गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

रामायण, महाभारत व वेदातील सरस्वती नदी

 https://kalaapushpa.com/2020/08/28/sarasvati_river/

श्री निलेश नीलकंठ ओक यांनी Chemical Engineering मध्ये MS ची पदवी मिळवली असून ते खगोलशास्त्र, पुरातत्त्व, भूशास्त्र, जनुकीयशास्त्र, प्राचीन भारतीय ग्रंथ आणि तत्त्वज्ञान यांचे अभ्यासक आहेत. त्यांनी रामायण व महाभारतात दिलेली ग्रहस्थितीवर आधारित रामायण व महाभारत कालाचे निष्कर्ष काढले आहेत. त्यांनी लिहिलेलं ‘When did the Mahabharata War Happen?’ आणि‘The Historic Rama – Indian Civilization at the end of Pleistocene’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आज त्यांच्या लेखाचा अनुवाद.

जगात अनेक ठिकाणी असे दिसून येते की कैक नद्यांचे पात्र कालौघात बदलले. कित्येक नद्या ज्या पूर्वी खूप मोठ्या होत्या त्यांच्या ठिकाणी आता लहानसा झरा सुद्धा राहिला नाही. भूशास्त्रज्ञ अशा प्राचीन नद्यांच्या वाळलेल्या पात्रांतील मातीचा अभ्यास करून जुन्या नदीची  किंवा नदीच्या जुन्या प्रवाहाची माहिती शोधू शकतात. भारतात अशी लुप्त झालेली नदी म्हणजे सरस्वती. लोकस्मृती मध्ये तिचे जमिनीत गुप्त होणे लक्षात आहेच. पण त्याहून विशेष असे आहे की साहित्यातून सरस्वतीच्या त्या त्या काळातील प्रवाहाची माहिती देखील मिळते. जगातील हे एकमेव उदाहरण असेल जिथे नदीच्या भूशास्त्रीय अभ्यासाला प्राचीन काळातील साक्ष मिळाली आहे.

भूशास्त्रीय अभ्यासातील सरस्वती 

विविध भूशास्त्रीय अभ्यासातून जसे की – Mary Courty 1986, Frankfort 1992, Khonde 2007, Bhadra 2009, Clift 2012, Sarkar 2016, Singh 2017, Dave 2018 आणि इतर अनेकांनी सरस्वती नदी बद्दल सातत्याने एकच सांगितले आहे –

पहिला टप्पा – सरस्वती नदी हिमालयात उंच पर्वतांमध्ये उगम पावून, दक्षिणेकडे वाहात सिंध सागराला मिळत होती. या काळात यमुना व सतलज नदी सरस्वती नदीला मिळत होत्या. या दोन मोठ्या उपनद्यांमुळे सरस्वती ही एक ‘महा’ नदी होती.

दुसरा टप्पा – कालांतराने दोन्ही उपनद्यांची दिशा बदलली. सरस्वतीला मिळणारे उपनद्यांचे पाणी कमी झाले. सरस्वतीला उंच पर्वतातील मिळणारे पाणी सुद्धा कमी होत गेले. पण त्याचवेळी पावसाचे प्रमाण वाढल्याने ते  पाणी सरस्वतीला मिळू लागले व सरस्वती वाहती नदी राहिली. पण सरस्वती आता महान नदी न राहता लहान नदी झाली होती.

तिसरा टप्पा – त्या नंतरच्या काळात जसे पावसाचे प्रमाण कमी होत गेले, तसे यथावकाश नदी पूर्ण कोरडी पडली.

ऋग्वेदातील सरस्वती

श्री श्रीकांत तळेगीरी यांनी ऋग्वेदाच्या १० मंडळातील भाषेचा अभ्यास करून त्यांच्या रचनेची क्रमवारी सांगितली आहे. त्यांच्या नुसार – मंडळ ६, ३ व ७ ही सर्वात प्राचीन आहेत. त्यानंतर मंडळ ४ व २ रचले गेले. त्यानंतर मंडळ ५, ८ व ९ ची रचना करण्यात आली. आणि सगळ्यात शेवटी १० वे मंडळ रचले गेले. पहिल्या मंडळात मात्र सुरवातीपासून शेवटच्या काळापर्यंत सूक्तांची रचना करणे चालू होते.

ऋग्वेदातील सर्वात प्राचीन मंडळातील सूक्त सरस्वती नदीचे भरभरून वर्णन करतात. जसे –

अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति || २.४१.१६ ||

सर्वोत्तम माता, सर्वोत्तम नदी, सर्वोत्तम देवी सरस्वती! अशी तिची स्तुती आहे. वेदातील सरस्वती नदी ही वाणी, वाचा, शब्द, भाषा, संगीत, गायन, काव्य, वेद … एकूणच जे श्रोत्याकडून वक्त्याकडे वाहते अशा विद्येची देवता आहे. तसेच ही नदी हिमालयापासून सिंधुसागर पर्यंत वाहते असे वर्णन येते. खासच ही सूक्ते पहिल्या टप्प्यात लिहिली असणार.

ऋग्वेदाच्या १० व्या मंडळातील नदी सूक्तात (१०.७५) गंगा, यमुना, सरस्वती आदि नद्यांची नावे येतात. पण इथे सरस्वतीचा केवळ नाम्मोलेख येतो. स्तुती येत नाही. उलट सरस्वती पेक्षा अधिक महत्व सिंधू नदीला दिलेले दिसते. त्यावरून हे सूक्त नंतरच्या टप्प्यात लिहिले गेले असणार असे कळते.

ऋग्वेदातच सरस्वती नदीच्या प्रवासाची झलक दिसते. ऋग्वेदाच्या सुरुवातील असलेली ‘महा’नदी ऋग्वेदाच्या शेवटच्या काळात एक लहानशी नदी झाली आहे.

रामायणातील सरस्वती

रामायणात दशरथाच्या मृत्यूच्या वेळी भरत व शत्रुघ्न आजोळी होते. त्यांना अयोध्येतून आलेल्या दूतांकडून निरोप मिळताच ते आजोळहून म्हणजे केकय इथून अयोध्येला परत निघाले. हा परतीचा प्रवास भरताने एकसारखा ८ दिवस केला. वाल्मिकी रामायण सांगते की या प्रवासात त्याने सतलज, सरस्वती, यमुना, गंगा व गोमती नदी ओलांडली. या वर्णानातून सरस्वती नदीचे ठिकाण कळते (यमुना व सतलजच्या मध्ये). तसेच सतलज नदी पश्चिमेला वाहत होती हे देखील कळते. 

महाभारतातील सरस्वती

रामायणाच्या नंतर घडलेल्या महाभारतात, सरस्वतीचे त्या नंतरचे रूप कळते. महाभारतात १०० हून अधिक ठिकाणी सरस्वतीचे उल्लेख व माहिती आली आहे. तिच्या प्रवाहात अनेक ठिकाणी तळ्यांची निर्मिती झाली होती. काही ठिकाणी नदीला पुष्कळ पाणी होते. तर काही ठिकाणी ती वाळूच्या खाली अदृश्य झाली होती. विनाशन या ठिकाणी सरस्वती लुप्त झाली होती असा उल्लेख येतो. तसेच कुरुक्षेत्र हे सरस्वती व दृषद्वती या नद्यांच्या मध्ये होते हे देखील सांगितले आहे. सरस्वतीच्या काठाने अनेक तीर्थक्षेत्र असून महाभारताच्या वेळी सुद्धा या तीर्थक्षेत्रांशी अनेक पौराणिक कथा जडल्या होत्या. मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला सरस्वतीच्या काठावर घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती देतात. तर लोमश ऋषी असे सांगतात की तिच्या प्रवाहात सरस्वती नदी अनेक ठिकाणी लुप्त होते व अनेक ठिकाणी प्रगट होते. 

महाभारतीय युद्धाच्या दरम्यान बलराम तीर्थयात्रेला गेला होता. त्याने सरस्वती नदीच्या काठाने हा प्रवास केला. तो सांगतो – उदापना या ठिकाणी सरस्वती लुप्त झाली होती, मात्र मातीतील ओलाव्याने सरस्वतीचे तेथील  अस्तित्व कळत होते. तर आणखी एका ठिकाणी सरस्वतीचे पाण्याने भरलेले मोठे पात्र पाहून आश्चर्यचकित झाल्याचे नमूद केले आहे.

सहजच कळते की महाभारताच्या आधी सरस्वती एक महान नदी होती. तिच्या भोवती अनेक पौराणिक कथा गुंफल्या गेल्या होत्या. महाभारत काळात ती काही ठिकाणी लुप्त झाली असली तरी इतर ठिकाणी वाहती नदी होती.

निष्कर्ष

भूशास्त्रीय अभ्यास नुसार – फार पूर्वी यमुना व सतलज नदी सरस्वती नदीला मिळत होत्या. इस पूर्व ४७,००० (आजपासून साधारण ५० हजार वर्षांपूर्वी) यमुना नदीचा प्रवाह पूर्वेला सरकू लागला. कालांतराने यमुना गंगेला मिळाली. तसेच १५ हजार वर्षांपूर्वी सतलज नदी सुद्धा पश्चिमेला वळून सिंधू नदीला मिळाली. सरस्वतीच्या या दोन उपनद्या तिला सोडून गेल्यावर सरस्वती ‘महा’ नदी नाही राहिली. ऋग्वेदात प्राचीन ‘महा’सरस्वती चे वर्णन आले आहे. रामायणात सतलज पश्चिमेला वळली आहे. यमुना गंगेला मिळाली आहे. आणि महाभारतात सरस्वती ठिकठिकाणी गुप्त झाली आहे. भूशास्त्रीय अभ्यास व साहित्यिक टिपणी एकत्र करून ऋग्वेद, रामायण व महाभारताच्या काळाचा अंदाज बांधता येतो.

  • ७० हजार वर्षांपूर्वी – महा सरस्वती
  • ५० हजार वर्षांपूर्वी – यमुना गंगेकडे वळते
  • २४ हजार वर्षांपूर्वी – सरस्वती ‘लहान’ नदी होते
  • १५ हजार वर्षांपूर्वी – सतलज सिंधुकडे वळते
  • ४ हजार वर्षांपूर्वी – सरस्वती लुप्त होते

मी रामायण व महाभारतातील खगोलशास्त्रीय निरीक्षणांवरून काल काढला आहे. हा काल नदीच्या भूशास्त्रीय निष्कर्षांशी मिळता जुळता आहे –

  • २४ हजार वर्षांपूर्वी – च्या आधी ऋग्वेदाच्या रचनेला सुरुवात.
  • १४ हजार वर्षांपूर्वी – रामायण

७.५ हजार वर्षांपूर्वी – महाभारत आपण खरोखर भाग्यशाली आहोत की भारतीय संस्कृतीची खोलवर पोचलेली मुळे आपण प्राचीन साहित्यातून शोधू शकतो. प्राचीन भारतीय साहित्यातून मिळणारी माहिती केवळ नदीच्या प्रवाहाशी संबंधित नाही, तर इतरही अनेक अंगांची माहिती देते. जसे – जलविज्ञान, खगोलशास्त्र, कृषीविद्या, अनुवंशशास्त्र, भाषाशास्त्र, औषधशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र, भूगोल, तत्वज्ञान… आदि विस्तार आहे.

 

सरस्वती-सिंधू – खेळ आणि खेळणी

सरस्वती-सिंधू संस्कृतीची वैशिष्ठ्ये अशी– आखणी करून बांधलेली नगरे, नगरांना असलेली तटबंदी, त्यामधील काटकोनातील रस्ते, दोन किंवा तीन मजली घरे, घराघरात संडासची सोय, सांड पाण्याचा भुयारी मार्गाने निचरा करण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी वेगळी भुयारी व्यवस्था, पाणी साठवण्यासाठी मोठे हौद, विहिरी, बांधीव तळी, पुष्करणी, काही घरात मिळालेली यज्ञकुंड, दूर देशांशी चाललेला व्यापार, समुद्र मार्गाने व्यापार, जहाज बांधणी व दुरुस्ती करण्याची सोय, हस्तिदंताच्या वस्तू, दगडांपासून मणी व मण्यांपासून दागिने तयार करणारे कारखाने, नक्षीदार मातीची भांडी आणि लहान मुलांचे खेळ!

येथे केलेल्या उत्खननात मिळालेल्या वस्तूंवरून, येथील मुले कोणते खेळ खेळायचे, त्यांची खेळणी काय होती, मोठी माणसे सुद्धा काही खेळायची का, आदि गोष्टींचा मागोवा घेऊ. आपण पाहणार आहोत तो प्रदेश आहे – हरयाणा, पंजाब, राजस्थान, सिंध आणि गुजरातचा, आणि काळ आहे साधारण सामान्य युग पूर्व ७,५०० (7,500 BCE) ते सामान्य युग पूर्व १,५०० (1,500 BCE) दरम्यानचा. मुख्यत्वेकरून हे खेळ आहेत ४ ते ५ हजार वर्षांपूर्वीचे.

अगदी लहान मुलांसाठी असलेले खेळ प्रथम पाहू. लोथल येथे दोन सुबकशी मातीची भांडी मिळाली. त्या भांड्यांवर काळ्या रंगाच्या शाईने सुंदर चित्र काढले आहे. एक चित्र आहे – तहानलेल्या कावळ्याच्या गोष्टीचे. तळाशी पाणी गेलेल्या मडक्यात कावळा दगड टाकतो, आणि पाणी वर आल्यावर पाणी पिऊन तहान भागवतो. तर दुसरे चित्र आहे – चोचीत पुरी धरून झाडावर बसलेल्या कावळ्याचे. झाडाखाली एक लबाड लांडगा पुरीकडे आशाळभूतपणे पाहत आहे. आता तो लांडगा कावळ्याच्या गाण्याची स्तुती करणार, आणि कावळ्याने गाणे म्हणायला चोच उघडताच पुरी खाली पडली, की ती घेऊन तो पळून जाणार! ही भांडी  पाहून वाटते की, अरे! हे लहान मुलांसाठी केलेले चित्रांचे गोष्टीचे पुस्तक तर नाही! कोणा गुड्डी आणि बंटीची ही ठरलेली वाडगी होती का? दुपारच्या वेळी आई  त्यांना त्यांच्या ठरलेल्या वाडग्यातून खाऊ देत असे. मग गुड्डी आणि बंटी पायरीवर बसून खाऊ खातांना आपापल्या वाडग्यावरच्या चित्रातली गोष्ट एकमेकांना सांगत असतील का?

उत्खननातून वितभर किंवा त्याहून लहान मातीच्या पुतळ्या मिळाल्या आहेत. कोणी त्यांना मातृदेवता म्हणतात. कोणी शोभेच्या वस्तू म्हणतात. त्या लहान मुलींच्या खेळण्यातील बाहुल्या असतील का? आणखी मिळाली आहेत, छोटी छोटी भांडीकुंडी. पिटुकली वाटी, इत्कुसं ताट, लहानसा माठ, बारीकसा झाकणाचा सट आणिक काय काय. कुणा छकुलीने मैत्रिणींबरोबर ओसरीवर भातुकलीचा खेळ मांडला असेल का? पिटुकल्या वाटीतून खोटी-खोटी आमटी पितांना छकुलीने मैत्रिणीला फू-फू करून प्यायला सांगितले असेल?

आणि कोणा बंड्याने कधी “आता मी काय करू?” असे म्हणून फार कटकट केली, तर त्याची आई त्याला हा चक्रव्यूहाचा खेळ काढून देत असावी. मग थोडा वेळ एकट्याने बसून बंड्या हा खेळ खेळला असेल. मातीचे पिटुकले चेंडू चक्रव्यूहातून फिरवत फिरवत, खाली न पडता बरोब्बर मध्यभागी घेऊन जायचे!

लहान मुलांसाठी तयार केलेल्या सुंदरशा, पक्ष्यांच्या आकारातील अनेक शिट्ट्या मिळाल्या आहेत. अशा शिट्ट्या पाकिस्तान आणि भारतातील ग्रामीण भागात अजूनही मिळतात. एखाद्या सुस्त दुपारी, कुणा उनाड पोरांनी, या शिट्ट्या वाजवून वाजवून खूप आवाज केला असेल का?

खेळण्यातले मातीचे प्राणी आणि पक्षी देखील मिळाले आहेत. बैल, म्हैस, बकऱ्या, मेंढ्या, डुक्कर, वाघ, घोडा, गेंडा, माकड, कबुतर वगैरे प्राण्यांच्या छोट्या छोट्या प्रतिकृती. कदाचित लहान मुले आपापली चित्रे घेऊन एकमेकांकडे खेळायला जात असतील. त्यांच्या मेंढ्या एकमेकांना खोटी खोटी टक्कर देऊन शक्ती दाखवत असतील. किंवा सगळ्या गुरांना घेऊन चिंटी पिंटी पोरं, शेजारच्या अंगणात चरायला नेत असतील.

काही प्राण्यांना पायाशी फिरणारी चाके आहेत. त्यांना धरून ‘गाडी – गाडी’ करत फिरवले असेल. नुकतंच  चालायला लागलेली ठकी अशा प्राण्याची दोर हातात धरून त्याला घेऊन घरभर फिरली असेल. काही प्राण्यांची डोकी दोरीने पाठीला बांधली आहेत. मागून दोरी ओढली की तो प्राणी मान वर-खाली करतो. खेळायला आलेल्या पिंटूने मान डोलवणारा बैल असलेल्या चिंटूला, विचारले असेल – “सांग सांग भोलानाथ! पाऊस पडेल काय?” मग चिंटूने त्याच्या नंदीबैलाची मान वर खाली करून “हो! पाउस पडणार!!” असा संकेत दिला असेल! काय सांगावे?

थोड्या मोठ्या मुलांच्या खेळातल्या चकत्या सापडल्या आहेत. भाजलेल्या माती पासून केलेल्या एकापेक्षा एक लहान चकत्या, एकमेकांवर रचून ठेवताच मनात आरोळी उठते “ल S गो S री S S !” चिंध्यांचा चेंडू करून आज सुद्धा हा खेळ पाकिस्तान आणि भारतातील मुले खेळतात. तसेच मातीपासून तयार केलेल्या गोट्या आणि भोवरे मिळाले आहेत.

दोरीने हलवता येणाऱ्या प्राण्यांच्या व स्त्री पुरुषांच्या बाहुलीचे कठपुतलीचे खेळ केले असावेत. काही मातीचे मुखवटे सापडले आहेत त्या वरून असा अंदाज व्यक्त केला जातो की वेगवेगळे मुखवटे लावून कलाकार नाटकांचे खेळ सदर करत असावेत. धोलाविरा येथे एका रंगमंचाचे अवशेष सापडले आहेत. त्यावरून मनोरंजनासाठी असे खेळ करत असावेत असे वाटते.

या गावांतील उत्खननातून अनेक लहान गाड्या सापडल्या आहेत. या छोट्या हातगडीत भाजी ठेवून, कोणी बिट्टू “भाजी घ्या भाजी! ताजी ताजी भाजी!” म्हणत फिरला असेल. या सुबकशा बैलगाडीत भोलुने एक छोटासा गाडीवान बसवला असेल, अन् गाडीत गवताच्या लहान लहान पेंढ्या, नाहीतर भांडी भरून, वडिलांसारखं दुसऱ्या गावी समान विकायला घेऊन चालला असेल! आपली गाडी पळवत तो म्हणाला असेल, “ए! सरका सरका! बाजूला व्हा! माझ्या सर्जा राजाची गाडी चालली रे चालली! हुर्रर्रर्र!!”

काही बैठे खेळ सापडले आहेत जसे – बुद्धिबळासारखा वेगवेगळ्या प्रकारच्या सोंगट्या असलेला पट सापडला आहे. हा बुद्धिबळाचा प्राचीन प्रकार असावा असे मानले जाते. तसेच दगड, माती व हाडापासून तयार केलेले विविध प्रकारचे dice मिळाले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आखीव रेखीव पट सुद्धा मिळाले आहेत. लहान खळगे असलेला एक पट मिळाला आहे. त्यावर चिंचोके वापरून खेळले असावेत असे वाटते.

खेळांमध्ये व्यायाम धरायचा असेल, तर असे वाटते की सिंधू संस्कृतीच्या लोकांना योगासने माहित होती. योगासनाच्या वेगवेगळ्या मुद्रेतील मातीच्या कैक बाहुल्या मिळाल्या आहेत. कदाचित शोभेच्या बाहुल्या म्हणून त्या तयार केल्या असाव्यात. किंवा त्यांचा वापर योगासने शिकवण्यासाठी सुद्धा केला गेला असेल. कोण जाणे! हे लोक कुस्ती सारखे काही खेळ खेळायचे का? कोंबड्यांची किंवा मेंढ्यांची झुंज लावायचे का? एखादा पैलवान प्राण्याला झुंज द्यायचा का? असे प्रश्न अजूनतरी अनुत्तरीतच आहेत.

या प्राचीन काळातल्या, मातीत गढलेल्या वसाहतींमधले काय टिकले आहे, तर दगडाच्या, तांब्याच्या आणि मातीच्या वस्तू. बाकी कापडाच्या, लोकरीच्या, चामड्याच्या किंवा लाकडापासून तयार केलेल्या वस्तू काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला मिळतात ती फक्त मातीची आणि दगडाची खेळणी. लहान मुलींसाठी कापडाच्या बाहुल्या केल्या असतील तर ते कसे कळणार? किंवा रंगीत कापडाचे चौकाड्यांचे पट केले असतील तर कोणास ठाउक? किंवा विटीदांडू सारखा लाकडी वस्तूंनी खेळलेला खेळ असेल तर काय जाणो? या खेळांबद्दल जर कुठे लिहून ठेवले असेल तर एक मार्ग आहे. पण ते भूर्जपत्रावर लिहून ठेवले असेल तर काय उपयोग? तो लेख दगडावर नाहीतर मातीच्या फळ्यावर कोरला असता तर ठीकय. अर्थात, या लोकांनी लिहिलेले अजून वाचता येत नाही तो प्रश्न वेगळाच. असो. कसे कळावेत त्यांचे सगळे खेळ? शिवाय  इतर खेळ जे कोणत्याही साहित्याशिवाय खेळले जातात, जसे – सूरपारंब्या, पकडापकडी किंवा लपाछपी हे चित्रित करून ठेवले असतील तरच कळणार. ते सुद्धा दगडावर किंवा मातीच्या खापरावर चित्रित / मुद्रित केले असतील तरच.

अशा अनेक जर-तर मधून मिळणारे धागेदोरे अगदी थोडे आहेत. त्या सर्व पुराव्यांना धरून बांधता येतात ते केवळ अंदाज. आणि त्यामधून उमटते ते एक पुसटसे चित्र. जे पूर्ण दिसत नसल्याने अधिक आकर्षक होते. जे अस्पष्ट असल्याने बारकाईने पाहायला लावते. आणि उत्तरे देण्यापेक्षा आपल्यालाच प्रश्नांवर प्रश्न विचारते, “ओळख पाहू, हा खेळ कोणता असेल! असा खेळ तुझ्या लहानपणी होता का? आणि सांग बरे, चित केल्यावर आम्ही काय म्हणून चित्कार करायचो? सांग! सांग!! सुटतंय का कोडं? की हरलास?”

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा