगा?’ 

हे सांगताना हे सगळं अयोध्येच्या बाहेरचेच लोक जाणूनबुजून करतात. इथल्या लोकांमधे मात्र ती वैरभावना नाही, हेही ते आवर्जून नोंदवतात. 

‘यहाँ तो हमेशा नॉर्मल रहता है। जब भी माहौल गरम करना होता है, तो नेता लोग कुछ प्रोग्राम रखते है। बाहर की भीड बुलाते है। अयोध्या को गरम दिखाया जाता है। अयोध्या गरम नहीं है, लेकिन दिखाया तो वही जाता है।’ अन्सारींशी गप्पा चांगल्याच रंगल्या. बोलता बोलता भूमिपूजन सोहळ्याचं आमंत्रण का स्वीकारलं तेही त्यांनी सांगून टाकलं. ट्रस्टचा उद्देश काहीही असेल; पण निमंत्रण दिलेले तर माझ्या गल्ली-मोहल्ल्यातले लोक होते. त्यांचं निमंत्रण नाकारून मी वाईटपणा का घेऊ, अशी सरळ भूमिका त्यांनी मांडली.  या सगळ्या भेटीगाठीत दुपार झाली. फेरफटका पुन्हा सुरू. कुठल्याही प्राचीन शहराची ओळख शहरातल्या बांधकामांवरून कळते. शरयू घाटावर गर्दीगर्दीनं उभी असलेली मंदिरंही अयोध्येच्या शेकडो वर्षांच्या इतिहासाची साक्ष देत उभी आहेत. अयोध्या म्हटल्यावर राम मंदिर डोळ्यांसमोर येत असलं, तरी अयोध्येत छोटी-मोठी सुमारे दहा हजार मंदिरं आहेत. शरयू घाटावरच्या गल्ल्यांमधून फिरताना घरात मंदिर आहे की मंदिरात घर आहे, हेही कधी कधी कळत नाही. असं असूनही प्रत्येक मंदिराची शैली आणि इतिहास वेगळा आहे, हेही विशेष!  दशरथ महल, कनक भवन, अयोध्या पॅलेस ही पर्यटकांच्या भेटीसाठीची नेहमीची ठिकाणं. या ठिकाणांचं महत्त्वही फार.

अलीकडे ‘मणिराम दास जी छावणी’चं धार्मिकद़ृष्ट्या महत्त्व वाढलंय. दिगंबर आखाड्याचे प्रमुख महंत नृत्यगोपाल दास हे या छावणीचे प्रमुख आहेत. बाबरी विध्वंस प्रकरणातले तेही आरोपी होते. भूमिपूजनावेळी पंतप्रधानांच्या व्यासपीठावर उपस्थित असणार्‍या पाच लोकांपैकी हे एक महंत होते. छावणीत आल्या आल्या परिसराचा आणि कारभाराचा विस्तार आपल्या नजरेत भरतो. छावणीच्या प्रवेशद्वारावरच बंदुकधारी जवान बसलेले दिसतात. लॉकडाऊनमुळं छावणी परिसर शांत वाटत होता. भव्य दगडी इमारतीत छावणीचं मुख्य मंदिर आहे. मंदिरातल्या साधू महाशयांना येण्याचा उद्देश सांगितला. त्यावर ‘महंत बोलणार नाहीत; पण छावणीचा कार्यभार पाहणार्‍या महंत कमलनयन दास यांची भेट घालून देतो,’ असं या साधू महाशयांनी सांगितलं. अंधार्‍या जिन्यातून दुसर्‍या मजल्यावर आम्ही पोहोचलो तेव्हा कमलनयन दास त्यांच्या सेवकांकडून रोजच्या दिनक्रमातली काही कामं करवून घेत होते. त्यात त्यांचा एक पट्टशिष्यही दिसत होता. सोबत आलेल्या साधूंनी आमची ओळख करून दिली. मुलाखत म्हटल्यावर घरच्याच अवतारात बसलेल्या कमलनयन दास यांनी एक स्वच्छ धोतर मागवून घेतलं. एका लयीत घड्या करत ते अंगाखांद्यावरून घेतलं आणि मग आमचं बोलणं सुरू झालं. 

अयोध्या आंदोलनानं काय साध्य झालं, या प्रश्नानं बोलण्याची सुरुवात झाली. ‘राष्ट्र निर्माणासाठी ही आवश्यक गोष्ट असून त्यामुळं इतक्या वर्षांचा आमचा सांस्कृतिक अपमान अखेर पुसला जातोय. अयोध्येचं वैभवही त्यामुळं कसं परत येतंय, हे स्पष्ट करून आता पुढं काय, हे सांगताना ते काशी-मथुरेवर येत नाहीत. ‘राम जन्मभूमी का आंदोलन तो राष्ट्रनिर्माण के उद्देश से खडा किया आंदोलन था। भविष्य में अगर राष्ट्रनिर्माण के लिए ही कोई आंदोलन खडा करना पडे तो हम उसके लिए भी तैयार रहेंगे। चीन के सामने हम कमजोर ना पडे इसलिए भी राष्ट्रनिर्माण आंदोलन की जरुरत है।’ असं ते स्पष्ट करतात. पुढं गप्पा सुरू राहिल्या. त्यात छावणीचा कार्यविस्तार किती आणि कसा मोठा आहे, त्याचं काम कसं चालतं हे विषय येत राहिले. नावातच छावणी असलेल्या ‘मणिराम दास जी छावणी’तून निघालो, ते खर्‍या खुर्‍या छावणीत. म्हणजे रामजन्मभूमी आंदोलन उभं राहिल्यापासून अयोध्येतल्या ‘विश्व हिंदू परिषदेची कार्यशाळा’ आणि ‘कारसेवकपूरम’ दोन वास्तू आंदोलनकर्त्यांसाठी छावणीसारख्या राहिल्या आहेत. शहराच्या टोकाला अयोध्येच्या परिक्रमा मार्गावर या दोन्ही वास्तू एकमेकांपासून अवघ्या काही मीटर अंतरावर उभ्या आहेत. कार्यशाळा म्हणजे मंदिराच्या निर्मितीसाठी गेल्या 30 वर्षांपासून दगडी शिळांचं कोरीव काम करणं सुरू होतं, ती जागा. नव्वदीच्या दशकात देशभरातून ‘जय श्रीराम’ लिहिलेल्या विटा मागवल्या गेल्या. त्याही इथंच रचून ठेवलेल्या आहेत. इतक्या वर्षांपासून मागवल्या गेलेल्या या विटा अस्थायी रूपात पत्र्याच्या शेडमध्ये लावण्यात आल्या आहेत. या विटांवर वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमधे ‘जय श्रीराम’ ही अक्षरं कोरलेली दिसतात. या विटांच्या शेजारीच कोरीव काम केलेले भव्य दगडी खांब एकावर एक रचून ठेवलेले आहेत. 

कार्यशाळेचे निरीक्षक असलेले अन्नुभाई सोमपुरा हे या कामात सुरुवातीपासून सहभागी आहेत. आज त्यांचं वय 82 आहे. आजवरच्या प्रवासात त्यांचे अनेक साथीदार बदलले. काहींनी त्यांची साथ सोडली. त्यांचा जावईही इथंच काम करत होता. जुलै 2019 मध्ये त्यांचंही निधन झालं. असे अनेक चढ-उतार पचवत अन्नुभाई कार्यशाळेत पाय रोवून आहेत. ते मूळचे गुजरातचे. काका चंद्रकांत सोमपुरा हे अन्नुभाई यांना 1990 मध्ये अयोध्येत घेऊन आले. मंदिराच्या निर्मितीचं काम आता ‘एल अँड टी’ कंपनी करतेय. त्यामुळं सध्या ही कार्यशाळा या सगळ्यातून उसंत घेतल्यासारखी दिसतेय. अन्नुभाईंच्या कामाच्या निष्ठेबद्दल कळल्यावर त्यांच्याबद्दल आणि कार्यशाळेबद्दल उत्सुकता तयार होतेच. याच उत्सुकतेनं कार्यशाळेत प्रवेश केला. अन्नुभाईंबद्दल विचारताच एक सेवक त्यांच्या घरापर्यंत घेऊन गेला. घरातून त्यांची मुलगी आणि नात बाहेर आल्या. ‘अन्नुभाई झोपलेत. थोड्या वेळातच उठतील. रोज 4 वाजता कार्यशाळेतल्या मंदिरात जाऊन बसतात,’ त्यांच्या मुलीनं सांगितलं. सोबत आलेल्या सेवकानं घरच्यांना ‘मी दुरून आल्याचं’ सांगितलं. अन्नुभाई उठताहेत का पाहा, अशी विनंती केली; पण मी

श्रीरामाच्या पाऊलखुणा

मर्यादापुरुषोत्तम प्रभुरामचंद्र हे शौर्य, सामर्थ्य आणि आदर्शवाद यांचे प्रतीक आहेत. हे सगळे गुण प्रत्येकाने अनुसरावेत आणि प्रत्येकाचे आयुष्य समृद्ध आणि संपन्न व्हावे, हीच मूर्तिमंत श्रीराम उभे करण्यामागे इच्छा असते. अशा काही वैशिष्ट्यपूर्ण राम मंदिरांविषयी... 

आशुतोष बापट

कुठल्याही गोष्टीचा गाभा, त्याचे तेज, स्वत्व याला रामाची उपमा दिलेली असते. अमुक एखाद्या गोष्टीत आता काही राम उरला नाही... अशी वाक्ये आपण अनेकदा आणि विविध संदर्भात वापरत आणि ऐकत आलो आहोत. असा हा श्रीरामाचा महिमा. याची भुरळ कलाकारांना पडली नसती तरच नवल आणि मग त्या कलाकारांनी प्रभू रामचंद्रांच्या निरनिराळ्या मूर्ती निर्माण केल्या. तसेच श्रीरामाची मंदिरे निर्माण केली. महाराष्ट्राचा विचार केला तर प्रभू श्रीरामांचा वावर जिथे जिथे झाला असं समजलं जातं तिथे तिथे त्यांची मंदिरे उभी राहिली. प्रभू रामचंद्र वनवासात होते तेव्हा त्यांचा बराचसा काळ हा नाशिक इथे व्यतीत झाल्याच्या नोंदी आपल्याला साहित्यातून मिळतात. या श्रद्धेमुळे तिथे त्यांचं मंदिर असणं साहजिकच आहे. तसेच विदर्भात रामटेक याठिकाणी देखील त्याचं वास्तव्य होतं अशी द़ृढ समजूत आहे. रामटेक आणि पंचवटी ही दोन क्षेत्रे त्यामुळेच रामक्षेत्रे म्हणून महत्त्वाची आहेत. 

नाशिकचे काळाराम मंदिर असेच एक महत्त्वाचे रामक्षेत्र. पूर्वीचे मंदिर आक्रमकांच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाल्यावर सध्याचे मंदिर सन 1788 मध्ये सरदार रंगराव ओढेकर यांनी बांधले. पूर्वीच्या मंदिरातील राममूर्ती गोदावरीत टाकून दिलेल्या होत्या. त्या त्यांनी परत मिळवल्या आणि त्यांची स्थापना मंदिरात केली. काळ्या पाषाणातील मूर्ती असल्यामुळे साहजिकच त्याला ‘काळाराम’ असे नाव पडले. मुंबईत गिरगावात झावबाच्या वाडीत राममंदिर आहे. त्याचे नाव गोराराम मंदिर होय. इथल्या मूर्ती संगमरवरी असल्याने देवाला ‘गोराराम’ असे नाव मिळाले. देवावरच्या श्रद्धेपायी आणि त्याच्याप्रति असलेल्या प्रेमापोटी सहजगत्या अशी नावे भक्तांकडून ठेवली जातात.

अजून एक रामक्षेत्र आहे विदर्भातल्या रामटेक इथे. वनवासात असताना श्रीरामाचा मुक्काम रामटेक इथे असलेल्या अगस्ती मुनींच्या आश्रमात होता. रामटेक इथले मंदिर हे 18 व्या शतकात नागपूरचे रघुजी भोसले यांनी बांधले. रामटेक या स्थानाचा संबंध कवी कालिदास आणि त्याने रचलेल्या मेघदूत काव्याशीसुद्धा जोडला गेलेला आहे. 

समर्थ रामदासस्वामी हे प्रभू श्रीरामाशी तादात्म्य पावले होते. त्यांच्या शब्दाशब्दांत राम होता. त्यांनी जागोजागी हनुमंताची स्थाने निर्माण केली तसेच त्यांनी चाफळ या आपल्या मुख्य मठाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे मंदिर बांधले. त्यासाठी त्यांनी रामरायाची मूर्ती आणली ती सातार्‍याजवळ असलेल्या अंगापूर गावच्या कृष्णेच्या डोहातून. मूर्तीची स्थापना करून त्यांनी रामाचा मोठा उत्सव सुरू केला. तरुणांमध्ये स्वधर्म आणि स्वदेश याप्रती अभिमान जागृत करण्याचे कार्य या उत्सवाच्या माध्यमातून समर्थांनी केले. सध्याचे चाफळ येथील मंदिर उद्योगपती मफतलाल यांनी बांधलेले आहे. या मंदिरात राम-सीता-लक्ष्मण यांच्या संगमरवरी मूर्ती असून समर्थांना अंगापूरच्या डोहात सापडलेली मूर्ती समोर ठेवलेली आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले चाफळ इथले राममंदिर आणि तो सगळाच परिसर मोठा देखणा आहे.

पुण्यात तुळशीबाग इथे असेच श्रीरामाचे एक सुंदर मंदिर आहे. हे मंदिर नारो आप्पाजी खिरे (तुळशीबागवाले) यांनी बांधले. त्यांनी इ.स. 1763 मध्ये विधीपूर्वक मंदिराचा उंबरा बसवला. इ.स. 1765 मध्ये उमाजीबुवा पंढरपूरकर यांच्याकडून श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती घडवून घेतल्या. जवळजवळ 30-32 वर्षे मंदिराचे बांधकाम सुरू होते. सन 1795 मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाला गेले. मंदिराचा 140 फूट उंचीचा कळस आजही लोकांचे लक्ष वेधून घेतो. 

पुणे-सोलापूर मार्गावर असलेल्या भिगवण जवळ असेच एक सुंदर श्रीरामायण मंदिर आहे. हे मंदिर उजनी जलाशयाच्या काठावर आहे. या जलाशयात असलेले पळसदेव मंदिर हे वर्षातले आठ महिने पाण्यात बुडालेले असते. मात्र, हे श्रीरामायण मंदिर काठावर असल्याने त्याच्या पायरीपर्यंत पाणी येते. हे दोन गाभारे असलेले मंदिर असून याच्या बाह्यभागावर रामायणातील प्रसंगांचे अत्यंत सुंदर असे शिल्पांकन केलेले आहे. ज्यात सेतूबंधन, वाली-सुग्रीव युद्ध आणि राम-रावण युद्ध हे प्रसंग अतिशय देखण्या रूपात शिल्पांकित केलेले दिसतात.

प्रभू रामचंद्रांची काही खास मंदिरं महाराष्ट्राबाहेरही बघायला मिळतात. त्यातले एक मंदिर आहे कर्नाटक राज्यातल्या चिकमंगळूर जिल्ह्यात, हिरेमंगळूर गावातील ‘कोदंडस्वामी मंदिर’ आहे. इ.स.च्या 14 व्या शतकातील होयसळ शैलीत बांधलेले हे मंदिर श्रीरामांचे देवस्थान आहे. गाभार्‍यात अंदाजे दीड फूट उंचीची श्रीरामचंद्रांची मूर्ती उभी असून, त्यांच्या दोन्ही बाजूला सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती आहेत. इथे सीतामाता रामचंद्रांच्या उजव्या बाजूला असून लक्ष्मण डाव्या बाजूला उभे असल्याचे दिसते. यावरून इथे एक लोककथा सांगितली जाते. ती अशी की, या ठिकाणी श्रीरामाने परशुरामाचे गर्वहरण केले. तेव्हा परशुरामाने प्रभूंना विनंती केली की त्यांनी त्यांच्या विवाहाचा प्रसंग दाखवावा. श्रीरामांनी त्यानुसार त्यांच्या विवाहाचा प्रसंग परशुरामासमोर उभा केला आणि म्हणून विवाह प्रसंगी उभे राहण्याच्या पद्धतीनुसार इथे सीतामाता रामचंद्रांच्या उजव्या बाजूला दाखवतात, अशा प्रकारची कथा इथे सांगितली जाते. 

आंध्र प्रदेशात हैदराबादपासून जेमतेम 30 कि.मी. अंतरावर ‘अम्मापल्ली’ इथे अजून एक प्राचीन श्रीराम मंदिर बघायला मिळते. इ.स.च्या 13 व्या शतकात वेंगी राजाने या मंदिराची निर्मिती केली. गर्भगृहात काळ्या पाषाणात घडवलेल्या श्रीराम-सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती असून, त्या मूर्तींची प्रभावळसुद्धा त्याच दगडातून घडवलेली आहे. मंदिरात मारुतीराया या मूर्तींच्या सोबत नसून त्याचे निराळे ‘अंजनेयस्वामी मंदिर’ याच मंदिर परिसरात आहे.

आंध्र प्रदेशात भद्राचलम इथले श्रीराममंदिर आणि त्यात स्थापित रामचंद्रांच्या मूर्तीसुद्धा देखण्या अशा आहेत. महाराष्ट्रात नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर इथे उगम पावलेली गोदावरी आता तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवरून वाहत जात पुढे भद्राचलम इथे येते. भद्राचलम हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. इथे इ.स.च्या 17 व्या शतकात बांधलेले आणि मूर्तिकाम असलेले एक श्रीरामाचे सुंदर मंदिर आहे. इथे असलेल्या रामाला ‘वैकुंठ राम’ असे म्हटले जाते. वैष्णव संप्रदायाचे हे मंदिर खास दक्षिणी पद्धतीने बांधलेले आहे. इथे रामनवमी तसेच वैकुंठ एकादशीचा उत्सवसुद्धा साजरा केला जातो. 

दक्षिणेतील अजून एक समृद्ध आणि संपन्न असे हिंदू साम्राज्य म्हणजे विजयनगर साम्राज्य होय. विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेल्या हंपी इथे असलेले ‘हजार राम मंदिर’ हे सुद्धा मूर्तिमंत रामचंद्रांचे दर्शन घेण्याचे अजून एक मोठे ठिकाण होय. इ.स.च्या 15 व्या शतकात हे मंदिर तेव्हाचा सम्राट देवराया दुसरा याने बांधले. जेव्हा त्याने हे मंदिर बांधले तेव्हा ते छोट्या रूपात होते. गर्भगृह, सभामंडप आणि अर्धमंडप एवढेच याचे स्वरूप होते. नंतर आलेल्या सम्राटांनी त्यात भर घालून अनेक खांब असलेला सभामंडप उभारला. या मंदिराचे वेगळेपण हे त्याच्या नावापासूनच सुरू होते. रामाची अक्षरशः हजारो शिल्पं या मंदिरावर कोरलेली आहेत. रामायणातील अनेक प्रसंग, विविध कथा इथे आपल्यासमोर शिल्परूपाने समोर येतात. 

रामभक्तीचा हा प्रवाह सर्वत्र वाहताना आपल्याला प्रकर्षाने दिसून येतो. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाई जवळच टाकेद तीर्थ नावाचे ठिकाण आहे. इथे जटायूचे मंदिर आहे. जटायूचे प्राणोत्क्रमण याच ठिकाणी झाल्याचा समज असल्यामुळे इथे जटायू मंदिर बांधलेले असून त्यात श्रीरामाची देखणी मूर्ती जटायूला पाणी पाजताना दाखवलेली आहे.

अशा रितीने मूर्तिमंत रामचंद्र आपल्याला जागोजागी आढळून येतील. मर्यादापुरुषोत्तम राम हा आदर्श प्रत्येक व्यक्तीच्या समोर शिल्पकारांनी विविध मंदिरांतून उभा केलेला आहे. प्रभू रामचंद्र हे शौर्य, सामर्थ्य आणि आदर्शवाद यांचे प्रतीक आहेत. हे सगळे गुण प्रत्येकाने अनुसरावेत आणि प्रत्येकाचे आयुष्य समृद्ध आणि संपन्न व्हावे हेच त्या मूर्तिकारांची मूर्तिमंत श्रीराम उभे करण्यामागची इच्छा असते.

 

प्रभुरामचंद्रांंची अयोध्या

अनेक शतकांमध्ये धार्मिक व राजकीय परिवर्तन झालेे; पण अयोध्या कायम राहिली. अयोध्येवरचे लोकांचे प्रेमही कायम राहिले. अयोध्येच्या श्रीरामांनी भारताला सांस्कृतिक इतिहास दिला, भूगोलाच्या मर्यादा ओलांडून श्रीराम भारतीयांच्या मनामनात पोहोचले. श्रीरामांची राजधानी म्हणून अयोध्येचे महत्त्व वादातीत आहे.

उमेश सणस

राम हा अनेक पिढ्या भारतीयांच्या मनात वसलेलं एक स्वप्न आहे. रामायण हे महाकाव्य आहे की इतिहास आहे, या वादात भारतीय सामान्य नागरिकाला कसलाही रस नाही. रामायण हा इतिहास आहे, यावर भारतीयांचा विश्वास आहे. महापुरुषोत्तम व आदर्श राजा असलेला राम आजही भारतीयांच्या मनामनात आहे. रामायणाच्या कथा मुलांना सांगून त्यांच्यावर संस्कारांचे बीजारोपण करण्यासाठी रामायणाचा उपयोग केला जातो. भारतीय माणसांच्या जीवनातून राम वजा करून काहीच शिल्लक राहत नाही, हे आजचे वास्तव आहे. रामाचा उल्लेख श्रीराम व प्रभुराम म्हणून करणारी भारतीय जनता आजही रामाच्या प्रेमात आहे.

भारतातला पहिला आदर्श राजा ज्याच्या राज्याचे, रामराज्याचे स्वप्न आजही भारतीय जनता पाहते. अशा राज्याची राजधानी असणारं शहर म्हणजे अयोध्या. म्हणून भारतीयांच्या मनामध्ये अयोध्याबद्दल विलक्षण आकर्षण आहे. अयोध्येचा राम हा शब्द भारतीयांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. अयोध्येला जाणारे असंख्य भारतीय प्रत्येक पिढीत सापडतात.

अयोध्येचा इतिहास पाहता इश्वाकू कुळातील राजांनी अयोध्येवर राज्य केले आहे. सूर्यवंशी, रघुकुळातील अनेक राजांनी अयोध्येचा आणि स्वतःच्या घराण्याचा नावलौकिक वाढवलेला दिसतो. सूर्यपुत्र मनू याने अयोध्येची स्थापना केली, असे संदर्भही पुराणकाळात सापडतात. रघू, भरत, हरिश्चंद्र, दशरथ, राम अशा राजांच्या कर्तृत्वाने अयोध्या राज्याच्या मोठेपणाच्या कक्षा आकाशापर्यंत भिडल्या. हरिश्चंद्र, रघू या राजांनी इश्वाकू कुळाचा लौकिक वाढवला. परंतु, सामान्य माणसाच्या जीवनात संस्कार, विचार आणि नैतिकतेचे पाठ हे श्रीरामांनी दिले. म्हणूनच श्रीरामांची अयोध्या आजही जनमानसाला आकर्षित करते. गुप्त घराण्याच्या राजांनीही अयोध्येवर राज्य केले आहे. हिदूंना पवित्र असणार्‍या या सप्तपुरींपैकी अयोध्या पहिली, कौशल राज्याची राजधानी म्हणजे अयोध्या. अयोध्या याचा अर्थ जेथे कोणाचा वध होत नाही असे शहर. अजिंक्य शहर म्हणजे अयोध्या असाही एक अर्थ सांगितला जातो. विनितानगर असेही आणखी एक नाव या नगराला आहे.

राम जन्मापूर्वीची अयोध्या व रामानंतरची अयोध्या यातही विलक्षण फरक आहे. हिंदूंच्या सात पवित्र तीर्थस्थानांमध्ये अयोध्येचा समावेश केला जातो, ही गोष्ट जितकी खरी आहे, तितकेच अयोध्येचं जैन आणि बौद्ध धर्मातील स्थानही वादातीत आहे. जैन धर्मात एकूण 24 तीर्थकार होऊन गेले. त्यापैकी 24 तीर्थकारांपैकी 5 तीर्थकार हे अयोध्येत जन्माला आले होते आणि 22 तीर्थकार हे इश्वाकू कुळातील होते, हे पाहता जैन समुदायासाठी अयोध्या हे तीर्थक्षेत्र आहे. जैन धर्माचे जन्मस्थान म्हणजे अयोध्या यावरही अनेकांचे एकमत आहे. अनेक जुनी हिंदू व जैन मंदिरे  अयोध्येमध्ये पाहायला मिळतात.

बौद्ध धर्मीयांना अयोध्येमध्ये आपल्या प्रगतीच्या व विकासाच्या पाऊलखुणा सापडतात. अयोध्यानगराचे साकेत हे नाव बौद्ध कागदपत्रात सापडते. सातव्या शतकात भारतात आलेल्या चिनी प्रवाशाने अयोध्येतील बौद्ध धर्माच्या पाऊलखुणांबद्दल लिहून ठेवले आहे. सर्व धर्मीयांना तीर्थक्षेत्र वाटणारी अयोध्या ही अतिप्राचीन नगरी आहे. शरयू नदीकाठची ही नगरी सदैव चर्चेचा व आकर्षणाचा विषय राहिली आहे, हे निःसंशय. पाचव्या शतकानंतर बौद्ध धर्माचा प्रसार भारतभर होऊ लागला. त्याची प्रतिबिंबे अयोध्येतही दिसतात. बौद्ध मठ व मंदिरे याच काळात अयोध्येत उभी राहिली. त्याचे अवशेष आजही पाहावयास मिळतात. बौद्ध धर्मानुसार गौतम बुद्धांनीही अयोध्येत तपश्चर्या केली आहे. गौतम बुद्ध 16 वर्षे अयोध्या येथे राहिले आहेत, असे संदर्भ पाली कागदपत्रात सापडतात.

मर्यादापुरुषोत्तम श्रीराम वनवासात गेले. रावणाचा पराभव करून दिगंत कीर्ती मिळवून पुन्हा अयोध्येत परतले. अयोध्येत राजसूय यज्ञ केला व अयोध्येची कीर्ती भारतभर पसरवली. शरयू नदीपात्रात रामबंधू लक्ष्मणाने आत्मसमर्पण केले. श्रीरामांनीदेखील शरयू नदीत प्रवेश करून इहलोकीची यात्रा संपवली. रामाचा मोठा मुलगा लव याने अयोध्येच्या बाहेर पंजाब किंवा आजच्या लाहोर प्रांतात स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले व श्रीरामांचा धाकटा मुलगा कुश याने अयोध्येची पुनर्स्थापना केली, असे दाखले इतिहासात सापडतात.

महाभारताच्या युद्धाच्या काळात इश्वाकू कुळाचा व रामाचा वंशज असलेला राजा बृहतबल याने महाभारताच्या युद्धात कौरवांच्या बाजूने सहभाग नोंदवला होता. अभिमन्यूने त्याला मारले व त्यानंतर अयोध्या झाकोळली गेली. तोपर्यंतच्या काळखंडात अयोध्या वैभवाच्या शिखरावर होती, असे सांगितले जाते.

विक्रमादित्य याने उज्जैन येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले. प्रत्येक राजाला आदर्श वाटावा असा श्रीरामांचा इतिहास होता. श्रीरामांच्या हयातीतच लोकांनी त्याला परमेश्वरी अवतार मानले व त्याच्या त्यानंतरच्या काळात ईश्वराचे दुसरे रूप म्हणून श्रीरामाकडे पाहिले गेले. दशरथ राजा अयोध्येत जिथे राहत होता,  तिथे दशरथ महाल होता. तिथेच श्रीरामांचा जन्म झाला. याच ठिकाणी विक्रमादित्य राजाने श्रीरामांचे भव्य मंदिर उभे केले होते. हे मंदिर अत्यंत भव्य होते. इ.स. 1528 च्या दरम्यान या मंदिराच्या जागेवर बाबरी मशीद बांधली गेली. हे मंदिर पडले व पडलेल्या जागेवर बाबरी मशीद बांधली की मंदिर पाडून बाबरी मशीद बांधली गेली, याबाबत वाद आहेत. तथापि, राम जन्मभूमी हा नंतरच्या काळात चर्चेचा विषय राहिला.

श्रीरामाचे भव्य मंदिर अयोध्येत उभे केले जावे, यासाठी अनेक रामभक्तांनी आंदोलन उभे केले. राजकारण करणार्‍या आणि राजकारणापासून दूर राहणार्‍या रामभक्तांना अयोध्येत गेल्यावर त्यांचा राम त्यांच्या जन्मभूमीत आणि जन्मस्थानी भेटावा अशी इच्छा होती. हा सर्व अलीकडचा इतिहास झाला. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार असंख्य भाविकांची श्रद्धा असलेल्या राम जन्मभूमीवर प्रभू श्रीरामांचा अधिकार मान्य केला गेला व तेथे आता प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारले जाणार आहे.

अयोध्येत गेलेला सामान्य माणूस श्रीरामांच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न करतो. शरयू नदीचे विशाल पात्र व शरयूच्या काठावर वसलेली अयोध्या नगरी हे आजही भारतीयांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. मोघल साम्राज्याच्या पतनानंतर फैजाबाद या शहराची स्थापना अयोध्येपासून अगदी जवळच केली गेली. मात्र, यामुळे अयोध्येचे महत्त्व कमी झाले नाही. फैजाबादच्या नबाबांनी फैजाबाद उभारले खरे; पण अयोध्येवरचे सामान्य माणसाचे प्रेम व श्रीरामांच्या अयोध्येवरची श्रद्धा ही कायम राहिली. फैजाबाद जिल्हा आता राहिला नाही, अयोध्या हा नवा जिल्हा उत्तर प्रदेशात स्थापन झाला आहे.

अयोध्येत सीतामातेने अग्निदिव्य कोठे केले? अयोध्येच्या धोबीघाटाचे स्वरूप कसे आहे? अयोध्येत रामभक्त हनुमान कोठे राहत होता? अशा प्रश्नांची उत्तरे शोधत सामान्य पर्यटक अयोध्येची तीर्थयात्रा पूर्ण करतो. सुनमुख पाहिल्यानंतर कैकयीने सीतेला दिलेल्या वास्तूला कनकमहाल असे म्हणतात. तेथे रामाचे व सीतेचे वास्तव्य होते. अशा पाऊलखुणा शोधत भाविक अयोध्येत फिरत असतात.

अनेक शतकांमध्ये व युगामध्ये धार्मिक व राजकीय परिवर्तन झाले; पण अयोध्या कायम राहिली. अयोध्येवरचे लोकांचे प्रेमही कायम राहिले. अयोध्येच्या श्रीरामांनी भारताला सांस्कृतिक इतिहास दिला, भूगोलाच्या मर्यादा ओलांडून श्रीराम भारतीयांच्या मनामनात पोहोचले. श्रीरामांची राजधानी म्हणून अयोध्येचे महत्त्व वादातीत आहे.

काही हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या आदर्शवत जीवन जगणार्‍या श्रीरामांवर भारतीय जनतेचे आजही मनापासून प्रेम आहे. श्रीरामांचे नाव घेऊन विविध पक्षांनी राजकारण केले. या सार्‍यांचे केंद्र गेले काही दशके श्रीरामांची राजधानी अयोध्या हेच राहिले. मोघल आक्रमणांनी सार्‍या भारतावर परिणाम झाला तसा अयोध्येवरही झाला. परकीय आक्रमकांच्या यशाचे प्रतीक असलेली बाबरी मशीद व राम जन्मभूमीचा वाद लोकशाही भारतात अखेर शांततामय मार्गाने मिटला.

जीवनात राम शोधण्यासाठी आयुष्यभर भटकणार्‍या धार्मिक भारतीयाला एकदा तरी अयोध्येला जावेसे वाटते. वडिलांच्या एका शब्दासाठी चौदा वर्षांचा वनवास हसत हसत स्वीकारणारा श्रीराम भारतीयांना आपला वाटतो. आजच्या भाऊबंदकीच्या कालखंडामध्ये भावांसाठी सर्वस्व अर्पण करणारा राम वेगळा आणि अनोखा वाटतो. एकपत्नीव्रती, चारित्र्यसंपन्न राम हा सर्व पिढ्यांसाठी आदर्श राहतो. रामायणाच्या पाऊलखुणा, श्रीरामांची पदचिन्हे अयोध्येच्या परिसरात उमटली आहेत, यावर भारतीय जनमानसाची श्रद्धा आहे. या श्रद्धेपोटी अयोध्येत राम शोधायला जाणार्‍या प्रत्येक भाविकाला शरयू नदीच्या विशाल पात्राकडे पाहताना कनकमहाल, हनुमानगढी पाहताना श्रीरामांच्या पदचिन्हाजवळ पोहोचल्याचा भास आणि अनुभूती नक्की होते. हनुमानगढी ही सर्वधर्मीयाचे श्रद्धास्थान आहे. अवधचा नवाब मन्सुरअली खान याने या मंदिराकरिता बावन्न एकर जमीन दान केली आहे. नबाब मन्सुरअली खान याचा आजारी पडलेला मुलगा हनुमानाच्या कृपेने बरा झाला यावर नबाबाची श्रद्धा होती. या मंदिरावर कोणाही राज्यकर्त्यांची सत्ता असणार नाही, असेही या नबाबाने जाहीर केले होते.

महाकवी वाल्मिकींनी अयोध्येचे वर्णन केलेले आहे. अयोध्येचे वर्णन रामायणात अनेकदा येते. श्रीरामांना यौवराज्याभिषेक नगरी करण्याच्या वेळी आनंदाने, सुखाने, ऐश्वर्याने नटलेली अयोध्या कशी होती त्याचे विलोभनीय वर्णन रामायणामध्ये सापडते. अयोध्येचं ऐश्वर्य या नगरीतील लोकांच चैतन्य, जगामध्ये असे कुठले शहर नाही याची जाणीव याचे वर्णन वाचताना सहजी होते. महाकवी अयोध्येची तुलना इंद्रलोकाशी करतात. गगनचुंबी इमारती व धनधन्याने, रत्ने जवाहिरांनी भरलेल्या अयोध्येचे वर्णन करताना महाकवीची प्रतिभा अधिकच खुलते.

कालिदास हा गुप्त कालातील कवी होता. त्यानेही अयोध्येचे संदर्भ त्याच्या लिखाणात दिले आहेत. राजा व योगी निर्माण करणारे शहर ही अयोध्येची आणखी एक ओळख आहे. कवींना आपले वाटणारे हे नगर आहे. 

श्रीरामांच्या वनवासाने मुकी झालेली अयोध्या ही देखील गोस्वामी तुलसीदासांच्या रामायणात आढळते. वनवास संपवून रावणाचा वध करून अयोध्याला परत आलेल्या श्रीरामांच स्वागत करण्यासाठी नटलेली अयोध्या ही वैभवसंपन्न होती. आपला सुपुत्र अनेक वर्षांनी परत येतो आहे. आपल्या नावलौकिकात भर टाकतो आहे. याचा अयोध्या नगरीला झालेला आनंद, प्रजेला त्यामुळे मिळालेली नवसंजीवनी याचीही विलक्षण वर्णनं रामायणामध्ये आढळतात. तत्कालीन भारतातील ऐश्वर्यसंपन्न नगर, देशातल्या सर्वात मोठ्या राज्याची राजधानी म्हणजे अयोध्या होती. जगातील तत्कालीन भारतातील सर्वश्रेष्ठ पुरुष इश्वाकू कुलात जन्माला आले होते. त्यांनी या देशाच्या नावलौकिकात भर घातली होती. अयोध्येचे राजे म्हणून सूर्यवंशी, रघुवंशी असे इश्वाकुकूल प्रसिद्ध होते. अयोध्या ही भारताची केंद्रबिंदू होती. श्रीरामांच्या नंतर हा केद्रबिंदू अयोध्याकडे राहिला नाही; पण तरीही अयोध्येचे महत्त्व कमी झालं नाही. जगातील सर्वश्रेष्ठ राज्यकर्त्याच्या, देवत्व लाभलेल्या श्रीरामांच्या आठवणी घेऊन अयोध्या आजही दिमाखाने उभी आहे. 

अयोध्या नगरी ही राज्याची राजधानी होती. तशीच इश्वाकू कुलाची जन्मभूमी होती. या जन्मभूमीनं अनेक नररत्न तत्कालीन भारतीय राजकारणाला दिली. श्रीरामपुत्र कुशानं नवनिर्माण केलेली अयोध्या ती आजची अयोध्या हा वेधक प्रवास आहे. श्रीरामजन्मभूमी  सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आता मुक्त झाली आहे. तेथे श्रीरामांचे भव्य मंदिर आहे. या नंतरच्या काळातही जगभरातील भाविक श्रीरामांची पदचिन्ह शोधण्यासाठी अयोध्येला आल्याशिवाय राहणार नाहीत. उत्तर भारतातील शरयू नदीकाठी वसलेलं एक शहर एवढीच अयोध्येची ओळख नाही. अयोध्या हा भारताचा सांस्कृतिक ठेवा आहे. भारतीय संचिताचे ते सार आहे. भारतीयांच्या मनात वसलेल्या श्रीरामांची ती जन्मभूमी आहे. सर्व बाबतीत आदर्श जीवन जगणार्‍या श्रीरामांच्या इतिहासाचा वारसा संपन्नपणाने मिरणारी अयोध्या आजही लोकांच्या कुतूहालाचा विषय आहे. जैन आणि बौद्ध धर्मीयाना आपलीशी वाटणारी तर हिंदूसाठी सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असणारी अयोध्या भविष्यातही भारताच्या इतिहासावर आणि भूगोलावर अधिराज्य करेल याबद्दल तिळमात्र शंका नाही.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा